सहप्रवास १२

Submitted by भारती.. on 25 July, 2012 - 15:14

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570
http://www.maayboli.com/node/36582
http://www.maayboli.com/node/36620
http://www.maayboli.com/node/36644

सहप्रवास १२

( इनामदारांचंच घर. उमा एका बैठकीशी बैठाच चौरंग घेउन काहीतरी वाचतेय.काळ अजूनही लोटल्याच्या खुणा आता केसात चमकताहेत, देहावर उमटल्या आहेत. बाहेरून कृपाळकाका येतात. )

कृपाळकाका- नमः शिवाय नमः शिवाय! वहिनीसाहेब, आजचा अभ्यासाचाच दिसतोय दिवस ! आता संजीवनला मुंबईला होस्टेलवर पाठवून तुमचीही समांतर विद्यार्थीदशा सुरू झाली वाटतं ! आनंद आहे ! म्हणजे मराठ्यांच्या घरात एका बहुजनसमाजातल्या स्त्रीने ब्राम्हणी विचारांचे वारे आणले !

उमा- कृपाळकाका,इतकं झालं,अजूनही विचारांचा कोतेपणा जात नाही तुमच्या. साहेबांच्या घरात येताना मला धास्ती होती त्यांच्या शहाण्णव कुळी सनातनी वातावरणाची. खरं तर ब्राम्हणांची घरं मी नेहमीच प्रगतीशील विचारांची पाहिली होती. पण इथे झालं वेगळंच! साहेब काही न बोलता नेहमी पुरोगामी वागले आणि तुम्ही मात्र ब्राम्हण्याच्या अहंकारातून कधीच बाहेर आला नाहीत !

कृपाळकाका- कळलं असतं तुम्हाला तुमच्या सासूबाई असत्या तर .. थोरल्या वहिनीसाहेबांचा डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आला नव्हता.आठवणीच राहिल्या त्या.साहेबांच्या पिढीजात उपाध्यायांचं घर आमचं. घरात बायकांची जागा कोणती असावी याची स्पष्ट संस्कार आमच्यावर आहेत. तुम्हाला तो आमचा दोष वाटला तर त्याला आमचा इलाज नाही! खरं तर आपण एकमेकांना कितीही प्रतिकूल असलो तरी एकमेकांना टाळू शकत नाही! साहेबांनी तुम्हाला दिलेली मोकळीक, तिचे परिणाम आम्हाला पहावे लागतात आणि आमची इथली उपस्थिती तुम्ही हलवू शकत नाही !

उमा- चला ! परस्परांची ताकद आणि मर्यादा ओळखण्याच्या परिपक्व टप्प्यावर आपण दोघेही आलो एवढंही पुष्कळ झालं. आज माझ्या शहरच्या काही मित्रमैत्रिणी इथे यायच्या आहेत कृपाळकाका-.तुमची कामं आवरली असतील तर तुम्ही लवकर रजा घेऊ शकता..

कृपाळकाका-- होय तर, निघतोच मी. तुम्हाला अडचण कशाला माझ्या इथल्या वावरण्याची? पण साहेब घरात असताना अशा भेटीगाठी ठरवणं लोकांच्या नजरेला बरं दिसलं असतं !

उमा- लोकांना विवाद्य वाटेल असं काहीही आम्ही करणार नाही आहोत कृपाळकाका ! जाऊ दे.कठीण आहे तुम्हाला समजणं हे सगळं.. हा बेत अचानक ठरला आणि खरं तर साहेब नाही आहेत हेच बरंय. खूप दिवसांनी खूप कमी वेळ भेटणार्‍या माझ्या सुहृदांसाठी स्वतंत्र वेळ नको मला ? की तोही औपचारिकतेत घालवायचा ?

कृपाळकाका- शिव शिव ! काय हे बेफाम विचार ! असो. सुदैवाने आता वयाचा धोका रहिलेला नाही तेव्हा जनरीतीचा नसलेला धाक वाटून घ्यायचेही कारण नाही.

उमा- धन्यवाद! तुमच्या मानाने पुष्कळच समजून घेतलीत तुम्ही ही परिस्थिती . आता उद्याच भेटू दहाच्या सुमारास,साहेबही असतील. कसं?

( कृपाळकाका उत्तर न देताच तणतणत निघून जातात. उमा हसते. आता एकटीच आणि एका प्रकाशझोतात. एक पत्र वाचते आहे -)

उमा- मेघ ! किती वर्षांनी किती प्रदीर्घ पत्र हे तुझं.गुप्तधनाचा साठा म्हणू याला की वळीवाची सर ? आणि किती सुंदर मुहूर्तावर, जेव्हा मीनू आणि प्रकाश यायचे आहेत आज इथे. ( वाचते- )

'प्रिय उमा,

किती अपुरी असतात ही संबोधनं. मनात नेहमीच तुझ्याशी बोलतो तेव्हा कायकाय म्हणतो तुला..- प्रिय की प्रियतम, जानू की डार्लिंग ,जिवलगा की नुसतंच सोन्या.. पण इतक्या वर्षांनी लिहिलेल्या पत्राची रीतसर सुरुवात नको करायला ?

तर खूप खूप वर्षे झाली. खूप खूप वर्षांपूर्वीची एक गोड मुलगी खूपच मागे राहिली..म्हणजे तशी मनात नेहमीच वावरत राहिली, पण ते कुठे पुरेसं असतं ? आयुष्य म्हणजे एक वादळ असतं कर्तव्यांचं,achievements चं आणि प्रगतीच्या सुस्पष्ट टप्प्यांचं. या वादळातून चालताचालता आणखी खूप दूर गेलो तुझ्यापासून.

बरोबर रेहाना होती ! तुला कदाचित समजलं असेल की हा निर्णय मी किती मनस्ताप करून घेतला.मी हे समजून घेतलं की तू माझी होतीस पण फक्त माझीच नव्हतीस. दादांची, आनंद-ओवरीतल्या अनाथ मुलांची,स्वामींचीही होतीस. खूप विश्लेषण करून मी स्वतःला समजावलं की आपले रस्ते वेगळे आहेत. ध्येयंधोरणं वेगळी आहेत. ती ओरबाडून काढली तर आपण आपण रहात नाही. आणि जिवलग माणसावर मालकीहक्क सांगायचा अट्टाहास कशाला ?

गंमत म्हणजे आपण आपापल्या आयुष्यात स्थिरावलो ! तूही तुझ्या जगावेगळ्या पद्धतीने,मी माझ्या. And they lived happily everafter !असंच काहीसं ..

खरं तर खूप लिहिण्यासारखं आहे.बोलण्यासारखं आहे.कशी गेली ही वर्षे ? तुझी ? माझी? दिवसरात्र बोलत राहिलो तरी संपणार नाही इतके काही साठले आहे.

Some other time ! हाताशी फोन आहे,इमेल आहे पण माझ्या आर्ट गॅलरीत एक सुंदर चित्र आहे. सुंदर पण धूसर. त्याच्याशी संवादण्याचे रस्ते या गॅजेटस मधून जात नाहीत! त्या चित्रासमोर ध्यान लावून बसावं लागतं,ध्यान लावून डोळे मिटून ते चित्र मनातल्या मनात पहावं लागतं.मग संवादाचे रस्ते उलगडतात !

पण आज एवढंच लिहिणार आहे की एक भावना मनात प्रबळ आहे. त्या बस-स्टॉपवर मी म्हणालो होतो, अपराधी वाटतंय. नंतर माझा निरोप घेताना तू म्हणाली होतीस ,अपराधी वाटतंय. कोणते अपराध केले आपण एकमेकांचे खरंच नीटसं कळत नाही पण केले. आणि पहिला जसा मी केला होता तसा शेवटचाही मीच केला. लग्नाचा, तुला सोडण्याचा निर्णय आधी मी घेतला. मी अपराध माझ्या आत्म्याशी केला उमा. त्याचं परिमार्जन करण्याचा एक छोटासा प्रयत्न नाही करू देणार तू मला ?प्लीज रागावू नकोस ! आणि रागावलीस तरी काय फरक पडतोय? मला करायचंय ते मी करणारच.

Love of a lifetime .

तुझा,

मेघ.'

(वाचतावाचता थांबते. पुनः स्वगत-)

उमा- इथे संपलं हे पत्र.अर्थ काय याचा ? वाचायला द्यावं हे मीनूला ?पण नकोच. घडी करून पुस्तकात ठेवून देते. एक नि:श्वास टाकून आत जाते. थोडावेळ रंगमंचावर कुणीच नाही.मग दरवाजात मीनू, प्रकाश.)

मीनू- कुणी आहे का घरात? उमा- ए उमा!! आम्ही आलोत बघ!

( आतून उमा येते.तिघंही एकमेकांच्या मिठीत ! मग थोडे सावरतात.)

उमा- मीनू! प्रकाश!! कसं अचानक ठरवून आलात! आणि कसला ग्रँड योगायोग ! आज मेघचंही पत्र आलंय मला ! पण तुम्हाला वाचायला द्यावंसं वाटत नाहीय मला ते अजून.चढलंय मला ते पत्र. अजून तरंगतेय मी.

मीनू- खडूस कारटी ! आम्ही एवढ्या लांब तंगड्या तोडत आलो त्याचं काही नाही. मेघचं पत्र म्हणे. तूच वाच आणि फ्रेम करून ठेव ते.

प्रकाश- आणि प्रीताला बरोबर न घेता मी मीनूबरोबर आलोय. केवढं रिस्क घेतलं तुझ्यासाठी. मेघचे कसले गोडवे गातेस ? तुझे खरे मित्र आम्हीच.

उमा- खरंय रे बाबांनो.माफी मागते मी तुमची. अगदी आत्ता ते पत्र वाचतावाचता तुम्ही आलात ना म्हणून असं वेड्यासारखं बोलले.कसा झाला रे तुमचा प्रवास? किती वर्षांनी भेटतोय आपण. चला जेवून विश्रांती घ्या. दमला असाल. संध्याकाळी मस्त नदीकाठी फिरायला जाऊ.आमचा मळा पाहू. गेल्यावेळी सर्वजण आला होत ना, तेव्हापेक्षाही आता छान झालाय. पेरूची बाग तर नुसती बघत रहाशील मीनू. प्रभात, परिमल,दोघांना घेऊन यायचं ना. आणि प्रकाश, दीडशहाण्या,कुणी सांगितलं होतं प्रीताला न घेता यायला ?

मीनू- तसं नाही ग,त्याच्या बडबडीवर काय जातेस ? प्रीताला कसलीशी मीटिंग होती.ती हल्ली महिला दक्षता समितीचं जोरदार काम करते. मलाही बोलवत असते कुठेकुठे.

प्रकाश- तिला कामधंदा काय आहे दुसरा ? मूलबाळ नाही हे पथ्यावरच पडलंय तिच्या.

उमा- किती दुष्टासारखं बोलतोस रे प्रकाश.खरं तर किती छान जीव रमवतेय ती स्वतःचा.या सगळ्याची किती गरज असते समाजाला. सगळे जण आपापल्या कोशात शिरून बसले म्हणजे ती काय आदर्श परिस्थिती म्हणायची का ?

मीनू- बाप रे ! आदर्शवाद तुझ्याइतका कोणाला कळलाय उमा ? मी तर करिअरिस्ट म्हणून बदनाम, प्रीता activist म्हणून.आदर्शांचा मक्ता तुझ्याकडेच उमा. (दोघेही हसतात.)

उमा- पुरे आता पिळवणूक.आता सांगा,अचानक यायचं कसं ठरवलं तुम्ही दोघांनी? काय झालं?

मीनू- (गंभीर होत)- उमा गेल्याच आठवड्यात न्यूयॉर्कला एका परिषदेसाठी गेले होते.तिकडे गेलेच तर मेघला भेटले ठरवून.तो माझ्या हॉटेलवर आला. खूप बोललो.खूप विचारलं त्याने तुझ्याबद्दल. आणि सगळ्यांबद्दल. जेव्हा कळलं त्याला की संजीवन खूप हुशार आहे आणि S.S.C. नंतर त्याला मुंबईच्या होस्टेलवर ठेवलंय ,पुढे त्याला मेडिसिनमध्ये खूप प्रगती करायचीय तेव्हा खूप गंभीर झाला. मला म्हणाला संजूच्या पुढच्या शिक्षणासाठी तो एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. म्हणून एक चेक दिलाय.
( एक पाकिट उमाच्या हातात देते. उमा अवाक.प्रकाश शांत. वातावरणात स्तब्धता. )

उमा- अस्सं.म्हणजे हा योगायोग नाही तर! तरीच ते पत्र आजच आलं. (पाकिटातून चेक बाहेर काढते.) दहा हजार डॉलर्स! Megh must be mad !

प्रकाश- उमा ,इथे मेघच्या वतीने आलोय मी. तुझ्या कोणत्याही अटींवर,प्लीज, हे स्वीकारच म्हणून सांगायला त्याने मला स्पेशल फोन केला होता..Don’t break his heart again !

उमा -(हसते) Again ! तू पहिल्यापासून त्याच्याच बाजूचा रे प्रकाश.(डोक्यावर हात दाबून विचार करते.) मीनू, आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे हे तूच सांगितलं असशील त्याला. (मीनू काही बोलत नाही.)
O.K !.I accept ! मेघ,मी माझ्या अटींवर घेतलं हे तुझं हे कर्ज. हे सव्याज परत करेल माझा संजीवन. तुला आणि समाजालाही.

(मीनूला अश्रू आवरत नाहीत.ती डोळे पुसत असतानाच -
पडदा.)

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

ब-याच घडामोडी झालेल्या दिसताहेत मधल्या काळात - छोट्या छोट्या प्रसंगातून ब-याच गोष्टी सांगायचे चांगले कसब आहे तुमच्याकडे.....
पुढे काय, पुढे काय - उत्सुकता ताणत चाललीये........

मनस्वी आहे तुमची उमा. फार आवडली ती अन तुमची ओघवती शैली. Happy असेच लिहीत रहा. Happy
बरं, क्रमशः आहे का अजून ?