कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या

Submitted by अवल on 3 June, 2012 - 11:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कारली २
कांदे २
मिरच्या ६
तीळ २ चमचे
कोथिंबीर
लसूण १० पाकळ्या
तेल २ चमचे
मोहरी १/२ चमचा
हिंग २ चिमुट
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
साखर आवडत असल्यास १ चमचा
1338734427215.jpg

क्रमवार पाककृती: 

कारल्याचे उभे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावी. त्याला थोडे मीठ लावून त्यावर पाण्याचा हबका मारून बाजूला ठेवावी.
कांदे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावेत.
लसूण उभा पांतळ पांतळ चिरून घ्यावा.
मिरच्या उभ्या पांतळ पांतळ चिरून घ्याव्यात. ( या कृतीला कृपया "पांतळ पांतळ कारली " म्हणू नये Wink या चिरण्यावर या भाजीचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो, त्यामुळे तेव्हढे कष्ट हवेतच. )
आता कारली स्वच्छ धुवून घ्यावीत. घट्ट पिळून घ्यावीत. ( हे घट्ट पिळणे महत्वाचे. मेथीही अशी घट्ट पिळून केली की वेगळी चव येते. तज्ज्ञांनी यामागचे शास्त्रीय कारण सांगावे Happy )
पॅनमध्ये तेल तापत ठेवावे. मोहरी टाकावी. ती तडतडली की लसूण टाकावा. तो लालसर झाला की मिरच्या टाकाव्यात. हिंग, हळद टाकावी. तीळ टाकावेत.लगेच कारली टाकावी.
कारली थोडी परतली की कांदा टाकावा. चवीपुरते मीठ टाकून मंद गॅसवर परतत ठेवावे. (झाकण ठेऊ नये - भाजीला पाणी सुटेल. )
किमान २० - ३० मिनिटे तरी मंद आचे वरती ही कारली मधून मधून परतत ठेवावी.
खुरकुरीत होत आली की आवडत असल्यास साखर घालावी. ( कांदा भरपूर असल्याने त्याची गोडी बहुदा पुरेशी होते. परंतु ज्यांना आवडत असेल त्यांनी साखर घालावी. )साखर घातल्यावर, ती विरघळली की लगेच गॅस बंद करावा, नाही तर भाजीला काळसर रंग येतो.
तयार आहेत कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या Happy
1338734452593.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल, त्या प्रमाणे :)
अधिक टिपा: 

ही भाजी आंबटवरण भाताबरोबर फार फर्मास लागते.
कोरडी असल्याने २-३ दिवसही टिकते. त्यामुळे प्रवासात नक्की करते मी.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक, काही माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारल्याच्या काचर्‍यांमध्ये शेवटी लिंबू, ओलं खोबरं आणि थोडासा चाट मसाला टाकला की पण मस्त चव येते.
मी कांदा घालत नाही यात. प्रयोग करून बघा.

अवल.........या त्या ..........
कोल्हापूरच्या कुलकर्णी काकांच्या कमळाकाकूनी कालच कौतुकानी केलेल्या "कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या" तर नव्हेत?
जोक अपार्ट (सध्या चालू आहे ना असं लिखाण!) पण मस्त पदार्थ!

कांदा नंतर >>>लसणावर कारली टाकली की त्याचा स्वाद कारल्याला छान लागतो. हेच मी कोळंबीलाही करते.
मानुषी, चिनुक्स Happy
निंबुडा, हो का गं ? ह्म्म्म तसं तर काय कोणतीही पाककृती टाकली ना तरी जागू नाहीतर दिनेशदांनी टाकलेली असेलच, Happy

ह्म्म्म तसं तर काय कोणतीही पाककृती टाकली ना तरी जागू नाहीतर दिनेशदांनी टाकलेली असेलच, >>>>> अवल काय हा विनय! आपणही काही कमी नाही आहात!
तरी सहमतच!

काल रात्री खाल्ली. अ फा ट सुंदर लागली.
पूर्ण एक तास लागतोच, पण खाताना चवीने तृप्त झालेली जीभ त्याची पुरेपुर पावती देते. Happy
(मी फक्त एक पूर्ण (आख्खा?) लसूण टाकला होता - तोच काय फरक.)
अवल, आजपासून आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी कारलं खाणारच, असा सर्वानुमते ठराव पास झालाय... सगळं श्रेय तुलाच!

धारा Happy मलाही जरा जास्त लसूण आवडतो.चित्रात बघ बराच घेतलाय. पण अनेकांना लसणाची फारशी सवय नसते, व्हेज ासतील तर. म्हणून जरा हात राखून लिहिल Happy
जयू, कारले जरा पिकले असेल तर आंबट लागू शकते. रंग पिवळसर होता का कारल्याचा?

नाहि ओ अवल,
चांगले ताजे, हिरवेगार होते. पअन चव छान लागली, कांद्याचा गोड्पणा आणि लिंबुपिळल्यासारखा आंबट्पणा. छान. Happy