ऐकतेयेस ना!

Submitted by रीया on 30 July, 2012 - 04:51

आधी हे वाचलय का?
http://www.maayboli.com/node/36279
----------------------------------------------------------------------------------------

आल्या आल्या तूला खिडकी बाहेरचा पाऊस न्याहाळताना पाहिलं आणि वाटलं चार वर्षमागे फ़िरवावं आयुष्य.तीच तू, तोच मी आणि तसाच हा पाऊसही.
आपली पहिली भेट. तुला सांगू त्या दिवसाआधी मला पाऊस कधीच नव्हता आवडला. पण त्यादिवशी रिक्षात भिजायला लागू नये म्हणुन तू आत सरकता सरकता तुझ्याही नकळत मला खेटून बसलीस आणि तेंव्हा पासून मला पाऊस अचानक आवडायला लागला. तो नसताच तर तुझं बावरलेलं ते रूप मला इतक्या जवळून पहाताच आलं नसतं.
आणखी एक गंमत सांगतो. त्यादिवशी स्टॉपवर तुला कॉलेज वैगेरे विचारणं हा फक्त एक मारलेला चान्स होता.गोंधळू नकोस सांगतोच काय झालेलं ते.
तुमच्या बॅचच्या अ‍ॅडमिशन प्रोसेसच्या वेळेस आम्ही तिथेच होतो. आमच्या नेहमीच्या टवाळक्या चालूच होत्या इतक्यात तू आलीस. तुझ्याच बॅचची इतर मुले जाम गोंधळलेली असताना तू मात्र प्रचंड आत्मविश्वासाने वावरत होतीस. तेंव्हापासूनच माझी नजर तुझ्यावर खिळलेली होती. वार्‍याने उडणारे तुझे केस आणि हातातले फॉर्म सावरताना तुझी होणारी धडपड मला आजही तशीच्या तशी आठवतेय. हीsss भली मोठी रांग. सगळेच प्रचंड कावलेले आणि त्यात एक जण कोणाच्या तरी ओळखीच्या जोरावर मध्ये घुसू पाहात होता. बाप्रे! कसलीच भडकलीस तू त्याच्यावर. त्यावर त्याने केलेल्या प्रचंड बडबडीला एका वाक्यात उत्तर देऊन त्याचं तोंड बंद करून टाकलेलस.ते संभाषण आता मी विसरलोय पण तू मात्र तशीच अजुनही डोळ्यासमोर येतेस. करारी! तेंव्हाच मनात भरलेलीस.
त्यानंतर रोज तुझ्या अ‍ॅडमिशनची चौकशी करायला जायचो. तुझी सीट फिक्स झाली हे कळालं त्याच दिवशी दगडूशेठला प्रसाद चढवून आलो. सॅम,डिजे,राहूल,श्रावणी,मेघना सगळ्यांना एव्हाना कळालंही होतं.बिचार्‍यांनी तुझी सगळी माहिती शोधून काढली आणि फायनली कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुला तुझ्या स्टॉपवर गाठलं. पुढचा प्रवास तर तुझ्याही लक्षात आहेच.
कॉलेजात गेल्या गेल्या तुला माझ्यासोबत पाहून सगळे प्रचंड शॉक्ड होते. अर्थातच! आणि नालायकांनी तुझ्याच समोर मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तरी मी शांतपणे त्यांना कटवलेलं पाहून रागावलेलीस ना? पण तू त्यावेळेला माझ्यासोबत होतीस यात त्या पाच जणांचा किती तरी मोठा वाटा होता. तुला माहितीये रागावलीस ना की खुप गोड दिसतेस तू. अग खरचं! टिपीकल डायलॉग असेलही पण तुला तंतोतंत लागू पडतो.तुझे ते आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठे करत दात ओठ खाणं.. "मला ना आता तुझ्या दातांचा जाम हेवा वाटतो बघ" अस म्हणताच क्षणात ते डोळे जमिनीला भिडवून चटकन लाजणं,जेवघेणं हसणं. फार आवडत मला हे. तेंव्हाही तेच झालं . तू चिडलीयेस हे तुझ्या चेहयावरून स्पष्ट दिसत असतानाच त्यांच चिडवणं ऐकुन तू पटकन लाजलीसही आणि गोंधळलीसही. तिन्ही भावनांचं एक गोड मिश्रण तुझ्या चेहर्‍यावर इतक पटकन उमटलं की मी रोखूच शकलो नाही स्वतःला. आणि सांगून टाकलं तुला भन्नाट दिसतेयेस म्हणुन. पण तुला काय झालं कोणास ठाऊक! एकाएकी रडायलाच लागलीस तू. बाप्रे धक्काच होता तो माझ्यासाठी. नशिब मेघना आणि श्रावणी होत्या तिथे तेंव्हा. पण काहीही म्हणं हं मित्र-मैत्रिणी लाखात एक मिळाले आपल्याला. माझ्याहीपेक्षा त्यांनी तुला जास्त जपलं.
हळू हळू ग्रुप मध्ये रमलीस खरी पण माझ्याशी बोलायला काही तयार नव्हतीस. इतरांकडे पाहून हसताना माझ्याकडे रागाचा कटाक्ष टाकायचीस. तेंव्हा जीव जळत होता पण आता आठवलं ना की त्या कटाक्षासाठी जीव झुरतोच माझा.त्यादिवशी रात्रंदिवस जागून अमेयचं सबमिशन पुर्ण करून आलो होतो. दमलो होतोच. इतर वेळेला कॉलेजला आलो ही नसतो पण तेंव्हाची गोष्ट निराळी होती. एक संपुर्ण दिवस तुला पाहिलं नव्ह्तं. अजुन एक दिवस तुला नसतं पाहिलं तर कदाचित हृदय बंद वैगेरे पडण्याची भिती वाटली मला.मग तसाच आलो. आणि त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्याशी बोललीस.सगळा त्राण कुठल्या कुठे गेला अग.स्वतःला रोखुच शकलो नाही. अचानक तुला मिठी मारली. वाटलं चिडतेस की काय आता पण तेवढ्यात पाऊस आला आणि कदाचित मला रागवायचच विसरलीस तू. मनातल्या मनात मी पावसाला लाख दुवा देऊन टाकल्या.
आपली पहिली बाईक ड्राईव्ह आठवतेय? त्यादिवशी खर तर काहीच प्लॅन नव्हता. पण तुला माझ्या आवडत्या ड्रेसमध्ये पाहिलं आणि जाणवलं हाच तो क्षण. आणि मग ठरवलं खडकवासला! माझ्या तोंडून स्वतःचच वर्णन ऐकता ऐकता स्वतःवरच जळत होतीस तू वेडे. एक क्षण तर मला भितीच वाटली. उतरतेय की काय ही गाडीवरून आता. पण अग आठवलं हिला कुठे रस्ते लक्षात रहातात.पण तुझी चिड चिड न्याहळता न्याहळता तुझं रूप डोळ्याने पिऊन घेत होतो. खडकवासला आलं आणि तुला स्वतःत हरवलेलं पाहिलं. किती मलूल झालेलीस. तुला "तस" पहायची सवय नव्हती. तुला हतबल पाहून स्वतःलाच रागावलो. आणि सांगून टाकलं तुला "तुझ्याशिवाय कोणाचा विचारही नाही करू शकत मी"!
त्यानंतरचं सगळंच खुप भारावल्यासारखं होतं, तू स्वतःहून मारलेली मिठी,आपला पहिला किस! तुझे डोळे बंद होते पण मी तो प्रत्येक क्षण अगदी अनुभवत होतो.तुझा तो मुक होकार, नंतरचा हक्काने दिलेला समंजस नकार.किती हट्टी होतीस ना तेंव्हा. एकदा ऐकायचं नाही ठरवलस की ऐकायचीच नाहीस. आणि मग मला तुला समजावत बसायला लागायचं.आपल्या लग्नाला घरच्यांची परवानगी मिळत नव्हती अगदी तेंव्हाही किती खंबीर होतीस तू. "मी याच्याशीच लग्न करणार" हे घरच्यांना निक्षून सांगितलस आणि त्याच वेळेला मला "तुला माझ्या घरच्यांकडून होकार मिळवावाच लागेल" असा दमही भरलास.मी ही प्रयत्नांची शिकस्त केली आणि तुझ्यापुढे घरच्यांचही काही चाललं नाही. न मिळणारी गोष्ट सगळ्या जगाशी झगडून मिळवायचीस.
आता कुठे गेला ग तो हट्टीपणा? आता का म्हणत नाहीस कशालाच हक्काने नाही? तुला जग फिरायचं होतं.खर सांगू म्हणुन कंपनीत रात्रीचा दिवस करून ऑनसाईटची संधी मिळवली होती. तुला न्युज दिली तेंव्हा खर तर तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद टिपायचा होता मला.पण तू नाराज झालीस.कुणास ठाऊक का! आई बाबांना सोडून जायचं नाही म्हणालीस. तिकडे एकटी पडेन म्हणालीस. का ग? माझ्यावर विश्वास नव्हता? खर तर तेंव्हाच खुप वाईट वाटलेलं मला. पण नंतर वाटलं की जबाबदारीमुळे नाही म्हणत असशील. तू खर कारण कधीच सांगितल नाहीस आणि मीही खुप प्रयत्न करून ते समजू शकलो नाही. आठवतय? एकदा बोलता बोलता म्हणालेलीस की या क्षेत्राचा कंटाळा आलाय.नोकरी सोडून द्यावी आणि खुप खुप वाचावं, लिखाण करावं. तुला नोकरी सोडायला लावली ते एवढ्यासाठीच.मला वाटलं किमान आता तरी स्वतःला वेळ देऊ शकशील किंबहूना तुलाही तेच हवं होतं की. पण मग अचानक काय झालं तुला? काही बोलून नाही दाखवलस . शांतपणे नोकरी सोडलीस. अगदी एकही शब्दही न बोलता. पण तू खुष नाहियेस ते कळत होतं. माझं मन स्वतःलाच खात होतं. तुला जे जे देईन अशी स्वप्न पाहिलीली त्यातलं अजुनपर्यंत काहीच देऊ शकलो नव्हतो. तितक्यात तू "ती" न्युज सांगितलीस. मला मुल नको होतं. कारण अजुन मी आपल्या संसारात तुलाही सुखी पाहू शकलो नव्हतो. पुर्वीची खंबीर तू कुठे तरी हरवली होतीस. मग ठरवलं अजुन तिसरं कोणी नको इतक्यात. बाळ हवं म्हणुन हाता पाया पडलीस. मी वाट पाहत होतो की हट्ट करशील. मला हवेच आहे म्हणशील. पण विनंत्या केल्यास. मला तुला हे "अस" पहायची सवय नव्हती.मला तू ही अशी नकोच होतीस.ते मूल जितकं तुझं होत तितकच माझही होतचकी. पहिल्या बाळाचा आनंद तुझ्या इतकाच मलाही झाला होता. पण मी पुर्वीच्या "तू"ला शोधत होतो. पुर्वी माझी करारी "तू" मात्र मला काही केल्या सापडत नव्हतीस. वाटलं जबाबदारीच्या ओझ्याने इतकी बदललीयेस की काय.म्हणून अजुन एका जबाबदारीसाठी नाही म्हणलं. पण तू एकदाही मला हक्काने,प्रेमाने,चिडून "का" अस विचारलं नाहीस.एकदा विचारून पाहिचं होतसं.पण कदाचित तुलातेंव्हा मी परकाच वाटत होतो
हे सगळं अस का झालं त्याची कारणं शोधतोय.
काल तुझा वाढदिवस. मी विसरलो नव्हतोच. पण मुद्दाम विसरल्यासारखं दाखवलं. वाटलं होतं चिडशील,रडशील, मला फटके देशील आणि मग हळूच मिठीत घेऊन मी तुला तुझ्यासाठी परवापासून आणुन ठेवलेलं ते गिफ्ट देईन. पुन्हा एकदा तुझी पुर्वी सारखीच समजूत काढेन आणि मग हळूवारपणे एक बिनसाखरेचा चहा मागवेन Happy
पण तू शांतपणे मला फ़क्त आठवण करून दिलीस. अनपेक्षीत होती ती रिअ‍ॅक्शन. मग स्वतः रंगवलेलं माझं आवडतं चित्र मी चुरगाळून टाकलं.तू अशी नव्हतीस ग.तू किती बदललीयेस ते तू कधी पाहिलच नाहीस. मी बदललोय हे मात्र ठरवून मोकळी झालीस.पण आता ना जे काही मनात आहे ते बोलून एकदा मोकळी हो. पण ते मात्र शेवटचचं!
त्यानंतर मात्र कोणाचं काय चुकलं ते शोधत बसण्यापेक्षा आपण नव्याने सुरुवात करूयात. तू तसाच हट्ट करत जा आणि मी तसाच तुझी समजूत काढत जाईन.मी तसाच उशीरा येत जाईन आणि तू तशीच माझ्यावर रागवत जा. पुन्हा एकदा बासरीचे सुर मनभर झंकारू देत. पुन्हा एकदा बिनसाखरेचा चहा प्यायला सुरुवात करतो आणि तूही कपाटात ठेवून दिलेला तो गुलाबी ड्रेस काढं. बाईक ड्राईव्हची नशा पुन्हा अनुभवूयात. आणि अगदी रोज रोज भांडूयात सुद्धा बरका पण लगेच भांडण विसरूनही जाऊयात, अगदी आपल्या पहिल्या भांडणासारखं.. चल ना एकदा चार वर्ष मागे फ़िरुयातच. मग बघ सगळंच पुर्वी सारखचं भासेल....
तू,मी आणि हा पाऊसही....

- प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

पुर्वार्ध जास्त चांगला रंगला होता..>>> + १
पण साहजिकच आहे ना हे?! पुर्वार्धात 'ती' ची बाजू होती.... आपल्या अजुबाजूला असेच दिसते ना, की 'ती' बोलतेच भरभरून... तिला आपल्या सगळ्या भावभावनांचं विश्लेषण करून त्या व्यक्त करता येतात नीट. पण 'तो' ला एवढं व्यक्त होता येतंच असं नाही.. कितीही भावनिक असला तरी ते सगळं शब्दात मांडता येतंच असं नाही.... सगळं सगळं बोलून टाकून मोकळं होण्याची कला जमतेच असं नाही... त्यामुळे 'त्या'ची बाजू जरा त्रोटक/ अपुरी - न खुललेली वाटतेय... पण मला तरी इथे 'त्या'ची बाजू जास्ती प्रामाणिक वाटली... आणि आवडलीच! Happy

प्रि, मनापासून लिहिले आहेस. आवडले. Happy
खरं तर "त्या"चीही काही बाजू असू शकेल असा विचार नव्हता केला आधी. पण तीही असू शकतेच की. तीही लक्षात घ्यायला हवी ना!

ओवी'शी सहमत...

तसेही " तो " ची बाजू मांडणे सोपे नसते.. किंवा खरे तर समजणे फार कठीण असते.. बिचारा स्वताच गोंधळलेला असतो.. कारण त्याला फार हळवे होऊनही चालत नसते...

छान लिहिलेस रीय... पुढचा भाग लिहीलास हेच मुळात छान केलेस.. Happy

प्रिया.........आधी सांगितल्याप्रमाणे आवडला हा भाग आणि पूर्वार्धापेक्षा जास्त आवडला.
मी मागच्या भागात सांगितले होतेच की तो भाग अगदी 'म्हैसूरपाक' होता. हा छान 'काजूकतली' झालाय. Wink

ओवीशी सहमत.
'त्या'ची बाजू मांडणे वाटते तितके सोपे नसते. तू इथे मात्र उत्तम लिहिले आहेस.

तू "ती" असताना तूच "त्याची" बाजु मांडण्याचा प्रयत्न केलायस तो काबिले तारीफ आहे! Happy

"त्या" ची बाजू मांडण अवघडच आहे... पण सुखांत पाहून बरं वाटल... लिहिते रहो.. पुलेशु Happy

++++++++++++++++++++
अवांतर:

(या ललिताचा गोषवारा सांगणारे दोन शेर आठवले ( नेहमीचीच खोड Proud )

मुका पाऊस बरसावा असे वाटते
तुझा आवाज ऐकावा असे वातते

मला मी शेवटी कळलो जरी नाही तरी
तुला समजून सांगावा असे वाटते

Happy

हे बरं केलंस प्री! Happy मस्त लिहिलयस....फक्त तिची बाजू न मांडता तू ती असूनही त्याचे विचार अलगदपणे मांडलेस......अखेर ''त्या'' च्या मनीचे भाव ''ति''ने उलगडणं कठीणच नै का? पुलेशु.... Happy

तसेही " तो " ची बाजू मांडणे सोपे नसते.. किंवा खरे तर समजणे फार कठीण असते.. बिचारा स्वताच गोंधळलेला असतो.. कारण त्याला फार हळवे होऊनही चालत नसते>>> +१

मला हाही भाग आवडला... Happy

शागं,चिमू,केदारदादा,मुकू,अनू,ओवी,मयू,अमू,स्मितू,मोना,स्मितुतै,गणेश,अभिषेकदादा,निखिल,केतन,लाजो,टोक्स्,चनस झकोबा :
खुप खुप आभार.

केदारदादा : Happy
अनु : Wink

ओवी : आहाहा ओवी Happy
कसला मस्त प्रतिसाद दिलायेस तू..मला तर प्रतिसादच फार आवडला
म्हणजे लिहिताना माझ्या डोक्यात नेमकं ते तस्च होतं पण मला जे वाटलं ते अगदी तसच्या तस शब्दात मांडलयेस तू..प्रतिसादांना निवडक १० असते तर तुझा प्रतिसाद त्यात असता माझ्यासाठी!

अमू,अभिषेकदादा,टोक्स : Happy
निखिल : काजुकतली Happy हे आवडलं Wink
केतन : क्या बात है Happy शेर परफेक्ट बसलेत Happy

दोन्ही भाग आवडले!

फक्त एकच बाजू न मांडता दोन्ही बाजुंचे विचार उत्तम मांडलेत......छान! Happy

मुका पाऊस बरसावा असे वाटते
तुझा आवाज ऐकावा असे वातते

मला मी शेवटी कळलो जरी नाही तरी
तुला समजून सांगावा असे वाटते

>>> अगदी सुरेख!!:)

.

हे लिहिणारी रियाच आहे का?? Uhoh
कुठे ती चॉकलेट साठी हट्ट करणारी बालिश रिया आणि कुठे हे प्रगल्भपणे लिहिणारी रिया Happy
छान लिहिल आहेस. आवडलं.

Pages