भयानक ( संपूर्ण )

Submitted by यःकश्चित on 31 May, 2012 - 00:10

भयानक
____________________________________________________________

BHayanak.jpg
____________________________________________________________

1

पौर्णिमेची रात्र होती ती....कुठल्याश्या एका गर्द वनराईच्या मध्यभागी ते सारे जमले होते...चंद्र चांदण्यांसमवेत वनात शुभ्र प्रकाश सोडत होता. मंद वारा वाहात होता. त्या जागी मध्यभागी एक यज्ञकुंड धगधगत होते. यज्ञाच्या चारी बाजूंना चार व्यक्ती बसल्या होत्या. त्यांनी भगवी कफनी परिधान केली होती आणि कमंडलूतील तुपाची पळीने आहुती देत होते. त्यांच्या शेजारी आठजण लाल कफनी घालून मंत्रोच्चार करत होते. सलग न् थांबता ते कालिका देवी आणि चामुंडा देवीचा नामोच्चार करत होते. यज्ञकुंडापासून साधारण वीस पाउले दूर एक मचाण बांधले होते. त्या मचाणावर काळी वस्त्रे परिधान केलेला एक तगडा माणूस डोळे मिटून शांतपणे ध्यान लाऊन बसला होता. त्या मचाणाभोवती लिंबू आणि मिरच्यांनी वर्तुळ काढले होते. त्या वर्तुळाच्या भोवतीने दोन माणसे गोल फिरत त्या बसलेल्या व्यक्तीवर बुक्का आणि कुंकवाचे क्रमाक्रमाने प्रोक्षण करीत होती. सारं काही यथासांग पार पडत होतं.

पण अचानक वारा जोराने वाहू लागला. निरभ्र आकाश बघता बघता काळ्या ढगांनी व्यापले. शुभ्र चंद्रबिंब हा हा म्हणता नाहीसे झाले. पावसाचे मोठाले टपोरे थेंब हळूहळू वेग घेत होते. वादळकम पाउस पाच मिनीटभर चालू होता. पावसाने यज्ञ थंड होत होता. मंत्रोच्चार करणारे आठ जण पावसाच्या व्यत्ययाने मंत्रोच्चार चुकत होते. यज्ञाभोवतीचे चार जण यज्ञ पुन्हा प्रज्वलित करण्याचा असफल प्रयत्न करत होते. मचाणावरची व्यक्ती मात्र शांतपणे ध्यान लाऊन बसली होती.

पाच मिनीटानंतर वादळ थांबले. एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती. सगळी परिस्थिती क्षणात पालटली होती. सारेजण हवालदिल होऊन एकमेकांकडे पाहत होते. मचाणावर बसलेली व्यक्ती मात्र अजुनी डोळे मिटूनच बसली होती. सगळे त्या व्यक्तीकडे टक लावून पाहत होते. हळूहळू त्या व्यक्तीने डोळे उघडले. त्याने सभोवार नजर फिरवली. तो खाली उतरला, लिंबू-मिरच्याच्या रिंगणाबाहेर आला. त्याने पुनश्च सभोवार नजर फिरवली आणि दोन्ही हात वर केले. तो हात वर्तुळाकार फिरवू लागला. त्याने हातांची गती वाढवली. अचानक त्याच्या हातातून कुंकवाचा सडा पडू लागला. एकदम त्याने हात फिरवायचे थांबवले. आजूबाजूची सारी जमीन लालबुंद झाली होती. नुसते दोन्ही हात आकाशाकडे करून तो काही मंत्र पुटपुटू लागला. काही क्षणातच परत जोराचा वारा वाहू लागला. ढगांचा गडगडात झाला आणि आकाशवाणी झाली-

"तू केलेल्या चुकांची शिक्षा तू लवकरच भोगशील. या पुढची ५० वर्षे तुझ्या सर्व शक्ती काढून घेण्यात येत आहेत. हा हा हा ..."

आकाशवाणीतून एक प्रकारचे असुरी हास्य बाहेर पडत होते. हात वर केलेली ती व्यक्ती टक लावून आकाशाकडे पाहत होती. ते सारे शिष्यगण त्या व्यक्तीकडे भिरभिरत्या नजरेने पाहत होते. सारेच्या सारे निराश झाले होते. मगाशी धगधगणारे यज्ञकुंड आता रागावलेल्या मुलासारखे शांत बसले होते. यज्ञाचे साहित्य इतस्ततः पसरले होते. आकाशाकडे पाहणाऱ्या त्या व्यक्तीची नजर अजून शून्यातच होती. त्या आकाशातील गुढ हास्याचा ध्वनी आसमंतात पुन्हा पुन्हा कितीतरी वेळ आदळत होता.

**********************************************************************************************************

स्थळ : संजीवन सभागृह
"नमस्कार, माननीय अध्यक्ष, माननीय संचालक आणि माझ्या सर्व रसिक श्रोतेहो, आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे, तो फक्त तुमच्यामुळेच. आज माझे चौदावे पुस्तक "भयानक" याच्या प्रकाशन प्रसंगी आपण सारे जमलो आहोत. याचे सर्व श्रेय तुमच्यासारख्या असंख्य वाचक बांधवाना जाते. आपण सर्वांनी माझ्या या आधीच्या सर्व पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला तसाच या आणि यापुढील सर्व कलाकृतींना असाच प्रतिसाद मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना...........................................मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र ."

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट...

त्याच्या चौदाव्या पुस्तकाला आजही तेवढाच प्रेक्षकवर्ग होता जेवढा याआधी असायचा. थोड्या वेळाने पुस्तकाचे परिच्छेद वाचन मग आभार प्रदर्शन झाले. सकाळी ९ वाजता सूरु झालेला हा कार्यक्रम ११ वाजता संपला. तो त्याच्या गाडीतून घरी आला. आल्यावर त्याने तलुला (त्याची पत्नी तारिका - तो तिला लाडाने तलु असं म्हणयचा) चहा द्यायला सांगितला आणि सोफ्यावर आरामात पहुडला.

श्री. विश्वास जेऊरकर.... तसा वयाने तरुणच. साधारणतः सत्तावीस वर्षाचा असेल. त्याच लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने लेखन क्षेत्रात पाऊल टाकले होते. गेली बारा वर्षे तो हे लेखनकार्य करत होता. व्यवसायाने तो बँकेत कामाला होता पण त्याला साहित्यात खूप रुची होती. वर्षातून एक किंवा दोन पुस्तके पण उच्च दर्जाची, त्यामुळेच तो अल्पावधीत लोकप्रिय झाला होता.

**********************************************************************************************************

आज तो अतिशय खुश होता कारण आजवर त्याने फक्त ललित लेखन आणि वास्तववादी कादंबऱ्या लिहिल्या होत्या. पण 'भयानक' ही त्याची पहिली रहस्यमय कथा होती. त्याच्या खुश असण्याचं मुख्य कारण म्हणजे आठवड्यात 'भयानक'च्या ५०० प्रती खपल्या होत्या. हा लेखन क्षेत्रातील एक इतिहास होता. या आधी कोणत्याही पुस्तकाची इतकी विक्रमी विक्री झाली नव्हती. आणि त्याच्या पहिल्याच रहस्यमय कथेला एवढा प्रतिसाद..! तो आज खूप खुश झाला होता.( पण त्याला हे माहित नव्हतं की हीच 'भयानक' त्याच्या आयुष्यात भयानक गोष्टी घडवून आणणार आहे !!!) ह्याच खुशीत त्याने तलुला सांगितले की आज संध्याकाळचा स्वयंपाक करू नको, आपण आज हॉटेलला जाऊयात.

संध्याकाळी हॉटेलमध्ये...ते दोघे पाच नंबरच्या टेबलवर बसले होते. त्यांनी वेटरला दोन मसाला मंचुरियन आणि दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. दोघेही गप्पा मारत मंचुरियनची मजा लुटत होते. इतक्यात -
strong>"ओ विश्वासराव ...... "
दोघांनीही त्या आवाजाच्या दिशेने तोंड वळवले. कोपऱ्यातल्या सतरा नंबरच्या टेबलावरचा इसम, साधारणतः तीसेक वर्षाचा असेल, त्यांच्याकडे धावत येत होता. तो जवळ आला.
"तुम्ही विश्वासराव जेऊरकर ना..?"
"हम्म."
"ती 'भयानक' तुम्ही लिहिली आहे ना..?"
"होय."
"मला तुमच्याशी जरा बोलायचय."
"हम्म बोला."
"इथे नको. आपण मला एकटे भेटू शकाल का..?"
"तुम्हाला उद्या दुपारी वेळ आहे का...?"
"हो"
"मग उद्या तुम्ही माझ्या घरी या. आपण सविस्तर बोलू. हा माझा पत्ता."
असे म्हणून विश्वासने त्याला एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला. खाऊन झाल्यावर थोड्यावेळाने ते दोघेही घरी आले. रात्रीचे ९ वाजले होते. तलुला जाम कंटाळा आल्यामुळे ती आल्या आल्या लगेचच झोपायला जाऊ लागली. तिने विश्वासला विचारले पण तो म्हणाला की मला जरा काम आहे, काम झालं की येतो झोपायला. ती 'बरं' म्हणून बेडरूममध्ये निघून गेली. विश्वास बाहेरच्या खोलीच्या खिडकीत विचार करत बसला होता.

'कोण होता तो ? त्याला आजवर कधीच भेटलो नाही. त्याला काय बरे सांगायचं असेल..? त्याला माझी कादंबरी आवडली नाही का किंवा त्यातील काही भाग त्याला खटकला का ? मग त्याने तिथे बोलायला नकार का दिला ? तो सगळ्यांसमोर काही बोलला नाही याचाच अर्थ तो जे काही सांगणार आहे ते काहीतरी वेगळं आणि नक्कीच गोपनीय आहे. काहीच कळत नाहीये.' -

स्सस्ससससससस्स्सस

त्याची विचारशृंखला तुटली. खिडकीच्या खाली असलेल्या झुडुपातून कसलासा आवाज झाला. कसला आवाज झाला हे पाहायला तो खिडकीत वाकणार इतक्यात मागे जोराचा वारा त्याच्या पाठीला स्पर्शून गेला. त्या वाऱ्याच्या ओघाने तो मागे वळला आणि खाडकन खिडकीचे तावदान खाली पडले आणि खिडकी बंद झाली. तो अजून एक सेकंद जरी खिडकीत राहिला असता तर त्याचे मुंडके धडावेगळे झाले असते.

रात्रीच्या त्या थंड वातावरणात त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. हे सारं इतक्या चटचट घडलं की विश्वासला कसला विचार करायची सवडसुद्धा मिळाली नाही. त्याची विचारशृंखला परत सुरु झाली पण यावेळी विषय वेगळा होता.

'कसला आवाज होता तो ? काय होतं तिथे खाली ? बरं झालं मी खिडकीतून खाली वाकलो नाही नाहीतर जीवाला मुकलो असतो. ते झुडुपातून काय सळसळत गेलं ? आणि मागे बाकीच्या सर्व खिडक्या बंद असताना एवढा जोराचा वारा कुठून आला ? पण तो वारा आला म्हणून वाचलो. हा सगळं काय प्रकार होता ? असं या आधी कधी झालं नाही मग आजच हे काय झालं ? आता बास. अजून थोडा विचार केला तर डोक फुटेल माझं. '

त्याने विचार करणं थांबवलं आणि बेडरूमकडे जाऊ लागला. जातानादेखील त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते. संध्याकाळी भेटलेला तो माणूस आणि ही अघटित घटना या दोन्ही विचारांनी त्याच्या डोक्यात गोंधळ घातला होता. त्याच्या मनातून काही हे सारे विचार जात नव्हते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सारं अंग कॉटवर झोकून दिले.

**********************************************************************************************************

"या बसा. नाव काय म्हणालात तुमचं ?"
"मी मोहन दामले. मी डेल्टा महाविद्यालयात प्रोफेसर आहे. मी तिथे विद्यार्थ्यांना आर्किऑलोजी शिकवतो. आता तिकडूनच येतोय."
"हम्म. तुम्ही चहा घेता कि कॉफी ?"
"कॉफी."
"ठीकाय. तलु दोन कॉफी आण." विश्वासने तलुला सांगितले आणि तो मोहनकडे वळून म्हणाला, " तर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचय असं काल तुम्ही म्हणालात !"
"होय. त्यासाठीच मी आलोय. हे 'भयानक'चे कथानक तुम्हाला कसं काय सुचलं ?"
"त्याच काय झालं, मी एकदा असाच बसलो होतो. तर मनात विचार आला की ललित कथा आणि गुन्हेगारी विषयक कथा नेहमीच लिहितो. यावेळी जरा नवीन प्रयोग करून पाहावा. मग मी असाच विचार करत गेलो आणि एकामागून एक घटना सुचत गेल्या तश्या मी त्या उतरवल्या आणि काय झाली की 'भयानक'.", विश्वास हे सगळं एकदम खुशीत येऊन सांगत होता, "का हो मोहनराव, तुम्ही हे का विचारताय मला ?"
"त्याचं कसंय ना, की आपल्या सभोवताली वा आपल्याशी संबंधित काही गोष्टी अचानक आणि इतक्या अचंबित करणाऱ्या घडतात की त्याची कारणे जर आपण शोधू लागलो ना तर आपण निसर्गाच्या अशा एका चक्रात अडकतो आणि मग तिथून बाहेर पडणं फार मुश्कील होऊन जातं. अशा घटनांना अडाणी लोक योगायोग किंवा प्राक्तन असं गोंडस नाव देतात पण ते तसं नसतं." -
"एक मिनिट मोहनराव, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ?"
"तुम्हाला सुचलेली भयानक ही केवळ कल्पनाशक्ती नाही. या भयानकचा तुमच्याशी काहीतरी संबंध आहे. भयानकचं कथानक हे नुसतं एक कथानक नसून यामागे एक मोठा इतिहास आणि त्या इतिहासामागे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. "
"याचा माझ्याशी संबध आहे म्हणजे ?"
"तुमच्याशी संबंध म्हणजे भयानक हि एक कथा नसून हि एक घडलेली घटना आहे आणि त्या घटनेचा आणि तुमचा खूप मोठा संबंध आहे."
"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं कि हि कथा मी त्या घटनेवरून चोरली आहे. !", विश्वास आता थोडा रागाला येऊ लागला होता. दोघेही एकमेकांवर वरचढ बोलत होते. दोघांचाही आवाज वाढत होता.
"नाही. मला असं नाही म्हणायचय"
"मग तुम्हाला काय म्हणायचंय ?"
"भयानक ही एक वास्तवात घडलेली घटना आहे."
"याला पुरावा आहे काय ?"
"होय."
" माझे चुलत आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे काका. तुमच्या कथेतील महत्वाच्या पात्रांमधील भैरोनाना हे माझे आजोबा आहेत."

एकदम दोघेही शांत झाले. दोन मिनीटभर दोघेही शांत होते. तलु कॉफी घेऊन आली. तिने कॉफीचा ट्रे त्यांच्यासमोर ठेवला आणि आत निघून गेली. दोघेही कॉफी प्यायले. विश्वासने मोहनरावांकडे बघितले. मोहनराव शांत बसले होते पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता ठळकपणे दिसत होती.

"तुमचे आजोबा कुठे असतात सध्या ?"
"ते इथे जवळच ५० किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे,तिथे राहतात. ते सतत कुठल्या तरी चिंतेत असतात. त्यांना काही विचारलं तर नीट उत्तरं पण देत नाहीत. ते आधी रोजनिशी लिहायचे. त्यातून मी त्यांच्याबद्दल काही माहिती काढली आहे. ते भटजी होते. गावात कोणतीही पूजा-अर्चा असू देत, एकाच नाव आठवायचं नानाभट. गावातले सगळे लोक त्यांना नानाभट असं म्हणायचे. त्याचं पूर्ण नाव भानुदास भगवान दामले. आमच्या घरात सगळे त्यांना भैरोनानाच म्हणायचे. आमच्या गावात एक पांडुरंगाच देऊळ आहे. रोज सकाळी ते तिथे जायचे, पूजा करायचे, देवळात येणाऱ्या भाविकांना प्रसाद द्यायचे. एखादी पूजा वगैरे असेल तर तिथे जायचे आणि मग उरलेला दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने घालवायचे. कधी भजन, कधी कीर्तन, कधी कधी एखाद्या गरजूला मदत करायचे तर कधी लोकांचे प्रॉब्लेमसुद्धा सोडवायचे. त्यांना गावात सारेजण देवमाणूस म्हणून ओळखायचे. दारात आलेला अतिथी त्यांनी कधी रिकाम्या हाती परतवला नाही. पण गेल्या पाच वर्षापासून ते खूप विचित्र वागू लागले आहेत. कुणाशी बोलत नाहीत. कुणी बोलायला आलं तर एकदम त्याच्या अंगावरच खेकसतात आणि त्याला काहीही बोलतात. खाणे तर जवळपास सोडल्यातच जमा आहे. ३-४ दिवसांतून एखादी भाकरी खातात ते हि इच्छा असेल तर नाहीतर ते पण राहिलंच. कधी कधी जोरजोरात ओरडू लागतात 'तो जिंकेल त्याला अडवा थांबवा नाहीतर विनाश अटळ आहे.' सगळच समजेनासं झालं. मग परवा तुमची भयानक वाचली आणि त्यातले काही संदर्भ व भैरोनानांच्या रोजनिशीतील काही घटना अगदी तंतोतंत जुळल्या. म्हणून तुमच्याकडे भैरोनानाच्या इतिहासाबद्दल काही माहिती मिळेल आणि त्यांचा आजार बरा करायला तुमची थोडी मदत घ्यावी म्हणून आलो. पण तुम्ही मला निराश केलंत."

"हे पहा प्रोफेसर, माझं अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. खरंतर मला हे सगळं काय चाललंय हेच कळत नाहीये. तरी मी तुमच्या प्रॉब्लेम्सना माझ्या परीने नक्की मदत करेन."
"तुमचा अमूल्य वेळ तुम्ही माझ्यासाठी देताय. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही."
"ठीक आहे. तुम्ही आता एक काम करा. तुमच्या आजोबांची रोजनिशी मला आणून द्या. मी ती वाचेन. मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू."
"धन्यवाद विश्वासराव. येतो मी. उद्या मी तुम्हाला ती वही आणून देईन." , असे म्हणून प्रो. मोहनराव निघून गेले.

विश्वास आधीच कालच्या घटनेमुळे अस्वस्थ होता आणि त्यात प्रोफेसरांनी येऊन सांगितलेल्या गोष्टींमुळे तो अजूनच अस्वस्थ झाला होता.

' हे सारं खरं आहे का ? माझा कसं काय त्यांच्या आजोबांशी संबध येईल. नाही हे खरे नाहीच मुळी. पण मग भयानकची कथा प्रत्यक्षात कशी आली ? काय होतं हे सगळं ? माझा खरच काही संबंध असेल ? का हा फक्त एक योगायोग आहे ? काल घडलेल्या घटनेचा याच्याशी काही संबंध आहे का ? कदाचित ती पुढे येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना तर नाही ना ? हे माझ्याच बाबतीत का घडतय ? ......................... '

विश्वास पुन्हा एकदा विचारांच्या गर्दीत हरवून गेला.

2

त्याने परत तयारी सुरु केली होती. मागल्या वेळी काही कारणांमुळे यज्ञात व्यत्यय आल्याने यज्ञ पूर्ण होऊ शकला नव्हता. पण यावेळी त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. यावेळी यज्ञात कसलाही व्यत्यय येणार नाही यासाठी त्याने पूर्ण खबरदारी घ्यायची असं ठरवलं होतं. यज्ञाच्या यशस्वीतेकडे तो पूर्ण लक्ष देत होता.

"बुवा, यावेळी आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाहीये. कुठलीही किरकोळ चूकसुद्धा आपल्या हातून झाली नाही पाहिजे. मागच्या वेळी पावसाच्या व्यत्ययाने आपला यज्ञ पूर्ण झाला नाही. मला असं वाटतं की तो पाऊस नक्कीच नैसर्गिक नव्हता. आपला यज्ञ असफल करण्यासाठी त्याने हा खेळ खेळला आणि त्यात तो यशस्वी झाला. आपल्याला यावेळी त्याला यशस्वी होऊ द्यायचे नाहीये."

"तू म्हणतोस त्यात काडीमात्रही शंका नाही. कारण यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला असताना त्याने चाल चालली. यावेळी जर त्याला हे करण्यापासून रोखायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला तो कोण आहे हे शोधावे लागेल आणि मग - "

"...त्याची काळजी तुम्ही करू नका. ते काम मी आधीच केलंय. ", बुवाजींचे वाक्य तोडत तो म्हणाला, "दोन महिन्यांपूर्वीच मी माझ्या एका शक्तीमार्फत त्याला अर्धा कमजोर बनवलाय. आता फक्त आपल्याला यज्ञाच्या सुरक्षेसाठी काही विधी करावे लागतील. "

"वा..!! तू फारच छान केलंस. पण तू त्याला एवढा कमी लेखू नकोस. तू जसा यज्ञाच्या पूर्तीसाठी एवढे कष्ट व खबरदारी घेतोयेस मग त्याने तुझा यज्ञ तोडण्यासाठी काही उपाययोजना कशावरून केली नसेल !!! "

"बुवा, तुम्ही म्हणता यात मला तथ्य वाटतंय. आपल्याला खूप सावध राहायला हवं. मग आता यापुढे आपल्याला काय करावे लागेल ? "

"सर्वात आधी आपल्याला यज्ञासाठी योग्य आणि अनुकूल जागा शोधावी लागेल आणि ती जागा अश्या ठिकाणी हवी की तिथे तो सहजासहजी पोहचू शकणार नाही. "

"अशी एक जागा माझ्या बघण्यात आहे. गावाबाहेरच्या जंगलात एक योग्य जागा आहे. त्या जंगलात खूप आत एक गुहा आहे. याच गुहेत आपण आपला यज्ञ करूयात. ते जंगल खूप घनदाट आहेच आणि तिथे हिंस्र श्वापदांचा वावरदेखील आहे, त्यामुळे तिकडे कुणी गावकरी फिरकतसुद्धा नाही. "

"उत्तम...!!!!"

"आपण पुढच्या महिन्यात तिकडे निघुयात."

"नाही नाही !! आपल्याला अजून बरीच महत्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी खूप वेळ आपल्याला हवाय. त्यामुळे आपल्याला याच आठवड्यात तिकडे निघावे लागेल. मग बाकीची कामे आणि यज्ञ तिकडे करता येईल. "

"पण आपल्याकडे अजून चार महिने असताना तुम्ही एवढी घाई का करत आहात ?"

"हे पहा. अजून बराच वेळ आहे म्हणून तू गाफील राहू नकोस. त्याला माहित असणारच की आपण यावेळी परत यज्ञ करणार आणि जर माहित असेल तर तो यावेळी आपल्याला अयशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त बाधा आणायचा प्रयत्न करेल. आपली किंचितशी चूकसुद्धा त्याच्या भरपूर फायद्याची आहे. म्हणून आपण आत्तापासूनच तयारी करायला हवी. "

"ठीक आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं. मी निघायच्या तयारीला लागतो. "

**********************************************************************************************************

"बुवा ती पहा गुहा.", समोर असलेल्या गुहेच्या तोंडाकडे बोट दाखवून तो सांगत होता, " बाहेरून ही फार छोटी वाटते पण आतून एकदम मोठी आणि सुंदर आहे. सुमारे ७५० वर्षांपूर्वी एका ऋषींनी इथे तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येमुळे ही जागा शक्तिशाली झाली आहे. तिला आपण अजून शक्तिशाली बनवूया म्हणजे आपला यज्ञ कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण होईल. "
असे म्हणून सर्वजण त्या गुहेकडे निघाले. गुहेजवळ आल्यावर बुवांनी सगळ्यांना बाहेरच थांबायला सांगितले आणि स्वतः गुहेत गेले. थोड्या वेळाने ते परत आले.

"काय झाल बुवाजी ? असे आत जाऊन का आलात ?"
"कधी कधी एखाद्या जागी जर दीर्घ काल मनुष्याचे वास्तव्य नसेल तर तिथे भुते, पिशाच किंवा अतृप्त आत्मा वास करतात. ही गुहासुद्धा फार जुनी असल्याने मी आत जाऊन भूत-पिशाचाचा वास आहे का ते तपासलं. इथे तसे काही नाहीये. आता आपण आत जाऊ शकतो."

मग बुवा गुहेत गेले. त्यांच्या पाठोपाठ तो आणि सगळे शिष्यगण त्यांच्या मागून जाऊ लागले. गुहा फार जुनी असल्याने आतून ती खूप अस्वच्छ होती. कोळीष्टके नसलेली एकही भिंत नव्हती. कपारीत वटवाघळे राहत होती. आत एक प्रकारची गुढ शांतता पसरली होती. बुवा नि तो दोघेजण निर्भिडपणे पुढे जात होते. बाकीचे मात्र आत जाताना जरा बिचकत परिस्थितीचा अंदाज घेत येत होते. मधूनच कुठूनशी ५-६ वाघळे फडफड आवाज करीत बाहेर जात होती. त्यांचा आवाज आणि पंखांची फडफड मनात भीती उत्पन्न करत होता. बुवा आणि तो मात्र एखादे प्रदर्शन पाहत निघावे तसे पुढे पुढे जात होते.

ते जसे जसे आत जात होते अंधार आणि भयाणता वाढतच चालली होती. ते तसेच चालत राहिले. अचानक एकदम लख्ख प्रकाश पडला. ती जागा एकदम मोठी होती. गुहेच्या मध्यभागी ते पोहोचले होते. शे-दोनशे लोक आरामात मावतील एवढी प्रशस्त जागा होती ती. मध्यभागी एक वर्तुळाकार चबुतरा होता. त्यावर अष्टकोनी यज्ञकुंड होतं. त्या कुंडाच्या बरोबर वरच्या वाजूस छताला एक छिद्र होते. यज्ञाचा धूर जाण्यासाठी बहुधा तशी सोय असावी. त्याचा छिद्रातून प्रकाश येत होता. बुवांनी सभोवार नजर टाकली आणि त्याच्याकडे वळून म्हणाले,
"आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"
बुवांच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या,

"हा हा हा हा हा "

तो आणि बुवा दोघेही जोरजोरात हसू लागले.ते इतक्या जोरजोरात हसू लागले की त्यांच्या हसण्याचा प्रतिध्वनी गुहेत ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकून शिष्यगण भीतीने इकडेतिकडे पाहू लागले. थोड्यावेळाने त्या दोघांनी हसणे थांबवले. पण ते प्रतिध्वनीचे हसणे मात्र वाढतच गेले...वाढतच गेले...वाढतच गेले. तो हसण्याचा आवाज इतका वाढला की तो कानांना असह्य होऊ लागला. सर्व शिष्यांनी कानावर हात ठेवले तरी त्यांना तो आवाज सहन होईना. त्याने आणि बुवांनी कान गच्च दाबले. तो आवाज येतच राहिला.

तो आवाज सहन न होऊन सारे शिष्यगण बेशुद्ध झाले. पाठोपाठ त्याच्या डोक्यातही कळा येऊ लागल्या, चक्कर येऊ लागली. परिणामी तोसुद्धा बेहोश झाला. बुवांनी तोंडाने मंत्र पुटपुटत आपल्या कमंडलूतील पाणी सर्वत्र शिंपडायला सुरु केले. पण तो आवाज काही केल्या आवाज कमी होईना. बुवा त्या आवाजाला कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण त्या आवाजावर काडीचाही परिणाम होत नव्हता. शेवटी बुवासुद्धा त्या आवाजापुढे हतबल ठरले. त्यांना चक्कर येऊ लागली, डोळे जड झाले , पापण्या मिटू लागल्या आणि बुवाजींचा अचेतन देह जमिनीवर कोसळला.

**********************************************************************************************************
**********************************************************************************************************

ट्रिंग..ट्रिंग..

"हॅलो"

"मोहन दामले आहेत का..?"

"हो..मीच बोलतोय. बोला "

"मी विश्वास जेऊरकर बोलतोय. तुम्ही ताबडतोप माझ्याकडे या ?"

"का ? काय झालं ?"

"आपल्याला खूप मोठा आणि महत्वाचा दुवा सापडलाय जो आपल्याला तुमच्या आजोबांच्या आयुष्याचा उलगडा करेल आणि माझ्याही मनातील काही प्रश्नांना वाट फुटेल."

"अच्छा ठीक आहे. मी १५-२० मिनिटात पोहोचेन तुमच्याकडे."

"ठीक आहे. " असे म्हणून विश्वासने फोन ठेवला आणि सोफ्यावर मोहनरावांची वाट पहात बसला. टेबलावरच्या रोजनिशीवर त्याने नजर टाकली. हीच ती रोजनिशी जी विश्वास आणि मोहनराव, दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार होती. त्यांच्या भेटीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी मोहनरावांनी रोजनिशी विश्वासला आणून दिली होती. विश्वासने ती रोजनिशी एका दमात वाचून काढली. त्यामुळे बरीच माहिती विश्वासला आता कळली होती. त्याच्या काही प्रश्नाची उत्तरे मिळाली होती. पण काही कोडी अजून गुलदस्त्यातच होती त्यासाठी विश्वासला मदत लागणार होती म्हणून त्याने मोहनरावांना बोलावले होते. त्यांचीच वाट पाहत तो बसला होता.

मोहनराव येईपर्यंत परत एकदा ती रोजनिशी पहावी म्हणून त्याने ती हातात घेतली. खरंतर त्या वहीला रोजनिशी म्हणता येणार नाही. कारण त्या वहीत रोजची नोंद नव्हती पण नानाभटांच्या आयुष्यातील महत्वाच्या नोंदी होत्या. त्याच नोंदींमधून विश्वासला त्यांच्याबद्दल बरीच उपयोगाची माहिती मिळाली होती. तो पुनःपुन्हा त्या वहीची पाने चाळत होता. तेवढ्यात मोहनराव आले. त्यांना बसायला सांगून विश्वास आत गेला. थोड्या वेळाने तो कसलासा कागद घेऊन आला.

"हे पहा हाच तो दुवा..", अतिशय आनंदाने त्याने मोहनरावांना सांगितले आणि तो कागद त्यांच्या हातात दिला.

मोहनरावांनी ती कागदाची घडी उलगडली आणि ते वाचू लागले.

या पत्राच्या वाचका,
मी भगवान गंगाधरपंत दामले उर्फ देवाजी. मला माहित नाही की हे पत्र कोण वाचतंय पण जो कोणी हे वाचत आहे त्याला मला काही सांगायचं आहे. हे पत्र वाचलं जाईल तेंव्हा कदाचित मी ह्या जगात नसेन. त्यामुळे माझ्यानंतर आपल्या दामले घराण्याशी संबंधित काही रहस्ये काळाच्या ओघात नष्ट होऊ नयेत म्हणून मी हे पत्र लिहितोय. कारण ही रहस्ये फक्त मलाच माहित आहेत. आपल्या दामले घराण्याला फार मोठा इतिहास आहे, तो असा -
फार फार वर्षांपूर्वी इंद्रशील नगरीत शूरसेन नावाचा राजाचं राज्य होतं. त्यावेळेस आपले पूर्वज शूरसेन राजाच्या दरबारात पुरोहित होते, चंद्रराव भट. ते राजाच्या दरबारातील सर्व पूजाअर्चा आणि अन्य विधी करायचे. त्यासाठी त्यांना राजाकडून पुरेशी बिदागीही मिळायची. तसेच घरातील वर्षाचे धान्यसुद्धा राजाकडूनच मिळायचं शिवाय कधी कधी राजाची मर्जी असेल तर मोत्याचा कंठाही भेट मिळायचा. त्यांना कधीही काहीही कमी पडायचं नाही. सारं काही व्यवस्थित चालू होतं. पण अचानक कुणाची नजर लागली देव जाणे..! त्यादिवशी राजाकडून अचानक चंद्ररावांना बोलावणे आले.

पत्र वाचता वाचता विश्वास आणि मोहनराव त्या काळात शिरले.

एक सेवक सकाळी सकाळी चंद्ररावांच्या घरी राजाचे बोलावणे घेऊन आला. त्यावेळी चंद्रराव देवपूजा करीत होते. देवपूजा आटोपून त्यांनी धोतरावर सदरा चढवला. खुंटीवरचे उपरणे काढत शांताक्कांना सांगितले, "अहो, जरा जाऊन येतो." शांताक्का म्हणजे चंद्ररावांच्या पत्नी. त्या घाईघाईने बाहेर येत म्हणाल्या,
"अहो धनी, एवढ्या सकाळ सकाळी कुठे निघालात ?"

"कितीवेळा सांगितलं, जाताना कुठे जाताय असं विचारू नका. विघ्न येतं हो. राजाकडून बोलावणं आलंय.", असं म्हणत त्यांनी वहाणा घातल्या.

"अहो दोन घास खाऊन जा म्हणलं"

"परत तेच ....... आणि आपण राजाचे सेवक आहोत. आधी राजाची आज्ञा मग बाकीचं "

"अहो पण - "
हे ऐकायला चंद्रराव तिथे होतेच कुठे ! त्यांनी अर्धा रस्ता पार केला होता. ते राजाच्या दरबारात पोहोचले. दरबार भरला होता. पण राजा दरबारात नव्हता. चंद्ररावांनी विचारणा केली असता एक मंत्री उठला आणि तो चंद्ररावांचा हात धरून कुठेतरी नेऊ लागला. ते राजवाड्याच्या आतल्या दिशेने जात होते.
"आपण कुठे जात आहोत ?"

"देवा, काही विचारू नका. आपण राणीसाहेबांच्या खोलीत जात आहोत. मोठा अनर्थ घडलाय. राणीसाहेबांवर कुणीतरी करणी केलीय बघा. सकाळपासून त्या काहीच खात नाहीयेत, कुणाशी बोलत नाहीयेत, वैद्यबुवापण सकाळीपासून प्रयत्न करत आहेत पण प्रकृतीमध्ये काहीच फरक पडत नाहीये. "

"पण मला कशासाठी बोलावलंय ?"

"राणीसाहेबांच्या खोलीत कसले तरी काळे दोरे सापडलेत आणि एक धागातरी चक्क त्यांच्या हातात बांधलेला होता. म्हणून - "

"हम्म.. मग हा नक्कीच काळ्या जादूचा प्रकार आहे. राजवाड्यात कुणाला काळी विद्या अवगत आहे ? "

"कुणालाच नाही."

"मग हे कोणी केलं ?"

"तेच समजत नाहीये.", समोरच्या दिशेने हात करत मंत्री म्हणाला, "ती पहा ती राणीसाहेबांची खोली. तुम्ही आत जा , मी इथेच थांबतो."

चंद्रराव राणीसाहेबांच्या खोलीत शिरले. त्यांना पाहताच राजा धावत धावत त्यांच्याकडे आला आणि भीती कम काळजीच्या स्वरात म्हणाला ,
"देवा, बघ ना काय झालं हे ? मी कधी कुणाचं वाईट केलं म्हणून आज माझ्यावर अशी वेळ यावी ."

"महाराज तुम्ही काळजी करू नका मी बघतो , काय करायचं ते . तुमच्या मंत्र्याने मला सगळं सांगितलंय. मला ते काळे धागे द्या, मी राणीसाहेबांवरची करणी काढून टाकतो."

ते धागे घेऊन चंद्रराव दरबारात आले. अचानक त्यांना काही आठवलं म्हणून ते वळले आणि परत राजाकडे गेले.

"महाराज, तुमचा कोणी शत्रू आहे का ? म्हणजे असा कोणी जो तुमच्या वाईटावर टपला आहे ?"

"अं.....", बराच विचार करून राजा म्हणाला , "नाही. मला असा कोणीही आठवत नाहीये."

"अच्छा. ठीक आहे.", राजाला जवळ ओढत चंद्रराव म्हणाले , " आपल्याला एका पूजेची तयारी करावी लागेल. राणीसाहेबांवरची करणी घालवण्यासाठी आपल्याला ही पूजा करावी लागेल. "
"तुम्ही काय म्हणाले ते करायला मी तयार आहे पण हिला काही झालं नाही पाहिजे. तुम्हाला काय हवंय ते अमात्यांना मागा. ते देतील. "

'ठीक आहे', असे म्हणून चंद्रराव तेथून निघून गेले. राजा परत राणीजवळ जाऊन बसला. चंद्रराव घरी आले. त्यांनी शांताक्कांना काय झालं ते सांगितलं आणि आता एक पूजा करावी लागेल हेही सांगितलं. त्यांनी जेवण केलं आणि आणखी दोन जणांना घेऊन ते राजवाड्यात गेले. राणीच्या महालाबाहेर असलेल्या सज्जा मध्ये ती पूजा करावयाचे ठरले.

चंद्ररावांनी त्या दोघांना आसन मांडले आणि त्यावर बसायला सांगितले. ते दोघे तिथे बसले आणि रामरक्षापठण करू लागले. चंद्ररावांनी पूजेसाठी लागणारी सारी साधने मागून घेतली आणि पुजेला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शुभ्र दोऱ्याच रीळ अभिमंत्रून, त्या दोऱ्याने वडाच्या झाडाला बांधतात तसे राणीच्या पलंगाला बांधले. तसेच दोरा बांधता बांधता ते कुठलासा मंत्रोच्चार करत होते. त्याचं दोरा बांधून झालं आणि त्याचक्षणी राणीने विजेचा झटका लागल्यासारखे अंग जोरात हलवले. सर्वांच्या नजरा राणीकडे वळल्या. राजाचे डोळे आशेने चमकले. चंद्ररावांनी राणीकडे पाहिले. आता ती निपचित पडून होती. ते परत पुजेकडे वळाले.

ते पाटावर येऊन बसले. त्यांनी कसलासा भूत-पिशाच निवारक मंत्र पुटपुटत विधी करू लागले. ते काळे धागे त्यांनी समोर ठेवले. त्याभोवती खडूने चौकोन काढला आणि कुंकवाचा फवारा मारला. त्या धाग्यांतून धूर निघू लागला. हळूहळू धुराचे प्रमाण वाढू लागले त्याचबरोबर राणी जराशी चुळबुळ करू लागली. काही वेळ हे असं चालू होतं पण राणी परत निपचित झाली. चंद्ररावांनी त्या धाग्यांवर पाणी शिंपडले आणि त्यावर काळे तीळ पसरले. तोंडाने मंत्र चालू होताच. अचानक ते धागे हालू लागले. मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफड करतो तसे धागे हलू लागले. ते धागे चौकोनाच्या बाहेर जायचा प्रयत्न करू लागले पण धागा चौकोनाच्या रेषेला स्पर्श करताच त्या रेषेवरून ज्वाला निघाली त्यामुळे ते त्या चौकोनाच्या बाहेर जाऊ शकत नव्हते. इकडे राणी परत चुळबुळ करू लागली. ती उठून बसली. राजाने चंद्ररावांकडे एक आभारपूर्ण नजर टाकली आणि राणीच्या जवळ जाऊ लागला. चंद्ररावांनी डोळे मोठे करून राजाला तिकडे न जाण्याचा इशारा केला. राजा तसाच थांबला.

उठून बसलेली राणी जोरजोरात ओरडू लागली. धाग्यांची तडफड सुद्धा वाढली. राणीच्या तोंडून पुरुषासारखा घोगरा आवाज येऊ लागला. तश्याच आवाजात ती ओरडत होती. चंद्रराव आणि ते दोघे भटजी सोडून सारेजण घाबरून राणीकडे पाहू लागले. इतके सारे घडत होते पण त्या दोघा भटजींचे रामरक्षापठण चालूच होते. बराच वेळ असंच चालू होतं. चंद्ररावांनी हातात कुंकू, तीळ व बुक्का घेतले, मुठ बंद केली, काही मंत्र म्हणले आणि जोरात त्या धाग्यावर फेकले. त्या धाग्यांनी उसळी घेतली आणि त्यातून ज्वाळा बाहेर पडल्या. ते धाग्यातून बाईच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते धागे स्तब्ध झाले. राणीपण स्तब्ध झाली. तिचे ओरडणं एकदम बंद झालं. ती इकडे तिकडे बघू लागली. राजाराणी एकमेकांकडे बघून हसले. राणी आता पूर्ण बरी झाली होती.

चंद्रराव त्या धाग्याकडे पाहत होते. त्या धाग्यातून ज्वाळा बाहेर पडत होत्या. थोड्यावेळाने त्या ज्वाळा कमी झाल्या. परत एकदा त्या धाग्याने उसळी घेतली, तो उंच हवेत गेला आणि रॉकेट फुटते तसा जोरात फुटला.

"फटाsssssssssssssssssssक"

त्यासरशी विश्वास आणि मोहनराव परत वर्तमानकाळात आले.

त्यादिवशी राणी बरी झाली होती आणि तिच्यावर करणी करणारा तो, त्याचा खात्मा झाला होता. त्या दिवसापासून तो जो कोणी आहे तो दामले घराण्याचा शत्रू झाला होता. दर ५० वर्षांनी त्याचे वारसदार दामले घराण्यातील एका व्यक्तीचा जीव घ्यायचा प्रयत्न करतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याच्या एका वारसदाराने भानूला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने एका जंगलात यज्ञ केला होता. पण मी आणि भानुने मिळून कृत्रिम पाऊस तयार केला आणि त्याच्या यज्ञात बाधा आणली. त्यावेळी त्याचा यज्ञ असफल झाला. पुढच्या वेळी त्याचा वारसदार नक्कीच जास्त खबरदारी घेईल यात शंका नाही पण माझी अशी इच्छा आहे की तू त्या वारसदाराला यावेळी ठार मारावे. कारण त्या वारसदारानंतर 'त्या'चं घराणं निर्वंश होईल आणि दामले घराण्याचा कायमचा धोका टळेल. ज्याने हे पत्र शोधून काढले तोच फक्त हे काम करू शकतो कारण
भानुदासनंतर तोच दामले घराण्याचा नवा वारसदार आहे.

तुमचा,
भगवान गंगाधरपंत दामले

विश्वास आणि मोहनराव एकमेकांकडे पाहतच राहिले.

3

"पण हे कसं शक्य आहे ? "

गोंधळलेल्या चेहऱ्याने विश्वासने मोहनरावांना विचारले. मोहनरावसुद्धा गोंधळले होते. त्यांना हे काय घडत आहे याचा काहीच बोध होत नव्हता. त्यांना हे कळत नव्हते की मुळातच ज्या माणसाचा दामले घराण्याशी काडीमात्र संबंध नाही तो माणूस दामले घराण्याचा वारसदार कसा काय असू शकेल ? विश्वासलाही हाच प्रश्न पडला होता.

खरंतर विश्वासने हे पत्र मिळाल्याबरोबर मोहनरावांना फोन केला होता आणि घरी बोलावले होते. त्याने ते पत्र वाचलेच नव्हते. पण जेंव्हा त्या दोघांनी मिळून पत्र वाचलं तेंव्हा दोघांनाही एकदम झटका बसला.

"मलाही तेच कळत नाहीये. ", मोहनराव म्हणाले , "हे पत्र तुम्हाला कोठून मिळाले..? "

"हि रोजनिशी पाहिलीत का ? ", विश्वासने ती वही हातात घेत मोहनरावांना विचारले . त्या वहीच्या मलपृष्ठाचा फाटलेला पुठ्ठा दाखवून तो म्हणाला , "काल रात्री मी हि वही वाचायला घेतली. वही अर्ध्यापर्यंत वाचून झाली होती. तेवढ्यात वाचता वाचता मला शिंक आली आणि डोक थोडसं गरगरल्यासारखं झालं. कदाचित दिवसभराच्या थकव्याने आणि या घटनांच्या ताणाने मला चक्कर आली असावी. नंतर थोडा वेळ मी बेशुद्धावस्थेत होतो. बहुतेक १०-१५ मिनिटे झाली असावीत. मला शुद्ध आली. उठून तोंड धुतले आणि पाणी पिऊन परत वाचायला लागलो. जसा वहीच्या शेवटच्या पानावर पोहोचलो , बघतो तर काय ! वहीचा मागचा पुठ्ठा जरासा फाटला होता आणि त्यातून एक कागदाचा तुकडा बाहेर आला होता. कदाचित शिंक देताना वहीला हिसका बसून तो कागद बाहेर आला असावा. तो कागदाचा तुकडा बाहेर ओढला. तो एक लिफाफा होता. त्या लिफाफ्यात हे पत्र होतं."

"अच्छा..पण मला आणखी एक शंका येतीये की हा तुकडा तुम्हालाच कसा सापडला ? माझ्या हातूनसुद्धा कितीतरी वेळा या वहीची हेळसांड झाली आहे पण तेंव्हा कधी पुठ्ठा फाटला नाही मग ...."

"मोहनराव आता मला काही विचारू नका. माझ्या मेंदूने विचार करणं केंव्हाच थांबवलंय. आधी तुम्ही येता काय , त्या रात्री ते अजब काहीसं होत काय आणि आता मी दामलेंचा वारसदार ? बापरे सगळंच विचित्र आणि माझ्या बुद्धीबाहेरचं आहे."

"आपण तुमच्या आई-वडिलांना याबद्दल विचारलं तर ? "

"ते या जगात नाहीत.", त्यांच्या आठवणीने विश्वासच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले . भावनांना आवर घालत अश्रू पुसत तो म्हणाला ," काही वर्षांपुर्वी एका कार अपघातात ते दगावले."

"माफ करा...पण मग आता करायच तरी काय ?"

"आता फक्त एकच पर्याय उरतो..ते म्हणजे तुमचे आजोबा."

"मी त्यांच्याबद्दल काही माहिती घ्यावी आणि आजार बरा करावा म्हणून तुमच्याकडे आलो होतो. पण उलट तुम्हीच यात अडकत चालले आहात आणि नवनवीन प्रश्न उद्भवत आहेत. माझे आजोबा आता विचित्र वागू लागले आहेत. ते अशा अवस्थेत काही सांगू शकतील यात मला शंकाच वाटते."

"आपण एकदा तुमच्या आजोबांना भेटून बघुया तरी. आधी आपण त्यांच्या विचित्र वागण्यामागचे कारण शोधूया आणि मग या रहस्यांचा शोध घेऊया. तसेच आपल्याला अजून एका व्यक्तीला भेटावे लागेल. त्या व्यक्तीचं नाव आहे 'दाजी' "

"तुम्ही कसे दाजींना ओळखता ?"

"मी त्यांना ओळखत नाही. पण यांचा उल्लेख त्या वहीत बऱ्याच वेळा झाला आहे. त्या उल्लेखांवरून मला असे वाटते की दाजी हे नानाभटांचे खूप जवळचे मित्र असावेत."

"तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. दाजी म्हणजे नानांचा जिगरी दोस्त. आमच्या घराच्या माग एक गल्ली सोडून त्यांचे घर होते. दाजींचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. दाजी आणि नाना चांगले ३-४ तास गप्पा मारत बसायचे. पण गेल्या ५-६ महिन्यांपासून ते आलेच नाहीत. त्यांचे घरसुद्धा ५-६ महिन्यांपासून बंद आहे. दाजींच्या गायब होण्याच्या एक-दीड महिन्यानंतर नानासुद्धा विचित्र वागू लागले. नेहमी हसतमुख असणारे नाना एकलकोंडे झाले. स्वतःला खोलीत कोंडून घायचे. मधूनच ओरडायचे , 'तो जिंकेल त्याला अडवा नाहीतर विनाश अटळ आहे'. या वाक्याचा थोडा संदर्भ लागतोय मला. पण त्यांची ही अशी अवस्था पाहवत नाही हो."

आणि अचानक मोहनरावांना रडू फुटले.

"मोहनराव शांत व्हा. आपण सगळे प्रॉब्लेम हळू हळू सोडवूया. मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आपण आधी तुमच्या आजोबांना बरे करुया आणि मग माझ्या शंकांची उत्तरे शोधूया."

"ठीक आहे.", मोहनराव डोळे पुसत म्हणाले, "मी उद्या रजा काढतो. मग आपण आमच्या गावी जाऊया."

********

दोन-तीन दिवसांनंतर विश्वास आणि मोहनराव सकाळी गावाकडे निघाले. विश्वासच्या कारमधून ते दोघे निघाले. जवळपास तासाभराने ते गावाकडे पोहोचले. विश्वासची कार नानाभटांच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसले ते .. वाडाच होता तो. एक भव्य चिरेबंदी वाडा . बांधकाम तसं जुन्या धाटणीचंच पण दगडी भिंती, जुन्या काळाची कलाकुसर त्या तिमजली वास्तूची शोभा वाढवत होते. एकविसाव्या शतकातही तो आपली संस्कृती व इतिहास जोपासत होता. विश्वास आणि मोहनराव वाड्यात गेले.

विश्वास वाड्याकडे नुसता पाहताच राहिला. बाहेरून वाटला त्यापेक्षा जास्त भव्य आणि आल्हाददायक होता. वाड्यात आत आल्या आल्या समोर मोकळी जागा होती. डावीकडे न्हाणीघर , उजवीकडे एक खोली , नवीन पाहुणे किंवा बाहेरचे लोक आल्यावर ज्या खोलीत बसतात , ती खोली..आणि समोर दिवाणखाना. दिवाणखान्याची रचना पूर्वीच्या वाड्यांसारखीच . एक झोपाळा, समोर छोटा टेबल किंवा स्टूल, बाजूने खुर्च्या , मागे पलंग वगैरे...

विश्वास आणि मोहनरावांनी पाय धुतले आणि दिवाणखान्याच्या पायऱ्या चढले. विश्वासला बसायला सांगून मोहनराव आत गेले. विश्वास खुर्चीत बसून समोर ठेवलेलं वर्तमानपत्र वाचत बसला. मोहनरावांनी विश्वासला पाणी दिले व ते आत गेले . थोड्या वेळाने ते कपडे बदलून आले.

"चला तुम्हाला घर दाखवतो आणि सर्वांची ओळख करून देतो.",मोहनराव.

मोहनरावांनी विश्वासला घरातल्या सर्वांची ओळख करून दिली. घरात सर्वांना त्यांनी विश्वासच्या येण्याच कारण सांगितलं. ते ऐकताच घरातल्या साऱ्यांना अत्यानंद झाला. कारण नाना आता बरे होणार होते. ( नाना खरच बरे होणार होते का विश्वास अजून एका नवीन कोड्यात अडकणार होता, देव जाणे..! )

घरातल्या साऱ्यांची ओळख झाली. आता फक्त एकच व्यक्तीची ओळख राहिली होती जिच्यासाठी विश्वास इकडे आला होता....नाना . नानांची खोली वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावर होती. ते दोघे नानाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले.
वरच्या मजल्यावर गेल्यावर मोहनरावांनी शेवटच्या खोलीकडे बोट दाखवून 'ही नानाची खोली' सांगितले. त्या खोलीचे दार बंद होते. त्या खोलीकडे जात जात मोहनराव विश्वासला सांगत होते,

"पाच-सहा महिनांपासून ते असेच स्वतःला कोंडून घेतात. आतासुद्धा ते दरवाजा उघडतील का सांगता येत नाही. "

जसे जसे ते खोलीच्या जवळ जात होते. विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्याला कसल्या वेदना होत होत्या. मोहनरावांचे तिकडे लक्ष गेले .

"काय होतंय विश्वास ? "

"काही नाही ", त्याने आता डोक धरले आणि मटकन खाली बसला , "जरा डोक्यात कळा येत आहेत."

विश्वासच्या डोक्यात कळा वाढत गेल्या. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. मोहनराव पाणी आणायला खाली गेले. इकडे विश्वासला फारच त्रास होऊ लागला.

मोहनराव पाणी घेऊन आले. त्यांना धक्काच बसला. जमिनीवर विश्वास नव्हता. ते तसेच पुढे चालत गेले.

ठळळळळळळ....

...समोरचे दृश्य बघून त्यांच्या हातातला ग्लास खाली पडला.

विश्वास नानाच्या खोलीसमोर उभा होता आणि खोलीचे दार उघडे होते. मोहनराव विश्वासच्या जवळ आले. आतमध्ये नाना पलंगावर मान खाली घालून बसले होते. त्यांनी दरवाजा उघडलेला पाहून मान हळूहळू वर केली.

त्यांनी समोर उभा असलेल्या विश्वासकडे पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हास्य आले. एका आशावादी नजरेने त्यांनी विश्वासकडे बघितले. ते विश्वासकडे पाहून आनंदाने ओरडले,

विश्वाsssssssss तू आलास..........

...आणि पलंगावरून उठून विश्वासकडे झेपावले.

5

ते विश्वासजवळ आले, विश्वासला कडकडून मिठी मारली.

मोहनराव हे दृश्य बघून चक्रावले होते. नाना दरवाजा उघडतील का नाही असं वाटत असताना त्यांनी दरवाजा नुसता उघडला नाही तर विश्वासला ते चक्क बिलगले. मुळातच विश्वास या घरात नवखाच आणि त्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने नानांकडे आणले होते. पण इथे काही वेगळेच चित्र दिसत होते. कधी कधी समोरची व्यक्ती ओळखीची नसतानासुद्धा आपण बिलगतो पण ते ओळख करून घ्यायच्या हेतूनेच पण नानांनी विश्वासला 'विश्वा' म्हणून पुकारले. त्यांना विश्वासचे नाव कसे काय कळाले ?

विश्वासला भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की एखादी व्यक्ती बऱ्याच वर्षांने भेटत आहे आणि तिला भेटून खूप आनंद होतो आहे. तो आनंद विश्वास आणि नानांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. शिक्षणासाठी गेलेला आपला मुलगा अमेरिकेवरून परत आल्यावर बापाला जो आनंद होतो ना, अगदी तस्सा आनंद नानांना झाला होता. इकडे मोहनरावांच्या मनात मात्र शंकांचा धांगडधिंगा सुरु होता.

विश्वास अजूनही नानाच्या मिठीतच होता. अचानक नानांनी मिठी सोडवली आणि ते विश्वासच्या खांद्याला धरून त्याच्याकडे पाहू लागले. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत गेले. त्या हास्याची जागा काळजीने घेतली आणि त्यांचे डोळे पाणावले. विश्वासच्या डोळ्यात पहात ते म्हणाले,

" विश्वा... कशाला आलास रे ? आता तो तुला सोडणार नाही. अजून वेळ आहे. माझं ऐक तुझ्या तुझ्या घरी जा. नाहीतर विनाश अटळ आहे. तुला पाहून मला आनंद झाला खरा, पण सत्य काही वेगळेच जे तुला माहित नाहीये."

विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांना असा वाटलं की विश्वासला आपलं म्हणणं पटत नसाव. ते जरावेळ थांबून परत बोलू लागले,

" मला कळतंय की तुला माझं बोलणं पटत नाहीये. पण नाईलाज आहे रे. जे व्हायचं ते मी टाळायचा प्रयत्न करत होतो पण शेवटी नशिबात जे आहे ते आपण थोडीच बदलू शकतो. आता जे व्हायचं ते होणार . त्याला कुणीही अडवू शकत नाही. कारण तो आता आधीपेक्षा ताकदवर झाला आहे. त्याला अडवणं आता आपल्या हातात नाही. माझे सारे प्रयत्न वायफळ ..."

आणि त्यांच्या गालावरून अश्रूचा ओघोळ वहात गेला. त्यांनी आपले हात विश्वासच्या खांद्यावरून काढले आणि उदास चेहऱ्याने ते परत पलंगावर जाऊन मान खाली घालून बसले. त्यांचा उदास चेहरा पाहून विश्वास त्यांच्याजवळ गेला, नानांची मान त्याने वर केली आणि म्हणाला,

"नाना, किती हो काळजी करता ! आता मी आलोय ना , मग आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कुणीही काहीही करणार नाहीये. सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. तुम्ही आजिबात घाबरू नका. खरंतर आता मी आलोय म्हणाल्यावर तुम्ही कसलीही काळजी घेतली नाही पाहिजे. पण तुम्हीतर अजूनच काळजी करू लागलात. तुम्हीच म्हणायचात ना , की 'आयुष्य म्हणजे एक प्रश्नपत्रिका आहे , त्यातला प्रत्येक प्रश्न नवीन संकट घेऊन येतो, त्या संकटावर मात करून आपल्याला ती प्रश्नपत्रिका सोडवायची असते, कुठलाही प्रश्न न गाळता.' मग आता कशासाठी माघार घेताय ? तुम्हीच असे बोलू लागलात तर मग आम्ही काय करायचं ? दोघे मिळून लढूया आणि संकटाला पळवून लावूया. राहता राहिला प्रश्न 'त्या'चा. तुमच्या म्हणण्यानुसार 'तो' ताकदवर झालाय पण वरती जो सर्वशक्तिमान आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच ताकदवर नसणार. मग वरचाच आपल्या बाजूने असल्यावर कुणाची भीती कशाला बाळगायची ? पटतंय का नाही माझं म्हणणं ? "

नानांनी नुसतीच मान डोलावली. याव्यतिरिक्त ते तरी दुसरं काय करू शकणार होते. कारण जे व्हायला नको तेच घडत होतं. विश्वासही काही ऐकायला तयार नव्हता. उलट 'त्या'च्या विरुद्ध तो लढू इच्छित होता. खरी परिस्थिती काय आहे हे नाना पक्के जाणून होते. पण या सर्वांशी अनभिज्ञ असलेल्या विश्वासला हे कोण सांगणार !

मोहनराव या दोघांकडे नुसतेच पहात होते. काहीच कळत नव्हते. विश्वासला काय झालं आहे ? आपणच त्याला नानांशी ओळख करायला इथे आणलं. पण इथे सारं चित्र पालटलं होतं. आधी नानांनी विश्वासला मिठी मारली आणि आता तर ते 'तो' जो कुणी आहे, त्याच्याबद्दल बोलत होते. विचार करता करता ते त्या दोघांकडे पहात होते.

अचानक विश्वास मगाशीसारखे हावभाव करू लागला. परत त्याला कसल्याश्या वेदना होऊ लागल्या. तो डोके धरून त्या वेदनांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता. पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. नाना आणि मोहनराव त्याला त्याच्या जवळ गेले. नानांनी विश्वासचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आणि मोहनरावांना पाणी आणायला सांगितले.

मोहनराव पाणी घेऊन आले व विश्वासच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडू लागले.

"आता याला काय झालं ? हा असा अचानक बेशुद्ध का झाला ? ", नाना.

"मगाशी आम्ही तुमच्याकडे येत होतो तेंव्हासुद्धा हे असेच बेशुद्ध झाले होते. मी पाण्याचा ग्लास आणेपर्यंत ते शुद्धीवर आले सुद्धा. नाना, मी एक विचारू का ? "

"विचार ना ? परवानगी कसली घेतो आहेस ? "

"तुम्ही विश्वासरावांना कसे काय ओळखता ?"

नाना काहीच न बोलता विश्वासच्या तोंडावर पाणी शिंपडत राहिले. नाना उत्तर देत नाहीत पाहून मोहनरावांनी परत एकदा तोच प्रश्न विचारला. नानांनी बोलण्यासाठी तोंड उघडले तेवढ्यात विश्वास हालचाल करू लागला. तो शुद्धीवर येत होता. त्याला शुद्ध आलेली पाहून नानांनी मोहनरावांना विश्वासला घेऊन जाऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सांगितली. तसेच 'सध्या त्याला विश्रांती घेऊ दे आणि त्याची काळजी घे ' असे म्हणाले. मोहनराव विश्वासला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले.

मोहनरावांनी विश्वासला त्यांच्या रुममध्ये आणला. त्याला पलंगावर बसवून ते म्हणाले,

" विश्वासराव, तुम्हाला फारच थकवा आलेला दिसतोय. तुम्ही थोडावेळ पडा इथे. मला जरा काम आहे. मी पंधरा-वीस मिनिटात जाऊन येतो. मग आल्यावर आपण जेवायला जाऊया. "

विश्वासने नजरेनेच होकार दिला आणि तो पलंगावर आडवा झाला. मोहनराव बाहेर आले. त्यांनी खोलीचे दार पुढे केले आणि चालू लागले. त्यांची पावले नानांच्या खोलीकडे वळाली. त्यांच्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते नानांकडे जात होते. नानाकडे जाताना त्यांच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते.

नाना विश्वासला कसे ओळखतात ? विश्वास इकडे प्रथमच आला आहे. मग ते त्याला कसे काय बिलगले ? समजा नाना काहीतरी हेतूने बिलगले पण तरीही विश्वासने त्यांना ओळखायला नाही पाहिजे. पण तोसुद्धा नानांना ओळखतो. नुसता ओळखताच नाही तर विश्वासला 'त्या'च्याबद्दलसुद्धा माहिती आहे. हे कसे काय घडू शकते ? मुळातच हे कळत नाहीये की नाना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून विचित्रपणे वागायचे, मधूनच काही असंबंध बडबडायचे, ते अचानक व्यवस्थित कसे झाले ? सारं काही उलट सुलत घडत होत.

विचार करता करता मोहनराव नानाच्या खोलीसमोर आले. खोलीचा दरवाजा अजून उघडाच होता. ते आत आले. समोर पलंगावर नाना नेहमीप्रमाणे मान खाली घालून बसले होते. पावलांचा आवाज ऐकताच त्यांनी मान वर केली. समोर मोहनरावांना पाहून हाताने शेजारी पलंगावर बसायची खुण केली. मोहनराव नानांच्या शेजारी बसले.

"बोल. कशासाठी आला आहेस ?"

"नाना, मी आत्ताच विश्वासरावांना विश्रांती घ्यायला सांगून आलोय. थोडावेळाने आम्ही जेवायला जाऊ. त्याआधी येण्याचे कारण असे की मगाशी या खोलीत जो प्रकार झाला त्यातल्या काही गोष्टी मला कळल्या नाहीत. तसेच गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यांच्यावर विश्वास बसत नाहीये. त्यामुळे माझ्या डोक्यात काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरे मला सापडत नाहीयेत. "

" तुला जे काही विचारायचं आहे ते सरळ सरळ विचार. उगीच आढेवेढे घेत बसू नकोस. "

" ठीक आहे. मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो. नाना, विश्वास हा एक प्रथितयश लेखक आहे. गेल्या बारा वर्षात त्याने बऱ्याच प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याने गेल्या आठवड्यात 'भयानक' नावाची रहस्य कादंबरी लिहिली आहे. ती मी वाचली. त्यामधील बहुतांश भाग तुमच्या आयुष्यातील काही घटनांशी साधर्म्य दर्शवतो. तसेच तुम्हीसुद्धा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून इतके विचित्र वागत होतात. डॉक्टरांना दाखवल्यावर ते म्हणाले की ' यांना मानसोपचार तज्ञांकडे न्यावे लागेल. यांची अवस्था बघता कदाचित तिथे यांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागेल.' पण तुमच्यावरच्या काळजीपोटी घरून शॉक ट्रिटमेंटला विरोध झाला. त्यामुळे ते रद्द झालं. मग एक वेडा विचार माझ्या मनात आला की बहुधा विश्वासरावांकडे काहीतरी उपाय मिळेल. विश्वासरावांच्या कथेतील साधर्म्य आणि तुमच्या आजाराचे रहस्य जाणण्याच्या उद्देशाने मी विश्वासरावांकडे गेलो. पण तिथे आम्ही कोड्यात आणखी अडकत गेलो. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला किडा जसा जितकी हालचाल करेल तितका अजून गुरफटत जातो तसे आम्ही रहस्यांचा जाळ्यात अडकत होतो. शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलो तर इथेही तेच. "

मोहनराव शांत झाले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले,

" विश्वासराव आणि तुम्ही एकमेकांना कसे ओळखता ? तुम्ही तर आजारी होतात, मग बरे कसे काय झालात ? तुम्ही दोघे ज्या 'तो'बद्दल बोलत होतात. 'त्या'चा संबंध दामले घराण्याशी असेल तर विश्वासराव 'त्या'ला कसे काय ओळखतात ? विश्वासरावांचा आपल्याशी आणि 'त्या'च्याशी कसा काय संबंध ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विश्वासराव दामले घराण्याचे वारसदार -"

" काय ? " , वारसदार हा शब्द ऐकताच नाना जवळजवळ ओरडलेच.

त्यांच्या ओरडण्याने मोहनराव जरासे बिचकले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज घेत नाना बोलू लागले,

"म्हणजे कशावरून म्हणतोस ? "

" मी जेंव्हा विश्वासरावांकडे गेलो होतो. तेंव्हा विश्वासला मी तुमची वही वाचायला दिली होती. त्या वहीच्या मागच्या पुठ्ठ्यातून त्याला एक पत्र मिळाले. त्यात असा उल्लेख होता. पण हे कसं शक्य आहे ? "

" हुश्श.. ", नाना दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाले, " मला वाटलं की..."

"म्हणजे हे खरं आहे ना की विश्वासरावांचा आपल्या घराण्याशी संबंध आहे !! "

नानांनी गप्प राहणं पसंद केलं.
नाना जरी गप् बसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर मूक होकार दिसत होता. मोहनराव त्यांच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाले ,

" विश्वासराव आपले कोण लागतात ? त्यांचा आपल्याशी कसा संबंध येतो ? "

" तू म्हणतोयस ते खरं आहे. विश्वास दामलेंचा वारसदार आहे. "

मोहनरावांना हे ऐकून धक्काच बसला.
पुन्हा एक नवीन कोडं ...! आधीच काय कमी प्रश्न म्हणून त्यात या नवीन प्रश्नाची भर पडली होती. आता विश्वास आणि दामले एकमेकांशी जोडले गेले होते. त्यांच्यात काय संबंध आहे हे फक्त नानांनाच माहित होतं आणि तेच आता या साऱ्या रहस्यांचा गुंता सोडवू शकणार होते.
मोहनरावांनी नानांना पुन्हा प्रश्न केला,

" विश्वासराव आपले वारसदार कसे काय ? "

" या साऱ्यामागे खूप मोठी कहाणी आहे. वेळ आल्यावर ती सर्वांनाच कळणार आहे. "

" पण आता - "

नानांनी मोहनरावांकडे पाहून बोलणं थांबवण्याचा इशारा केला. त्यांनी आपला पंजा मोहनरावांच्या दिशेने वर केला आणि मान खाली करून जमिनीकडे पाहू लागले. मोहनराव परत बोलण्याचा प्रयत्न करू लागले.

" नाना.. "

नानांनी मान वर केली. त्यांनी मोहनरावांकडे नजर टाकली तसे मोहनराव बिचकले. नानाचे डोळे लालभडक झाले होते, मुद्रा क्रोधित होती. मोहनराव काही बोलणार इतक्यात -

" तू इथे काय करतोयस ? चालता हो इथून ... ", ते मोहनरावांच्या अंगावर खेकसले.

मोहनराव क्षणभर स्तब्ध झाले. त्यांना काय करावे ते सुचेना. ते नुसतं नानांकडे पहात राहिले. मोहनराव जात नाहीयेत हे पाहून नाना उभे राहिले आणि त्यांनी डोळे मोठे करून मोहनरावांकडे पहात पुन्हा ओरडले ,

" जातोस का नाही मुकाट्याने .. पटकन जा ... आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. "

मोहनराव आधीच त्यांचा हा अवतार बघून बिचकले होते. ते काही न बोलता खोलीच्या बाहेर पडले. ते बाहेर पडताच नानांनी दार लावून घेतले. नाना पलंगावर जाऊन बसल्याचा आवाज झाला. हताश झालेले मोहनराव परत आपल्या खोलीकडे जाऊ लागले.

मोहनराव आपल्या खोलीचा दरवाजा उघडून आत आले. विश्वास अजून झोपलेलाच होता. त्यांना विश्वासला झोपेतून उठावावेसे वाटले नाही. ते आरामखुर्चीत बसून त्याच्या उठण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या डोक्यातील प्रश्नमंजुषा पुन्हा सुरु झाली.

नाना अचानक असे का ओरडले ? त्यांना असा झटका बऱ्याचदा यायचा पण याआधी ते इतके भडकले नव्हते. आज मात्र नेहमीचे नाना कुठेतरी हरवले होते. सुरुवातीला नाना नीट बोलत होते पण नंतर ते एकदम अंगावर आले आणि खोलीतून चक्क हाकलून लावलं. एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. उलट नवनवीन प्रश्न निर्माण होत होते.

विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. सारखा विचार करून करून मेंदूला शीण आला होता. सक्त विश्रांतीची गरज होती. मोहनरावांनीपण झोप घ्यायला हवी होती. पण या सतत उद्भवणाऱ्या प्रश्नांनी त्यांची झोप उडवली होती.

विश्वासला जाग आली. तो उठला आणि मोहनरावांना उठवले. ते दोघे जेवायला गेले. त्याचं स्वयंपाकघर तसं प्रशस्त होतं. वाडा जरी जुना दिसत असला तरी अत्याधुनिक सोयी होत्या. ते दोघे डायनिंग टेबलवर समोरासमोर बसले. बाकीच्यांची जेवणे झाली होती. फक्त मोहनराव आणि विश्वास जेवायचे राहिले होते. त्यांनी जेवायला सुरुवात केली. जेवतानासुद्धा मोहनरावांच्या मनातले विचार जात नव्हते. ते विश्वासकडे पहात जेवत होते. विश्वास अगदी निवांत जेवत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडाही ताण वा कसली चिंता दिसत नव्हती. जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो जेवत होता. मगाशी इतके सारे घडूनही हा माणूस कसा काय निवांतपणे जेवू शकतो ? असा विचार मोहनरावांच्या मनात आला. विश्वासच्या प्रश्नाने त्यांची विचार शृंखला तुटली.

" अहो मोहनराव असे काय बघताय माझ्याकडे ? "

" अं..काही नाही.. ", ते भानावर येत म्हणाले, " विश्वासराव, तुम्हाला एक विचारू का ? "

" निःसंकोचपणे "

" तुम्ही नानांना कसे ओळखता ? ", विश्वासच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून ते पुढे म्हणाले, " म्हणजे तुम्ही याआधीपासून नानांना ओळखता काय ? "

" नाही हो. "

" पण मला असा वाटतंय की फार पूर्वीपासूनच नाना आणि तुमचा काहीतरी संबंध आहे. "
थोड्या वेळापूर्वीच नानांनी विश्वास हा दामलेंचा वारसदार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तरी विश्वासकडून काही नवी माहिती मिळवावी म्हणून ते काही माहित नसल्याचे दाखवत होते.

" काहीतरीच काय बोलताय मोहनराव. मी कसा काय ओळखेन नानांना ! तुमच्याकडूनच प्रथम मी नानांच नाव ऐकलं. नानांबद्दल तुम्ही जी काही थोडीफार माहिती दिली आहे, तेवढंच काय ते ओळखतो. आणि मी नानांना ओळखणार कसा ? कारण मुळात मी अजून नानांना भेटलोच नाहीये. "

हे शेवटचं वाक्य ऐकताच मोहनरावांना धक्काच बसला. घास खाण्यासाठी तोंडात घातलेला हात तोंडातच राहिला.

5

" अहो मोहनराव, काय पहाताय असे ? "

" तुम्ही पूर्ण शुद्धीत आहात ना ? ", मोहनराव भानावर येत म्हणाले, " असे काय बोलता आहात तुम्ही ! मगाशी नाही का आपण दोघे नानाकडे गेलो. तुम्ही तिथे नानांना भेटलात, मिठी मारलीत आणि गप्पाही मारल्यात. एवढंच नव्हे तर तुम्ही 'त्या'च्याविरुध्द लढायचं ठरवलंत. "

विश्वासच्या चेहऱ्यावर भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह दिसत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मोहनरावांना कळत होतं की त्याला काही आठवत नसावं. मोहनराव त्याला आठवून द्यायचा प्रयत्न करत होते. पण त्याला काहीच आठवत नव्हत.

" अहो विश्वासराव आठवतं का तुम्हाला, आपण दोघे नानाकडे गेलो होतो. जाता जाता तुम्हाला चक्कर आली मग - "

" तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलंत. ", विश्वास मोहनरावांचे वाक्य तोडत म्हणाला, " मग मला शुद्ध आली. तुम्ही मला तुमच्या खोलीत आणून झोपवलं. मग तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेलात. मी झोपेतून उठलो तेंव्हा तुम्ही आधीच येऊन आरामखुर्चीत झोपला होतात. मी तुम्हाला उठवलं आणि आपण जेवायला आलो. आता मला सांगा, आपण कधी भेटलो नानांना ? "

मोहनरावांना काय बोलावं तेच कळेना. विश्वासला काहीच आठवत नव्हते. मोहनराव परत एकदा त्याला काही आठवतं का बघू लागले.

"अहो विश्वासराव, डोक थोडं शांत ठेवा. एकदम रीलॅक्स व्हा, एक दीर्घ श्वास घ्या आणि डोक्याला थोडासा ताण देऊन बघा. काही आठवतं का. "

ते दोघे दोन मिनिट शांत होते. विश्वास पुन्हा पुन्हा आठवून बघत होता, काही आठवतंय का, पण काहीच आठवत नव्हतं. त्याने मोहनरावांकडे पाहिले. ते विश्वासला काही आठवेल अशा अपेक्षेत होते. तसं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. खूप प्रयत्न करूनही काहीच आठवेना झाल्याने विश्वास मोहनरावांना म्हणाला,

" नाही हो मोहनराव , काहीच आठवत नाहीये. आपण नानांकडे गेलोच नाही तर कसे आठवेल. मला चक्कर आल्यावर आपण परतलो. "

" विश्वासराव आपण एक काम करुया. सध्या जेवताना डोक्याला ताण नको. जेवण झाल्यावर आपण निवांतपणे नानांकडे जाऊया. तिथे गेल्यावर काय ते कळेलच. "
विश्वासने नुसतीच मान डोलावली आणि तो जेऊ लागला.

*****

दोघेही जेवण आटोपून मधल्या खोलीत आले. एक मोठी ढेकर देत मोहनरावांनी विश्वासला चालायची खुण केली. तसा विश्वास त्यांच्या पाठोपाठ चालू लागला. ते वरच्या मजल्यावर आले. ते आता तिथून चालत होते जिथे विश्वासला चक्कर आली होती. ती जागा पाहून विश्वास मोहनरावांना म्हणाला,
" हीच ती जागा, जिथे मी बेशुध्द झालो होतो आणि इथूनच आपण परतलो होतो."

मोहनराव काहीच बोलले नाहीत. कारण काही बोलूनही फायदा नव्हता. विश्वासला काहीच आठवत नव्हते. नानाकडे गेल्यावर या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागणार होता. तसं पाहिलं तर तिथेसुद्धा हा प्रश्न सुटण्याची शाश्वती नव्हती. कारण नाना सध्या नॉर्मल असतील का किंवा त्यांना कधी झटका येईल हे सांगता येत नव्हते. जर का नाना अजून मगाशीच्या झटक्यातून बाहेर आले नसले तर रिकाम्या हाताने परत फिरावे लागणार होते. सारं अनिश्चित होतं.

मोहनराव विचार करत होते. इतक्यात विश्वास काही विचित्र आणि वेड्यावाकड्या हालचाली करू लागला. कदाचित तो या जागेचा प्रभाव असेल पण यावेळी त्याला चक्कर आली नव्हती तर तो दारू पिऊन झिंगलेल्या माणसाप्रमाणे इकडे तिकडे करत होता. तो वाकड्या चालीने जाऊ लागला. अचानक तो उलट फिरला आणि माघारी जाऊ लागला. मोहनराव त्याला अडवत होते पण तो मात्र कसाही कुठेही जात होता.तो अगदीच विचित्रपणे वागू लागला होता. मोहनरावांना काही कळत नव्हते.

हा असं का वागतोय ? याच ठिकाणी याला असे काही का होते ? या जागेचा काही प्रभाव त्याच्यावर पडत असावा का ? असं काय होतं त्या जागेत ? मागच्या वेळी तो इथेच बेहोश झालं होता. यावेळी पुन्हा इथेच ?

मोहनराव विश्वासची विचारपूस करीत होते. त्याला समजावून सांगत होते की आपल्याला नानाकडे जायचं आहे तुम्ही इकडे उलट दिशेने कुठे जात आहात ! पण विश्वास आपल्याच तंद्रीत होता. आजूबाजूला काय चालू आहे , कोण काय बोलताय याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो काहीच ऐकेना म्हणून मोहनरावांनी विश्वासला नानाच्या खोलीकडे जबरदस्तीने ओढत न्यायचे ठरवले आणि त्यांनी विश्वासच्या दंडाला पकडले. विश्वासने मोहनरावांकडे पाहिले. त्याचे डोळे लालभडक झाले होते. नजरेत एक प्रकारचा अंगार होता. अशा रुपात मोहनराव विश्वासला प्रथमच पाहत होते. त्या अंगारपूर्ण नजरेने आधी ते जरा बिचकले पण मग ते विश्वासला तसेच ओढू लागले. विश्वास जागचा हलेना म्हणून त्यांनी अजून थोडा जोर लावला , तोच विश्वासने त्यांना जोरात ढकलून दिले. जवळपास पाच-सहा फुटावर असलेल्या भिंतीवर मोहनराव जाऊन आदळले. त्यांच्या कपाळाला मार लागला आणि रक्त बाहेर आले. पण त्याकडे त्यांचे लक्षच नव्हते. ते विश्वासला अडवण्याच्या प्रयत्नात होते.

विश्वास अजूनच वेड्यासारख वागू लागला. तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत तो ओरडू लागला. त्याचा आवाज राक्षसी आणि घोगरा बनला होता. त्याचा आरडाओरडा ऐकून खालच्या मजल्यावर घरातले सारे जमा झाले. हा काय प्रकार चालू आहे हे त्यांना समजत नव्हते. नुसते माना वर करून ते या प्रकाराकडे पाहत होते. मोहनरावांनासुद्धा काय करावे ते सुचेना. थोडी हालचाल केली की विश्वास ओरडायला लागायचा. त्यामुळे ते ही काही करू शकत नव्हते. त्यांच्या मनात विचार आला , ' नानांना हाक मारुयात का ! जर का ते नॉर्मल असतील तर ते काही करू शकतील. पण ते बाहेर आले अन् विश्वासनी काही उलटसुलट केलं आणि नानांना काही केलं तर... नको नको त्यापेक्षा नानांना न बोलावलेलच बरं. ' या बाबतीत मोहनरावांची द्विधा मनस्थिती झाली होती.

आपणच काही करावे म्हणून ते उठले आणि सावधपणे विश्वासकडे सरकू लागले. त्यांना आपल्याकडे येत असलेलं पाहून विश्वास अजून आरडाओरडा करू लागला. मोहनरावांना पाहून तो ' इकडे येऊ नको, आहे तिथेच थांब ' असे ओरडू लागला. त्यामुळे मोहनराव आहे तिथेच थांबले. शेवटचा एक प्रयत्न म्हणून मोहनरावांनी शेवटी नानांना बोलावयाचे ठरवले. ते नानांना हाक मारणार इतक्यात नानाच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि ' काय गोंधळ लावला आहे ? ' असे म्हणत नाना खोलीच्या बाहेर आले. आवाजाच्या दिशेने त्यांची नजर गेली आणि तोंडातून शब्द बाहेर पडले,

" विश्वाsssss थांब..."

विश्वासने आपले लालभडक डोळे नानावर रोखले आणि मगाशीच्या घोगऱ्या आवाजात तो ओरडला,
" तू आत हो.."

नानांनी एकदा त्याच्याकडे पाहिले, त्याचं ते विचित्र रूप पाहिलं आणि ते खोलीत निघून गेले. नानांच्या येण्याने आनंदी झालेले मोहनराव नानाच्या खोलीत परत जाण्याने हताश झाले. मोहनराव चकित होऊन विश्वासकडे पहात होते कारण त्याने नानांना चक्क एकेरी संबोधले होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर ' नको नको ' असा आवाज आला. त्या आवाजाने भानावर येत मोहनरावांनी विश्वासकडे पाहतो तो काय ! विश्वासने एक पाय कठड्यावर टाकला होता आणि खाली उभे असलेले ' नको नको ' म्हणून ओरडत होते.
विश्वास हळू हळू कठड्यावर भार देऊन अंग वर उचलत होता. कोणत्याही क्षणी तो खाली उडी टाकण्याच्या बेतात होता. हे पाहून मोहनराव जोरात ओरडले , " थांबा विश्वासराव ".
विश्वासने मोहनरावांकडे लक्ष न देता आपले अंग अजून थोडे वर उचलले. मोहनराव आणि खाली उभे असलेल्या साऱ्यांची धडधड वाढली.

मोहनरावांना आता विश्वासला इकडे आणून आपण चूक केली कि काय असे वाटू लागले. आपण उगाच इकडे आणले विश्वासरावांना. आता जर का त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर आपण त्याला जबाबदार ठरणार. त्यांची पत्नी तिकडे वाट बघत असेल आणि इकडे हे प्रकरण भलतीकडेच जात आहे. या साऱ्याला मीच कारणीभूत आहे. जर का विश्वासला इकडे आणला नसता तर हे काही घडलंच नसतं.

असा विचार करत असतानाच " विश्वाssss " अश्या आवाजाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. नाना " विश्वा " असं ओरडत विश्वासकडे येत होते. ते विश्वासपासून हातभर अंतरावर उभे राहिले आणि पुन्हा एकदा ते जोरात ओरडले, " विश्वास थांब ".
विश्वासने मान वळवून नानांकडे तुच्छतापूर्ण नजर टाकली. त्या नजरेतही एक प्रकारचा अंगार होता. डोळे अजून लालभडक होते. पण नानांनी तिकडे लक्ष न देता त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी विभूती टाकली. तापमापीचा पारा उतरावा तसा त्यांच्या चेहऱ्यावरील तो अंगार झटकन उतरला आणि विश्वास कावऱ्याबावऱ्या नजरेने तो इकडे तिकडे पाहू लागला. कठड्यावर टाकलेला पाय त्याने काढला आणि साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

*******

ते तिघे नानाच्या खोलीत बसले होते. खोलीत एक प्रकारची शांतता पसरली होती. थोड्यावेळापुर्वी जे घडलं होतं ते नक्की काय होतं याचा विचार करत होते.

" आता काय करायचं ? ", मोहनरावांनी नानांना प्रश्न केला. विश्वासने नानाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. कपाळाला आठ्या घालून दीर्घ सुस्कारा सोडत ते म्हणाले,

" आता आपल्या हातात काहीच राहिले नाही. या खेळाची सारी सूत्रे त्याच्याकडे गेली आहेत. आधी तर तो शक्तिशाली झाला आहे आणि त्यात आपल्याकडे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काहीच नाहीये. "

" त्यादिवशी विश्वासराव म्हणाले ना की आपण 'त्या'च्याशी लढूया. त्यांच्या बोलण्यात केवढा आत्मविश्वास होता. मग आता तुम्ही असे का बोलताय ? विश्वासराव तुम्हीपण बोला ना काहीतरी ", मोहनराव विश्वासकडे पाहत म्हणाले.

" तो काहीच बोलणार नाही. त्यादिवशी तो बोलला खरे पण आता तो काहीच बोलू शकणार नाही. किंबहुना त्याला ते आठवणारही नाही. काय विश्वास ? "

त्यांनी विश्वासकडे बघितले. तो प्रश्नार्थक मुद्रेने दोघांकडे बघत होता. त्याने मोहनरावांना विचारलं,
" तुम्ही जेवताना बोलत होतात त्याचबद्दल नाना बोलत आहेत का ? "
मोहनरावांनी डोळ्यानेच होकार दिला. त्यांच्या एका प्रश्नाला आता उत्तर मिळणार होते.
" हो नाना , मगाशी जेवताना मी यांच्याशी बोललो पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. का बरे आठवत नाहीये विश्वासरावांना ? "

नानांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली,

" आता सारे काही सांगायची वेळ आली आहे. तू थोड्या वेळापूर्वी म्हणालास ना की मी मधूनच विचित्र वागतो आणि आजारी होतो मग बरा कसा काय झालो. खरंतर मी आजारी कधी नव्हतोच आणि आत्ताही नाहीये. "

नानांना काहीतरी होऊ लागले. ते चेहरा वेडावाकडा करू लागले. ते पाहून मोहनराव आणि विश्वास त्यांच्याकडे जाण्यासाठी उठले, तोच नानांनी त्यांना बसायची खुण केली आणि तसेच बोलू लागले,

" मोहन, आता मी सांगतो तसं कर. ज्या काही अनाकलनीय घटना घडत आहेत त्याचा जास्त विचार करत बसू नकोस. विश्वासच्या जीवाला इथे धोका आहे. विश्वासला शहरात त्याच्या घरी सोडून ये आणि चुकूनही परत इथे आणू नकोस. आता जे काही होईल ते हातावर हात ठेऊन बघण्याशिवाय काही पर्याय नाही. आता निघा दोघे. मी माझी काळजी घेईन. विश्वास तूही काळजी घे स्वतःची. "

त्या दोघांनी उठून नानांना नमस्कार केला आणि दरवाज्याकडे गेले. दरवाज्यातून वाकून त्यांनी नानांकडे पाहिले. नाना डोकं धरून बसले होते. दोघे तसेच पुढे गेले.ते जिन्यात असतानाच नानाच्या खोलीचा दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज झाला.

******

दुपारचे पाच वाजले होते. विश्वासला त्याच्या घरी सोडण्याची जबाबदारी नानांनी मोहनरावांवर सोपविली होती. दोघेही नुकतेच झोपेतून उठले होते. दिवसभराच्या तणावामुळे पडल्यापडल्या झोप लागली होती. दोघांनी तोंड धुतले, चहा घेतला आणि ते शहराकडे जाण्यास निघाले. मोहनरावांनी बाहेरूनच ' शहरात विश्वासरावांना सोडून येतो ' असे ओरडून सांगितले. ते ऐकून नाना खोलीतून बाहेर येऊन सज्जात कठड्याला रेलून उभे राहिले. त्यांनी दोघांना ' काळजी घ्या ' असे सांगितले आणि हाताने टाटा केले.

दोघांनी चपला घातल्या. वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे वळाले आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन पायांवर त्यांची नजर खिळली.

6

मोहनराव आणि विश्वास त्या पायांकडे पाहू लागले.

कोल्हापुरी चपला.....पांढरे शुभ्र धोतर.....त्यावर तितकाच शुभ्र सदरा.....खांद्यावर पांढरा पंचा....दोन्ही हाताच्या मधल्या बोटांत व अनामिकेत रत्नजडीत अंगठ्या.....गळ्यात रुद्राक्षाच्या २-३ माळा.....पिळदार मिशा.....कपाळावर मोठ्ठा बुक्का.....उजव्या कानात बाळी...डोक्यावर तांबडा फेटा.

वयाने ती व्यक्ती वृद्ध दिसत असली तरी चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज होते. त्यांच्या तेजाने वाड्याच अंगण व्यापून टाकलं होतं.

विश्वासने खांद्याने धक्का देत मोहनरावांना ' हे कोण आहेत ?' असं विचारलं. पण मोहनरावांचे लक्षच नव्हते. ते आश्चर्यचकित होऊन दरवाज्यातील त्या व्यक्तीकडे पाहत होते.

कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत त्या कोल्हापुरी चपलांनी वाड्याचा उंबरा ओलांडला आणि वाड्याचे अंगण त्यांच्या तेजाने न्हाहून निघाले.

विश्वासचे कुतूहल वाढतच चालले होते. मोहनराव त्या व्यक्तीकडे टक लाऊन पाहत होते. तेवढ्यात-
" दाजी तू आलास.. "

नाना वरच्या मजल्यावरून अत्यानंदाने ओरडले. त्याचवेळी विश्वासला कळाले की हेच ते नानाचे मित्र दाजी.

" मोहनराव आपल्याला अजून एक महत्वाचा दुवा मिळाला. दाजी भेटले. ", विश्वास मोहनरावांच्या कानात हळूच बोलला. मोहनराव अजूनही त्याच तंद्रीत होते.

" अरे मोहन, त्याला दारातच उभा करणारेस काय ? "

नानाच्या ओरडण्याने मोहनराव भानावर आले.

" मोहन, जा, आत जाऊन पाणी घेऊन वर ये. आणि दाजी तू विश्वासला घेऊन वर ये पटकन. " नाना एकदम खुश होऊन बोलत होते. एवढे आनंदी ते याआधी कधीच झाले नव्हते.

मोहनराव गोंधळून गेले. थोड्या वेळापूर्वी नानांनी विश्वासला घरी सोडून यायला सांगितले होते आणि आता ते त्याला वर बोलवत आहेत. असे कसे विचित्र वागत आहेत ते...? त्याने नानांकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली. नाना त्या नजरेचा अर्थ ओळखून मोहनरावांना म्हणाले, " वर आल्यावर सांगेन. तू पटकन दाजीसाठी पाणी घेऊन ये. "

मोहनराव आत पाणी आणायला गेले. दाजी व विश्वास जीना चढू लागले.

*****

" काय रे हे दाजी...किती उशीर लावलास ? मी तर आशा सोडून दिली होती. विश्वासलासुद्धा मी परत पाठवत होतो. बरं झालं तू वेळेवर आलास. थोडक्यात चुकामुक झाली असती."

" अरे नाना, मला काही बोलू देशील का नाही ! तूच किती बोलतो आहेस. जरा थांब. "

" मग तू परत यायला किती उशीर लावलास ?"

" अरे परिस्थिती तशी निर्माण झाली होती. त्यामुळे वेळ लागला. खरतर आपलं काम तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं. पण वेळच अशी होती की त्या परिस्थितीला तोंड देणं अत्यावश्यक होतं नाहीतर फार मोठ्ठ संकट आलं असतं आपल्यावर. "

" बर. जे आपल्याला हवं होतं ते मिळालं ना. आता काय करायचं ते सांग."

विश्वास दोघांच्या तोंडाकडे नुसता पाहत बसला होता. हे दोघे काय बोलत आहेत हे त्याला काहीच कळत नव्हत. तेवढ्यात मोहनराव पाणी घेऊन आले, दाजींना पाणी देऊन ते विश्वासच्या शेजारी येऊन बसले.

" नाना, थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की विश्वासला सोडून ये, आणि आता-"

" थोड्या वेळापूर्वी इथे दाजी नव्हता.",नाना मोहनरावांचे वाक्य तोडत म्हणाले, " त्याच्या येण्याने आता फार काही बदल होणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आता 'त्या'चा विनाश अटळ आहे. "

" आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आता मी जी गोष्ट सांगणार आहे, ती फक्त मला आणि दाजीला माहित आहे. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे आता त्या साऱ्या गोष्टी सांगायची वेळ आली आहे."

नानाचे हे बोलणे ऐकून विश्वास आणि मोहनराव सरसावून बसले आणि लक्ष देऊन ऐकू लागले.

" मोहनने बाबांचं पत्र वाचलेलं आहे. त्यात असलेल्या उल्लेखानुसार विश्वास हा दामलेंचा वारसदार आहे. विश्वास हा माझा नातू म्हणजेच प्रभाकरचा मुलगा आहे. "

मोहनराव आणि विश्वास अचंबित होऊन नानांकडे पहातच राहिले. विश्वासला धक्काच बसला. त्याला हे सारं काय चालु आहे कळत नव्हतं, रहस्यावर रहस्ये चढत चालली होती, कशाचा काही उलगडा होत नव्हता. आता थोड काही चांगलं कळेल असं वाटत असतानाच नानांनी आणखी एका रहस्यात टाकलं.

" पण हे कसं शक्य आहे ? माझे आई-बाबा तर एका कार अपघातात वारले आहेत. मग-"

" तुझे आई-वडील कार अपघातात नाही वारले.", विश्वासचे वाक्य तोडत नाना त्याला म्हणाले, " त्याच बाबतीत मी काही महत्वाच्या गोष्टी आता सांगणार आहे. " असे म्हणून नानांनी पाण्याचा एक घोट घेतला आणि परत बोलू लागले,

" बाबांनी जे पत्र लिहून ठेवलं होतं तसं पत्र आपल्या घराण्यात बऱ्याच वेळा लिहिलं गेलं आहे. त्या पत्राबद्दल विशेष गोष्ट अशी की ज्याला ते पत्र मिळत, तोच 'त्या'च्याविरुद्धच्या मोहिमेवर जाऊ शकतो. कारण ते पत्र फक्त दामले घराण्याच्या अशा वारसदाराला मिळतं जो 'त्या'च्याशी लढू शकेल आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते पत्र त्याच वेळी बाहेर पडत जेंव्हा त्याच्याशी लढायची वेळ आलेली असते. यावेळी हे पत्र तुला मिळालं आहे ज्याचं निमीत्त ठरली तुझी "भयानक" कादंबरी. त्यामुळे आता तुला तयारी करायला हवी. "

" पण सध्या विश्वासची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. त्याला आपण सकाळी भेटलेलो तेसुद्धा लक्षात नाहीये. त्याला आपल्या घराण्याबद्दल काहीच इतिहास माहिती नाही. शिवाय 'त्या'च्याशी सामना कसा करायचा हे सुद्धा माहित नाही आणि तुम्ही त्याला तयारी कर म्हणताय. कसा काय तो काही करू शकणार आहे ? ", मोहनरावांनी शंका उपस्थित केली.

" तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तुलासुद्धा संपूर्ण इतिहास माहित नाही. ऐक आता शांतपणाने. आपले पूर्वज चंद्रकांतराव दामले, ह्यांनी जेंव्हा 'त्या'च्या पूर्वजांना मारले. तेंव्हा त्याचं बदला म्हणून त्या पूर्वजाने दामले घराणे निर्वंश करायचा निर्धार केला. त्याची प्रत्येक पिढी हा प्रयत्न करते पण त्याला यश येत नाही. याला कारण आपल्या पूर्वजांनी केलेला पुण्यसंचय. आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून आपण आज जिवंत आहोत. गेली अनेक वर्षे तो काही ठराविक वर्षांनी त्या वर्षातल्या एका पौर्णिमेला आपल्यावर हल्ला करतो आणि आपण तो परतवून लावतो. पण हे असं किती दिवस चालणार ? म्हणून मागल्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी होतो. आम्ही त्याचा हल्ला परतवून लावला आणि एवढंच नाही तर त्याच्यावर उलटा वार केला. त्याचा यज्ञ खंडीत झालं पण अत्यंत खेदाची गोष्ट, बिचाऱ्या माझ्या मुलाचा-प्रभाकरचा यात बळी गेला."

प्रभाकराच्या आठवणीने नानांचे डोळे पाणावले. पुढे दाजी बोलू लागले,

"म्हणून आम्ही डोकं चालवलं आणि विश्वासला या साऱ्यापासून दूर ठेवलं. दामले घराण्यात जेंव्हा व्रतबंध करतात तेंव्हा त्यासोबत अजून एक विधी केला जातो. त्यात त्या मुलाचे वडील त्याला घराण्याचे सारे संस्कार करतात शिवाय एक विद्या त्याला शिकविली जाते ज्याचा वापर 'त्या'च्या विरुद्ध लढताना केला जातो. विश्वासलासुद्धा ही विद्या अवगत आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की यावेळी "तो" सुद्धा असंच विचार करतोय की यावेळी सगळा खेळ संपवून टाकावा. यासाठी त्याने बुवांना बोलावले आहे. बुवा म्हणजे काळ्या माया-जगतातील महान व्यक्ती. आत्तापर्यंत बुवांना कुणीही आव्हान दिलं नाहीये कारण त्यांना आव्हान देणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आणि आपण "त्या"च्याविरुद्ध लढणार म्हणजे बुवांना अप्रत्यक्षपणे दिलेलं आव्हानच आहे. त्यामुळे यावेळी विश्वासला सर्व तयारीनिशी सज्ज राहावे लागणार आहे. तसेच मी काही नवीन विद्या त्याला शिकवणार आहे. बुवा ही व्यक्ती अतिशय ताकदवर आणि हुशार आहे. त्यांना जर हरवायचे असेल तर विश्वासला अस्त्रविद्याही शिकावी लागेल. त्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत घ्यावे लागतील. दुसरा पर्यायच नाहीये. "

इतका वेळ विश्वास तिघांकडे पहात नुसतं ऐकत होता. पण डोक्यात उडालेल्या गोंधळाने त्याला वाचा फुटली.

" आतापर्यंत मी तुमचं सगळ ऐकलं. त्यावरून मला काही प्रश्न पडलेत. "

" निःसंकोचपणे विचार ", नाना.

" तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी तुमचा नातू आहे. तर मग या गोष्टीला पुरावा काय ? जरी ही गोष्ट खरी असेल तर मग मला कसे काही आठवत नाही ? "

विश्वासचे शंका निरसन करण्यासाठी नाना सांगू लागले,

" इथेच सारी कहाणी सुरु होते. सुमारे २५-२६ वर्षांपूर्वीची घटना आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. संध्याकाळची वेळ होती. आम्ही त्याच्या आघातापासून स्वतःचे रक्षण केले आणि त्याच्यावर आघात करण्याच्या तयारीस लागलो होतो. रात्री नऊच्या आसपास आमची तयारी पूर्ण झाली. ठरल्याप्रमाणे पहिला आघात मी करणार होतो, मग नंतर दाजी आणि नंतर प्रभाकर. पण "विनाशकाले विपरीत बुद्धी".. ऐनवेळी प्रभाकरला काय झाले की तो म्हणाला पहिला आघात मी करतो. मीही बुद्धी फिरल्याप्रमाणे त्याला संमती दिली. प्रभाकरने आघात मंत्राचा पहिला चरण म्हणाला आणि आघात केला. तोच आकाशातून एक चमकता किरण सुसाट वेगाने आला आणि प्रभाकर वर आदळला. आधी आम्हाला काही कळेना. मी आणि दाजीने आमची शक्ती एकवटली आणि अंतःचक्षु उघडले असता आम्हाला कळाले की "त्या"ने आघात-निवारण याग सुरु केला होता. जो याग पूर्ण होताच त्याच्यावर कुठलाच आघात काम करणार नव्हता आणि तो शक्तिशाली बनणार होता. त्या यागामुळे प्रभाकरने केलेला आघात त्याच्यावरच उलटला आणि त्यातच प्रभाकरचा प्राण गेला. मग आम्ही परत अंतःचक्षूच्या सहाय्याने पाहिले, त्याचा शेवटचा चरण चालू होता. तो जर पूर्ण झाला असता तर याग संपूर्ण झाला असता. पण तो पूर्ण होऊ द्यायचा नव्हता आणि अशा ऐनवेळी आम्हाला काही उपाय योजना करणे फार अवघड होऊन बसले. मग आम्ही कृत्रिम पाऊस निर्माण केला आणि त्याच्या यज्ञात बाधा आणली. जेणेकरून त्याचा याग सफल होऊ नये. आमचा हेतू साध्य झाला. त्याचा यज्ञ खंडीत झाला. मग त्याला घाबरवण्यासाठी दाजीने आकाशवाणीद्वारे संदेश पाठवला. त्याचा यज्ञ अपूर्ण राहिला. पण इकडे प्रभाकरचा जीव गेला. तेंव्हा तू एक-दीड वर्षाचा होतास. मग आम्ही तुला जेऊरकरांच्या घरी सोपविले. त्यांनाही मुलगा हवा होता. मग त्यांनी तुला दत्तक घेतले. दुर्दैवाने श्री व सौ जेऊरकरांना काळाने आपल्या पोटात ओढले. तुझ्या व्रतबन्धाची वेळ येताच व्रतबंध व आपले खानदानी संस्कार व विद्या तुला दिली. पण नियती.. "

नानांनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले,

" नियतीच्या मनातील विचार कधी ओळखता येतात का ? जरी ओळखता आले तर ते आपण बदलू शकत नाही. तसंच काहीसं तुझ्याबाबतीत झालं. आम्ही विचार केला की तू जर आमच्यापासून दूर राहिला तर ते पत्र तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मग तुला "त्या'च्याशी लढायची वेळच येणार नाही. तसं झालंही असतं जर तू "भयानक" लिहिली नसतीस तर. तू भयानक लिहिलीस आणि तुझ्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्या स्मृतींद्वारे नियती जागृत झाली आणि मग पुढच्या घटना अशा रीतीने घडत गेल्या की त्या ठरल्या आहेत असं वाटणारही नाही. शेवटी ते पत्र तुझ्या हातात पडलं, तू इकडे आलास आणि....... आता नियतीचे आपल्याला ऐकले पाहिजे. "

विश्वासच्या चेहेरयावर किंचितसे समाधान दिसले आणि तो लढायला तयार आहे असे वाटले. मग नाना दाजीकडे वळून म्हणाले,

" दाजी तू मगाशी बोललास की त्याने बुवांना बोलावले आहे. तुला कसे कळाले ? "

यावर दाजी हसून म्हणाले,

" अरे म्हणून तर मला उशीर परतायला उशीर झाला ना. आपलं काम आधीच झालं होतं. मी जी विद्या संपादन करायला गेलो होतो ती विद्या कधीच मिळाली मला. ही विद्या फार दुर्मिळ आहे. तिचे नाव "आत्मा संमोहन विद्या" आहे. कठोर तपश्चर्या केल्यावर ही विद्या मिळते. त्यामानाने मला ती फारच सहज मिळाली असे म्हणावे लागेल. इथून उत्तरेकडे ९-१० मैलांवर एक शांत, सुंदर जंगलात एक डोंगर आहे. त्या डोंगरात एक गुहा आहे. तिथे साडेसातशे वर्षांपूर्वी एक फार महान ऋषी रहायचे. त्याच्या निवासाने ती जागा पवित्र झाली होती. मी तिथेच तपश्चर्येला बसलो. मी तिथे फलाहार आणि जलाहार करायचो. फक्त साडेचार वर्षात ते ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी मला ही विद्या दिली. मी तिथून निघालोच होतो. पण तेवढ्यात मला कुणीतरी गुहेत येत असल्याची चाहूल लागली. मी तिथल्याच एक कपारीत दडून बसलो आणि पाहू लागलो कोण येतंय ते. एवढ्या निर्जन ठिकाणी कोण कशाला बरे येईल. आधी मला वाटले की जंगली श्वापदे असावीत. पण मग माणसाच्या बोलण्याचे आवाज आले. त्यांच्यातला एकजण बोलला "

" आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"

" असे म्हणून तो हसू लागला. त्याच्या पाठोपाठ दुसरी व्यक्तीही हसू लागली. दोघांनी जोरजोरात हसत गुहेच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केला. मी तिथेच जवळ लपलो होतो. त्यांना मी दिसत नव्हतो पण ते मला दिसत होते. ते माझ्या दृष्टीपथात आले आणि त्यांचे चेहेरे पाहून मला धक्काच बसला. "

7

त्या दोघांतील एक व्यक्ती म्हणजे बुवा होते. त्यांना पाहून मला प्रश्न पडला की बुवा इथे कशाला आले आले असावेत. बुवा सहसा इतक्या निर्जन ठिकाणी जात नाहीत. प्रथम मला वाटले की ते कुठलीशी योगसिद्धी प्राप्त करण्यासाठी आले असावेत. पण माझा अंदाज साफ खोटा ठरला. ते एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. एवढ्यात तिथे आणखी ७-८ जण आले. मला वाटले, ते सारे बुवांचे सहकारी असावेत. बुवा त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले,

" आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"

आणि बुवा जोरजोरात हसू लागले. त्यांच्या पाठोपाठ त्या दुसरा व्यक्तीनेही हसायला सुरुवात केली. त्यांनी हसणे थांबवले पण हसण्याचा आवाज येताच होता. मलाही काही समजेना की हा हसण्याचा आवाज नक्की येतोय कुठून ? ते हास्य वाढू लागले. कानांना असह्य झाले. बुवांचे सारे शिष्य कानावर हात ठेवू लागले. ते सारेजण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. मागोमाग तो दुसरा माणूसही बेशुद्ध झाला. बुवा त्या आवाजावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज काही केल्या कमी होत नव्हता. तो तर अजूनच वाढत चालला होता. मग मलाही तो आवाज कानांना असह्य झाला. कान बधीर व्हायची वेळ आली होती. पुढे काय झालं कळालंच नाही. मीही त्या आवाजाने बेहोश झालो होतो.

मी किती वेळ बेशुद्धावस्थेत होतो ठाऊक नाही. गुहेच्या मध्यवर्ती भागात असल्याने वेळेचा अंदाज येत नव्हता. कदाचित संध्याकाळ झाली असावी कारण छताला असणाऱ्या छिद्रातून येणारा प्रकाश कमी झाला होता. मी उठलो आणि समोर पाहिले. बुवा किंवा त्यांचे सहकारी कुणीच नव्हते तिथे. मी हळूच त्या कपारीतून बाहेर आलो. ती जागा स्वच्छ केली होती. यज्ञकुंडात लाकडाच्या काटक्या रचून ठेवल्या होत्या. त्याच्या शेजारी पूजेचे सामान होते. आसने मांडलेली होती. बहुतेक बुवा एक मोठ्ठा यज्ञ करणार होता. ते सारेजण बाहेर कुठेतरी गेले होते. तीच वेळ साधून मी तिथून बाहेर पडलो आणि तडक इकडे आलो. तुला माहितीये का नाना, ती दुसरी व्यक्ती कोण होती ? "

दाजींनी दोन सेकंद नानाच्या प्रश्नांकित चेहेऱ्याकडे बघितले आणि ते म्हणाले,

" """"" तो ' तो ' होता. दामलेंच्या जीवावर उठलेला दामले घराण्याचा कट्टर वैरी. "

विश्वास आणि मोहनरावांनी चमकून दाजींकडे पाहिले. नाना अजूनही प्रश्नार्थक मुद्रेने दाजींकडे पाहत होते.

" अरे पण तुला कसं काय कळाले की तो 'तो' होता ? ", नाना.

" हीच तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शुद्धीवर आल्यावर मी त्या गुहेतून बाहेर पडलो. मला वाटले तसे संध्याकाळ होत होती. संध्याकाळची संध्या करण्यासाठी तलावाकडे निघालो. आपल्या आसपास कुणी नाही ना याचा कानोसा मी घेत होतो. जरी पकडलो गेलो असतो तर काही झाले नसते किंबहुना त्यांनी मला पकडलाच नसतं पण मला एक महत्वाची गोष्ट पुढे कळाली ती कळाली नसती. मी संध्या करण्यासाठी तलावाजवळ पोहोचतो तोच मला तलावाच्या काठावर बुवा ध्यान लाऊन बसलेले दिसले. त्यांना समोर पाहून मी दोन पावले मागे सरकलो. मी तिथून जरा दूर बुवांच्या नजरेस न पडता संध्या आटोपली आणि उठून परत घरी येण्यास निघालो. एका ठिकाणी झुडूपामागून मला कुजबुज ऐकू आली. तिथे काय चाललंय हे पाहावं म्हणून मी त्या झुडूपाजवळ जाऊन दोन फाटे बाजूला सारून पलीकडचे पाहू लागलो. तो दाजींच्या सोबत आलेला बाकीच्या सहकाऱ्यांना भाषण देत होता - "

" यावेळी आपण हरायच नाही. त्यांचा पूर्ण विनाश करायचा. त्या दामल्यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे."

त्याच्या तोंडून दामले हे नाव ऐकताच मला आश्चर्यही वाटले आणि कुतूहलही. मी आणखी लक्ष देऊन ऐकू लागलो.

" मागल्या वेळी त्या हरामखोर नानाची चाल आपल्याला मारायचीच होती. पण ऐनवेळी मला त्याच्या डावाचा सुगावा लागला आणि मी तो यज्ञ सुरु केला म्हणून आपण वाचलो. नाहीतर त्याच्या त्या आघाताने मी आणि माझ्यानंतर तुम्ही सारे ठार झाला असतात. "

" पण नाना आम्हाला कशाला मारतील. त्याचं वैर तर तुमच्याशी आहे ना ? ", एकाने शंका उपस्थित केली.

" हो ना. तुमच्याशी नानाचा काही संबंध नाही पण हे त्या अविवेकी नानाला काय माहित ! भडक डोक्याचा आणि एक लुच्चा माणूस, तो सरसकट सर्वांना ठार करणार. आपण त्याच्या कचाट्यातून वाचलो हे बरं झालं. पण यावेळी त्याला आणि त्याच्या घराण्याला ठार केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. "
तो अगदी चवताळून बोलत होता.

" आपण सारे जण या ठिकाणी यासाठीच थांबलो आहोत. आपले या आठवड्यातले सगळे यज्ञ सुरळीत पार पडले की मग आपल् कार्य सफल झालंच म्हणून समजा. शिवाय बुवाही आपल्यासोबत आहेत. हे बुवा म्हणजे काळ्या मायाजगताचे देव आहेत. आजतागायत कुणी त्यांच्या नखालासुद्धा स्पर्श करू शकला नाही. मोठे मोठे मांत्रिकसुद्धा त्यांच्या पायाशी लोळून गेले आहेत. अशा या मायाराज बुवांचा आपल्या पाठीवर हात आहे म्हणल्यावर कशाची चिंताच नाही. येत्या पौर्णिमेला आपण अजातशत्रू झालेले असू. हीच ती पौर्णिमा. बरोबर २५ वर्षापूर्वी, आपण सारे थोडक्यात बचावलो होतो. त्याच पौर्णिमेला दामले मरणार आणि माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळणार. "

" या वाक्याने मी जरा दचकलो आणि हातात धरलेला फाटा सुटला. झुडुपातून सळसळ ऐकू आल्याने त्याचं बोलणं थांबल आणि ते सारे त्या झुडूपाकडे पाहू लागले. त्याबरोबर मी चटकन तिथून पसार झालो. मग मी घरी आलो. चार घास खाल्ले आणि लगेच इकडे आलो. "

दाजी बोलायचं थांबले. सारेच जण काही वेळ शांत होते.

" आपण त्या काळ्या शक्तींवर विजय कसा मिळवायचा ? त्याला हरवायच कसं ? "

दाजींनी सांगितलेल्या घटनेने सारेजण खिन्न झाले होउन विचार करत होते. विश्वासच्या प्रश्नाने त्यांना जरा दिलासा आला. नाना उभे राहून म्हणाले,

" बोलता बोलता बराच उशीर झाला. रात्रीचे आठ वाजत आलेत. आज रात्री मी आणि दाजी चर्चा करतो आणि काय करायचं ते तुम्हाला उद्या सांगतो. "

ते विश्वासकडे वळून म्हणाले,

" विश्वास, तारिकाला तू इथे बोलवून घे. कारण आता येत्या पौर्णिमेपर्यंत तरी तुला कुठेही जाता येणार नाही. तोपर्यंत ती इथेच राहील. आणि दाजी, तूसुद्धा आज इथेच रहा. आता आपण जेवण करायला जाऊया. "

******************************************************************************

सकाळचे ९ वाजले होते. नाना आणि दाजी त्यांच्या खोलीत बसले होते. आता यापुढे काय करावं लागेल याचा विचार करत होते.

" तुला काय वाटतं दाजी ? आपण बुवांना हरवू शकू का ? ", नाना.

" बहुतेक हो. ", दाजी.

" अरे त्याचं सामर्थ्य फार आहे, त्यांची शक्ती अचाट आहे. त्यांच्या शक्तीपुढे आपण म्हणजे हत्तीपुढे वाघ-सिंह. आपण 'त्या'च्याविरुध्द लढतोय म्हणजे बुवांना दिलेलं आव्हान आहे आणि बुवांना आव्हान म्हणजे .... "
" माहित आहे. पण माझ्याकडे एक युक्ती आहे ज्याने आपण बुवांना हरवू शकणार नाही पण त्या'ला ठार करू शकतो. "

" मग त्यावेळी बुवा प्रतिकार करणार नाहीत का ?"

" नाही. कारण बुवा त्यावेळी सुप्तावस्थेत असतील. त्यांना सारे दिसत असेल आणि कळतपण असेल पण ते काहीच करू शकणार नाहीत. "

" अरे दाजी, हे कसं शक्य आहे. ते बुवा आहेत बुवा. त्यांना काहीही करणं ही काही छोटी गोष्ट नाही. "

" नाना तू एक गोष्ट विसरतो आहेस. मी "आत्मा संमोहन विद्या" प्राप्त करून घेतली आहे. त्याद्वारे आपण बुवांच्या मेंदूचा ताबा घेऊ शकतो. "

एवढ्यात विश्वास आणि मोहनराव खोलीत आले. त्यांना बसायला सांगून नानांनी दाजींकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली. त्या नजरेचा अर्थ ओळखून दाजी म्हणाले,

" मला माहितीये की बुवांच्या मेंदूचा ताबा घेणं सहजासहजी शक्य नाही होणार. पण त्यावरही एक उपाय माझ्याकडे आहे."

" कुठला ? ", नानांनी उतावीळपणे विचारले.

" आज आहे पंचमी, म्हणजे आपल्याकडे अजून १० दिवस आहेत. खरंतर ते कमी आहेत पण दुसरा काही पर्याय नाही. इथे जवळच गावाबाहेर एक महादेवाचं मंदिर आहे. गावाबाहेर असल्याने सहसा तिकडे कुणी जात नाही. तिथे प्रशस्त, शांत, सुंदर जागा आहे. आजूबाजूला झाडी आहे. गावाबाहेर असल्याने शांत, झाडीमुळे थंड अश्या त्या जागी आपल्या साधनेस अनुकूल असे वातावरण आहे. तिथे मी आत्मा संमोहनाला प्रबळ करण्यासाठी साधना करेन. त्याच वेळी तू तिथे विश्वासच्या मेंदूला जागृत कर."

" एक मिनिट, माझ्या मेंदूला जागृत ...? ", विश्वासने मधेच वाक्य तोडले.

" अरे विश्वा, तुला त्याच्या शक्तीची कल्पना नाही. या दामले घराण्यात व्रतबन्धासोबत एक विधी केलं जातो हे मी तुला आधीच सांगितलं आहे. त्यात त्या मुंज्याला मंत्र-तंत्र-अस्त्र-विद्यादी ज्ञान दिले जाते. तो विशी तुझ्यावर केला पण लगेचच आम्ही आणखी एक काम केलं की तुझ्या मेंदूच्या त्या भागाला निद्रावस्थेत ठेवलं. कारण तसं केलं नसतं तर 'त्या'ने तुझ्या मेंदूतल्या स्मृतींद्वारे तुला केंव्हाच शोधून काढला असता आणि ठार केला असता. म्हणून तुझ्या मेंदूला निद्रावस्थेत ठेवले. आता या आठवड्यात आपण त्या विधीचा प्रतिविधी करणार आहोत. "

दाजी बोलायचं थांबले. तेवढ्यात मोहनरावांच्या पत्नी चहा घेऊन आल्या. साऱ्यांनी चहाचे कप उचलले. नाना चहा पीत बोलले,

" विश्वास, तू आता घरी जा. तारिकाला घेऊन ये आणि तुझ्या कंपनीत रजेची मुदत वाढवून ये. आणि मोहन तू... "

मोहनरावांनी नानांकडे पाहिले,

" तसं तुला काहीच काम नाहीये पण तू आमच्या सोबत तिथे येणार आहेस. न जाणो आम्हाला तिथे तुझी मदत लागेल. त्यामुळे तूसुद्धा चलायचं. "

साऱ्यांचा चहा पिऊन झाला. ते सारे उठले. विश्वास निघाला.

" आता विश्वासला जाऊन यायला साधारणतः दोन-अडीच तास लागतील. तोपर्यंत सारेजण विश्रांती घ्या. आजच चार वाजता आपल्याला निघायचं आहे. "

विश्वास, दाजी आणि मोहनराव नानाच्या खोलीतून बाहेर पडले.

दोन तासांनी विश्वास तारिकाला घेऊन परत आला. साऱ्यांनी दुपारच जेवण केलं. विश्वासची कार दरवाज्यातच होती. चौघे कारमध्ये बसले. दारात उभ्या असलेल्या बायकांकडे पाहून त्यांनी हात हलवून निरोप घेतला आणि कार गावाबाहेरच्या मंदिराकडे निघाली.

8

" हलगर्जीपणा करू नकोस. याचा मला नाही तुलाच तोटा होईल. "

बुवा संतापले होते.कारण 'त्या'चे यज्ञात लक्ष नव्हते. मंत्रपठणाच्या वेळी दर एक चरण झाल्यावर पळीभर तूप आहुती द्यायची असते. पण तो कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात मग्न होता. त्याने याधी दोन वेळा आहुती चुकवली होती आणि त्यामुळे त्यांना तो यज्ञ दोन वेळेस परत सुरुवातीपासून सुरु करावा लागला होता. त्याची आहुती चुकण्याची हि तिसरी वेळ होती. त्यामुळे बुवा भयंकर संतापले होते. त्यांना वेंधळेपणा आणि बेशिस्त मुळीच खपत नसे.

" आधीच तर तुझ्यामुळे आपल्याला हा यज्ञ दोनदा पहिल्यापासून करावा लागला आहे. आणि आता परत... तुला मी आता शेवटची संधी देतोय. यापुढे एकदाही तू आहुती चुकवली किंवा काही गडबड केली तर मी निघून जाईन. "

" नाही नाही. चुकल माझं. आता यापुढे मी नित लक्ष देऊन सगळ्या क्रिया करेन. पण तुम्ही निघून जाऊ नका. तुम्ही गेलात तर माझं काय होईल ? "

" बस बस. मी जात नाहीये पण ही शेवटी म्हणजे शेवटची संधी. तसं म्हणलं तर मी तुझ्याबरोबर असताना तुला कशाची चिंता आहे ? "

" बुवा, एक गोष्ट मी तुम्हाला नाही सांगितली. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी इथे दाजी येऊन गेलाय. दाजी म्हणजे नानांचा जिवलग यार. त्याने इथे काय काय पाहिलं ते नक्की माहित नाही पण तो इथे आला होता म्हणजे नक्कीच त्याने आपली तयारी पाहिली असणार. तसेच त्याला आता आपला ठावठिकाणा पण माहित झाला. पण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आता - "

" त्याने काय फरक पडतो आपल्याला ? हे पहा, आपण जो शक्तीकामना यज्ञ करत आहोत. त्याचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता हा पाचवा टप्पा चालू आहे. आणि येत्या ८-१० दिवसात उरलेले तिन्ही टप्पे पूर्ण होतील. अर्थात तू आत्तासारखं नाही वागलास तर. मग हा यज्ञ पूर्ण होताच तू खूप शक्तिशाली होशील आणि तू केलेल्या आघाताचा ते प्रतिकारसुद्धा करू शकणार नाहीत. मग तुला तुझा वर्षानुवर्षाचा पण पूर्ण करता येईल. आता सांग आणखी काही चिंता ?"

बुवांच्या बोलण्याने 'त्या'चे समाधान झाले.

" बुवा, आता मी दुसरीकडे कुठेच लक्ष देणार नाही, कशाचा वायफळ विचार करत बसणार नाही. आता आपलं लक्ष फक्त शक्तीकामना यज्ञावर. खरच बुवा तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार करताय, त्याचे ऋण मी कसे फेडू ? "

" अरे बाळ, यात कसले उपकार. संकटात सापडलेल्या आपल्या काळ्या मायाजगतातील लोकांना मदत करणे हे माझे कामच आहे. "

" आणि म्हणूनच सारेजण तुम्हाला 'मायाराज' म्हणतात."

या वाक्यावर बुवांनी खुश होऊन एक स्मितहास्य दिले. आनंदून गेलेल्या त्या साऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने यज्ञाला सुरुवात केली.

*******

" अजून किती वेळ आहे पोहोचायला ? "

एका निर्जन रस्त्यावरून विश्वासची कार धावत होती. सहा वाजत आले होते. सूर्यदेवही जाण्याच्या तयारीत होते. पक्षी आपापल्या घरट्याकडे परतत होते. चौघेही आता एका मोठ्या मोहिमेवर निघाले होते.बऱ्याच पिढ्यांपासून चालत आलेल्या युद्धाचा आता शेवट होणार होता की इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती, देव जाणे ! पण चौघांनीही ठाम निश्चय केला होता की 'त्या'ला संपवयाचा आणि या युद्धाला पूर्णविराम द्यायचा. त्याचवेळी तिकडे 'तो'सुद्धा या चौघांच्या विनाशाची तयारी करत होता.नेहमीप्रमाणे दामले आणि 'त्या'च्यात युद्ध होणार होते पण यावेळी दोन प्रबळ शक्ती सर्व ताकदीनिशी झुंजणार होत्या. 'त्या'ची अर्ध्याधिक तयारी झाली होती. नानाच्या तयारीला अजून अवकाश होता. उद्यापासून ते यज्ञ आणि पूजा-अर्चा सुरु करणार होते. सर्व रस्ता आणि आसपासचा परिसर निर्जन होता. दूरदूरवर कुठेही जंगल वा गर्द झाडी दिसत नव्हती. इच्छित स्थळाचा नेमका अंदाज न आल्याने विश्वासने नानांना विचारले,

" अजून किती वेळ आहे पोहोचायला ? "

" अजून १५-२० मिनिटात आपण पोहचू. "

" पण इथे तर कुठेच झा..."

" अरे तू फक्त १५ मिनिटे धीर बाळग आणि स्वस्थपणे गाडी चालव. "

विश्वास शांत होऊन समोर कुठे झाडी दिसते का याचा अंदाज घेत गाडी चालवू लागला. थोड्या वेळानी नानांनी विश्वासला डावीकडे वळायला सांगितले.तिथे फक्त दोन झाडे दिसत होती. त्या दोन झाडांमधून विश्वासला गाडी घ्यायला सांगितले. विश्वास चक्रावला. ह्या दोन झाडांमधूनच कशाला बाजूने एवढी मोठी जागा असताना ? पण नानांचा आदेश त्याने पाळला. त्याने कार दोन झाडांमधून नेली आणि क्षणभर विश्वासला झटका बसल्यासारख झालं आणि लगेच परत पूर्ववत झाला तो. पण समोर जे काही दिसलं त्याला ते पाहिलं आणि जागच्या जागी त्याने कार थांबवली.

ते समोरचे दृश्य फारच विलोभनीय होते. नानांना गाडीतून उतरताना पाहून बाकीचे तिघेही कारच्या बाहेर आले. विश्वास प्रथम आपली मान वळवून मागे पाहू लागला आणि त्याला ती दोन झाडे दिसेचनात जिथून तो आला होता. मागेतर पूर्ण गर्द झाडी होती आणि एक झरा समोरून त्या झाडीत खळखळ आवाज करत वाहत होता. विश्वास परत समोर पाहू लागला. एका उंच कड्यावरून पाणी मंजुळ आवाज करीत पडत होते. ते फेसाळलेले शुभ्र पाणी झऱ्यातून वाहत होते. तो पाण्याचा वाहणारा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. त्या हिरव्यागार वनराईतून वारादेखील गाणे गुणगुणत होता. शहरात कधी न दिसणारे ते पक्षी मंजुळ किलबिल करत होते. एकूणच वातावरण शांत आणि सात्विक होते. अशी जागा विश्वासने उभ्या आयुष्यात कधी पहिली नव्हती. त्यामुळे तो या वातावरणात हरवून गेला होता. नानांनी त्याला हाक मारली तसा तो भानावर आला.

" अरे विश्वास कुठे हरवलास ? "

" क..कुठे नाही. फार आल्हाददायक आहे इथलं वातावरण. पण आपण इथे कसे आलो ? ती दोन झाडे आणि तो निर्जन परिसर..... ? "

" अरे हीच ती जागा जिथे आपल्याला आपला यज्ञ पूर्ण करायचाय. ती मागची दोन झाडे म्हणजे गुप्त प्रवेशद्वार आहे. फार पूर्वीपासून ऋषीमुनीसुद्धा इथेच यायचे तपश्चर्येसाठी. आता ही कार इथेच राहु देत. इथून सरळ - " एका पायवाटेकडे हात दाखवत ते म्हणाले, " या पायवाटेने चालत गेलो कि आपल्याला महादेवाचे मंदिर लागेल. तिथे आपल्याला यज्ञ करायचाय. "

सारेजण त्या पायवाटेने चालत निघाले. समोर महादेवाचे मंदिर आले. सर्वानी महादेवाचे दर्शन घेतले आणि बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसले. तोच एक माणूस धापा टाकत तिथे आला आणि नानांना म्हणाला,

" अवो मालक माफी करा. जरा उशीर झालं. ते तुमच्याच राह्याची जागा सोच्च करत व्हतो. "

" असू देत. ये तुझी ओळख करून देतो. हा महादू. आपला गडी, याने अन याच्या गेल्या चार पिढ्यांनी आपली इमाने इतबारे सेवा केली आहे. आपली राहायची, खायची व्यवस्था हा बघणार आहे. तसेच युद्धातही लागेल ती मदत हा करेलच. आणि महादू, दाजीला तर तू ओळखतोच. हा विश्वास माझा नातू आणि हा मोहन माझा पुतण्या. आता जा झऱ्यातून थंडगार पाणी घेऊन ये. "

महादुने सगळ्यांना नमस्कार केला व पाणी आणायला निघून गेला.

नानांनी बोलायला सुरुवात केली.

" सर्वात पहिली गोष्ट अशी कि हे सारे करताना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मनोनिग्रह. खंबीर मनोनिग्रह असल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही. आणि आत्मविश्वास किंचित जरी ढळला तरी तो त्याच्या पथ्यावर पडू शकतो. म्हणून विश्वास, तू मनाची तयारी कर. या युद्धात असे बरेच क्षण येतील जे तुझे मानसिक संतुलन बिघडवतील. त्यावेळी तुला तुझ्या मनाला खंबीर ठेवावे लागेल. मला कळतंय की तुला हे सारे नवीन आहे. पण आता काही पर्याय नाहीये. अजून १० दिवस आहेत आपल्याकडे. या दहा दिवसात दाजी तुझ्या निद्रितावस्थेतील मेंदूला जागे करील. त्याच वेळात मीही इकडे शक्तिवर्धन यज्ञाला सुरुवात करेन. दाजीला आत्मा संमोहन विद्या प्राप्त आहेच. तिघांच्याही शक्ती एकत्र केल्या तर 'तो'च काय त्याचा बुवा पण आडवा पडेल. "

तेवढ्यात महादू पाणी घेऊन आला. सारेजण ते झऱ्याचे गोड पाणी प्याले. थंड पाणी प्यायल्यामुळे आणि नानाच्या बोलण्याने विश्वासच्या चेहऱ्यावर तरतरी आली होती.

" मोहन सध्यातरी तुझे काहीच काम नाहीये. पण कदाचित नंतर तुझी गरज लागेल. त्यामुळे तू नेहमी आमच्या सोबत रहा. मी गरज पडली कि तुला सांगेनच. आता सर्वाना एका शांत आणि दीर्घ विश्रांतीची गरज आहे. कारण उद्यापासून सलग दहा दिवस आपल्याला फार कमी वेळ आणि सावध झोप घ्यावी लागेल. 'तो' आपल्याला शक्तीहीन करण्याच्या प्रयत्नात असणार. तो या संधीची वाटच बघत असेल. त्याला एकदाही हि संधी मिळू देऊ नका. चला आता झोपायला. "

असे म्हणून नाना व महादुच्या पाठोपाठ सारेजण चालू लागले. महादुने त्यांना त्यांच्या झोपण्याच्या जागा दाखवल्या. थोडा वेळाने भरपेट जेवण करून ते सारे झोपी गेले.

*******

शक्तीकामना यज्ञाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला होता. 'त्या'ला पाचवा टप्पा पूर्ण झाला म्हणून खूप आनंद झाला होता. सलग पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर बुवांनी सहा तासांची विश्रांती दिली होती सर्वांना. काहीजन पहुडले होते. तर काहीजण जंगलात फिरायला गेले होते. 'तो'सुधा काहीवेळ जंगलात फिरून आला. तोपर्यंत बुवांची सारी कामे आटोपली होती. ते सारेजण जमायच्या प्रतीक्षेत गुहेच्या तोंडाशी सूर्यकिरणे खात बसले होते. तो बुवांच्या शेजारी येऊन बसला. तो काही बोलायला तोंड उघडणार इतक्यात बुवा म्हणाले,

" एवढ्यातच इतका हुरळून जाऊ नकोस. अजून तीन टप्पे बाकी आहेत. ते सर्वात महत्वाचे आणि मोठे आहेत. यात तुला आधीपेक्षाही जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत आणि आधीसारखा हलगर्जीपणा आता नको. त्यांनी तुझ्याविरुद्धच्या तयारीला आता सुरुवात देखील केलीये. "

" तुम्हाला कसे काय कळले ?", त्याने एकदम आश्चर्याने विचारले.

" या सबंध भूतलावर माझ्याविरुद्ध काही शिजत असले की याची इत्थंभूत माहिती मला मिळते आणि त्याचे संकेत सतत येत राहतात. याचे कारण म्हणजे माझी पंधरा वर्षांची तपश्चर्या. "

'त्या'चा उजळलेला चेहरा पाहून ते म्हणाले,

" आताही हुरळून जायची गरज नाही कारण ते जे काही करत आहेत ते माझ्याविरुद्ध नसून तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला साथ देतोय त्यामुळे मला फक्त संकेत येत आहेत. त्याची पूर्ण माहिती मिळत नाहीये. "

मगाशी आनंदलेला त्याचा चेहरा खर्रकन उतरला.

" पण निदान आपल्याला धोक्याची जाणीव होते. जसजसे ते प्रबळ होत जातील तसतसे संकेतही त्रीव्र होतील आणि मी हे तुला वेळोवेळी सांगेनच. चल आता थोड्याच वेळात सारेजण येतील. मग आपण पुन्हा यज्ञाला सुरुवात करुया. यज्ञाबरोबर काही छोटे विधी करून दामलेंच्या विधीत अडथळा आणूयात. "

त्याने होकारार्थी मान डोलावली आणि साऱ्यांना घेऊन तो बुवांच्या मागे गुहेत प्रवेशला.

*******

महादेवाच्या मंदिराबाहेर अहोरात्र मंत्रजागर चालू होता. एकावेळी एकाच ठिकाणी दोन यज्ञ चालू होते. एक होता तो आत्मा संमोहनास्त्र प्रबळ करण्यासाठी आणि दुसरा विश्वासच्या मेंदूला जागृत करण्यासाठी. त्याचवेळी तिकडे गुहेमध्ये शक्तीकामना चालू होता ज्याचे पाच टप्पे पूर्ण झाले होते आणि आणखी फक्त तीन बाकी होते. दोन्ही यज्ञ, शक्तीकामना आणि आत्मा संमोहन तोडीस तोड होते. त्यामुळे ह्यावेळी आधी कधीही झाले नाही असे तुंबळ युद्ध होणार होते. दोन्ही पारडे बरोबरीचे होते. एकीकडे नाना तर दुसरीकडे बुवा. फक्त एक गोष्ट नानांकडे कमी होती ती म्हणजे विश्वास हा अननुभवी होता. खरेतर त्याच्याकडे नानांपेक्षा जास्त शक्ती होती पण याची त्याला जाणीव नव्हती. विश्वास लढू शकेल का याबाबत नाना जरासे साशंकच होते पण विश्वासचा आत्मविश्वास पाहून त्यांना थोडे हायसे वाटले.

दिवसामागून दिवस जात होते. नानांनी यज्ञ सुरु करून सात दिवस उलटले होते. त्यांच्यावर एकही हल्ला झालेला नव्हता. याचा अर्थ नानांनी आणि दाजींनी ओळखला होता की तो आता कोणताही हल्ला करत नाहीये म्हणजे त्या पौर्णिमेच्या रात्री तो सर्वशक्तीनिशी एकदम वार करणार. म्हणजेच आपल्याला आपली शक्ती अजून वाढवावी लागेल. पण याचा अर्थ असा नाही कि तो येत्या तीन दिवसात शांत बसेल. नानांना याची नक्की खात्री होती म्हणून त्यांनी महादू आणि मोहनवर एक काम सोपवले. त्यांनी अभिमंत्रित केलेले एकवीस धागे दोघांना दिले आणि सांगितले की, " हे दोरे इथल्या एकवीस झाडांना असे बांधा की ती एकवीस झाडे वर्तुळाकार व आपल्याला घेरून टाकणारी असावीत." हे धागे म्हणजे एक प्रकारचे सुरक्षा कवच होते. याच्या आत 'तो' हल्ला करू शकणार नव्हता. ते दोघे धागे बांधायला गेले. आत्मा संमोहनासाठीचा यज्ञ अंतिम टप्प्यात आला होता. विश्वासचा मेंदू हळूहळू जागृत होत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज झळकत होते. विश्वासला स्वतःलाही हे जाणवत होते.

संध्याकाळ होत आली होती. महादू आणि मोहन धागे बांधून आले होते. म्हणजे ते सारे आता सुरक्षित होते.

तिकडे त्याचा सातवा टप्पाही पूर्ण झाला होता. आता फक्त एकच आणि शेवटचा टप्पा बाकी होता. यज्ञ सिद्धीस जात असला तरी 'तो' मनातून थोडासा अस्वस्थ होता. बुवांच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही.

" कसला विचार करत आहेस ? यज्ञाच्या वेळी हे असे अस्वस्थ असू नये, त्याचा यज्ञावर परिणाम होतो. "

" बुवाजी, पौर्णिमा आता फक्त तीन दिवसावर आहे आणि आपण त्यांच्यावर कसलाच हल्ला केला नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा आणलेली नाही - "

" अरे मुर्ख माणसा, ", त्याचे वाक्य तोडत बुवा म्हणाले. त्यांच्या मुर्ख म्हणण्याने तो दचकला, " तुला काहीच कस समजत नाही. आजवर आपण त्याच्यावर हल्ला केला नाही याचे कारण त्याला असाच गाफील ठेवायचा आणि शेवटच्या दिवशी त्याच्यावर सर्व ताकदीने हल्ला करायचा कि त्याला काही करायलादेखील सवड मिळाली नाही पाहिजे. पण तरी तू म्हणतोस तर आपण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तीन-चार वार त्याच्यावर करू. म्हणजे तो थोडा दुबळा होईल. पण आपल्याला त्याला इतकाही दुबळा नाही समजला पाहिजे. कारण कधी कधी मला येणारे ते संकेत क्षणभरासाठी भलतेच त्रीव्र होतात आणि परत लगेच कमीही होतात. तेंव्हा तुही खबरदारी घे. "

"..."

तो काही बोलणार इतक्यात बुवांनी त्याला इशारा करून आत्ता यज्ञाकडे लक्ष दे असे सुचवले त्यामुळे तो गप्प बसला.

*******

अजून दोन दिवस बाकी होते. वाटत जरी जास्त असले तरी ते काहीच नव्हते. हा हा म्हणता दोन दिवस कसे निघून जातील कळणारसुद्धा नाही. नानाच्या सुदैवाने आणि बुवांच्या दुर्दैवाने आजचा दिवस विना हल्ला गेला. कारण तिकडे मागच्यावेळी प्रमाणे 'तो' तुपाची आहुती द्यायला विसरला होता. त्यामुळे यज्ञ संपायला तब्बल एक दिवसाचा उशीर लागला आणि दामले सुरक्षित राहिले. नाहीतर आज बुवा वार करणार होते. आजचा दिवस जरी सुरळीत गेला असला तरी उद्या जाईल याची काय शाश्वती ! उद्या त्याचा शक्तीकामना यज्ञ पूर्ण होणार होता. नानाचा आत्मा संमोहनाचा यज्ञ पूर्ण झाला होता आणि विश्वासचा मेंदू जागृत व्हायला अवघे सहा तास उरले होते.

दुसरा दिवस उजाडला. एका दिवसाचा अवकाश आणि दोन प्रतिस्पर्धी आपली सगळी शक्ती पणाला लावून लढणार होते. विश्वास आज नेहमीपेक्षा फार वेगळा वाटत होता. त्याच्या चेहेऱ्यावर तेज झळकत होते. विश्वास आता संपूर्ण तयार झाला होता. कोणत्याही क्षणी तो लढायला तयार होता. नाना व दाजीसुद्धा तयार होते. विश्वासचे म्हणणे असे होते की आपण आजच त्याच्यावर हल्ला करूयात. आज तो बेसावध असणार म्हणजे आपला विजय निश्चित. पण नानांचे विचार विश्वासच्या बरोबर उलटे निघाले. ते म्हणत होते की तो जरी बेसावध असला तरी त्याच्याकडे शक्ती आहे. आणि मुख्य म्हणजे वर्षानुवर्षे हे युद्ध पौर्णिमेला होत आले आहे. हि पौर्णिमा म्हणजे त्या पत्राने म्हणजे नियतीने ठरवलेली वेळ आहे. आपण नियतीला विरोध करणे ठीक नाही. तेंव्हा आज तू तुझा आत्मविश्वास वाढव, ध्यान कर, जप कर जेणेकरून तुझी शक्ती वाढेल. आज आपण त्याच्यावर कुठलाही हल्ला करायचा नाही.
सकाळचे दहा वाजले होते. सर्वांनी जेवण केले. जेवण करून विश्वास ध्यान करायला बसला. नाना आणि दाजी जप करत शेजारीच बसले होते. मोहन जरा विश्रांती घेत होता आणि महादू त्याची कामे करत होता. ध्यानाला सुरुवात करून जेमतेम अर्धा तास नाही झाला तोच विश्वास अचानक विचित्रपणे वागू लागला. त्याचे पाय लटपटू लागले. डोळ्याची बुब्बुळे नाहीशी झाली. अर्धांगवायूचा झटका आल्याप्रमाणे तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. ते पाहून नाना आणि दाजी लगेच उठून त्याच्या जवळ गेले. नानांनी काय झाले म्हणून त्याचा हात हातात घेतला तर एक जोरदार कळ त्यांच्या हातातून डोक्यापर्यंत गेली. झटकन त्यांनी त्याचा हात सोडला आणि म्हणाले,

" सुरुवात झाली...!"

दाजींनी तोवर मोहन आणि महादुला हाक मारून बोलावले. दोघेही धावत तिथे आले. ते दृश्य बघून दोघेही घाबरले. नाना म्हणाले,

" दाजी, ताबडतोप बाधा निवारण मंत्रजप सुरु कर. 'त्या'ने हल्ला केला."

दाजींनी लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केली.

" महादू आणि मोहन, तुम्ही ते धागे व्यवस्थित बांधले आहेत ना ? एखादा दोरा सैल वगैरे झाला असेल जा पटकन बघा कुठे काय झालं ते. "

दोघेही धागे बघायला गेले. त्याने हल्ला केला होता. तोही साधासुधा नाही पहिल्याच डावात शक्तिशाली हल्ला केला होता. जर त्याची सुरुवात अशी असेल तर पुढे काय होईल याचा अंदाजच करायला नको. नाना काळजीत होते. आपण एवढे अभिमंत्रित धागे बांधूनही त्याचा हल्ला इथपर्यंत पोहोचलाच कसा. तिकडे बुवा होते. त्यांची शक्ती फार प्रचंड होती. त्यासमोर हे धागे ते काय !. पण नानांनी या साऱ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच ते धागे अभिमंत्रित केले होते. त्यांना तडा जाणे जवळजवळ अशक्य होते. ते बघण्यासाठीच नानांनी मोहन आणि महादुला पाठवले होते.

नानांनी तांब्याभर पाणी घेतले आणि काही मंत्र पुटपुटत नागवेलीच्या पानांनी पाणी शिंपडायला सुरुवात केली. दहा मिनिटांनी विश्वासचे लोळणे थांबले. पण तो मध्ये विव्हळत थोडा हलायचा पुन्हा स्वस्थ व्हायचा. नाना अजूनही चिंतेत होते. विश्वासचे विव्हळणे कमी झाले तरी त्याचे डोळे अजून पांढरेच होते. त्याच्या डोळ्यात बुब्बुळेच दिसत नव्हती.

इतक्यात मोहन आणि महादू धावत आले. मोहनने नानांना सांगितले की एका झाडाचा दोरा पक्ष्याने चोची मारल्याने खाली पडला होता. आम्ही तो बांधून आलो आहोत. आणि बाकीचे धागे सुद्धा घट्ट करून आलोय. आज संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बघून येऊ. नानांना जरा हायसे वाटले. आपले धागे त्याचा वार पेलू शकतात याचे त्यांना समाधान वाटले. त्यांनी आणखी काही धागे अभिमंत्रायला सुरु केले. दाजींचे मंत्र म्हणणे चालूच होते. नानांनी ते मंतरलेले धागे कुंकू लाऊन विश्वासच्या मनगटात बांधले आणि विश्वासने एक जोरात झटका दिला आणि निपचित पडला. नाना काळजीने विश्वासकडे बघू लागले. दाजीसुद्धा मंत्र म्हणत विश्वासकडे पाहू लागले. दोघांचाही श्वास थांबला होता. हळूहळू विश्वासने बोटे हलवली. त्याने डोळे उघडले....

... आणि दोघांच्या जीवात जीव आला. विश्वासची बुब्बुळे आता डोळ्यात दिसत होती. तो उठून बसला. महादू पाणी घेऊन आला. पाणी पिऊन आता जरा तरतरी आली. नाना विश्वासला म्हणाले,

" त्याने तुझ्यावर हल्ला केला होता. आता तो काही करू शकणार नाही. आपलं सुरक्षा कवच आता तो भेदू शकणार नाही. तू आता विश्रांती घे आणि तयार हो. कारण उद्या याहून मोठी परीक्षा आहे तुझी. "

विश्वास विश्रांती घ्यायला गेला.

मोहन आणि महादू पण निवांत झाडाखाली पहुडले.

नाना आणि दाजी मंदिरात जप करत बसले.

तिकडे तो आणि बुवा चरफडत होते. त्यांचे वार आता निकामी ठरत होते. आता त्याला हल्ला करण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागणार होता.

.....आणि अखेरीस पौर्णिमेचा दिवस उजाडला...

9

सकाळचे आठ वाजले होते. नाना व दाजींनी आन्हिक उरकले आणि झटपट तयारीला लागले. काही मंत्र पुटपुटत ते जागेची आवराआवर करत होते जिथे बसून ते वार करणार होते. तीन आसने मांडून त्याभोवती संरक्षण कवच तयार केले. तसेच त्यांनी वार करण्यासाठी आणि संरक्षण लागणारी साहित्य सामग्री जवळच ठेवली होती. कारण कधी कशाची गरज पडेल ते सांगता येत नाही. नानांनी विश्वासला बोलावले आणि त्याला एका आसनावर बसून नामस्मरण करण्यास सांगितले. विश्वासला कालच्या विश्रांतीने तरतरी आली होती. त्याच्या चेहऱ्यावर आता ते तेज दिसत होते जे त्याला दाजींच्या पहिल्या भेटीत त्यांच्या चेहऱ्यावर दिसले होते. तो आता युद्धासाठी पूर्णपणे तयार होता. विश्वासचे नामस्मरण चालू होते. नाना व दाजी सुद्धा मंत्रोच्चार करून वातावरणास अधिक बलवान बनवत होते. आता ते 'त्या'च्याकडून होणाऱ्या वाराची वाट बघत होते.

वाट बघता बघता दुपार टळून गेली होती. अजूनपर्यंत त्याच्याकडून एकही वार झाला नव्हता. यामुळे विश्वास अचंबित झाला होता. त्याला काळातच नव्हत की आजच पौर्णिमा आहे मग तो अजून वार कसा काय करत नाहीये. शेवटी न राहवून त्याने नानांना विचारलं,

" नाना, दुपार टळत चाललीये आणि अजून - "

" अरे विश्वा..." असे म्हणून ते केवळ हसले. त्यांच्या हसण्याचा अर्थ न कळून विश्वासने प्रश्नार्थक मुद्रेने दाजींकडे पहिले.

" हि वादळापूर्वीची शांतता आहे. " - दाजी

" आणि माझ्या अंदाजानुसार तो आज संध्याकाळी सहानंतर वार करणार. कारण वाईट शक्ती दिवसा कमजोर ठरतात. त्या रात्री बळकट होतात. " नानांनी दाजीच्या उत्तरच स्पष्टीकरण दिलं.

नानांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. सुर्यनारायण अस्ताला जात होता. हळूहळू अंधार पडत चालला होता. जसा जसा काळ पुढे सरकत होता तसतसे वातावरण भयानक होत चालले होते. शांत पण गुढ वातावरण होते ते. दाजीच्या म्हणण्याप्रमाणे हि वादळापूर्वीची भयाण शांतता होती. आणि ते खरच होतं. पण थोड्याच वेळात या वादळाचं आगमन होणार होतं.

नाना क्षितीजावरच्या अस्ताला चाललेल्या सूर्याकडे एकटक पाहत होते. तो हळूहळू खाली जात होता. आणि सूर्याचा शेवटचा किरण अंधाराने गिळला.

तेवढ्यात.......ते नानांच्या नजरेतून सुटले नाही. जांभळी छटा पसरलेल्या क्षिताजावर नारिंगी ठिपका दिसत होता जो क्षणाक्षणाला वाढत होता. तो नारिंगी गोळा त्यांच्या जवळ येत होता. नाना पटकन ओरडले, " तयार रहा.." . एवढ्यात तो जवळ आला सुद्धा. त्याचा वेग प्रचंड होता. दाजी आणि विश्वासने मागे वळून आकाशाकडे पहिले आणि ते एकदम दचकले. तो गोळा प्रचंड वेगात येऊन त्यांच्यावर आदळणार होता. त्या गोळ्याला इतक्या जवळ पाहून विश्वासने डोळे मिटले आणि एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. त्याने डोळे उघडून बघीतले. गोळा हवेतल्या हवेत फुटला होता.
नानांनी बांधलेल्या अभिमंत्रित धाग्यांनी पराक्रम गाजवला होता. नंतर २-३ सेकंदात दुसरा निळ्या रंगाचा गोळा फुटला.

" विश्वास सुरु कर... " नाना.

विश्वासने आपल्या मुठी बंद केल्या, हात वर केले, काही मंत्र तो पुटपुटला आणि मुठींना नमस्कार करून त्याने त्या आकाशाकडे उघडल्या. विश्वासने एक यशस्वी आणि शक्तिशाली वार केला होता. त्याच्या हातातून एक हिरवा गोळा बाहेर पडून क्षितिजाकडे गेला. सलग त्याने दुसरा पिवळ्या रंगाचाही वार केला.

पलीकडून गोळे येणं काही वेळापुरत थांबलं. विश्वासचा वार त्याला लागला होता. थोड्या वेळाने पुन्हा पलीकडून गोळे आले. इथून विश्वास आणि नानांनी उतरादाखल आणखी शक्तिशाली गोळे सोडले.

बराच वेळ हे गोळेयुद्ध चालू होतं. अधूनमधून वेगवेगळया आकाराचे गोळे फेकले जायचे. कधी चांदणीचा...तर कधी पानाच्या आकाराचा...कधी चौकोनी तर कधी त्रिकोणी...

जवळ जवळ अर्धा तास हे चालू होत. दोन्हीकडचे आता वार करून थकले होते. नाना व विश्वासवर अजून एकही वार झाला नव्हता. कारण अभिमंत्रित धागे. पण त्यालाही काही मर्यादा होत्या. धागे अभिमंत्रित असले तरी बरेच शक्तिशाली वार सलग झेलल्यामुळे तेही आता थोडे क्षीण होत होते. कुठल्याही क्षणी आता वार विश्वासला लागणार होता. आणि तो त्याच्या तयारीत होताच. "त्या"ने अनेक वार झेलूनही तो अजूनही तेवढेच शक्तिशाली वार करत होता कारण त्याने शक्तिशाली शक्तीकामना यज्ञ केला होता.

इतक्यात एक गोळा आला आणि तो हवेत न फुटता दाणकन विश्वासवर आदळला. अचानकपणे झालेल्या वारामुळे विश्वासला मूर्च्छा आली. दाजी येऊन विश्वासला धरणार तोच विश्वासने स्वतःला सावरले. विश्वास आता त्या भट्टीत तयार झाला होता. तोपर्यंत दोन वार नानांनी केले आणि म्हणाले,

" आता काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा. तू आत्मा-संमोहन कर आणि बुवाला ताब्यात घे. मी आणि विश्वास इकडून "त्या"च्यावर एकत्रित वार करतो. "

दाजींनी डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरु केले. पलीकडून आलेल्या दोन वारांना विश्वासने संरक्षण वार करून चोख प्रत्युत्तर दिले. नंतरचे काही वार असेच संरक्षणात्मक केले गेले.

दाजींना काहीसे झटका आल्यासारखे झाले. ते फुटभर हवेत उडाले आणि जमिनीवर पडले. ते उठले आणि ओरडले,
"नाना, पटकन......" आणि अचानक नानांना बुवांचा आवाज ऐकू आला,
" अरे नीच माणसा... " " ..त्याच्यावर वार .." " शेवटी तू इथे मला " " करा " " आणलाच ..."

" विश्वास , बुवाची आत्मा दाजीच्या ताब्यात आहे. पटकन तुझा हात माझ्या हातात दे."

विश्वासने व नानांनी एकमेकाच्या मुठी जुळवल्या आणि काही मंत्र म्हणले. एवढ्यात समोर आकाशात एक प्रचंड मोठा आगीचा गोळा दिसला आणि ह्या दोघांनी मुठी तिकडे केल्या. त्यांच्या हातातून एक निळसर गोळा बाहेर पडला आणि आकाशातल्या त्या गोळ्यावर आदळला आणि आसमंतात शुभ्र प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने विश्वासचे डोळे दिपले. तो प्रकाश त्याच्या डोळ्यांना सहन होईना. म्हणून त्याने डोळे मिटले. एवढा तेजस्वी प्रकाश पाहिल्यामुळे त्याच्या मेंदूला किंचित बधिरता आली होती.

त्याने प्रकाश कमी झाला का पाहायला डोळे उघडले आणि.......

तो जंगलात नव्हताच मुळी. तो एका अशा ठिकाणी होता जिथे ना जमीन होती ना आकाश होते ना झाडे ना पाणी होते. फक्त आणि फक्त पांढरा रंग दिसत होता. तो कशावर उभा होता हेही त्याला माहित नव्हते. फार विचित्र जागा होती ती. त्याने सभोवार नजर फिरवली आणि त्याला नाना आणि "तो" चा मृतदेह आढळला. तो नानाच्या जवळ गेला. आसपास दाजी कुठेच दिसत नव्हते. त्याला ते दृश्य पाहून अतिशय दुःख झालं. आपण आपली सर्व शक्ती लावून लढलो. पण आपला काहीच उपयोग झाला नाही. त्याने नानांना मारले. शेवटी वाईटाचाच विजय झाला. पण इथे अजून एक गोष्ट घडली होती ती म्हणजे तोही मेला होता. हे दोघे कसे मेले ते त्याला कळेना.
पण त्याला फार दुःख झालं. त्याने नानाचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.

अचानकपणे त्याच्या डोक्यात भयंकर कळा येऊ लागल्या. तो डोके गच्च धरून बसला. त्या वातावरणाचा पांढरा रंग आता हळूहळू नाहीसा होत होता आणि एक काळी पोकळी दिसत होती.

हे सारे काय चालू आहे हे विश्वासला कळण्याच्या आतच -

10

हे सारे काय चालू आहे हे विश्वासला कळण्याच्या आतच -

त्याला जाग आली. तो त्याच्या बेडरूममध्ये पलंगावर होता. घामाने डबडबला होता.

आधी त्याला कळलेच नाही कि तो कुठे आहे. हळूहळू त्याच्या लक्षात आले की आपण आपल्याच बेडरूममध्ये आहोत आणि आता झोपेतून उठतो आहोत. म्हणजे हे सारे स्वप्न होते कि काय ? की नाना, मोहनराव, दाजी हे सारे मनाचे खेळ होते आपल्या ! पहिलीच रहस्यमय कादंबरी आणि त्याचा आपल्या मनावर इतका परिणाम व्हावा ! हे नक्की स्वप्न होते का खरच असा काही घडलं होतं आणि नेमक काय झालं ते आठवत नव्हत ? काहीच कळेना. त्या विचित्र ठिकाणी मी बेशुद्ध झालो असेन, मग कुणीतरी मला घरी आणून सोडलं असावं आणि मला आता शुद्ध येतीये. पण त्या विचित्र ठिकाणी तर कुणीच नव्हतं. तिथे तर आम्ही तिघेच होतो. तो अन् नाना तर गेले होते. मग मला इथे कुणी आणून सोडलं ? दाजी कुठे गेले ? मोहनरावांच काय झालं पुढे ? आणि महादू.....?

काहीच कसं आठवत नाहीये ! बहुतेक तलुला माहित असावं. तिला नक्की माहित असणार आपल्याला इथे कुणी आणून सोडलं ते. हो. तीच आता खर काय ते सांगेल. त्याने अंगावरचं पांघरून बाजूला केलं. चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि तो तलुला हाक मारणार इतक्यात -

बेडरूममध्ये त्यावेळी सारखा शुभ्र पांढरा प्रकाश पडला. खोलीत आता पांढऱ्या रंगाशिवाय काहीच दिसत नव्हते आणि तो पुन्हा एकदा त्या शुभ्र अवकाशात उभा होता. विश्वास पुन्हा संभ्रमात पडला.

आता पुन्हा इथे मी कसा आलो !

त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पहिले. ते नाना होते. विश्वास आनंद आणि आश्चर्य अशा मिश्र भावनेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला ,

" नाना .... बरं झालं. तुम्ही जिवंत आहात. नाना तो मेला. दामल्यांचा शत्रू मेला. पण दाजी आणि मोहनराव कुठे आहेत ? आणि मी इथे कसं काय आलो - "

" अरे थांब थांब किती बोलशील आणि किती प्रश्न विचारशील. जरा दम खा. आपण इथे नकोच बोलायला. आपण तुझ्या घरीच जाऊया. "
असे म्हणून त्यांनी विश्वासचा हात पकडला आणि ते तिथून अदृश्य होऊन विश्वासच्या बेडरूममध्ये प्रकटले. नानांनी विश्वासला पलंगावर बसवले आणि ते दरवाजाची कडी लाऊन आले. बसता बसता विश्वासला पलंगाच्या पलीकडे पडलेली ती नानांची रोजनिशी आणि त्यातून बाहेर आलेला त्या पत्राचा तुकडा दिसला.

" ती वही राहू दे तिथेच. आता तशीही तिची काहीच गरज उरली नाहीये. " असे म्हणून नाना विश्वासच्या शेजारी येऊन बसले आणि बोलू लागले,

" मी तुझ्या सर्व शंकांना उत्तरे देतो. तू फक्त शांतपणे ऐकून घे. मध्ये काहीही बोलू नकोस. आता तुला पहिला प्रश्न पडला असेल की मी जिवंत कसा झालो तर याचं उत्तर आहे की मी जिवंत नाहीये. "

हे ऐकून विश्वास दचकला.

" घाबरून नकोस. माझे बोलणे संपल्यावर तुला सर्व गोष्टींचा खुलासा होईल. तर ऐक.

फार वर्षांपूर्वी ... नाही नाही युगांपुर्वी म्हणजे सत्ययुगात, जेंव्हा हे विश्व सत्य आणि पवित्रता या दोन गोष्टींच्या आधारावर चालू होते. ज्ञान, ध्यान व तपस्या यांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. मानवाचा प्रत्येक विचार हा शुद्ध आणि पवित्र असायचा. संपूर्ण मानवजाती देवाकडून चालवली जायची. आश्रम हे दुष्टपणा आणि छळरहित असायचे. आणि नाट्य, याची त्याकाळी गरजच नव्हती कारण तेंव्हा प्रत्येक माणूस आनंदी असायचा. कारण तेंव्हा कुणी गरीब नव्हता न श्रीमंत. त्यामुळे कुणी कुणाला राबवायचे नाही. जे जे मानवाला हवे असायचे ते त्याच्या इच्छाशक्तीवर मिळायचे. परिणामी माणूस सुखी असायचा.

त्या सत्ययुगाच्या अखेरच्या कालखंडात सांदिप नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. त्या ऋषींच्या आश्रमात देवराज आणि भोईराज नावाचे दोन भाऊ शिक्षण घेत होते. पूर्वी गुरुकुलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आश्रमातील काही कामे वाटून दिली जायची. तशीच त्या दोघांनाही ऋषींनी काही कामे वाटून दिली होती जसे कि नदीवरून पाणी भरून आणणे, लाकडे तोडून आणणे इत्यादी.. दोघेही मिळून कामे करत. त्यांच्यामध्ये इतके सख्य होते की कुणालाही त्यांचा हेवा वाटावा. जणू त्यांना द्वेष इर्षा भांडण हे शब्दसुद्धा माहित नसावे. आणि तो काळही तसाच होता.

असेच एकदा ते नदी किनारी पाणी भरून आणायला गेले होते. त्या दिवशी ते नेहमीच्या वाटेने न जाता थोड्या वेगळ्या मार्गाने गेले होते. पाणी भरून परतत असताना वाटेत त्यांना एक रथ दिसला. तो धुराळा उडवत मार्गक्रमण करत होता. बहुतेक त्याला घाई असावी. त्यामुळे तो रथ वेगात हाकत होता. तो रथवान त्यांच्यासमोरून वेगाने गेला आणि जाता जाता वाटेत असलेल्या कडेच्या एका दगडावरून चाक गेल्याने रथाचा मागचा भाग हिंदकळला आणि सोन्याच्या काही सुवर्णमुद्रा रथातून उडून बाहेर पडल्या. देवराज त्या रथवानाला हक मारणार तोच भोईराजने त्याला मागे खेचले. तो मागे ठेचकाळला. पुन्हा सावरून तो हाक मारणार होता पण तोपर्यंत रथ फार लांब गेला होता.

भोईराजने त्या सुवर्णमुद्रा उचलल्या आणि उपरण्यात ठेऊन गाठ मारली. देवराजला हे पाहून राग आला. तो भोईराजला झापू लागला.

" हे बरोबर नाही. जा आत्ताच्या आत्ता त्या वाटेने जा आणि तो रथ कुणीकडे गेला हे बघून ह्या सुवर्णमुद्रा परत करून ये. "

" हे बघ. आपण काही या मुद्रा चोरल्या नाहीत. त्या रथातून पडल्या होत्या. चल आता आश्रमात पाणी भरायचं आहे. "

" पण गुरुदेवांना कळाले तर काय होईल तू जाणतोसच. "

" आपण इथे काय केलं ते त्यांना कसे काय कळेल ? आणि मी ह्या मुद्रा नीट लपवून ठेवीन. तू काळजी करू नकोस."

" तरीही मला हे तुझ वागणं पटत नाहीये. पण आता मोठा भाऊ म्हणून गप् बसतो."

ते दोघे आश्रमात गेले. त्यांनी आणलेले पाणी ठेवले. लाकडेपण तोडून घेऊन आले. दुपारच्या अध्ययनासाठी ते आश्रमात असलेल्या पिंपळाच्या पारासमोर बसले. त्यांचा अंदाज होता की सांदिप ऋषींना काही कळणार नाही. पण त्यांचा अंदाज साफ खोटा ठरला कारण त्यांना अजून ऋषींच्या शक्तीचा अंदाज नव्हता.

थोड्याच वेळात ऋषी आले. त्यांची मुद्रा संतप्त होती. डोळे लालभडक झाले होते. आल्याआल्या त्यांनी नजर देवराज आणि भोईराजकडे टाकली आणि जोरात ओरडले,

" पाप्यानो उठा आणि चालते व्हा ह्या आश्रमातून. या आश्रमात तुमच्यासारख्या अधर्मी व्यक्तींना यत्किंचितही थारा नाही. एका क्षणात चालते व्हा माझ्या डोळ्यांसमोरून. "

त्यांच्या बाकी शिष्यांना समजेना की ह्या आदर्श बंधूंना गुरुवर्य असे का ओरडत आहेत. पण लगेचच या गोष्टीचा खुलासा झाला. देवराज आणि भोईराज उठले , ऋषीच्या जवळ जाऊन त्यांचे पाय धरण्यासाठी खाली वाकले. तोच ऋषी मागे सरकले आणि म्हणाले,

" व्हा मागे. तुमची लायकी नाही. भोईराजने चूक केलीच. पण देवराज तू कमीतकमी मला तरी येऊन सांगायचस. पण दोघांनी एक चकार शब्द काढला नाही आणि चक्क मुद्रा लपवून ठेवल्या. "

" पण गुरुवर्य आम्ही फक्त - "

" तुम्ही जे केलं ते चौर्यकर्म नाही पण तेही एक प्रकारचे अनैतिक कामच. याबद्दल तुम्हाला माफी नाही. "

ऋषी अतिशय संतापले होते. त्याचा संतापात त्यांनी त्या दोघांना शाप दिला.

" तुमच्या या गैरवर्तनाबद्दल मी तुम्हाला शाप देतो की कलीयुगात तुम्ही पुन्हा या पृथ्वीवर जन्म घ्याल आणि तेंव्हा तुम्ही एकमेकांचे शत्रू असाल. तुम्ही एकमेकांचा जीव घ्याल. तुम्हाला गैरवर्तन करण्याची इतकीच हौस आहे ना मग तुमच्यासाठी कलियुगच योग्य आहे. तुम्ही कलीयुगात पुन्हापुन्हा जन्म घेऊन याची पुनरावृत्ती करीत राहाल आणि तुम्हाला कलियुग संपेपर्यंत मोक्ष मिळणार नाही. "

दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आता कलीयुगाच्या मानाने ती एक क्षुल्लक गोष्ट असली तरी सत्ययुगात हा एक मोठा अपराध होता. ऋषींनी भयंकर शाप दिला होता. या शापाच्या विचारानेच त्या दोघांच्या पोटात गोळा आला. त्यांना आता त्यांच्या चुकीची जाणीव होऊन ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घ्यायला तयार होते. पण त्यासाठी इतका भयंकर शाप !

ते दोघे सांदिप ऋषींसमोर सपशेल आडवे झाले आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालू लागले. रडून भेकून ते माफी मागू लागले.

" गुरुवर्य आमचा अपराध आम्हाला मान्य आहे. पण त्यासाठी एवढा मोठा शाप नका देऊ. आम्ही या चुकीचे हवं ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत. "

ऋषींचा राग किंचित कमी झाला होता. त्यांना वाटले की खरच यांना यांच्या चुकीची जाणीव झाली आहे.

" हे पहा माझा शाप तर मी मागे घेऊ शकत नाही. पण मी तुम्हाला उःशाप देईन. कलियुग सुरु होऊन पाच हजार वर्षे झाल्यावर एक कथाकार तुमच्या चालू जन्मावर कथा लिहेल. तेंव्हा तो कथाकारच तुमची मुक्तता करेल. त्याच्याकडे दैवी शक्ती असतील पण त्या तुम्हाला जागृत कराव्या लागतील. "

" हि होती कथा देवराज आणि भोईराज या भावांची "

एवढे बोलून नाना थांबले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा बोलू लागले,

" तो देवराज मीच आहे आणि 'तो' म्हणजे भोईराज. तुझे खूप खूप धन्यवाद. आमची या कलीयुगातून मुक्तता केल्याबद्दल. "

विश्वास थोडासा गोंधळात पडला. हि कथा ऐकून तो आत्तापर्यंत घडलेल्या साऱ्या गोष्टींचा संबंध जुळवू लागला.

" मग मोहनराव, महादू, दाजी याचं काय ? " - विश्वास.

" ते फक्त एक आभास होते. ती या उःशापासाठी तयार करण्यात आलेली माया होती. त्या व्यक्ती अस्तित्वातच नाहीत. आणि आता त्या कुणाला आठवणारदेखील नाहीत."

" म्हणजे तलुलासुद्धा मोहनराव आठवणार नाहीत ? "

" अर्थात. कारण हि सर्व माया होती आणि आता माझ्या जाण्यानंतर काळसुद्धा मागे जाईल त्या दुपारीपर्यंत जेंव्हा भयानकच्या प्रकाशनाला आठवडा उलटला होता आणि अल्पावधीत त्याच्या ५०० च्या वर प्रती खपल्या असतील. कुणालाही काहीच आठवणार नाही, फक्त तुला सोडून. "

विश्वासच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त आणि फक्त समाधान होते. आता त्या खोलीत पूर्ण शांतता होती.

त्या शांततेचा भंग करीत नाना म्हणाले,

" तर मग विश्वा, मी निघतो आता मुक्तीच्या प्रवासाला. "

आणि पुन्हा एकदा खोलीत शुभ्र पांढरा प्रकाश पसरला अन् काही क्षणात तो प्रकाश नाहीसा झाला.

आता त्या खोलीत नाना नव्हते. मगाशी जमिनीवर दिसलेली ती रोजनिशी आणि पत्रही तिथे नव्हते. तो बाहेरच्या खोलीत आला आणि सोफ्यावर बसला. त्याने स्वयपाकघरात काम करत असलेल्या तलुला ओरडून सांगितले,

" तलु, आज संध्याकाळचा स्वयपाक करू नकोस. आज आपण हॉटेलला - "

काहीतरी विचार मनात येऊन तो एकदम थांबला. तेवढ्यात त्याच्या कानाशी एक मंद हलकासा ओळखीचा आवाज आला. तो आवाज नानांचा होता.

" जा. बिनधास्त जा. आज तिथे मोहन तुला हाक मारणार नाही. "

-------------------------------------------समाप्त-----------------------------------------

गुलमोहर: 

खूपच छान
वाचून मजा आली

अजुन पुढे वाट बघतो आहे नवीन कथेची

Pages