आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 13 May, 2012 - 02:39


Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
line.pngआई शाळेत जाते

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. असं जरी असलं तरी लग्न, मुलं झाल्यावर ही तशी जवळ असणारी शिक्षणाची वाट तशी परकी होत जाते. काही जणी मात्र लग्न, मुलं झाल्यावर सुद्धा ह्या तश्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाटेवर पाऊल टाकतात. लग्नाआधी शिकण्याचा आणि सांसारिक जबाबदार्‍या असतानाचा अनुभव हा अनेक पातळीवर वेगळा. वय वेगळं, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा, जबाबदार्‍या वेगळ्या, आजूबाजूची परिस्थिती वेगळी ...कसा घडतो ह्या वाटेवरचा प्रवास ?

कोवळ्या वयात शिकतांना जीवनाचा मुख्य प्रवाहच मुळी शिक्षण असतो. मातृत्वाची मोठी जबाबदारी पेलताना शिक्षण घेणे हे प्रवाहाविरुद्ध पोहणेही ठरु शकते. शाळा-कॉलेजातलं मुक्त आयुष्य, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यांवर प्रापंचिक जबाबदार्‍यांसकट शिक्षण घेताना आपल्याला भेटतात का? मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां? वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का ? सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त ? मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता ? अभ्यासासाठी मनाची एकाग्रता कशी साधता ह्यासारखे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात.

आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. अनेक सदस्या स्वतःच संसारात पडल्यानंतर, मुले झाल्यानंतर पुन्हा 'शाळेत' गेल्या असतील. मुलाबाळांच्या साथीने अभ्यास करतानाचे, परीक्षा देतानाचे अनुभव, मोठेपणी शाळेत भेटलेले मित्रमैत्रिणी आणि एकूण आपल्या या नव्या शिक्षणाने आपल्यातच घडलेला बदल हे सगळेच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

ह्या धाग्यावर तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपली बायको, आई, मुलगी, मैत्रिण किंवा ओळखीतल्या कुठल्याही आईची शिक्षणासाठीची धडपड पाहिली असेल त्यांनीही अशा आयांबद्दल लिहावे असे आम्हाला वाटते.

ह्या आया कौतुकास पात्र तर निश्चितच आहेत पण शिकण्याची इच्छा पूर्ण न करता आलेल्या एका जरी स्त्रीला ह्यातून मानसिक बळ, जिद्द मिळाली तर ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

वाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय सगळ्यांनीच.

मी पण लिहिणार, माझ्या आईबद्दल आणि आज्जीबद्दल. आज्जीचा प्रवास बघितला नाहीये पण ऐकून आहे. तिच्याबद्दल सांगायला आवडेल.

शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव. <<

मानुषी, तुम्ही स्वतःही तुमच्या अनुभवाबद्दल लिहू शकता Happy

खूपच स्फुर्तीदायक आहेत सगळयांच्या आई-आजी. Happy

६०-७० वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय-कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. माझ्या आजी-आईची सुध्दा अशीच कहाणी आहे शिक्षणाच्या संघर्षाची. मला लिहीता येत नाही तरी जसे जमले तसे मी लिहिणार आहे. Happy मातृदिनानिमीत्त त्यांना माझा हाच सलाम. Happy

वयाच्या १७ व्या वर्षी त्याकाळच्या मानाने आजीचे लग्न उशीराच झाले. १७ ते २७ वर्षे या काळात तिला ३ मुले झाली. १०-१२ माणसांचे एकत्र कुटुंब तिने संभाळले त्यावेळी तिचे शिक्षण ७ वी पास होते. २७ व्या वर्षी तिने दिराबरोबर दहावीची परिक्षा दिली. एकीकडे भाक्र्या थापताना ती अभ्य्साचे पुसत्क वाचत असे - दिराचेच. नंतर तिने डीएड केले अन लगेच नोकरीला पण लागली. दिरांची लग्ने-घ्ररातली सगळी कामे अन चार मुलांचे संगोपन-शिक्षण चालू होतेच ( डीएड चालू असतानाच अजून एक बाळ झाले Happy ) नोकरीशिवाय इतर बायकांसारखेच शिवण-विणकाम-उन्हाळी सगळी कामे. (माझ्या समोर सुध्दा तिनी खडेमीटठ आणून ते वर्ष्भाराचे दळून ठेवले आहे. तिखट - मिरच्या आनून .. हळद फोडून-कांडून जात्यावर दळे. ती गेल्या वर्शी वारली. अत्यंत विकल झाली होती. शेवटची ४-५ वर्षेच तिने काम केले नाही. हिंडती-फिरती होती. माहेरीही भावंडाचे संगोपन केलेले.

आता आई - आईचे लग्न पीपीसी (तेव्हाचे अकरावी ) असताना वयाच्या १९ व्या वर्शी झाले. नंतर ती लगेच नोकरीला लागली. शिक्षण चालूच होते. आम्ही (मी अन बहिण) लहान असताना तीयथावस्काश बीए, ती अन बाबा एकदम बीएड झले. लग्नानंतर १० वर्षांनी आमचे बाबा वारले. नंतर ती एमे ची सुध्दा परिक्षा दिली. - सर्वप्रथम आली मराठवाडा विद्यापिठातून Happy ही सुध्दा आपल्या आईसारखी सर्वगुणसंपन्न आहे. शिवण - विणकाम इ.इ. अजून ही नवीन शिकत असते सतत. सध्या गुजराथी लिहाय्ला वाचाय्ला शिकत आहे. इंटर्नेट पण आता ऑपरेट करते. माबो वाचते ती पण लिहायला अजून लागली नाही. टा य्पींग शिकायला सांगते आता तिला. ती प्रभावी भाषेत लिहू शकते. म्ह्णून तिने मायबोली वर लिहावे असे मला वाटाते . बघू. Happy

अनघा, तुझ्या आजी आणि आईविषयी वाचून खरेच खूप कौतुक वाटले. घरकामे, इतर कामे करुन पुन्हा शिकायचे हे काही सोपे काम नव्हे!

हो ग. त्याकाळच्या स्त्रिया खूपच कामाच्या होत्या. मला त्यांचे कौतुक तर वाटतेच पण करूणा वाटते कारण घरी बसलेल्या स्त्रियांना फाईट देण्यासाठी शिक्षण-नोकरी-बालसंगोपना बरोबर त्या घरकाम पाककला इतर कला हे सुध्दा मानेवर खडा ठेवून करत असायच्या. माझ्या आजीला "आप्ण पेपरला गेलो अन उशीर झाला म्हणून पेपर देऊ देत नाहीयेत. अशी स्वप्न पडायची. ८० व्या वर्षी सुध्दा .. म्हण्जे तिच्या मनावर या सगळ्याचा किती ताण असला पाहिजे ना. नवर्याच्या २ माम्या ही अश्याच - नोकरी-शिक्षण - घरकाम इ. सगळे समर्थपणे केले त्यानी.

इथे आईबद्दल लिहिणं अपेक्षित आहे. पण मी माझी मुलं शाळेत असताना, त्यांच्याबरोबरच शास्त्रीय संगीत शिकले. त्याबद्द्ल इथे लिहावंसं वाटतं! कारण हे शिक्षण सुरू करण्यात आई म्हणून माझा काय विचार होता हे सांगणं खूप महत्वाचं वाटतं. आणि आत्ता जेव्हा पुलाखालून बरंच पाणी गेलंय, मुलं मोठी होऊन आपापल्या जागी सेटल आहेत तेव्हा मी गतकाळाबद्दल, तेव्हा घडलेल्या घटनातून बाजूला काठावर उभी राहून तिऱ्हाइताची नजर टाकते तेव्हा मला वाटतं, किती योग्य वेळी योग्य निर्णय घेतले.
थोडी पार्श्वभूमि:
माझी आई शास्त्रीय संगीतात आकंठ बुडलेली. (सध्याच्या) अलंकारपर्यंत ती संगीत शिकली होती. सध्या वय ८६. तशी शारिरिक दृष्ट्या निरोगी, पण अल्झायमरने पीडीत.....अगदी १००% नाही पण ५०%. रोजचं रूटीन तिचं ती पार पाडते. तिची ४०च्या दशकातली नोटेशन्सची वही आत्ताआत्तापर्यंत भावाकडे होती. मी जन्मल्यापासून दर्जेदार संगीत ऐकत लहानाची मोठी झाले. घरात सतत रेडिओ, कॅसेट प्लेअरवर सर्व दिग्गजांचं संगीत दिवस रात्र चालू असायचं. थोडी मोठी झाल्यावर रेडिओवर विविध भारती, सीलोनची मला लागण झाली. आणि जिथे जिथे म्हणून संगीत असायचं ते मी लावून ठेवायची. यात हिंदी मराठी,अगदी बंगाली सुद्धा, फ़िल्मी, गैर फ़िल्मी, गझला, भावगीतं,आणि अर्थातच शास्त्रीयही ...हे सर्व आलं! बऱ्याच वेळा वडिलांची बोलणी खाऊन. नंतर आई एका ग्रूपची(नाव "संगीत सभा" बहुतेक) सभासद होती. तिच्याबरोबर अगदी पहिल्या रांगेत बसून पं. भिमसेन, गुलाम मुस्तफ़ा खान, परवीन सुलताना, किशोरी अमोणकर आणि कित्येकांच्या कलेचा आनंद लुटला.
एरवी सतत वाजत असलेल्या रेडिओवर लताबाईंचं........"जा तोसे नाही बोलू कन्हैया" लागलं की आई म्हणायची," बघ नीट ऐक. हा हंसध्वनी आहे."
किंवा "मेरा साया " लागलं की म्हणायची "हा नंद आहे" असं करत करत माझा कान रीतसर संगीत न शिकता चांगलाच तयार झाला होता. खूपसे राग मी ओळखायला लागले होते. आता यात तीव्र मध्यम आहे का असं कोणी विचारलं तर नाही सांगता यायचं. पण शास्त्रीय संगिताची खूपच गोडी लागली. घरात सतत गुणगुण/मोठ्यांदा गाणं चालूच असायचं आणि आईबरोबर चर्चा! सातवी आठवीत गेल्यावर आई म्हणायाला लागली," इतका चांगला आवाज आहे, कान तयार आहे. तर ती अमकीताई सतार शिकवते...जा की शिकायला. किंवा व्होकल म्युझिक शीक." पण मी कधी मनावर नाही घेतलं....आता सांगायला हरकत नाही...मी (अंमळ उद्ध्टपणेच)म्हणायची," आई कित्ती ते बोअर.....एका जागी बसून ते टुंग टुंग कोण करणार?"
कारण खेळाडू असल्याने तेव्हा माझं कोणतंच वागणं स्त्रीसुलभ नसायचं. फ़ेमिनाइन गोष्टी करण्यात कमीपणा वाटायचा. साधं कधी वर्गातल्या गाण्याच्या भेंड्यातही गाणं म्हटलेलं नाही, किंवा कौटुंबिक कार्यक्रमात.
लग्नापर्यंतचं माझं अर्धं आयुष्य ग्राउंडवर गेलं. मी शाळेपासून आंतरशालेय, नंतर ओपन, नॅशनल्स, इंटरव्हर्सिटी असं खेळत मेडल्स मिळवत राहिले. संगीत शिकण्याचं राहून गेलं. म्हणजे असं डोक्यातच नव्हतं!
एकविसाव्या वर्षी लग्न झालं. सासरी घरात(औरंगजेबी कारभार) रेडिओ, किंवा कोणतंच संगीत लावयला बंदी. म्हणजे संगीत लावायचं का, कधी लावायचं, कोणतं लावायचं हे माझ्या मनावर नव्हतं. मन संगीत ऐकायला तळमळायचं. पण पाठोपाठ मुलं झाली, मोठ्या एकत्र कुटुंबात पडतात त्या इतरही अनेक जबाददाऱ्या अंगावर पडल्या. आणि दिवस कुठे संपायचा कळायचंच नाही. पण जशी मुलं मोठी होऊ लागली, मला कळत होतं की घरात संगीताचे सूर मिसिंग आहेत. या मुलांना संगीत अगदी खूप समजलं नाही तरी शास्त्रीय संगीत लावल्यावर यांनी," काय ते आ ऊ लावलंय?" एवढं तरी म्हणू नये इतकी माफ़क अपेक्षा होती.
तर एके दिवशी एक धाडसी निर्णय घेतला. गावातच नणंद रहायची. तिच्या दोघी मुली आणि माझी मुलगी साधारण अगदी बरोबरीच्या. या तीन मुली आणि मी असं शास्त्रीय संगीत शिकायला सुरवात केली. (बऱ्याच लोकांना वाटायचं मला तीन मुली आहेत.) आत्ता जेव्हा मी मागे वळून पहाते तेव्हा वाटतं कसं केलं मी हे सगळं?
श्री. देवीप्रसाद खरवंडीकर आणि सौ. कीर्तीदेवी खरवंडीकर यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन. यांच्याकडे मी क्लाससाठी गेल्यावर त्यांनी मला "प्रारंभिक" परिक्षा स्कीप करायला सांगितलं कारण त्यांचं म्हणणं ...माझी बरीच तयारी आहे. आणि एकदम दुसऱ्या परिक्षेपासून सुरवात केली. मी म्हणत होते की मी नुसतं शिकते, परिक्षा देत नाही. कारण पिंड कधीच अभ्यासू नव्हता. आता तिशीत अभ्यास? पण बाईंनी मला अभ्यासाचीही गोडी लावली.
क्लास दुपारी ४ ते ५ वगैरे असायचा. आठवड्यातले २ दिवस. तोही कधी कधी चुकायचा. कारण पाहुणे, किंवा इतर ऐन वेळी अचानक उपटलेल्या गोष्टी.....ज्या चुकवून मी क्लासला जाणं शक्यच नव्हतं. म्हणजे माझं गाणं शिकणं हे सर्वांच्या प्रायोरिटी लिस्टवर शेवटच्या नंबरवर! सासरच्यांनी आधीच डिक्लेअर केलेलं होतं की आम्ही आमच्या ४ मुलांना खूप शिकवलंय. आता सुनांना शिकवणार नाही. त्यांनी ती अपेक्षा ठेऊ नये. (इथे कुणाला अभ्यासाची आवड होती?) असो....तर त्यामुळे माझा क्लास बुडला तर कुणालाही काहीच वाटायचं नाही. नवरोबा त्यांच्या व्यापात.
पण ती ६/७ वर्षं गाणं शिकण्यापलिकडेही मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आनंद अनुभवले. उदा. नव्या मैत्रिणी, गाण्याच्या मैफ़ली, मैत्रिणींबरोबर रियाज, क्लासच्या गॅदरिंगची तयारी आणि काय काय! यासर्व फ़ॅक्टर्समुळे मी आनंदी राहून संसारातल्या सर्व कटकटींवर मात केली. आणि घरातल्या तीन वाढत्या वयाच्या मुलींना बरोबर घेऊन शास्त्रीय संगिताची वाटचाल करण्यात काय मजा आहे हेही अनुभवलं.
आणि तोंडी परिक्षा बाई स्वता:च्या घरीच ठेवायच्या. ती तर मजाच असायची. जणू काही एखादा उत्सवच! बऱ्याच जणींना त्या परिक्षा झाली की जेवायलाही घालायच्या. त्यांच्या मेथीच्या सुक्या भाजीची आणि लिंबाच्या सॉसची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.
पण "मध्यमा"नंतर जेव्हा लेखी पेपर सुरू झाले तेव्हा मात्र प्रत्येक पेपरला मला एकदा तरी वाटायचंच की ...हे मी का घेतलंय उरावर?...चांगलं चाललं होतं ते!
मग मध्यमापासून घरी रियाजाची जरुरी वाढली. आधी ती नव्हती असं नव्हे. पण आम्ही सगळं क्लासातच भागवायचो. कारण वेळ कुठे होता? पण वेळ निभावून नेली. आता मात्र मध्यमापासून परिक्षा आली की घरी एका तबलजीला बोलावायला लागलो. तीघी जणी एकत्र रियाज करायचो. तर सगळ्या इतक्या वेळेवर यायच्या! कारण सर्वांचीच मुलं लहान होती. सांसारिक जबाबदाऱ्या होत्या. आलटून पालटून एकेकीच्या घरी बसायचो.
तबलजींना उशीर झाला की आम्ही हवालदिल होऊन त्यांची वाट पहायचो. आणि नवरोबा जर जवळपास असले तर तबलजींना म्हणायचे," काय राव, नशीबवान आहात. आमची पण इतकी कुणी वाट पाहिली नाही." आत्तापर्यंत नवरोबांचा पूर्ण पाठिंबा मिळालेला होता माझ्या गाणं शिकण्याला.
बरं.... रियाज करायचा तर घर आणि ऑफ़िस एकाच प्रिमायसेसमधे शेजारी शेजारी . त्यामुळे बेडरूमची दारं खिडक्या "गच्चिम" बंद करून मग रियाज सुरू! बाहेर विशेषत: ऑफ़िसात ऐकू जाता कामा नये.
साबूंना सारखी चिंता असयाची की मी घरकाम टाळून किंवा पुढे ढकलून तर नाही ना गायला बसत!
आणि आमचे तबलजी आम्हाला धीर द्यायचे. म्हणायचे," अहो ताई मी कसल्या कसल्या (बेसूर)बायकांना साथ करतो! तुम्हा तर काहीच नाही!"
कधी कधी तबलजींचा तुटवडा पडायचा...विशेषत: परिक्षेच्या काळात! मग एके दिवशी अजून एक धाडसी निर्णय घेतला आणि माझ्या धाकट्या मुलाला तबल्याच्या क्लासात घातलं. म्हणजे आपण आणि आपल्या तीन मुली(१ माझी, २ नणंदेच्या!)फ़ुलफ़्लेज गायिका होईपर्यंत घरातलाच तबलजी! व्वा! स्वता:च्या कल्पनाशक्तीवर खूष! पण मुली बिचाऱ्या माझं ऐकून माझ्या मागे आल्या. मुलाने तबल्याच्या दोन परिक्षा देऊन बंड पुकारलं! संपूर्ण असहकार! मीही मग सक्ती नाही केली.
पण तीघी मुलीं मध्यमापर्यंत आनंदाने शिकल्या, परिक्षाही दिल्या. मग प्रत्येकीची १०वी/१२वी आल्यावर मात्र हे संगीत शिक्षण बंद पडलं. कारण मध्यमापासून बडा ख्याल सुरू होतो आणि बरीच गळती तेव्हाच होते.
पण आजही या माझ्या तीघी मुलींना शास्त्रीय संगीताची आवड आणि जाण दोन्ही आहे. यातल्या दोघी उसगावात आहेत. तरीही त्यांनी ऐकणं तरी चालू ठेवलंय. माझी लेक गातेही छान...छंद म्हणून! मुख्य म्हणजे आम्हाला कुणालाच गायिका व्हायचं नव्हतं(वरचा जोक आहे!). मी तर केवळ "स्वांत सुखाय" हे करत होते. हेही माहिती होतं की "म्युझिक इज अ परफ़ॉर्मिंग आर्ट". तरीही परफ़ॉर्मन्सच्या मागे फ़ार नाही लागले. पण व्यक्तिमत्व विकासात या मुलींच्या वाढत्या वयात या संगीत शिक्षणाने खूपच मोलाची भर घातली आहे. आणि एक आई म्हणून मला समाधान वाटते. हो.......घरातल्या तबलजीने जरी बंड पुकारले तरी त्यालाही संगीतातलं बरं वाईट कळतं.
मी मात्र विशारद झाले. आमच्या जिल्ह्यात मी फ़र्स्टक्लास फ़र्स्ट आले. कॉलेजात असतानाही केला नव्हता एवढा अभ्यास केला. मॅथ्स घेऊन एमेस्सी झालेली एक सिनियर मैत्रिण अभ्यासाला बरोबर होती. ती म्हणते तुझ्यामुळे माझं व्होकल सुधारलं. मी तिला म्हणते...तुझ्यामुळे माझी थिअरी सुधारली. चला....नैय्या पार लागली.
आता केव्हापासून अलंकार करण्याचा विचार मनात आहे.

अनिताताई, अगो, स्वराली, प्रॅडी, मानुषी, अनघा_मीरा... सर्वजणींच्या आयांच्या कहाण्या वाचते आहे. ग्रेट आणि अतिशय प्रेरणादायी!! Happy

माझ्या आईचे एम ए शिक्षण आम्हा दोघी बहिणींच्या जन्मानंतरच पूर्ण झाले. आमची दुखणी-खुपणी, पिण्याचे पाणी खाली तळमजल्याला भरायचे व ते उरापोटाशी घेऊन तीन मजले चढायचे, घरी मदतीला कोणी नाही अशा अवस्थेत आईचा अभ्यास चालू असे हे म्हणणे जरा धाडसीच ठरेल. पण मग तिच्या फायनल्सच्या वेळी माझ्या मध्य प्रदेशात राहणार्‍या काका-काकूंना तिची दया आली असावी व त्यांनी मला व बहिणीला परीक्षेअगोदर २-३ महिने सांभाळायचे कबूल केले.

आईने आम्हाला काका-काकूंकडे सोडले व एम ए चा कसून अभ्यास केला. आम्ही तेव्हा फक्त अनुक्रमे वय वर्षे पाच व दोन अशा वयाच्या होतो. पहिल्यांदाच आईपासून इतक्या दूर अंतरावर राहत होतो. त्या काळात आमची आठवण आली तरी तिला मनावर दगड ठेवून अभ्यास करणे भाग होते. तेव्हा पत्रांतूनच ख्यालीखुशाली कळवायची पद्धत होती. फोनही जास्त कोणाकडे नसत व असले तरी ट्रंक कॉल हे महा कटकटीचं व वेळखाऊ प्रकरण असे. त्यामुळे या काळात काकांच्या आमची खुशाली कळवणार्‍या पत्रांवर ती समाधान मानत असे.

एम ए उत्तीर्ण झाल्यावर आई नोकरीला लागली. परंतु ती बी एड नव्हती. तेव्हाच्या सरकारी नियमांनुसार तिला बी एड किंवा डिप्लोमा इन हायर एज्युकेशन (डी एच ई) करणे भाग होते. मग काय, मी साधारण सहावी - सातवीत असताना तिने त्यासाठी नाव नोंदविले. अभ्यासक्रम बराच टफ होता. शिवाय अनेक विषय तिला नवीनही होते. आदर्श कॉलेज मध्ये त्यांची लेक्चर्स असायची. अनेक नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक त्यांना शिकवायला होते. या काळात आईने तिची नोकरी, आमचे अभ्यास, घरकाम व तिचा स्वतःचा अभ्यास असे सगळे सांभाळले. सायंकालीन लेक्चर्सहून ती घरी परत यायलाच तिला रात्रीचे नऊ-साडेनऊ व्हायचे. त्यानंतर नोट्स पुर्‍या करणे, असाईनमेन्ट्स पूर्ण करणे, प्रोजेक्ट्स करणे इत्यादी असायचेच! बी एड सारखेच लेसन्स घ्यायला लागायचे. त्याचे फळे तयार करणे, चित्रे रंगविणे, कार्डशीटवर रंगीत तक्ते तयार करणे वगैरे असायचे. ज्या दिवशी लेसन असायचा त्याच्या आधी काही दिवस घरात सगळीकडे कागद, खडू, स्केचपेन, फुलस्केप कागद, पेने, तिच्या नोट्स व जाडजूड पुस्तके असे दृश्य दिसायचे. भरीस भर म्हणून माझा व बहिणीचा पसारा असायचाच!
वडिलांचे ऑफिस सांभाळणे, स्वतःची नोकरी, संध्याकाळची लेक्चर्स व आम्हीही तिच्या व्यापांमध्ये भर घालायची दक्षता घ्यायचो!! Proud .... तिने हे सगळे कसे काय जमवले, धकावले हे तिचे तिलाच माहीत! या सर्व जबाबदार्‍या सांभाळून तिने अभ्यास केला व तिच्या कोर्सला हायर सेकंड क्लास मिळवला.

नंतरही नोकरीनिमित्ताने तिला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रशिक्षणांना जावे लागायचे. कधी एड्स जागृती अभियानाचे प्रशिक्षण, कधी आणखी कोणत्या उपक्रमाचे प्रशिक्षण.... तर नोकरीत अनिवार्य असणारी इतर प्रशिक्षणेही असायचीच! मग कधी पुणे-खोपोली / पुणे-कर्जत असे रोज एस. टी. ने अप-डाऊन करून ती प्रशिक्षणे पूर्ण व्हायची. त्या काळात ती पहाटे चारला उठून आमचे डबे, जेवणाचे बघायची, साडेपाचला घरातून निघून सहा वाजताच्या एसटीत बसलेली असायची. सायंकाळी साडेपाचची परतीची एसटी की घरी यायला नऊ-साडेनऊ. आल्यावर प्रशिक्षणाच्या नोट्स, असाईनमेन्ट्स, अभ्यास, दुसर्‍या दिवशीची तयारी, आमचे हवे-नको बघणे करत झोपायला साडेअकरा वाजायचेच! की परत दुसर्‍या दिवसाचे रहाटगाडगे सुरू!

आईला खरे तर मिळवत्या स्त्रियांच्या विषयावर पी एच डी करायचे होते. परंतु तेव्हा घरातील अनेक अडचणी, तिच्या गाईडने तिची केलेली दिशाभूल व त्या कडवट अनुभवानंतर पुन्हा त्या वाटेला जावे की नाही याबद्दल द्विधा मनस्थिती असे करत तिचे पी एच डी मागेच पडले. पण त्या काळातही तिने त्यासाठी केलेली तयारी - मेहनत, फायली, नोट्स, कसून बनवलेली नेटकी व तपशीलवार प्रश्नावली, ठिकठिकाणच्या शिक्षिका- प्राध्यापिकांना व्यक्तिशः भेटून ती प्रश्नावली भरून देण्याची तिने केलेली विनंती - त्यासाठीची वणवण, त्या प्रश्नावलीला मिळालेले प्रतिसाद आणि सर्वात शेवटी त्या कागदपत्रांनी भरलेली व नंतर धुळीत पडलेली सूटकेस, अखेरीस तिने जड मनाने रद्दीत काढलेले ते कागद हे आजही माझ्या स्मरणात आहेत.

नुकताच काही महिन्यांपूर्वी तिने ज्ञानेश्वरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि आता तुकाराम गाथेचा अभ्यास सुरू केला आहे. Happy

मानुषी , तुझा संगीत शिक्षणाचा प्रवास इथे लिहिला म्हणून खूप छान वाटलं. एवढ्या जबाबदा-या पार पाडत शास्त्रीय संगीतात विशारद होणं सोपी गोष्ट नाही. अभिनंदन.
अरूंधती, तुझ्या आईला साष्टांग दंडवत! अजूनही शिकणं सुरुच आहे. हॅटस ऑफ !

मानुषीताई छान आहे तुमचा संगीत प्रवास. रियाज करणे सोप्पी गोष्ट नाही.. गावोगावी हौसेने १-२ वर्षे गाणे शिकायला जाणा-या हजारो मुली असतील -- पण आळसामुळे पूर्ण करत नाहीत अभ्यास.
अरू, तुझ्या आईला प्रणाम ----------/\---------- विद्यार्थिनी अजूनही ... ग्रेट.. Happy

स्वराली, प्रॅडी, मानुषी, अनघा_मीरा, अकु सगळ्यांचेच अनुभव इतके ग्रेट आहेत. कित्येकजणींना नवीन उमेद मिळाली असेल शिक्षण चालू ठेवण्यासाठी. मनःपूर्वक धन्यवाद Happy

सगळ्यांनी खूप छान लिहिलंय. ह्या सगळ्यांच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे ...
अनुभव लिहिणा-या सगळ्यांचे आभार.

सुरेख लिहीलय सगळ्यांनी फार.

माझ्या आईनेही लग्नानंतर आणि २ मुली झाल्यानंतर तिचं बीए पुर्ण केलं. घरच्या जवाबदार्‍या, नंडांची, दिराची लग्न ह्यातुन वेळ काढुन जिद्दीने ती शिकली.
त्यासाठी तिला सलाम.

Hats off to all the moms. Happy

मी आईचे दुसरे अपत्य, वडील नोकरीला लागले होते. पण परिस्थिती अगदीच बेताची. कारण आजोबानी नोकरी केलीच नाही, वडील १० वी पास होईपर्यंत टॉकीजवर वा, कुठल्याश्या हॉटेलवर नोकरी करायचे. लग्नानतर, हातभर लागावा म्हणुन आईने डीएंड केले जिल्ह्याचे ठिकाणी कॉलेज असल्यामूळे रोज जाणे येणे सकाळी ४ वाजता उठुन स्वयंपाक, मग आमचे करून कॉलेजला जाणे आल्यावर परत भाडोंडा वर असेल ते खाऊन झोपी जाणे असा नित्यक्रम. डिएड पास झाल्यावर नोकरी लवकर मिळाली पण परत गावापासुन १०० किमी आम्हाला अजुन शाळेत न घातल्यामूळे आम्ही तिचे जवळ दुसर्‍या गांवी वडील दुसर्‍या गांवी असे विभागल्या गेलो. तिने सलग ३८ वर्ष नोकरी केली आणि निवॄत्त झाली त्यामूळे आम्ही आज सुखात आहोत. तिनेही आठवण म्हणुन काही हुशार मुलांच्या नोंदी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. दोघेही आनंदात जिवन व्यतित करीत आहेत.

मला इथे माझ्या सासूबाईन बद्द्ल लिहावस वाटतय. वय वर्षे ६५. पुर्वीच्या काळाप्रमाणे लहानपणिच लग्न झाले. जेम तेम अकरावीपर्यन्त शिक्षण झालेले. मोठया घरतली मोठी सून. सहाजिकच मोठया जबाबदार्या पडल्या. पण आत कुठे तरी शिकण्याची इच्छा होतीच. कधी कधी मुलान्चा अभ्यास घेण्याच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण व्हायची. यथावकाश मुले मोठी झाली, मुलान्ची लग्न झाली. आता नातवन्ड मोठी होउ लागली आहेत. मोकळा वेळ मिळायला लागला. वाचन तर चालु होतेच. पण राहीलेल शिक्षण पूर्ण का करु नये अस माझ्या सासूबाईना वाटल. लगेच त्यानी यशवन्तराव मुक्त विद्यापीठचा फोर्म आणला आणी ह्या २ महिन्या पुर्विच १२वि ची परीक्शा पास झाल्या. ह्या नंतरही BA पर्यन्त शिक्षण पूर्ण करायच त्यान्च्या मनात आहे. इतक्या वर्षानी त्यान्च्या शिकायच्या जिद्दिला माझा सलाम.

बंडोपंत, तुमच्या आईच्या कष्टांना व धीराला सलाम.
s_kallolkar, तुमच्या सासूबाईंचं कौतुक वाटतं!! Happy

Pages