मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 17 June, 2012 - 01:39

baba.jpg

********************************************************

आपल्या आयुष्यातल्या नात्यांचा पहिला गोफ विणला जातो तो आई, वडिलांसोबत. या सुंदर तिहेरी गोफात गुंफलेल्या असतात असंख्य आठवणी. हीच शिदोरी आपल्याला पुढे हसवते, रडवते, घडवते, सांभाळते आणि आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरते.

आईचं स्थान अबाधित आहेच पण वडिलांशी असलेलं नातंही खास असतं, नाही का? प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे नातं आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवलेलं असतं.

अगदी आत्ताआत्तापर्यंत बर्‍याचशा घरांमधून बाबांची प्रतिमा कठोर, शिस्तप्रिय, मुलांना धाकात ठेवणारी असायची. वरुन काटेरी पण आतून गर्‍यांसारखे रसाळ अशी उपमा आईपेक्षा बाबांच्याच वाट्याला जास्त आली. बाबांना घाबरुन राहता राहता अवचित कधीतरी एखाद्या प्रसंगातून त्यांचं मृदु मन मुलांना जाणवायचं. सगळ्यांच घरांतून अशी परिस्थिती होती असंही नव्हे. काहींना मुलांत मूल होऊन वावरणारे,मित्रत्वाने वागणारे वडीलही मिळाले. आज पितृदिनाच्या निमित्ताने आपल्या बाबांच्या खास आठवणी इथे सांगूयात. आनंदाच्या, दु:खाच्या, नवीन काही शिकवणार्‍या, जीवनाचा दृष्टिकोन घडवणार्‍या, बाबांचा एक वेगळाच पैलू दाखवणार्‍या - अशा असंख्य क्षणांना उजाळा देऊयात.

गेल्या काही वर्षांत मात्र बाबांची ही प्रतिमा पुष्कळ प्रमाणात बदलली आहे. 'अहो बाबा' च्या जोडीने 'अरे बाबा' ऐकू येण्याचं स्थित्यंतरही ह्याच काही वर्षांतलं. मायबोलीवरही आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारे बरेच 'नवडॅड' आहेत. ह्या बाबांनी त्यांच्या मुलांशी असलेलं त्यांचं नातं कसं आहे त्याबद्दल इथे लिहावे असे आम्हाला वाटते. मुलांशी असलेलं बाँडिंग उलगडणारे किस्से, प्रसंग, संवाद, गंमतीजंमती सगळ्यांबरोबर शेअर करावेत.

आठवणी म्हणजे स्मरणरंजनाचा भाग झाला. परंतु सध्याच्या काळात आपण आपल्या वडिलांशी कशा प्रकारे नाते जपतोय, किंवा ते आपल्याशी कसे नाते जपत आहेत त्याबद्दलही लिहिता येऊ शकते.

पितृदिनाचे औचित्य साधून लिहूयात आपल्या वडिलांविषयी किंवा आपल्या पितृत्वाच्या अनुभवांविषयी.
मी आणि बाबा सॉल्लिड टीम!

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००५ च्या हितगुज दिवाळी अंकामधे मायबोलीकर गिरीराज आणि बी या दोघांनीही आपापल्या वडिलांबद्दल लिहिले होते.
गिरीराजने लिहिलेले फार म्हणजे फारच सुंदर होते. बी चेही चांगलेच होते.
ही लिंक आठवणी

मला माझ्या लहानपणीचा माझा बाबा अजिबात आठवत नाही. बाबा एकतर सर्जन त्यामुळे वेळीअवेळी येणारे कॉल्स, धावपळ हे नेहमीचेच. त्यात पुन्हा ते कम्युनिस्ट पार्टी, जनविज्ञान चळवळ असल्या दंग्यात गुंतलेले! यासगळ्यात आमचा संपर्क कमीच. पण आपले वडिल कायतरी वेगळं करताहेत ही अंधुक जाणिव नक्कीच होती. त्यांच्या प्रचंड, गार पोटावर मी झोपलोय आणि त्यांचे, एका हातात पुस्तक आणि दुसरा हात भाजलेल्या शेंगादाण्याच्या वाटीत ह्या थाटात दुपारचे वाचन चाललेय ही माझी लहानपणीची सर्वात छान आठवण!

वय वाढत गेले, समज आली तसे बाबा काय 'वेगळे' आहेत ते हळूहळू नीट कळायला लागले. लौकिकार्थाने बोलायचे तर ते 'खेडेगावात जाउन गोरगरीबांच्या सेवेत झटणारे डॉक्टर' वगैरे आहेत. त्यात पुन्हा कुष्ठरोगी, एड्सपिडीत असल्या 'रिस्की' प्रश्नांशी झगडण्यात त्यांना जास्त आनंद. पण मला विचाराल तर त्यांचा ग्रेट्नेस या सगळ्यात नाही, तो आहे या सगळ्याचा अजिबात बडेजाव न करण्याची त्यांची वृत्ती. बर्‍याचवेळा लोकांना त्यांच्या तथाकथित सेवा-त्याग इ.इ.ची नशा चढते आणि मग सगळचं बिघडतं. पण बाबांसमोर कोणीही असे काही कौतुकाचे बोलू लागले की ते जाम वैतागणार आणि विषयच बदलणार हे नक्की. त्यांना त्यांच्या कामाचे ड्यू क्रेडीट मिळाले नाही ही आईची कायम तक्रार असते पण बाबाला तसे वाटत नाही. 'मी मला मजा आली म्हणून हे सगळे केले, त्यात लोकांचा काही फायदा झाला असेल तर बरेच आहे' ही वृत्ती हाच त्यांनी माझ्यावर केलेला सर्वात मोठा संस्कार आहे. त्यांचं कुतूहल, त्यांचा अभ्यास, नवं शिकण्याचा ध्यास अजूनही प्रचंड जिवंत आहे, आणि तुम्ही जेंव्हा अशा माणसाबरोबर राहता तेंव्हा या गोष्टी 'रब ऑफ' होतातच. अर्थात त्यांच्या काही गोष्टी मला पटतही नाहीत आणि ते माझे रोल मॉडेल वगैरे तर नक्कीच नाहीत.

माझा अभ्यास आणि करिअरच्याबाबतीत बाबांनी प्रचंड धीर धरला हे मात्र अगदी खरे. मला माझी वाट सापडेपर्यंत त्यांनी एकदाही कसलीही खंत, काळजी, निराशा दाखवली नाही.आताही ते माझे पुढचे बेत, करिअरचे प्लॅन्स इ.इ. बद्दल पूर्ण उदासिन आणि बर्‍याचदा अनभिज्ञही असतात, आणि मला ते फार आवडते. मुळात आमच्या बोलण्याचे विषयचे हे नव्हेत. त्यांचे वाचन प्र..चं..ड आहे, त्यामुळे त्यांनी वाचलेल्या नव्या पुस्तकाबद्दल, त्यांच्या नव्या 'ब्रेनवेव्ह'वर, राजकिय-सामाजिक परिस्थितीवर घमासान चर्चा हाच आमच्या नात्याचा अविभाज्य भाग आहे. नातेवाईक, पगार, गुंतवणूक इ.इ. विषयतर नाहीच (हे सगळे आमच्या मातोश्रींचे डोमेन आहेत!). यावर बोलणे झालेच तर तेही बाबांच्या अ‍ॅनॅलिटिकल-फिलॉसॉफिकल मार्गाने.

पण गेल्या काही वर्षात परिस्थीती बदलली आहे, विशेषतः ते आजोबा झाल्यापासून. आईशी किंवा आज्जीशी एखाद्या मुद्द्यावर कसे डील करावे, एखाद्या नातेवाईकाशी कसे वागावे, असले मुद्दे आमच्या बोलण्यात असतात आणि कधी नव्हे ते भारताचे अर्थकारण सोडून आम्ही त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दलही बोलतो! बर्‍याचदा त्यांना माझा सल्ला पटतो.
लहानपणी आई हा त्यांच्या आणि माझ्यामधला दुवा होती आता मात्र मी त्यांचा सर्वात जवळचा मित्र आणि विश्वासू माणूस बनलो आहे! आणि माझ्या नकळत मी त्यांना 'अरे बाबा' न म्हणता 'अहो बाबा' म्हणू लागलो आहे.

सगळेच मस्त लिहीताय!!

माझे बाबा आणि मी सॉलिड टीम आहोत खरं! लिहीता येतंय का बघते. पण ते ठोस, ठळक, पटकन डोळ्यात भरेल असं काहीच जाणवून देत नाहीत, आणि मग नंतर भूतकाळ आठवताना लिंक लागते, बाबांनी तेव्हा असं सांगितले होते, असं वागले होते ते. मग सगळ्याचा अर्थ उलगडायला लागतो!
मी आणि आई रोज, सकाळ संध्याकाळ बोलतो. शिळोप्याच्या गप्पा! पण जेव्हा बाबा एकटे असताना माझ्याशी बोलतात तो फार बेस्ट दिवस असतो माझ्यासाठी! साध्या साध्या गप्पांतून फिलॉसॉफी समजावतात.. सतत 'जग चांगलेच आहे ,तुम्हीही सगळ्यांशी कायम चांगले वागा' सांगत असतात. ती त्यांची अगदी आवडती पद्धत आहे जगण्याची! आता जगात सगळेच लोकं कुठे चांगली वागतात तरीसुद्धा ते असा विचार करतात व वागतात त्याहून भारी म्हणजे कधीही न चिडता, भावनातिरेक न होता आनंदी असतात ..
रोज पहाटे उठून वाचन, मनन, चिंतन व लेखन हे झालेच पाहिजे हा शिरस्ता! बाबांचे ते १,२ पानांचे लेख होताहोता अक्षरशः चळत लागलीय घरी! ते सगळंच वाचायला देत नाहीत, त्यामुळे काही त्यांनी वाचायला दिले की मस्त वाटते, लिहीलेले आवडतेच हे काय वेगळं सांगायचे! मी जे काही फराटे मारलेत लिहीण्याच्या नावाखाली ते सगळं बाबांमुळेच! वाचत राहा, वाचलेले लोकांना सांगत राहा किंवा निदान स्वत:च्या शब्दात लिहून काढा ही त्यांची शिकवण!
बापरे! मला खरंच भरून येतंय! ते इतके गोड आहेत ना कि माझ्या मैत्रिणी जळायच्या अगदी! किती कूल बाबा आहेत तुझे असं म्हणून! Proud अजुन काय सांगणार! I just LOVE him!! Happy

हे माझे बाबा व मी! Happy
21848_283350292017_7441317_n.jpg

सर्वानी मस्त लिहिले आहे. मला एवढं चांगलं लिहिता येणार नाही. पण तरी काही किस्से लिहिते.

माझे लग्न झाल्यावर माझ्या सासूसासरे आणि नवर्‍याचा देखत माझे पपा माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. "तुझा पप्पा कायम तुझ्यासाठी आधार बनून उभा आहे. कधीच स्वतःला एकटं समजू नकोस."

माझ्या लहानपणी पप्पा कायम फिरतीवर असायचे, मी दीड वर्षाची वगैरे असताना ते अरूणाचल्प्रदेशामधे होते. जवळ जवळ आठ नऊ महिन्यानी ते परत आले तर मी आईला "हा कोण माणूस आलाय?" असं (कानडीतून्) विचारलेले. त्याच दिवशी पप्पानी त्या नोकरीचा राजिनामा दिला. Happy

माझ्या वडलांचा पाच वर्षापूर्वी एक मोठा अपघात झाला. त्या अपघातातून ते वाचले हे आमचे नशीब. पण त्यामुळे एखादा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजून गेले. अपघाताच्या तिसर्‍या दिवशी ते बेशुद्ध होते. कोमामधे कधीही जाऊ शकले असते. त्याना आयसीयुमधे ठेवले होते. पण बेशुद्धीमधे ते अखंड बडबडत होते. नर्स म्हणाली की ते असंबद्ध बोलत आहेत. त्यांचे डोळे बंद होते. मी लक्षपूर्वक ऐकलं तर ते म्हणत होते. "योग्या, तो ज्युस पिऊ नकोस. या बाईचा भरवसा नाही. काहीपण पाजेल. (मधेच कानडी बोलत होते)" आईने मागच्याच महिन्यात रीअल का कसलातरी ज्युस आणला होता. त्यासंदर्भात ते बोलत होते. मी विचारलं. "तुम्हाला बरं वाटतय का?"

"काय बरं वाटणार? तो ज्युस घशात अडकलाय"

"मी चहा देऊ का तुम्हाला?"
"कशाला? चहाने पित्त होईल" मला इतकं समजलं की ते असंबंद्ध बडबडत नाहीयेत. मी जर प्रश्न विचारला तर ये योग्य उत्तर देत आहेत. मी कानडीतून विचारलं की कानडीमधून उत्तर द्यायचे. इंग्रजीतून विचारल्यावर इंग्रजीतून. अशी आमची हिंदी-मराठी-गुजराती-कानडी-इंग्लिश अशी प्रश्नोत्तरे झाली. नर्स म्हणे "जास्त बोलू नका" आणि पप्पांची बडबड तर चालू. थोड्या वेळाने डॉक्टर आले तेव्हा हा प्रकार मी त्याना सांगितला. गंमत म्हणजे डॉक्टरानी काहीही विचारले तर ते अजिब्बात उत्तर देत नव्हते. मी सोडल्यास अजून कुणालाही ते उत्तर देत नव्हते.

ते अखंड चार पाच दिवस मी त्यांच्य्या उशाशी बसून त्यांच्याशी बोलत होते(खरंतर ऐकत होते) . मधेच त्याना लहर आली की त्यांच्या कॉलेजचे किस्से सांगायचे. अजून कधीतरी मला जहाजाच्या स्पेसिफिकेशन्बद्दल सांगायचे. या स्टेजमधून परत यायला पप्पाना जवळ जवळ तीन ते चार महिने लागले. आजची रात्र तरी जाईल का इथपासून ते उभे राहतील का ते ऑफिसात जातील का अशा कित्येक अडथळ्यावर त्यानी मात केली.

आशियामधे बांधल्या गेलेल्या पहिल्या ऑइल रिगचे ते एंजीनीअरिंग हेड आहेत. हे शक्य झालं ते त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीनेच. त्यांच्यासारखा सेम टूसेम चेहरा दिला देवाने पण त्यांच्य्यासारखी चिकाटी, परिश्रम, प्रसंगावधानता मिळाली असती तर देवाचे जरा आभार मानले असते. Happy

>>> माझ्या नकळत मी त्यांना 'अरे बाबा' न म्हणता 'अहो बाबा' म्हणू लागलो आहे. <<<<
हा बदल बहुधा स्वतः बाप झाल्यावर होत असावा, नै? Wink
पण आम्हालाबोवा हा बदल अनुभवता येणार नाही, कारण आमच्यावेळेस "अरे बाबा" म्हणले अस्ते तर एका कानाखाली आईने अन दुसर्‍याखाली बापाने जाळ काढला अस्ता. Proud

खूप छान लिहीलय सगळ्यांनी... हे सगळं वाचून माझ्या बाबांबद्दल लिहायची संधी सोडावी वटत नाहीये.

कळत नकळत खूप काही शिकले त्यांच्याकडून अजूनही शिकतेय. पण प्रकर्षाने जाणवणार्‍या गोष्टी म्हणजे प्रामाणीक पणा, त्यांच्या कामावरचं त्यांचं प्रेम, स्ववलंबन, सतत काम करत रहाणे. बँकेच्या कामामूळे त्यांना वैतागलेलं कधीच बघीतलं नाही मी. मधे ५-६ वर्ष ते खेडेगावात होते. तेंव्हा त्यांना खूप त्रास झाला गावातल्या राजकारणाचा, बँकेतल्या राजकारणाचा, कर्ज़ मंजूर करण्यासाठी धमक्या, वेगवेगळी अमीषं. पण ते कधीच डगमगले नहीत. उलट आम्हाला भीती वटायची. पण तेंव्हा ते म्हणायचे मी काही चुकीचं करत नाही, मला काही होणार नही.

त्यांचं वाचन ही भरपूर आहे, पण बोलण नाही फ़ारसं त्यामुळे कळतच नाही केवढी महिती असते त्यांच्याकडे. सगळा स्वयंपाक उत्तम करतात ते. काही पदार्थ खावेत तर त्यांच्याच हातचे. घरातलं कुठलही काम करताना मागे पुढे बघत नाहीत. आज काल आम्हालाच त्यांना थांबवाव लागतं. घर कायम स्वच्छ लागतं पण ते काम दुसर्‍या कोणी करण्यची ते वाट ही बघत नाहीत आणि त्यांची अपेक्षाही नसते बहुतेक.

बर्‍याच गोष्टी आठवताहेत लहानपणीच्या. सुट्टीतलं सक्तिचं शुध्दलेखन, पाढे, लहानपणीच्या ट्रिप्स (जवळ जवळ सगळा भारत फ़िरले मी त्यांच्याबरोबर), त्यांचं आमचा अभ्यास कधीच न घेणं (आई ची कायम तक्रार असायची ह्या बाबतीत) पण काही अडलं की सोप्पं करुन समजून सांगणं. ते कायम म्हणायचे आधी तू प्रयत्न कर नाही जमलं तर मी सांगीन.

माझ्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात ते खंबीर पणे उभे रहीलेत माझ्या मगे. त्यांचा तो खंबीर स्वभाव थोडा तरी माझ्यात यावा.

फ़क्त एक तक्रार आहे माझी, ते तब्येतीची कळजी अजीबात घेत नहीत. अगदी लहान मुलासारखं सांगावं लागतं त्यांना. मग आई मला सांगते 'तुच सांग त्यांना तुझं ऐकतात ते'. मला एकदम मुठभर मास चढल्यासारखं होतं मग.

खूप विस्कळीत लिहीलय मी, जसं मनात येत गेलं तसं. पण तरी संयुक्ताचे खूप खूप आभार लिहीण्याची संधी दिल्या बद्दल.

मी आणि माझे पप्पा सॉल्लिड टीम Happy
माझ्या लहानपणापासून आम्ही दोघं सॉल्लिड टीम आहोत....
He is the first Hero in my life!
२ वर्षांची होईपर्यंत कोकणात होतो, तेंव्हा त्यांच्याच हातून खायचे.. पुढे शाळेत जायला लागल्यावर पप्पा माझ्या केसांच्या वेण्या घालणार.. त्यांना खूप आवडतात माझे लांब केस.
पप्पांबरोबर स्कूटरवरून फिरणं म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. १ली ते ४थी शाळेत सोडायला यायचे तेंव्हा दोघं मिळून "सारे जहाँसे अच्छा..." म्हणायचो मोठ्मोठ्यानं... Happy
माझी ड्रेस खरेदी करताना मला पप्पाच हवे असायचे बरोबर, कारण आई आणि मी दोघींचं या बाबतीत फारसं जुळत नाही. आता लग्न झाल्यावरही माहेरी घेतल्या जाणार्या साड्या बर्याच वेळा पप्पांच्या पसंतीच्या असतात....
१२वी नंतर मेडिकल ला प्रवेश नाही मिळाला, म्हणून त्या कॉलेजसमोर माझ्यासोबत उभे राहिलेले, "काळजी करू नकोस मनू, सगळं छानच होइल" म्हणत डोळ्यातलं पाणी दूर सारणारे, मला हिम्मत देणारे पप्पा...
पुढे engineering करताना, एकदा परिक्षेच्या वेळी खूप आजारी होते, रोज हॉस्टेलवरून घरी फोन करून म्हणायचे, या वर्षी काही पास होत नाही... तेंव्हा शेवटच्या पेपरला मला न सांगता direct कॉलेजमध्ये घ्यायला आलेले पप्पा...
माझ्या नुसत्या आवाजावरून मला काय वाटतंय ते ओळखणारे पप्पा...
आजही लग्नानंतर जेंव्हा मी त्यांना म्हणते, "पप्पा तुमची आठवण येतेय आज", तेंव्हा
"ह्या(हा अगदि स्पेशल सातारी हेल).... काय मनू... आत्ता येऊ का तिकडे? तू म्हण नुसतं लगेच गाडीला पाय दिलाच बघ...." असं म्हणून हसवणारे माझे पप्पा.... खरंच मागच्या जन्मी काहितरी खूप पुण्य केलं असणार मी, म्हणूनच माझे पप्पा मला मिळाले..

कालच वाचलं होतं सगळं, प्रतिसाद दिला नव्हता... फारच छान लिहीलंय सगळ्यांनी.. भाग्यवान आहात इतके छान नाते आहे बाबांशी.. :).. फार सुरेख आठवणी आहेत, डोळे ओलावले..

छान लिहिलंय सगळ्यांनी. माझी अन बाबांची सत्त्ताधारी आणि विरोधी (अनुक्रमे नाही Wink ) अशा पार्टीज असल्याने इथे काय लिहावे? Proud

छान लिहिलय सगळ्यांनी..
प्राची, लिहून काढ ग.. मोकळं वाटेल!

इथे सगळ्यांनी इतकं मस्त लिहिलय आपापल्या बाबांबद्दल की ते वाचून मला पण थोडं लिहावसं वाटायला लागलय.
बाबांबरोबरच्या आठवणी अनंत आहेत. ते आम्हाला चंद्र-तारे वगैरे तोडून आणून द्यायला पण कमी करणार नाहीत ही आम्हा बहिणींची खात्रीच होती. ऐकायला तद्दन फिल्मी वाटेल पण ते खरच तसच विचारायचे, बेटा तुला चंद्र तारे आणून देउ का?
आमच्या नातेवाइकांत बाबा तसे टेरर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते पण मला आणि बहिणीला कायम बाबांपेक्षा आईचाच जास्त धाक वाटत आला आहे.
बाबा ही हट्ट करण्याची हक्काची जागा वाटते नेहेमीच.
लहानपणी ते मला किंवा बहिणीला किंवा क्वचित दोघींना घेवून दर रविवारी मंडईत न्यायचे स्कूटरवर बसवून. त्याचा मला मनस्वी कंटाळा यायचा मग येताना बाजीराव रोड वरच्या वाडेश्वरकडे इडली/उत्तप्पे आणायच्या बोलीवरच आम्ही जायला तयार व्हायचो. ते ताज्या भाज्यांच्या ढीगाने वाहवत जावून गरजेपेक्षा चौपट जास्ती भाजी खरेदी करायचे आणि आई प्रचंड वैतागायची. आणि मला आता आश्चर्य वाटतं की गेल्या भारतवारीत मला मंडईत कधी एकदा जाते असं झालं होतं. अनेक वर्षांनी परत एकदा बाबांबरोबर स्कूटरवर बसून मंडईत जावून आल्यावर एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं.

एकदा एका दिवाळीत बाबांनी मला आणि बहिणीला प्रत्येकी रु. ५० दिले आणि तुम्हाला दिवाळी गिफ्ट म्हणून काय हवं ते घ्या म्हणाले होते. तोपर्यंत असे प्रत्यक्ष हातात खर्चायला पैसे कधीच मिळालेले नव्हते त्यामुळे त्याचं फारच अप्रूप वाटलं होतं. अजूनही लख्ख आठवतं की बहिणीने लालभडक रंगाची लिपस्टिक घेतली आणि मी स्केचपेन्सचा सेट घेतला आणि उरलेले पैसे काय घ्यावं हे न सुचल्याने आईला देवून टाकले होते. स्केचपेन्स घेतले म्हणजे मी गुणी चित्रकार होते असा गैरसमज करून घेवू नका. मी भलतीच चित्रकला चॅलेन्ज्ड होते आणि आहे.
चित्रकलेच्या वहीत आणि शास्त्राच्या प्रयोगाच्या वहीत चित्रे आणि आकृत्या काढून घेण्यासाठी बाबांनाच साकडं घालायचे नेहेमी. तीच रड मराठीचे निबंध लिहिण्याची Happy
मी सातवीत असताना सहामाही परिक्षेत चित्रकलेत नापास झाले होते(!) आणि हे बाबांना सांगायचं जाम टेन्शन आलं होतं. खूप हिम्मत करून सांगितल्यावर बाबा खदखदून हसले होते असं आठवतं. त्यामुळे हातिच्या आपण उगीच घाबरलो असा रिलीफ मिळाला.

बाबांना चालायची फारच आवड आहे असं म्हणणं हे मोठच अंडरस्टेटमेंट ठरेल. रोज ऑफीस सुटल्यावर संध्याकाळी ते आणि त्यांचे एक मित्र पुणे विद्यापीठात चालायला जायचे. अनेक वर्ष दर रविवारी सकाळी सिंहगड चढणे हे पण चालूच होते. त्यांच्याबरोबर गप्पा रंगायच्या त्या देखील चालता चालताच. जवळ जवळ रोज रात्री जेवणं झाली की गच्चीवर अर्धा पाउण तास आमची सगळ्यांची शतपावली ठरलेलीच असायची. आत्ता हे लिहिता लिहिता जाणवतं आहे की वाढत्या वयाच्या मुलिंबरोबर त्यावेळच्या त्या निर्हेतुक गप्पांमधून त्यांनी किती छान नातं फुलवलं होतं.

बाबा कधीच मेहेनतीला मागे हटत नाहीत. आम्हा बहिणींच्या जन्मानंतर त्यांनी पर्सोनेल मॅनेजमेंट आणि लॉ च्या पदव्या पूर्णवेळ नोकरी आणि संसार सांभाळून मिळवल्या. ह्याला कारण त्यांचा जिद्दी स्वभाव. आता रिटायर झाल्यावर देखील ते निरनिराळ्या कॉलेज मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतात आणि त्यासाठी कसून अभ्यास पण करतात.

बाबांना स्वयंपाकाची तर सतत खुमखुमी येत असते. त्यांचे हातखंडा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे खिचडी, शीरा, वालाच्या डाळीची आमटी, चवळी आणि मुगाच्या उसळी, ऑमलेट, भुरजी. सध्या ते इथे माझ्या घरी आले आहेत तर रोज मला विचारतात की आज तुला काय करून घालू म्हणून.
सध्या मी रोज त्यांच्या हातचा आयता चहा एंजॉय करते. खाण्यापेक्षा खिलवण्याची त्यांना जास्ती आवड आहे.

बाबांचा स्वभाव पण एकदम आनंदी, उत्साही आहे. स्तुती करतील तेव्हा खरच तोंड फाटेस्तोवर करतात की एखाद्याला ती खोटीच वाटेल Happy पण ती खरोखरच मनापासून असते. तसच राग पण इतका पटकन येतो की तो सुद्धा टोकाचा आणि त्यांची मतं बदलणं फार कठिण. पण जितक्या पटकन ते रागवतात तितक्याच पटकन शांत पण होतात. नंतर त्यांना त्यांच्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला तर सॉरी म्हणून मोकळे होतात. त्यांच एक वाक्य मला नेहेमीच लक्षात राहील ते म्हणजे "क्षमा करणार्‍याचं यश चिरंतन असतं" अर्थात ते आचरणात आणायला मात्र मला अजून जमलेलं नाही.

आई गमतीने म्हणते की त्यांचा स्वैपाक पण त्यांच्या स्वभावासारखा असतो चवीला, भरपूर तिखट, भरपूर मसाला आणि भरपूर गोड Happy

बाबा आहेत सातार्‍यात वाढलेले आणि त्याचा त्यांना कोण अभिमान! त्याचं गमतीशीर उदाहरण म्हणजे, लहानपणी आम्ही टीव्हीवर छायागीत/चित्रहार पहात असलो आणि त्यात डोंगर दर्‍या, पर्वतराजी, हिरवळ, तलाव, नद्या अशी कोणतीही निसर्गरम्य दृष्य दिसली की ते म्हणायचे हा आमच्या सातार्‍याचा सीन आहे. आम्हाला सुरवातीला ते खरच वाटायचं पण शेवटी आम्ही मोठे झालोच Happy आणि मग आता आम्हीच त्यांना विचारतो की बाबा हा सातार्‍याचा सीन असेल ना? अजिंक्यतारा किंवा चार भिंती वगैरे?

बाबांना एक सवय होती आता चांगली की वाइट ते मला नाही माहित, पण ते ऑफीस मधून घरी आले की दिवसभराच्या घटना रसभरीत वर्णन करून ऐकवायचे. त्यात त्यांचे ऑफीस मध्ये उडालेले खटके, झालेले वाद हे सर्व असायचे. गोष्टी/प्रसंग सांगायची त्यांची हातोटी पण खूपच सही होती. ऐकणारा पूर्ण गुंग होणारच. त्यांचे आवेशपूर्ण संवाद ऐकून आई डोळे मोठ्ठे करून अचंबित होउन , "खरच? आणि मग? तुम्ही खरच असं म्हणालात?" असं भाबडेपणाने विचारायची त्यावर ते सांगायचे की अर्थात, पण ते सगळे फक्त ते मनातल्या मनात बोललो प्रत्यक्षात नाही Happy
जवळच्या लोकांमध्ये त्यांची ही स्टाइल माहिती होती त्यामुळे माझ्या कोकणातल्या आत्याच्या सासुबाई मजेने म्हणायच्या की ह्या विश्वासच्या शिंकेवरती पण कोणी विश्वास ठेवू नका.

वाचनाची मात्र त्यांना अजिबातच आवड नाही. पत्ते ते हातात धरत सुद्धा नाहीत आणि त्यांचे वर्षानुवर्षांचे जुने मित्र म्हणतात की विश्वास म्हणजे संगीतातला औरंगजेब! स्वतःमधल्या दुर्गुणांची त्यांना जाणीव आहे आणि जे दुर्गुण मला त्यांच्याकडून वारशाने मिळाले आहेत त्यांची देखील त्यांना नेहेमीच जाणीव होती. मला त्याबद्दल त्यांनी अनेकदा सावध केलं होतं आणि अजूनही करतात. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर अवगुणांबरोबर जे भले गुण माझ्या वाट्याला आले आहेत त्यांचं मोल मला आधिक आहे.

लहानपणीचा एक किस्सा आठवतोय.

देव्हार्‍यासमोर उभा राहुन देवांना नमस्कार करताना मी बाबांना विचारलेला प्रश्न..

बाबा, ह्या सर्व देवांमध्ये ह्या माणसाचा फोटो कशाला ठेवलाय?

बाबा म्हणाले,'कारण तो देवमाणुस आहे. तु जसा बाप्पाला नमस्कार करतोस ना तसा यांना पण नमस्कार करायचा दररोज.'
.
.
तो फोटो शिवछत्रपतिंचा होता. आजही तो फोटो आमच्या देव्हार्‍यात आहे. Happy

बाबांचा स्वभाव पण एकदम आनंदी, उत्साही आहे. स्तुती करतील तेव्हा खरच तोंड फाटेस्तोवर करतात <<<
अगदी अगदी. एकदम जॉलि माणूस तुझे बाबा म्हणजे. स्तुतीबाबतीत पण अगदी अगदी.

माझे वडील काय आहेत मला समजायला मला फार उशीर झाला. उशीर अश्या अर्थाने की मी तो पर्यंत वडील झालो होतो. माझ्या वडीलांच्यात एक आई दडलेली आहे हे लहानपणी कळत होत पण त्यातल वेगळेपण मात्र कधी स्पष्ट्पणे समजण्याची कुवत माझ्यात त्यावेळेला नव्हती.

वयाच्या ७ व्या वर्षी जेव्हा माझ टॉन्सिल्सच ऑपरेशन झाल तेव्हा माझे वडील माझ्या सोबत होते. आई फारशी गावाला गेली नाही पण मी लहान असताना जेव्हा केव्हा ती गावाला गेली तेव्हा वडील जवळ असण्याचा अनुभव अद्याप चांगला आठवतो.

शामची आई ऐकताना ७०व्या वर्षी ओक्साबोशी रडणारे माझे वडील. माझ्या मुलीला पहिल्या दिचशी प्ले ग्रुप मध्ये सोडताना माझ्या वडीलांबरोबर माझी पत्नी सुध्दा होती. प्ले ग्रुप च्या बाईंनी सांगीतलेली आठ्वण म्हणजे इतर सगळी मुले आई आई म्हणुन रडत होती तर तुमची मुलगी नाना नाना ( वडीलांचे घरातले नाव ) म्हणुन रडत होती.

किती छान लिहिलय सगळ्यांनी... सुंदर उपक्रम, खरच.
बाबा-
मुली वडिलांच्या खरच इतक्या जवळच्या काय म्हणून असतात?
माझ्यातलं संगीत, अध्यात्मं, असलीच तर काही दुसर्‍याला समजून घेण्याची कुवत... हे सगळं बाबांचं करणं. शास्त्रीय संगीताचं, कलेवरचं त्यांचं वेड... हो, वेडच. माझी अगदी लहानपणीची आठवण म्हणजे मी बाबांच्या खांद्यावर डुलक्या घेतेय आणि बाबा मला दोन अडीच मैलावरच्या नाचाच्या क्लासवरून घरी आणतायत... मी, वय वर्ष चार.
उपशास्त्रीय आणि लोकनृत्याचंही शिक्षण व्हाव म्हणून घरी एक मास्तर यायचे... छोटु मास्तर - बेनेइस्त्रायल होता असामी. लोकनॄत्याचे अनेक प्रकार बसवून घेतले... साधी म्युनिसिपालटीमधली नोकरी करून आई-बाबा... विशेष्त: बाबा... कसं जमवत असतिल सगळं?
"... का करायचं मी हे?" हा माझा प्रश्नं दात घासण्यापासून तुळशीला पाणी घालण्यापर्यंत कशालाही असायचा... जातिवंत बंडखोर होते... आणि त्या सगळ्या सगळ्याला अत्यंत शांत राहून ते मला समजतिल आणि पटतिल अशी उत्तरं द्यायचे.
नाच थांबला... आता पुढे काय? न शिकता मला तबला वाजवता येतोय, घरी होणार्‍या कार्यक्रमांत, साथीला येणार्‍याला वगैरे झक्कास कथ्थकचे तुकडेच्या तुकडे वाजवून दाखवू शकत होते, हे फक्तं बाबांच्या लक्षात आलं.. माझ्याही नाही! त्या काळात मुलींनी तबला शिकण्याच्या सगळेच विरोधात. आमचे काही नातेवाईक घरी येऊन तोंडावर स्पष्टं विरोधात... बाबा माझ्या बाजूने, माझ्या मागे. तबला उचलून माझ्याबरोबरीने क्लासलाही. मी डाव्या हातानं तबला वाजवत होते... साथीला येणार्‍या डावखुर्‍या तबला वादकाचं बघून, त्याला दाखवता दाखवता मीही डाव्याच हातानं वाजवायचे.
गुरुजींनी सांगितलं, डावखुरी नाहीस मग उजव्याच हातानं तबला वाजवायचा. झालं! साधा ना वाजवता येईना... त्या आडनिड्या वयात, इतर सगळेच मी तबला वाजवण्याच्या उघड विरोधात असताना... तबला सोडण्याच्या नामी संधींमधली ही पहिली... तासनतास माझ्यासमोर बसून मला समजावीत माझ्यातला तबला राखण्याचं संपूर्णं श्रेय बाबांना.
महिन्याच्या शेवटी माझ्यासोबत क्लासला आले तर गुरुजींना फी दिल्यावर पायाला हात लाऊन नमस्कार करायचे. का? तर... मी शिकवण्याचा मोबदला देतोय असं अगदी कणभरही स्वत:ला वाटू नये ह्याची धडपड. मला बाबा असे कळतच गेले, मग.
मला रामकृष्णं कळत नाहीत, पटत नाहीत?... मग विवेकानंद पटवले... वेळच लागला नाही त्याला. जे नश्वर नाही ते ईश्वर... मग संगीत?... तुला त्यात नश्वरता सापडली, चिरंतन शांतता सापडली तर.. येस्स! संगीत तुझा इश्वर!
देवळाच्या गाभार्‍याचं दार छोटं का?... तांब्या किंचित वाकडा केला आणि त्यातली "हवा" जाऊ दिली तरच त्यात पाण्याला जागा होऊ शकते... रोज रात्री झोपताना आज काय बरोबर केलं आणि काय चूक ह्याची स्वत:शी जमा-खर्चं मांडायला हवा... जगाला फसवू... स्वत:ला?
अशा चर्चा करता करता खूप काही समजत राहिलं... ह्या वर्षी दिवाळीचे कपडे की सवाईची वारी हा प्रश्नं बाबांचा एकट्याचा राहिला नाही... एकमेकांची उत्तरं माहीत असण्याइतके प्रश्नंच सोप्पे झाले.

आपले बाबा वेगळे आहेत हे कळत राहिलं... पण किती वेगळे?.... मध्यंतरी बाबा घरून बाहेर पडले आणि नाक्यावरच एका मोटरसायकलने उडवलं. तो ही घसरून आडवा झालाच... तरी आला धाव्वत बाबांकडे. बाबांचा पाय गुढग्यातून मोडलाच होता. आरडा-ओरडा करीत माणसं जमा व्हायला लागली. बाबांना आयुष्यभर ओळखणार्‍या दुकानदार, शेजारी वगैरेंनी त्या मोटरसायकलवाल्याला मारलाच असता... जमावानं असं काही करण्याआधी बाबाच त्याला म्हणाले... पळ आणि स्वत:चा जीव वाचव.. मारतिल तुला जीवे...
नंतर तो हॉस्पिटलात एकटा येऊन ढसाढसा रडून गेला...
बाबा आता एका पायानं अधू आहेत, लंगडत चालतात. पण आपण केलं ते बरोबरच ह्यावर ठाम आहेत... दोघं अधू झाली असती... एकच झाला!

माझी लहानपणीची अजून एक आठवण आहे... मी आणि बाबा पार्ल्याला एका कार्यक्रमाला निघालो आहोत. संध्याकाळची वेळ आहे. जसराजजी कोणता राग गातील ह्यावर चर्चा चालू आहे. गोरख कल्याण ह्यावर दोघांचंही एकमत. बाबांचा डावा हात कायम खिशात... त्या हातात माझा उजवा हात घालून मी दुडकी, दिडकी करीत चालतेय. डोक्यात कुठचातरी ताल चालू आहे, तुकडे चालू आहेत. त्याची सम उजव्याच पायावर यायला हवी म्हणून मधेच छोटी उडी, किंवा लोंबकाळून अर्धं पाऊल मागे अशी मी चाललीये. बाबा तस्से माझी लळत-लोंबत वरात बरोबर घेऊन चाललेच आहेत. कार्यक्रमात जसराजजी गोरख कल्याण सुरुवात करतात आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक टाळी सण्णदिशी वाजते... मी बाबांच्या हातावर दिलेली Happy

परवा भारतात गेले आणि एका संध्याकाळी दोघे असेच कार्यक्रमालाच निघालो. तस्सेच... बाबांच्या डाव्या खिशातल्या हातात उजवा हात घालून मी... रशिद खान आज काय गाणार ह्यावर बेट्स लावीत. बाबांच्या आताच्या थोड्या अधू, मंद चालीला माझ्या सम चालीची साथ अगदी शोभत नाही...
आता त्यांच्या उजव्या पायाची सम गाठायला मी दुडकी, दिडकीची छोटी उडी मारते... कधीकधी बाबांचा तोलही जातो... पण, बाबा हसतात... ताईबाई, मोठ्या झालात... उड्या कसल्या मारतेस, म्हणतात...

मला? मला फक्तं सम गाठायचीये... कितीही प्रयत्नं केला तरी अख्खेच्या अख्खे बाबा गवसत नाहीत... प्रत्यक्षात छोट्या दिसणार्‍या त्यांच्या प्रचंड सावलीची ऊब मात्रं कायम सोबत आहे... अगदी माझ्या गतीनं, माझ्या लयीत मला सम गाठता येईल अश्शी.

>>>>>>कितीही प्रयत्नं केला तरी अख्खेच्या अख्खे बाबा गवसत नाहीत.<<<<<<
हे वाचलं आणि आता पुढचे शब्द दिसत नाहीत.....

खूप छान लिहीलं आहे सगळ्यांनी.
साक्षी, तुमच्या पोस्टमध्ये मला माझ्या बाबांचं प्रतिबिंब दिसत होतं. Happy

>>सत्त्ताधारी आणि विरोधी
सॉल्लिड वादविवाद टीम अश्या बेताने लिहावे. Wink

मस्तच बाबालोक जमले आहेत बाकी इथे. शूम्पीच्या बाबांची गोष्ट वाचायला मजा आली. (मी सातार्‍याची ना ;-))

बाबा झाल्यावरचे अनुभव लिहिणारे नाही का कुणी?

Pages