विठ्ठल विठ्ठल...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

"एकलीच निगालिस व्हय माय? सोबती नाय काय कुनी तुज्या?", मी आजुबाजुला, पुढे मागे बघत म्हटल, नाही आलं कुणी, चालतं ना एकट आलं तर?
"व्हय व्हय चालतय की, तसला कायबी नेम नाय बग इट्टलाचा, या म्हनतो समद्यास्नी",
"कोन गाव म्हनायच ?", मी गोंधळले होते, आता नक्की काय सांगु या माउलीला, नुकतीच पुण्यात आले म्हणून सांगू, औरंगाबादची आहे म्हणून सांगू का दुबईहुन आले म्हणून सांगु? माझा गोंधळ निरखत समोरुन दुसरा आवाज आला ,"-हाऊ द्ये बाई, कुटं कुनाला कळतय कोन कुठला अन कशाला आलाय ते",. "समदे येकाच जागेला जायचे आखिरला"

इथे काही न बोलताच चालतंय बहुतेक सगळं!

त्यां सगळ्यांचा मोकळा वावर, माझं अवघडलेपण, त्यांचे धुवट कपडे, त्यांच माऊलीला साद घालण, त्यांच लोटांगण घालणं, त्यांच मधेच पुंडलिक वरदा हाSSSSरी विठ्ठल.

आजी, ते बाबा काय सांगत होते हो मगाशी ते वाखरीच रिंगण का काय ते? काय असतं हो ते? तिथे कधी पोचणार आपण?
आजी हसली, काय बाई एवड्या लगोलग वाखरीला पोचायचं? तिकडं जायचं का पंडरपूरला जायच, आं?
नाही त्या रिंगणात आपण असलो तर मोक्ष मिळतो म्हणतात ना?
व्हय व्हय मिळतो की, त्याचे येळ यावी लागतेय बग लेकी....बोला विठठल विठठल विठठल...

.ह्म्म!!... ताप उतरलाय आता, तुम्ही यांना घरी जाऊ शकता. या काही गोळ्या आणून घ्या, रात्रीतुन बरं नाही वाटलं तर कधीही परत घेऊन या. डॉक्टर, भावाला सांगत होते... दरदरुन घाम आलेला, डोळे उघडून बघीतलं तर समोर डॉक्टर,नर्स, लेक आणि भाऊ, मी विचार करत होते माझी वारी राहिली की अर्धवटच...

आजी ते वाखरीच्या रिंगणाच काय बरं सांगत होती???

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: