ओट्स-मेथीचे पौष्टीक लाडु - फोटोसहित

Submitted by यशस्विनी on 10 August, 2012 - 23:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. ओट्स ( एक वाटी )
२. गव्हाचे पीठ ( अर्धी वाटी )
३. बेसन ( पाव वाटी )
४. पीठी साखर ( पाव ते अर्धी वाटी - आवडीनुसार )
५. मेथीचे दाणे ( पाच चमचे - आवडीनुसार कमी जास्त घ्यावेत )
६. तीळ
७. बदाम
८. वेलची पुड
९. तुप

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका पॅन मध्ये दोन चमचे तुप घालावे व त्यावर ओट्स मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजुन घ्यावे.
२. नंतर एक चमचा तुप घालुन गव्हाचे पीठ मंद आचेवर खरपुस भाजुन घ्यावे.
३. अर्धा चमचा तुपात बेसन खरपुस भाजुन घ्यावे.
४. आता अर्धा चमचा तुप घालुन त्यात मेथीचे दाणे, बदाम, तीळ पाठोपाठ भाजुन घ्यावे व या तिघांची एकत्र पुड करुन घ्यावी.
५. परातीत भाजलेले ओट्स, गव्हाचे पीठ, बेसन, मेथी-बदाम-तीळ पुड, वेलची पावडर व पीठी साखर एकत्र करुन घ्यावी.
६. यावर गरम तुपाचे थोडे मोहन घालुन पटापट लाडु वळुन घ्यावेत. तुप जास्त नको असेल तर थोडे दुध शिंपडुन देखील लाडु वळता येतात.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराचे २२ लाडु बनले
अधिक टिपा: 

लाडु अजुन पौष्टीक करायचे असतील तर यामध्ये तुपात भाजलेले पाव वाटी सोयाबिनचे पीठ, मुगडाळीचे पीठ, दाण्याचे कुट, अक्रोडचा चुरा व साखरेऐवजी किसुन घेतलेला चिकीचा गुळ वापरता येइल Happy

माहितीचा स्रोत: 
मी स्वत:च :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना Happy

अनुसया, फक्त ओट्स वापरुन लाडु केले तर ते नीट बांधले जात नाहीत म्हणुन गव्हाचे पीठ घेतले. ओट्सचे प्रमाण थोडे वाढवता येते. बेसन नाही घेतले तरी चालते. पण त्याने अजुन खमंग चव येते.

दिनेशदा मेथीचे दाणे मी प्रत्येकाच्या आवडीनुसार घ्यायला सांगितले आहेत कारण प्रत्येकालाच त्याची कडुसर चव आवडेलच असे नाही. मी ५ चमचे मेथीचे दाणे घेतले. याचे प्रमाण थोडे वाढवले तर लाडवात त्याची कडु चव जाणवते.

छान पौष्टीक लाडू..पिठाच्या दुपटीचे ओट्स भाजुन मिक्सरमधे एकदा फिरवुन घेतले तर जास्त पौष्टीक होतील असे वाटते.

धन्स सावली आणि सुलेखा Happy

सुलेखा मी आधी मिक्सरवर फिरवायचाच विचार केला होता पण ओट्स तुपात भाजल्यावर मस्त मउ होतात, नुसत्या हाताने जरी कुस्करले तरी त्याची पावडर बनते त्यामुळे पीठात मिसळताना ते आपोआप एकजीव होतात.

घरात एक मोठ्ठा डबा भरुन मुसेली होते ते कुणीच खात नव्हते. ते एक वाटी वापरुन लाडु करुन पाहीले. मस्तच झालेत. पीठ सोडुन इतर काहीच तुपात भाजले नाही. मध्यम आकाराचे करुनही खुपच कमी लाडु झालेत . मुसेलीमुळे मधेमधे कुरकुरीत लागतात Happy

सावली मी बाउल वापरुन प्रमाण मोजले म्हणुन असेल कदाचित माझे तेवढया सामग्रीमध्ये २२ लाडु बनले.

सुनिधी मी क्वेकरचे इन्स्टंट ओटमील वापरले.

आज करून पाहिलेत.
काही चुका:
१. मेथी थोडी जास्त घेतली. त्यामुळे थोडे कडू वाटले.
२. तूप खूपच कमी वापरले (माझ्याच्याने तूप हातातून सुटतच नाही काय करू? Sad ), त्यामुळे शेवटी साखरेचा पाक करून लाडू वळवले. पण त्यामुळे पॉइंट १ चा कडूपणा कमी निघून गेला. पण लाडू तसे कोरडेच म्हणावे लागतील.
३. अंड्याच्या आकाराचे १३ लाडू झाले. मला जास्त अपेक्षित होते. पण बरंय.. घरात लाडूप्रेमी मी एकटीच असल्याने चालून जाईल.

तर ही मी बनवलेल्या लाडवांची प्रचि :
oat-laadu.jpg

वरच्या ४ लाडवांमध्ये दूध वापरले तूपाऐवजी, म्हणून ते ओलसर दिसत आहेत.

व्हीनस, तूप किती लागत ? मी मध्ये एकदा मुलांसाठी पोळीचे लाडू करतात त्यात ओट्स घातले, ते खूप कोरडे झाले, तूप घालून वैतागले, शेवटी दुध घालून वळले ( धारा सारखे Happy ) . दुध घातले तर लाडू टिकतील का हि शंका वाटली म्हणून परत ओट्स घातले नाहीत.

मीमराठी मी देखील दुध वापरुनच लाडु वळते फक्त दिवाळीच्यावेळी करायचे लाडु तुप घालुन वळते कारण ते जास्त दिवस ठेवायचे असतात. मुलांना खाउ म्हणुन करायचे रोजचे लाडु दुध वापरुन वळले तरी चालतात. ते किती दिवस टिकतील याची नीटशी कल्पना नाही कारण मी एका वेळी जास्त लाडु करत नाही. जास्तीत जास्त २५ लाडु करते व ते माझ्या कुटुंबाला आठवडयाभर पुरतात. वरील लाडवात मी ओट्स, पीठ, मेथ्या भाजण्यापुरते तुप वापरले आहे व लाडु वळताना दुधाचा हबका दिला आहे. पण कोणाला पुर्ण तुपातील लाडु आवडत असतील तर पाव ते अर्धा वाटी तुपाचे मोहन लागेल.

धारा प्रयत्न छान केलास.... दूध थोडे जास्त वापरलेस वाटते >>>>> हो. जाणून्बुजून जास्त वापरले कारण ते मी लगेच खायला म्हणून ठेवलेत. तूपाचे लाडू मला जास्त आवडत नाहीत. Happy

एक महत्वाचे सांगायचे राहिले. मला लाडूचा हा प्रकार खूप आवडला. ओटस मला एव्हढे आवडत नाहीत, त्यामुळे ते खायचा उत्तम पर्याय. खरंच एकदम पौष्टिक प्रकार! अनेक धन्यवाद.

धन्स धारा..... अग मला देखील ओट्स नुसते दुधात शिजवुन खायला आवडत नाहीत पण पोटात तर गेले पाहीजेत ना म्हणुन हा प्रकार करुन बघितला Happy

मी काल केले ....पण मी ओट्स तुपा त भाजुन मिक्सरला लावले ...(ओट्स ,गव्हाचे पीठ, बेसन, पीठी साखर,, तुप ) मस्त झाले आहेत ....