पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले

Submitted by बेफ़िकीर on 30 June, 2012 - 10:48

या लिंकवर ठरल्याप्रमाणे प्रोफेसर देवपूरकरांच्या आग्रहास्तव ही तरही रचली आहे. मते अवश्य कळवावीत.

http://www.maayboli.com/node/36062?page=1#comment-2184877

धन्यवाद

-'बेफिकीर'!

===================================

पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले
मृत्यूच्या सवयीसाठी जगण्याचे धाडस केले

विजयाची पाने कुठली हे कळल्यावरतीसुद्धा
मी होत जुगारी.. पत्ते.. पिसण्याचे धाडस केले

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले

मी दुनियेमधुनी इतका अलगद डावलला गेलो
पानावर जणू दवाने रुजण्याचे धाडस केले

तो बघता बघता होतो त्यांचाही नेता... ज्याने
रुळलेल्या लोकांमध्ये रुळण्याचे धाडस केले

आहेच अनायासे मी या पृथ्वीवरती म्हणुनी
पृथ्वीने सूर्याभवती फिरण्याचे धाडस केले

जेथून परतण्याइतकी उरलेली असेल उर्मी
लाटांनी त्याच तिराला भिडण्याचे धाडस केले

एकत्र कुटुंबामध्ये हेव्याच्या भिंती पडल्या
तेव्हाच छप्पराने त्या उडण्याचे धाडस केले

हे मोह दडपशाहीने सद्बुद्धी चिरडत होते
मी माझ्याविरुद्ध जेव्हा उठण्याचे धाडस केले

'बेफिकीर' झालो जेव्हा प्रतिभेच्या हाका आल्या
चालणे जमत नसुनीही पळण्याचे धाडस केले

===============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

विजयाची पाने कुठली हे कळल्यावरतीसुद्धा
मी होत जुगारी.. पत्ते.. पिसण्याचे धाडस केले

जेथून परतण्याइतकी उरलेली असेल उर्मी
लाटांनी त्याच तिराला भिडण्याचे धाडस केले

हे मोह दडपशाहीने सद्बुद्धी चिरडत होते
मी माझ्याविरुद्ध जेव्हा उठण्याचे धाडस केले....... हे तिनच आवडले पण खुप Happy

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले........... हासिल-ए-गझल शेर.

विजयाची पाने कुठली हे कळल्यावरतीसुद्धा
मी होत जुगारी.. पत्ते.. पिसण्याचे धाडस केले >> ओह!

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले >> आह! Happy

बरेच शेर आवडले.. धन्यवाद! Happy

(बाकी प्रोफेसर साहेबांनी असेच बालहट्ट करत रहावेत, काय? Wink )

बेफिकीरजी! आपली गझल वाचली. आपण तिला तरही गझल का म्हणता?
इथे कुठलाही मिसरा दिलेला नव्हता, फक्त रदीफ व काफिये दिले होते. असो.
आपल्या या गझलेचा मी बारकाईने अभ्यास केला. मला जो अर्थ समजला, तो मी इथे देत आहे. हे एक, माझ्यापरीने केलेले सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण आहे! कृपया गैरसमज करून घेवू नये.
>(टीप: भूषणराव! हे विश्लेषण करण्यासाठी मला पूर्ण दोन दिवस लागले. पण, आपल्यातल्या स्नेहामुळे व गझलेवरील प्रेमामुळे मला यातना जाणवल्या नाहीत. आपण देखिल अत्यंत बारकाईने, सबूरीने, आपल्यातील निरागसतेने चव घेत घेत, हे विश्लेषण वाचावे. आपली मते काही ठिकाणी वेगळी असू शकतात, ज्यांचा मला पूर्ण आदर आहे. पण एखद्या गझलेचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण करणे हे किती कष्टाचे, पण तरीही, आनंददायी असते हे मला यातून समजले.
आपणही वेळ काढून या विश्लेषणाचा परखड अभ्यास करावा. आपली प्रांजळ मते विस्ताराने कळवावीत. म्हणजे मलाही माझ्या चुका सुधारता येतील व माझ्या गझलचिंतनास ते खूप उपयोगी पडेल. आपल्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे. खरे तर, आपण समक्ष भेटून चर्चा आता करायलाच पाहिजे!
लवकरात लवकर योग जुळवून आणू या!)
..................................................................................................
शेर नंबर१)
पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले!
मृत्यूच्या सवयीसाठी जगण्याचे धाडस केले!!

इथे “हृदयांमध्ये” असे करावे वाटले.
मृत्यूच्या सवयीसाठी.........इथे संदिग्धता वाटते.
मला मृत्यूची सवय व्हावी म्हणून मी असे जगण्याचे धाडस केले. म्हणजे मरणाला झुकांड्या देत, वा मरत मरत का होईना, पण जगण्याचे धाडस केले, की,..........
मृत्यूला माझ्या, प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची वा मी जिवंत असलेले पाहण्याची सवय व्हावी म्हणून मी जगण्याचे धाडस केले......
नक्की अर्थ स्पष्ट होत नाही...........

पहिला मिसरा होकारात्मक वाटतो, आव्हान स्वीकारल्यागत वाटतो. पण, दुस-या मिस-यात ही होकारात्मकता कमी झालेली वाटते.
दोन ओळींतील नाते अस्पष्ट वाटते.
दुस-या मिस-यातील दोन्ही अर्धे भाग अर्थांच्या दृष्टीने संदिग्ध वाटतात.
नशिबाने प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही फुलायला धाडस करावे लागते.
पाषाणहृदयांवरीच फुलण्याचे धाडस का करावेसे वाटले?
पाषाणहृदयी माणसांच्या अतरंगास जिंकायचे होते का?
सर्व माणसे पाषाणहृदयीच होती का?
की, आव्हान म्हणून मी हे धाडस करतो आहे?
कवीला मृत्यूचे भय कमी करायचे आहे म्हणून तो असे धाडस करत आहे/
मृत्यूची सवय व्हावी/ पाषाणी हृदयांवर फुलणे...........नाते स्पष्ट होत नाही वा भावत नाही.
प्राप्त परिस्थितीतली हतबलता व त्यावर मात करण्याचे दाखवलेले धाडस ही भावना प्रखरपणे अभिव्यक्त झालेली नाही.
असे आहे का? की, कवीला मृत्यूची भीती कमी करायची आहे वा रोज मरणाची सवय लावून घ्यायची आहे, म्हणून तो पाषाणहृदयी माणसांच्याच अंतरंगातही फुलणाचे धाडस करतो आहे?
टीप>>>>.फुलांचें/ फुलण्याचे प्रतिक आल्यावर, काट्यांची प्रतिमा सुसंगत वाटते. पाषाणहृदयांत फुलणे म्हणजे निर्दयी माणसांच्या मनातही जागा निर्माण करणे. त्यांना मनाने जिंकणे असा अर्थ होतो, जो मृत्यूलाही सवय व्हावी म्हणून जगण्याचे धाडस केले.............या दोन्ही गोष्टींशी नाते निर्माण करू शकत नाही. शिवाय प्राप्त परिस्थितीमधील हतबलता दिसत नाही.

आपला हा पहिला शेर आम्ही खालीलप्रमाणे वाचला.
पाषाणी हृदयी सुद्धा फुलण्याचे धाडस केले!
मृत्यूचे मन जिंकाया जगण्याचे धाडस केले!!
...................................................................................

शेर नंबर २)
विजयाची पाने कुठली, हे कळल्यावरती सुद्धा;
मी होत जुगारी....पत्ते पिसण्याचे धाडस केले!

इथे विजय व्हायला/डाव जिंकायला कोणती पाने लागतात हे कुणालाही, कोणत्याही खेळाडूला माहितच असते. म्हणून काही, खेळात पत्ते पिसण्याचे कोणी थांबत नाही. किंवा तसे कोणी करूही देणार नाही.
उलट, जुगा-याचे हात पत्ते पिसण्यासाठी शिवशिवत असतात,असे समाजात दिसून येते.
जिंकण्यासाठीच पत्ते पिसले जातात, जेव्हा सगळे खेळाडू आपले नशीबच आजमावत असतात.
इथे कुठलेही धाडस केल्याचे मला दिसत नाही. शेर पूर्ण फसल्यासारखा वाटतो. विजयाची पाने व पत्ते पिसणे या दोन शब्दांनी फक्त दोन ओळी जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण पत्ते पिसणे, जुगारी होवून पत्ते पिसणे व विजयाची पाने कुठली हे कळलेले असून सुद्धा तसे करणे, यात धाडस दिसत नाही.
आपला दुसरा शेर मी असा वाचला..............
ते हाडाचेच जुगारी, हटकून जिंकणारे, अन्......
मी त्यांच्या पुढ्यात पत्ते पिसण्याचे धाडस केले!
................................................................................................

शेर नंबर ३)
एकदा अबोला धरला, तर कायमची रुसली ती!
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले!!

पहिली ओळ प्रेमाच्या नात्यातील वाटते, जी पटते.
पण, दुस-या ओळीत फक्त एका म्हणीचा वापर करयचा अट्टहास दिसतो. “पिकते तिथे विकत नाही”
पण इथे “अबोला विकणे” ही कल्पनाच खटकते.
कारण, हा अबोला प्रेमातील (कदाचित लटका) आहे, व प्रेमात काहीही विकणे वा विकत घेणे नसते!
अबोला ती धरू शकते, ती रुसू शकते माझ्यावर. पण, हेच जर मी केले तर मात्र तिला ते चालत नाही. ती लगेच कायमची रुसून बसते. असा सरळ आशय या शेरात वाचणा-याला जाणवतो.

अबोला तिच्यामाझ्या वागण्यातूनच निर्माण होतो. म्हणजेच अबोला पिकतो. पण तो जर मी धरला तर चालत नाही. ती लगेच कायमचीच रुसते, म्हणजे अबोला तिला विकलेला चालत नाही.
नाही बुवा पटत हे अबोल्याचे पिकणे आणि विकणे......
कल्पनाच हृद्य वाटत नाही.
केवळ एका म्हणीच्या वापराचा असा अट्टहास का? ती म्हण इथे लागू होत नाही. कारण नाते प्रेमाचे आहे.
प्रेमात कसले आले पिकणे आणि विकणे?
आणि कसले आले धाडस?
दुस-या मिस-यात “तेथे” वा “तिथे” शब्द हवा होता असे वाटून गेले.
आपला तिसरा शेर मी असा वाचला..............

माझ्या गावाची मैफल, अन् मला गाळले गेले!
जे पिकते जिथे तिथे ते विकण्याचे धाडस केले!!
...................................................................................

शेर नंबर ४)
मी दुनियेमधून इतका अलगद डावलला गेलो;
पानावर जणू दवाने रुजण्याचे धाडस केले!!

इथे दव रुजणे व मी डावलला जाणे या प्रतिमा अजून जवळ यायला हव्यात.
दुस-या मिस-यात अळवावरचे पाणी असे काही आले असते तर पहिल्या ओळीला न्याय मिळाला असता.
पहिल्या ओळीत मी अलगद डावलला गेलो..........ऎवजी मी अलगद निखळून पडलो/गडगडलो/ ओघळून पडलो अशा अर्थांच्या काही तरी प्रतिमा असायला हव्या होत्या.
अर्थ आपल्या मनात आहे तोच, पण प्रतिमेत ओघळण्याची, गळून पडण्याची, निखळण्याची अशी काही तरी भावना पहिल्या मिस-यात असायला हवी होती असे वाटले.
आपला चौथा शेर मी असा वाचला..............
मी दुनियेमधून इतका पटदिशी निखळला गेलो;
अळवावरील पाण्याने रुजण्याचे धाडस केले!
...................................................................................

शेर नंबर ५)
तो बघता बघता होतो त्यांचाही नेता..... ज्याने,
रुळलेल्या लोकांमध्ये रुळण्याचे धाडस केले!

इथे रुळलेले लोक म्हणजे कोण?
कशात ते रुळले होते?
पहिल्या ओळीत नेता आहे म्हणून दुस-या ओळीत, घडीभर गृहीत धरले की, राजकारणात रुळलेले.
इथे पक्के वा मुरलेले, चतुर वा हाडाचे राजकारणी असे हवे.
रुळलेल्या लोकांमध्ये रुळण्याचे धाडस केले ही ओळ अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण वाटते.
नेत्यांचे नेते होणे असे काही आहे का?
दोन ओळीतील नाते अजून घट्ट हवे.

आपला पाचवा शेर मी असा वाचला..............

निवडून अखेरी आलो, अन् मीही मंत्री झालो!
जनतेत आम जेव्हा मी रुळण्याचे धाडस केले!!

.................................................................................................

शेर नंबर ६)
आहेच अनायासे मी या पृथ्वीवरती म्हणुनी,
पृथ्वीने सूर्याभवती फिरण्याचे धाडस केले!
इथे दोन गोष्टी खटकतात..............
मी अनायासे पृथ्वीवरती आहे......... म्हणजे काय?
अनायास म्हणजे सहज, योगायोगाने, अकल्पितरित्या इत्यादी.
योगायोगाने वा आयताच मी अजून पृथ्वीवरती जिवंत आहे वा,
असे म्हणायचे का? की,...........
मी पृथ्वी सोडून कुठल्या दुस-या लोकी, स्वर्गात वा परग्रहावर वगैरे गेलेला असतो!

दुसरी गोष्ट.............
पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, यात तिला काही धाडस करावे लागते का?
घडीभर म्हणू या होय; तर ती धिटाई पृथ्वीकडे माझ्या जिवावर वा माझ्यामुळे का येते? असे माझ्यात काय आहे, ज्यामुळे पृथ्वीला अशी धिटाई मिळावी?

पृथ्वी हा ग्रह, तिचे सूर्याभोवती फिरणे यातील विज्ञान तर बाजूला राहिले.
हे फिरणे हा सृष्टीचा नियम आहे. असे अनेक ग्रह अनेक सूर्यांभोवती, अनेक सूर्यमालांमधे व अनेक आकाशगंगांमध्ये सृष्टीच्या नियमानुसार फिरत असतात.

या फिरण्यातलेही काव्य प्रकट करता येईल, पण तो विषय तूर्तास इथे बाजूला ठेवतो. कवीला असे म्हणायचे आहे का? की, सूर्यालाही जरब बसेल असे माझे व्यक्तीमत्व आहे? पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे यातील काव्यच प्रकट झाले नाही. किंवा माझे व्यक्तीमत्व कसे आहे, यावरही काही भाष्य नाही.

अनायसे माझे असणे ही कल्पना आवडली. पण, तिला न्याय मिळेल अशी बाकीची शब्दयोजना शेरात नाही. त्यामुळे इथे दोन ओळींतील नाते दुरावल्यासारखे वाटते.
आपला सहावा शेर मी असा वाचला..............

मजभवती दुनिया फिरते, पाहिले तिनेही म्हणुनी...........
पृथ्वीने सूर्याभवती फिरण्याचे धाडस केले!
.................................................................................

शेर नंबर ७)
जेथून परतण्या इतकी उरलेली असेल उर्मी;
लाटांनी त्याच तिराला भिडण्याचे धाडस केले!

इथे शब्द “तीराला” असायला हवा “तिराला” नव्हे.
आता या शेरातील प्रतिमा पाहू या........
तीर/तट/किनारा..........१ली प्रतिमा
लाटा...........२री प्रतिमा
उर्मी.........३री प्रतिमा.

इथे उर्मी याचा अर्थ लहर / लाक्षणीक अर्थ आहे मूड, जो अकस्मात येतो, बदलतो. जसे वारा लहरी आहे असे आपण म्हणतो.
सर्व प्रतिमांची संलग्नता बरोबर आहे.
प्रतिमा एकमेकांना पूरक व साजेश्या आहेत.

पण आपणास निसर्गात दिसते ते चित्र काय आहे?....................
लाटा समुद्रात / सरोवरात/ तळ्यात वगैरे दिसतात.
त्या किना-यावर आदळतात, आपटतात, व नष्ट झाल्यासारख्या वाटतात. पण, आपण जर बारकाईने समुद्रकिना-यावरील लाटांचे येणेजाणे पाहिले, तर दिसून येईल की, लाटा किना-याकडे झेपावतात, किना-यावर आदळतात / आपटतात / भिडतात, जेव्हा लाटांचा जोर वा शक्ती क्षीण होते. लाटांनी आणलेली वाळू, शंख, शिपले व खनिजे यांचे किना-यावर निक्षेपण होते(deposition of sediments), व नंतर क्षीण झालेल्या लाटांचे पाणी देखिल माघारी समुद्रात फिरते. (backwash/ backwater currents), ज्यांच्या बरोबरही काही वाळू, शंख, शिंपले, खनिजे परत समुद्रात निक्षेपित होतात. लाटा या समुद्रातील / जलाशयातील / सरोवरातील/ तळ्यातील पाण्याचाच एक भाग असतात.
किनारा हा देखिल समुद्राचाच भाग असतो.
किना-याची जागाही काळानुरूप बदलते. काव्याच्या भाषेत सांगायचे झाले तर, किनाराही चालू शकतो, सरकू शकतो. कधी तो जमिनीच्या बाजूला, तर कधी सागराच्या दिशेने! (भरती-ओहोटी वा transgression & regression.)
किना-याकडे झेपाणारे प्रवाह असतात (शक्तीमान असतात), व समुद्राकडे परतणारेही प्रवाह असतात (दुर्बल असतात).
हे झाले या प्रतिमांचे वैज्ञानिक सत्य.

आता या प्रतिमांमधल्या संभाव्य काव्यकल्पना पाहू.............

लाटा/ लहरी किना-याकडे का झेपावतात?
त्यांच्यात काही प्रेमाचे नाते आहे का?
लाटांना किना-याची ओढ लागली आहे का?
जणू ते दोघांचे मीलन आहे का?
लाटा किना-याला भेटून जणू विलीन होवू पाहतात का?
लाटांच्या येण्याजाण्यातही एक ताल (rhythem) असतो. नाद असतो (अनाहताचा नाद).
ही लाटांची किना-यावरील येजा, तो अनाहताचा नाद काय सांगतो?
तो सागराचा श्वासोच्छ्वास आहे का?
लाटा (स्वभावाने) लहरी असतात का?
वा-याच्या लहरीने लाटा निर्माण होतात (windblown waves).
अर्थात सूर्यचंद्राचे गुरुत्वाकर्षण हे कारण आहेच!
लाटांचे उत्पन्न होणे, प्रवाही असणे, किना-याकडे एकसारखे तालबद्धपणे जाणे काय सुचवतात?
पृथ्वीची, चंद्राशी अन् सूर्याशी असलेली सोयरीक तर नाही सांगत हे?
अशा काही कवी कल्पना, कवीच्या वा परिपक्व रसिकांच्या मनात येवू शकतात.

आता मी आपल्या या शेराकडे वळतो........
लाटांना, तीराला/किना-याला भिडण्यासाठी धाडस का करावे लागते?
तीरावरून लाटांना परत का यायचे आहे? किना-यावरून परतण्या इतकी उर्मी लाटांना का हवी आहे? म्हणून अशाच तीराला लाटांना भेटायचे आहे व परत, भिडण्याचे धाडस करायचे आहे.
या प्रश्नांची उत्तरे शेरात मिळत नाहीत. त्यामुळे शेर काळजाला न भिडताच वाचला जातो.
आपला सातवा शेर मी असा वाचला..............
दरवेळी जरी तटांनी, फेटाळल्याच त्या लाटा;
लाटांनी तरी तटांना भिडण्याचे धाडस केले!

.................................................................................................

शेर नंबर ८)
एकत्र कुटुंबामध्ये हेव्यांच्या भिंती पडल्या;
तेव्हाच छप्पराने त्या उडण्याचे धाडस केले!

हेवा म्हणजे स्पर्धा, द्वेष, मत्सर, अनावर लोभ, सोस, हाव, इच्छा, मनीषा इत्यादी.
छप्पर म्हणजे घराचे आच्छादन, छत.
उडणे म्हणजे भरारी मारणे, आकाशातून जाणे, वरून उडी मारणे, एक स्थान सोडून दुस-या स्थानावर जाणे, झडप घालणे, तुटून पडणे, आवेशाने चालून जाणे, संपणे, नाहीसे होणे, निघून जाणे, लोपणे वा अदृश्य होणे, खलास होणे.
मन उडणे म्हणजे प्रेम नाहीसे होणे, तिटकारा येणे इत्यादी.

आता हेव्यांच्या भिंती (एकत्र कुटुंबातल्या) ही प्रतिमा पाहू.............
म्हणजे एकत्र कुटुंबात जेव्हा माणसांमध्ये मत्सर, द्वेष, अनावर लोभ, मनीषा निर्माण होतात, तेव्हा एकत्र कुटुंबास तडे जावू लागतात. नात्यांमध्ये अंतरे निर्माण होतात व एकत्र कुटुंब विभक्त होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू होतो. एकत्रपणाची भावना नष्ट होवू लागते व एकत्रातही विभक्तपणाची भावना येते. म्हणून हेव्यांच्या भिंती ही प्रतिमा चपखल आहे. तेव्हा पहिली ओळ ताकदीची आहे.
पण उत्तरार्ध संदिग्ध आहे.
सानी मिसरा म्हणतो...........
तेव्हाच छप्पराने त्या उडण्याचे धाडस केले!
शाब्दीक अर्थ आहे........
एकत्र कुटुंबाचे छप्पर उडून गेले, नाहीसे झाले व या करता छप्पराला उडण्याचे धाडस करावे लागते.

लाक्षणीक अर्थ मी असा घेतला...........

डोक्यावरचे छप्पर म्हणजे सुरक्षितता, आश्रय, थारा, वगैरे.
एकत्र कुटुंबातील बुजुर्ग/कर्ती व्यक्ती, जिच्यामुळे कुटुंबातील एकी टिकून असते, जिचे आशिर्वाद कुटुंबियांच्या पाठिशी असतात, अशी व्यक्ती जोवर एकत्र कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत असते तोवरच जिवंत असते व विभक्ती यायला लागल्यावर प्राण सोडते (प्राण उडून जातात). नको अशी विभक्ती बघायला.
पण मग प्राण सोडायला/ प्राण उडायला/छप्पराला उडायला, धाडस का करावे लागते?
उलट सर्व आलबेल आहे. आता आपण कृतकृत्य झालो आहोत. सर्व आप्तेष्ट एकत्र रहात आहेत. आपला कार्यभाग/अवतार आता जवळ जवळ संपला आहे. आता सुखाने प्राण सोडायला/उडायला/डोळे मिटायला हरकत नाही, असे ती व्यक्ती (छप्पराचे प्रतिक) म्हणू शकते.
यात धाडसाचा संबंध येतो कुठून? ही तर आपखुशी आहे.

उलट एकत्र कुटुंबात जरा जरी दुही येवू लागली, तर त्या बुजुर्ग व्यक्तीने (छप्पराने) ती दुही मिटवायला जिवंत असले पाहिजे.
तेव्हा उडण्याचे, नाहीसे होण्याचे, प्राण सोडण्याचे विचार मनात येणे वाजवी वाटत नाही व असे देखिल करण्यातले धाडस समजत नाही.

आपला आठवा शेर मी असा वाचला..............
दारे, खिडक्या अन् भिंती! पण, घरास घरपण नव्हते;
म्हणुनीच छप्परानेही उडण्याचे धाडस केले!
...................................................................................

शेर नंबर ९)
हे मोह दडपशाहीने सदबुद्धी चिरडत होते;
मी माझ्या विरुद्ध जेव्हा उठण्याचे धाडस केले!

हा शेर तुलनेने ठीक वाटला.
पण, एक गोष्ट खटकली. ती म्हणजे...........
“माझ्या विरुद्ध मी उठणे”
असे आपण म्हणत नाही.
एखाद्याने एखाद्या विरुद्ध उठणे असा वाक्प्रचार नाही.
एखद्याने एखाद्याच्या जिवावर उठणे असे म्हणतात, पण याचा अर्थ फारच वेगळा, विरुद्ध आहे.

आपणास म्हणायचे आहे की, माझे तन, माझे मन, माझी सारासार बुद्धी, विवेक, बुद्धी, wisdom यांत एक द्वंद्व निर्माण झाले आहे.
मन/तन एखाद्या ठिकाणी रेंगाळू पहाते आहे. पण, सारासार बुद्धी, विवेक wisdom मला उठायला सांगते आहे. पण मनाला पडलेल्या मोहामुळे, मोहाच्या दडपशाहीने, माझी सदबुद्धी, विवेक, सारासार बुद्धी, wisdom चिरडले जात आहेत. त्यांचे काहीच चालत नाही. म्हणून मला माझ्या विरुद्ध उठण्याचे धाडस करावे लागत आहे.
पण, माझ्या विरुद्ध मी उठणे ही वाक्यरचनाच सदोष वाटते.
उठणे काफियाला अजिबात न्याय मिळालेला नाही.
एका स्थानावरून दुसरीकडे जाण्यासाठी निघणे म्हणजे उठणे.
हा स्थानबदल व्यक्त झाला नाही.
पहिली ओळ छान. दुसरी ओळ तुलनेने दुबळी वाटली.
शेरातील आपल्या मनातील आशय खूपच काव्यात्मक, समर्थ व छान आहे. पण, कमजोर अभिव्यक्तीमुळे सदर शेर फिका पडल्याचे दिसते.

आपला नववा शेर मी असा वाचला..............

मन म्हटले “बस,.... थोडी घे”....तन अजून मागत होते!
सदबुद्धी जागृत झाली....उठण्याचे धाडस केले!!
...................................................................................

शेर नंबर १०)
बेफिकीर झालो जेव्हा प्रतिभेच्या हाका आल्या;
चालणे जमत नसुनीही पळण्याचे धाडस केले!

प्रथम प्रतिभेच्या हाका ही प्रतिमा पाहू........

प्रतिभा म्हणजे कल्पना, मानसिक प्रतिमा, अनुभव, अलौकिक बुद्धी, उच्चप्रकारचे ज्ञान, तेज इत्यादी.

प्रतिभावान/प्रतिभाशाली/प्रतिभासंपन्न म्हणजे अतिशय हुशार, श्रेष्ठ बुद्धीचा.

प्रतिभेच्या हाका आल्या म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या हाका आल्या.
माझी अलौकिक बुद्धी मला बोलावू लागली.
म्हणजेच मला काही तरी स्फुरू लागले (कलाकृती निर्मितीसाठी).
अशा वेळी मी बेफिकीर का बरे झालो?
म्हणजे मी त्या हाकांकडे दुर्लक्ष केले, की, त्या हाका मी खूपच casually घेतल्या.
की, प्रतिभेच्या हाका आल्याने वा काही तरी स्फुरण्याची उर्मी आल्याने, मी ट्रान्समधे गेल्याने, आता माझ्या होणा-या कलाकृती विषयी मी बेफिकीर वा निश्चिंत झालो, असे म्हणायचे आहे? असो.
अर्थ नीट लक्षात येत नाही....

बेफिकीर हे शायराचे नाव गुंफण्याच्या कसरतीमुळे हा अर्थाचा संभ्रम इथे निर्माण झाला आहे.
दुसरी ओळ सुटी बरोबर आहे.
चालताही येत नव्हते तरी मी पळण्याचे धाडस केले.
पण, ही ओळ पहिल्या ओळीशी नाते निर्माण करू शकत नाही.
का बेफिकीर व्हायचे प्रतिभेच्या हाका आल्यावर?
मला का चालता येत नव्हते?
मला पळण्याचे धाडस का करावे लागले?
इथे चालणे, पळणे जुळते. पण, प्रतिभेच्या हाकांशी हे जुळत नाही.
प्रतिभेच्या हाका, चालणे, पळण्याचे धाडस या प्रतिमा नीट गुंफल्या गेलेल्या नाहीत.
म्हणून हा शेर थेट पोचत नाही.

आपला दहावा शेर मी असा वाचला..............

प्रज्ञेने हाक दिली अन् प्रतिभाही धावत आली!
प्रतिभेच्या बरोबरीने पळण्याचे धाडस केले!!

>................प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................

शेवटी आपली ही (तरही) गझल मी अशी वाचली.............


पाषाणी हृदयी सुद्धा फुलण्याचे धाडस केले!
मृत्यूचे मन जिंकाया जगण्याचे धाडस केले!!

ते हाडाचेच जुगारी, हटकून जिंकणारे, अन्......
मी त्यांच्या पुढ्यात पत्ते पिसण्याचे धाडस केले!

माझ्या गावाची मैफल, अन् मला गाळले गेले!
जे पिकते जिथे, तिथे ते, विकण्याचे धाडस केले!!

मी दुनियेमधून इतका पटदिशी निखळला गेलो;
अळवावरील पाण्याने रुजण्याचे धाडस केले!

निवडून अखेरी आलो, अन् मीही मंत्री झालो!
जनतेत आम जेव्हा मी रुळण्याचे धाडस केले!!

मजभवती दुनिया फिरते, पाहिले तिनेही म्हणुनी...........
पृथ्वीने सूर्याभवती फिरण्याचे धाडस केले!

दरवेळी जरी तटांनी, फेटाळल्याच त्या लाटा;
लाटांनी तरी तटांना भिडण्याचे धाडस केले!

दारे, खिडक्या अन् भिंती! पण, घरास घरपण नव्हते;
म्हणुनीच छप्परानेही उडण्याचे धाडस केले!

मन म्हटले “बस,.... थोडी घे”....तन अजून मागत होते!
सदबुद्धी जागृत झाली....उठण्याचे धाडस केले!!

प्रज्ञेने हाक दिली अन् प्रतिभाही धावत आली!
प्रतिभेच्या बरोबरीने पळण्याचे धाडस केले!!

>..........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................

वाह ..! देवपुरकर सर धन्यवाद.

प्रत्यक शेराचा त्याच्या आशय आणि विषयाचा किती बारकाईने आणि सखोल आभ्यास करावा. याचं दिलेलं हे
सुंदर स्पष्टीकरणात्मक मार्गदर्शन मायबोलीवरील या सर्वच गझल मित्रांना अतिशय मोलाच ठरेल. गझल वा कोणतही काव्य हे केवळ
त्याच्या व्याकरणावर अथवा ठरावीक आशा आकृतीबंधात होत असलं, तरी त्याही पेक्षा अती महत्वाची गोष्ट ती हिच असते, की आपण आपल्या निर्मित्तीतून जे काही सांगत आसतो, जे काही देत असतो. ते सर्व वर्तमानातील या नववैचारीक दृष्टीकोणाच्या पातळीवर किती महत्वाच किंव्हा किती मुल्यवान आहे. याचा विचार प्रत्येक कवी/लेखकांनी करायलाच हवा असं मला तरी वैयक्तीकपणे वाटते.

देवपूरकरांची पर्यायी गझल ही खुप आवडली.

देवपुरकरांच्या या रसास्वादानंतर आपण आयुष्यात चांगली उंची असणार्‍या शेरांची गझल करूच शकणार नाही अशी खात्री झाल्याने मी गझल लेखन थांबवण्याचा विचार करत आहे..

शाम,

गझलकार ठरवून गझल लेखन थांबवू शकेल असे वाटत नाही. प्रकाशित करणे बंद करू शकेल. पण मनातल्या मनात शेर गुणगुणणे, रचत राहणे इत्यादी बाबी सुरूच राहतील असे वाटते.

गझल ही मराठीत निव्वळ 'आस्वाद्य' बाब नाही हे खरेच. तीवर आस्वादाव्यतिरिक्त इतर अनेक फोर्सेस काम करताना दिसतात.

गझलकार ठरवून गझल लेखन थांबवू शकेल असे वाटत नाही. प्रकाशित करणे बंद करू शकेल. >>>>>>>>>>

होय बेफीजी मी अनुभव घेतला आहे

________________________

प्रा. साहेब : मी आपल्याला नम्रपणे + स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपल्या सौंदर्यदृष्टीत काहीतरी भयंकर बिघाड झालाय .कृपया तज्ञ सौंदर्यशास्त्र्यांचा सल्ला घ्याच प्लीज

आमचे काही नुकसान नाही होत ...पण तो पहा ओर्फी ;आताकुठे गझलेची बाराखडी शिकतोय तो आणि पहा तुमच्या मूर्खतापूर्ण प्रतिसादावर कसा फिदा झालाय तो ........
कुठे जीव लावावा हे त्याला कळत नाही आहे
गझलेच्या अत्यंत कुरूप /हिणकस रूपाला तो सुंदर मानू लागलाय..................
हे येणार्या गझलकारांच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे सर....... हे आपणास समजत नाही का

कृपया ही सवय सोडवा... इतरना तर अजिबात लावू नका .........

मला तुमची काळजी नाही वाटत की हा प्रतिसाद वाचून तुम्हाला काय वाटेल वगैरे...
मला ओर्फीची आणि त्याच्यासारख्या नवीन गझल-शागीर्दांची काळजी वाटते आहे .....
उद्याच्या गझलेची काळजी वाटते आहे

__________

देवसर मी छातीठोकपणे सांगू शकतो की

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले>

हा शेर तुम्हाला सुचूच शकत नाही . मग भटांना गुरू करा किंवा बेफीजिंना...शक्य नाही ते शक्य नाहीच !!! तुम्हालाच काय ,मला...... इतर कुणालाही शक्य नाही ते....
बेफीजिंनाच हा शेर पुन्हा करा म्हटल्यास त्यानाही तो शेर तसा जमणार नाही

होय ............हे मी छातीठोकपणे सांगू शकतो ........!!!
__________________

माफ करा......... ..या शेरावर तुम्ही दिलेले विश्लेषण वाचूनच डोकं फिरलंय माझं...त्यामुळं पुढे वाचू शकलो नाही.....पुढे प्रतिसादात एखादी चांगली बाब आपण नमूद केली असेल तर त्यासाठी न वाचताच अभिनंदन

असो
देवसर ; आपण माझ्या "मी आज पुन्हा हे धाडस करण्याचे धाडस केले" या रचनेवर प्रतिसाद देण्याचे धाडस करणे मुद्दाम टाळत आहात हे एव्हाना अख्ख्या मायबोलीला समजले आहे बरका

Rofl

'एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले...'
निव्वळ अफाट....शेर....ओरिजिनल..आणि सदाबहार राहील हा शेर...
लाख दंडवत या शेराला..
गझल मस्तच आहे..

शामजी!
मी गझल लेखन थांबवण्याचा विचार करत आहे<<<<<<<<
हे वाक्य आणि तेही, एक रसास्वाद वाचल्यावर, हे वाचून मला खूप वाईट वाटले.
काही गोष्टींचा खुलासा करतो.................

१)मी जे बेफिकीरजींच्या गझलेवर लिहिले ते एक सदर गझल काव्याचे (माझा विवेक जागृत ठेवून व एक गझलकार/कवी म्हणून) केलेले सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण होते.

२)ते वाचून आपण निराशेच्या इतक्या टोकाला(?)कसे गेलात हे कळत नाही.

३)मला तरी असे वाटते की, प्रत्येक शायराने/कवीने स्वत:वर, स्वत:च्या परमेश्वरावर, प्रज्ञेवर व प्रतिभेवर नुसती श्रद्धाच नव्हे, तर विश्वास ठेवायला हवा.

४)डोळे, कान व मन उघडे ठेवून जीवनाची व काव्याची वाटचाल करायला हवी.

५)जे चांगले आहे ते घेवून पुढे जायला हवे.

६)कलाकाराची अतृप्तीच कलाकाराला जिवंत ठेवते, प्रगत करते.

७)मला सर्व समजले म्हटले की, प्रगतीचा प्रवास थांबतो.

८)कालच्यापेक्षा आजचे माझे लिखाण जरा बरे आहे का याकडे मी तरी लक्ष देतो.

९)प्रत्येकाची शैली वेगळी असते. वेगवेगळ्या शैलीतील दर्जेदार काव्य हे त्याच्या त्याच्या जागी सुंदरच असते!

१०)गझल हा फक्त कवितेचा/काव्याचा एक आकृतिबंध आहे. लोक उगाच या आकृतिबंधावरच (बाह्यांगामधेच) अडकून बसतात. किती लोक गझलेच्या/शेराच्या अंतरंगाचा/आत्म्याचा विचार करतात? किती लोक शब्दांच्या अर्थांच्या प्रसरणशीलतेचा, शब्दांच्या अपरिहार्यतेचा, शब्दांच्या लाक्षणिक व ध्वन्यार्थांचा अभ्यास करतात? किती जण आवडलेल्या शेरांचे बहुपदरी अर्थ उलगडतात?

११)कुठलाही कामयाब शेर ही एक दर्जेदार कविता असते, व मुळात काव्य तरी कशाला म्हणायचे? यावर किती जण विचार करतात?

१२)कविता/काव्य/शेर हृदयात निमिषार्धात लकाकतात, जे कवीला जाणवते. सुचलेले काव्य कागदावर लिहिताना कवीच्या प्रज्ञेची, आणि प्रतिभेचीही कसोटी लागते.

१३)कुठलीही कविता / शेर /गझल लिहिताना वास्तवाचे, सत्याचे व विज्ञानाचेही भान ठेवायला हवे.

१४)जीवनातील/जगातील प्रत्येक गोष्टीत काव्य दडलेले असते, अगदी विज्ञानात सुद्धा! ते काव्य शब्दांत मांडण्याची धडपड कवी करत असतो.

१५)सुचलेल्या कल्पनांवर, योजायच्या प्रतिमांवर, प्रतिकांवर शास्त्रीय व कलात्मक विचार कसा केला जातो, हे मला व्यक्त करायचे होते. मी माझ्या स्वत:च्या गझलेवरही हे लिहू शकलो असतो. पण, मग आत्मस्तुतीचा दोष स्वीकारावा लागला असता.

१६)हाडाच्या गझकाराचा गझल म्हणजे श्वास असते. अहोरात्री त्याच्या मनात शेर/गझलाच थैमान घालत असतात. तेव्हा गझल लिहिणे, प्रकाशित करणे वा मुशय-यात पेश करणे, हे शायर कधीच ठरवून करत नसतो.

१७)खरे सांगायचे तर गझल/कविता ही करावीच लागत नाही. सरावाने, श्रद्धेने, निष्ठेने, व्यासंगाने, प्रज्ञेने व प्रतिभेने ती आपोआप होतेच!

टीप:
शामजी! आपण सुंदर लिहिता. स्वत:वर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवा.
आपली तरही गझल मला छान वाटली. आजच मी तुमच्या गझलेवर काही लिहिणार होतो. पण आता मी दचकलो आहे. फक्त एवढेच सांगतो की, पहिले दोन तीन शेर खूपच छान आहेत.
आपली इच्छा असेल तर बाकीच्या शेरांवर काय काम करायला पाहिजे, ते मी सुचवू शकेन.

जाता जाता फक्त माझे दोन शेर देतो..............

कवितेस लाभलेली कांती दिसून येते!
हृदयात आग जितकी, तितकी तिची झळाळी!!
................................................................................................

गझल म्हणजे फक्त शब्दांची न जादू;
गझल छायाचित्र असते काळजाचे!
..................................................................................................
..........प्रा.सतीश देवपूरकर

<<<आपली इच्छा असेल तर बाकीच्या शेरांवर काय काम करायला पाहिजे, ते मी सुचवू शकेन.>>>

प्रोफेसर साहेब, आपण हे कशावरून ठरवता की एखाद्याच्या गझलेत काय काम करायला पाहिजे हे सांगण्याचा आपल्याला काही नैतिक अधिकार आहे? कुतुहल म्हणून विचारले.

राग मानू नयेत.

घबाड | 3 July, 2012 - 18:04 नवीन
छान
>>>

काय छान?

वर पानिपत चाललंय!

देवसर:

गझल म्हणजे फक्त शब्दांची न जादू;
गझल छायाचित्र असते काळजाचे!>>>>>>>>>

मस्त
शेर आवडला पण..........................

काळजाचे छायाचित्र=नक्की आपणास काय म्हणायचे आहे हे समजले नाही देवसर
२ डी एको की ३ डी एको ??

माफ करा........... आपल्याला सुचलेल्या कल्पनेमागे , योजलेल्या प्रतिमेमागे , प्रतिकामागे शास्त्रीय व कलात्मक विचार आपण नेमका़ कोणता व कसा केलात हे मला जाणून घ्यायचे होते

कुतुहल म्हणून विचारले.(;))

खरे सांगायचे तर असा कामयाब शेर समजून( आवडून........... ) घ्यावा लागत नाही. सरावाने, श्रद्धेने, निष्ठेने, व्यासंगाने, प्रज्ञेने व प्रतिभेने तसे आपोआप होतेच!
Light 1
मला माहीत आहे ; माझ्या प्रतिसादावर तुम्ही उत्तर देत नाहीएत तरी विचारायचे धाडस केले .....
________________

असो;
खालील ओळ मला इतकी आवडली नाही माझ्या विचारसरणीला अनुसरून नाही आहे ती

गझल म्हणजे फक्त शब्दांची न जादू;>>>

मला वाटते ..........

गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला >>>>>>>>>

आपले मत कळवा

>>>
एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले

जेथून परतण्याइतकी उरलेली असेल उर्मी
लाटांनी त्याच तिराला भिडण्याचे धाडस केले
<<<

वा! मस्त शेर! Happy

वरची घनघोर चर्चा वाचून इक्बालच्या ओळी आठवल्या :

तेरे सीने में दम है, दिल नहीं है
तेरा दिल गर्मी-ए-महफिल नहीं है
गुजर जा अक्ल से आगे, कि यह नूर
चिराग-ए-राह है, मंजिल नहीं है

देवपुरकर,

>> प्रत्येकाची शैली वेगळी असते. वेगवेगळ्या शैलीतील दर्जेदार काव्य हे त्याच्या त्याच्या जागी सुंदरच असते!
>> बाकीच्या शेरांवर काय काम करायला पाहिजे, ते मी सुचवू शकेन.

यात विरोधाभास दिसतो. अगदीच तांत्रिक चुका (वृत्तभंग इ.) नसतील तर त्यांना त्यांच्या शैलीत व्यक्त होऊ द्या की. आवडेल तिथे (जमलं तर) दाद द्या, नाही आवडणार ते सोडून पुढे जा.
तुम्ही इतरांची काव्यं 'सुधारणं' म्हणजे तुमचा चष्मा बळेच त्यांच्या डोळ्यांवर चढवण्यासारखं नाही का? एकाद्या शब्दाची नीट योजना केल्यामुळे मूळचा अर्थ आणखी खुलला - इतपत इस्लाह समजू शकते. पण मूळचा शेर आणि त्याचे सर्व संभाव्य अर्थांचे कंगोरे डावलून आपलेच पूर्णतः नवीन शेर सुचवायचा अट्टहास आपण का करता? प्रत्येक शेरचं वैज्ञानिक पृथःकरण करण्याच्या नादात ते कोमेजून जातात हे आपल्या लक्षात येत नाही का?

हे फार दिवस वाचते आहे म्हणून आज विचारण्याचे 'धाडस केले'. Happy

धन्यवाद स्वातीताई,

आपण मोलाची मते मांडलीत आणि इक्बालच्या ओळीही आवडल्या. (वाचल्या नव्हत्या , माझ्यासाठी नवीन आहेत)

<<<म्हणजे तुमचा चष्मा बळेच त्यांच्या डोळ्यांवर चढवण्यासारखं नाही का? >>> बरे झाले हे लिहिलेत

पुन्हा आभार

हे फार दिवस वाचते आहे म्हणून आज विचारण्याचे 'धाडस केले'>>>>>>>>>>>>>

वा वा देवसर तुमच्या मुळे मायबोलीकर अत्यन्त धाडसी झाले आहेत याबद्दल समस्त मा.बो. तर्फे आपले आभार

बेफीजी : मी तुम्हाला तेंव्हाच माझ्या भाषेत समजावून सान्गीतले होते की तुम्ही बेफी आहात, देवपूरकर बनायला जावू नका म्हणून.................
तुम्ही असम्बद्ध- सुसम्बद्ध प्रतिसाद म्हणत कानाडोळा केलात त्या वेळी..........

तुमच्या मुळेच माझ्यावर असले काहीच्या काही प्रतिसाद द्यायची वेळ आलीय आज!!!

(मी पुण्यात आल्यावर तुमच्या कडून पेनल्टी म्हणून एक पार्टी उकळावी म्हणतोय............. Wink )

<<<<बेफीजी : मी तुम्हाला तेंव्हाच माझ्या भाषेत समजावून सान्गीतले होते की तुम्ही बेफी आहात, देवपूरकर बनायला जावू नका म्हणून................>>>>>

१०१ % सहमत!

Happy

मनातल बोललात वै व कु

क्षमस्व बेफि, पण देवपुरकरांनी मला उद्देशुन इथे प्रतिसाद लिहल्याने मलाही लिहावे लागत आहे...

@ देवपुरकर,

वरील प्रतिसाद, माझा निर्णय नसून फक्त तत्कालीक विचार होता त्यामुळे आपण गंभीर होऊ नये... नाहीतर पुन्हा "माझ्या समिक्षेमुळे एक भंकस गझलकार निर्माण होणे थांबले" असे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण करून उर बडवत बसाल..

आपण वयाने जेष्ट आहात आणि केवळ एवढ्याच भांडवलावर उठसूट सगळ्या गझलांचे कुठल्या कुठल्या भंपक शास्त्रांच्या आधारे किस पाडत आहात. . हे शोभणीय नाही.

१)मी जे बेफिकीरजींच्या गझलेवर लिहिले ते एक सदर गझल काव्याचे (माझा विवेक जागृत ठेवून व एक गझलकार/कवी म्हणून) केलेले सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण होते. कोणी सांगीतले होते करायला,,,, हे काफिये आणि रदीफ घ्या नि गझल करा म्हणालात ,,, वरून बालहट्ट म्हणालात... म्हणून आम्ही गझल केली तरी आपले आहे तेच... कोणाच्याही गझलेला चांगलं म्हणायचच नाही अशी शपथ घेतली आहे का आपण?

भटांच नाव घेता आपण... त्यांच्या गझले सोबतच त्यांचा गझलदृष्टीकोन का नाही घेतलात आपण ... त्यांनी कोणाच्या गझलेचं असं सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण केल्याचं माझ्यातरी ऐकण्यात नाही. आणि ज्यांनी अशा समिक्षा केल्या त्यांना भटांनी जे उत्तर दिलं ते आपणास मी काय सांगावं?
आपल्याला चांगली वाटलेली स्वतःची व भटांची सोडून एखादी गझल आहे काय? असल्यास इथे द्यावी आपल्यासौंदर्यशास्त्राचा आम्हाला अंदाज तरी येईल.

२)ते वाचून आपण निराशेच्या इतक्या टोकाला(?)कसे गेलात हे कळत नाही. हळूहळू बरेच कळेल आता आपल्याला...विश्वास ठेवा.

बाकी आपले ३ ते ८ मुद्दे निव्वळ फुकटचे सल्ले आहेत.

९)प्रत्येकाची शैली वेगळी असते. वेगवेगळ्या शैलीतील दर्जेदार काव्य हे त्याच्या त्याच्या जागी सुंदरच असते! हे तुम्हाला कळते यावर विश्वास बसत नाही.. तुमच्या लेखी दर्जेदार काव्य म्हणजे काय ?हा वेगळाच प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. ज्याचे पानभर उत्तर आपण छापालच पुढे...

१०)गझल हा फक्त कवितेचा/काव्याचा एक आकृतिबंध आहे. लोक उगाच या आकृतिबंधावरच (बाह्यांगामधेच) अडकून बसतात. किती लोक गझलेच्या/शेराच्या अंतरंगाचा/आत्म्याचा विचार करतात? किती लोक शब्दांच्या अर्थांच्या प्रसरणशीलतेचा, शब्दांच्या अपरिहार्यतेचा, शब्दांच्या लाक्षणिक व ध्वन्यार्थांचा अभ्यास करतात? किती जण आवडलेल्या शेरांचे बहुपदरी अर्थ उलगडतात?>>> आत्तापर्यंत खूप कामियाब गझलांचा सुध्दा कोणी असा विचार केलेला नसावा. गझलच्या शेराला अर्थाचे खूप कंगोरे असतील आणि ते उलगडण्यास फार वेळ लागत असेल तर असे शेर गझला नक्किच यशस्वी होऊ शकणार नाहीत.. हा आपल्यासारखे लोक त्यातला एखादा शेर घेऊन अखंड सप्ताहात पारायणं करतील ते वेगळे.

११)कुठलाही कामयाब शेर ही एक दर्जेदार कविता असते,>>> जुनं तत्वज्ञान आहे........ व मुळात काव्य तरी कशाला म्हणायचे? यावर किती जण विचार करतात? मला वाटतं कवीला सुद्धा हा विचार करण्याची गरज नाही... जे उत्तम काव्य आहे त्याची पावती रसिकच देऊन जातात... मग काव्याच्या व्याख्या चघळण्यात काय शहाणपण?


१२)कविता/काव्य/शेर हृदयात निमिषार्धात लकाकतात, जे कवीला जाणवते. सुचलेले काव्य कागदावर लिहिताना कवीच्या प्रज्ञेची, आणि प्रतिभेचीही कसोटी लागते.
>>>> पुन्हा एक तत्त्वज्ञान

१३)कुठलीही कविता / शेर /गझल लिहिताना वास्तवाचे, सत्याचे व विज्ञानाचेही भान ठेवायला हवे. फु.स

१४)जीवनातील/जगातील प्रत्येक गोष्टीत काव्य दडलेले असते, अगदी विज्ञानात सुद्धा! ते काव्य शब्दांत मांडण्याची धडपड कवी करत असतो. पुन्हा एक तत्त्वज्ञान

१५)सुचलेल्या कल्पनांवर, योजायच्या प्रतिमांवर, प्रतिकांवर शास्त्रीय व कलात्मक विचार कसा केला जातो, हे मला व्यक्त करायचे होते.>>>> असे १०० वेळा व्यक्त करून झाले आहे कितीदा करणार आणखी .......मी माझ्या स्वत:च्या गझलेवरही हे लिहू शकलो असतो. पण, मग आत्मस्तुतीचा दोष स्वीकारावा लागला असता. म्हणजेच मी लिहलेली गझल परीपुर्ण आहे. असेच आपल्याला म्हणायचे आहे.. "आपला तो बाब्या" ... या मनोवृत्तीतून लवकर बाहेर या देवपूरकर.

या नंतर पुन्हा तत्वज्ञानाचे दोन मुद्देसूद डोस होते.

टीप:
शामजी! आपण सुंदर लिहिता. स्वत:वर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवा.
आपली तरही गझल मला छान वाटली.
>>> धन्यवाद!!!!

आजच मी तुमच्या गझलेवर काही लिहिणार होतो. पण आता मी दचकलो आहे.>>>> दचकू नका नगरकर आत्ता तर कुठे लिहू लागलेत.

फक्त एवढेच सांगतो की, पहिले दोन तीन शेर खूपच छान आहेत. >>> नक्की निर्णय झाल्यावर सांगा किती ते.

आपली इच्छा असेल तर बाकीच्या शेरांवर काय काम करायला पाहिजे, ते मी सुचवू शकेन.
अत्यंत महत्वाची ओळ... असेच विचारत चला सगळ्यांना,.. माझ्या शेरांवर काम करायला मी रोजगार हमीचे मजूर पाहीन आपण हे कष्ट टाळावेत..

या नंतर बिनमहत्त्वाचे असे दोन शेर आपण टेकवलेले आहेत.....

......तर आपल्या अभिप्रायाने माझे मनोबल उंचावले आहे असे आपण समजण्यास हरकत नाही...

माझेही बिनमहत्त्वाचे दोन घ्या...

बुरे बोलतो वा बरे बोलतो मी
मला फक्त कळते खरे बोलतो मी..

तुझे शब्द लागून गेले जिव्हारी
तरीही तुझ्याशी अरे बोलतो मी..
..............................................................................................................................शाम

Pages