पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले

Submitted by बेफ़िकीर on 30 June, 2012 - 10:48

या लिंकवर ठरल्याप्रमाणे प्रोफेसर देवपूरकरांच्या आग्रहास्तव ही तरही रचली आहे. मते अवश्य कळवावीत.

http://www.maayboli.com/node/36062?page=1#comment-2184877

धन्यवाद

-'बेफिकीर'!

===================================

पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले
मृत्यूच्या सवयीसाठी जगण्याचे धाडस केले

विजयाची पाने कुठली हे कळल्यावरतीसुद्धा
मी होत जुगारी.. पत्ते.. पिसण्याचे धाडस केले

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले

मी दुनियेमधुनी इतका अलगद डावलला गेलो
पानावर जणू दवाने रुजण्याचे धाडस केले

तो बघता बघता होतो त्यांचाही नेता... ज्याने
रुळलेल्या लोकांमध्ये रुळण्याचे धाडस केले

आहेच अनायासे मी या पृथ्वीवरती म्हणुनी
पृथ्वीने सूर्याभवती फिरण्याचे धाडस केले

जेथून परतण्याइतकी उरलेली असेल उर्मी
लाटांनी त्याच तिराला भिडण्याचे धाडस केले

एकत्र कुटुंबामध्ये हेव्याच्या भिंती पडल्या
तेव्हाच छप्पराने त्या उडण्याचे धाडस केले

हे मोह दडपशाहीने सद्बुद्धी चिरडत होते
मी माझ्याविरुद्ध जेव्हा उठण्याचे धाडस केले

'बेफिकीर' झालो जेव्हा प्रतिभेच्या हाका आल्या
चालणे जमत नसुनीही पळण्याचे धाडस केले

===============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Pages