ढोकळा-रविवार स्पेशल..

Submitted by सुलेखा on 25 April, 2012 - 03:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरं तर ढोकळा कोणत्याही वेळी खाण्यासारखा पदार्थ आहे.चटकमटक्,नाश्ता,जेवणात डावी बाजु तर रविवार्,सुट्टी च्या दिवशी संध्याकाळी पोटभर असा केव्हाही ,कोणत्याही ॠतुत खायला आवडतो.पुन्हा करायला अगदी सोपा,पचायला हलका आहे..
२ वाट्या तांदुळ.
१ चमचाभर चणाडाळ..[रोजचा पोहे खायचा चमचाभर]
१ चमचाभर उडिद डाळ..
हे तीनही जिन्नस एकत्र छान धुवुन ,यात बुडेल इतके पाणी घालुन ४ तास भिजवुन ठेवावे.
हे भिजलेले मिश्रण असे दिसते..यातले काही काळसर दाणे एका डब्यात उरलेल्या जवसाचे आहेत
daal-taandul bhijalele.JPG
४ तासानंतर यातील जास्तीचे पाणी काढुन टाकुन द्या व मिश्रण मिक्सरमधे रवाळ वाटुन घ्या.
वाटताना पाणी लागेल तसे घाला.वाटलेले मिश्रण इडली इतपत पातळसर असावे.
या मिश्रणात १चमचा दही किंवा पाव वाटी ताक घालुन मिश्रण चमच्याने कालवुन घ्यावे.त्यावर झाकण ठेवुन ६ ते ८ तास तसेच ठेवावे.म्हणजे संध्याकाळी ढोकळा करायचा असेल तर सकाळी व सकाळी करायचा असेल तर रात्री वाटुन ठेवायचे आहे.
चवीप्रमाणे मीठ.
१/२ चमचा हळद.
३चमचे तेल.
चटणी साठीचे साहित्य:
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ चमचाभर किसलेले आले..
३ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या..
लसुण पाकळी मोठी/जाड असल्यास एक अथवा दोन .
हे मिक्सरमधे वाटुन घ्यावे.
फोडणीसाठी_
१ मोठा चमचा तेल.
मोहोरी,जिरे पाव्-पाव चमचा
पाव चमचा हिंग..
कढीपत्ता पाने ७-८.
३ हिरव्या मिरच्या मधुन चिरुन ,एकाचे २ तुकडे करावे..
१ चमचा तीळ..
हळद पाव चमचा..
इनो फ्रुट्-सॉल्ट १ लहान पाउच [२ चमचे]
एक काठ असलेली थाळी.
वरुन पेरायला ओले खोबरे .

क्रमवार पाककृती: 

इतकं केल्यावर पुढचे काम सोपे आहे.
मिश्रणात पाव/अर्धा चमचा हळद घालुन ढवळावे..रंग हलका पिवळसर यायला पाहिजे.
आता त्यात वाटलेली चटणी ,चवीप्रमाणे मीठ, ३ चमचे तेल,पाव चमचा हिंग घालुन ढवळावे.
आता ज्या थाळीत ढोकळा वाफवायचा आहे त्या थाळीला अर्धा चमचा तेल तळाला सगळीकडे लावुन घ्या .जर थाळी लहान असेल तर मिश्रण २ भागात करायचे आहे..
[थाळी प्रकार करायचा नसेल तर इडली पात्रात ही वाफवता येतील.आणि वाफवल्यावर एका इडलीचे २ तुकडे करायचे.]
फ्राय पॅन मधे १/२ भांडे पाणी घालुन त्यात रिंग /.लहान प्लेट ठेवुन गॅसवर गरम करायला ठेवा.
मिश्रण थाळीत किती मावेल तो अंदाज घेवुन सगळे किंवा अर्धे मिश्रण घेवुन त्यात २ चमचे किंवा १ चमचा इनो घालावा व मिश्रण छान ढवळावे.आता इनोमुळे हे मिश्रण फुगलयासारखे दिसेल .लगेच्च थाळीत ओतुन थाळी फ्राय पॅन मधे हळुच ठेवावी.वर झाकण तसेच ठेवावे.शीटी लावु नये .पहिली ३ मिनिटे गॅस मोठा नंतर मध्यम आचेवर ५ मिनिटे ठेवावा. व झाकं काढुन सुरी उभी रोवुन ढोकळा वाफवला आहे का ते पहावे..सुरीला मिश्रण चिकटले नाही तर ढोकळा तयार आहे..थाळी बाहेर काढुन वाफ जिरली कि सुरीने वड्या कापुन घ्या.
थाळीत वाफवलेल्या ढोकळ्यावर तेल्-पाणी मिश्रीत फोडणी घातल्यावर असा दिसतो.
dhokalaa thali.JPG
ढोकळा वाफायला लावला कि लगेच फोडणी साठी तयारी करा .
कढईत तेल तापले कि त्यात मोहोरी,जिरे,हिंग,कढीपत्ता,मिरच्यांचे तुकडे व हळद घालुन परता .
एका बाऊल मधे वाटीभर पाणी घ्या त्यात ही फोडणी ओता..
कापलेल्या ढोकळा गरम असताना ही पाणीमिश्रीत फोडणी त्यावर सगळीकडे पसरेल अशी ओता ..
ही फोडणी ढोकळ्यात लगेचच जिरते.
या मंडळी ..ढोकळा प्लेट मधे तयार आहे.
dhokala..plate tayar.JPG
आता वरुन ओले खोबरे पेरा.प्रत्येक वडीवर चमच्याने एक थेंब लालचुटुक टोमॅटो सॉस घालुन चव पहा..

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तितके..
अधिक टिपा: 

१] जर ही वाटाघाटी करायची नसेल तर ढोकळा पिठ करता येते.त्यासाठी १ किलो तांदुळ्,पाव वाटी चणाडाळ्,पाव वाटी उडिद डाळ या प्रमाणात घेवुन गिरणीतुन "रवेदार" दळुन आणायचे. हे मिश्रण ५-६ तास दही/ताकात भिजवुन बाकी कृती वरील प्रमाणे करावी.
२] इडली पात्रात ही छान होतात..
३]एकावेळी थाळीत जितके मिश्रण बसेल तितकेच घेवुन त्यात इनो मिसळावा.साधारण अर्धी ते पाऊण थाळी मिश्रण ओतावे .वाफवल्यावर ढोकळा आकारमानात फुलतो.
४]ढोकळा वाफवायला ठेवण्यापुर्वी मिश्रणात इनो बरोबर चिरलेला कच्चा कांदा घालावा ..तयार ढोकळ्याची चव अर्ध्या -कच्च्या कांद्यामुळे वेगळी पण मस्त लागते.
५]वाटलेल्या चटणीमुळे या ढोकळ्याला कोथिंबीर्,मिरची,आले किंचित लसुण व हिंग या सर्वाची वेगळी मस्त अशी चव येते.
६] तेल +पाणी मिश्रीत फोडणीमुळे ढोकळा आतुन नरम रहातो,फुलतो.
७] मिश्रण वाफायला ठेवण्याआधी त्यात तेल घातल्याने ढोकळा मऊ होतो.

माहितीचा स्रोत: 
रंगरंगीलु मारु गुजरात...
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच जमलाय !

आई असाच करायची पुर्वी. पण पिठ पुरेसे आंबले असेल तर इनोची गरज
पडत नाही. त्याकाळी चक्कीवर पण असे रवाळ पिठ दळून मिळत असे.
ते रात्री ताकात भिजवायचे.
इनोमूळे मात्र आता, कसल्याही पिठाचा छान ढोकळा करता येतो.
त्यामूळे असे मिश्रधान्य भिजत घालून वाटणे, वगैरे कमी झालेय, आमच्याकडे.

होय दिनेशदा,माझी आई मक्की च्या पिठाचा ताक घालुन खुप छान ढोकळा करायची..ढोकळा कुठलाही प्रकार असो ,[नुसत्या चणाडाळीचा,मिक्स डाळीचा,तांदुळ व डाळीचे वेगवेगळे प्रमाण],आम्ही पोटभर खात होतो.थंडीत पिठ आंबायचे नाही तेव्हा चिमुटभर खा.सोडा घालायची.तेव्हा तिथे इनो मिळत नव्हताच .ताकात भिजवल्याने या ढोकळ्याला एक आंबलेली विशिष्ट चव येते ती आवडायची..इनोमुळे घशाला त्रास होत नाही व बनतोही छान जाळीदार !!!!

झक्कास.. जलाराम च्यगाडयांवर सक्काळी ७ पासून मिळायला लागतो. थाळ्याच्या थाळ्या सकाळीरिक्क्षातून उतरतात. मी डाळीचा किंवा इडली खीरूचा करते. आता हाही करून बघेन. Happy धन्यवाद Happy

मी करते ढोकळा पण चितळे चा किंवा तलोद चा, आता हा करुन बघेन, पण इनोच प्रमाण पुन्हा एकदा नीट सांगाल का?

वरील प्रमाणात ढोकळा करताना मी ८ इंच व्यासाची थाळी दोन वेळा वापरली आहे.अर्धे मिश्रण एका दुसर्‍या भांड्यात घेवुन त्यात एक सपाट चमचा इनो घालुन फेटले .तेल लावलेल्या थाळीत ओतले .ते साधारण अर्धी [उंची मधे]थाळी बसले.जे फुगुन दुप्पट झाले.
अजुन एक इनो किंचित जास्त झाला तरी चालते.मिश्रणात घातल्यावर फेटले कि मिश्रण हलके होते .वाढते.

छान आहे रेसिपी. ती टीप नं १ खूप महत्वाची वाटली मला! आणि ह.डाळ एकदम कमी असल्याने जास्तच छान.
फोटो एकदम टेम्टिंग आलेत.

माझा पण ढोकळा एकदम ऑल टाईम फेव्हरेट.. आता पर्यंत गिट्स जिंदाबाद होतं, आता एकदा ह्या पद्धतीने आणि एकदा सिंडरेला च्या पद्धतीने करून पहायचायं Happy
दोन्ही रेसिपी आणि फोटो एकदम तोंपासु

मस्तच रेसीपी. सासुबाई तुम्ही लिहिलय तस सगळ दळून आणतात आणि रात्रभर भिजवून ठेवून करतात. मस्त लाग्तो चविला एकदम.

सुलेखाजी, बहु सरस! Happy
आई करते घरी.

बाकी, हे बघितलेय की कोणी दुसर्‍याने रेसीपी लिहिली की , आपण कधीतरी आधी लिहिलेल्या रेसीपीची लिंक का देत असतात लोकं काय कळत नाही... (स्वतःच्या रेसीपीचा टीरपी वाढवायचा पुन्हा केविलवाणा प्रयत्न.. इथले प्रतिसाद खेचून ..) Wink

मस्त! Happy

मी आत्तापर्यंत गिटस/चितळे असा केला आहे. हा सोपा वाटतोय. करुन बघते.

बाकी, हे बघितलेय की कोणी दुसर्‍याने रेसीपी लिहिली की , आपण कधीतरी आधी लिहिलेल्या रेसीपीची लिंक का देत असतात लोकं काय कळत नाही... (स्वतःच्या रेसीपीचा टीरपी वाढवायचा पुन्हा केविलवाणा प्रयत्न.. इथले प्रतिसाद खेचून ..) >>>>>+१००
इथल्या रेसिपीबद्दल काही प्रतिसाद नाही, माझी रेसिपी बघा. किती तो .......

अरे वा सहीच दिसतोय ढोकळा. मला ढोकळा खूप आवडतो. इथे असे पीठ दळून आणणे शक्य नाही. तेव्हा सध्यातरी चितळे जिंदाबाद.

रुनी, दळायचा म्हणजे मिक्सरवर होईल की बारीक. डोश्याच्या पिठासारखंच तर हवंय.
ज्यांना फोडणीतल्या हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा नको असेल त्यांनी भोपळी मिरची उभट चिरुन (बोटभर काप) जरा तेलावर परतून ढोकळ्यावर लावली तरी छान चव येते.

अहाहा माझा फेव पदार्थ. माझी आई याच रेसिपीने करते. तिच्या हातचा ढोकळा खुप चविष्ट लागतो.
मला मात्र गिट्स चा ढोकळा पण धड जमत नाही. ही रेसिपी बघुन मात्र फार मोह होतोय
परत एकदा प्रयत्न करायचा.

ढोकळा माझाही खुप आवडता. मी गिट्चा नेहमीच करते, तो होतोही छानच. मुगाच्या डाळीचाही करते पण तो जास्त फुगत नाही. पण आता हा असा करीन. फ्रायपॅन मधे पाणी ठेउन त्यात थाळी ठेवण्याची कल्पना छान आहे.

कसला मस्त ढोकळा दिसतोय ! आत्ता सुरी घेवून, एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतोय ! मी पण आज करते ढोकळा, सध्या एक रेडीमेड पाकीट आहे त्याचा करते! वरील कृती प्रमाणे पण करून पाहील.

हो सायो नंतर लक्षात आले ते माझ्या, वर सुलेखा काकुंनी एकदाच जास्त पीठ दळून आणण्याबद्दल लिहीले होते ना त्यासाठी होते ते.

Pages