रयतेचा राजा शाहू महाराज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 26 June, 2012 - 05:14

आज शाहू महाराजांची जयंती. त्याना विनम्र अभिवादन.

shahu.jpg

जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये:

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

कलेला आश्रयः

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान :

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपारिक जातीभेदाला विरोधः

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

अशा या महान राजाला विनम्र अभिवादन.

( फोटो व माहिती आंतरजालावरुन)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉरन बफे, चान्गली माहिती.
छत्रपती शाहू महाराजांविषयी, त्यान्चे जीवनकार्याविषयी तपशीलात खरोखरच फारशी माहिती उपलब्ध नाही, व जी उपलब्ध असेल, ती आजवर सर्वदूर पोचविण्याचे कार्य झालेले नाही असे वाटते. केवळ शालेय इतिहासातील एखाददोन परिच्छेदात सम्पविण्याचा हा विषय नाही हे ही तितकेच खरे. कदाचित कित्यकान्नी यावर संशोधन केलेही असेल, पण ते सार्वजनिक झालेले नाही. ते व्हायला हवय.

राजर्षि शाहूंच्या कार्याविषयी इथे इतके चांगले लिहून आल्याचे पाहून एक कोल्हापूरकर या नात्याने मला झालेला आनंद अपरिमित असाच आहे.

शाहूराजांच्याविषयी (इथे आलेल्या माहितीव्यतिरिक्त) काही विशेष सांगायचे झाल्यास त्यानी केवळ उच्चवर्णीयच नव्हे तर तळागाळातील मुलामुलींनाही शिक्षणाची द्वारे खुली झाली पाहिजेत अशी अपेक्षा बाळगली होती. पण त्या काळातील परिस्थितीच अशी विचित्र होती की सामान्य रयतेला असे वाटे की पोराला "साळंला घातलं तर शेताकडील एक हात वाईच कमी हुणार ! त्यातबी पोराच्या साळंची फी आणि जेवणाचा खर्च कसा झेपायचा आमा गरिबांना ?" ~ म्हटले तर हे दोन्ही प्रश्न त्या काळाचा विचार करता योग्यच म्हटले पाहिजेत. शाहुराजांनाही 'विद्याप्रसारणाच्या निव्वळ घोषणा करून काही उपयोग नाही, त्यासाठी वाड्यावरील खजिन्यातूनच काही ठोस उपाययोजना केली तरच पोरे शाळा शिकतील' हा विचार पटला आणि त्याच विचारातून कोल्हापूर संस्थानात सुरू झाली "फ्री बोर्डिंग स्कीम"....म्हणजे रयतेने पोराना शाळेत फक्त भर्ती करायचे आणि मग पुढे त्याच्या राहण्याजेवण्याची, कपडेलत्याची, दप्तराची सारी सोय ते ते बोर्डिंग करणार. ही अनोखी योजना रयतेपर्यंत कारभारी अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव, मामासाहेब मिणचेकर, सरनोबत आदी कर्तबगार कारभार्‍यांनी ग्रामीण भागात सर्वत्र चावडीचावडीत जाऊन पसरविली. मग निदान "पोराला दोन वेळचं पोटभर खायला तरी फुकट मिळत्यय...तर जावू दे त्याला साळंला..." असे म्हणत एकदाची ती शेतकरी-कातकर्‍याची पोरे आनंदाने कोल्हापूरला शाळेला येऊ लागली. संस्थानाच्या बोर्डिंगमध्ये मोफत भोजनासह राहून शिकू लागली, शिकली, आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात अगदी अधिकारी पदापर्यंत पोचली देखील.

महाराज स्वतः संध्याकाळच्या जेवणाच्यावेळी त्या त्या हॉस्टेलला 'सरप्राईझ व्हिजिट' देत आणि त्या पोरांच्यासोबतीने तिथेच पाट टाकून त्यांच्यात ताटातील भाजीभाकरी कांदा चटणीचा आस्वाद घेत पोरांच्या शाळेतील प्रगतीची चौकशी करीत. त्यामुळे झाले असे की 'महाराज केव्हाही मुदपाकखान्यात येऊन स्वयंपाकाचा दर्जा तपासतील' अशी शक्यता असल्याने कोठीवरचे नेमस्त लोक मुलांना दिले जाणारे जेवण हे दर्जेदारच असेल याची रास्त खबरदारी घेत.

एकदा महाराजांनी शिवाजी पेठेतील (त्यावेळी ती गुरुवार पेठ होती) श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस येथे अचानक भेट दिली असता त्याना मेस हॉलच्या बाहेर दहाबारा पोरे आपापली ताटेवाट्या घेऊन पायर्‍यावर मुकाट बसलेली दिसली. जेवणाची तर वेळ झाली होती आणि आत कित्येक मुलांचा जेवण घेत असल्याचा कोलाहलदेखील ऐकू येत होता. महाराजांनी पायर्‍यावर बसलेल्या पोरांना "का रं, असं का बसलात तुम्ही ? जेवणं झाली का तुमची ?" असे विचारले. त्यापैकी एकाने खाली मान घालून सांगितले, "नाही जी, आम्ही म्हारांची पोरं हाया, आत बामण आणि मराठ्यांची पंगत चाललीया....ती झाली की मास्तर आमाला हाक मारतात...." या निष्पाप उत्तरावर महाराजांच्या हृदयात कालवाकालव झाली. काय करायचे या जातिभेदाबाबत ? त्यांची अशी अपेक्षा होती की शालेय शिक्षण घेता घेता एकजुटीने या पोरांनी जेवणही केले तर निदान त्यातील मीठाने तरी यांच्यातील जातीच्या भिंती कमकुवत होत जातील. पण आत पंगतीला बसलेल्या मुलांपेक्षा त्यांच्या मास्तरांनाच तो भेद तसाच राहावा असे वाटत होते की काय या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.

दुसर्‍या दिवशी मग कारभार्‍यांना हा किस्सा सांगून त्यांनी निर्णय घेतला की, शिक्षणसंस्था जरी एक असली तरी जेवणाच्यावेळीतरी लोक भेदाभेद करणार असतील तर त्यापेक्षा आपण त्या मुलांतील न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र अशी हॉस्टेल्स बांधू आणि त्यांच्यात भेदामुळे निर्माण झालेली भावना शिक्षण संपादनाच्या आड येणार नाही इतके तरी पाहू. ही योजना पुढे कार्यान्वित झाली आणि मग याच कोल्हापूरात मराठा, लिंगायत, जैन, महार, मुस्लिम अशी विविध फ्री हॉस्टेल्स सुरू करण्यात आली आणि त्यामुळे शिक्षणप्रसारालाही चांगलाच वेग आला.

अशोक पाटील

अशोक पाटील, चांगली माहिती. 'खासबाग' लेखावरच मी तुम्हाला विनंती केली होती की शाहू महाराजांवर लिहा. ही बरीचशी बोर्डिन्ग्ज दसरा चौकात आहेत. चांकाप्र बोर्डिन्गही आहे. नंतर तिथे कोणाही गरजूला रहाता येऊ लागले, जात कोणतीही असो.

kiran.. धन्यवाद.

मंदार वैद्य, मला कालच ती साईट सापडली. जरूर पूर्ण करा. तिथे एका पुस्तकाची जाहिरात आहे ते बाजारात आले आहे का?

छान माहिती मिळाली... मुळ लेख आवडलाच, तसेच प्रतिसादही आवडलेत. दुर्दैवाने जातीच्या भिंती आजही घट्ट आहेत.

राजर्षि शाहू महाराजांना आणि त्यांच्या कार्याला वंदन.

महाराजानी गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल काढून दिले, अशीही कथा कुठेतरी ऐकली आहे. स्वतः महाराज त्या हॉटेलात सकाळी ३-४ महिने जायचे म्हणे. त्यातून लोकांची भीड चेपली आणि मग लोकांची वर्दळ वाढली.

गंगाराम कांबळेंना महाराजांनी चहाचं हॉटेल काढून दिलं. आठवड्याने महाराज तिथं मुद्दाम गेले तेव्हां हॉटेल बंद असल्याचं त्यांना दिसलं. त्यांना राग अनावर झाला. गंगाराम कांबळेला बोलवायला माणसं पाठवली ती ही लवकर येइनात म्हणून स्वत: महाराज गंगारामच्या वस्तीत गेले तर गंगाराम कामावर गेलेला ! आता सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून महाराजांनी तिथं माणसं पाठवली. गंगाराम आला तोच भीत भीत. महाराज त्याच्यावर बरसले. शांत झाल्यावर हॉटेल बंद करून कामावर जायचं कारण विचारलं. तेव्हां गंगारामने सांगितलं कि तो सांगितल्याप्रमाणे रोज सकाळी लवकर चहाचं हॉटेल उघडत होता पण त्याच्या दुकानात चहा घ्यायची कुणाचीच तयारी नसल्याने गि-हाईकच नव्हतं. घर तर चालवायला पाहीजे म्हणून आठवडाभर वाट पाहून तो नेमका त्याच दिवशी कामावर गेला होता.

हे ऐकताच महाराजांनी त्याला उद्या हॉटेल उघड, गि-हाईक कसं येत नाही ते बघतो असं ठणकावून सांगितलं. दुस-या दिवशी सकाळी सकाळी महाराज स्वतः लवाजम्यासह चहा प्यायला गंगारामच्या दुकानी आले. महाराज स्वतःच चहा घेतात म्हटल्यावर अधिकारी आणि इतरांची काय कथा ! त्यानंतरही महाराज रोज काही दिवस चहा प्यायला जात असत. त्यांनी केलेला या छोट्याशा कृतीने लोकही जाऊ लागले. अशा रितीने गंगारामचं हॉटेल चालायला लागलं.

छत्रपती शाहु महाराजांबद्द्ल अंत्यत सुंदर माहिती मिळाली........ खरोखर त्यांचे कार्य खुप मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वारस म्हणुन शोभुन दिसतात.....

छान

छान

अत्यंत सुंदर लेख आहे व त्यावरील काही सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादातील माहीतीदेखिल वाचनीय आहे

मराठी माध्यमाच्या इयत्ता नववीच्या मराठीच्या पुस्तकात शाहू महाराजानी लिहिलेला एक धडा आहे. छान आहे. शाहू महाराजानी आणखी काही लेख/ पुस्तके लिहिलि आहेत का?

कु. कमला सोनटक्के, लेखाबद्दल आभार! Happy बरीच माहिती मिळाली.

Kiran.., वॉरन बफे, अशोक., तुम्हा सार्‍यांची माहिती छान तर आहेच, शिवाय लेखाशी पूरकही आहे.

मंदार वैद्य, आपली तळमळ वादातीत! लवकरच आपले संकेतस्थळ पूर्ण होतो. Happy

सरतेशेवटी शाहूमहाराजांना मानाचे मुजरे!

आ.न.,
-गा.पै.

पैलवानतात्या, आपण तर तो नववीच्या पुस्तकातला धडा वाचलाच पाहिजे.
गळ्यात झाडू ही फक्त एक थाप आहे, असे आपण एके ठिकाणी म्हटल होते.

या पाठात त्या परंपरेबद्दल खुद्द महाराजानी अगदी विस्तृत लिहिले आहे. त्या झाडूला काहीतरी विशेष नावही होते. त्याचाही उल्लेख त्यात आहे.

बकामुक,

जर आपणांस आठवत असेल तर दुवा द्यावा. किंवा स्कॅन टाकलात तरी चालेल. मी केवळ पुराव्याची मागणी केली आहे. ही प्रथा खरोखरच अस्तित्वात असल्यास तिचे मूळ कारण शोधता येईल.

आ.न.,
-गा.पै.

बकामुक,

अहो, त्याच संदेशात पुढे म्हंटलंय की पुरावा मिळाल्यास बरं होईल. म्हणजेच पुरावा मिळाल्यास मडकेझाडू ही लोणकढी नाही! एव्हढं साधं कळंत नाही आपल्याला? नवल आहे!

आ.न.,
-गा.पै.

खुप छान कथा आहे.....
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, रवळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.

याला म्हणतात लोकराजा.

व्हाट्सप

खरय. वाचुन खरच डोळे पाणावले. कुठे ते थोर लोकमान्य थोर पुरुष शाहु महाराज आणी कुठे आजकालचे अर्ध्या हळकुन्डात पिवळे झालेले नवश्रीमन्त. ज्याना गरीबान्चा स्पर्ष सुद्धा अस्पर्श वाटतो.

Pages