ढोकळा-रविवार स्पेशल..

Submitted by सुलेखा on 25 April, 2012 - 03:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरं तर ढोकळा कोणत्याही वेळी खाण्यासारखा पदार्थ आहे.चटकमटक्,नाश्ता,जेवणात डावी बाजु तर रविवार्,सुट्टी च्या दिवशी संध्याकाळी पोटभर असा केव्हाही ,कोणत्याही ॠतुत खायला आवडतो.पुन्हा करायला अगदी सोपा,पचायला हलका आहे..
२ वाट्या तांदुळ.
१ चमचाभर चणाडाळ..[रोजचा पोहे खायचा चमचाभर]
१ चमचाभर उडिद डाळ..
हे तीनही जिन्नस एकत्र छान धुवुन ,यात बुडेल इतके पाणी घालुन ४ तास भिजवुन ठेवावे.
हे भिजलेले मिश्रण असे दिसते..यातले काही काळसर दाणे एका डब्यात उरलेल्या जवसाचे आहेत
daal-taandul bhijalele.JPG
४ तासानंतर यातील जास्तीचे पाणी काढुन टाकुन द्या व मिश्रण मिक्सरमधे रवाळ वाटुन घ्या.
वाटताना पाणी लागेल तसे घाला.वाटलेले मिश्रण इडली इतपत पातळसर असावे.
या मिश्रणात १चमचा दही किंवा पाव वाटी ताक घालुन मिश्रण चमच्याने कालवुन घ्यावे.त्यावर झाकण ठेवुन ६ ते ८ तास तसेच ठेवावे.म्हणजे संध्याकाळी ढोकळा करायचा असेल तर सकाळी व सकाळी करायचा असेल तर रात्री वाटुन ठेवायचे आहे.
चवीप्रमाणे मीठ.
१/२ चमचा हळद.
३चमचे तेल.
चटणी साठीचे साहित्य:
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ चमचाभर किसलेले आले..
३ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या..
लसुण पाकळी मोठी/जाड असल्यास एक अथवा दोन .
हे मिक्सरमधे वाटुन घ्यावे.
फोडणीसाठी_
१ मोठा चमचा तेल.
मोहोरी,जिरे पाव्-पाव चमचा
पाव चमचा हिंग..
कढीपत्ता पाने ७-८.
३ हिरव्या मिरच्या मधुन चिरुन ,एकाचे २ तुकडे करावे..
१ चमचा तीळ..
हळद पाव चमचा..
इनो फ्रुट्-सॉल्ट १ लहान पाउच [२ चमचे]
एक काठ असलेली थाळी.
वरुन पेरायला ओले खोबरे .

क्रमवार पाककृती: 

इतकं केल्यावर पुढचे काम सोपे आहे.
मिश्रणात पाव/अर्धा चमचा हळद घालुन ढवळावे..रंग हलका पिवळसर यायला पाहिजे.
आता त्यात वाटलेली चटणी ,चवीप्रमाणे मीठ, ३ चमचे तेल,पाव चमचा हिंग घालुन ढवळावे.
आता ज्या थाळीत ढोकळा वाफवायचा आहे त्या थाळीला अर्धा चमचा तेल तळाला सगळीकडे लावुन घ्या .जर थाळी लहान असेल तर मिश्रण २ भागात करायचे आहे..
[थाळी प्रकार करायचा नसेल तर इडली पात्रात ही वाफवता येतील.आणि वाफवल्यावर एका इडलीचे २ तुकडे करायचे.]
फ्राय पॅन मधे १/२ भांडे पाणी घालुन त्यात रिंग /.लहान प्लेट ठेवुन गॅसवर गरम करायला ठेवा.
मिश्रण थाळीत किती मावेल तो अंदाज घेवुन सगळे किंवा अर्धे मिश्रण घेवुन त्यात २ चमचे किंवा १ चमचा इनो घालावा व मिश्रण छान ढवळावे.आता इनोमुळे हे मिश्रण फुगलयासारखे दिसेल .लगेच्च थाळीत ओतुन थाळी फ्राय पॅन मधे हळुच ठेवावी.वर झाकण तसेच ठेवावे.शीटी लावु नये .पहिली ३ मिनिटे गॅस मोठा नंतर मध्यम आचेवर ५ मिनिटे ठेवावा. व झाकं काढुन सुरी उभी रोवुन ढोकळा वाफवला आहे का ते पहावे..सुरीला मिश्रण चिकटले नाही तर ढोकळा तयार आहे..थाळी बाहेर काढुन वाफ जिरली कि सुरीने वड्या कापुन घ्या.
थाळीत वाफवलेल्या ढोकळ्यावर तेल्-पाणी मिश्रीत फोडणी घातल्यावर असा दिसतो.
dhokalaa thali.JPG
ढोकळा वाफायला लावला कि लगेच फोडणी साठी तयारी करा .
कढईत तेल तापले कि त्यात मोहोरी,जिरे,हिंग,कढीपत्ता,मिरच्यांचे तुकडे व हळद घालुन परता .
एका बाऊल मधे वाटीभर पाणी घ्या त्यात ही फोडणी ओता..
कापलेल्या ढोकळा गरम असताना ही पाणीमिश्रीत फोडणी त्यावर सगळीकडे पसरेल अशी ओता ..
ही फोडणी ढोकळ्यात लगेचच जिरते.
या मंडळी ..ढोकळा प्लेट मधे तयार आहे.
dhokala..plate tayar.JPG
आता वरुन ओले खोबरे पेरा.प्रत्येक वडीवर चमच्याने एक थेंब लालचुटुक टोमॅटो सॉस घालुन चव पहा..

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तितके..
अधिक टिपा: 

१] जर ही वाटाघाटी करायची नसेल तर ढोकळा पिठ करता येते.त्यासाठी १ किलो तांदुळ्,पाव वाटी चणाडाळ्,पाव वाटी उडिद डाळ या प्रमाणात घेवुन गिरणीतुन "रवेदार" दळुन आणायचे. हे मिश्रण ५-६ तास दही/ताकात भिजवुन बाकी कृती वरील प्रमाणे करावी.
२] इडली पात्रात ही छान होतात..
३]एकावेळी थाळीत जितके मिश्रण बसेल तितकेच घेवुन त्यात इनो मिसळावा.साधारण अर्धी ते पाऊण थाळी मिश्रण ओतावे .वाफवल्यावर ढोकळा आकारमानात फुलतो.
४]ढोकळा वाफवायला ठेवण्यापुर्वी मिश्रणात इनो बरोबर चिरलेला कच्चा कांदा घालावा ..तयार ढोकळ्याची चव अर्ध्या -कच्च्या कांद्यामुळे वेगळी पण मस्त लागते.
५]वाटलेल्या चटणीमुळे या ढोकळ्याला कोथिंबीर्,मिरची,आले किंचित लसुण व हिंग या सर्वाची वेगळी मस्त अशी चव येते.
६] तेल +पाणी मिश्रीत फोडणीमुळे ढोकळा आतुन नरम रहातो,फुलतो.
७] मिश्रण वाफायला ठेवण्याआधी त्यात तेल घातल्याने ढोकळा मऊ होतो.

माहितीचा स्रोत: 
रंगरंगीलु मारु गुजरात...
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्क्रॅच पासून पदार्थ करणार्‍या खरं तर सर्वच पाकृ वाल्यांबद्द्ल मला प्रचंड आदर आहे...
त्यामुळे ते डाळ तांदुळाचे फ़ोटो पाहूनच ठरवलं होतं की प्रतिक्रिया तर द्यायलाच हवी..पण इथे आणखी एक म्हणजे ही कृती माझ्यासारखीला झेपणेबल आहे असं वाटतंय....छोट्या प्रमाणावर नक्की करून पाहीन....ज्या ब्लेंडरमध्ये मला इडलीचं पीठ करायला जमतंय बहुदा त्यात हे पण वाटलं जाईल असं वाटतंय.....
मस्त रेसिपी आणि तो ढोकळ्याचा फ़ोटो किलिंग आहे..भू.........क लागली....

>>इथल्या रेसिपीबद्दल काही प्रतिसाद नाही, माझी रेसिपी बघा. किती तो .......:D
अशांसाठी खरं तर तो रिक्षा स्ट्यांडचा धागा ही जास्त योग्य जागा आहे....
पण जाउदे नं ते आपण रेसिपी पाहूया खाऊया आणि भरपेट ढेकर देऊया कसं....:)

>>इथल्या रेसिपीबद्दल काही प्रतिसाद नाही, माझी रेसिपी बघा. किती तो ......<<

हो तेच ना. दुसर्‍याची रेसीपी आली रे आली की आपल्या रेसीपीची लिंक द्यायची चिकटवून...
इकडच्या रेसीपीवर हूं का चूं .. का काहीच नाही...... किती तो '......पणा' असे ना.

किंवा ते बहुधा असे आहे.. मेरी रेसीपी से भला उसकी रेसीपी कैसे .... Proud
किंवा.. रीक्षा चालवायची हौस दुसरे काय.. Wink
असे करण्यापेक्षा स्वतःच्या रेसीपीवर जावून धन्यु, धन्स किंवा चार पाच वेळा स्मायली वा पोस्टी खाडाखोड करून/टाकून यायचे ना धागाच वर आणायला. Wink

बरं , जावू दे.. आपण रेसीपी वाचावी. कसें?

पहिली ३ मिनिटे गॅस मोठा नंतर मध्यम आचेवर ५ मिनिटे ठेवावा. >> इतक्या कमी वेळात वाफेवर शिजेल?
बाकी फोटो मस्त आहे.

पहिली ३ मिनिटे गॅस मोठा नंतर मध्यम आचेवर ५ मिनिटे ठेवावा. >> इतक्या कमी वेळात वाफेवर शिजेल?
>> मी पाणी उकळल्यावर १ ला घाणा १५ मि. (पीठ थोड जास्त वाट ल म्हणून) अन २ रा घाणा १० मि. ठेवला. मध्ये झाकण काडून सुरी खुपसून पाहिल तर झाला न्व्हता. कदाचित सुलेखाताईंचे खीरू एकावेळी कमी घालायची पध्दत असेल.

मस्त दिसतोय ढोकळा Happy

आला उन्हाळा
करावा ढोकळा Wink
त्यामुळे, लवकरच करून बघण्यात येईल. जमला, तर फोटो टाकेन इथे.

झी,करता येईल . डाळी भिजल्यावर मिक्सरमधुन बारीक वाटुन घे.नंतर त्यात भिजलेला इडली रवा घालुन पुन्हा एकदा वाटुन घे ..

मी आजच सकाळी केला हा ढोकळा... पण पीठ छान आंबूनही वाफवल्यावर दडदडीत झाला Sad Sad Sad
मग त्याचं आमिरी खमण करावं लागलं.

मंजुडी,एक तर तुझ्या हातुन चुकायलाच नको .असे माझे प्रामाणिक मत आहे.पण तरीही -इनो घातले नाही का? कमी घातले?इनोशिवाय इतका जाळीदार्/हलका होणार नाही.
दडदडीत ला चुरुन पाण्याचा शिबका देवुन ,झाकण ठेवुन एक मिनिट मावे त वाफवुन घ्यायचे.अगदी थोड्या तेलावर कच्चा कांदा कच्चा लागेल इतपत परतुन त्या आमिरी खमण मधे मिसळायचा .वरुन शेव घालायची.

सुलेखा, चणाडाळ कमी असलेला म्हणून अगदी लगोलग करून बघितला गं हा ढोकळा.... इनो घातलं, अगदी तू लिहिल्याबर हुकुमच केला ढोकळा, पण दडदडीत झाला. Sad

मला ही प्रश्न तोच ..पण आता पुढच्या वेळी थोडा इनो जास्त घाल .मिश्रण फसफसल्यासारखे दिसते.
तसं ही ढोकळा जमायला जरा वेळ च लागतो.

छान रेसिपि... माझ्याकडे ईनो फ्रुट सॉल्ट नाहिये. त्याऐवजी बेकिंग सोडा/पावडर.. काय आणि किती प्रमाणात घालू?

इनो फ्रूट सॉल्ट म्हणजे ६०% बेकिंग सोडा आणि ४०% सायट्रिक अ‍ॅसिड असतं. चु.भू.द्या.घ्या.

मी इनो नसेल तर, एक चमचा इनो सांगितले असल्यास - अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड किंवा अर्धा चमचा लिंबूरस घेते. हा प्रयोग आतापर्यंत यशस्वी झालेला आहे.

सुलेखाताई, तांदुळाला पर्याय कोणता पदार्थ वापरता येतो?
सासुबाईंना मधुमेह असल्याने तांदूळ नाही वापरु शकत.

स्वाती तांदुळाला पर्याय नाही असे मला वाटतेय, पण बघु सुलेखाताई सांगतीलच.
माझ्याही साबांना मधुमेह आहे, पण इतर पथ्ये आणी औषध त्या नियमीत घेतात, त्यामुळे आटोक्यात आहे, असो.
तांदुळ भाजुन ते भिजव किंवा शिजवुन बघ, कारण त्यामुळे त्यातील स्टार्च कमी होवुन तांदुळ हलका होतो, असे माझ्या वाचनात आलेय, त्यामुळे प्रयोग करायला काय हरकत, मात्र तांदुळ अगदीच खमंग भाजु नयेत.
सुलेखाताई खरेच छान आणी सोपी पद्धत. माझ्या साबा असेच करतात, माझ्या माहेरी मात्र नुसत्या बेसनाचा झटपट ढोकळा व्हायचा. नेमके उपासाच्या दिवशी आणी तोंडाला पाणी सुटले.

झंपी आजकाल सॉल्लिड तासते सगळ्यांना. पण खरे आहे.

स्वाती, मी स्वतः मधुमेही आहे. ढोकळा, ईडली हे आवडते प्रकार असल्याने आता ओट्स पर्यायाने वापरते. एकदा सवय लागली की कळत ही नाही तांदूळ वापरलेले नाहीत. डोसाचे भिजवताना ३ कप तांदूळाएवजी २ कप ओटस घेते, १ कप तांदूळ. ओट्स भिजायला फार वेळ लागत नाही - फार तर अर्धा तास. नेहमीप्रमाणे भिजवलेले तांदूळ, उडद डाळ वाटून घ्यायचे, सर्वांत शेवटी ओट्स वाटायचे.

अमी

Pages