"तू अजून शोले नाही पाहिलास...???" मी जवळजवळ किंचाळलोच.
जेव्हा कोणी शोले न पाहिलेला भेटतो तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया असते. माझी कशाला, ज्याने ज्याने शोले पाहिला आहे, या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशीच काहीशी असावी. समोरच्याला जेवढ्या केविलवाण्या नजरेने बघता येईल तेवढे नजरेत सहानुभुतीमिश्रित तुच्छतेचे भाव आणायचा मी प्रयत्न करतो. जर ते आणण्यासाठी अभिनयक्षमता कमी पडली तर असाच किंचाळतो. पण आता तर समोर खुद्द माझीच बायको होती. माझ्या बायकोने शोले बघितलेला नसणे हे मला माझेच कमीपण वाटू लागले. असे कसे मी कोणत्याही मुलीशी लग्न केले जिने आजवर शोले पाहिला नाही. छ्या.. माझा प्रेमविवाह नसता आणि अरेंज मॅरेज असते तर मी कांदेपोहे खाताखाता हाच प्रश्न विचारला असता कि, कितने आदमी थे.. म्हणजे.. आपलं.. कितनी बार शोले देखा है..?? आणि याचे उत्तर तीन पेक्षा कमी आले असते तर मुलगी तिथेच नापास.. एकवेळ एकदाही शोले न बघितलेल्या मुलीला मी निदान दया तरी दाखवली असती पण जिने एकदा पाहिला आणि परत बघावासा वाटला नाही तिची आणि माझी पत्रिका बघितली तर एकही गुण जुळणार नाही याची मला खात्रीच होती.
"नाही बघितला शोले, त्यात काय एवढे?" बायकोच्या या उलटहल्ल्याने मी भानावर आलो.
"त्यात काय एवढे? त्यात काय एवढे?? अरे शोले म्हणजे.. तू अजून शोले नाही पाहिला म्हणजे... अगं म्हणजे तू..." छ्या.. आयत्यावेळी शब्दच सुचत नव्हते. तिने शोले पाहिला नाही म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले आहे असे मला जे वाटत होते त्या भावना तिच्यापर्यंत कश्या पोहोचवाव्यात हेच समजत नव्हते.
बायको मला त्याच अवस्थेतच सोडून निघून गेली आणि मी स्वताशीच विचार करू लागलो... जो मला वीस-बावीस वर्षे मागे भूतकाळात घेऊन गेला..
मी तेव्हा तिसरी की चौथीत असावो. आजसारखे सतराशे साठ चॅनेल किंवा किंवा केबल टी.वी.चा जमाना नव्हता. आमच्या घरात तर ब्लॅक अॅंड व्हाइट टी.वी. वरच समाधान मानावे लागत होते. मामाकडे मात्र कलर टी.वी. आणि व्ही.सी.आर. देखील होता. त्यामुळे सुट्ट्या पडल्या की माझा मुक्काम मामाकडे ठरलेलाच असायचा. दहा रुपये भाड्याने विडीओ कॅसेट आणायच्या आणि दुसर्या दिवशी परत करायच्या. एखादा सिनेमा आवडलाच तर तो त्याच दिवशी दोनदाही बघितला जायचा. काय कसा माहीत नाही मला तेव्हा मिथुन चक्रवर्ती फार आवडायचा. आता तुम्ही लगेच माझ्याकडे अश्या विचित्र नजरेने बघू नका. असते एकेकाची आवड. मधल्या काळात मिथुनने केलेले "बी ग्रेड" सिनेमे पाहिलेल्यांना कदाचित माझी ही आवड पटणार नाही पण तेव्हा मिथुन म्हणजे डिस्कोडान्सर हे समीकरण माझ्या डोक्यात फिट् होते. तर माझ्या मामाकडचे सारे जण, ज्यात माझ्या वयाचा कोणीच नव्हता ते अमिताभ बच्चनचे चाहते होते. ताडमाड अंगकाठी असलेला हिरो ज्याला मिथुनसारखे कंबर मटकवत नाचता येत नाही तो कसा काय लोकांना आवडतो हे मला काही समजायचे नाही. त्यामुळे मला चिडवायला म्हणून मिथुन विरुद्ध अमिताभ हा वाद सारखा चालूच असायचा. आणि अश्यातच, एक दिवस शोलेची कॅसेट आणली गेली.
दरवेळी रात्रीचे जेवण आटोपून साडेनऊ-दहाला लागणारा चित्रपट मध्यांतराला पोहोचेपर्यंत माझी बत्ती गुल झालेली असायची पण अपवाद तीनसाडेतीन तासांच्या शोलेचा.. सुरुवातीचे घोड्यांवरून ट्रेनच्या पाठलागाचे दॄष्य आणि दरोडेखोरांच्या चित्रपटाला साजेशी बॅकग्राऊंड थीम, बघता बघता मला त्यातील वातावरणाशी एकरूप करून गेली. पुढचा सारा वेळ मी सुद्धा रामगड का रहिवासी बनून त्यांच्याच विश्वात हरवून गेलो. खरे सांगायचे तर मी तेव्हा त्यात काय पाहिले आणि मला काय आवडले हे आता मलाही आठवत नाही पण मध्यरात्री एक-दीड वाजता तो चित्रपट संपल्यावर मी पुन्हा एकदा लावा म्हणून असा काही दंगा घातला होता म्हणे, की घरचे अजूनही आठवण काढतात. कोणत्याही कलाकृतीला मी वन्समोअर म्हणून दिलेली माझ्या आयुष्यातील ती पहिलीच दाद असावी. त्या वयातही मला अस्सल कलेची जाण होती हे बघून आजही मला अभिमानाने गहिवरून येते. पुढच्या चार दिवसात मी घरच्याच टीवी व्हीसीआरचा फायदा उचलत आणखी पाच-सहा वेळा शोले पाहिला. आणि माझ्या बरोबरीने इच्छा असो वा नसो, घरच्या सर्वांनाही तो बघावा लागला. त्यानंतर पुढच्या काही वर्षांत तो कितीवेळा आणि कुठेकुठे पाहिला याची गिणती नसावी. अॅक्शन-कॉमेडी-रोमान्स-संगीत हिंदी चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर खरा उतरलेला चित्रपट, प्रत्येक वयोगटाला त्यात काही ना काही आवडीचे सापडेलच असा पण बायकोला नेमके काय सांगू हे मला अजूनही समजत नव्हते.
लहाणपणी मी जेव्हा जेव्हा शोले बघायचो तेव्हा घोड्यावरून डाकू आले की मी उत्स्फुर्तपणे उठून उभा राहायचो, अमिताभ बच्चनचा जय काही तेव्हा माझ्या फारसा आवडीचा नव्हता पण वीरू आणि बसंतीची बोलबच्चनगिरी मात्र करमणून करून जायची. अमजदभाई हे तर माझ्यासाठी हिरो होते त्या चित्रपटाचे. सर्वप्रथम माझे कोणाचे संवाद पाठ झाले असतील तर ते गब्बरसिंगचे. जगदीपचा सुरमा भोपाली, केष्टो मुखर्जीचा हरीराम न्हाई आणि असरानीचा अंग्रेजोके जमानेका जेलर तेव्हाही तेवढेच हसवून जायचे जेवढे आज हसवतात. जसे लहाणपणी आपण घर घर खेळायचो तसे शोले शोले खेळल्याचे आठवतेय. मित्राबरोबर साईड सीट असलेल्या स्कूटरवर बसून स्वताला जय वीरू समजून गाणे गायचे, हातात पट्टा घेऊन गब्बरसिंगचे डायलॉग मारायचे, अगदी हात शर्टाच्या आत लपवून ठाकूर बनण्यातही एक मजा होती.
शोलेमधील माझ्यासाठी सर्वात कंटाळवाणे कॅरेक्टर होते ते जया बच्चनचे. ते तसेच असणे का गरजेचे होते हे समजण्यासाठी मला जरा वयात यावे लागले.. आणि तोपर्यंत मला अमिताभही आवडू लागला होता.. त्यानंतर शोले बघण्यात एक वेगळीच मजा येऊ लागली. अमिताभचे खोचक डायलॉग आता खुसखुशीत वाटू लागले होते. "तुम्हारा नाम क्या है बसंती"ला सारे जण का हसायचे हे समजू लागले. यारी दोस्ती सबकुछ वाटायचे ते वय, "मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार.." असे गात ये दोस्ती हम नही तोडेंगे चे वचन देणारी जयवीरूची जोडी आपली वाटू लागली. शेवटी अमिताभ गेल्यानंतरचे दु:ख ही नकळत धर्मेंद्रच्या जागी स्वताला ठेऊन अनुभवले.
माझे वय वाढत गेले तसे चित्रपटसृष्टीत सुद्धा बदल घडत होते. शोलेची जादू ओसरली नसली तरी आता तो माझ्या हॉल ऑफ फेम मध्ये जाऊन बसला होता. माझी चित्रपटांची आवड बदलली होती. नव्वदीच्या दशकात मीच नव्हे तर माझ्या वयाच्या सार्या तरुण पिढीच्या डोक्यावर रोमॅंटीक चित्रपटांचे भूत चढले होते. याला जबाबदार होते ते बॉलीवूडचे तीन खान. सलमानचा "मैने प्यार किया", आमिरचा "कयामत से कयामत तक" आणि शाहरुखचा "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" या तीन चित्रपटांनी केलेले गारुड पाहता त्याच पठडीतले सिनेमे येऊ लागले. "दिल तो पागल है", "कुछ कुछ होता है" सारख्या सिनेमांनी मला शाहरुखच्या फॅनक्लबमध्ये नेऊन बसवले. चित्रपटसृष्टीचा पसारा वाढला होता. कलाकारांची नवी फळी तयार होत होती. नवे स्टार उदयाला येत होते. वर्षाला शे-दोनशे चित्रपट निघायला लागले. केबल टीवीचा जमाना आला आणि एकाच वेळी चौदा चॅनेलवर चौदा चित्रपट दिसू लागले. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत "शोले" असो वा "रामगोपाल वर्मा के शोले", सार्यांना एकाच तराजूत तोलले जाऊ लागले. चॅनेल सर्फ करता करता अधूनमधून शोलेची एखादी झलक कुठेतरी दिसायची, पण ती तेवढीच बघून मी देखील पुढच्या चॅनेलवर जाऊ लागलो. संगणक, ईंटरनेट, मोबाईलच्या वाढत्या वापराने मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध झाली आणि मोजकेच चित्रपट बघितले जाऊ लागले. हे मोजके चित्रपट देखील फारसा दर्जा राखून होते अश्यातला भाग नाही. एखादा तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकाच वेळी देशभरात हजारो चित्रपटगृहांमध्ये झळकून अॅडव्हान्स बूकींगमध्येच करोडोंचा गल्ला जमवू लागला. शोलेचा कमाईचा विक्रम अमुकतमुक चित्रपटाने तोडला अश्या बातम्या अधूनमधून कानावर यायच्या आणि त्यात किती फोलपणा आहे याची चर्चा करायला म्हणून शोलेच्या आठवणी निघायच्या. पण आज पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देताना माझ्या लक्षात आले की गेले काही वर्ष मीच स्वता शोले पाहिला नाही तर बायकोला काय समजवणार त्या बद्दल.
तरीही एवढ्या वर्षानंतरही शोले आज आपल्या आठवणीत का आहे याचे उत्तर शोधताना आठवत होते ते त्यातील अजरामर झालेले एकेक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरच्या तोंडी असलेले संवाद.. येस्स संवाद.. "ये हाथ मुझे दे दे ठाकूर" आणि "होली कब है, कब है होली?" असे विचारणार्या अमजदभाईंचा प्रत्येक संवाद स्वतामध्येच एक डायलॉग होता. पण त्याच जोडीने "मैने आपका नमक खाया है सरदार" असे बोलणारा कालियाही तेवढाच लक्षात राहतो. "भाग धन्नो, आज तेरे बसंती के इज्जत का सवाल है" बोलणार्या बसंतीबरोबरच तिच्या घोडी धन्नोलाही आपण विसरू शकत नाही ते याचमुळे. जेमेतेम दोन दृष्यात दिसणारे ए. के. हंगल ही "इतना सन्नाटा क्यू है भाई?" बोलत आपल्या आठवणींचा हिस्सा बनून जातात आणि त्याचमुळे सचिनने साकारलेला अहमद ही या आठवणींमध्ये एक जागा बनवतो. धरमजींनी आजवर किती चित्रपटात "कुत्ते कमीने" हा डायलॉग मारला हे माहीत नाही पण "बसंती ईन कुत्तोंके सामने मत नाचना" याचा नंबर त्यात सर्वात वरचा असावा हे नक्की. पाण्याच्या उंच टाकीवर चढून त्याने "सुसाइड सुसाईड" करत घातलेला गोंधळ तेवढाच अविस्मरणीय झाला आहे आणि "मौसीजी चक्की पिसिंग" मुळे बसंतीची मौसी सुद्धा कायम लक्षात राहते. एवढेच नाही तर "अरे भाई, ये सुसाईड क्या होता है?" विचारणारा गावकरीही अजून माझ्या डोळ्यासमोर येतो. अमिताभने बसंतीच्या मौसीकडे बसंती आणि वीरूच्या लग्नाची बोलणी करताना स्तुती करायच्या आविर्भावात धर्मेंद्रच्या वाईट सवयींचा पाढा वाचणे आणि सरतेशेवटी "अब क्या करू मौसी, मेरा तो दिल ही कुछ ऐसा है" असे बोलणे म्हणजे निव्वळ हास्याचा कडेलोट होता.
या साध्या साध्या वाक्यांमध्ये खरेच एवढा प्रभाव पाडायची ताकद होती का? की ही ताकद दिग्दर्शक रमेश सिप्पी, लेखक सलीम-जावेद आणि त्या दिग्गज अभिनेत्यांची होती? काही योग जुळूनच यावे लागतात असे म्हणतात. शोलेच्या बाबतीत प्रत्येक फ्रेममध्ये हे जुळून आले होते हे एक आश्चर्यच म्हणू शकतो. खरेच काही योग जुळायचेच होते म्हणूनच जयची भुमिका जी आधी शत्रुघ्न सिन्हा करणार होता ती अमिताभ बच्चनच्या पदरी आली. गब्बरसिंगच्या भुमिकेसाठी पहिली पसंती असलेला डॅनी डेंझोपा फिरोजखानच्या धर्मात्मामुळे वेळ देऊ न शकल्याने त्या भुमिकेचे सोने करायला अमजद खान अवतरला. धर्मेंद्र तर स्वत: संजीव कुमारने साकारलेली ठाकूर बलदेव सिंगची भुमिका करण्यास उत्सुक होता. पण असे काही घडणे नव्हतेच. याउलट स्वर्गात ज्या जोड्या जमवल्या गेल्या होत्या त्या इथेच जुळल्या. अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी. ऑनस्क्रीन रोमान्स जेव्हा ऑफस्क्रीनही घडतो तेव्हा तो परद्यावरही तेवढ्याच उत्कटतेने साकारला जातो याची प्रचिती शोले बघताना आल्याशिवाय राहत नाही. खास करून शोलेची अॅक्शन चित्रपट आणि धर्मेंद्रची अॅक्शन हिरो अशी ओळख असूनही धर्मेंद्र, हेमा मालिनीवर चित्रीत झालेली दृष्ये पाहताना त्यांच्यात जुळलेली केमिस्ट्री ही जाणवल्यावाचून राहत नाही.
सुमधुर संगीताशिवाय हिंदी चित्रपट हिट होणे शक्य नाही अश्या त्या काळात शोलेला हिट होण्यास संगीताची फारशी अशी गरज नव्हतीच. याउलट गाण्यांपेक्षाही ज्याचे संवाद जास्त लक्षात राहिले असा शोले हा त्या काळातील पहिलाच चित्रपट असावा. तरी शोलेची ही बाजूही कमकुवत नव्हती. "ये दोस्ती हम नही तोडेंगे" हे मैत्रीवरच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असावे. "मेहबूबा मेहबूबा" हे गाणे आजही तेवढीच झिंग आणते. विशेष म्हणजे तुम्ही कितव्यांदाही शोले बघत असला तरी ती गाणी टाळून तुम्हाला पुढे जावेसे वाटत नाही हेच त्या गाण्यांचे यश आहे आणि याचे श्रेय जेवढे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे आहे तेवढेच त्या गाण्यांच्या चित्रिकरणाचेही आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनीमुद्रणातल्या तांत्रिक बाबींबद्दल माझे ज्ञान तसे तोकडेच, पण शांततेचा भंग करत सूटलेल्या बंदूकीतील गोळीचा आणि तो घोड्याच्या टापांचा आवाज आजही कानात तसाच गुंजतो. ही सर्व त्या भारावलेल्या वातावरणाची जादूच असावी अन्यथा एवढा समरस मी आजवर कोणत्याही चित्रपटाशी झालो नव्हतो ना पुन्हा होईल असे वाटते.
सरतेशेवटी एवढेच सांगता येईल की शोले हा केवळ एक सिनेमा नव्हता तर भारतीय चित्रपटप्रेमींसाठी बायबल-गीता-कुराण होता. ज्याने तो पाहिला तोच हे समजू शकतो. न पाहिलेल्या माझ्या बायकोला ते काय रसायन होते हे निव्वळ शब्दांत समजवणे अशक्यच होते आणि म्हणूनच महिन्याभरापूर्वी मी खास बेत आखून शोलेची डीवीडी मिळवली आणि एकदाचा तिला लॅपटॉपवर दाखवला. पुर्ण चित्रपट बघून झाल्यावर मी तिला कसा वाटला हे विचारले. त्यावर तिचे औपचारीकता म्हणून आलेले "छान आहे" हे उत्तर थोडीशी चुटपुट लाऊन गेले खरे, पण या लेखाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मी शोलेचा विषय काढला आणि तिची उत्स्फुर्त प्रतिक्रिया, "बरेच दिवस झाले ना बघून, परत बघूया का?" .. हे बरेच दिवस म्हणजे केवळ एक महिना होता बरे का.. काही लोकांमध्ये विष हळूहळू भिनत असावे.
असो, मला मात्र हा लेख लिहायच्या आधी शोले बघायचा नव्हता. कदाचित या लेखाला डोक्यात ठेऊन त्या दृष्टीकोणातूनच सिनेमा बघितला जायची भिती होती. शोले मध्ये नेमके मला काय आवडले हे शोधायचा उगाच एक निष्फळ प्रयत्न झाला असता, जे आजवर भल्या भल्या समीक्षकांना जमले नाही. काही जण तर तो प्रदर्शित झाल्या झाल्याच पाश्चात्य चित्रपटांची फसलेली नक्कल म्हणून त्याला फ्लॉप घोषित करून बसले होते. पण पुढे जे झाले, तो इतिहास आहे. त्यातील बर्याच जणांनी आपली चूक कबूल केली तर काही जण अजूनही हे कोडे उलगडवत बसले असतील. पण काही उत्तरे न शोधण्यातच शहाणपणा असतो नाही का.. तरी तुम्ही बघा प्रयत्न करून.. तुम्हाला जमतेय का..!
- समाप्त -
........................................................................................
एखाद्याने आजवर शोले बघितला नसेल तर त्याने तो बघावा हा हेतू ठेऊन हा लेख लिहिला नाही, पण शोलेचा उल्लेख झाला नसता तर या एवढ्या सुंदर स्पर्धेत काहीतरी राहिल्यासारखे नक्कीच वाटले असते, तसे होऊ नये म्हणून हा लिखाणप्रपंच.
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
छान रे........... अगदी झकास
छान रे........... अगदी झकास लिहिले आहेस.......
शोलेबद्दलच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. आज इतक्या वर्षांनंतरही हाच सर्वात आवडलेला भारतीय सिनेमा आहे.
हाहाहा...मीसुद्धा शोले गेल्या
हाहाहा...मीसुद्धा शोले गेल्या महिन्यात पहिल्यांदा पूर्ण पाहिला.
बच्चनसाहेब मरतात म्हणून मला अजूनही चुटपुट लागते. (अमिताभ बच्चन माझा ऑल टाइम क्रश :फिदी:)
लेख छान झालाय.
मस्त लिहिलेय. मी दहावीत
मस्त लिहिलेय.
मी दहावीत असताना तो लागला आणि बी कॉम होईपर्यंत, तिथेच होता.
कितने आदमी थे .. वगैरे तर आमच्या अगदी तोंडात असायचे.
लेख सावकाश वाचते.. शोलेवर
लेख सावकाश वाचते..
शोलेवर कितीही लिहिलं आणि कितीही वेळा वाचलं तरी छानच वाटतं...
पण आवर्जुन सांगावसं वाटतं ते म्हणजे 'मेकिंग ऑफ शोले' हे अनुपमा चोप्राने लिहिलेलं पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे..
मस्त लिहीलय. जयाच्या
मस्त लिहीलय. जयाच्या व्यक्तीरेखेबद्दल लिहिले नाही? जयाच्या वाट्याला खूप प्रसंग नाहीयेत पण जे आले आहेत त्यांचे मुद्राभिनयाने तिने खरेच सोने केले आहे.
शोलेवर कितीही लिहिलं आणि
शोलेवर कितीही लिहिलं आणि कितीही वेळा वाचलं तरी छानच वाटतं... >> +१.
शोले न बघितलेली लोक पण असतात. देव त्यांना सद्बुद्धी देवो.
निशदे.. धन्स रे.. भारतीय या
निशदे.. धन्स रे.. भारतीय या शब्दाने थोडासा खट्टू झालो रे..
पण सर्वात आवडता भारतीय चित्रपट या कॅटेगरीखाली आपली आवड जुळणे हे ही नसे थोडके.. आणि असे बरेच असावेत.. 
रुणझुणू...
हाहाहा...मीसुद्धा शोले गेल्या महिन्यात पहिल्यांदा पूर्ण पाहिला.
>>>>>>
आणि यावर तुला हक्काबक्का होऊन प्रतिक्रिया देणारा मीच होतो..
शैलजा..
जया बच्चनचा उल्लेख केला आहेच... पण तिच्या मुद्राअभिनयाबद्दल का नाही लिहिले असे विचाराल तर एवढेच म्हणेन की तो मुद्दा आपल्या प्रतिसादासाठी सोडला होता..
अवांतर - जयाच्या मुद्राभिनयावरून आठवले.. कभी खुशी कभी गम मध्ये शाहरुख खानच्या हेलिकॉप्टरवाल्या एंट्रीला आणि कल हो ना हो मध्येही त्यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाला, दोन्हींमध्ये दाराकडे नजर लाऊन असलेल्या तिच्या चेहर्यात आशा, निराशा आणि मग आनंद हे अनुक्रमे येणारे भाव बघण्यासारखे आहेत.
>>तो मुद्दा आपल्या
>>तो मुद्दा आपल्या प्रतिसादासाठी सोडला होता.. >> घ्या!

आता मग काय बोलणार हो..
आता मग काय बोलणार हो.. प्रत्येकाच्या आठवणीतला शोले हजार पानांच्या पुस्तकात तरी मावेल का..
तुमच्याच आठवणीतली जया लिहा
तुमच्याच आठवणीतली जया लिहा हो. शोलेमध्ये तिने बसंतीएवढी बकबक केली नाही म्हणून काय झालं? जयला आवडली होती तीच. पण शेवटी त्यालाच मारुन टाकलं. (ह्या बाबीचा निषेध आहे! )
अभिषेक , छान लिहिलय . माझ्या
अभिषेक , छान लिहिलय . माझ्या मते शोले च्या यशाच खर रहस्य होत त्यातले साम्भा , कालीया , सुरमा भोपाली आणी अंग्रेजो के जमाने के जेलर ....
झालच तर कुत्ते कमीने करून जो वीरू नंतर एकटाच सगळ्या गँग ला मारतो , तो बरोबर जय असताना आधी का पळतो हे मला लहानपणापासून न कळलेल कोडं आहे . जय साईड हिरो असल्यामुळे त्याने मरायचे असते अस माझ्या भावाने मला स्पष्टीकरण दिल होत .
पण शेवटी त्यालाच मारुन टाकलं.
पण शेवटी त्यालाच मारुन टाकलं. (ह्या बाबीचा निषेध आहे! ) >> +१०००००००००००
मलाही नाही आवडलं हे.
'शोले' ही एक 'घागर में
'शोले' ही एक 'घागर में सागर'सारख्या जादूच्या प्रयोगांतल्या पाण्यासारखी न संपणारी जादू आहे
तुमच्या लेखातली विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत 'शोले' आवडण्याची कारणं कशी बदलत गेली ते प्रांजळपणे लिहिलंय. rarने लिहिल्याप्रमाणे 'मेकिंग ऑफ शोले' हे एक अप्रतिम पुस्तक आहे. प्रत्येक 'शोले'प्रेमीने आवर्जून वाचावं.
अवांतर - मला नेहमी वाटतं की अगदी 'शोले' इतकी नाही तरी 'शान' हीसुद्धा एक चांगली जमलेली भट्टी होती. 'शान'चा मुख्य प्रॉब्लेम हा झाली की 'शोले'नंतरचा रमेश सिप्पीचा तो पहिला सिनेमा होता. दहावीच्या मेरिट लिस्टमधे पहिल्या आलेल्या वगैरे अशा मुलाच्या / मुलीच्या धाकट्या भावंडाकडून जशा त्याचप्रकारच्या अपेक्षा ठेवल्या जातात, साधारण तोच प्रकार 'शान'च्या बाबतीत झाला
छान लिहीले...... . . मी पण या
छान लिहीले......
.
.
मी पण या वरच लिहीणार होतो.....
.
.
आता ..."राम गोपाल वर्मा के शोले" वर लिहीण्याचा विचार करतोय...
उदयन माझी पण हीच गोची
उदयन

माझी पण हीच गोची झालीये. कित्येक दिवसांपासून शोलेवर लिहीन म्हणत होतो
असो.
छान झालाय लेख. स्पर्धेसाठी शुभेच्छा !
केदार.. कर्रेक्क्ट.. हे सारे
केदार..
कर्रेक्क्ट.. हे सारे एकेक प्रसंगापुरते असणारे कॅरेक्टर सुद्धा अजरामर होने आणि ते ही असे की आजही शोलेवर अनेक पॅराडाईज बनतात ज्यात हे सर्रास वापरले जातात.. हेच शोलेचे यश आहे आणि याचा कोणताही फॉर्म्युला नसल्याने हे पुन्हा कधी घडणे नाही..
संदीप..
आपल्या अवांतर "शान"शी सहमत.. शोले चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या किस्स्यांमध्ये शान पडला हा एक किस्साही नेहमीच चघळला जातो.. मी स्वता शान ३-४ वेळा पाहिला आहे.. तो पडण्याचे कारण आकलनापलीकडले आहे.. किंवा आपण म्हणतात तसेच आहे..
रुणझुणू..
तू बाई एकदा रामगोपालवर्माचा शोले ज्याचे नाव त्याने नंतर "आग" असे ठेवले तो बघ.. त्यात अमिताभ बच्चन गब्बर झाला होता म्हणे.. पण तो चित्रपट बघितल्यानंतर अमिताभ मूळ शोलेमध्ये मेला याचे दु:ख कायमचे विसरून जाशील बघ..
अवांतर - अमिताभ मेला नसता तर "ये दोस्ती हम नही तोडेंगे" चे सॅड वर्जन ऐकण्यातील मजा कशी आली असती.
उदय अन किरन.. हसू की रडू समजत
उदय अन किरन..
हसू की रडू समजत नाही... पण डोक्यात जरी लिहायला सुरुवात केली असेल तर थांबू नका..
आणि उदय, माझ्यावरचा किंवा नशीबावरचा राग वाचकांवर नको काढूस रे... रामूच्या शोलेवर लिहून...
मला सीडी सापडत नाही...सगळ्या
मला सीडी सापडत नाही...सगळ्या दूकानदारांनी फेकल्या..जाळून टाकल्या आहेत... मी विचारल्यावर मनोरूग्ण असल्यासारखे बघत असतात... बहूदा न बघताच लिहावे लागणार...
.♥ ......
पण तो चित्रपट बघितल्यानंतर
पण तो चित्रपट बघितल्यानंतर अमिताभ मूळ शोलेमध्ये मेला याचे दु:ख कायमचे विसरून जाशील बघ. >>
शोलेप्रेमीना एक प्रश्न
शोलेप्रेमीना एक प्रश्न :
शोलेमधल्या गावात लाइट नसतात म्हणे.
मग एवढी उंच पाण्याची टाकी कशासाठी बांधून ठेवतात? वीज नाही तर त्यात पाणी कसे भरत होते?
टाकी वरतून उघडी असावी...
टाकी वरतून उघडी असावी... पावसाळ्यात भरत असावी.. आणि उन्हाळ्यात नदी आटली की तिचे पाणी वापरत असावेत..
हे उत्तर शोलेप्रेमी म्हणून दिले आहे, पटले नाही तर दिग्दर्शकाशी स्वत: संपर्क साधावा.
पण तो चित्रपट बघितल्यानंतर
पण तो चित्रपट बघितल्यानंतर अमिताभ मूळ शोलेमध्ये मेला याचे दु:ख कायमचे विसरून जाशील बघ..
एकदम चूक ........ उलट राम्याचा शोले आणि बच्चनचा गब्बर बघितल्यावर हा बिचारा त्या खर्या शोलेत खरोखरच का मेला नाही, असे वाटेल
स्वतः बच्चनचीही प्रतिक्रिया आग च्या प्रिमियरला अशीच होती म्हणे ... अर्धा सिनेमा झाल्यावर राम्याने विचारले, स्नॅकला काय आणू ??? थोडा जहर लाना ... बच्चनचे उत्तर !!
http://www.youtube.com/watch?v=o1vcuYud_8A
शोलेबद्दल माझं एक थोडं
शोलेबद्दल माझं एक थोडं 'कॉन्ट्रोव्हरशील' मत आहे.. वादात पडायचं नाहीच, पण माझं एक माझ्यापुरतं असलेलं मत ...
शोलेची गाणी करताना ('मेहबूबा' सोडलं तर अर्थातच) त्याच्या चाली, वाद्य, अरेंजिंगमधे आर्.डी. बर्मन मला त्याच्याच तुलनेत कमी पडलाय असं वाटतं. म्हणजे शोलेमधे सबकुछ आहे, पण गाणी त्यातल्यात्यात वीक लिंक वाटते मला.
पण त्याच आर्.डी. नी शोलेला जे काही महान, केवळ महान 'बॅकग्राउंड म्युझिक' दिलंय त्याला तोड नाही
रामगडमधे वीज नसते असे नव्हे
रामगडमधे वीज नसते असे नव्हे तर लोड शेडिंग असते! कधी मधी वीज येऊन ती टाकी भरत असेल असे मानू. किंवा कुण्या बुद्धीवान मंत्र्याने वा आमदाराने आपल्या निधीतून "निदान टाकी तरी बांधू. वीज येईल तेव्हा येईल" असा विचार केला असेल. असो.
शोले हा माझाही अत्यंत आवडता चित्रपट. कितीही वेळा बघू शकेन.
मला वाटते त्यातील पात्रांच्या उत्कृष्ट कामाइतकीच शिरीष कणेकरांच्या भाषेत "घट्ट विणीची पटकथा" हेही त्या सिनेमाच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे. सलीम व जावेदने वेगवान पण सहज कळेल, रुचेल आणि भावेल अशी कथा लिहिली आहे. वेस्टर्न सिनेमाचा प्रभाव आहे पण तरी अस्सल भारतीय वातावरण निर्माण केले आहे. तोपर्यंत डाकू म्हटला की फेटा, गंध लावलेला मिशाळ उग्र माणूस असेच अभिप्रेत असायचे. त्यापेक्षा कितीतरी वेगळा पण जास्त भीतीदायक आणि दुष्ट वाटेल असा दरोडेखोर खलनायक अमजद खानने साकार केला आहे आणि अजरामर केला आहे. कदाचित ही एक दुर्मिळ संधी योगायोगाने मिळाली आहे आणि ती गमावली तर पुढे काही आशा नाही असा निर्वाणीचा विचार करुन अमजद खानने जीव ओतून अभिनय केला असावा.
इतका खराखुरा खलनायक नंतर फार वेळा दिसला नाही.
एक गोष्ट मला थोडी खटकते ती म्हणजे अमिताभ बच्चनचे जय हे पात्र हे फारच जास्त पॉलिश्ड वाटते. त्याची भाषा, विचार हे त्याच्या सडकछाप पार्श्वभूमीशी विसंगत वाटतात. धर्मेंद्रची भाषा, संवाद, बाकी वागणे हे जास्त सुसंगत वाटते.
लेख आवडला .. मस्तच ..
लेख आवडला .. मस्तच ..
अभिषेक, आहाहा!!! मस्त
अभिषेक, आहाहा!!! मस्त लिहिलंयेस.. मी पण शोले ची एक सुपर डूपर फॅन!!!
त्या काळी जबलपूर ला कोणताही सण असो, चौकाचौकातून सिनेमाची गाणी लाऊडस्पीकरवरून दिवसभर ओरडत..पण 'शोले' आला आणी या सिनेमातील डायलॉग्स ची रेकॉर्स अखंड वाजू लागली.
त्या जमान्यात गावातील बच्च्या बच्च्या च्या जुबान वर शोले चे डायलॉग्स सदासर्वदा ठाण मांडून बसलेले दिसत!!
अभिषेक-आज वाचता आला लेख
अभिषेक-आज वाचता आला लेख तुझा.छानच जमलाय्.शोले च्या समस्त चाहात्याच्या भावना एकवटल्या आहेत एकाच लेखात:)
लेख आवडला.. शोले.. १५ ऑगस्ट
लेख आवडला..:)
शोले..:) १५ ऑगस्ट १९७५ ला आला तेव्हा पहीले ३ आठवडे डब्यात जाऊन बसला होता.. आणि नंतरचा इतिहास तर सर्वांनाच ठावुक आहे.. शेवटी गब्बरला ठाकुर मारतो असे चित्रीकरण सेन्सॉर बोर्डचे 'A' सर्टिफिकेट चुकविण्यासाठी गाळले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.. १९७५ साली दिवार आणि ज्युलीच्या तगड्या स्पर्धेने शोलेला केवळ एकच फिल्मफेअर अवार्ड मिळाले .. ते देखिल तांत्रिक विभागातले.. मात्र ५० वर्षातील सर्वोत्तम चित्रपटाचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले आणि ते अपयश धुवुन निघाले..
छान
छान
rar तुमचे मत हे बरोबरच आहे
rar
तुमचे मत हे बरोबरच आहे आणि त्यात आपण म्हणता तसे 'कॉन्ट्रोव्हरशील' काही नाही. जर शोले हा इतिहासातील एक सर्वोत्तम चित्रपट आहे तर त्यातील गाण्यांची तुलना चित्रपटाशी करायची झाल्यास ती देखील इतिहासातील सर्वोत्तमच हवीत ना.. तरी मेहबूबा हे गाणे चांगलेच आहे हे आपणही कबूल केलेत तसे "ये दोस्ती हम नही तोडेंगे" आजच्या पिढीलाही आवडतेच..
अवांतर - कालपासून या लेखाच्या निमित्ताने मी शोलेमय झालो असल्याने "ये दोस्ती" गाणेच येऊन जाऊन गुणगुणतोय..
वर्षूदी धन्स... आणि तो जमाना माझ्या जन्माच्याही आधीचा होता..
Pages