पुस्तक परिचय- 'मॅनहंट' (बिन लादेनच्या शोधाचे दशक)

Submitted by लोला on 30 May, 2012 - 22:31

मॅनहंट - बिन लादेनच्या शोधाचे दशक, ९/११ पासून अ‍ॅबटाबाद पर्यंत.
(Manhunt - The ten year search for Bin Laden from 9/11 to Abbotabad)
पीटर बर्गन
पृष्ठसंख्या- ३८४

अमेरिकेच्या नेव्ही सील्सनी बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन ठार केल्याची बातमी तसंच त्या कारवाईचं सविस्तर वर्णन आपण वाचलंच असेल. पण त्याआधीचा, ९/११/२००१ पासून ते २०११ च्या मे महिन्यापर्यंतचा १० वर्षाच्या शोधाचा प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे. यातल्या काही घटना, तपशील आपल्याला वर्तमानपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमातून तुकड्या-तुकड्याने परिचयाचे असले तरी एकसंध, घटनाक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक वाचताना एखादे 'थ्रिलर' वाचत असल्याचा अनुभव येतो.

पीटर बर्गन हे टीव्ही पत्रकार आणि लेखक. तसंच डीसीमधल्या न्यू अमेरिका फाऊंडेशनच्या 'नॅशनल सिक्युरिटी स्टडीज' प्रोग्रॅमचे डिरेक्टर. हार्वर्ड आणि जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठात सहाय्यक अध्यापक म्हणूनही काम केलं आहे.

हे पुस्तक लिहिण्यासाठी आवश्यक असलेला 'अ‍ॅक्सेस' (व्हाईट हाऊस, सीआयए, डिफेन्स डिपार्ट्मेन्ट, स्टेट डिपार्ट्मेन्ट इ.) त्यांना मिळाला. अनेकांच्या प्रत्यक्ष मुलाखती, संदर्भ पुस्तके, कागदपत्रे यांच्या मदतीने व्यापक माहिती गोळा करुन सर्वसामान्यांना समजेल आणि रोचक वाटेल अश्या रुपांत पुस्तकांत मांडली आहे.
पुस्तकाची शेवटची १०० पाने बिब्लिओग्राफी, नोट्स इ. ने भरलेली आहेत.

लेखक स्वतः १९९७ च्या मार्च मध्ये सीएनएन साठी मुलाखत घेणाच्या निमित्ताने बिन लादेनला भेटले होते. तेव्हा त्यांना तो कोणी 'क्रांतिकारी' वाटला नाही, एक साधा क्लेरिक पण त्याच्या प्रत्येक शब्दातून अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त होत होता. त्याचवेळी त्याने 'ऑन कॅमेरा' अमेरिकेविरुद्ध जिहादची घोषणा केली. आणि ४ वर्षानंतर ९/११ चे हल्ले झाले..

पुस्तकाची सुरुवात 'कम्फर्टेबल रिटायरमेन्ट' या प्रस्तावनेनं होते. त्यात जेम्स अ‍ॅबट या ब्रिटिश अधिकार्‍याने वसवलेल्या (आणि म्हणून) 'अ‍ॅबटाबाद' नावाच्या शहराची ओळख, बिन लादेन, त्याच्या सुविद्य (पण धार्मिक आणि त्याच्या 'जिहाद' वर विश्वास असणार्‍या. एकजण तर डॉक्टरेट मिळवलेली होती.) पत्नी, मुलं आणि त्यांच तिथलं घर याबद्दल माहिती आहे.

त्यानंतर बराचसा परिचित असलेला ९/११ चा भाग येतो. त्यानंतर 'टोरा बोरा' ची लढाई, जिथून बिन लादेन निसटला. त्या लढाईचे (चुकलेले) आडाखे, तिथून पाकिस्तानात पळून जाता येणारे मार्ग दुर्लक्षित आहेत हे लक्षात आल्यावरही 'पाकिस्तान बॉर्डर्स सील करेल' हे 'विशफुल थिन्किन्ग' याबद्दलचे तपशील येतात. तिथून निसटल्यावर बराच काळ काही ठावठिकाणा न कळल्याने हवालदिल झालेले, मध्येच 'इराक' उपटल्याने फ्रस्ट्रेट झालेले, तरीही रात्रंदिवस प्रयत्न करणारे सीआयए आणि इतर अश्या एजन्सीजमधील लोक त्यांच्याही कथा येतात. सीआयए मधले 'बिल लादेन युनिट' जे होते त्यात बर्‍याच स्त्रिया होत्या. त्यांचं काम पाहता युनिटचे मुख्य म्हणाले, 'युद्धाच्या कथा सांगणे आणि सिगारेट फुंकणे यात वेळ घालवणार त्यामुळं माझ्या हातात असतं तर मी पुरुषांनी अर्ज करु नयेत- अशी पाटी लावली असती'. यातल्या काही संसार, लहान मुलेबाळे असलेल्या होत्या. (एक चाळीशीतली तीन मुलांची आई, जेनिफर मॅथ्यूज, खोश्त मध्ये अल कायदाच्या डबल एजंटने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात इतर काही एजंटांसमवेत मृत्यू पावली.)

पाकिस्तानात आहे असा जरी अंदाज असला तरी २००८-२००९ मध्ये अमेरिकेला तो उत्तरेकडच्या डोंगराळ भागाऐवजी शहरांत रहात असावा अशी शंका आली. त्याच्याकडून अधूनमधून येणारे व्हिडिओ, ते एखाद्या ठिकाणी किती वेळात पोचतात. जगातल्या एखाद्या घटनेबद्दल त्याचाकडून किती वेळात प्रतिक्रिया येते इ. वरुन आडाखे बांधले जात. व्हिडिओतल्या लादेन आणि त्याच्या बोलण्यापेक्षा बॅकग्राऊंडकडे जास्त लक्ष दिले जाई. झाडं, पक्षी (एकदा ऑर्निथॉलॉजिस्ट्ला पक्षाचा आवाज ओळखायला बोलावले) इ. वरुन ठिकाणाचा अंदाज घेण्यासाठी.

प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली तेव्हा 'स्पेशल फोर्सेस' वापरले. सील्स आणि इतर अनेक स्पेशल फोर्सेस संबंधीही माहिती वाचायला मिळते. ही कल्पना कशी आली, सुरुवात कुठून झाली. मे. ज. स्टॅन्ली मॅक्क्रिस्ट्ल (ज्यांना नंतर दुर्दैवाने 'रोलिन्ग स्टोन' ला दिलेल्या मुलाखतील व्हाईस प्रेसिडेन्टबद्दल अयोग्य शब्द वापरण्यावरुन राजिनामा द्यावा लागला.) यांच्या 'व्हिजन' ने तयार झालेले स्पेशल फोर्सेस. अ‍ॅबटाबाद कारवाईचे आर्किटेक्ट व्हा. अ‍ॅ. विल्यम मॅकरेव्हन, सील्सचे ट्रेनिन्ग इ. वृत्तांत 'सिक्रेट वॉरियर्स' या प्रकरणांत येतो.

पुस्तक मोजके फोटो आणि नकाशे यांसह आहे. काही इन्टरेस्टिन्ग संभाषणे आणि माहिती आहे. अ‍ॅबटाबाद व्हर्जिनियातल्या 'लीजबर्ग' सारखे आहे, रॉ ओटस् पासून बनवलेला अर्क, अ‍ॅबटाबादचे घर 'फोर्ट्रेस' सारखे बांधले असल्याने फार काही दिसायचे नाही, तर वाळत घातलेल्या कपड्यावरुन घरात किती आणि काय वयाची माणसं असावीत याचा अंदाज बांधणे. 'लादेन तिथे असण्याची शक्यता किती?' या ओबामाच्या प्रश्नाला पेनेटा प्रत्येक अ‍ॅनॅलिस्टचे वेगळे अंदाज(६०%, ८०%, ९०%) सांगतात तर ओबामांचा प्रश्न आहे की अश्या वेगवेगळ्या शक्यता का आहेत? (हा काय प्रश्न झाला!)

थोडक्यात काय तर माझ्या मते 'वाचलेच पाहिजे' असे पुस्तक आहे.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.. परवाच ह्या पुस्तकाबद्दल वाचलं... NY Times चा रिव्ह्यू पण चांगला आहे.. वाचणार नक्की.

बादवे यंदाच्या मौजच्या दिवाळी अंकात लादेनचं ठिकाण शोधून काढण्यासाठी वापरल्या गेलेल्या कॅलिफोर्नियातल्या विद्यार्थ्यांनी केलेला अ‍ॅनालिसिसबद्दल सविस्तर लेख आहे तो ही मस्त आहे एकदम!

वाचलंच पाहिजे हे पुस्तक. मी मागील वर्षी एक लेख वाचला होता. अमेरिकेच्या एका प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने संख्याशास्त्रातील 'गेम थिअरी' वापरून लादेन कोणत्या शहरात लपण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे याचे एक मॉडेल केले होते. त्यात स्थानिक लोकसंख्या (शिया / सुन्नी), दुर्गमता, दळणवळणाची उपलब्धता असे अनेक घटक वापरून कराची, लाहोर, इस्लामाबाद, अफगाणिस्थानचा उत्तर भाग, पेशावर इ. भागात तो लपण्याची शक्यता मोजून त्यात गणिती मॉडेलनुसार अबोटाबाद मध्ये तो असण्याची शक्यता ९७ टक्के आहे असे अनुमान काढले होते.

चांगला परिचय. नक्कीच वाचणार हे पुस्तक.

युद्धाच्या कथा सांगणे आणि सिगारेट फुंकणे यात वेळ घालवणात त्यामुळं माझ्या हातात असतं तर मी पुरुषांनी अर्ज करु नयेत- अशी पाटी लावली असती'.>> हे नीट समजले नाही.

तो सापडला त्या कारवाईचे वर्णन किती आहे यात?

धन्यवाद.

मौज मिळाला तर वाचेन. त्याबद्दलची ही न्यूज होती -
http://www.washingtonpost.com/blogs/answer-sheet/post/ucla-students-came...

मास्तुरे तुम्ही आणि पराग एकच म्हणताय का? अगदी त्याच गावाचं नाव घेणं मला जरा कठीण वाटतंय. लादेनला शोधण्यासाठी आधी त्याचा 'कुरियर' शोधत होते, जो कोणी त्याच्या संपर्कात असेल तो. (ते सेल फोन, फोन, इमेल वापरत नसत) खालिद शेख महंमद आणि लिबी हे दोघे सापडल्यानंतर त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. पण हा जो "कुवेती" कुरियर होता त्याचे काही महत्त्व नाही किंवा त्याचा रोल नगण्य आहे असे हे दोघेही म्हणत होते त्यावरुन उलट शंका आली आणि याच्यावर पाळत ठेवली, तो या गावात गेला. सेल फोनही तो गावापासून दीड दोन तासाच्या अंतरावर गेल्यावर चालू करायचा.

ड्रोन अ‍ॅटॅक, त्यात मरणारे नागरीक, सीआयए च्या काँट्रॅक्टरने गोळ्या घालून मारलेले दोघे आणि बर्‍याच कारणांनी पाकिस्तानशी संबंध खराब झाले होते त्यामुळे परिस्थितीजन्य का होईना पण पुरेसा पुरावा असल्याखेरीज तिथे कारवाई करायला कोणी धजत नव्हते. गेट्स आणि बायडन तर शेवटपर्यंत का-कू करत होते. ओबामा आणि हिलरीने पुश केले.

कारवाईत भाग घेतलेल्या सील्सशी आजतागायत कोणी बोललेले(मुलाखत) नाही. कदाचित त्यांनी मुलाखत देऊ नये असे काही ठरले असावे. त्यामुळे लादेनची बॉडी व्हर्जिनियात आहे/होती असे समजायला हरकत नाही.

पुस्तक वाचा. Wink

वाचायला हवं पुस्तक. परिचयाबद्दल आभारी आहे. मास्तुरे तुम्ही दिलेली माहिती पण इंटरेस्टिंग आहे.

कारवाईत भाग घेतलेल्या सील्सशी आजतागायत कोणी बोललेले(मुलाखत) नाही. कदाचित त्यांनी मुलाखत देऊ नये असे काही ठरले असावे.>>> हो. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची खरी ओळखही अगदी ठरावीक आवश्यक लोकांनाच माहीत आहे.

फारेन्ड, टायपो. दुरुस्त केले. 'तिथले पुरुष वॉर व्हेटेरन इ. असतील तर ते त्यांच्या युद्धाबद्दलच्या स्टोरीज सांगण्यात, बाहेर जाऊन स्मोकिन्ग करण्यात वेळ घालवतात' असं. हे शब्दशः नसेल पण त्यावेळी स्त्रियांची संख्या जास्त म्हणून चेष्टेवारी नेणार्‍याना उत्तर म्हणून तसं म्हटलंय. त्यापूर्वी सीआयए ही पुरुषांची मक्तेदारी होती.

कारवाईचे सविस्तर वर्णन आहे. एक पूर्ण प्रकरण आहे. पण त्या आधीची कथाच जास्त इन्टरेस्टिन्ग आहे.

कालच हे पुस्तक वाचायला हातात घेतले आणि आज याचा पुस्तक परिचय वाचला. खूपच मस्त वाटतेय हे पुस्तक वाचायला, अजिबात हातातून सोडवत नाही.

मस्त परिचय. नक्कीच वाचणार. धन्यवाद लोला.

मध्ये मी "ग्रोईंग अप बिन लादेन" हे बिन लादेनचा मुलगा आणि पहिली बायको ह्यांनी लिहिलेले आणि जिन सॅसन हिने शब्दांकन केलेले पुस्तक वाचले. ते पण "हातातून खाली ठेववत नाही" ह्या यादीतले आहे.

एक सर्वसामान्य आयुष्य जगणारा, कुटुंबवत्सल, देवभोळा माणूस जगातला "मोस्ट वाँटेड" अतिरेकी कसा झाला, आणि त्यात त्याच्या कुटुंबाची कशी कुतरओढ झाली हे वाचताना त्रास होतो. कुटुंबियांची कीव येते.
ओसामा बिन लादेन आणि पहिली बायको ह्यांचा प्रेमविवाह झाला होता, तिचा लादेन बरोबरचा तेंव्हापासूनचा ते ती अफगाणिस्तानातून सिरियाला (९/११ च्या आधी) पळून गेली तेंव्हा पर्यंतचा प्रवास तिच्या शब्दात कळतो. पुस्तकात ती त्याच्याबद्दल अवक्षर काढत नाही किंवा तक्रार करत नाही. ओमार (मुलगा) मात्र वडीलांचे विचार न आवडणारा, सामान्य आयुष्य जगण्याची धडपड करणारा, आई आणि भावंडांवर नितांत प्रेम करणारा!! असो...

खूप दिवसांपासून त्या पुस्तकाचा परिचय लिहायचाय, मुहुर्त लागला की लिहिते :).

>>> मास्तुरे तुम्ही आणि पराग एकच म्हणताय का? अगदी त्याच गावाचं नाव घेणं मला जरा कठीण वाटतंय.

त्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या प्राध्यापकांनी मिळालेल्या बर्‍याच माहितीचे विश्लेषण करून व संख्याशास्त्रातील 'गेम थिअरी' वर आधारीत एक मॉडेल तयार केले व त्यानुसार लादेन अबोटाबाद मध्ये असण्याची शक्यता जवळपास ९७ टक्के इतकी दिसली. अबोटाबाद व्यतिरिक्त अजून २-३ शहरात तो असण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे असे लक्षात आले. त्यानुसार अमेरिकेच्या संरक्षण खात्याने या शहरांवर लक्ष केंद्रीत करून लादेनच्या तपासाला सुरूवात केली. या शहरांच्या प्रत्येक रस्त्याचे नकाशे गुगल अर्थ व उपग्रहाच्या प्रतिमांद्वारे तपासून तिथे २००२ नंतर कोणत्या रस्त्यांवर नवीन घरे बांधण्यात आली आहेत हे अक्षरशः लाखो प्रतिमांचा तपास व तुलना करून तपासले गेले. त्यामध्ये अबोटाबादमध्ये २००५ नंतर एक नवीन इमारत झाली असून त्या इमारतीला १५ फुटी उंच कुंपण भिंत आहे हे लक्षात आले. अर्थात हे घर सापडेपर्यंत २००९ उजाडले होते. संशयावरून इतरही अनेक नवीन इमारतींवर लक्ष केंद्रीत करून गुपचुप तपास सुरू केला.

शेवटी अबोटाबादमधील त्याच इमारतीवर संशय नक्की झाला. गुपचुप काढलेल्या माहितीनुसार त्या घरात फोन कनेक्शन घेण्यात आले नव्हते. आजूबाजूला लष्करी अधिकार्‍यांच्या अनेक पॉश इमारती असताना या इमारतीत साधा फोन नसावा ही गोष्ट नक्कीच संशयास्पद होती. त्या इमारतीवर अनेक दिवस लक्ष ठेवल्यावर आत किती जण असावेत याचा अंदाज बांधला गेला. इमारतीतून क्वचितच कोणीतरी बाहेर येत असे किंवा आत जात असे हेही लक्षात आले.

नंतर एका खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार एका कुरिअर सर्व्हिसमॅनचा सतत २ वर्षे पाठलाग करून तिथे लादेनच राहतो याची पूर्ण खात्री करून घेतली आणि नंतरच त्याला मारण्याचे ऑपरेशन ठरविण्यात आले होते.

बादवे, अमेरिकन संरक्षण खात्याने 'गेम थिअरी' वापरून अमेरिकेतील यापुढील अतिरेकी हल्ला कुठे होईल याचा अंदाज बांधणारे मॉडेल तयार केले आहे. त्या मॉडेलनुसारच २००१ नंतर न्यूयॉर्क वर होऊ घातलेले किमान ३ हल्ले आजवर टाळता आले आहेत.

Pages