सहप्रवास ६

Submitted by भारती.. on 17 July, 2012 - 06:27

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36481

सहप्रवास ६

(मीनूची ऑफिस केबिन.मीनू एकाग्रपणे काम करतेय.काही उघड्या मिटलेल्या फाईलस समोर. एक मोठठं अमूर्त चित्र मागे लावलेलं. शिपाई आत येतो.)

शिपाई- मॅडम,तुम्हाला भेटायला दोघेजण आलेत.मेघःश्याम धुरंधर आणि प्रकाश पाटील अशी नावं सांगितलीत.

मीनू- पाठवून द्या त्यांना आत..आणि ऑपरेटरला माझे सर्व फोनकॉल्स बंद करायला सांग.मी मीटिंगमध्ये आहे म्हणून.

शिपाई- सांगतो मॅडम. (जातो. मेघःश्याम ,प्रकाश प्रवेशतात.)

प्रकाश- हाय मॅडमजी ! विचार करतोय शोभा कोणाची कोणामुळे वाढलीय..तुमची केबिनमुळे की.. (गंभीर होत ) पण आज अजिबात भंकस करायची नाही असं ठरवून आलोय मी..

मीनू- बसा रे ..मेघ, प्रकाश, be comfortable . खूप बोलायचंय आपल्याला.उमाबद्दल. हेच ना? पण सगळ्यात आधी तुझं अभिनंदन प्रकाश! C.B.I. मध्ये थेट ऑफिसरच्या पोस्टवर लागलास!
गटांगळ्या खाताखाता पैलतीर गाठलंस की रे राजा. कसं जमवलंस?

मेघःश्याम- त्याला underestimate का करतेयस मीनू? मला विचार. शाळेत आणि कॉलेजात वर्षानुवर्षे बेंचमध्ये लपवून सगळ्या क्लासिक आणि बाजारू मिळतील त्या रहस्यकथा वाचायचा व्यासंग केलाय रावसाहेबांनी.

प्रकाश- परीक्षा दिली होतीच,माझ्या मेरिटवर तुमचा विश्वासच नसेल तर.. .गेल्या महिन्यात रिपोर्ट केल्याकेल्या ट्रेनिंग होतं.परत येतो तो डॅडनी सांगितलं उमाचे चार-पाच तरी फोन होते ताबडतोब भेट म्हणून.

मीनू- मग भेटलास?

प्रकाश-नवीननवीन ड्यूटी,रोजचं excitement वेगळ्याच कामाचं.कामाचा अतिभार असलेलं खातं.पार संपून जायचे बाराचौदा तास. भेटू शकलो नाही,पण फोन केले मी तिला.

मीनू-काय म्हणाली उमा ?

प्रकाश-आक्काच्या अपमृत्यूमुळे अपसेट होती.माझ्या प्लेसमेंट्चं डॅडकडून कळलं होतं तिला. चौकशी करत होती पोलीस ठाण्यात culpable homicide ची तक्रार कशी नोंदवायची,तिच्या जवळच्या ठाण्यातल्या सिनीअर पोलिस ऑफिसरची ओळख काढू शकेन का,परस्पर एक ऑफिसर म्हणून मीच तक्रार नोंदवू शकतो का..सगळे प्रश्न.बाईची समजूत काढताना थकून गेलो की तक्रार जवळच्या माणसांनाच नोंदवावी लागते,पिक्चरमध्ये यायची तिला तयारी ठेवावी लागेल..ते तिच्या बाबांना चालेल का? शिवाय सगळं ऐकल्यावर सिद्ध होण्याचे चान्सेस पण खास वाटत नव्हते ते वेगळंच.

मीनू-हं.याचे तुटकतुटक रिपोर्टस मिळाले मला तिच्याकडून.

मेघःश्याम-तू गेली होतीस तिच्याकडे या काळात?

मीनू- होय ना. तिच्याकडूनच फोन आला तेव्हाच मला तिची मनःस्थिती बरोबर वाटली नाही.मी तीन-चार शनिवारी घरी जात होते तिच्या.अंधशाळेचं काम बंदच केलं होतं तिने,ऑफिसमधूनही रजा घेतली होती. जॉब सोडायचीच तयारी दिसत होती.

मेघःश्याम-(हताश) दर शनिवारी जाऊन तू मला कळवलं नाहीस्,ना या वेडपटाने कळवलं.

प्रकाश-मुळात तू इतका अंधारात असशील हेच मला माहीत नव्हतं.आणि सांगितलं ना यार,कामाच्या बोज्याखाली होतो रे महिनाभर.

मीनू-मेघ ,खरं सांगायचं तर मला तरी उमानेच मना केलं होतं तुला काहीही सांगायला.दुसरं म्हणजे सगळं चित्र इतकं करूण होतं.. उमा जवळजवळ वेड्यासारखं वागत होती.मध्येच असंबद्ध बोलणं,रात्रीच्या रात्री न झोपता किंवा अपुर्‍या झोपेवर काढलेल्या..सुजलेले डोळे.. ती नेहमीची शांत उमा नव्हतीच.तिचे बाबा तिचं रोजचं brain storming करत होते तिने या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आणि स्वतः थकून जात होते.

मेघःश्याम- (खूप दु:खी) ती लाख सांगेल! मनोरुग्ण माणसाचं काय मनावर घ्यायचं मीनू! तू तरी स्वतंत्र विचार करायला हवा होतास यार! उमा या सगळ्यातून जात होती आणि मी परकाच ठरलो तिच्यासाठी..अगदी या प्रकाशचाही आधार घेतला तिने.पण मला काही कळू दिलं नाही.

मीनू- पण का मेघ? असं काय झालं तुमच्या दोघांमध्ये?

मेघःश्याम- आक्काच्या मृत्यूआधी काही दिवस मी तिला भेटलो होतो काही काम काढून.. नंतर आक्काच्या मृत्यूचंही तिने सांगितलं मला फोनवर.पण कसं?'वय झालंच होतं आक्काचं,फार नाही,साठीचंच ,पण माणसाचा भरवसा काय?एका अर्थी बरंच झालं.कुणाची सेवा न घेता हातीपायी धड असतानाच गेली. आता थोडे आठवडे फोन करू नकोस. मीच करेन नंतर.'धडधडीत खोटं बोलली माझ्याशी. मलाही खरंच वाटलं .किती अतर्क्य असतात माणसाचे अंत;स्थ हेतू... माझ्यापर्यंत तिच्या मनाची खळबळ पोचवायचीच नव्हती तिला. नंतर महिनाभर फोन आला नाही, मीही केला नाही.मग अस्वस्थ होऊन केला तर स्विच्ड ऑफ!

मीनू- काही काही गोष्टी अदमासाने कळल्या मला मेघःश्याम ,म्हणूनच धीर धरला मी.

प्रकाश-पण असं का मेघ? असं काय झालं तुमच्यात? उमा , मला तर कळतच नाही खूपदा ती.. तुम्हा दोघांच्याच जास्त जवळची.

मीनू-- खरंय प्रकाशचं.उमा जी इतरांना कठीण वाटते ती मला बरीच समजते मेघ.तिला तू खूप आवडतोस आणि कुठेतरी तू दुखावलं आहेस तिला नक्की.कशामुळे?

मेघ;श्याम- पुढे सगळं असं घडणार आहे आणि उमा ते इतकं जिव्हारी लावून घेणार आहे हे जर ,मला माहिती असतं तर मी नक्कीच जास्त शहाण्यासारखं वागलो असतो त्यादिवशी..एवढ्या Final stage चं काहीच बोललो नव्हतो मी..आणि उमानेही ऐकून घेतलं होतं माझं तिच्याबद्दलचं Undecided attraction.. वी आर ऑल अडल्टस यार..

मीनू-हं .. जर आणि तर ! जर माहिती असतं तर ! वरकरणी सहज घेतल्यासारखं दाखवत होती ती तुला.आधीच आतून खूप एकाकी,त्यातून तुझं ते Undecided attraction ! त्यातच आक्काच्या मृत्यूमागच्या कुरूप गोष्टी. आत्ता नीट कळलं की मानसिक संतुलन का डळमळलं तिचं. हे सगळं आतल्याआत सहन करण्याची क्षमता संपली तिची.. हे घाव पडले कुणावर तर उमावर! 'मज फूलही रुतावे' अशा उमावर..मी तिच्या जागी असते ना मेघ,तर कान धरून वठणीवर आणलं असतं तुला.

मेघःश्याम- हे तुझं दुसरं जर आणि तर! तू तिच्या जागी असतीस तर ! हॅम्लेटच्या जागी ऑथेल्लो असता तर!मीनू,प्रकाश,मी एवढा उथळ वाटतो का तुम्हाला फ्रेंडस? खरं तर खूप काळजी आहे मला उमाची.म्हणूनच मला घाई करायची नव्हती. दोन विसंगत माणसांमधल्या आकर्षणाला पुरेसा वेळ दिला पाहिजे परिपक्व व्ह्यायला.मला तर वाटतंय की उमाच चुकली. communication च्या वाटा बंद करायच्या..आणि घुसमट वाढवायची. ठीक आहे. पुरे हा analysis. ती कुठे गेलीय सांगा लवकर.जाऊन थडकतो तिकडेच.

मीनू -पुनः सॉरी मेघ;श्याम,प्रकाश. मी वचन दिलंय तिला सांगणार नाही म्हणून. शिवाय मेघ,ती एकाच ठिकाणी असेल असंही नाही म्हणाली होती. आत्ताच म्हणालास ना,पुरेसा वेळ दिला पाहिजे..थोडासा धीर धर.घाव भरू दे तिचा. तो घाव आक्काच्या मृत्यूचा वाटतो, पण खरं तर तू दिलेला आहेस.तिला नॉर्मलवर येऊ दे,ती स्वत;च भेटेल तुला. (शिपाई चहाचा ट्रे आणतो.) चहा घेऊ या.

प्रकाश-हे सगळं ऐकून मला आता मेघ्याचीच जास्त काळजी करवीशी वाटतेय. मेघ,Be sport यार हे तर फिल्मी मेलोड्रामापेक्षा जास्त आहे.

मेघःश्याम-थँक्स प्रकाशं ,निदान तू तरी मला समजून घेतोयस.ठीक आहे मीनू.मी प्रयत्न करेन.इतकंच काय प्रार्थनाही करेन..प्रार्थना हा मोठा वीक पॉईंट आहे उमाचा.

मीनू-(हसते) are you sure ? तो स्ट्राँग पॉईंट आहे तिचा !

प्रकाश- हं.. माझ्यातल्या डिटेक्टिव्हला वाटतंय की बाई कुठल्यातरी तीर्थक्षेत्री गेली असणार !

मेघःश्याम-(पुटपुटतो) पंढरपूर?! एक पांडुरंगाला ठाऊक ..!

(पडदा!)

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.