गोडाचा शिरा

Submitted by सायो on 9 September, 2008 - 15:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेला बारीक रवा १ वाटी, साजूक तूप- २ टे.स्पून, साखर-१ ते सव्वा वाटी(किंवा चवीप्रमाणे), गूळ-सुपारीएवढा खडा, वेलची पूड-अर्धा ते एक टीस्पून, केशर-४,५ काड्या, पिस्ते,बदाम्,काजू, बेदाणे (चवीप्रमाणे), पाणी -२ वाट्या, दूध- अर्धी वाटी.
(रवा, पाणी,दूध,साखर ह्यांची मापाची वाटी एकच असावी)

क्रमवार पाककृती: 

गोडाच्या शिर्‍याची ती कसली रेसिपी टाकायची असा विचार मनात आला लिहिण्यापूर्वी. सगळ्यांचे घालण्याचे जिन्नस जरी तेच असले तरी मला आवडतो तसा शिरा जमायला बराच वेळ जावा लागला. आणि शेवटी जमला म्हणून रेसिपी इकडे टाकते आहे.तुम्हांलाही आवडेल अशी आशा आहे.
कृती:
रवा बारीक गॅसवर थोडं तूप घालून खमंग भाजून घ्यावा.(अगदी लालसर करायची गरज नाही). भाजून झाल्यावर बाजूला ठेवून नॉनस्टीक पॅनमध्ये २ वाट्या पाणी उकळत ठेवावं. उकळी आल्यावर त्यात साखर, गूळ, वेलची पावडर घालावी. अर्धी वाटी दूध गरम करुन त्यात केशर घालावं म्हणजे छान रंग येईल. पाण्यात घातलेली साखर विरघळली की त्यात दूध घालावं. नीट ढवळून काजू,बदाम, पिस्ते, बेदाणे घालावेत. उकळी आली की त्यात भाजलेला रवा पेरत पेरत घालावा. एका हाताने ढवळत राहावं म्हणजे गुठळी होणार नाही. मिडियम गॅसवर झाकण घालून वाफ काढावी व पाणी आटल्यावर गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांकरता
अधिक टिपा: 

मी ह्यात एवरेस्टचा केशरी दुधाचा मसालाही घालते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्‍यासाठी मी सुद्धा नेहमीच जाड रवा'च' वापरते. आधी तो नुसता कोरडाच भाजायचा वास मस्त येइपर्यंत. मग'च' त्यात तूप टाकून आणखी जरा वेळ परातायचा. रवा भिजला असला पाहिजे तूपात तर आणखी उत्तम. एकदम तूप वर नाही तरंगले पाहिजे पण चांगले लागले पाहिजे तूप सर्व रव्याला. तोवर फक्त दूध (केशर दूधातच टाकून) कडकडीत उकळून ठेवायचे मग रवा तूपात परतला की ओतायचे. सारखे करून घ्यायचे एकदा ढवळून व झाकण मारून ठेवायचे १० मिनीटे.
मग साखर टाकायची, ढवळायचे व पुन्हा झाकण मारून शिजू द्यायचे मंद गॅस ठेवून १० मिनीटे. मग उतरववताना दूध मसाला, वेलची टाकून निमू द्यायचा परत मगच झाकण उघडायचे व मुदी पाडायच्या.

१ वाटी जाड रव्याला तीन वाटी दूध व अर्धा वाटी तूप असे प्रमाण कधीच चुकत नाही. व मस्त लुसलुशीत खरपूस लागतो. रवा ब्रॉउन दिसतो पांढरा चिकट होण्याएवजी नी चव छान होते. ह्याच पद्ध्तीने मी केळे घालून मस्त सत्यनारायणाचा प्रसाद करते. केळं मात्र छान परतून घेते शुद्ध तूपात लवंग (फक्त एक काडी) घालून आधी. अजिबात चिकट होत नाही केळं घालून सुद्धा. लिहिली होती इथेच ती रेसीपी.

सत्यनारायणाचा प्रसाद असेल तर १ किलोला पावूण किलो तूप.

काल केला व खाल्ला शिरा. आत्म तृप्तम. आमची पण शिरा फॉर ड्मीजच कृती आहे.

मुदी पाडायला एक फुलाच्या आकाराचा डाव मिळतो. मूद आकाराने लहान व अगदी सुबक पड्ते. म्हणजे प्रसादाला लोकांना द्यायला शिरा पुरेसा पडतो. ( असे रीझनिन्ग असावे.)

इतके 'च' न करता शिरा होतो चांगला नक्कीच पण ह्या 'च' च्या टिप्स आहेत अगदीच कोणाचा शिरा बिघडत असेल तर'च'. Wink

बरे तुझा तो इतका 'च' न वापरता शिरा चांगला'च' असतो हे कसे कळणार? Wink

मुदी पाडायला एक फुलाच्या आकाराचा डाव मिळतो. मूद आकाराने लहान व अगदी सुबक पड्ते. म्हणजे प्रसादाला लोकांना द्यायला शिरा पुरेसा पडतो. ( असे रीझनिन्ग असावे.)<<< मामी, नेक्स्ट टाईम माझी टा तु टि ची ट्रिक वापरा शिर्‍याच्या मुडी पाडायला Happy

वोक्के! मस्त टिप्स मिळाल्या.. माझ्याकडून रवा भाजायला कमी पडतोय आणि तूपही कमी पडत असावं असं वाटतंय. हे दोन्ही करून बघते. आणि एकदा फक्त दूधाचा करून बघेन, तसा कधी केला नाही.. मनासारखा मोकळा शिरा जमला की मोकळा श्वास घेऊन फोटो टाकणार नक्की Proud

पूनम, शिरा करताना रवा आधी कोरडा भाजून घे कढईत (उपम्याला करतो तसे) मग त्यावर तूप टाकून परत भाज. १ वाटी रवा असेल तर २ चमचे (पोहे खातो तो चमचा) तूप घालून भाज.
दूध अगदी सायीसकट वापरले तरी चालते. २.५ ते ३ कप दूध घालून गुठळ्या काढून पुन्हा नीट कोरडा होतो पण रवा शिजलेला असतो. मग त्यात साखर घालून नीट मिक्स कर. एक वाफ आली की वरून १-२ चमचे तूप घाल मिसळून झाकण ठेव.

शिरा तयार. वेलची, केशर, काजू, बदाम, बेदाणे हे सगळे एन्हान्सर्स त्याने शिरा घट्ट्/गोळा वगैरे होणे न होणे यात काही फरक पडत नाही.

कोल्ड ड्रींकसच्या बाटल्यांची बुच कशी वाटतात मुदी पाडायला ? Wink

कुणी जाड रव्याचा गूळ घालून केलाय का ? आजी बनवायची.

अम्या तो सांजा, कणकेत भरून त्याच्या पोळ्या करतात.
सांज्याची पोळी आणि घट्ट तुपाचा गोळा.. अहाहा!!

गप्प, जाड रव्याचा फक्त गूळ घालुन केलेला शिरा. तू त्याला सांजा म्हणत असशील (सांजाच का ? सांजच्याला खातात म्हणून ?) तर म्हण. पण तो नुसताही खातात की, सांजोर्‍यातच घालतात अस थोडच्चै ?
गुळामुळे खरपूस चव येते त्याला.

आजीला मस्का मारायला लागणार आता.

बेस्ट शिरा झाला!
मी रव्यात गरम पाणी ओतायचो म्हणून का काय माहीत नाही मोकळा शिरा व्हायचा नाही. काल असा केला आणि केशर वेलची भरपूर घालून केला त्यानेही असेल एकदम हवा तसा झालेला.

मस्तच ग सायो.. मला त्या मंदिरात असतो तसल्या टेक्स्चरचा शिरा फार आवडतो. पण मला नीट नाही बनवता येत तसा. हा ट्राय करेन. तसा होतो का मऊसुत?
मी केलेल्या शिर्‍याची ढेकळं ढेकळं च फार राहतात.

वा, वा अमित.
हो अंजली, तसाच होतो मऊसूत. फक्त आधी पाणी घालून उकळी काढून मग त्यात दूध घालून रवा पेरणं हे फॉलो कर. तसंच रव्याच्या दुप्पट पाणी आणि त्यात अजून अर्धी, पाऊण वाटी दूध हे ही.

हो अंजली, तसाच होतो मऊसूत. फक्त आधी पाणी घालून उकळी काढून मग त्यात दूध घालून रवा पेरणं हे फॉलो कर.>>>>>>>>>>> नक्की. थँक्यू

या प्रमाणात रवा वरुन टाकला तर खीर होत्येय का काय वाटू लागलं. सो घाबरुन मूठभर रवा वरुन परत टाकला. पण नसता टाकला तरी चाललं असतं. मिश्रण शोषून घेतं पाणी.

मी उलट करते. रवा तुपावर भाजून झाला की त्यातच हळू हळू पाणी घालत तो फुलवत न्यायचा. आणि साखर नंतर घालते.
या पद्धतीने करून बघेन आता.

मै, मी ही असाच करायचो. पण पाणी आणि साखर प्रमाणात न घालता वरुन घातल्याने अंदाजाने घातली जाते आणि शिरा न होता एक चिकट गोळा होतो माझा.
आय लाईक नो ब्रेनर रेसिपीज.

बाप रे, ही पद्धत मला रिस्की वाटली, कारण पिठल्यासारख्या गुठळ्या झाल्या तर? उकळत्या पाण्यात पीठ घातलं की गुठळ्या होतात असा अनुभब आहे. कदाचित रवाळ टेक्सचर मुळे बेसन पिठासारख्या गुठळ्या होत नसतील.
मी रवा भाजला की त्यात साखर, वेलदोडा पावडर, केशर, बेदाणे टाकून मिक्स करते आणि लगेच उकळतं दुध ओतते. अजून कधी फ्लॉप झालं नाही.

मी उलट करते. रवा तुपावर भाजून झाला की त्यातच हळू हळू पाणी घालत तो फुलवत न्यायचा. आणि साखर नंतर घालते.
या पद्धतीने करून बघेन आता. >>> मी पण .
उलट कधी करून बघेनच एकदा.

आम्ही रवा तुपात भाजतो, निट भाजत आला की त्यात ड्रायफ्रुट्स अन वेलची घालतो, हे सगळे करत असताना दुसर्या गॅसवर दुध साखर गरम करायला ठेवायचे. अन ते ऊकळते दुध साखर रव्यावर ओतुन दोन मिनीटे झाकायचे. फक्त आच मंद असायला हवी. खुप छान मऊसुत मोकळा शिरा होतो.

हिच पद्धत ऊपम्याला, वरुन पाणी ओतायचे छान मऊ होतो ऊपमा

रवा किंवा उपमा करताना सगळा मालमसाला घातलेल्या आधणात किंवा उकळत्या मिश्रणात रवा वैरायचा (म्हणजे पेरायचा) सुरेख उपमा/ शिरा होतो.
पेशंट, लहान बाळं, वृद्ध व्यक्तींना जर पचायला हलका साधा भात हवा असेल तर असेच आधणात किंवा उकळत्या पाण्यात, आधी धुवून घेतलेले तांदूळ वैरायचे म्हणजे भातही नीट होतो.

मीरा, पाणी आणि दूध उकळलं की त्यात हाताने रवा पेरत घालायचा आहे. भसकन ओतायचा नाही. रवा घालून झाल्यावर एकदा चांगलं ढवळून घेऊन गॅस जरा बारीक करुन झाकून ठेवायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत.

पेरत बसण्यापेक्षा आधणाचे पाणी भाजलेल्या रव्यात टाकणे सोपे वाटते. गुठळ्या होण्याची शक्यता पेरण्यात जास्त आहे. आधणाचे पाणी घालून, दणदणीत वाफा आणल्या की रवा मस्त फुलतो, मौ, मोकळा होतो. शिरा/उपमा होत आला की कडेने तूप सोडावे, हमखास मोकळा होणारच.. Happy

रव्यात गरम पाणी घालून केलेल्या शि-यापेक्षा उकळत्या पाण्यात रवा घातलेल्या शि-याचं टेक्श्चर जास्त लुसलुशीत असतं. एका हातात उलथनं घेऊन दुस-या हातानं रव्याची धार कढईत सोडणं तितकंसं अवघड नाही. गॅस बारीक ठेवायचा.

आधणाचे पाणी घालून, दणदणीत वाफा आणल्या की रवा मस्त फुलतो, मौ, मोकळा होतो.>>>सहमत.तसे करणे सोपे वाटते.

रव्यात गरम पाणी घालून केलेल्या शि-यापेक्षा उकळत्या पाण्यात रवा घातलेल्या शि-याचं टेक्श्चर जास्त लुसलुशीत असतं. >>>> नाही, तूप, दूध/पाणी प्रमाण व्यवस्थित असेल तर वरून पाणी ओतलेला शिरा/उपमा जास्त मऊ होतो अन मुख्य म्हणजे हे कमी त्रासिक देखील आहे, उकळते पाणी घालून न हलवता झाकून ठेवायचे, अन दोनेक मिनिटांनी हलक्या हाताने पळटायचे

Pages