पालक सुप

Submitted by यशस्विनी on 3 August, 2012 - 02:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ताजा पालक - एक जुडी
२. दालचिनीच्या काडया.... २-३ लहान आकाराच्या
३. दुध - एक मोठी वाटी
४. मिरीपुड
५. मीठ

क्रमवार पाककृती: 

१. पालकाची पाने मीठाच्या पाण्यात स्वच्छ धुउन घ्यावीत
२. ही पाने न चिरता अशीच कुकरच्या सेपरेटरमध्ये घालावीत त्यातच दालचिनीच्या २-३ लहान काडया घालाव्यात.
३.कुकरच्या २ शिटया काढाव्यात, शिट्या जास्त काढु नयेत दोन पुरे, नाहीतर पानांचा हिरवा रंग फिका पडतो
४. उकडलेला पालक थंड झाल्यावर त्यातील दालचिनीच्या काड्या काढुन टाकाव्यात ( या फक्त वासासाठी म्हणुन पालकाबरोबर उकडुन घेतल्या)
५. आता हा पालक मिक्सरमध्ये बारीक वाटावा.... वाटत असतानाच झाकणाच्या भोकातुन थोडे थोडे दुध त्यात घालावे, साधारण एका पालकाच्या जुडीला एक मोठी वाटी दुध पुरे होते.
६. दुध हळु हळु घालण्याचे कारण म्हणजे त्यामुळे दुध फुटत नाही व पालकात नीट मिसळते.
७. आता हे मिश्रण एका पातेल्यात काढावे व बारीक गॅसवर गरम होण्यास ठेवावे.
८. या मिश्रणास उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ व थोडी मिरीपुड घालावी.
९. सर्व्ह करताना गरम सुपात वरुन थोडे चीझ किंवा पनीर किसुन घालावे.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जण
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मी दुध नाही घालत. पालकाबरोबर छोटी मूठभर मूगडाळ आणि एक छोटा बटाटा (साल काढलेला) उकडायला लावते. आणि तेच मिक्सरमधे वाटते. गरम गरम सर्व्ह करताना थोडे लिंबू पिळून + मिरीपूड + तूपाचे थोडे थेंब (किंवा बटर) घालते. यम् यम् एकदम! Happy

छान. Happy
मागे मःनस्विनीने पालक कुकरमध्ये न घालता बाकी जवळपास सारखीच कृती दिली होती. Happy आहे इथेच कुठेतरी.

मी नेहमी करते.. मुलाला खुप आवडते हे सुप. तो पोळी बरोबर खातो Happy
मी पातेल्यात मंद गॅसवर.. पाणी फक्त शिंपडुन ठेवते शिजवायला. आणी दालचीनी काढत नाही मिक्सर फिरवण्याआधी...

पालकाबरोबर दुध घालणे योग्य नाही कारण दुधातले कॅल्शियम पालकातले आयर्न रक्तात शोषण्यात अडथळा निर्माण करतात. याच कारणासाठी पालक-पनीर आरोग्यास लाभ देण्याऐवजी नुकसान करते असे हल्ली बरेच ठिकाणी वाचलेय.

त्यापेक्षा मुगडाळ्-बटाट्याचा ऑप्शन बराय. मला पालक सुप करावेसे वाटते पण चव कशी लागेल या भितीने केले नाही कधी. वाफवलेल्या पालकाला खुप उग्र वास येतो.

मला पालक सुप करावेसे वाटते पण चव कशी लागेल या भितीने केले नाही कधी. वाफवलेल्या पालकाला खुप उग्र वास येतो.
>>
साधना करून बघा. इतका उग्र वास नाही येत. मला तर सूप्स च्या प्रकारात मश्रूम सोडले तर सगळेच आवडते. Happy

मस्तच. मीही असेच करते पण एखाद्-दोन लसूण पाकळ्याही घालते. सूपात नंतर दालचिनी पूडही घालता येते.

याच पध्दतीने केलेली कॉम्बिनेशन सुपं उदा. पालक-मशरूम, मशरूम्-सेलरी ही सुपंही मस्त होतात.

टोमॅटो-गाजर सुपही असंच दालचिनी, लसूण घालून करता येतं. पण मिक्सरमधून काढल्यावर गाळणीतून गाळावं लागतं. आणि यात दूध घालता येत नाही. पण चव अगदी अप्रतिम येते.

मस्त कृती आणि वेरिएशन्स..
मामी, टो.गा. सूप गाळून का घ्यावे लागते?

<<<<<,पालकाबरोबर छोटी मूठभर मूगडाळ आणि एक छोटा बटाटा (साल काढलेला) उकडायला लावते.

मी हे नक्कि ट्राय करुन बघेन. मी प्रेगनीसी च्या वेळेस पालक सुप घेत होते. खुप तोंड वाकड करुन. त्यामुळे पालक सुप म्हटल की नको वाटायच.
पण आता नक्की ट्राय करुन बघेन.

मला पालक सुप करावेसे वाटते पण चव कशी लागेल या भितीने केले नाही कधी. वाफवलेल्या पालकाला खुप उग्र वास येतो.
>>

साधना, पालक प्रेशर कूकरमध्ये उकडून घ्यायचा नाही, त्याच रंग, पोत, गुणधर्म सगळंच नाहीसे होते. पालकाची पाने तशीच न चिरता स्वच्छ धुवून तेला/ तुपावर परतवून झाकण न ठेवता शिजवून घेता येतात, आणि तेला/ तुपाचा वापर टाळायचा असेल तर पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात सात-आठ मिनीटे ठेवायचा. मग पाणी वेगळे करून मिक्सरमधे वाटून घ्यायचा.

मी पालक सूपसाठी अश्या प्रकारे शिजवलेल्या पालकाबरोबर व्हाईट सॉस ब्लेंड करते, मीठ आणि किंचीत गरम मसाला. मस्त सूप होते, आणि व्हा सॉ-गरम मसाल्यामुळे पालकाचा तो विशिष्ठ वास मास्क होतो.

हेल्दी ऑप्शन हवे असेल तर पालक ब्लांच करून घ्यावा. पाण्याला उकळी येताच आच बंद करून त्यात स्वच्छ धुतलेली पा.पा. टाकून वरून झाकण ठेवावे. पाच मिनीटांनी उघडावे. हिरवा रंग (आणि सत्व) शाबूत आणि पाने उकडलेली. सूपसाठी पाणी वेगळे करण्याची पण गरज नाही. थोड्या पाण्यातच उकडावे. कारण पालकाला स्वतःचे पण पाणी असतेच.

धन्यवाद सर्वांना तुमच्या प्रतिकियांमुळे मला "पालक सुप" बद्द्ल अजुन नविन माहीती मिळाली Happy

@ स्वाती

मी पाकृ टाकण्याच्या आधी पालक सुप नावाने सर्च केले होते त्यावेळी मला ही पा़कृ नाही मिळाली, मात्र जुन्या माबोवर प्रतिक्रियांमध्ये कोणीतरी थोडक्यात कृती सांगितलेली दिसली.... त्याबद्दल सांगते आहेस का तु?

@ निंबुडा

तु सांगितलेला प्रकार देखील मस्त वाटत आहे पण मी सुप मध्ये बटाटा घालायचे टाळते, पण लहान मुलांना आवडेल अशी चव Happy

@ साधना

माझ्या कृतीत कॅल्शियम आयर्न एकत्र होत आहेत हे माझ्या लक्षातच नाही आले, आता बघेन दुधाशिवाय कसे लागते ते...... एवढी डॉ.मालती कारवारकरांची पुस्तके वाचुन स्वयंपाक पौष्टीक तत्वाने युक्त करायचा प्रयत्न करते तरी चुक झालीच बघ Happy बाकी पालक सुप खुप मस्त लागते ग... मी घरी आलेल्या पाहुण्यांना स्टार्टर म्हणुन खुपदा दिले आहे, सर्वानी खुप आवडीने पिले आहे, ते पण पुन्हा पुन्हा घेउन Happy

@ मंजुडी

मला वाटते कुकर मध्ये पदार्थांचे पोषक तत्वे कमी होत नाहीत, पालकाची पाने एक ते दोन शिट्ट्यांवर काढली तर तो चांगला शिजुन त्याचा रंग देखील सुरेख हिरवा राहतो उलत झाकन नसलेल्या भांड्यात शिजवल्यामुळे पालकाची पोषकतत्वे कमी होतात

@संघमित्रा

धन्यवाद..... सुपसाठी असा पालक तयार करुन घेणे हे सर्वात उत्तम वाटत आहे Happy