कैरीचे लोणचे घालुन झाले.बाठीजवळ मुद्दाम सोडलेल्या कैरीचे झिलप्या काढुन गोड लोंणचे केले.आता बाठींना बुडतील इतके पाणी घालुन कूकर मधे २ शिट्या देवुन त्याचा उरला-सुरला गर काढुन त्याचा हा गोडांबा केला आहे.
तर असा हा कैरीचा पाणीमिश्रीत पातळ गर एक काचेचा ग्लास भरुन घेतला आहे.
२ चमचे मोहोरीची डाळ.
१/२ चमचा मेथीदाणा.
१/२ चमचा लाल तिखट.
१/२ चमचा मीठ.
पाव चमचा हळद.
पाव चमचा हिंग.
१ चमचा तेल.
पाव चमचा प्रत्येकी मोहोरी व जिरे.
अर्धी वाटी बारीक केलेला गूळ.
लागले तर थोडे पाणी व गराच्या आंबटपणानुसार गूळ.
तेल गरम करुन त्यात मोहोरी-जिरे -मेथीदाणा-हिंग घालुन फोडणी केली कि त्यात हळद व कैरीचा पातळ गर घालायचा.त्यात तिखट,मीठ,गुळ घालुन मिश्रण ढवळायचे.मध्यम गॅस आचेवर एक उकळी आली कि गोडांबा तयार.
डोसा,पोळी व भाताबरोबर छान लागतो.
मोहोरी डाळ व मेथीदाणा मुरल्यावर ३ ते ४ तासानंतर खुप मस्त चव येते.
ही पद्धत थोडीफार" कोयांडा" सारखीच आहे.
म.प्र.तल्या निमाड भागात "कचुमर"नांवाने हा गोडांबा नावाजला जातो.तिथे अजुन एक नवा पदार्थ पाहिला .म्हणजे खाल्ल्यावर हे काय असावे ते ओळखता आले नाही.तो पदार्थ म्हणजे लोणच्याच्या कैर्या "सरोत्याने"कापल्यावर कैरीतल्या ज्या बीया--बाठी मधली बी- उरतात .त्या धुवुन भरपुर बुडतील इतके पाणी घालुन कूकर मधे शिजवुन घ्यायच्या.चाळणीवर गाळुन त्याचे तुरट पाणी काढुन टाकायचें नंतर त्या लागेल तसे पाणी घालुन मिक्सर मधे पातळसर वाटुन घ्यायच्या.हे वाटण गॅसवर पळी पापडी सारखे शिजवायचे .शिजले कि चवीप्रमाणे मीठ व जिरे घालायचे व प्लास्टीक कागदावर साबु.पापड्यांसारख्या लहान्-लहान पापड्या घालायच्या.४-५ तासांनी त्या उलटवुन ठेवायच्या नंतर २ दिवस कडक उन्हात वाळवायच्या.कि वर्षभरासाठी टिकाऊ पापड्या तयार.या पापड्या तेलात तळल्या कि खुप फुलतात्,चवीला कुरकुरीत व छान लागतात.तूरट्पणा तर जाणवत नाही.रंग थोडासा ज्वारीच्या पापड्यांसारखा येतो.पण पातळ असतात त्यामुळे जिभेवर ठेवली कि विरघळते.
कैरीच्या कुठल्याही रेसिपीज
कैरीच्या कुठल्याही रेसिपीज वाचताना तोंडाला काय पाणी सुटते... कचमुरच्या पुढचे वाचायचे मी सोडुनच दिले...