विषय क्रमांक १ - शोले

Submitted by तुमचा अभिषेक on 20 August, 2012 - 09:00

"तू अजून शोले नाही पाहिलास...???" मी जवळजवळ किंचाळलोच.

जेव्हा कोणी शोले न पाहिलेला भेटतो तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया असते. माझी कशाला, ज्याने ज्याने शोले पाहिला आहे, या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशीच काहीशी असावी. समोरच्याला जेवढ्या केविलवाण्या नजरेने बघता येईल तेवढे नजरेत सहानुभुतीमिश्रित तुच्छतेचे भाव आणायचा मी प्रयत्न करतो. जर ते आणण्यासाठी अभिनयक्षमता कमी पडली तर असाच किंचाळतो. पण आता तर समोर खुद्द माझीच बायको होती. माझ्या बायकोने शोले बघितलेला नसणे हे मला माझेच कमीपण वाटू लागले. असे कसे मी कोणत्याही मुलीशी लग्न केले जिने आजवर शोले पाहिला नाही. छ्या.. माझा प्रेमविवाह नसता आणि अरेंज मॅरेज असते तर मी कांदेपोहे खाताखाता हाच प्रश्न विचारला असता कि, कितने आदमी थे.. म्हणजे.. आपलं.. कितनी बार शोले देखा है..?? आणि याचे उत्तर तीन पेक्षा कमी आले असते तर मुलगी तिथेच नापास.. एकवेळ एकदाही शोले न बघितलेल्या मुलीला मी निदान दया तरी दाखवली असती पण जिने एकदा पाहिला आणि परत बघावासा वाटला नाही तिची आणि माझी पत्रिका बघितली तर एकही गुण जुळणार नाही याची मला खात्रीच होती.

"नाही बघितला शोले, त्यात काय एवढे?" बायकोच्या या उलटहल्ल्याने मी भानावर आलो.

"त्यात काय एवढे? त्यात काय एवढे?? अरे शोले म्हणजे.. तू अजून शोले नाही पाहिला म्हणजे... अगं म्हणजे तू..." छ्या.. आयत्यावेळी शब्दच सुचत नव्हते. तिने शोले पाहिला नाही म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले आहे असे मला जे वाटत होते त्या भावना तिच्यापर्यंत कश्या पोहोचवाव्यात हेच समजत नव्हते.

बायको मला त्याच अवस्थेतच सोडून निघून गेली आणि मी स्वताशीच विचार करू लागलो... जो मला वीस-बावीस वर्षे मागे भूतकाळात घेऊन गेला..

मी तेव्हा तिसरी की चौथीत असावो. आजसारखे सतराशे साठ चॅनेल किंवा किंवा केबल टी.वी.चा जमाना नव्हता. आमच्या घरात तर ब्लॅक अ‍ॅंड व्हाइट टी.वी. वरच समाधान मानावे लागत होते. मामाकडे मात्र कलर टी.वी. आणि व्ही.सी.आर. देखील होता. त्यामुळे सुट्ट्या पडल्या की माझा मुक्काम मामाकडे ठरलेलाच असायचा. दहा रुपये भाड्याने विडीओ कॅसेट आणायच्या आणि दुसर्‍या दिवशी परत करायच्या. एखादा सिनेमा आवडलाच तर तो त्याच दिवशी दोनदाही बघितला जायचा. काय कसा माहीत नाही मला तेव्हा मिथुन चक्रवर्ती फार आवडायचा. आता तुम्ही लगेच माझ्याकडे अश्या विचित्र नजरेने बघू नका. असते एकेकाची आवड. मधल्या काळात मिथुनने केलेले "बी ग्रेड" सिनेमे पाहिलेल्यांना कदाचित माझी ही आवड पटणार नाही पण तेव्हा मिथुन म्हणजे डिस्कोडान्सर हे समीकरण माझ्या डोक्यात फिट् होते. तर माझ्या मामाकडचे सारे जण, ज्यात माझ्या वयाचा कोणीच नव्हता ते अमिताभ बच्चनचे चाहते होते. ताडमाड अंगकाठी असलेला हिरो ज्याला मिथुनसारखे कंबर मटकवत नाचता येत नाही तो कसा काय लोकांना आवडतो हे मला काही समजायचे नाही. त्यामुळे मला चिडवायला म्हणून मिथुन विरुद्ध अमिताभ हा वाद सारखा चालूच असायचा. आणि अश्यातच, एक दिवस शोलेची कॅसेट आणली गेली.

दरवेळी रात्रीचे जेवण आटोपून साडेनऊ-दहाला लागणारा चित्रपट मध्यांतराला पोहोचेपर्यंत माझी बत्ती गुल झालेली असायची पण अपवाद तीनसाडेतीन तासांच्या शोलेचा.. सुरुवातीचे घोड्यांवरून ट्रेनच्या पाठलागाचे दॄष्य आणि दरोडेखोरांच्या चित्रपटाला साजेशी बॅकग्राऊंड थीम, बघता बघता मला त्यातील वातावरणाशी एकरूप करून गेली. पुढचा सारा वेळ मी सुद्धा रामगड का रहिवासी बनून त्यांच्याच विश्वात हरवून गेलो. खरे सांगायचे तर मी तेव्हा त्यात काय पाहिले आणि मला काय आवडले हे आता मलाही आठवत नाही पण मध्यरात्री एक-दीड वाजता तो चित्रपट संपल्यावर मी पुन्हा एकदा लावा म्हणून असा काही दंगा घातला होता म्हणे, की घरचे अजूनही आठवण काढतात. कोणत्याही कलाकृतीला मी वन्समोअर म्हणून दिलेली माझ्या आयुष्यातील ती पहिलीच दाद असावी. त्या वयातही मला अस्सल कलेची जाण होती हे बघून आजही मला अभिमानाने गहिवरून येते. पुढच्या चार दिवसात मी घरच्याच टीवी व्हीसीआरचा फायदा उचलत आणखी पाच-सहा वेळा शोले पाहिला. आणि माझ्या बरोबरीने इच्छा असो वा नसो, घरच्या सर्वांनाही तो बघावा लागला. त्यानंतर पुढच्या काही वर्षांत तो कितीवेळा आणि कुठेकुठे पाहिला याची गिणती नसावी. अ‍ॅक्शन-कॉमेडी-रोमान्स-संगीत हिंदी चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर खरा उतरलेला चित्रपट, प्रत्येक वयोगटाला त्यात काही ना काही आवडीचे सापडेलच असा पण बायकोला नेमके काय सांगू हे मला अजूनही समजत नव्हते.

लहाणपणी मी जेव्हा जेव्हा शोले बघायचो तेव्हा घोड्यावरून डाकू आले की मी उत्स्फुर्तपणे उठून उभा राहायचो, अमिताभ बच्चनचा जय काही तेव्हा माझ्या फारसा आवडीचा नव्हता पण वीरू आणि बसंतीची बोलबच्चनगिरी मात्र करमणून करून जायची. अमजदभाई हे तर माझ्यासाठी हिरो होते त्या चित्रपटाचे. सर्वप्रथम माझे कोणाचे संवाद पाठ झाले असतील तर ते गब्बरसिंगचे. जगदीपचा सुरमा भोपाली, केष्टो मुखर्जीचा हरीराम न्हाई आणि असरानीचा अंग्रेजोके जमानेका जेलर तेव्हाही तेवढेच हसवून जायचे जेवढे आज हसवतात. जसे लहाणपणी आपण घर घर खेळायचो तसे शोले शोले खेळल्याचे आठवतेय. मित्राबरोबर साईड सीट असलेल्या स्कूटरवर बसून स्वताला जय वीरू समजून गाणे गायचे, हातात पट्टा घेऊन गब्बरसिंगचे डायलॉग मारायचे, अगदी हात शर्टाच्या आत लपवून ठाकूर बनण्यातही एक मजा होती.

शोलेमधील माझ्यासाठी सर्वात कंटाळवाणे कॅरेक्टर होते ते जया बच्चनचे. ते तसेच असणे का गरजेचे होते हे समजण्यासाठी मला जरा वयात यावे लागले.. आणि तोपर्यंत मला अमिताभही आवडू लागला होता.. त्यानंतर शोले बघण्यात एक वेगळीच मजा येऊ लागली. अमिताभचे खोचक डायलॉग आता खुसखुशीत वाटू लागले होते. "तुम्हारा नाम क्या है बसंती"ला सारे जण का हसायचे हे समजू लागले. यारी दोस्ती सबकुछ वाटायचे ते वय, "मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार.." असे गात ये दोस्ती हम नही तोडेंगे चे वचन देणारी जयवीरूची जोडी आपली वाटू लागली. शेवटी अमिताभ गेल्यानंतरचे दु:ख ही नकळत धर्मेंद्रच्या जागी स्वताला ठेऊन अनुभवले.

माझे वय वाढत गेले तसे चित्रपटसृष्टीत सुद्धा बदल घडत होते. शोलेची जादू ओसरली नसली तरी आता तो माझ्या हॉल ऑफ फेम मध्ये जाऊन बसला होता. माझी चित्रपटांची आवड बदलली होती. नव्वदीच्या दशकात मीच नव्हे तर माझ्या वयाच्या सार्‍या तरुण पिढीच्या डोक्यावर रोमॅंटीक चित्रपटांचे भूत चढले होते. याला जबाबदार होते ते बॉलीवूडचे तीन खान. सलमानचा "मैने प्यार किया", आमिरचा "कयामत से कयामत तक" आणि शाहरुखचा "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" या तीन चित्रपटांनी केलेले गारुड पाहता त्याच पठडीतले सिनेमे येऊ लागले. "दिल तो पागल है", "कुछ कुछ होता है" सारख्या सिनेमांनी मला शाहरुखच्या फॅनक्लबमध्ये नेऊन बसवले. चित्रपटसृष्टीचा पसारा वाढला होता. कलाकारांची नवी फळी तयार होत होती. नवे स्टार उदयाला येत होते. वर्षाला शे-दोनशे चित्रपट निघायला लागले. केबल टीवीचा जमाना आला आणि एकाच वेळी चौदा चॅनेलवर चौदा चित्रपट दिसू लागले. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत "शोले" असो वा "रामगोपाल वर्मा के शोले", सार्‍यांना एकाच तराजूत तोलले जाऊ लागले. चॅनेल सर्फ करता करता अधूनमधून शोलेची एखादी झलक कुठेतरी दिसायची, पण ती तेवढीच बघून मी देखील पुढच्या चॅनेलवर जाऊ लागलो. संगणक, ईंटरनेट, मोबाईलच्या वाढत्या वापराने मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध झाली आणि मोजकेच चित्रपट बघितले जाऊ लागले. हे मोजके चित्रपट देखील फारसा दर्जा राखून होते अश्यातला भाग नाही. एखादा तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकाच वेळी देशभरात हजारो चित्रपटगृहांमध्ये झळकून अ‍ॅडव्हान्स बूकींगमध्येच करोडोंचा गल्ला जमवू लागला. शोलेचा कमाईचा विक्रम अमुकतमुक चित्रपटाने तोडला अश्या बातम्या अधूनमधून कानावर यायच्या आणि त्यात किती फोलपणा आहे याची चर्चा करायला म्हणून शोलेच्या आठवणी निघायच्या. पण आज पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देताना माझ्या लक्षात आले की गेले काही वर्ष मीच स्वता शोले पाहिला नाही तर बायकोला काय समजवणार त्या बद्दल.

तरीही एवढ्या वर्षानंतरही शोले आज आपल्या आठवणीत का आहे याचे उत्तर शोधताना आठवत होते ते त्यातील अजरामर झालेले एकेक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरच्या तोंडी असलेले संवाद.. येस्स संवाद.. "ये हाथ मुझे दे दे ठाकूर" आणि "होली कब है, कब है होली?" असे विचारणार्‍या अमजदभाईंचा प्रत्येक संवाद स्वतामध्येच एक डायलॉग होता. पण त्याच जोडीने "मैने आपका नमक खाया है सरदार" असे बोलणारा कालियाही तेवढाच लक्षात राहतो. "भाग धन्नो, आज तेरे बसंती के इज्जत का सवाल है" बोलणार्‍या बसंतीबरोबरच तिच्या घोडी धन्नोलाही आपण विसरू शकत नाही ते याचमुळे. जेमेतेम दोन दृष्यात दिसणारे ए. के. हंगल ही "इतना सन्नाटा क्यू है भाई?" बोलत आपल्या आठवणींचा हिस्सा बनून जातात आणि त्याचमुळे सचिनने साकारलेला अहमद ही या आठवणींमध्ये एक जागा बनवतो. धरमजींनी आजवर किती चित्रपटात "कुत्ते कमीने" हा डायलॉग मारला हे माहीत नाही पण "बसंती ईन कुत्तोंके सामने मत नाचना" याचा नंबर त्यात सर्वात वरचा असावा हे नक्की. पाण्याच्या उंच टाकीवर चढून त्याने "सुसाइड सुसाईड" करत घातलेला गोंधळ तेवढाच अविस्मरणीय झाला आहे आणि "मौसीजी चक्की पिसिंग" मुळे बसंतीची मौसी सुद्धा कायम लक्षात राहते. एवढेच नाही तर "अरे भाई, ये सुसाईड क्या होता है?" विचारणारा गावकरीही अजून माझ्या डोळ्यासमोर येतो. अमिताभने बसंतीच्या मौसीकडे बसंती आणि वीरूच्या लग्नाची बोलणी करताना स्तुती करायच्या आविर्भावात धर्मेंद्रच्या वाईट सवयींचा पाढा वाचणे आणि सरतेशेवटी "अब क्या करू मौसी, मेरा तो दिल ही कुछ ऐसा है" असे बोलणे म्हणजे निव्वळ हास्याचा कडेलोट होता.

या साध्या साध्या वाक्यांमध्ये खरेच एवढा प्रभाव पाडायची ताकद होती का? की ही ताकद दिग्दर्शक रमेश सिप्पी, लेखक सलीम-जावेद आणि त्या दिग्गज अभिनेत्यांची होती? काही योग जुळूनच यावे लागतात असे म्हणतात. शोलेच्या बाबतीत प्रत्येक फ्रेममध्ये हे जुळून आले होते हे एक आश्चर्यच म्हणू शकतो. खरेच काही योग जुळायचेच होते म्हणूनच जयची भुमिका जी आधी शत्रुघ्न सिन्हा करणार होता ती अमिताभ बच्चनच्या पदरी आली. गब्बरसिंगच्या भुमिकेसाठी पहिली पसंती असलेला डॅनी डेंझोपा फिरोजखानच्या धर्मात्मामुळे वेळ देऊ न शकल्याने त्या भुमिकेचे सोने करायला अमजद खान अवतरला. धर्मेंद्र तर स्वत: संजीव कुमारने साकारलेली ठाकूर बलदेव सिंगची भुमिका करण्यास उत्सुक होता. पण असे काही घडणे नव्हतेच. याउलट स्वर्गात ज्या जोड्या जमवल्या गेल्या होत्या त्या इथेच जुळल्या. अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी. ऑनस्क्रीन रोमान्स जेव्हा ऑफस्क्रीनही घडतो तेव्हा तो परद्यावरही तेवढ्याच उत्कटतेने साकारला जातो याची प्रचिती शोले बघताना आल्याशिवाय राहत नाही. खास करून शोलेची अ‍ॅक्शन चित्रपट आणि धर्मेंद्रची अ‍ॅक्शन हिरो अशी ओळख असूनही धर्मेंद्र, हेमा मालिनीवर चित्रीत झालेली दृष्ये पाहताना त्यांच्यात जुळलेली केमिस्ट्री ही जाणवल्यावाचून राहत नाही.

सुमधुर संगीताशिवाय हिंदी चित्रपट हिट होणे शक्य नाही अश्या त्या काळात शोलेला हिट होण्यास संगीताची फारशी अशी गरज नव्हतीच. याउलट गाण्यांपेक्षाही ज्याचे संवाद जास्त लक्षात राहिले असा शोले हा त्या काळातील पहिलाच चित्रपट असावा. तरी शोलेची ही बाजूही कमकुवत नव्हती. "ये दोस्ती हम नही तोडेंगे" हे मैत्रीवरच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असावे. "मेहबूबा मेहबूबा" हे गाणे आजही तेवढीच झिंग आणते. विशेष म्हणजे तुम्ही कितव्यांदाही शोले बघत असला तरी ती गाणी टाळून तुम्हाला पुढे जावेसे वाटत नाही हेच त्या गाण्यांचे यश आहे आणि याचे श्रेय जेवढे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे आहे तेवढेच त्या गाण्यांच्या चित्रिकरणाचेही आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनीमुद्रणातल्या तांत्रिक बाबींबद्दल माझे ज्ञान तसे तोकडेच, पण शांततेचा भंग करत सूटलेल्या बंदूकीतील गोळीचा आणि तो घोड्याच्या टापांचा आवाज आजही कानात तसाच गुंजतो. ही सर्व त्या भारावलेल्या वातावरणाची जादूच असावी अन्यथा एवढा समरस मी आजवर कोणत्याही चित्रपटाशी झालो नव्हतो ना पुन्हा होईल असे वाटते.

सरतेशेवटी एवढेच सांगता येईल की शोले हा केवळ एक सिनेमा नव्हता तर भारतीय चित्रपटप्रेमींसाठी बायबल-गीता-कुराण होता. ज्याने तो पाहिला तोच हे समजू शकतो. न पाहिलेल्या माझ्या बायकोला ते काय रसायन होते हे निव्वळ शब्दांत समजवणे अशक्यच होते आणि म्हणूनच महिन्याभरापूर्वी मी खास बेत आखून शोलेची डीवीडी मिळवली आणि एकदाचा तिला लॅपटॉपवर दाखवला. पुर्ण चित्रपट बघून झाल्यावर मी तिला कसा वाटला हे विचारले. त्यावर तिचे औपचारीकता म्हणून आलेले "छान आहे" हे उत्तर थोडीशी चुटपुट लाऊन गेले खरे, पण या लेखाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मी शोलेचा विषय काढला आणि तिची उत्स्फुर्त प्रतिक्रिया, "बरेच दिवस झाले ना बघून, परत बघूया का?" .. हे बरेच दिवस म्हणजे केवळ एक महिना होता बरे का.. काही लोकांमध्ये विष हळूहळू भिनत असावे.

असो, मला मात्र हा लेख लिहायच्या आधी शोले बघायचा नव्हता. कदाचित या लेखाला डोक्यात ठेऊन त्या दृष्टीकोणातूनच सिनेमा बघितला जायची भिती होती. शोले मध्ये नेमके मला काय आवडले हे शोधायचा उगाच एक निष्फळ प्रयत्न झाला असता, जे आजवर भल्या भल्या समीक्षकांना जमले नाही. काही जण तर तो प्रदर्शित झाल्या झाल्याच पाश्चात्य चित्रपटांची फसलेली नक्कल म्हणून त्याला फ्लॉप घोषित करून बसले होते. पण पुढे जे झाले, तो इतिहास आहे. त्यातील बर्‍याच जणांनी आपली चूक कबूल केली तर काही जण अजूनही हे कोडे उलगडवत बसले असतील. पण काही उत्तरे न शोधण्यातच शहाणपणा असतो नाही का.. तरी तुम्ही बघा प्रयत्न करून.. तुम्हाला जमतेय का..!

- समाप्त -

........................................................................................

एखाद्याने आजवर शोले बघितला नसेल तर त्याने तो बघावा हा हेतू ठेऊन हा लेख लिहिला नाही, पण शोलेचा उल्लेख झाला नसता तर या एवढ्या सुंदर स्पर्धेत काहीतरी राहिल्यासारखे नक्कीच वाटले असते, तसे होऊ नये म्हणून हा लिखाणप्रपंच.

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोलेप्रेमीना एक प्रश्न :

शोलेमधल्या गावात लाइट नसतात म्हणे.

मग एवढी उंच पाण्याची टाकी कशासाठी बांधून ठेवतात? वीज नाही तर त्यात पाणी कसे भरत होते? >>>>>

हातपंप होता. पूर्वी ठाकूर चालवायचे. म्हणूनच गब्बरने ते हात काढून घेतले. आता जया भागदौडी चालवते

मस्त रे!
शोलेची गाणी वीक लिंक आहेतच, सिनेमाच्या नॅरेटीव्हमधे ती खट्कत नाहीत एवढेच त्यांचे विशेष.
अर्थात ती सगळी कसर आरडीने पार्श्वसंगीतात भरुन काढली आहे!

शोले मला प्रचंड आवडतो....
बस्स बाकी काहीही मत मांडणार नाही..., त्याची गरजच नाही !
लेखाबद्दल म्हणशील तर शॉल्लेटच रे Happy

क्या बताऊ मियाँ तुमना, कत्ती बडी आगगाडी होना उनो, पडदेके एक साईडसे लेको थेट दुसरे साईडतक जाती बे..
उसका जो आखरी डिब्बा होताय ना, वो गारडवाला, उसमें उनो ठाकुर बैठेला रैताय, अपना संजुकुमार बे, उसके पास दो कैदी होतेय, एक जय होर दुसरा वीरु... बोले तो बच्चन होर धरमींदर बे ! इत्ते में क्या होता की एकदम से किदरशे तो लै घोडे आतेय, एकदम तबड्ग तबडग.... तबड्ग तबडग....तबड्ग तबडग....तबड्ग तबडग....
बच्चन कैसा भारी मालुम, बोलताय...
हई विन्स्पेक्टरसायेब, देको, तुमना भरवसा हे तो हमना छोड दो थोडा टाईमके लिए. फिर देखो कैसे छटी का दुध याद दिलाते डाकुको...
फिर क्या मियाँ.... दोनोभी नुसते गोळ्या मारते सुटते देख, एकके बाद एक डाकु को मार डालते उनो. बीचमें क्या होताय की संजुकुमार को एक गोळी लगतीय देख. तो धरमींदर बोलताय, इनो तो गया रे जय, चल भागते है...
हेsssss इत्ता आसान नै होताय, अपना संजुकुमार गब्रु भी लै खतरा... वैसेच पेटमें गोली खाके हुबा रैताय होर बोलताय..
खबरदार, भागने की कोशीस करे तो गोल्या डाल दुंगा सिद्धे अंदर...!
अब बोल... Lol

अभिषेक जियो !!! या स्पर्धेतील इतर लेख वाचायचे आहेत. तुझ्या लेखात शोलेचे नाव पहिले आणि अजिबात राहवले नाही. एका दमात लेख वाचून काढला ..कारण.... मी पण एक खरीखुरी शोले प्रेमी आहे Happy
मस्तच लिहिलस रे. खूपश्या गोष्टी पटल्या. मी लहान असताना माझे आई, बाबा आणि बहिणी मला घरी ठेवून थीएटर मध्ये जाउन पिक्चर बघून आले होते .
ही गोष्ट मला खूप नंतर कळली आणि अजूनही मी या गोष्टी वरून त्यांच्याशी वाद घालते आणि थेटरात हा पिक्चर बघायला मिळाला नाही म्हणून हळहळते. अजूनही मोठ्या स्क्रीन वर शोले बघायची इच्छा आहे. ( 3D शोले येणार आहे असे वाचले. थीएटर मध्ये बघायला मिळणार म्हणून आतुरतेने वाट पाहत आहे.)
मलाही शाळेत असताना शोले बघताना स्क्रीन वर जया भादुरी आली कि कंटाळा यायचा. गब्बर सीन ने 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर ' म्हणत संजीव कुमार चे हात कापतानाचा सीन मी अजूनही बघितला नाही कारण आपोआप डोळ्यावर हात जातात. (डोळे हात न ठेवता ही बंद करता येतात , पण एखादा हॉरर सीन बघताना डोळे बंद करताना डोळ्यावर हात का जातो याचा शोध मला अजून नाही लागला.) कॉलेज मध्ये असताना शोले मधील जया चा अभिनय आवडायला लागला.
अरे बापरे !!! असे वाटते की दुसरा लेख तयार होईल. शोले हा विषयच असा आहे की नॉन स्टोप बोलत रहावेसे वाटते.
रार च्या मताशी सहमत. मला पण शोले मध्ये गाण्याची बाजू जरा वीक वाटते. पण तरीही शोले तो शोलेच.
होळीचा सण जवळ आला की कोणालाही होळी कधी आहे हे सरळ विचारायला जमतच नाही . "होली कब है, कब है होली?" बोलल्याशिवाय राहवतच नाही.
चानल सर्फिंग करताना शोले लागला की थांबल्या शिवाय रहावत नाही. बाबा वैतागतात काय हे किती वेळा बघणार. काम सोडून ते ही येवून बसतात . आम्ही दोघेही पुढचे पुढचे डायालोग्स बोलायला लागतो आणि पिक्चार पूर्ण बघितला जातो. Happy

online असणाऱ्या सगळ्यांसाठी एक प्रश्न. गुगल न करता पटकन उत्तर द्या. "शोले" मध्ये गब्बर सिंग चे नाव काय होते ? बघूया कोण सांगत पटकन ....

सामी... मलाही तुझा प्रतिसाद बघून हीच भिती (खरे तर आनंद) वाटली की ही आता दुसरा लेखच करते का.. खूप छान प्रतिसाद.. Happy

आणि ते गब्बरसिंगचे पुर्ण नाव हा प्रश्न जुनाच आहे.. उत्तर मागे माहीत होते आता विसरलो... Proud
कसे लक्षात राहणार.. गब्बरसिंगचे नाव अमजदखान आहे हे समजायला आणि ते लक्षात राहायला एक जमाना गेला.. Happy

मी पण शोले फॅन. मस्त लेख. गाणी सिच्युएशन प्रमाणे आहेत. पण मला कोई हसीना पण जाम आवड्ते. धरमपाजींनी हेमाजींना चिडवायचे मंजे क्क्क्क्क्क्क्कित्ती गोड. जया भादूरीच जाम पिडते. त्या तिच्यावाल्या होळीच्या सीन मध्ये. टायटल मुज्जीक पण मस्त आहे.

कितीही वेळा पाहून पाठ झाला तरी परत पहाताना नव्याने गवसणारा शोले........ बास एवढंच यापलिकडे अजून काही म्हणायचं नाहीये ...

अभिषेक, गाथाचित्रशतीत मी वाटच बघत होते शोले ची.. Happy छान लिहिलस, अजून बरंच काही आहे की रे लिहिण्यासारखं, फारच छोटा लेख केलास शोलेवर Proud

छान लिहिलाय लेख.
चांगली भट्टी जमलेला सिनेमा होता शोले.
त्या काळी मी दोनदा पाहिला होता.
दुसर्‍यांदा खास करून गब्बरसाठी.

मस्त लिहिलेय.....

एकदा "मेकिंग ऑफ शोले" नक्की वाचच...... त्यातले प्रत्यक्ष सेटवर घडलेले किस्से (स्पेश्यली वीरूचे) भन्नाट आहेत. अनबिलिवेबल.

माझ्या शोले अजून एका गोष्टीमुळे लक्षात राहिलाय.....

हनिमूनला गेलो तेंव्हा वाटेत शोलेचं शूटिंग झालेलं "रामगड" बायकोला दाखवलं ... आणि तिथून काही अंतरावर आमच्या इंडिकाला मेजर अपघात झाला...... कसेबसे वाचलो आम्ही Sad त्यामुळे रामगडच्या खडकाजवळ काढलेला त्या इंडिकाचा शेवटचा फोटो ही न विसरता येणारी आठवण आहे.

भुंगा...
मेकिंग ऑफ शोले चा बरेच जण उल्लेख करत आहेत.. म्हणजे योग आला तर वाचायला हवेच आता..
बाकी वीरू स्पॉटबॉय, लाईटमन यांना पैसे देऊन हेमामालिनी बरोबरचे रोमान्सवाले सीन बिघडवून रीटेक वर रीटेक घ्यायला लावायचा असा किस्सा मी ऐकून आहे..

मंजिरी,
एवढा पण छोटा लेख नाही आहे ग्ग.. भावना पोहोचवणे महत्वाचे होते.. Happy

छान लिहीले आहे... या स्पर्धेत "शोले" हवाच होता!

>>सुमधुर संगीताशिवाय हिंदी चित्रपट हिट होणे शक्य नाही अश्या त्या काळात शोलेला हिट होण्यास संगीताची फारशी अशी गरज नव्हतीच. याउलट गाण्यांपेक्षाही ज्याचे संवाद जास्त लक्षात राहिले असा शोले हा त्या काळातील पहिलाच चित्रपट असावा.

हेही खरेच. पण मुळात नेहेमीच्याच पठडीतला (म्हणजे संगीतप्रधान) असा शोले चित्रपट नव्हताच. जबरदस्त पटकथा, तितकेच जबरदस्त चित्रण, लोकेशन, पडद्यावरील अक्षरशः प्रत्त्येक पात्राला (हंगल आजोबा, सचिन, ठाकूर चा परिवार, त्यातील लहान मुलगा, नायक, नायिका, सांबा ते गब्बर) मिळालेली सशक्त स्पेस, थोडक्यात निव्वळ नायक, नायिका ई. सोडून सर्वार्थाने या चित्रपटाची पार्श्वभूमिक अंगे (दुसरा शब्द सुचत नाहीये) ईतकी प्रचंड परिणामकारक व ताकदीची होती की त्याला तितकेच परिणामकारक "पार्श्वसंगीत" असणे अधिक गरजेचे होते. ईतर गाणी हे निव्वळ कथानक पुढे जातानाच्या दृष्टीकोनातूनच असल्यासारखी आहेत. त्यामूळे त्या गाण्यांच्या संगीताची तुलना ईतर नेहेमीच्याच पठडीतल्या चित्रपटांशी करणे चूकीचेच ठरेल (स्वतः पंचम ने संगीत दिलेल्या चित्रपटांबाबत देखिल). किंबहुना,
१. गब्बर च्या "द एंट्री" चे म्युझिक.. त्याशिवाय गब्बर कसा वाटेल..?
२. ठाकूर च्या सर्व परिवाराची हत्त्या झाल्यावर नुसत्या रिकाम्या झुलणार्‍या झोपाळ्याचा काळीज फाडणारा आवाज आणि त्यामागचे मंद संगीत.. त्याशिवाय तो सिन कसा वाटेल..?
३. जया बच्चन दिवा विझवताना आपल्या हिरो ने वाजवलेला बाजा, किंवा त्या सिन पुरते वापरलेले पार्श्वसंगीत..
४. बसंती च्या मागे डाकू लागलेला तो फेमस सीन.. त्यातील पार्श्वसंगीतात वापर केलेल्या समता प्रसाद यांच्या रेल्याचा (तबल्यातील एक वादन प्रकार), घुंगरांचा, घोड्यांच्या टापांचा आवाज..
५. "कितने आदमी थे" च्या दृष्यात तिघांना गोळी मरल्यानंतरही मागे वापरलेल्या पक्षांचा कलकलाट.. (if i remember correct... will have to see it again!)
५. अगदी चित्रपटाच्या सुरुवातीची ट्रेन मधिल फेमस लढाई, त्यासाठी वापरलेले पार्श्वसंगीत..

अशी एक ना अनेक दृष्ये ही तितक्याच ताकदीच्या पार्श्वसंगीतामूळे अक्षरशः आरपार भिडतात. शोले चित्रपट अशा सर्वार्थाने एक "बखर" आहे. त्यातील निव्वळ पार्श्वसंगीतावरच एक लेख लिहीता येवू शकेल ईतके अचाट काम पंचम ने केले आहे. तेव्हड्यासाठी मुद्दामून पुनः चित्रपट बघून पुनः त्याबाबत लिहीणे आजही रोमांचक असेल. आणि पंचम ने हे सर्व त्या काळात केले जेव्हा आजकाल सारखे कुठलेही वा कशाही प्रकारचे आवाज्/ध्वनी/सँपल्स हे कोथिंबीर मसाल्याप्रमाणे बाजारात वा संगणकावर (आपल्याकडे) ऊपलब्ध नव्हते. ईतकेच नव्हे तर ते प्रोसेस करून, ध्वनिमुद्रीत करून, तितक्याच सफाईदारपणे मिक्स करून कुठेही चित्रपटातील संवाद वा ईतर गोष्टींना धक्का न लावता थेट प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यास लागणारी महागडी यंत्रसामुग्री देखिल सहज ऊपलब्ध नव्हती.

पंचम चे काम हे म्हणूनच ईतर कुठल्याही कालच्या वा आजच्या संगीतकारापेक्षा अधिक कौतूकास्पद ठरते कारण तंत्र आणि मंत्र यांचे ऊत्तम मिश्रण करून मुळात सशक्त (वा अशक्तही) असलेल्या निर्मीतीला त्याच्या प्रतीभेने व कामाने अधिक श्रीमंत करून सोडले आहे!

ईती पंचमसीमा.. Happy

शोले...........डिव्हीडी ५.१ मधे घरात लावुन बघा.................. अप्रतिम अनुभव आहे...........५.१ डिव्हीडीच घ्या पण... Wink जबदस्त साउंडइफेक्ट आहे....विशेषतः नाणे उडवल्याचा आणि घोड्यांचा टापांचा आवाज.......आपण तिथेच बसलो आहे असेच वाटते...

योग...
मस्तच प्रतिसाद...
ते पार्श्वसंगीत भन्नाटच होते यात वाद नाही.. पण त्यातील तांत्रिक बाबींच्या तोकड्या ज्ञानामुळे मी त्याचा उल्लेख मला झेपेल तेवढाच केला.. पण आपल्या पोस्टने ती कसर भरून काढली.. Happy

आर. डी. च्या fans ना दुखवायचे नाही पण मेहबूबा हे गाणे डेमीस रुसोस च्या गाण्याची copy आहे हे उल्लेखावयास हवे -

http://www.youtube.com/watch?v=4UJXgmPqAE4

मी स्वतः शोले ३७ वेळा पाहिला आहे. सगळी characters फेमस झालेला मला वाट्टं एकमेव चित्रपट. टीकाकारांच्या मते सर्वोत्तम चित्रपट नसेल कदाचित, पण आम्हा मित्र-मंडळींच्या भाषेत 'दिल खोल के' बनवलेला चित्रपट. माझ्या दृष्टी ने सर्वोत्तम!

आर. डी. च्या fans ना दुखवायचे नाही पण मेहबूबा हे गाणे डेमीस रुसोस च्या गाण्याची copy आहे हे उल्लेखावयास हवे -
>>>>>>>>

मागे मी एका साईटवर आपल्या आजवरच्या सार्‍या संगीतकारांनी किती आणि कुठून गाणी चोरलीत किंवा प्रेरणा घेतली याची लिस्ट होती...
सर्वात टॉपला अर्थात श्री अनू मलिकजी होते, ज्यांची ६५-७० गाणी असावीत..
आर.डी. ची लिस्ट मी आवर्जून पाहिली असतात त्यातही ८-१० गाणी होती..
मी खरे खोटे करायला ऐकत बसलो नाही पण तेव्हा त्यात "मेहबूबा" हे गाणे ही होते हे नक्की पाहिल्याचे मला आठवतेय.

योग,
Once upon a time in West हा चित्रपट पाहिल्यास, ठाकूर परिवार हत्या, mouth organ, पक्षांचा कलकलाट आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्त क्षणाचा silence हा शोले मधे उचलला आहे हे लक्षात येईल.

उदा - ठाकूर परिवार हत्या. खालील प्रसंग पाहिल्यास लक्षात येईल.
http://www.youtube.com/watch?v=_ptjc9Vono4

माझा हेतू आर. डी. किंवा शोले ला कमी दाखवणे नाही. परंतू एखादी कलाकृती अजून एका कलाकृती ला कारणीभूत झाली असेल तर ते वाचकांच्या नजरेस आणून देणे हा आहे.

ब्येस्टच!!!!! लेख छानच जमलाय... Happy

शोले... निदान १५-१६ वेळा तरी पाहिलाय... सगळे सीन्स, डायलॉग्ज आठवले Happy आता विकांताला परत पहायलाच हवा Happy

इथल्या एस बी एस नावाच्या चॅनलवर इंटर्नॅशनल मुव्हीज दाखवतात त्यात शोले किमान ३ वेळा तरी दाखवलाय आणि प्रत्येक वेळेस रात्री जागुन पाहिलाय Happy

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

छान लेख. शोले अप्रतिम... सर्वांचाच अभिनय उच्च दर्जाचा होता.

अभिषेक - स्पर्धेसाठी शुभेच्छा.

अतिशय सुरेख लेख. संपुर्ण कव्हरेज Happy

माझ्या लहानपणी जेव्हा अमिताभ बच्चन जबरदस्त चर्चेत होता.. तेव्हा तो माझ्या वडीलांना अजिबात आवडत नसे (अजूनही आवडत नाहीच) त्यामुळे मलाही आवडायचा नाही. सगळे 'शोले - शोले' करणार.. मला नेहमी प्रश्न.. इतकं काय आहे त्या सिनेमात? Uhoh
शोले मी पार कित्येक वर्षांनंतर पाहिला.. त्याआधी मी अमिताभचा मुक्कदर का सिकंदर पाहिला आणि तेव्हा मला कळलं की अमिताभ काय चीज आहे ते Proud तेव्हा तो मला आवडायला लागला आणि ते माझं स्वत:चं असं पहिलंवहिलं मत Proud जेव्हा शोले पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्याची खुमारी जाणवली नाही. पण त्यानंतर प्रत्येक वेळेला त्यातली मजा कळत गेली. अजरामर आणि अर्थपुर्ण संवाद. अगदी तो 'आक थु' हा डायलॉग असला तरी तो कहाणीत सुपर फिट च होता. कुत्ते कमिने, तुम्हारा नाम क्या है बसंती... पहली बार सुना है ये नाम..... एक ही संवाद व्यर्थ नव्हता.. शिवाय घेतलेली सर्व पात्रं सुद्धा अतिशय समर्पक होती... कोणतही कॅरेक्टर उगिचच घेतलंय हे मला एकदाही तो चित्रपट पाहताना जाणवलेलं नाही. अगदी अमिताभ आणि धर्मेंद्र जेव्हा ठाकूरच्या हवेलीवर येतात तेव्हा आल्या आल्या दोन भाडोत्री गुंडांबरोबरची त्यांची मारामारी, ते गुंड ही या दोघांइतकेच महत्वाचे होते. 'मैं देखना चाहता था की वो ही जोश तुममें अब भी बाकी है... या नही..'
जयाभादुरी नसती तर बरं झालं असतं असं मला ही एक दोनदा वाटून गेलं. पण त्यातल्या त्यातही या अ‍ॅक्शनपटात एक अबोल आणि हळूवार प्रेमकथा लेखकाने फुलवून चित्रपटाला चार चाँद लावले.
असो.. जितकं लिहू तितकं कमी.. शोले अगदी मोस्ट फेव्हरीट नसला तरी एनी टाईम आय अ‍ॅम रेडी टू वॉच.. Happy

शेळी .. मी सुद्धा आपण दिलेल्या लिंक बद्दलच बोलत होतो.. हीच ती लिंक.. Proud

दक्षिणा .. अगदी भरभरून प्रतिसाद.. बरीच मतेही जुळली.. Happy

अभिषेक, छान लेख.

आम्हाला मास कॉमला सलिम खान फिल्म अ‍ॅप्रीसीएशन शिकवायला यायचे. तेव्हा त्यांच्याबरोबर पाहिलेले सिनेमा: मुघलेआझम, सुजाता, मैने प्यार किया आणि शोले.

शोलेच्या वेळेला त्यानी "कुणी कुणी बघितला नाही?" हा प्रश्न विचारला. सोळापैकी सोळाही जणीनी एकपेक्षा जास्त वेळा सिनेमा पाहिला होता. त्यामुळे शोले आम्ही जवळ जवळ सहासात तास बघत होतो. मधेच सलीमसर पॉझ करायचे. एखादी आठवण किंवा गंमत सांगायचे, मग परत सिनेमा चालू.

Pages