सहप्रवास ९

Submitted by भारती.. on 22 July, 2012 - 02:07

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570

सहप्रवास ९

(उमाचं घर. दादा आणि मेघःश्याम बोलत बसले आहेत. दादा मेघःश्यामचं बारीक निरीक्षण करताहेत आणि तो अर्थातच अस्वस्थ.)

दादा-निरोप पाठवलाय मी उमाला तुम्ही आलात म्हणून. येईलच मठातून ती आता.

मेघःश्याम -हे मठ प्रकरण काय आहे ?म्हणजे प्रीता-प्रकाशकडून थोडंसं कळलं मला ते.. पण उमाने असल्या Set-up मध्ये अडकावं हे मला तरी पटत नाहीय. तुम्हाला ?

दादा- माझी मतं नेहमीच व्यक्तिगत असतात..या गावचा असूनही आमच्या नोकर्‍यांमुळे आम्ही बरीच वर्षे मुंबईत काढली. उमाची आई निवर्तल्यावर हे वडिलोपार्जित घर मी जवळ केलं आणि उमाला आक्काबरोबर शिक्षणासाठी मुंबईतच ठेवलं.त्यामागे एक हेतू होता. उमाचं आम्हा दोघांवर आत्यंतिक भावनिक परावलंबन होतं. ते कमी व्हावं असा. दुर्देवाने आक्काच्या अपमृत्यूनंतर ते बळावलं आणि उमा इथे परत आली. माझी खंत एवढीच आहे की हा आधार तिच्यासारख्या मुलीला तिच्या समवयस्क जवळच्या व्यक्तीकडून मिळायला हवा होता ( मेघःश्यामकडे साभिप्राय बघतात )..असो! तसं घडलं नाही.पुढे म्हणाल तर इथे आल्यावर उमा स्वामीजींकडे आकर्षित होणं कदाचित क्रमप्राप्त होतं.तिच्यामध्ये एक विस्कळित आध्यात्मिकता आहे व स्वामीजी हे चौकटीबाहेरचं व्यक्तिमत्व आहे.. सध्या तरी एका विधायक कामात ती गुंतली आहे. हे गुंतणं तिला आवश्यकही आहे. जवळजवळ मानसिक संतुलन हरवून ती इथे आली होती..

मेघःश्याम- गुंतण्यासाठी याहून कितीतरी चांगले पर्याय आहेत काका- मी सुचवू शकेन उमाला.

दादा- अवश्य सुचवा. माझ्यासाठीही आनंदाची गोष्ट असेल ती. पण तिने तुमचं ऐकायचं तर तसा अधिकार तुमचा तिच्यावर हवा. माफ करा,सरळच विचारतो, तसा विशेष अधिकार मिळवलाय का तुम्ही?

मेघःश्याम-मिळवायची इच्छा आहे, आणि खरं सांगतो,तिला गमावण्याचं भयही आहे आत्ता मनात.

दादा- ( एक नि:श्वास टाकत) ते तुम्हाला संपवून टाकायला हवं कोणतातरी निर्णय घेऊन. (उमा येते) ये उमा- हे तुझे मित्र मेघःश्याम धुरंधर मुंबईहून आलेत तुझ्या चौकशीसाठी.बर्‍याच गप्पा झाल्या आमच्या तू येईपर्यंत.मी जरा संध्याकाळचा फेरफटका करून येतो बेटा,तुम्ही बसा बोलत निवांत.. (बाहेर जातात.)

मेघःश्याम- उमा! कशी आहेस सोन्या! किती वाळली आहेस आणि डोळ्यांखाली ही काळी वर्तुळं.मी इतका परका वाटलो की एकटीने सहन केलंस सारं.( अश्रू लपवण्यासाठी चेहरा फिरवतो.)

उमा- परका कुठे झाला आहेस वेड्या! पण परदेशी मात्र होणार आहेस म्हणून कळलं..अभिनंदन मेघ! नीट सांग बघू कायकाय ठरलं आहे ते..

मेघःश्याम- ही रीत झाली बोलण्याची उमा? अभिनंदन कसलं आणि परक्यासारखी तर तू वागतेयस. म्हणे कुठे जाणार ते सांग! हे सगळं सोड उमा ,हा मठ आणि कायकाय चाललंय तुझंच ते.माझ्यापासून दूर जाणारे रस्ते आहेत हे.उमा, मी तुला मागणी घालायला आलोय. होय,अमेरिकेलाच जाणारेय मी, I.M.F.A..A चा Media Management चा पायलट कोर्स संपवून आता न्यूयॉर्क पुढील अभ्यासासाठी .मेट्रोपॉलिटन कॉलेज.परत यायचं नाही असं ठरवलंय.उमा,माझा जीव रमत नाही या देशात.जे अनुभवसमृद्ध व्यावसायिक जीवन हवं ते मिळत नाही इथे.सगळीकडे क्षुद्रवाद. माझ्याकडे तुझ्यासारखी सहनशक्ती नाही ग. वर्षभराने परत येईन तेव्हा लग्न करू.उमा,तू बरोबर असशील तर माझा देश माझ्याबरोबर असेल. विन-विन! तयार आहेस ना डिअर ?

उमा- किती बरं वाटतंय मेघःश्याम- एवढा आनंद देतो आहेस- सवयच गेलीय बघ आनंदित व्ह्यायची.किती प्रतीक्षा केली होती या क्षणाची..

मेघःश्याम - ( पुढे होऊन तिला जवळ घेतो. निकटतेचा एकच क्षण आणि ती स्वतःला पुनः सोडवून घेते) हे काय उमा-इतक्या दिवसांनंतर दिसते आहेस ती खरी आहेस की भासातली हे तरी मला ठरवू दे....

उमा- मेघ,खेड्यात आहोत आपण. कुणीतरी येईल पटकन आणि माझं पुरतं ऐकलं कुठे आहेस अजून? तू परदेशी चालला आहेस, तुझी दिशा तू ठरवली आहेस-तशीच माझी मीही. मला काय हवं होतं ते इथेच सापडलंय मला.

मेघःश्याम - (धक्का बसून) काय म्हणायचंय काय तुला उमा? तू स्वतःच्या मनाला इतकं फसवू शकतेस? असं काय मौलिक करते आहेस इथे म्हणून तू मला दूर करावंस? हा मठ वगैरे bullshit पटतं का तुझं तुला तरी? अचानक तुझं ध्येय बनलं हे सगळं? आणि तुझ्या या सेवाव्रतात तरी काय originality आहे उमा? तू नाही तर दुसरं कुणी सापडेल त्यांना.माझी तर खात्री आहे,आत्ताच कुणीतरी टपून बसलेलं असेल तुझी जागा घ्यायला.

उमा- originality, मौलिक वगैरे मला नाही कळत मेघ, तुझ्याइतकं महत्त्वाचं काहीच नाही खरं तर. पण हे मन आहे ना,कालपरवापर्यंत उद्ध्वस्त झालेलं,मोठ्या कष्टाने रमलंय इथे, सावरलंय..या साध्यासुध्या माणुसकीने ओथंबलेल्या कामात.मीही शब्दच दिलाय त्यांना काही काळासाठी.मला परदेशी नेऊन तू कामात अडकशील आणि या दुखण्यासारख्या मनःस्थितीतून कशीबशी नॉर्मलवर आलेली मी पुनः एकटी होईन. तुझ्याइतकी मी तिथे रमेन असं नाही वाटत मला. आतल्या आत सारं सोसणारे माझे बाबा ही एकटे होतील!कुणीच सुखी होणार नाही.मेघ,दुसरा काहीच पर्याय नाही का रे?

मेघःश्याम - I am disappointed उमा. तुला मी हवा आहे की नको? तुझ्या अटींवरच मी तुला हवा आहे उमा.

उमा- अटींची आणि अटीतटीची भाषा नको वापरूस मेघ..मी घाई नाही करत तुला.प्रवाही असू दे आयुष्य. कसं सांगावं तुला की तुझ्याइतकं काहीच हवंसं नाहीय माझ्यासाठी. पण तुझ्यामागून परदेशी प्रस्थान नाही ठेवू शकत मी.सगळे निर्णय उत्स्फूर्तपणे घेत आले मी मेघ आणि आज माझं अंतर्मन मला सांगतंय परदेशी जाऊ नकोस.(अचानक) मी तुला इथे बोलावलं तर इथे येशील मेघ? (तो गडबडतो.ती हसते.) कठीण आहे ना? मग माझ्यासाठी परदेशी येणं तितकंच कठीण आहे.

मेघःश्याम- माझ्या सगळ्या स्वप्नांवर किती सहज पाणी फिरवते आहेस! मला शंका होतीच की काहीच सरळपणे होणार नाही! बोलून ऐकायची नाहीस तू उमा. मी फोर्स करेन. पळवून नेईन तुला. (तिचा हात हातात घेऊन ) उमा, या स्पर्शाची भाषा ऐक ग, वय काय सांगतंय ते तरी ऐक. .

उमा - (क्षणभर सुखस्वप्नात हरवलेली ) मी आयुष्यभर जपेन हा सुंदर क्षण मेघ. या स्पर्शातली कविता मला माझ्या ग्रीष्माशी झुंजताना बळ देईल.. ही लोभस संध्याकाळ माझ्या चित्रदालनातलं सगळ्यात सुंदर चित्र असेल मेघःश्याम,पण या क्षणाच्या बेरजा आणि गुणाकर करून आपल्याला सुख मिळेल असा भ्रम नाहीय मला ,उलट हरवून जाईल हा क्षण, अपेक्षांच्या,अधिकारांच्या भाऊगर्दीमध्ये.. (दूर होत) मी तुला मोकळं करते आहे मेघ..कुणीसं म्हटलं आहे ना,ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला मोकळं सोडा. ते प्रेम खरं असेल तर ती व्यक्ती परतून येईल तुमच्या जीवनात. पण मेघ,,याही अपेक्षेत दु:ख दडलेलं आहे.मी कसलीच अपेक्षा न करण्याचा प्रयत्न करेन.

मेघःश्याम - बोलण्यात हरणार नाहीस आणि समजतंय मला तुला काय म्हणायचंय ते. सगळंच बरोबर आहे. ( नि:श्वास टाकत) मी निघणार आहे महिन्याभरात.नेहमी संपर्कात राहेन असं नाही,पण उमा,नित्य आठवण करेन तुझी. 'उमा' म्हणत जागा होईन, 'उमा' म्हणत झोपी जाईन. दु:ख देते आहेस..

उमा- मेघ,आपल्या बस स्टॉप वरच्या भेटीत म्हणाला होतास,अपराधी वाटतंय.. आज मला अपराधी वाटतंय! हे असं का होतंय?

मेघःश्याम- खरं तर काहीच नकोय तुला उमा. म्हणून अध्यात्माकडे आकर्षित होतेस. मी उघड्या डोळ्यांनी पहातोय की तू खरं जीवन अव्हेरते आहेस आणि मृगजळामागे जाते आहेस.

उमा- कोण जाणे मेघ, माझं मन आज शांत झालंय.तुला हव्या असलेल्या पर्यायांनी ते पुनः अशांत होईल. त्याचा त्रास दोघांनाही होईल. तू मला नेहमीच हवा आहेस मेघ माझं आनंदनिधान म्हणून.तुला मनस्ताप देण्यासाठी नाही. ( अश्रू घळघळतात ) का नाही मी चारचौघींसारखी मेघ? का अशा जीवघेण्या सिचुएशन्स माझ्या वाट्याला येतात? का तूही असा आहेस मेघ? का इतका मोह आहे तुला यशाचा,जीवनशैलीचा? तू मृगजळामागे जात नाहीस याची खात्री आहे तुला ?

मेघःश्याम- अटळ आहेत फक्त वाद..एकमेकांकडे पुनःपुनः आकर्षित होणे अन दूर जाणे! आयुष्य Dynamic आहे उमा आणि तुझे विचार एखाद्या Static चित्रासारखे वाटताहेत मला.सुंदर आणि अनाकलनीय.. पुनः कोणत्या परिस्थितीत आपण भेटू मला माहीत नाही. हरवून टाकू नकोस स्वतःला उमा,निदान हे तरी वचन दे मला !

उमा- मेघ, जीव घाबरा होतो आहे! एकदाच जवळ घे !
( दोघेही एकमेकांच्या मिठीत असतानाच- पडदा.)

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

उमा व मेघःश्याम यांची घालमेल, त्यांना वाटणारे आकर्षण, त्यांची ध्येये हे छान रंगवलंत.
उत्सुकता चांगलीच ताणलीये.....

धन्स शशांकजी! अशा प्रतिक्रियेमुळे 'to be or not to be'..चा लिहिणारीचा पेच सुटतो.. :))