रयतेचा राजा शाहू महाराज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 26 June, 2012 - 05:14

आज शाहू महाराजांची जयंती. त्याना विनम्र अभिवादन.

shahu.jpg

जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये:

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

कलेला आश्रयः

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान :

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपारिक जातीभेदाला विरोधः

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

अशा या महान राजाला विनम्र अभिवादन.

( फोटो व माहिती आंतरजालावरुन)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती!!

अवांतर :
फोटो आणि लेख बघुन शाळेतल्या प्रोजेक्टची आठवण आली. आम्ही असेच फोटो वहीत चिकटवायचो आणि लेख लिहायचो.

प्रागतिक दृष्टीकोण बाळगणार्‍या, गुणग्राहक, अनेक नवनवीन उपक्रमांना प्रोत्साहन देणार्‍या समाजसुधारक शाहुमहाराजांना विनम्र अभिवादन!

लेख अतिशय सुंदर लिहीलाय. अजून माहिती देता येत असेल तर पहा.

पाणीपुरवठा आणि जलसंधारण या क्षेत्रातलं महाराजांचं धोरण हे आजही आदर्श आहे. राधानगरीचं धरण मी पाहून आलो. शाहूंनी हे धरण स्वतः बांधून घेतलेलं आहे. याच कारणामुळे हा परिसर हिरवागार आहे. कोल्हापूरला पाणीपुरवठ्यासाठी रंकाळा तलावाची निर्मिती इ. कामं ही त्यांच्या दूरदृष्टीची पावती आहे. सामाजिक क्षेत्रातले निर्णय तर क्रांतीकारक आहेतच त्याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रालाही त्यांनी भरघोस मदत केलेली आहे. बालगंधर्वांना त्यांनी मदत केल्याचे सर्वश्रुत आहेच. विविध कलांना राजाश्रय देण्यात कोल्हापूरच्या या राजाची तुलना त्या काळच्या फक्त बडोदा संस्थानशी होऊ शकते.

लोकराजा राजर्षि शाहू छत्रपती यांना विनम्र अभिवादन!

थोडक्यात चांगली माहिती दिली आहे. त्यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यांच्यावर राहुल सोलापूरकर व्याख्यान देतात ते ऐकण्यासारखे आहे, व्याख्यानाची सीडीही उपलब्ध आहे.

शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन अनेक मल्लांना राजाश्रय दिला. किंबहुना कोणत्याही क्षेत्रातील ते गुणी लोक असतील, त्यांना कोल्हापुरात आणण्याची महाराजांना फार हौस होती. यामुळे अल्लादियाखांसारखा गानमहर्षी, बाबूराव पेंटरांप्रमाणे चित्रमहर्षी कोल्हापुरात आपल्या कलानंदात मग्न असत. रियासतकार सरदेसाईंविषयी महाराजांना प्रेम होते व महाराज हे कलेचे एवढे भोक्ते, की आपल्या जवाहरखान्यातील दागिनेही ते नाटक मंडळीला वापरावयास देत. गोविंदराव टेंब्यांनी कंपनी काढली, तिला महाराजांचा मोठा आधार मिळाला. गोविंदरावांच्या पेटीवादनाचे महाराजांना फार कौतुक होते अणि ‘शिवसंभव’ नाटकाच्या वेळी महाराजांनी आपल्या जवाहरखान्यातील खास शाही दागिने वापरण्यासाठी दिले होते.

‘शिवसंभव’नाटकातील शिवजन्माचा प्रसंग येताच शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातील शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला. असा मोठ्या दिलाचा हा राजा होता.

महाराष्ट्राच्या समाजकारणात लोकमान्य टिळक व छत्रपती शाहू महाराज यांचे ग्रह जमले नाहीत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. पण कोल्हापूरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी, यास्तव लोकमान्यांना गादीचा अभिमान व गादीवरील वारसाबद्दल आदर होता. उलट, लोकमान्य टिळकांशी वेदोक्त वगैरे प्रकरणांवरून कितीही मतभेद असले, तरी इंग्रजांशी निधडेपणाने लढणार्‍या लोकमान्यांबद्दल शाहू महाराजांना आदर होता. महाराज भोजनासाठी पानावर बसले असता लोकमान्यांच्या निधनाची वार्ता समजली, तेव्हा त्यांनी आपल्यापुढील ताट बाजूला केले, ‘असा लढवय्या पुरूष होणार नाही’असे म्हणाले व पाटावरून उठले.

संदर्भ : यशवंतराव चव्हाण

शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्याचा लाभ सर्व जातींच्या लोकांना मिळावा, हा महाराजांचा कटाक्ष होता. म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या. परंतु केवळ शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत. त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तमोत्तम शिक्षकवर्ग प्रयत्‍नपूर्वक आणला. डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या तज्ज्ञांची त्यांनी नेमणूक केली, हेही त्यांच्या गुणग्राहकतेचे उदाहरण म्हणून सांगता येईल. या बाबतीत त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. त्यांनी कै. रानडे व कै.गोपाळ कृष्ण गोखले यांचा आदर्श ठेवला होता. १९१८ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत ब्राह्मणेतर समाजापुढे भाषण करताना महाराज म्हणाले,

‘ज्यांच्या मृत्यूमुळे जनतेला अतिशय तळमळ लागून राहिली, असे माझे मित्र न्यायमूर्ती रानडे व गोपाळराव गोखले यांनी मागासलेल्या लोकांची सुधारणा करण्यासाठी प्रयत्‍न केले होते. मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी महत्प्रयास केले पाहिजेत, ही गोष्ट प्रथम मी त्यांच्यापासून शिकलो.’

तथापि, ब्राह्मण समाजाची विद्या ही फक्त मराठा समाजात आली, की आपले कार्य झाले, असे शाहू महाराजांना वाटत नव्हते. त्यांनी अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्‍या समाजाला विद्येचा लाभ मिळावा, त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी आणि अस्पृश्यतेचा कलंक घालवावा, यासाठी जे विविध प्रयत्‍न केले, ते विशेषच मोलाचे होते. महाराजांनी महारवतने नष्ट केली; रामोशी वगैरे जातींच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावयास लागे, ती पद्धत रद्द केली. आपला चाबुकस्वार, मोटारचा ड्रायव्हर, माहूत हे महार असतील, अशी व्यवस्था त्यांनी केली होती.

संदर्भ : यशवंतराव

शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव यावा यासाठी शाहूंनी कोल्हापूर तसेच जयसिंगपूरला बाजारपेठा वसविल्या.भोगावती नदीवर राधानगरी येथे धरण बांधून कोल्हापूर संस्थानाचा कायापालट केला.कापड उत्पादनासाठी शाहू मिलची स्थापना केली.तसेच सहकारी संस्थांचे जाळे संस्थानात मजबूत केले.

भारतातील तत्कालीन संस्थानकालीन सर्वात मोठे
चुनामातीचे धरण,राधानगरी(भोगावती नदी)

radhanagari.jpg

धन्यवाद बफे साहेब.
माहितीपूर्ण लिखाण. असे अजून हवे.

चांगली माहिती! दक्षिण मध्य (तेव्हाची सदर्न मराठा?) रेल्वे कोल्हापुरापर्यंत आणण्यातही त्यांचेच प्रयत्न होते असे वाचले होते.

वॉरन बफे
जबरदस्त !!!

लोला
शाहू महाराजांचे चरित्र चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहीले आहे. या शिवाय त्यांच्यावर अनेक ग्रंथ लिहीले गेलेले आहेत. राजांना जाणून घ्यायचं असेल तर कोल्हापूरला भेट मस्ट आहे. करवीरवासीय या राजावर आजही वेड्यासारखं प्रेम का करतात हे इथे अनुभवता येतं.

सर्वांना धन्यवाद....
शाहु रायांबद्दल असलेलं हे प्रेम आणि आपुलकी यामुळेच शाहु विचार जगभर रुजायला पुन्हा एकदा मदत होणार आहे.

मी कोल्हापूरचा. व्यवसायाने वेब डीझाइनर. गेली ८ वर्षे या व्यवसायाशी संबंधित. शाहू महाराजांबद्दल इंटरनेट वरती काहीच माहिती नाही याचे मला नेहमी दु:ख वाटत असे.
एवढ्या मोठ्या मनाच्या राजाबद्दल परीपुर्ण माहिती इंटरनेट वरती नाही. शासन गतिने हे कधिही होणार नाही असेच वाटते. शाहू जन्म स्थळाचे काम गेले कित्येक वर्षे चालूच आहे. अधिकारी बदलले.. शासन बदलले.. तरीही शाहू जन्मस्थळ मात्र जैसे थे.

या सगळ्यातून एक सुरुवात म्हणून मी ही वेबसाईट सुरु केली आहे. http://www.shahumaharaj.com

आपणा सर्वांचे सहकार्य आहेच..

मंदार वैद्य, कोल्हापूर.

महाराजाना विनम्र अभिवादन.

सर्व प्रतिसाद आणि लेख ह्यातुन चांगली माहिती मिळाली आहे. Happy
महाराजानीच शाहु मार्केट यार्ड ही आसपासच्या सर्व मालाला एक मोठी बाजारपेठ म्हणुन वसवली होती.
तिथे आजही गुळ, कांदा, बटाटा, लसुन, धान्य, भाजीपाला, फळफळावळ ह्याचा होलसेल व्यापार चालतो.
आधी जनावरांचाही बाजार भरत असे. आता वाढत्या शहरीकरणामुळे तिथे जनावरांचा बाजार भरत नाही बहुतेक.

मंदार वैद्य, अभिनंदन.

आपल्याला शुभेच्छा. मी कालच तुमची वेब सैट पाहिली. ती अजून अपूर्ण आहे. आता लवकर ती पूर्ण करा. तसेच ही माहिती मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत ठेवल्यास छान परिणाम होईल.

कोल्हापूर्ला रेल्वे आणण्यास महाराजांचे मिळालेले योगदान या विषायावरही लिहा.. रेल्वेच्या शासनाच्या ज्या साइट आहेत, त्यात इंग्रजांचे उल्लेख आहेत, पण महाराजांचा नाही. त्यानी याबाबत केलेले कार्य जनतेसमोर यायला हवे. शाहू महाराजांच्या नावाने महाराष्ट्राबाहेरही काही संस्था, कॉलेजेस आहेत. त्यांचीही एक सूची व्हावी. म्हणजे शाहू हे नाव केवळ कोल्हापूर प्रांतातच नव्हते तर सगळीकडे आदरणीय आहे, हे अधोरेखीत होईल.

उत्तर प्रदेशात एका जिल्ह्याचे नाव शाहूजी महाराज नगर असे दिले गेलेले आहे.

Pages