मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 17 June, 2012 - 01:39

baba.jpg

********************************************************

आपल्या आयुष्यातल्या नात्यांचा पहिला गोफ विणला जातो तो आई, वडिलांसोबत. या सुंदर तिहेरी गोफात गुंफलेल्या असतात असंख्य आठवणी. हीच शिदोरी आपल्याला पुढे हसवते, रडवते, घडवते, सांभाळते आणि आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरते.

आईचं स्थान अबाधित आहेच पण वडिलांशी असलेलं नातंही खास असतं, नाही का? प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे नातं आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवलेलं असतं.

अगदी आत्ताआत्तापर्यंत बर्‍याचशा घरांमधून बाबांची प्रतिमा कठोर, शिस्तप्रिय, मुलांना धाकात ठेवणारी असायची. वरुन काटेरी पण आतून गर्‍यांसारखे रसाळ अशी उपमा आईपेक्षा बाबांच्याच वाट्याला जास्त आली. बाबांना घाबरुन राहता राहता अवचित कधीतरी एखाद्या प्रसंगातून त्यांचं मृदु मन मुलांना जाणवायचं. सगळ्यांच घरांतून अशी परिस्थिती होती असंही नव्हे. काहींना मुलांत मूल होऊन वावरणारे,मित्रत्वाने वागणारे वडीलही मिळाले. आज पितृदिनाच्या निमित्ताने आपल्या बाबांच्या खास आठवणी इथे सांगूयात. आनंदाच्या, दु:खाच्या, नवीन काही शिकवणार्‍या, जीवनाचा दृष्टिकोन घडवणार्‍या, बाबांचा एक वेगळाच पैलू दाखवणार्‍या - अशा असंख्य क्षणांना उजाळा देऊयात.

गेल्या काही वर्षांत मात्र बाबांची ही प्रतिमा पुष्कळ प्रमाणात बदलली आहे. 'अहो बाबा' च्या जोडीने 'अरे बाबा' ऐकू येण्याचं स्थित्यंतरही ह्याच काही वर्षांतलं. मायबोलीवरही आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारे बरेच 'नवडॅड' आहेत. ह्या बाबांनी त्यांच्या मुलांशी असलेलं त्यांचं नातं कसं आहे त्याबद्दल इथे लिहावे असे आम्हाला वाटते. मुलांशी असलेलं बाँडिंग उलगडणारे किस्से, प्रसंग, संवाद, गंमतीजंमती सगळ्यांबरोबर शेअर करावेत.

आठवणी म्हणजे स्मरणरंजनाचा भाग झाला. परंतु सध्याच्या काळात आपण आपल्या वडिलांशी कशा प्रकारे नाते जपतोय, किंवा ते आपल्याशी कसे नाते जपत आहेत त्याबद्दलही लिहिता येऊ शकते.

पितृदिनाचे औचित्य साधून लिहूयात आपल्या वडिलांविषयी किंवा आपल्या पितृत्वाच्या अनुभवांविषयी.
मी आणि बाबा सॉल्लिड टीम!

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च, इथे लिहून मोकळं वाटलं का थोडं ? तुझी मनस्थिती समजू शकते ...
मला माहीत आहे की दु:ख बाहेर बोलून दाखवणे सोपे नाही. पण आनंद वाटल्याने वाढतो आणि दु:ख वाटल्याने कमी होते हेही खरेच आहे Happy

फार सुरेख लिहितायत सगळेजण. सगळ अजुन वाचायच आहे खरं.
आगावु , बस्के फार मस्त लिहिलय तुम्ही. नंदिनी ग्रेट आहेत बाबा तुझे.

शुम्पी , माझ्या वडिलांना पण बाहेरचे लोक घाबरतात पण आम्ही मात्र आईला. (आणि ते ही.:डोमा:) लाड सगळे पप्पाकडुनच. बहुदा मुलींवाल्या घरात असच असत. Happy फार छान लिहिलयसं.

विनार्च , कित्ती ओघवत आणि आतून लिहिल आहे.परत परत वाचल. एकदम हळवं व्हायला झाल.

'मी आणि बाबा सॉल्लिड टीम' ह्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अजूनही ज्यांना आपल्या वडिलांविषयी लिहायचे आहे परंतु वेळेअभावी शक्य झाले नाही त्यांनी जमेल तसे प्रतिसाद लिहावे. वडिलांच्या आठवणी लिहिण्यासाठी पितृदिन हे निमित्त झाले. ठराविक कालमर्यादेनंतर धागा बंद करावा असे मात्र संयोजकांना वाटत नाही. प्रतिसादांचे स्वागतच आहे Happy
त्याचबरोबर इथल्या वडिलांनी आपल्या पितृत्वाच्या अनुभवांविषयी लिहावे असेही आवाहन आम्ही केले होते. त्या आवाहनाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. आजकालची मुलं भारी हुशार. वेळोवेळी आपल्या पालकांना पेचात टाकतात, अंतर्मुख करतात. मुलाला घडवताना एखादा बाबा कसा घडला हे वाचणे जितके गंमतीशीर तितकेच उद्बोधकही असेल ह्यात शंका नाही. तर मग लिहिताय ना तुमच्या आणि लेकराच्या टीमबद्दल ? ... आम्ही वाट पाहत आहोत Happy

मा संयोजक,

हा उपक्रम खरच उत्तम आहे. मानवी जीवन अनेक नातेसंबंधांनी परिपुर्ण होत असते. आयुष्यात अनेक लोक आपल्याला भेटतात. या उपक्रमामुळे आपल्याला अनेक नात्यांच अवलोकन करण शक्य आहे. बाबा,आई, भाऊ, बहिण, काका, मामा, काकु, मामी, मित्र या शिवाय जिथे आपला खुप काळ जातो ती व्यवसाय्/नोकरी अश्या ठिकाणी बॉस/ सहायक ही सुध्दा नाती महत्वाची असतात.

या सर्व नात्यांचा आपण विचार करु शकलो तरी खुप काही वाचायला/शिकायला मिळेल.

त्याचबरोबर इथल्या वडिलांनी आपल्या पितृत्वाच्या अनुभवांविषयी लिहावे असेही आवाहन आम्ही केले होते. >>>>

इथे माझ्या एका मित्राचा अनुभव शेअर करावासा वाटतो. हा माझा मित्र जन्मतःच मूक-बधिर. पण अतिशय तल्लख, बुद्धिमान, वेगवेगळ्या कलांमधे प्रवीण. तो मूक-बधिर आहे हे कळल्यावर सहाजिकच त्याचे आई-वडिल खचले. पुढे त्याच्या आईने अतिशय जिद्दीने एका परदेशी तज्ञाच्या सल्ल्याने त्याला बोलायला शिकविले. तोदेखील भराभर शिकला - आपण त्याच्याशी बोललो तर तो खाणाखुणा न करता आपल्याशी बोलतो (थोडेसे बोबडे, पण हळुहळू कळते आपल्याला). पुढे त्याने बरेच शिक्षण घेऊन एका नोकरीत स्थिरावला (त्याची पत्नी अव्यंग असून त्याला आता एक मुलगाही आहे.) या त्याच्या सर्व जीवन प्रवासात त्याला धडवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी जे कष्ट घेतले व जी जिद्द दाखवली ते सर्व खरोखरच अतुलनीय आहेत.
मध्यंतरी त्याच्याशी बोलताना त्याचे काही शेअर करण्यासारखे अनुभव आहेत का विचारल्यावर त्याने १-२ वह्या मला दिल्या. त्यात जसे त्याने लिहिलेले काही अनुभव होते तसेच त्याच्या आई-वडिलांनी पण काही अनुभव लिहिले होते.

त्यात त्याच्या वडिलांनी लिहिलेला हा अनुभव वाचून माझे डोळे पाणावलेच -
"जेव्हा पहिल्यांदाच श्रीने (नाव बदलले आहे) स्वकष्टाने काही पैसे मिळवले त्यातून त्याने आम्हाला जी भेट दिली त्याचे मोल काही वेगळेच होते - ती भेट होती एक टू इन वन (रेडिओ -टेपरेकॉर्डर). श्री मूक-बधिर आहे हे कळल्यानंतर एक फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा त्याला काही न्यूनगंडाची भावना होऊ नये म्हणून आम्ही आमच्याकडे असे काही आणले नव्हते व एक जुना रेडिओ होता तो कोणाला तरी देऊन टाकला. श्रीने मुद्दाम ही भेट देऊन आम्हाला जणु असे सुचवले की माझ्याप्रेमाखातर तुम्ही इतकी वर्षे या आनंदाला मुकलात तो यापुढेतरी नाकारु नका."
असा माझा मित्र आहे अनेक सद्गुणांनी युक्त - सहाजिकच असा मित्र मला लाभला याचे प्रचंड समाधान आहे.

श्रीने मुद्दाम ही भेट देऊन आम्हाला जणु असे सुचवले की माझ्याप्रेमाखातर तुम्ही इतकी वर्षे या आनंदाला मुकलात तो यापुढेतरी नाकारु नका.">> ओह! Happy

Pages