आईला शाळेत जायचंय : अमेरिका (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 May, 2012 - 11:13

अमेरिकेला आल्यावर व्हिसा, घरच्या जबाबदार्‍या अशा कारणांनी अनेक स्त्रियांना नोकरी करणे शक्य होत नाही. बर्‍याच स्त्रिया स्वतःहून मुलांसाठी आपली नोकरी बाजूला ठेवतात. एकदा मुलं शाळेला जायला लागली की मग पुन्हा नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या कालावधी नंतर सुरुवात करणे फार कठिण जाते. डिग्री जुनी झालेली असते. स्किल सेट सध्याच्या जॉब मार्केटपेक्षा मागे पडलेला असतो. अशावेळी बरेचदा नवीन क्षेत्रात शिक्षण घेणे किंवा आपल्या डिग्रीला पूरक शिक्षण घेणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. योग्य माहिती असल्यास / मि़ळवल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास अमेरीकेत शिक्षण घेणे सोपे आहे. त्या संदर्भात माहिती देण्याचा आम्हा संयुक्तां तर्फे हा छोटा प्रयत्न-

संयुक्ता सदस्यांपैकी बर्‍याचजणी किंवा आपल्या ओळखीमध्ये अनेकजणी अमेरिकेत डिपेंडंट व्हिसावर येतात. डिपेंडंट व्हिसाचे H4, F2 इ. प्रकार आहेत. ह्या मुली भारतात नोकरी करत असतात, चांगलं करिअर असतं पण इथे व्हिसा स्टेटसमुळे नोकरी किंवा उद्योग करता येत नाही. काही जणींना व्हिसाची अडचण नसते पण इथे शिक्षण घेण्याची इच्छा असते, नवीन कोर्सेस करणं नोकरीत आवश्यक असतं. अमेरिकेत शिक्षण घेणे हेही अनेकांचं स्वप्न असू शकतं. इथल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीतील वातावरण, आपल्याला हवे ते कोर्स निवडण्याची मुभा, फक्त परीक्षेची तयारी न करता सखोल ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने आखलेला अभ्यासक्रम, भल्या मोठ्या अनेक मजली लायब्ररीज, भरपूर रिसोर्सेस, ज्ञान मिळवण्यासाठी कुठलीही आडकाठी किंवा सीमा नसणे, अनेक देशातले विद्यार्थी आणि शिक्षक हे सगळं अगदी आवर्जून हा अनुभव घेण्याइतपत फार फार समृद्ध आहे. संधी मिळाली तर अवश्य हा अनुभव घ्यावा.

अमेरिकेत शिक्षण घेण्याचा फायदा फक्त नोकरी मिळवण्याच्या, टिकवण्याच्या, प्रमोशन मिळवण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही होतो. तुमचा दृष्टिकोन विस्तारतो, व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतो. फायदे अनेक आहेत, तोटे खरं तर नाहीतच. फक्त भरपूर कष्ट करावे लागतात, आपल्याला आयुष्यात काय महत्त्वाचं आहे ते ठरवावं लागतं (priorities), कदाचित छोट्या छोट्या गोष्टींचे त्याग करावे लागतात. पण हे तोटे नाहीत, फायदेच आहेत हे एकदा लक्षात आलं की त्याचंही फारसं काही वाटत नाही. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही स्त्री आहात म्हणून किंवा लहान बाळाची आई आहात म्हणून सवलत मिळत नाही, पण मदत मिळू शकते.

सुरुवातीची तयारी-
कोर्स निवडताना मेन स्ट्रीम टेक्नॉलॉजी किंवा मॅनेजमेंट क्षेत्रांचाच विचार न करता स्कूल टीचर, नर्सिंग , मिडिया, मॉंटेसरी स्कूल टीचर, काउंन्सेलर, फूड टेक्नॉलॉजी, हेल्थ मॅनेजमेंट, पॅरालिगल, डेंटल असिस्टंट, मेडिकल कोडिंग, इंटरनेट मार्केटिंग इत्यादी क्षेत्रांचा जरूर विचार करता येईल. पूर्ण वेळ कोर्सच निवडला पाहिजे असं नाही. कम्युनिटी कॉलेजमधून छोटे कोर्सेस किंवा तेथील Continuing education (CE) and Workforce Development अंतर्गत असलेल्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेता येईल. या कोर्सेसचे शुल्क कमी असते. तसेच हे कोर्स 'ऑफ वर्क आवर्स' मध्ये उपलब्ध असल्यामुळे करणे सोयिस्कर आहे. या कोर्सना GMAT/GRE ची गरज नसते. कोर्स पूर्ण करण्यासाठी लागणारा एकूण वेळ कमी असतो. प्रवेशासाठी पेपरवर्क कमी आहे. काही उदाहरणा दाखल कोर्सेस-

  • Mortgage Broker/Loan Officer
  • Creative Writing
  • Clinical Medical Assistant,
  • Real Estate
  • Graphic Design

कुठलाही कोर्स घेण्याआधी त्या कोर्सची ऑनलाइन माहिती मिळवा. त्या विषयाचे/कोर्सचे फायदे, तोटे, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, त्यांना झालेला फायदा, या कोर्सला नोकरी देताना कंपन्या किती महत्त्व देतात अशी सर्व प्रकारची माहिती ऑनलाइन मिळू शकते. एकदा कोर्स ठरला की त्या डिपार्टमेंटची माहिती काढा. त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखास (Head of the Department or Head of the Course) भेटा. तुमची शैक्षणिक माहिती त्यांना देऊन तुमच्या कोर्सबद्दलच्या अपेक्षा सांगा. या भेटीचा, प्रमुखांशी बोलण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला प्रत्यक्ष माहिती मिळते. कधी कधी तुम्ही शोधत असलेला कोर्स वेगळा असू शकतो. तसंच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतल्या HOD किंवा अ‍ॅडवायझर यांच्याशी बोललात तर तुलना करून निर्णय घेणं सोपं जातं. तुमची शैक्षणिक पात्रता, तुमचं त्या विषयातलं ज्ञान याबद्दल त्यांना देखील कळतं. त्यामुळे अ‍ॅडवायझर, HOD तुम्हाला योग्य कोर्स सुचवू शकतात. कोर्सबद्दलची, डिपार्टमेंटबद्दलची माहिती ऑनलाईनपण मिळते. कोर्सला भरावी लागणारी फी, स्कॉलरशिप, असिस्टंटशिप, ऑन कँपस जॉब याबद्दलही माहिती युनिव्हर्सिटीत अथवा ऑनलाईन मिळू शकते. प्रत्येक कॉलेज कँपसवर स्टुडंट कॉर्डीनेटर असतात, ते खूप मदत करतात आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांना भेटून खूप शंकांचे निरसन होते.

युनिव्हर्सिटी आणि कम्युनिटी कॉलेज-
कोर्सला सुरूवात करण्याआधी कुठल्या कारणाने तुम्ही हा कोर्स करत आहात त्यावर विचार करा. फक्त आवड म्हणून, आधी घेतलेल्या शिक्षणास पूरक म्हणून करत असाल तर कम्युनिटी कॉलेजमधले कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. डिपेंडंट व्हिसावर असाल तर छोट्या कोर्सना अ‍ॅडमिशन मिळणं सोपं जातं. कोर्स निवडताना पुढे डिग्री कोर्सला क्रेडिट्स मिळतील ह्याची खात्री करावी. म्हणजे पुढे खर्च आणि कोर्स पूर्ण करण्याचा कालावधी कमी होतो.

वेळ भरपूर आहे, खर्च करायची तयारी आहे, F1 व्हिसा घ्यायची तयारी आहे, मेन स्ट्रीम मध्ये जॉब मिळावा म्हणून करत आहात तर अवश्य BS/MS ह्या पर्यायाचा विचार करा. पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यायचा असेल तर व्हिसा स्टॅटस बदलावं लागतं (उदा. F2 वरून F1, H1 वरुन F1). डिपेंडंट व्हिसावर पूर्ण वेळ कोर्स करता येत नाही. तसंच हा मोठा निर्णय घेण्यापूर्वी अभ्यासासाठी द्यावा लागणारा वेळ, घर, मुले, प्रवासाला लागणारा वेळ ह्या सगळ्याची कल्पना येण्यासाठी आधी एखादाच छोटा कोर्स करून बघायला हरकत नाही. खूप दिवस शिक्षण घेणे, अभ्यास करणे पासून लांब राहिलेलं असाल तर आपल्याला सगळे एकत्र किती जमेल याचा अंदाज यायला सोपे जाते.

कम्युनिटी कॉलेज हे लोकल युनिव्हर्सिटीची एक शाखा असू शकते किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कार्यकारिणीने आखून दिलेल्या धोरणानुसार चालवले जाते. Wikipedia वर असलेल्या व्याख्येनुसार, "In the United States, community colleges, sometimes called junior colleges, technical colleges, or city colleges, are primarily two-year public institutions providing higher education and lower-level tertiary education, granting certificates, diplomas, and associate's degrees. Many also offer continuing and adult education". कम्युनिटी कॉलेजबद्दल अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Community_college आणि http://en.wikipedia.org/wiki/Education_in_the_United_States इथे बघा.

कम्युनिटी कॉलेज स्वतःच्या काउंटी मधले निवडूच शकता पण राज्यातल्या दुसर्‍या काउंटीत असलेल्या कम्युनिटी कॉलेजमध्ये तुम्हाला हवे असलेले कोर्स 'ऑनलाईन' उपलब्ध असल्यास तिथे प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी द्यावे लागणारे शुल्क 'इन स्टेट' असते. कम्युनिटी कॉलेजमध्ये दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम सुद्धा असतो. Associate of Arts (AA) आणि Associate of Science (AS) अशा पदव्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळतात. Certificate Course असेल तर तो सहसा एक वर्षाचा असतो आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट मिळतं. सध्या युनिव्हर्सिटीमध्ये शुल्क खूप वाढल्याने पहिली दोन वर्ष कम्युनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन पुढे युनिव्हर्सिटीमध्ये चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला transfer घेणे हा पर्याय अनेक विद्यार्थी वापरतात. यात फी कमी लागत असल्याने पैशाची बचत होते.

आवड म्हणून किंवा नोकरीतील गरज म्हणून एखादा क्रेडिट कोर्स करायचा असेल तर कम्युनिटी कॉलेज हा उत्तम पर्याय आहे. एखादाच क्रेडिट कोर्स घ्यायचा असेल तर सहसा मार्कशीटस, इतर शैक्षणिक पात्रता बघत नाहीत. पण Associate Degree किंवा Certificate Course साठी प्रवेश घ्यायचा असेल तर १२ पर्यंतचं शिक्षण ( HSC marksheet) बघतात. इथे SAT देणं अपेक्षित नसतं पण इंग्रजी आणि गणितासाठी Placement Test द्यावी लागते. चांगले गूण मिळाल्यास तर Basic English, Mathematics हे विषय घ्यावे लागत नाहीत.

ऑनलाइन आणि ऑन कँपस कोर्सेस-
आजच्या काळात एक मोठी सवलत म्हणा किंवा तंत्रज्ञानाचा फायदा म्हणा पण अनेक युनिव्हर्सिटी/कॉलेजांमध्ये ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहेत. काही कारणांसाठी ऑन कँपस कोर्स घेता येत नसल्यास ऑनलाइन कोर्स करावेत. कम्युनिटी कॉलेजांमध्ये सुद्धा ऑनलाइन कोर्स, डिग्री घेण्याची सोय आहे. ऑनलाइन कोर्स करताना शिस्त, नियमितपणा (सेल्फ डिसिप्लिन्ड) असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःला 'डीटेल्ड' आणि 'इन्स्टंट' कम्युनिकेशनची सवय लावून घ्यायला लागेल. थोडक्यात प्रत्येक ईमेलला उत्तर देणे आणि कुठल्याही प्रश्न, शंकांसाठी तत्परतेने प्राध्यापकांना, सहअध्यायींना ईमेल पाठवणे अथवा फोन करणे याची सवय लावून घ्यावी लागते. असाईनमेंट्सच्या डेडलाइन्स, दर आठवड्याला क्विझेस, दर महिन्याला परीक्षा असतात. अभ्यास आपला आपण करणे, टिपणं काढणे, पुस्तकं वाचणे, इंटरनेटवर माहिती शोधणे हे सगळं स्वतःहून करायची सवय लावून घ्यावी लागेल. इथले प्राध्यापक मदत करायला अतिशय तत्पर असतात, पण त्यांना तुम्ही मनापासून काम, अभ्यास करताय हे जाणवून द्यावं लागतं. एकदा त्यांच्या लक्षात आलं की स्वतःहून बरीच माहिती देतात. पुढे नोकरी शोधताना त्यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्राचा (रेको लेटर) खूप फायदा होतो. भारतात थोडीफार स्पून फीडिंगची सवय असते. आपण भरपूर शिकवण्या (External coaching) लावलेल्या असतात पण इथे स्वतःहून माहिती जमवताना, टिपणं काढताना तुम्ही बरंच जास्त, सखोल शिकता. हे सगळं असलं तरी सहज शक्य असल्यास एक तरी कोर्स कँपसवर जाऊन करावा. कँपसवरचं वातावरण निराळंच असतं. सगळ्या वयाचे (अगदी ७० वर्षांचे आजोबापण), बर्‍याच देशातले, राज्यातले विद्यार्थी भेटतात. लायब्ररी प्रचंड मोठी आणि भरपूर रिसोर्सेस असलेली असते. शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून फरक पडतो.

व्हिसा आणि फंडिंग-
अमेरिकेत शिक्षण घेताना H4, L2 या व्हिसावरही घेता येते. तसेच EAD स्टेटस् वरही घेता येते. ग्रीन कार्ड अथवा नागरिकत्व नसल्यास Federal Student Aid मिळू शकत नाही. डिपेंडंट व्हिसा असल्यास नोकरी करता येणार नाही. परंतु कमी व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्ज (Educational Loan) घेता येते. त्याचे परतफेडीचे हप्ते नोकरी मिळाल्यावर सुरू करता येतात. काही युनिव्हर्सिटी मधून डिपेंडंट व्हिसावर एक किंवा दोन सत्र (Semester) पूर्ण झाल्यावर गूण (GPA) बघून काही नियमांनुसार स्कॉलरशिप मिळू शकते. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करताना तुम्ही राहत असलेल्या (रेसिडेन्सी) राज्यातील स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतलात तर शुल्कात सवलत मिळते. प्रत्येक राज्याचे वेगळे रेसिडेन्सी रुल आहेत. अर्कान्ससमध्ये हे ड्युरेशन ६ महिन्यांचं आहे तर अलास्का मध्ये २ वर्षांचं. काही ठिकाणी स्वतःच्या नावावर घर असणे इत्यादी मुळे रेसिडेन्सीच्या ड्युरेशनमध्ये बदल होऊ शकतो. ही सवलत डिपेंडंट व्हिसावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. स्टुडंट व्हिसावर (F1) आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ही सवलत मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिसाचे नियम बदलत राहतात. प्रत्येक कॉलेज/युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल स्टुडंट्सचं ऑफिस असतं. तिथे व्हिसा संबंधित माहिती मिळते. तसंच अनेक ऑनलाईन फोरम्स आहेत तिथूनही माहिती मिळवता येते. या बाबतीत एका सोर्सवर अवलंबून राहू नये.

ग्रीन कार्ड अथवा अमेरिकेचे नागरिकत्व असल्यास FAFSA कडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. शिक्षण पूर्ण होऊन सहा महिने होईपर्यंत ह्या कर्जाचे परतफेडीचे हप्ते सुरू होत नाहीत. अधिक माहितीसाठी http://www.fafsa.ed.gov/ इथे पहा.

भारतातील डिग्रीचे काय-
अमेरिकेत येणार्‍या बहुतेक भारतीयांकडे ३ वर्षांची (B.A, B.Com, B.Sc, B.C.S वगैरे), ४ वर्षांची (इंजिनीअरिंग), ५ किंवा ५.५ वर्षांची ( आर्किटेक्चर, मेडिसिन, M.A., M.Com., M.Sc) अशी डिग्री असू शकते. त्यामुळे इथे आल्यावर Graduate School ला (मास्टर्ससाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे नाव) अर्ज करणे शक्य होऊ शकते. भारतात इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, मेडिसिन, M.A., M.Com., M.Sc असा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर GRE (Graduate Record Exam) व TOEFL (Test of English as a Foreign Language) या परीक्षा देऊन व विद्यापीठाच्या इतर अटींची पूर्तता केल्यास तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. GRE व TOEFL या परीक्षांची माहिती www.ets.org/ इथे मिळेल. प्रवेश देण्याचे सर्व हक्क अर्थातच विद्यापीठाने राखून ठेवलेले असतात. B.A, B.Com, B.Sc, B.C.S असा अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास Graduate School ला प्रवेश घेण्याआधी GRE व TOEFL बरोबरच काही prerequisites (पूर्व परीक्षा) घ्यायला लागण्याची शक्यता असते. Prerequisites घ्यायचे किंवा नाही हे सर्वस्वी युनिव्हर्सिटीवर अवलंबून असते. मेडिसिन अभ्यासक्रमासाठी वेगळे नियम आणि प्रवेश प्रक्रिया आहेत.

आधी घेतलेल्या शिक्षणाशी फारकत घेत संपूर्ण वेगळ्या विषयातलं शिक्षण घ्यायचं ठरवलंत तर कदाचित Under Graduate Program ला (बॅचलर्स) अ‍ॅडमिशन घ्यावी लागेल. तुम्ही आधी पूर्ण केलेला अभ्यासक्रम बघून काही विषयांसाठी सवलत (Exemption) मिळू शकते. पण याचा निर्णय अभ्यासक्रमाचे प्रमुख व इतर शिक्षक, अ‍ॅडवायझर घेतात.

MBA करायचे असल्यास GMAT (Graduate Management Admission Test) द्यावी लागते. MBA अभ्यासक्रमासाठी नोकरीचा अनुभव जमेस धरला जातो. तसंच तुमच्याकडे जर आधीच मास्टर्स आहे किंवा Ph.D आहे, किंवा नोकरीतला खूप वर्षांचा अनुभव आहे अश्या वेळेस तुमचा इंटरव्ह्यू घेऊन विभागप्रमुख तुम्ही GMAT द्यायची आवश्यकता आहे किंवा नाही हे (नियमाला अपवाद म्हणून) ठरवू शकतात. पण त्यासाठी Outstanding educational record, नोकरीतला अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच सरसकट हा नियम लावला जात नाही हेही लक्षात घ्या.

हा छंद जीवाला लावी पिसे-
आता पर्यंत करियर मध्ये वर्क परमिट नसताना स्वतःला नोकरीसाठी कसे तयार करावे याबद्दल माहिती दिली. आता आवड म्हणून, छंद म्हणून काही शिकण्याची, करण्याची इच्छा असलेल्यांसाठी थोडी माहिती. कुठल्याही कारणाने तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल (वेळ आहे किंवा काढता आला हे जास्त महत्त्वाचे आहे) तेव्हा काय करायचे हा प्रश्न बर्‍याच लोकांना सतावू शकतो. भारतात आपण शिकत असताना, नोकरी संसाराच्या रगाड्यात बर्‍याच गोष्टी करायच्या राहून जातात. कोणाचं गाणं शिकायचं राहून गेलं असेल तर एखादं वाद्य वाजवायला शिकणे, पोहायला शिकणे, स्किइंग करणे, बॅले शिकणे, वेगवेगळ्या भाषा शिकणे हे करायची इच्छा असेल तर कोणाला स्क्रीन प्रिटींग, ब्रेड कसा बनवायचा, कंप्युटर कसा वापरायचा, अकाउंटिंग हे असे वेगवेगळे भन्नाट काहीतरी शिकायचे असेल तर कोणाला अजून काही. ह्या सगळ्या प्रकारचे कोर्स प्रत्येक राज्याच्या कम्युनिटी कॉलेज मध्ये उपलब्ध असतात. तसेच प्रत्येक शहरात रीक्रीएशन सेंटर (थोडक्यात नगरपालिकेतर्फे चालवले जाणारे) असते तिथे पण असे क्लासेस चालवले जातात.

तुमच्या भागातील असे सेंटर किंवा कम्युनिटी कॉलेज कुठे आहे याबद्दल गूगल वापरून माहिती काढता येईल. तसेच त्या त्या कॉलेजचे कॅटलॉग, कोर्सचा कालावधी, शूल्क, वेळा या सगळ्यांची माहिती दिलेली असते. उदाहरणादाखल वर्जिनियामधल्या कम्युनिटी कॉलेजचा दुवा देत आहे (http://nvcc.edu/index.html). प्रत्येक कॉलेजात विद्यार्थ्यांना सगळी माहिती देणारे Student Counselor असतात. त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या शंकांचे समाधान होते. त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्या कॉलेजात प्रवेश घेतला पाहिजे असे काही नाही.

कम्युनिटी कॉलेजमध्ये Associate of Arts (AA) or Associate of Science (AS) डिग्री घ्यायला जायचे की नुसते आवडीचे कोर्सेस करायचे हे प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, बजेटनुसार ठरवायचे. आपल्याला कोर्स आवडेल की नाही अशी शंका आली तर त्या विषयाच्या शिक्षकांना, डिपार्टमेंटच्या हेडला जाऊन विचारता येते आणि चर्चेअंती योग्य तो निर्णय घेता येतो. मुळात बहुतेक कोर्सना त्या विषयातला कामाचा अनुभव, शिक्षण इत्यादीची आवश्यकता नसते. कुठल्याही वयाची व्यक्ती शिकायला जाऊ शकते.

जर डिग्री घ्यायची नसेल आणि कुठलाही विषय फक्त आवड म्हणून शिकायचा असेल तर Credit कोर्सेस Audit करता येतीत. थोडक्यात तुम्हाला त्या विषयांची परीक्षा द्यावी लागत नाही आणि त्या कोर्सचे क्रेडिटपण मिळत नाही. कोर्स ऑडिट करण्याचा फायदा असा की त्यासाठी शुल्क खूप कमी असते. तसेच बहुतांश कोर्ससाठी सिनियर सिटिझन कडून अत्यल्प प्रमाणात फी घेतात त्यामुळे ज्यांचे आई-वडील अमेरिकेत कायम स्वरुपी राहायला आले आहेत त्यांना अश्या वेगवेगळ्या कोर्सचा लाभ घेता येईल (व्हिजिटर व्हिसावर असलेल्या सीनियर सिटिझन्सना या कोर्सला प्रवेश मिळत नाही). कुठल्याही व्हिसावर (डिपेंडंट/वर्क/स्टुडंट) असताना या कोर्सना अ‍ॅडमिशन घेता येते ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आवडीचे कोर्सेस करता करता कधी कोणाला यातून एखादी बिझनेस आयडिया सुचेल ते सांगता येत नाही.

काही ऑनलाईन रिसोर्सेस-
खालील दुव्यांवर बरेच मोफत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहेत. हार्वर्ड, प्रिन्स्टन, बर्कले, मिशिगन, UCLA अश्या नावाजलेल्या विद्यापीठांकडून व्हिडिओ, वेबसाइट, पॉडकास्ट इ. वापरून हे विषय मोफत शिकवले जातात. ते फक्त अमेरिकेतूनच नाही तर जगातल्या कानाकोपर्‍यातून कुठूनही, कुणालाही करता येतात. यात बर्‍याचशा शास्त्रशाखा, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, भाषा, कला, सिनेमा, संगीत, इतिहास, राजकारण, कॉपीराइट्स आणि इतर शेकडो विषयातील कोर्स उपलब्ध आहेत. तेव्हा ज्यांना आवड आहे, एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता आहे आणि त्या विषयातले ज्ञान वाढवायचे आहे अश्या सगळ्यांनी तेथे उपलब्ध असलेल्या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा.

http://ocw.mit.edu/courses/#sloan-school-of-management

http://www.coursera.org

http://www.class-central.com/

http://www.openculture.com/freeonlinecourses

इथे दिलेली माहिती म्हणजे Guidelines आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळे नियम असू शकतात. त्याची माहिती त्या त्या युनिव्हर्सिटीमधूनच आणि त्या त्या डिपार्टमेंटमध्येच मिळेल. इथे शिक्षण घेणार्‍या प्रत्येकाचा अनुभवही वेगळा असू शकतो. त्यामुळे कोर्सला प्रवेश घेण्याआधी पूर्ण आणि सखोल माहिती काढणे याला पर्याय नाही.

एकदा तरी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीत/कॉलेजमध्ये शिकण्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. इथली शिकवण्याची पद्धत, अतिशय मोठी समृद्ध वाचनालये, वेगवेगळ्या देशातून-संस्कृतीतून आलेले विद्यार्थी, परीक्षापद्धती या सगळ्यांचा एकत्र अनुभव तुम्हाला श्रीमंत करून जातो !

-अंजली, बिल्वा, रुनी, सीमा, एक मुलगी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकताच एक कोर्स कोर्सेरावरून पूर्ण केला. सर्टिफिकेटही मिळाले.
ह्या माहितीबद्दल मायबोली आणि संयुक्ताचे मनापासून आभार! Happy

EDUCATION Websites

edsurge.com
khanacademy.org
edx.org
coursera.org
udacity.com
generalassemb.ly
baeo.org/researchlinks
edweek.org
nces.ed.gov
greatschools.org
stand.org
crpe.org

ही माहिती
http://blog.ted.com/2007/08/03/100_websites_yo/
या साइटवर मिळाली.

कोर्सेराने नुकतेच टीचर्स, एज्युकेटर्स व पेरन्ट्स साठी ऑनलाईन कोर्सेस सुरु केले आहेत : Coursera's new Teacher Professional Development Content will offer teachers, parents and other educators a broad range of courses in various areas of teaching and pedagogy.

Putting a MOOC on the Resume

“At this point, a MOOC listed on a resume shows that someone is curious, interested in self-improvement and engaged with their professional development — all of which are great attributes to share with a prospective employer.”

कोर्सेरावर Creative Programming for Digital Media & Mobile Apps कोर्स सुरु झाला आहे. खुप मजा येत आहे करताना. काल first time i saw my code actually running on my i-phone. was very happy. Happy बरेच वर्शा नन्तर परत Programming करत आहे. कोर्सेरा च्या माहितीबद्दल मायबोली आणि संयुक्ताचे मनापासून आभार

http://coursebuffet.com/
या ठिकाणी एखाद्या विषयाबद्दलचे सर्व ऑनलाइन कोर्सेस शोधून, तुलना करून हवा तो निवडता येतो.

ही माहिती इथे योग्य नसेल तर सांगा. पोस्ट उडवेन.

तुम्ही ज्या कंपनीत काम करत असाल ती कंपनीही तुमचा कोर्सेरा कोर्स (व्हेरिफाईड सर्टिफिकेट सह) स्पॉन्सर / प्रायोजित करू शकते. त्या बद्दलची ही बातमी : Yahoo! sponsors employees to earn Verified Certificates on Coursera

अमेरीकेतल्या कुणी WES मधून भारतातील शिक्षणाचे क्रेडीट एव्हाल्युएशन करून घेतले आहे का?
कम्युनिटी कॉलेजेस अशाप्रकारचे क्रेडीट घेतात का?

बिल्वा: Happy

तोषवी: WES मधून मी क्रेडिट एवॅलुएशन नाही केलं.
माझ्या युनि ने डिग्री सर्टिफिकेट सोबत सिलॅबस सबमिट करायला सांगितला होता ( this is to verify what courses were covered in the degree I was using to get entrance in the Masters program at American University ) . नागपुर विद्यापीठाने सिलॅबस न कव्हर लेटर पाठवल्याचं आठवतय मला.

कम्युनिटी कॉलेजेस अशाप्रकारचे क्रेडीट घेतात का?>>> हो, घेतात. कम्युनिटी कॉलेजला मलातरी भारतातल्या शिक्षणाच्या एव्हॅल्युएशनची गरज लागली नव्हती. तू WTCC मध्ये अ‍ॅडवॅझरशी बोलून घे. ते व्यवस्थित गाईड करतील. माझ्या मते: तू प्री-रिक्वीज घेणार असशील तर evaluation ची गरज नाही. कुठल्या डिग्री प्रोग्रॅमसाठी अ‍ॅडमिशन घेणार असशील तर १२ चे मार्कशीट आणि सर्टीफिकेट लागेल. तसंच आपल्याकडे SAT चा स्कोर नसतो म्हणून गणित / इंग्लिशच्या टेस्ट्स द्याव्या लागतील (ज्या सोप्या असतात). ही कम्युनीटी कॉलेजसाठीची रिक्वायर्मेंट आहे. युनीवर्सिटीची वेगळी रीक्वायर्मेंट आहे.

मी WES मधून evaluation करून घेतलेले नाहीत, त्यामुळे त्याचा अनुभव नाही.

मी ती प्लेस्मेंट टेस्ट दिली. त्यामुळे गणित ईग्लिश च्या प्री रिक्विज लागणार नाहीयेत. मी क्लिनिकल ट्रायल असोसिएट साठी पण ट्राय करणार आहे. त्याच्या सर्टीफिकेशन कोर्स साठी हेल्थ केअर मधील ग्रॅज्युएशन लागतं. माझे आयुर्वेदातील ग्रॅजुएशन असल्याने मला क्रेडीट इव्हअ‍ॅल्युएशन करून घ्यायचे आहे.

गेल्या आठवड्यात PMP certification pass झाले.
वैजयंती कामत या मायबोलीकरांनी खूप सपोर्ट केलं. जुन्या मायबोलीतील आगाऊ, शोनू यांच्या यासंबंधीच्या पोश्टी खूप कामी आल्या. शोनूला खूप खूप धन्यवाद्-तिच्या कमेंट्स वाचून application व्यवस्थित fill करता आले.
वैजयंती यांनी खूप मोरल सपोर्ट आणि बेस्ट सल्ले दिले. त्यांच्या effectivepmc.com siteची pratice exam ही देऊ केली. त्यांचे कसे आणि किती आभार मानावे कळत नाहीये!
प्रत्येक आनंदात मोलाचा वाटा असणारी मायबोली आणि संयुक्ताची ही सपोर्ट सिस्टीम, जीवनाचा एक भाग झाली आहे. खूप खूप धन्यवाद!

cpr certification कुठे करता येइल? ह्या क्लास चे स्वरूप ऑनलाईन असते का? मला सगळे कोर्स तसेच सापडतायत. कम्युनिटी कॉलेज मधील क्लासेस भरले आहेत. मला फॉल सेमिस्टर सुरू व्हायच्या आधी ते सर्टिफिकेशन पूर्ण करायचे आहे.

Toshavi
Enquire with your local hospital or check your county-city website, you may find some info there.
American heart association, red cross etc offer CPR certification you can check that as well.

CPR is available in Emergency medicine department of most major universities and Red Cross. If a separate class is not available, usually it is done with First Aid Course or as a part of Life guard courses.

@तोषवी,

cpr certification बाबत यातलं काही उपयोगी पडलं तर पहा. (I am not sure उपयोगी पडेल की नाही.)

http://www.trianglecpr.com/

http://www.redcross.org/nc/raleigh

http://www.cprconsultants.com/

http://ahainstructornetwork.americanheart.org/AHAECC/classConnector.jsp?...

http://www.heart.org/idc/groups/heart-public/@wcm/@private/@ecc/documents/downloadable/ucm_306636.pdf

http://www.caryfire.com/community/cpr_classes.html

http://www.rexhealth.com/cpr-classes

नमस्कार,

अमेरिकेत रिकाम बसण्यापेक्षा शिक्षण सुरु कराव का हा विचार मनात मुळ धरतोय, नवरा मागे लागलाय, पण अजून मनाची तयारी होत नाहीये, भारतात कॉलेज सोडून आता जवळ जवळ १० वर्ष झाली, नंतर ५/६ वर्ष नोकरीही केली, आणि आता इथे परत entrance exam देऊन शिकायला जायचं, जर कठीण वाटतय, मुलही लहान आहेत, त्यामुळे कस जमेल हि भीतीही आहेच, मनाची तयारी होत नाहीये,

पृर्वि हा लेख वाचला होता, तेव्हा त्यातील माहिती नीटशी समजली नव्हती, विसा नियम इ, परंतु आता इक दोन ठिकाणी चौकशी केल्यामुळे सगळ निट समजल. इथे काही university आहेत, जिथे GRE/GMAT स्कोर लागत नाही, परंतु अशा ठिकाणी प्रवेश घ्यावा किंवा कसे ते समजत नाहीये, शिवाय ५ वर्ष पेक्षा जास्त अनुभव असेल तर GRE waiver मिळतो असे कळते, पण त्यासाठी कुणाशी संपर्क साधायचा तेही माहित नाहीये, हा लेख लिहिणाऱ्या वाचणार्या कुणाला काही माहिती आहे का?

धन्यवाद !

Pages