छुपा लो युँ दिल में प्यार मेरा...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गाण्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस बरेच वेळा सकाळी उठतो तोच डोक्यात एखाद्या गाण्याची अोळ किंवा धुन घेऊन. उठता-उठता नेमकं तेच गाणं का? या प्रश्नावर विचार करत मी कित्येक तास घालवले असतील... आधल्या दिवशी घडलेल्या कशाशी त्याचा संबंध आहे का? रात्री पडलेल्या स्वप्नात कुठे त्याचा संदर्भ लागतो का? शेवटी नाद सोडला. आज सकाळी जाग आली ती 'ममता' चित्रपटातल्या 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' गुणगुणत. गाभाऱ्यात भरुन राहणारा अोंकार असावा तसा हेमंतकुमारचा आवाज आणि जोडीला मन व्याकुळ करणारा 'तिचा' आवाज. पार्श्वभुमीला संगीत म्हणून फक्त घंटानाद आहे तोही गाण्यावर कुरघोडी न करता मंदीरात ताल धरल्यासारखा! असं एखादं गाणं म्हणत उठलं की तेव्हाच समजतं आजचा दिवस छान जाणार! गाण्याचे शब्द, पार्श्वभुमीलाच राहणारं नाजूक संगीत आणि या गाण्याला दुसरे कुठलेही आवाज चालले नसते असे हेमंतकुमार आणि लताचे आवाज... बास्! केवळ या गाण्यानीच दिवसाचं सोनं होतं; नंतरचा दिवस कसाही जावो, इथे मनात सतत हे गाणं वाजत असतं!

लतानी गाण्यातून व्यक्त केली नाही अशी एकही भावना नसेल; पण का कोणास ठाऊक, मला सगळ्यांत जास्त भावतात ती तिने गायलेली मन व्याकुळ करणारी गाणी - कधी ती व्याकुळता प्रेयसीची असते, कधी पत्नीची, कधी आईची तर कधी मुलीची; एखाद्या गाण्यात मानवी जीवनाची क्षणभंगुरता मनाला भिडते तर कुठे जीवनाच्या संध्याकाळच्या छाया भिववतात. पण दरवेळी, हे असं प्रत्येक गाणं ऐकताना हे लक्षात येतं की आपला आवाज हे एक माध्यम आहे याची जाणीव तिच्या मनात सतत असावी. खरं तर तिच्या आवाजाशिवाय दुसऱ्या आवाजात त्या गाण्याची कल्पनाही असह्य वाटते आणि तो आवाज हा त्या गाण्याचा अविभाज्य घटक असतो, इतका की तिचा आवाज आणि गाण्याचा भाव जणू तद्रुप होतात; पण तरी तो आवाज भावावर कुरघोडी करत नाही. ही तारेवरची कसरत तिची तीच करू जाणे...

'वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह, आज यूँ मिलते हैं जैसे कभी पहचान न थी' दोघं काही गैरसमजुतीमुळे एकमेकांपासून दुरावतात तेव्हा हा दुरावा कसा दूर करावा न उमजल्यामुळे नुसत्याच जुन्या आठवणींवर दिवस काढायची जेव्हा वेळ येते तेव्हाही सगळ्यांत जास्त दुःख कशाचं होतं तर,

देखते भी है तो यूँ मेरी निगाहों में कभी
अजनबी जैसे मिला करते हैं राहों में कभी
इस कदर उनकी नज़र हम से तो अंजान न थी

याचं जास्त होतं! एकेकाळी एकमेकांवर जीव जडलेला, एकमेकांशिवाय एक-एक क्षण युगासारखा वाटायचा आणि आज अचानक भेट झाली तरी जणू दोन अनोळखी व्यक्तींच्या पहिल्या भेटीसारखं त्यानी आपल्याकडे बघावं - प्रेयसीसाठी यासारखी दुसरी जीव तोडणारी गोष्ट नसेल! मदन मोहनच्या चालीचं सोनं करावं तर ते 'तिनी'च! 'अकेली मत जईयो' या चित्रपटातल्या या संपूर्ण गाण्याची लय, मंद स्वरात मनातली वेदना गुणगुणल्यासारखा गोड आवाज - त्या प्रेयसीचं दुःख किती नेमकेपणानी पोहोचतं आपल्यापर्यंत!

तर दुसऱ्या टोकाला पती मृत्यूच्या छायेत वावरतोय आणि त्यानी मृत्युला सामोरं जाताना आपल्या पत्नीकडून एक वचन मागितलं - आपल्या मृत्यूनंतर तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर तिने पुनर्विवाह करावा. या विचित्र परिस्थितीत त्या स्त्रीच्या मनातली खळबळ, काळजाचे तट् तट तुटणारे धागे, जुन्या सुखद आठवणी आणि कितीही नाकारावंसं वाटलं तरी समोर दिसणारं ढळढळीत सत्य अशा गुंत्यात सापडलेली पत्नी पतीला सांगते, 'हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है, खो बैठे। तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाअो, भूल जाअो'.

सपनों का दर्पन देखा था, सपनों का दर्पन तोड़ दिया
ये प्यार का आंचल हम ने तो दामन से तुम्हारे बाँध लिया
ये ऐसी गाँठ है उल्फत की जिसको ना कोई भी खोल सका
तुम आन बसे जब इस दिल में दिल फ़िर तो कहीं ना ड़ोल सका
अो प्यार के सागर, हम तेरी लहरों में नाँव ड़ुबो बैठे
तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाअो, भूल जाअो

मला हे गाणं अशासाठी भावतं की गाण्यातून ती पत्नी एकप्रकारे कबुली देते की एकेकाळी मी दुसऱ्या कोणावर प्रेम केलं होतं, पण तुझी झाल्यापासून माझ्या तन-मनात फक्त तूच भरून राहिला आहेस आणि आता तू जे मागतो आहेस ते केवळ अशक्य आहे. प्रेमाचा त्रिकोण असंख्य रूपातून आपल्यासमोर येतच आला आहे. पण पुर्वाश्रमीचं प्रेम लग्नाच्या होमात समर्पण करून पतीबरोबर एकदा सात पावलं टाकल्यावर भारतीय स्त्रीला पतीशिवाय दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा - मग तो आधीचा प्रियकर का असेना - आपल्यासंदर्भात उल्लेख किती असह्य होतो; ते शब्द, चाल, पडद्यावर मीनाकुमारीचा अभिनय आणि 'तिचा' आवाज हे रसायन या सगळ्या भावना आपल्यापर्यंत किती नेमकेपणाने पोहोचवतात! कधी वाटतं याची उत्कटता समजायला स्त्रीचं, त्यातूनही भारतीय स्त्रीचं मन हवं. प्रेमाचं हे रूप अगदी निराळं - वेदना, मृत्यूचं भय याहूनही इथे त्या पत्नीचं निस्सीम प्रेम साथीला असलेल्या सतारीसारखं मनात झंकारत राहतं. चित्रपट 'दिल एक मंदीर'.

आणि 'दिल दिया, दर्द लिया' मधलं हे दुःखद प्रेमाचं आणखी निराळंच रूप. आपल्याच भावाने प्रियकरावर अनन्वित अत्याचार करून त्याला मरणाच्या खाईत लोटून दिलं, लग्न त्याच्या पसंतीच्या माणसाबरोबर ठरवलं, सगळी दौलत उधळून टाकली आणि एक दिवस अचानक प्रियकर आला, नुसता आला असं नाही, तर प्रचंड श्रीमंती कमवून आला आणि सगळ्यांत वाईट गोष्ट म्हणजे प्रेयसीबद्दल गैरसमज आणि त्यातून उद्भवलेला तिरस्कार मनात काठोकाठ भरुन आला. या सगळ्या समीकरणात बिचाऱ्या प्रेयसीला ना भावाने समजून घेतलं, ना ज्याच्याबरोबर लग्न ठरलं त्याने आणि सगळ्यावर कळस म्हणजे ज्याच्यावर जीव अोवाळून टाकला तो प्रियकर तर घालून-पाडून बोलायची आणि दुखवायची एकही संधी सोडत नाही. तरीही प्रेयसीचं मन मात्र म्हणत राहतं, 'फ़िर तेरी कहानी याद आयी, फ़िर तेरा फ़साना याद आया। फ़िर आज हमारी आँखों को इक ख्वाब पुराना याद आया'

जलते हैं चिराग़ों की सुरत, हर शाम तेरी हम यादों में
जब सुबह को शबनम रोती है, खो जाते है हम फ़रियादों में
जब दिल ने कोई आवाज़ सुनी, तेरा ही तराना याद आया

'तिच्या' आवाजात त्या प्रेयसीचं सगळं दुःख कसं ठसठशीतपणे जाणवतं! सगळी तडफड, सगळं दुःख, सगळा मनस्ताप आणि या सगळ्यापासून मनानेच दूर गेलेला प्रियकर आणि त्याच्या मनात भरलेला अंगार - या सगळ्यात मूकपणे जळतेय ती फक्त नायिका. असं म्हणतात की अंगात तीन ताप असतानासुद्धा 'तिनी' या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. 'तिच्या' बाबतीत या अशा कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास बसावा इतकी तिची तपस्या नक्कीच आहे.

सलीम-अनारकलीची प्रेमकथा भलेही ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीला उतरत नसेल, पण तरी ती प्रेमकथा चित्रपटनिर्मात्यांना आणि प्रेमिकांना सतत भुरळ घालत आली आहे. सी. रामचंद्रांनी 'अनारकली' एवढ्या एकाच चित्रपटाला संगीत दिलं असतं तरी ते अनेक जन्मं पुरण्याइतकं पुण्य होतं, पण हा तर त्यांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटांच्या हारातला एक - फारतर आपण त्याला हारातील रत्नजडीत पदक म्हणू... एका युद्धात जखमी झालेला सलीम जीवन-मरणाच्या रेषेवर अधांतरी रेंगाळत असताना कुठूनतरी हवेवर तरंगत आलेल्या अनारकलीच्या आवाजाने त्याला थोडी शुद्ध येते, तेव्हा बादशाह अनारकलीला शोधून आणवून मुलाला पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी गाणं म्हणायला सांगतो; पण त्याला तेव्हा हे कुठे ठाऊक असतं की अनारकलीच्या रूपाने त्याने सलीमची ज़िंदगीच त्याच्यासमोर पुन्हा उभी केली आहे... सलीमला त्या अवस्थेत पाहून अनारकलीच्या तोंडून बाहेर पडतं

'दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर।
वफ़ाअों का मजबूर दामन बिछाकर। दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर।।
जो बिजली चमकती है उनके महल पर।
वो कर ले तसल्ली मेरा घर जलाकर। दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर।।'

गाण्याचा मुखडाच किती काळजाला हात घालतो! जर विजेला कुणाचं तरी घर जाळून समाधान मिळणार असेल तर माझं जळू दे, पण माझ्या प्रियकराचं घर शाबूत राहू दे!

सलामत रहे तू, मेरी जान जायें।
मुझे इस बहाने से ही मौत आयें।
करूँगी मैं क्या चंद साँसें बचाकर।।

१९५३ सालचा 'तिचा' आवाज म्हणजे पुरणपोळीवर सुधारस घालून ती आमरसात बुडवून खाल्ली तरी गोडीला कमीच पडेल. शैलेंद्रसारख्या हळव्या कवीच्या शब्दांना, सी. रामचंद्रांच्या अवीट चालीला आणि चित्रपटातील प्रसंगाला पूर्ण न्याय मिळायचा असेल तर केवळ 'तिचा'च आवाज हवा.

१९५७ साली मधुबाला आणि अशोक कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला एक अगदी वेगळ्या विषयावरचा चित्रपट आला होता 'एक साल'. ब्रेन ट्युमरमुळे जेमतेम एक वर्षाचं आयुष्य बाकी असलेल्या आपल्या एकुलत्या एका आणि तरुण मुलीचं ते शेवटचं वर्ष आनंदात जावं म्हणून तिचे वडिल एका माणसाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगतात आणि त्याला विनंती करतात की त्याने त्यांच्याकडे नोकरी करण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री करुन तिला डॉक्टरकडे जायला आणि उपचारासाठी तयार करावे. तिला आपल्या आजाराची काहीच कल्पना नसल्याने ती डॉक्टरचं नाव काढलं तरी भडकायची. दुर्दैवाने मॅनेजर म्हणून नोकरीला येताना अशोक कुमारचा वेगळाच बेत असतो. मुलीवर प्रेमाचं नाटक करायचं, वर्षभरात ती जाणार, तेव्हा हळुहळु सगळी दौलत ताब्यात घ्यायची या उद्देशाने तो येतो खरा, पण निरागस, प्रेमळ, सुंदर अशा मधुबालाच्या तो कधी खरंच प्रेमात पडतो ते त्यालाही कळत नाही. अशोक कुमारच्या तोंडी असलेलं 'सब कुछ लुटा के होश में आयें तो क्या किया' जवळपास सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. पण अशोक कुमारचं खरं रूप समजल्यावर याच मुखड्याचं गाणं मधुबालावरही चित्रीत झालं, ते मात्र दुर्दैवाने 'भुले-बिसरे गीत' मध्ये शोभून दिसेल. 'तिच्या' आवाजातलं हे गाणं या पंक्तीत जावं यासारखी वाईट गोष्ट नसेल कारण गाणं निव्वळ अप्रतिम आहे. 'तिनी' ते फारच छान म्हटलं आहे हे सांगायची गरजच नाही!

न पुछो प्यार की हम ने जो हकीकत देखी
वफ़ा के नाम पे बिकते हुए उल्फ़त देखी
किसी ने लुट लिया अौर हमें खबर ना हुई
खुली जो आँख तो बरबाद मुहोब्बत देखी

सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया
दिन में अगर चराग़ जलाए तो क्या किया

मैं वो कली हूँ जो न बहारों में खिल सकी
वो दिल हूँ जिसको प्यार की मंज़िल न मिल सकी
पत्थर पे हमने फूल चढ़ाए तो क्या किया

जो मिल न सका प्यार ग़म की शाम तो मिले
इक बेवफ़ा से प्यार का अंजाम तो मिले
ऐ मौत जल्द आ ज़रा आराम तो मिले
दो दिन ख़ुशी के देख न पाए तो क्या किया

मुखड्याच्या आधीच्या अोळी, मुखडा आणि पहिलं कडवं ऐकलं की कधी डोळ्यांत टचकन् पाणी येतं आपल्यालाही कळत नाही. गाण्याचे शब्द, चाल सुंदर आहेच पण माझ्यासाठी तरी ही जादू केवळ 'तिच्या' आवाजाची... दुसऱ्या कडव्यात 'तिचा' आवाज हळुहळु जो काही चढत राहतो त्यानी अंगावर सर्रकन् काटा उभा राहतो! सुर जागचा न ढळता आवाजाची इतकी मोठी झेप घेणारा दुसरा आवाज मला तरी माहीत नाही! ते दुसरं कडवं ऐकताना अक्षरशः हृदय हलतं. आवाजात इतका दर्द कुठून आणते 'ती' हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे.

'तिची' गाणी हा वीक पॉईंट असणाऱ्या हजारो लोकांपैकी मी एक. थोडं टोकालाच जातं ते प्रेम कधी-कधी; म्हणजे 'तिनी' अमक्यावर अन्याय केला, हे चुकीचं केलं नि ते... पण मी प्रेम करते ते तिच्या आवाजावर, गाण्यांवर, प्रत्येक भावना अचूकपणे माझ्यापर्यंत पोहोचवण्याच्या ताकदीवर, केवळ उर्दू शब्दांचे उच्चार बिनचूक व्हावेत म्हणून ती भाषा शिकण्याच्या तिच्या निष्ठेवर... त्यामुळे हे बाकीचे टीकाकारांचे मुद्दे खरंतर माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत; म्हणजे ऐकू येतात, कधी मी हिरीरीने वादही घालते पण शेवटी मला काय त्याचे, हेच खरं. आयपॉड सुरू करावा तर नेमकं सुरू होतं 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' आणि या अोळीनंतर जेव्हा लता म्हणते 'तुम अपने चरणों में रख लो मुझको, तुम्हारे चरणों की धूल हूँ मैं। मैं सर झुकाये खड़ी हूँ प्रीतम, के जैसे मंदीर में लौ दीये की' तेव्हा दिवसभर ते गाणं पाठलाग करतं ते उगीच नाही!

प्रकार: 

खूप छान! अगदी मनातलं! एखादं गाणं असंच झपाटून टाकतं एकेका वेळेस... आणि मग घुमत राहातं मनात. हे गाणं तर लतादीदी आणि हेमंतदांच... केवळ उच्च!
आणि अशी अनेक गाणी रोज भेटतातच.. हे एक आणखी मस्त! Happy

'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की'

हे शब्दसुर कानी पडले की गाभा-यात तेवत असलेली पणती येते डोळ्यासमोर आणि मन अगदी शांत होते.... काव्यातले भाव संगीतात आणि आवाजात अगदी अचुक उमटलेत.

>>हे शब्दसुर कानी पडले की गाभा-यात तेवत असलेली पणती येते डोळ्यासमोर आणि मन अगदी शांत होते.... >>काव्यातले भाव संगीतात आणि आवाजात अगदी अचुक उमटलेत.

अगदी अगदी ! हे गाणे रात्री बेला के फूल मधले शेवटचे गाणे असते अनेकवेळा. Happy

ओए मस्तच लिहले.... Happy

अगदी अगदी ! हे गाणे रात्री बेला के फूल मधले शेवटचे गाणे असते अनेकवेळा...

हो महेश, मी पण ऐकले बरेच वेळा

देखणा असा संपूर्ण लेख वाचल्याक्षणी मनी वाटले की, हा लेख अधिक सुंदर की ज्या गाण्यासाठी इतके प्रदीर्घ लेखन केले ते गाणे लेखाहून मधुर ? अत्यंत तन्मयतेने लिहिलेला लेख आहे हा. बर्‍याच वेळा आपण गाण्यांच्या आठवणीत हरवून जातो आणि सहसा बोलताना "अरे लताने म्हटलेले 'एहसान तेरा होगा मुझपे' अधिक श्रवणीय का रफीने म्हटलेले ?" असे म्हणतो आणि मग दोघाचौघात दोघापैकी कोण श्रेष्ठ अशी नित्याची चहाच्या कपाभोवतालची वादावादी सुरू होते. दुसर्‍या दिवशी दुसरे गाणे...परत तोच खेळ. पण असे काही एखाद्या गाण्याबद्दल लिहिलेले वाचायला मिळाले की वाटते या लेखिकेने केवळ याच कारणासाठी 'मायबोली' वर सतत यावे.

लेखात उल्लेख केलेली सर्वच्यासर्व गाणी ऐकली आहेत, व्हिडिओवर पाहिली आहे, पण आज या निमित्ताने पुन्हा एकदा 'एक साल' मधील अत्यंत देखण्या दिसणार्‍या मधुबालेला लताच्या आवाजात "सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया..." मुद्दाम पाहिले आणि आठवले तिचेच 'जानेवालेसे मुलाकात ना होने पायी....' नजरेसमोर आले.

संगीताच्या आकाशात कलेकलेने लताचा आवाज गुंजत राहिला आणि तो चंद्रमा कधीच ढळला नाही. लेखाच्या शेवटी प्रिया म्हणतात "दिवसभर ते गाणं पाठलाग करतं ते उगीच नाही..." तेच शेवटी खरे.

[या क्षणी योगायोगाने प्रिया राजवंश यानी पडद्यावर म्हटलेले लताचे 'जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं वो वो तो नही...' हे दर्दभरे गाणे विविध भारतीवर लागले आहे. या गाण्यातील

:....छुप के सिने मे कोई जैसे सदा देता है,
शाम से पेहले दिया दिल का जला देता है...."

या ओळी तर अक्षरशः जीवघेण्याच आहेत.]

मस्त मस्त मस्त!
तुम्ही ऐकले नसेल तर लतानी गायलेल्या गालिबच्या गजला ऐकाच, विशेषतः 'कोई उम्मीद बर नही आती'.

लेख मस्तच.. @आगाऊ +१

मला लताची "आंख से आंख मिलाता है कोई" गजल प्रचंड म्हणजे प्रचंड आवडते..

प्रिया, सुंदर लेख..

आता ही गाणी आणि लेख मनात रेंगाळणार दिवसभर.
ऐकताना वाटतं, हे सगळं आपल्याला जाणवतं किंवा ऐकल्यावर मनात जे उभं राहतं तसं दुसर्‍यांना पण जाणवत असेल का? आणि असं वाचल्यावर वाटतं मलापण हे असंच 'भावतं' हे लिहिणार्‍यापर्यंत पोचेल का आपल्या प्रतिक्रियेतून...

(दमदार पुनरागमन.)

प्रिया
छानच लिहिलंस .
हेमंतकुमार यांचा आवाज खरंच अगदी गाभार्‍यातून आल्यासारखा वाटतो. आणि
छुपा लुं यूं दिलमे. ..............हे तर ऑल टाइम फेवरेट.

लेख आवडला. मला स्वतःला लता पेक्षा आशाची गाणी आणि आवाजातले वैविध्य या गोष्टी जास्त आवडतात. पन वर लेखात उल्लेख केलेल्या गाण्याचे शब्द आवडलेत. त्यामुळे ही गाणी नक्की ऐकणार. (वरील पैकी फक्त एखाद-दोनच गाणी माहीत आहेत)

(अवांतरः लेखात सगळीकडे "तिनी" असा उल्लेख आहे. ते "तिने" असं हवंय ना!)

खूप आवडतं गाणं आहे हे. म्हणजे झाले. रात्रीचे आजोबा रेडिओ लावायचे व आम्ही आजूबाजूला एकत बसायचो.
शब्द तेव्हा कळत न्हवते पण एकायला मस्त वाटायचे. आज घरी जावून एकून.

प्रिया, कित्ती दिवसांनी ग! Happy इथे लेख वाचूनच गाणं ऐकू येतंय आणि माझाही ते नक्कीच पाठलाग करणार आहे आता..सुरेख लिहिलंस. असेच आणखी लेख लिहून मालिका करावी ही विनंती!

तिची' गाणी हा वीक पॉईंट असणाऱ्या हजारो लोकांपैकी मी एक. थोडं टोकालाच जातं ते प्रेम कधी-कधी; म्हणजे 'तिनी' अमक्यावर अन्याय केला, हे चुकीचं केलं नि ते... पण मी प्रेम करते ते तिच्या आवाजावर, गाण्यांवर, प्रत्येक भावना अचूकपणे माझ्यापर्यंत पोहोचवण्याच्या ताकदीवर, केवळ उर्दू शब्दांचे उच्चार बिनचूक व्हावेत म्हणून ती भाषा शिकण्याच्या तिच्या निष्ठेवर...>>>>> +१

मंडळी, खूप मनापासून आभार! मायबोलीवर हे असं काही मी कधी लिहिलं नाही, फार वर्षांपुर्वीही (म्हणजे मायबोलीवर साधारण दर अर्ध्या तासाने चक्कर टाकल्याशिवाय जेव्हा चैन पडत नसे तेव्हाची गोष्ट) माझं लिखाण म्हणजे अंताक्षरीच्या फलकांपुरतंच मर्यादित होतं, लोकांनी छान-छान लिहीलेलं वाचलं की वाटायचं कसं बुवा जमतं हे असं लिहीणं! आता वरच्या तुमच्या प्रतिक्रिया वाचून क्षणभर मलाही उगीचच वाटलं - जमलं बरं का आपल्याला पण Lol पण लगेचच लक्षात आलं की हे कौतुक माझं असलं तर ते केवळ मायबोलीमुळे जुन्या, काही प्रिय गाण्यांची आठवण करुन द्यायला एक माध्यम मिळालं त्यामुळे आहे. खरं श्रेय आणि कौतुक 'तिचं'...

अमेलिया, दिनेश, चिंगी, साधना, महेश, स्मितू - धन्यवाद!
अशोक - निःसंशय 'तिची' गाणीच जास्त मधुर... 'अमर' मधलं 'जानेवाले से मुलाकात' आणि 'हकीकत' मधलं 'ज़रा सी आहट'... तुमची प्रतिक्रिया वाचल्यापासून छळ होतोय नुसता - कसल्या जीवघेण्या गाण्यांची आठवण काढलीत!
आगाऊ, लंपन, शैलजा, मंदार_जोशी - तुमचेही आभार.
गजा - तुझ्या प्रतिक्रियेतून तुला हे 'भावलं' हे नक्की पोहोचलं; पण त्यात आश्चर्य ते काय? तुझी गाण्यातली आवड माहिती आहे. खरंच - तुझा एक लेख उधार आहे माझ्याकडे... करते पूर्ण.
मानुषी, शिल्पा, झंपी, मितान, मनस्मी - धन्यवाद.
निंबुडा - प्रतिक्रियेबद्दल आभार. व्याकरणदृष्ट्या तुम्ही म्हणता तसे 'तिने' जास्त योग्य पण मला वाटतं बोलीभाषेत 'तिनी' असं रूपही वापरलं जातं. तसं नसेल तर क्षमस्व.
स्मिता - खरंच ग! खूप दिवसांनी आलेय... आणि हो, ब्लॉगवर मालिका असं नव्हे पण आणखी एक-दोन लेख लिहीले आहेत गाण्यांवर... जमलं तर मेल पाठव...

लेख आवडल्याचं आवर्जुन कळवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार!