सहप्रवास १४ (अंतिम)

Submitted by भारती.. on 27 July, 2012 - 09:13

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570
http://www.maayboli.com/node/36582
http://www.maayboli.com/node/36620
http://www.maayboli.com/node/36644
http://www.maayboli.com/node/36676
http://www.maayboli.com/node/36699

सहप्रवास १४

(उमाचं दहीवाडीतलं घर. उमाशी गावातली एक बाई बोलत बसली आहे.एका टेबलावर हार घातलेला उमाच्या वडिलांचा -दादा नाईकांचा फोटो.दरवाजात आता मेघःश्याम येऊन उभा आहे.पन्नाशीतला.)

मेघःश्याम- उमा !!

उमा-(दचकून मागे वळून पहाते . क्षणभर स्तब्ध ! मग ) मेघ! तू इथे? न कळवताच?! किती वर्षांनी!

(त्या बाई निरोप घेऊन जातात.)

मेघःश्याम- किती प्रश्न! आत तर येऊ देशील! रीतसर विचारून आलो असतो तर काहीतरी फाटे फोडले असतेस त्यालाही.(तिचा हात हातात घेऊन) I am sorry उमा.दादांबद्दल ऐकलं तेव्हा रहावलं नाही.आधी मुंबईला आलो, संजीवनकडे फोनवर चौकशी केली तुझी आणि थेट इथे आलो.शेखर इनामदार कुठे आहेत ? प्रकाश्,मीनू,प्रीताही येताहेत तुला भेटायला.दादा कसे होते शेवटी ?

उमा-( किंचित उदास) वय झालंच होतं रे बाबांचं. पण हट्टी.शेवटपर्यंत माझ्याकडे रहायला आले नाहीत.' बघू नंतर' म्हणत राहिले.तशा माझ्या सतत फेर्‍या असायच्याच इकडे. किरकोळ तापाचं निमित्त झालं शेवटी. तरी मी लगेच दहिवाडी गाठली फोन आल्यावर.का कोण जाणे पण खूप निर्वाणीचं बोललो आम्ही. म्हणजे नंतर कळलं मला ते.. 'बाबा कसं वाटतंय,ताप उतरतोय ना?' मी विचारलं. त्यांची कफाची घरघर ऐकू येत होती. तेव्हा कळलं नाही, ती शेवटचीच घरघर होती..तर म्हणाले' उमा, सुखी आहेस ना बेटा ?' .. 'असं का विचारता ? काय कमी आहे मला?' मी म्हटलं पण माझे डोळे पाझरायला लागले .'काही नाही आणि सर्व काही ! निमकरकाका आठवतात ना?' असं म्हणून हसवलं मला.मग विश्रब्ध झोपी गेले ते शेवटचंच.(डोळे पुसते) आयुष्याचा एक भागच निखळून पडला बघ.

मेघःश्याम-(विषय बदलत ) आणि माझ्या आयुष्याचा हा भाग मला आज भेटतोय इतक्या वर्षांनी. (गंभीर,स्वतःच्याच विचारात बुडालेला).

उमा- बैस रे.एवढा प्रवास करून आलास. साहेब आहेत इथेच.मठात गेले आहेत. येतीलच.थांब आधी चहा आणते तुला. जरा फ्रेश वाटेल. रेहाना कशी आहे? तुझ्या मुलीचं नाव काय ते, सुहानी.. तिचा फोटो आहे का रे एखादा ?

मेघःश्याम-रेहाना,सुहानी.. मजेत आहेत दोघीही. सुहानीचं स्कूलिंग चाललंय..आता कुठे फक्त अकरा वर्षांची झालीय.रेहानाला काळजी लागलीय तिच्या वयात येण्याची.भारतात परतायचा विचार घोळत असतो अलिकडे रेहानाच्या डोक्यात. तरी मी सांगत असतोच, काय वाईट आहे इथे? इथले इतर सर्व फायदे हवेत.मग भारतीय दांभिकता तेवढी कशाला संभाळायची ?

उमा- उशिरा झालेलं एकुलतं एक मूल.ती काळजी करेल नाहीतर काय? आणि ही आपली त्रासदायक मूल्यं तरी आपल्याला कुठे सहजपणे सोडता येतात? कातडीलाच चिकटलेल्या गोष्टी आहेत या.

मेघःश्याम- काही चिकटलेलं वगैरे नसतं.आपणच घट्ट पकडून ठेवतो आणि त्याला संस्कृती वगैरे नावं देतो. हे इतक्या शक्यतांनी गजबजलेलं आयुष्य काटूनछाटून बोनसाय करून टाकतो. मी सांगतो उमा-चुकलंच आपल्या सर्वांचं.लग्न वगैरे काही न करता आपण सर्वांनीच एकत्र रहायला हवं होतं आपलंच कम्यून करून. इस्रायलच्या सुरुवातींच्या ज्यू वसाहतींसारखं.

उमा- इतकं काही टोकाला जायला नको हं मेघ. मला खात्री आहे सुहानी जिवाचा तुकडा असणार तुझ्या. जसा संजीवन माझ्यासाठी. काय बिघडलं आयुष्याचं? ठीकच तर गेलं!

मेघःश्याम-बिघडलं काहीच नाही ग.तुझं नाही. माझं नाही. मीनू,प्रकाश,प्रीताचंही नाही.अपापल्या परीने जगून झालं इतकी वर्षे ,पण आत एक अधांतरी फीलिंग राहिलं बघ. निदान माझ्या तरी.जणू काहीतरी हरवलंय. काही तरी कशाला? माझा आत्मा हरवलाय. मीच हरवून टाकला तो बेफिकिरीने . कळलं नाही मला मी काय गमावतोय ते.

उमा- पुरे मेघ! तुझ्या तोंडी अशी निराश भाषा शोभत नाही. अरे आता तर आयुष्यही अर्धं संपलंय!

मेघःश्याम- अर्धं उरलंय उमा! त्याचाच विचार करतोय मी सीरियसली. माझ्याकडे एक प्लॅन आहे उमा, तुझ्या आनंद-ओवरीच्या राजेश्वर देशमुखांशी डिस्कस करतोय मी तो..एक N.G.O.स्थापन करायचीय इथे मला.जिचे आपण सर्वजण ट्रस्टी असू. तू,मी,मीनू,प्रकाश,प्रीता,राजेश्वर. कार्यभार तुझ्याकडे, राजेश्वरकडे. आनंद-ओवरीबरोबरच ग्रामविकासाचं त्यांचं चाललेलं काम अधिक विस्तारवू आपण.शिवाय एक खास विभाग असेल ग्रामीण मुलांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणारा. हे बीज तुझंच तर आहे उमा. आता संजीवनमधून मोकळं झाल्यावर यात लक्ष घालायला काय हरकत आहे तुला ?

उमा.- (भांबावलेली) कठीण आहे- ऐकायला छान वाटतंय पण..मीनू,प्रकाश्,प्रीता येतील? साहेबांना पटेल हे सारं? इस्रायेलमधल्या ज्यू सेटलमेंटसबद्दल बोललास मेघ,त्या कोर्‍या नवतरुणांच्या होत्या!.मागले पाश तोडून आलेल्या. आणि सर्व पाशात अडकलेले प्रौढवयीन आपण..कठीणच आहे..

मेघःश्याम- कठीण आहेच, पण अशक्य नाही उमा. नाही म्हणू नकोस. मीनू,प्रकाश,साहेब,सगळ्यांना convince करायचं माझ्यावर सोड!

उमा- साहेबांना convince करणं अजिबात सोपं नाही हं मेघ.त्यांना तर तू अजून पाहिलंही नाहीस !

मेघःश्याम-माझा स्वतःवर खूप विश्वास आहे आणि न पहाताही त्यांच्यावरही.तुला नवीन काहीच करायचं नाहीय यात उमा,तुझं तर इथे माहेरघर आहे,आनंद-ओवरीत पुन: जमेल तसं लक्ष घालायचंय फक्त. नवीन गोष्टी आहेत त्या आम्हा इतरांसाठी. आम्हाला काहीतरी residential arrangements किंवा farmhouses सारखं काहीतरी जमवावं लागेल या परिसरात.खरं तर मलाच सर्वात जास्त कठीण आहे सारं. कामाचा व्याप,सुहानीचं लहान वय..मी अधूनमधूनच येऊ शकेन सध्या तरी. पण मूळ फंडस माझे असतील आणि मीनू प्रकाश प्रीता आपापला शेअर घेतील,म्हणजे मी convince करेन ना त्यांना. (हसतो.पुनः गंभीर होत) -उमा??

उमा-एक पर्व संपत आलं आहे.. आयुष्य विस्मृतीच्या काळोखात जायच्या आधी तू नव्या दीपत्काराची भाषा करतो आहेस.आश्चर्य वाटतंय,त्यादिवशीच्या भासात की स्वप्नात स्वामींनी पुन; मला आनंद-ओवरीला भेट द्यायला सांगितलं होतं..

मेघःश्याम-मला तुझा हा परमार्थ कधीच कळला नाही उमा,माझा तर सगळा एक प्रकारचा स्वार्थ आहे. एकमेकांचा सहभाग मिळावा,सग़ळ्यांना पुनः एकत्र जोडणारं एक चांगलं प्रयोजन असावं असा स्वार्थ. कदाचित या स्वार्थातून एक परमार्थ उगवेल माझ्यासाठी. कुणाकुणाला आपलं मानून आयुष्यभर झटलीस उमा, आज मलाही विन्मुख पाठवू नकोस.प्लीज.

उमा- ( किंचित सचिंत, पण उत्साहित होतेय ) मेघ, साहेबांशी बोलून ठरवावं लागेल मला . पण कल्पना चांगली आहे. प्रयोगशीलता सोडू नये कोणत्याच वयात.

मेघःश्याम-(आनंदलेला) ती एक संध्याकाळ आठवते याच घरातली, आयुष्यभराची निराशा पदरात बांधली होतीस माझ्या. आणि ही आजची संध्याकाळ..खूप सुंदर वाटतंय उमा अचानक आतून एक फीलिंग दाटून येतंय की जे झालं ते बरोबरच होतं आणि जे होणार आहे तेही बरोबरच असणार आहे..

उमा- (स्वतःशीच) हे पुनः स्वामींचेच शब्द! जे आहे ते बरोबर आहे! जे आहे ती ईश्वरेच्छा आहे!

मेघःश्याम- काय म्हणालीस?

उमा- काही नाही. मला गावंसं वाटतंय.तुझ्यासाठी अन बाबांसाठी. मी आज खरंच खूप सुखात आहे हे बघताहेत ते चिरप्रवासाला जाण्याआधी...!

मेघःश्याम- (हेलावून) गा ना. ते लाटा आणि समुद्रावरचं गाणं तुझं आवडतं.. 'निळाई'.किती दिवसांनी ऐकेन तुझं गुणगुणणं..

उमा-(गाते)
किती धीरगंभीर लाटा उसळल्या
कुणी आत्मघाती तटाशी विखुरल्या
कुणी सोज्वला कोमला उर्मिला त्या
तरंगात काही उसासून गेल्या. .

कुणी मत्त कोणी उदासीतमस्वी
कुणी मुग्ध कोणी जिव्हारीमनस्वी
कुणी चंद्रसाक्षी धरे बिंब वक्षी
कुणी ऐन मध्यान्ही तळपे तपस्वी

किती लक्षकोटीक लाटा सतंद्रा
जळ-अप्सरांच्या जणू भावमुद्रा
निळाई परी सागराची समग्रा
एकांतिका..एकता .. रुपरुद्रा..

निळाई अशी ही अपारा उदारा
न आटे न ओलांडते वा किनारा
येथेच ही नित्य डोळ्यांपुढारा
तरी मापवेना हिचा थांग सारा

( गाणं संपताना,पडदा, आणि ,

समाप्त. )

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

थोडा अनपेक्षित शेवट वाटला.
.....तरीही सकारात्मक शेवट आवडला.
ते निळाई गाणे - अगदी अप्रतिम.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा. (पु ले शु)

होय शशांकजी..हा शेवट स्नेहबंधांना विधायक दिशा देण्याचा एक प्रयत्न, जो थेओरेटिकल वाटू शकतो, पण प्रत्यक्ष जीवनात केला जाऊ शकतो..निरनिराळ्या परिस्थितींमध्ये.असो. निळाई वेगळेही टाकलेय्..पाहिलेतच तुम्ही. पुनश्च खूप आभार..

भारती ताई छान झाली कथा. मला शेवट थोडा अर्धवट वाटला पण पोझिटीव म्हणून आवडला. पण एकूण फ्लो छान होता . अश्याच लिहित रहा आणि आम्ही वाचत राहू.

ते दोघे परत एकदा भेटले ते छान वाटले. व्यक्तिरेखा छान आहे उमेची. आता अशी लोके कुठे भेट्तात. अजून काय काय लिहा बरे का.
पुलेशु.

आज खूप दिवसानी वेळ मिळाला आणि सर्व भाग वाचून काढले. सर्व भाग आवडले. एक नाटक म्हणूनही सुन्दर आहे.

नाटक वेगवेगळी वळणे घेउन जाते - ती वळणे आवडली. शेवट मला आवडला; पण तो शेवटच नाटकामधील कच्चा भाग आहे असे वाटते. कविताही आवडल्या. काही अधिक गीते असली तर एक उत्तम संगीत नाटक होइल.

पुढील लेखनाची जरूर वाट बघेन. शुभेच्छा पुढील लेखनासाठी.

नमस्कार भारतीताई, शेवट अनपेक्षित आहे पण खुप आवडला. विपु मधे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद Happy

प्रणाली,सुसुकू,मृदुला, खूप आभार.

प्रत्येक शेवट म्हणजे एक सुरुवात असते.
..एकमेकांना खूप जवळून ओळखणार्‍या माणसांनी नातेसंबंध जुळू शकले नाही म्हणून अटळ निरोप घेणे खूप सातत्याने रंगवले गेलेय. त्यामागल्या प्रेरणा शिळ्या कढीइतक्या उकळल्या गेल्यात.

आज व्यक्तिस्वातंत्र्य इतक्या प्रकारांनी वापरले जाते तर सामूहिक सहजीवन एखाद्या घट्ट ग्रूपला का जमू नये मूळ वैयक्तिक कर्तव्ये पार पाडल्यावर ? माझ्यासाठी हा एका लेखनाचा शेवट असण्याबरोबरच एका जगण्याची शक्यता आहे.

क्रमशः कथा मी वाचत नाही, त्यामुळे कदचित वाचायची राहून गेली होती.
आज अचानक सापडली, वाचली अन आवडली.