सहप्रवास १०

Submitted by भारती.. on 23 July, 2012 - 12:49

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570
http://www.maayboli.com/node/36582

सहप्रवास १०

( उमाचं शहरातलं तेच घर. बेल वाजते आहे.उमा आतून आले.. आले करत पण थोड्या वेळाने येऊन दरवाजा उघडते. थकलेला अवतार. निमकरकाका प्रवेशतात.

काका- उमा.. किती थकलेली दिसतेयस बेटा-कुणी सांगितलं होतं इतकी कामं काढून बसायला? होताहोईतो साफसफाई करून घेत असतो मी या घराची.आज येणार हे थोडं आधी कळलं असतं तर अजून जोर लावला असता..आज अजून कुणाकुणाला बोलावलं आहेस उमा?

उमा- काका.. अधुनमधून धावत्या भेटी होतातच इथे पण हा मात्र मोठा interval आहे हं.याच्यानंतर इथे यायला जमेल का,हे घरच ठेवायला जमेल का .. सगळेच प्रश्न आहेत. सगळे प्रश्न विसरून आजची संध्याकाळ सुहृदांबरोबर enjoy करायचीय मला. आज मीनू येईल,माझी कॉलेजातली जिवलग मैत्रीण,अरुंधती तर सातार्‍याहून माझ्याबरोबरच आलीय-बाहेर इथल्या तिच्या एका नातेवाईकाला भेटायला गेलीय.आणि तुम्ही. अजून कोण हवं?

काका- पाच वर्षे लोटली आक्का गेल्याला. त्यानंतर हे घर कमी अधिक बंदच आहे.खरं तर जिवाला फार मोठा चटका लागायचा तू गेल्यानंतर..पण श्रेयससारखा गोड नातू झाला आणि रमलो मी! तूही लग्न कर आता उमा.या ठराविक वाटणार्‍या गोष्टीच आयुष्याला आकार आणतात,गोडवा देतात.

उमा-मी कुठे नाही म्हणते काका? पण मनासारखं कुणी मिळेल तर ना! आणि त्या तसल्या माणसाला ही असली मी आवडायला हवी ना ? सगळ्यात कठीण बार्टर एक्स्चेंज लग्नाचाच काका. होय ना?

काका- (हसतात) मनात मोकळी जागा ठेवावी म्हणजे भरते ती अलगद.. खूप अपेक्षांचे काटेकुटे पसरून ठेवू नयेत तिथे.

उमा- काका.. आता कसं सांगावं तुम्हाला.. जाऊ देत. पण मनावर घेईनच मी मनात जागा ठेवण्याचं. (दोघेही हसत असतानाच उघड्या दारातून मीनू येते.)

मीनू- काय विनोद झालाय मलाही सांग ना उमा.किती छान दिसते आहेस..भरली आहेस थोडी अंगाने..बरं वाटतंय तुला पाहून.

उमा- होय ग बाई,आधी ओळख करून देते. हे माझे निमकरकाका,आणि काका, हीच मीनू. अग, नेहमीचा लग्नाचा विषय काढला की विनोदांना काही तोटा असतो का सांग..मीनू डार्लिंग! खरी कर्तबगार बाई वाटते आहेस. म्हणजे आहेसच.इतकी प्रमोशन्स घेतलीस पटापट आणि प्रभात सारख्या गोड प्रेमळ मुलाशी लग्नही झालंय आता.सुखात रहा नेहमीच मीनू.. तुझ्याकडे बघूनच शांतशांत वाटतं मला.

मीनू- उगीच उदंड कौतुक करतेस माझं नेहमीच.बरं ,मठाचं कसं चाललंय ते सांग आधी. तू सगळं सोडायचं ठरवते आहेस हे ऐकून बरं वाटलं आणि वाईटही.इतकी रमली होतीस ..दोनाची पाच वर्षं काढलीस तिथे.किती केलंस तू आनंद-ओवरीसाठी.सगळीकडे नाव झालं तुझ्या इतक्या लहान वयात केलेल्या कार्याचं आणि आत तिशीच्या तोंडावर सोडते आहेस.. काय नवीन ठरवते आहेस? इथे मला मात्र तुझ्याकडे बघून काळजीच वाटते नेहमी.

उमा- खूप नाट्यपूर्ण घटना घडल्या.स्वामी निवर्तले.त्यांच्या अखेरच्या आजारपणात राजेश्वर देशमुख ,मठाचे प्रमुख आश्रयदाते कॅनडाहून भारतात परत आले. उमदा तरूण माणूस..आनंद-ओवरी आणि एकूणच गावासाठी खूप योजना आहेत त्यांच्या डोक्यात.अगदी शेतीसाठी पाणी नियोजन,पर्यायी पिकं,लागवडीचे नवीन प्रयोग, मार्केटिंगचे ऑप्शन्स असं बरंच काही.आमच्या गावाचं नाव जगाच्या नकाशावर आणायचंय त्यांना. अरुंधती आनंद-ओवरीला खूप विरोध करत होती प्रथम,पण नंतर मनापासून सहकार्य केलं तिने मला. राजेश्वर देशमुख आणि ती लग्न करताहेत. स्वामी गेले..जुनं जग गेलं,आता नवीन येतंय.मधल्या काळात मी सगळं सांभाळलं,माझ्या मर्यादेत वाढवलं. योग्य माणसांच्या हातात देऊन तिथून योग्य वेळी बाहेर नको का पडायला ?

निमकरकाका - पण यात तुझ्या भविष्याचा विचार येतोय कुठे? फक्त इतरांचे विचार केले आहेस तू.

मीनू- खरं आहे काका... एक अप्रिय गोष्ट आधीच बोलून टाकते..तुला माहिती असेलच बहुधा-मेघ;श्यामने रेहानाशी लग्न केल्याचं कळवलं असेलच ना तुला ? उमा,कोणत्या भ्रमात असशील तर आता बाहेर ये. काहीतरी व्यवहारी निर्णय घे..

( सगळेच थोडा वेळ स्तब्ध.उमा सरस्वतीच्या शिल्पाजवळ पाठमोरी झालेली. निमकरकाका येरझार्‍या घालताहेत. मग उमा पुन; सर्वांना सन्मुख.)

उमा- मीनू,आजची संध्याकाळ enjoy करायचीय मला. हम अपने गमको सजाकर बहार कर लेंगे..( भावना लपवत हसण्याचा प्रयत्न करते. मीनू तिच्या खांद्यावर हात ठेवते.पुन; सावरत-) -पण कल्पना होतीच मला याची.शक्य नव्हतं मला त्याच्याबरोबर जाणं आणि त्याला माझ्याबरोबर येणं..मीनू,जे अप्राप्य तेच का एवढं आवडतं का असतं ग? की जे आवडतं ते अप्राप्य असतं?

मीनू- जाऊ दे ग उमा- माझी खात्रीच झालीय की फार चुकीच्या मुहूर्तावर एकमेकांकडे आकर्षित झालात तुम्ही. नसतंच जमलं तुमचं एरवीही. बरं झालं सगळं संपलं ते. उमा,तूसुद्धा नक्कीच सगळ्याचा विचार करते आहेस.. या बातमीमुळे मोकळी होशील तू निर्णय घ्यायला.

उमा- काय ठरवायचं असतं? काय करायचं असतं या एवढ्या मोठ्ठ्या आयुष्याचं ..? मला एवढंच कळतं की ढोरमेहनत करत रहायचं. बरं असतं ते व्यसन. खूप सुरक्षित वाटतं त्याच्या धुंदीत. बाकी सगळे टप्पे म्हणशील तर फार क्षणभंगूर समाधान देतात. तिथे पोचलं की कळतं नवीन प्रश्नच वाट पहाताहेत आपली. निमकरकाका,मीनू, मीही एका प्रस्तावाचा विचार करतेय आता. आमच्याच पंचक्रोशीत शेखरसाहेब इनामदारांचं मोठ्ठं घर आहे.शेतीवाडी ,गुरंढोरं ,नातीगोती, आणि पहिल्या बायकोचा एक गोड मुलगा.. भरपूर कामं असतील मला.आनंद-ओवरीसाठी देणगी मागायला गेले तिथे ओळख झाली..मग मठातल्या येण्याजाण्यातून वाढत गेली..मैत्रीत परिवर्तित झाली त्यांच्या सरळ उमद्या स्वभावामुळे आणि आता..

मीनू - ( धक्का बसून) उमा ? अग दुसरेपणावर ? काय गरज काय ?

उमा- दुसरेपणा कसला ? विधूर माणूस तो. एकटाच आहे मनाने. त्याला माझा,मला त्याचा पहिलाच अनुभव आहे हा.

काका- आणि दादा ? त्यांना पटलंय हे सगळं? उमा अग पक्क्या housewife ची भूमिका रुचेल तुला ?हेच का हवं होतं तुला शेवटी ?

उमा- हवा तर होता चंद्रच- आणि कशावरून साहेबच तो चंद्र नाहीत? उगीच आपले पूर्वग्रह तुमचे. माझ्यावरच्या प्रेमामुळे.

मीनू- तू खुश असशील उमा तर दुसरेपणा हाही मुद्दा नाहीय. पण अग ही कुठे हरवत चालली आहेस तू ! तुझी चित्रप्रदर्शनं,तुझ्या वादसंवादसभा,तुझ्या जिवलग भेटीगाठी या सगळ्यांचं शहर दूर करून कुठे वाटचाल करते आहेस?

उमा- कुठे दूर जातेय मी ? याच काळात वावरतेय ना ? तुम्ही जेव्हा दमाल थकाल या प्रिय शहराच्या धावपळीत तेव्हा माझ्या निवार्‍याला या..मी जेव्हा कंटाळेन माझ्या दिवसरात्रींच्या येरझारांना तेव्हा तुमच्याकडे येईन. आणि दिवस निरर्थक कुठे जातात ? तू तुझा प्रॉफिट वाढवशील तेव्हा उमा, मी संजीवनला ,आमच्या मुलाला वाढवेन,माझी झाडं वाढतील,शेतं फुलारतील- गाईगुरांचे गोठे गजबजतील.. मीही आनंदातच असेन मीनू.

मीनू - निरुत्तर करतेस नेहमीच. तुझं ऐकून ऐकून खरं वाटायला लागतं शेवटी. खरं तर या विचित्र संकल्पनांच्या मार्केटिंगचं शास्त्र असतं ना उमा, तर तू त्याची कुलगुरू झाला असतीस ! मी पण येऊ का प्रभातला घेऊन सातार्‍याला शेतीवाडी करायला ?

उमा- मीनू,फिरकी घेतेयस माझी. मला माहितेय ग इतकं सोपं नाही ते..समस्या तिथेही आहेतच पुष्कळ पण जगण्याची तीसुद्धा एक समृद्ध रीतच आहे ना ?आपल्या निर्मितीक्षमतेला वेगळ्या वाटा मिळवून देणारी ? मी तिथे जाण्यातच तर गंमत आहे मीनू ! ( हसते पण सुस्कारा सोडते.)

मीनू- I hope you will be happy उमा .मी प्रार्थना करेन तुझ्यासाठी.तुझ्या जगावेगळ्या निर्णयांसाठी. (अरुंधती येते.)

उमा- ये अरु, ही मीनू आणि हे निमकरकाका. आम्ही वाट बघत होतो तुझीच.

अरु- नमस्कार मीनूताई,निमकरकाका. आणि अभिनंदन मीनूताई.. सगळ्याच गोष्टींसाठी..

मीनू- तुझंही अरुंधती. आज सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन करायचा दिवस आहे.

निमकरकाका- मी यात नाही हं. माझं अभिनंदन करण्यासारखं काही घडलेलं नाही.

उमा- सर्व काही आणि काही नाही या सगळ्यातून तुम्ही पार झाला आहात असंच ना ?!

काका- आज आक्कांची आठवण येते आहे.

उमा- आणि आईचीही. व्रण भरल्यासारखे वाटतात ,पण एकेकदा खूप पाझरतात.

काका- (विषय बदलत) अरुंधती, तू गातेस छान असं कळलंय आम्हाला. तुझं गाणं ऐकल्याशिवाय सोडणार नाही आम्ही ! कोणतं म्हणशील ?

अरुंधती- उमाताईंच्या खूप आवडीचं..वनतंद्रा.. (गाते)

काठावरती लोककथांची वनतंद्रा घुमते
मातीस मेंदीचा वास दिशांतून उन्मादी गीते

डोहात जांभळे तरंग रेखून जलाप्सरा थकल्या
पाण्यावर सोडून घागरी कोण वाट चुकल्या ?

मी धुळीत पाऊलखुणा शोधता भरला मंत्रचळ
कापले ओठ तापले श्वास गात्रांची होरपळ

हा श्यामसमय की शांत निळ्यावर भडका ज्वालांचा
ही दृष्ट लागली की करुणामय कृपाक्षेप त्याचा

-सांगती लाजर्‍या मुक्ता-' याहून विलक्षण घडते'
'आषाढरात्रीची वीज कुणाची सखी मायेची होते '

( गाणं संपतानाच, पडदा.. )

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

खूपच मजेशीर वळणे घेत चाललीये कथा (तसं म्हटलं तर आयुष्य हे सरळ रेषेत जातच नाही कधीही.....)...

मनात मोकळी जागा ठेवावी म्हणजे भरते ती अलगद.. खूप अपेक्षांचे काटेकुटे पसरून ठेवू नयेत तिथे. >>>>>

जे अप्राप्य तेच का एवढं आवडतं का असतं ग? की जे आवडतं ते अप्राप्य असतं? >>>>

काय ठरवायचं असतं? काय करायचं असतं या एवढ्या मोठ्ठ्या आयुष्याचं ..? मला एवढंच कळतं की ढोरमेहनत करत रहायचं. बरं असतं ते व्यसन. खूप सुरक्षित वाटतं त्याच्या धुंदीत. बाकी सगळे टप्पे म्हणशील तर फार क्षणभंगूर समाधान देतात. तिथे पोचलं की कळतं नवीन प्रश्नच वाट पहाताहेत आपली. >>>>

......ही व अशी अनेक सुरेख आशयघन वाक्ये मन वेधून घेताहेत या कथेतील.......
खूपच मस्त...... असेच भराभर पुढचे भाग येऊ देत.......

खूप खूप धन्स शशांकजी,शाम, तुमच्या प्रतिसादांमुळे माझी ढोरमेहनत सार्थकी लागलीय.. :))

''खूपच मजेशीर वळणे घेत चाललीये कथा (तसं म्हटलं तर आयुष्य हे सरळ रेषेत जातच नाही कधीही.....)...''

अगदी खरं शशांकजी ..