आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 13 May, 2012 - 02:39


Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
line.pngआई शाळेत जाते

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. असं जरी असलं तरी लग्न, मुलं झाल्यावर ही तशी जवळ असणारी शिक्षणाची वाट तशी परकी होत जाते. काही जणी मात्र लग्न, मुलं झाल्यावर सुद्धा ह्या तश्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाटेवर पाऊल टाकतात. लग्नाआधी शिकण्याचा आणि सांसारिक जबाबदार्‍या असतानाचा अनुभव हा अनेक पातळीवर वेगळा. वय वेगळं, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा, जबाबदार्‍या वेगळ्या, आजूबाजूची परिस्थिती वेगळी ...कसा घडतो ह्या वाटेवरचा प्रवास ?

कोवळ्या वयात शिकतांना जीवनाचा मुख्य प्रवाहच मुळी शिक्षण असतो. मातृत्वाची मोठी जबाबदारी पेलताना शिक्षण घेणे हे प्रवाहाविरुद्ध पोहणेही ठरु शकते. शाळा-कॉलेजातलं मुक्त आयुष्य, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यांवर प्रापंचिक जबाबदार्‍यांसकट शिक्षण घेताना आपल्याला भेटतात का? मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां? वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का ? सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त ? मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता ? अभ्यासासाठी मनाची एकाग्रता कशी साधता ह्यासारखे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात.

आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. अनेक सदस्या स्वतःच संसारात पडल्यानंतर, मुले झाल्यानंतर पुन्हा 'शाळेत' गेल्या असतील. मुलाबाळांच्या साथीने अभ्यास करतानाचे, परीक्षा देतानाचे अनुभव, मोठेपणी शाळेत भेटलेले मित्रमैत्रिणी आणि एकूण आपल्या या नव्या शिक्षणाने आपल्यातच घडलेला बदल हे सगळेच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

ह्या धाग्यावर तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपली बायको, आई, मुलगी, मैत्रिण किंवा ओळखीतल्या कुठल्याही आईची शिक्षणासाठीची धडपड पाहिली असेल त्यांनीही अशा आयांबद्दल लिहावे असे आम्हाला वाटते.

ह्या आया कौतुकास पात्र तर निश्चितच आहेत पण शिकण्याची इच्छा पूर्ण न करता आलेल्या एका जरी स्त्रीला ह्यातून मानसिक बळ, जिद्द मिळाली तर ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

वाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तुमच्या आयांबद्दल हे सर्व वाचून खूपच हेवा वाटतो. कारण माझी आई कधीच शाळेत गेली नाही. मी जेंव्हा जेंव्हा माझ्या मित्रांच्या शिकलेल्या आया फाड फाड ईंग्रजी मराठी बोलणार्‍या आया पाहिल्या तेंव्हा तेंव्हा मला कमालीचा हेवा वाटत राहिला. मी आईपासून १२ व्या वर्गापासून लांब राहतो कारण माझे शिक्षण आणि नोकरी दोन्ही होते. आता सिंगापुरात माझी आई आली आहे. परवा ती मला सहज म्हणाली की मला जर कुणी शिकवले असते तर मी नक्कीच खूप काही करु शकले असते. मला आणि माझ्या पुतणीला एकदम पोटात डचमळून गेले. मग आम्ही दोघांनी आईला शिकवायचे ठरवले. आज मी आईसाठी पाटी आणि पेन घेऊन जाणार आहे. परवा तिला हाताच्या कांड्यावर १ ते १० पर्यंत म्हणता आले. ती म्हणाली की तिला व्यवहारिक गणित पटकन येते. पण आकडे आणि अक्षर नाही येत. आईचे वय आता ७८ आहे. तिला आकडे आणि बाराखडी शिकवायला आजपासून आम्ही प्रारंभ करणार आहोत.

हा निर्णय वरचे लेख वाचून आणखीच पक्का झाला. की आईला शिकवायचचं! म्हणून सयंक्ताचे लक्ष लक्ष आभार.

सर्वच कहाण्या प्रेरणादायी आहेत.
बी, आई नक्कीच शिकतील आणि भराभर देखील.

माझ्या आईलादेखील संगीताची खुप आवड होती. त्या काळात स्त्रियांनी गाणे हे कमीपणाचे मानले जात असे, त्यामूळे लग्नापुर्वी शिकणे कठीणच होते. पण सासरी मात्र पोषक वातावरण होते (श्यामलाबाई माजगांवकर,
मधुबाला जव्हेरी या आमच्या नातलग आणि मोहनतारा अजिंक्ये या घरमालक) तरी तिचे गाण्याचे शिक्षण मात्र
नाहीच झाले.

मी दहा वर्षाचा झाल्यावर मात्र तिने रितसर भजन गाणे सुरु केले. गेली ४० वर्षे ती गात आहे. गणेशोत्सवात,
नवरात्रीमधे, खाजगी रित्या पण तिच्या ग्रुपचे कार्यक्रम होत असतात.

मलाही कधीकाळी सुरवात करता येईल, हे स्वप्न तिच्यामूळे टिकून आहे.

सगळ्यांनी खुप छान लिहिलेय.. प्रेरणादायक आहेत सगळे अनुभव.
s_kallolkar, तुमच्या सासुबाईंची ह्या वयात शिकण्याची जिद्द प्रचंड कौतुकास्पद !!त्यांना सलाम आणि त्यांना पुढच्या शिक्षणाला खुप शुभेच्छा Happy

सर्वांचे अनुभव मस्त!
बी, कौतुक वाटले. नक्की शिकव. Happy

s_kallolkar, तुमच्या सासुबाईंची ह्या वयात शिकण्याची जिद्द प्रचंड कौतुकास्पद !!>>>>>सहमत! कमाल आहे !

अनिताताई, अगो, स्वराली, प्राडी, अनघा_मीरा, मानुषी, अरुंधती, बंडोपंत, s_kallolkar, बी, दिनेशदा
कित्ती छान लिहिलय सर्वानी. प्रेरणादायक आहेत हे सर्वच अनुभव.
धन्यवाद संयुक्ता,अनेक वंदनीय स्त्रियांची ओळख झाली उपक्रमामुळे.
सर्व आईंना सादर प्रणाम.
गौरी, कित्ती सुरेख चित्र आहे गं आईंनी काढलेली. फारच सफाई आहे. रंगाची जाण चकीत करणारी ! सलाम माझा Happy

सगळ्याच आयांची शिकण्याची धडपड प्रेरणादायी आहे.

माझी आई पेशाने डॉक्टर. स्वेच्छानिवृत्तीनंतर तिने होमिओपथीचा अभ्यास केला, आवड म्हणून गाणं शिकली. चित्रकलाही हळुहळू सुरू केली.स्वत: वॉटरकलरमध्ये थोडेफार प्रयोग चालले होते तिचे. पण कुठे पद्धतशीर शिकायची तिची इच्छा होती. या वेळी तिचं वय असेल सुमारे पासष्ट. मी आणि ती एसएनडीटी महाविद्यालयात चौकशीला गेलो. तिथे एम ए फाईन आर्टला प्रवेश घेता येईल असं समजलं. पण आईचं पूर्वीचं शिक्षण बीजे मधून. त्यामुळे बीजे ला जाऊन तिथून जुनं `ट्रान्स्फर सर्टिफिकिट' आणणं भाग होतं. कॉलेज सोडल्यावर चाळीस वर्षांनी पुढे शिकण्यासाठी ट्रान्स्फर सर्टिफिकेट हवंय हे समजल्यावर बीजेच्या क्लार्कनीसुद्धा ही कोण 'विद्यार्थिनी' आहे म्हणून बाहेर येऊन बघितलं :). सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून तिने एसएनडीटीला प्रवेश घेतला, दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम कॉलेजला जाऊन जिद्दीने पूर्ण केला.

तिच्या काही वॉटरकलर्सचे फोटो इथे आहेत.

तिच्याकडे बघितलं की जाणवतं, शिकण्याचं वय आयुष्यभर असतं.

या धाग्यावर ज्या सर्व मातोश्रींची वर्णने आली आहेत त्या व सर्वच मातोश्रींच्या चरणी सादर दंडवत......

ज्या मंडळींनी हे सर्व इथे लिहिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार....

गौरी , फारच सुंदर आहेत आईनं काढलेली चित्रं. असं ऐकलंय की रविंद्रनाथ टागोरांनी साठाव्या वर्षी चित्रकला शिकायला सुरुवात केली. तुमच्या आईनं पासष्टाव्या वर्षी. अत्यंत प्रेरणादायी उदाहरण.
इथे लिहिलं म्हणून खूप छान वाटलं.

गौरी , फारच सुंदर आहेत आईनं काढलेली चित्रं. असं ऐकलंय की रविंद्रनाथ टागोरांनी साठाव्या वर्षी चित्रकला शिकायला सुरुवात केली. तुमच्या आईनं पासष्टाव्या वर्षी. अत्यंत प्रेरणादायी उदाहरण.>>> +१
मस्त वाटलं सगळी चित्रं बघून.

अवल, शशांक, अनिताताई, अंजली, आभार.

आई म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड. त्यामुळे तिचा हा सगळा प्रवास अगदी जवळून अनुभवायची संधी मिळाली मला. शिकायला सुरुवात करतानाची तिची चित्रं आणि आताची सफाई यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तिची कायम शिकायची धडपड आणि चिकाटी मला थक्क करते.

आपल्या जवळच्या माणसाचं कौतुक क्वचितच होतं. संयुक्ताने ही संधी दिल्यावर मला मोह आवरला नाही मायबोलीवर हे शेअर करण्याचा. Happy

गौरी, कसली मस्त चित्रं आहेत तुमच्या आईची... खूपच आवडलीत. सर्वांचे अनुभव , लेखन आवडले.
सगळ्यांच्या जिद्दीला सलाम !

अगदी लहानपणी पहिली-दुसरीत असताना 'आई कुठे गेली? ' असा कोणी प्रश्न विचारला तर 'आई शाळेला गेली' असं उत्तर देऊन मी विनोद करायचा प्रयत्न करायचे.
'आई शाळेत जाते' ही संकल्पना माझ्यासाठी अजिबातच नवीन नाही, कारण माझी आई शिक्षिका असल्याने ती रोजच शाळेत जायची - विद्यार्थ्यांना शिकवायला.
पण गेल्या काही वर्षापासून आई कॉलेजला जातीये... एक विद्यार्थीनी म्हणून .. त्या मोठ्या प्रवासाची ही लहानशी गोष्ट.
माझ्या आईचं लहानपण एक साध्या, बेताची परिस्थिती असलेल्या घरात गेलं. आई सगळ्या भावंडात मोठी असल्यानं घरच्या जबाबदा-या फार लहान वयापासूनच तिच्यावर आल्या. अगदी शाळकरी वयापासून आजीला शिवणकामात मदत करण्यापासून ह्या जबाबदारीची सुरुवात झाली. पण तरीही जेव्हा आई, मामा, त्यांचे लहानपणचे मित्र मैत्रीणी आजही एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्या गप्पांमधून ह्या सगळ्या भावंडांनी घरच्या गरीब परिस्थितीतही लहानपण पुरेपुर अनुभवलं असावं. आजच्या हाय्-टेक युगात त्यांच्या लहानपणाच्या गरजा, त्यांचे खेळ खूप बेसिक किंवा साधे वाटतील पण त्यांनी त्याची पुरेपुर मजा घेतली असावी.
अजून एक गोष्ट म्हणजे केवळ शिक्षणच आपली परिस्थीती बदलू शकेल हा त्या वेळाच्या तरूण पीढीला जो विश्वास होता, त्याप्रमाणे आई आणि मामा यांनी शिक्षणाचं महत्व जाणलं होतं.
माझी आई बी.ए.बी.एड, पुढे एम्.ए. करुन शिक्षिका झाली. त्यावेळी बी.एड कॉलेजमधे असताना ती दूधक्रेंदावर पहाटे आणि संध्याकाळी पार्ट-टाइम नोकरी करत असे. आईचा अभ्यासाचा आणि नंतर शिकवण्याचा मुख्य विषय संस्कृत. त्याच्या जोडीला ती हिंदी पण शिकवायची.

अनेक वर्ष आईच्या मनात हिंदीमधे एम्.ए. करण्याची इच्छा असावी. (आईला विचारलं तर ती म्हणते माझ्या आजीची तशी इच्छा होती - की तिच्या मुलीनं हिंदीमधे एम. ए करावं... आजी आता नाही, त्यामुळे हे त्या मायलेकींचं सिक्रेट आहे असं आम्ही आता म्हणतो). पण नोकरी, संसार किंवा त्याही पेक्षा 'ते आतून इच्छा होणं' काही घडलं नसावं. (कारण तिला ते वाटलं असतं नोकरी, संसार करतानाही तर तीनं ते सगळं सांभाळत तेव्हाच केलं असतं).
पण अखेर मी मास्टर्स करत असताना आईनी हिंदीमधे एम्.ए करायचं ठरवलं. खरं तर त्यावेळी मोकळा वेळ आहे, सगळं सुरळीत आहे अशीही परिस्थीती नव्हती.
त्या वेळी आई लोणावण्याच्या शाळेमधे मुख्याध्यापिका होती. रोज कोथरूड ते शिवाजीनगर बस, पुढे लोकलने लोणावळा - आणि संध्याकाळी परत असा तिचा दिनक्रम असायचा. पहाटे उठून सगळा स्वयपाक्-पाणी आटोपून ती सकाळी ६-७ च्या सुमारास घरातून निघायची आणि संध्याकाळी पाचची शाळा सुटली की घरी यायला ८. मग घरातली कामं वगैरे वगैरे.
त्यात आमचं घर 'उमेश' म्हणजे सतत म्हणजे अतिशयोक्ती वाटेल इतकी सतत येणारी-जाणारी माणसं. इतका प्रचंड मित्रपरिवार आणि हक्काने वेळी-अवेळी येणारी माणसं.
हे सगळं कणभरही तक्रार न करता, मनापासून आवडीनं, आपुलकीनं सांभाळत आईनी शिवाजीनगर- ते- लोणावळा ह्या रोजच्या लोकलच्या प्रवासात मिळेल त्या वेळात अभ्यास करुन 'फर्स्ट क्लास' मिळवत हिंदीमधे एम्.ए. पूर्ण केलं.

पण नुसत्या एम्.ए. वर तिचं समाधान झालं नाही. तिला हिंदी काव्याची, हिंदी साहित्याची आवड होतीच. आता त्यातला एखादा विषय घेऊन त्यात पी.एच्.डी करावी असं तिच्या मनानं घेतलं.
मधल्या काळात माझी माझी पी.एच्.डी होत आली होती, तेव्हा आई मला नेहेमी विचारायची - मला जमेल का गं?
आणि माझं उत्तर ठरलेलं - बिनधास्त सुरुवात कर... सगळ्यात अवघड गोष्ट सुरुवात करणं .. पुढे आपोआप होते पी.एच्.डी !
दागिन्यांवर पीच्.डी करणारे म. वि. सोवनी सर हे देखील प्रेरणास्थान असावं. सोवनीसर माझ्या आइचे शाळेतले शिक्षक. ते आई-बाबांचे खूप जवळचे स्नेही आणि आमच्या घरी कायम जाणं येणं. सरांनी रिटायर्ड झाल्यावर गावोगाव फिरुन माहिती गोळा करुन पीएचडी केली दागिन्यांमधे याचं आई-बाबांना प्रचंड कौतुक. 'आपल्यालाही जमू शकेल प्रयत्न केला तर' हा विश्वास तिला सोवनीसरांच्या अभुववातून मिळाला असावा.

मधल्या काळात आईनी रिटायर्डमेंट घेतली. त्यानंतर ती गीता, ज्ञानेश्वरी, श्रीसुक्त, पौरोहित्य असं पण काय काय शिकत होती. शिवाय एकीकडे विषय, गाईड ह्याची शोधाशोध चालु असताना विद्यापीठाचे नियम बदलले. एम्.ए. नंतर एम्.फिल आणि मग पीच्.डी ह्या पाय-या आवश्यक झाल्या. शिवाय एम्.फिल- पीएच्.डी साठी 'प्रवेश परिक्षा' अत्यावश्यक (कम्पल्सरी) झाली.
पुण्यात आबासाहेब गरवारे कॉलेजमधून 'एक्स्टर्नल' म्हणुन ह्या 'प्रवेश परिक्षेला' बसायचं असं आईनं ठरवलं. आईबरोबर एम्.ए. करणा-या माझ्या वयाची आईची एक मैत्रीण आहे. त्या दोघी नोट्सची देवाणघेवाण, एकत्र अभ्यास करायच्या परि़क्षेच्या आधी.
आईनी तिच्याकडून नोट्स घेऊन, कॉलेजच्या लायब्ररीतून अभ्यास करून 'प्रवेश परिक्षा' दिली.
माझे बाबा तिला परिक्षेला सोडायला गेले होते. ते हा किस्सा रंगवून सांगतात - की आई परिक्षा हॉल मधे गेली तर परिक्षा द्यायला आलेले सगळे विद्यार्थी 'examiner' बाई आल्या म्हणुन उठून उभे राहिले. आई शांतपणे तिच्या जागेवर जाऊन पेपर लिहून आली. पण ह्या दिवसापासून 'नेट, सेट' देणारे माझ्या वयाचे अनेक नवीन मित्रमैत्रीणी आईला मिळाले.
वयाच्या ६६ व्या वर्षी ३ तासात हिंदी सारखा 'भाषेचा' पेपर लिहायला आता लेखनाचा स्पीड उरलाय का? आपला पेपर लिहून पूर्ण होईल का? ही मोठी चिंता आईला होती. पण ती कमालीची जिद्दी आहे. ती ही प्रवेश परि़क्षा अतिशय उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि तीला एम्.फिल ला प्रवेश मिळाला.

मग रिसर्चचा टॉपिक शोधण्यासाठी लायब्ररीत बसणे, जुने थिसीस वाचणे, गाईडशी चर्चा, आईला काय अभ्यासायला आवडेल ह्या सगळ्यावर विचार केला.
त्यानंतर तिनं 'अज्ञात म्हणून हिंदीमधे एक खूप प्रसिद्ध कवी होऊन गेले - त्यांनी एका विशिष्ठ कालखंडात युरोपमधे वास्तव्य आणि प्रवास केला. त्यांच्या युरोपभ्रमंतीमधे त्यांनी जे काव्य लिहिलं आणि त्या काव्याचा इतर समकालिन कवींच्या लेखनावर कसा प्रभाव पडला' हा विषय एम्.फिल. च्या थिसीस साठी घेतला.
गेल्या वर्षी अमेरिकेत आले असताना आईची बॅग म्हणजे अभ्यासाची पुस्तकं. तिनं थिसिसचा 'रफ ड्राफ्ट' इथल्या वास्तव्यात लिहायला सुरुवात केली.
१५०-२०० पानी टाईप केलेल्या थिसीसचा 'पहिला ड्राफ्ट' आईनी वयाच्या ६८ व्या वर्षी हाताने लिहून काढला. १२-१५ फुलस्केप वह्या झाल्या.
दोन आठवण्यापूर्वी फोन केला तेव्हा 'गाईड कडून corrections आल्या आहेत पहिल्या ड्राफ्ट मधे' असं म्ह्णाली. तिच्या मनात होतं की 'परत एकदा फायनल थिसीस लिहून काढावा आणि मग टायपिंग ला द्यावा म्हणजे टायपिंग करणा-याचं काम सोपं होईल'. मी तिला जवळजवळ ओरडलेच.. की परत थिसीस लिहित बसू नकोस, नुसत्या corrections परत लिही. ह्या थिसिस लिखाणातून हे पण शिकायचं असतं असा आगाऊ सल्ला पण दिलाय. बघू आता काय करते ते !!

अश्या रितीने पुढ्च्या २-३ महिन्यात आई तिचा थिसिस विद्यापीठाला सादर करेल.
माझ्या मागच्या भारत भेटीमधे मी अनेकदा आईला कॉलेजला सोडायला गेले तेव्हा एक वेगळंच समाधान मला मिळालं. एक वेगळीच मजा वाटली आम्हाला दोघींनाही. अमेरिकेतून जाताना माझ्याकडे आईनं काय मागावं - तर माझ्याकडच्या ज्या पेनाने ती थिसिस लिहायची, तशी २ डझन पेनं, थिसिस लिहायला....!

ह्या सगळ्या गोष्टी मी फार सहज लिहित असले तरी त्या इतक्या सुरळीत झाल्या नाहीत. आई-बाबांच्या ३-४ अमेरिका वा-या, आईचं 'माझ्या जन्माच्या टाक्यांमुळे' जीवावर बेतलेलं आजारपण, बाबांची डोळ्याची ऑपरेशन्स, घरच्या अनंत जबाबदा-या, आणि 'उमेश' मधली मित्रमंडळींची अखंड वर्दळ...आणि सगळ्या गोष्टी सांभाळून, कधीही 'अभ्यासाचा बाऊ न करता.. कोणाला कळणारही नाही ह्या बाईची उद्या परिक्षा आहे' इतक्या शांतपणे पण जिद्दीनं, नेटानं एक एक टप्पे पार करत आता थिसीस विद्यापीठाला सुपुर्त करण्याच्या शेवटच्या टप्यापर्यंत पोचलेली आई.

मी काही मातृदिन वगैरे साजरी करणा-यातली नाही. तिला त्यासाठी फोन वगैरे केला असता तर 'मी आजारी वगैरे आहे' अशी त्यांना काळजी वगैरे वाटली असती.
पण तरीही ह्या उपक्रमाच्या निमित्तानं हे लिहायची संधी मला मिळाली हे माझं भाग्य.

'आई कुठे गेली? - आई शाळेला गेली' हा लहानपणचा जोक आज माझ्यासाठी, आमच्यासाठी एक अभिमानाची, एक प्रेरणा देणारी गोष्ट झाली आहे... आणि त्याचं सगळं श्रेय आईला, तिच्या कष्टाला, तिच्या जिद्दीला, चिकाटीला.

मी आता फक्त आईच्या ग्रॅज्यूएशनची खूप आतुरतेने आणि मनापासून वाट पाहतीये !!! Happy

गौरी , अतिशय सुंदर चित्र काढली आहेत आईने. फार कौतुक वाटल.
इतर सर्वजणांचा प्रवास अजुन वाचत आहे. वाचुन प्रतिक्रिया लिहिते.

सर्वांनी छान लेख लिहिले आहेत.
rar... अप्रतिम, स्फूर्तिदायक लेख! जिद्द, चिकाटी या सद्गुणांना अंतःस्फूर्तीने वेगळेच परिमाण दिले आहे आईने! शुभेच्छा आणि सलाम!!!

काय जिद्द आहे रार आईची तुझ्या !! साष्टांग नमस्कार Happy आजच्या पिढीला - वेळ नाही, जमत नाही, आता वय झाले असे म्हणणार्याना अतिशय प्रेरक उदाहरण आहे हे.. Happy सगळ्यांचेच लेख उत्तम झालेत. Happy

बाप रे! रार ,तुझ्या आईचा शिकण्याचा प्रवास वाचून ''धन्य धन्य'' असं म्हटलं. त्यांचं वय ६८ आहे असं सांगु नकोस. मला तर त्या फक्त २८ वर्षांच्या वाटल्या. काय ती जिद्द! प्रचंड स्फुर्तिदायक उदाहरण. इथे शेअर केलंस म्हणून मनापासून धन्यवाद!

संयुक्ता व्यवस्थापन मस्त विषय आहे.... आणि सगळ्या पोस्ट्स निव्वळ म-हा-न आहेत.
या सगळ्या 'आईं'ची चिकाटी खरंच अचंबित करणारी आहे. सगळ्यांना शि. सा. न. __/\__
या माऊलींचा आशिर्वाद मिळालाच पाहिजे, म्हणजे रोजच्या लहान-सहान बाबींवर कटकट करायची हिंमतच नाही होणार आमच्यासारख्यांची. Happy

रार, खरचं काकूंची जिद्द कौतुकास्पद आहे. Ph. D. नक्की पुर्ण होईल त्यांचे. माझ्याकडून काकूंना शुभेच्छा. अज्ञात ह्यांच्या कवितांची ओळख तू नक्की करुन देशील अशी अपेक्षा आहे.

अनिताताई,अगो, रार,स्वराली, प्रादी, मानुषी, अरुंधती, s_kallolkar, बंडोपंत, गौरी, रार, अनघा_मीरा,

तुम्ही सगळ्यांनीच फार सुंदर लिहीले आहे. थँक्स अ टन फॉर शेअरिंग.

सगळ्याच शाळेत जाणार्‍या आयांचं कौतुक आणि शि. सा. न. __/\__

रोजच्या लहान-सहान बाबींवर कटकट करायची हिंमतच नाही होणार आमच्यासारख्यांची.
>>++१०००

Pages