मायबोलीवर अमराठी गोष्टींवर चर्चा करण्यासाठी नक्की निकष काय?

Submitted by HH on 9 April, 2012 - 13:56

बी यांनी वाचू आनंदे मधे उघडलेला अमराठी कवितांवरचा धागा बंद झालेला दिसला. त्यामुळे हा प्रश्न मनात आला. जिथे हा धागा बंद केला आहे त्याच ग्रुपमध्ये हॅरी पॉटर वर तब्बल ६००+ पोस्ट आहेत. डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकांवर गप्पा असाही धागा दिसतो. ईतरही अनेक अमराठी पुस्तकांवर चर्चा आहे. गायनी कळा ग्रुप मधे हार्डरॉक कॅफे तर पूर्ण इन्ग्रजी गाण्यांवरच आहे. उपग्रह वाहिनी या ग्रुप मधे बीबीसी व ईतर अमेरिकन सिरियल्स अशा नावाचा बीबी उघडण्यात आला होता तोही जिवंत आहे. चित्रपट ग्रुप मधेतर ९०% चित्रपट धागे हिंदी चित्रपटांवर आहे. हे सगळे चालते तर अमराठी कवितांचा बीबी का नाही चालला? नक्की निकष काय आहेत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी चा त्रागा योग्यच आहे. ही वेबमास्तरांची पोस्ट आहे बी च्या बीबीवर

>>webmaster | 5 April, 2012 - 21:04
इतर भाषांसाठी नेटवर बर्‍याच जागा आहेत. मायबोलीच्या साधनांचा फायदा शक्यतोवर आपल्या मायमराठीला व्हावा असा प्रामाणिक प्रयत्न आहे. दर १-२ वर्षांनी हा असा धागा निघतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या धोरणाला अनुसरून हा धागा बंद करतो आहोत.>>

ह्यातली धोरणं कुठे स्पष्ट केली आहेत का? आणि यापूर्वी ही असे कोणते धागे निघाले होते?

HH, बी चा बाफ बंद झालेला पाहून मलाही हाच प्रश्न पडला होता.
'इंग्रजी चित्रपट' असाही एक बाफ आहे वेगळा. इंग्रजी पुस्तकांवरची परिक्षणही बर्‍याच जणांनी लिहीली आहे वाचू आनंदे मध्ये. मग ह्याच बाफ ला काय प्रॉब्लेम होता कळले नाही.

हह , सायो , मेधा , महागुरु , पराग + १.
एकाला एक नियम आणि दुसर्‍याला दुसरा नियम करण्याचा काय उपयोग आहे ?

>बी यांनी वाचू आनंदे मधे उघडलेला अमराठी कवितांवरचा धागा बंद झालेला दिसला
हा धागा इंग्रजी कवितेचा म्हणून बंद केला आहे.
> तुम्हाला जर चांगल्या चांगल्या ईंग्रजी कविता माहिती असतील तर त्याचे दुवे वा काही ओळी इथे द्याव्यात.
या धाग्यावर ईंग्रजी कवितेचे रसग्रहण नसून फक्त काही ओळी द्यावी अशी अपेक्षा होती.

>बायदवे बी ने वाचू आनंदे मध्ये धागा उघडला नसून कविता मध्ये होता.

या कारणासाठी नक्कीच हा धागा बंद केला नाही. हे कारण असते तर तो धागा आम्ही योग्य तिथे हलवला असता.

याबाबतचं धोरण असं आहे.

१) मायबोलीवर सगळ्या भाषांना एकाच तराजूनं तोललं जाणार नाही. मराठीचं पारडं सगळ्यात जड, त्यानंतर इतर भारतीय भाषा आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी. हे लिहायला मला कुठेही अवघड जात नाही कारण मायबोलीचा जन्मच त्यासाठी आहे. सगळ्या भाषांना समानता मिळावी म्हणून नाही. इंग्रजी आता भारतीय भाषा आहे असं कुणी म्हणालं तरी इंग्रजी, विशेषतः इंग्रजी साहित्य, इथे शेवटचं. कारण इंग्रजी साहित्यासाठी नेटवर इतरत्र भरपूर जागा आहे. एकदा सगळ्या भाषा इथे सारख्या नाही हे लक्षात घेतलं तर बरेचसे मुद्दे निकालात निघावेत.

२) रसग्रहण करणे आणि सरळ सरळ काही ओळी लिहणे यात फरक आहे. या आधिही जेंव्हा फक्त उर्दू गझला, फक्त हिंदी गाण्यांचा संग्रह यासाठी धागे निघाले तें बंद केले आहेत. इतर भाषेतल्या गोष्टींबद्दल मराठीतून लिहलं जातं, त्याचं रसग्रहण केलं जातं त्यामुळे या गोष्टी मराठीत येत आहेत म्हणून त्यांचं आपण स्वागत केलं. चित्रपटांबद्दलचं, पुस्तकांबद्दलचं, टीव्ही शों बद्दलचं लेखन रसग्रहण या सदरात मोडतं. आता मायबोलीचा पसारा वाढल्यामुळे काही अमराठी भाषेतले धागे (जे रसग्रहण नाहीत) चुकून अजून चालू असणे शक्य आहे, ज्यांच्याकडे अजून माझं लक्ष गेलं नाहीये.

३) हिंदी अनंताक्षरी हा वाहता धागा एक अपवाद म्हणून चालू ठेवला आहे. पण हिंदी विनोद, इंग्रजी विनोद, फक्त उर्दू गज़ला, हिंदी चारोळ्या, उर्दू शेर, इंग्रजी लिमरिक्स, इंग्रजी कार्टून्स (तसेच्या तसे टाकलेले), इंग्रजी पुस्तकांची नुसती यादी यांसाठी असलेले धागे आपण यापूर्वी बंद केले आहेत. यात फक्त कविता याच वाङमयप्रकाराला सापत्नभाव दिलेला नाही.

४)एका भाषेतून दुसरी भाषा शिकवणारे धागे आहेत पण त्यातली एक मराठी आहे म्हणूनच.

५) तांत्रिक विषयांवर इंग्रजीत लेखन चालू आहे ते नाईलाजाने. तिथेही काही जण शक्य तेंव्हा मराठी लिहत असतात हे स्वागतार्ह आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते चालू ठेवले आहे. एक उदा: गुंतवणूक या विषयावर मराठीत लिहलं जावं/वाचलं जावं म्हणून Investments वर इंग्रजीत लिहणं चालू आहे.

पण हा नियम कवितांना लावता येणार नाही. मराठी कविता केल्या जाव्या/वाचल्या जाव्या म्हणून इंग्रजी कवितांची गरज नाही.

६) मला वाटतं आपण सगळ्यांनी मायबोलीचा मूळ हेतू लक्षात घ्यावा. यात काही बाबतीत आमच्याकडून सगळ्याच बाबतीत सुसुत्रता किंवा सुस्पष्टता राहिली नसेल याची कल्पना आहे. आणि काही बाबतीत ती येणारही नाही. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आहोत.

व्वा! गुरुजी, अचूक (नि पटण्याजोगे) विश्लेषण दिलेत Happy

>>>> मायबोलीवर सगळ्या भाषांना एकाच तराजूनं तोललं जाणार नाही. मराठीचं पारडं सगळ्यात जड, त्यानंतर इतर भारतीय भाषा आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी. हे लिहायला मला कुठेही अवघड जात नाही कारण मायबोलीचा जन्मच त्यासाठी आहे. <<<
हेच हे वाक्य अन त्यातला आशय, केवळ या एका साईटीपुरता मर्यादित न रहाता, यच्चयावत "महाराष्ट्रीय लोकान्चे" जीवनाचाच एक भाग बनला तर? पण असो. या एका वाक्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.

वेमांचे पटले.
मराठीचे पारडे सगळ्यात जड, मग मराठीच्या इतर बोलीभाषा (अहिराणी, मालवणी इत्यादी), मग मराठीला सगळ्यात जवळ असलेल्या किंवा एकेकाळी मराठीची बोलीभाषा म्हणून गणल्या गेलेल्या (कोकणी सारख्या) भाषा, मग इतर भारतीय भाषा आणि मग परदेशी भाषा... अशी अजून तपशीलात चळत लावायलाही हरकत नाही. Happy

मायबोलीवर सगळ्या भाषांना एकाच तराजूनं तोललं जाणार नाही. मराठीचं पारडं सगळ्यात जड, त्यानंतर इतर भारतीय भाषा आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी. >> म्हणूनच तर येतो मायबोलीवर - निदान मी तरी.

मुद्दा पटला.

वेमा, अगदी पटलं.
मराठीशी नातं जोडणारे संकेतस्थळ म्हणून मी याकडे बघतो. नाहीतर दिवसभरात
(घरचा फोन सोडल्यास ) मला कुणाशीही मराठी बोलता येत नाही. मायबोलीमूळेच
हे मराठीशी नाते टिकून राहिलेय.

"मराठीच पारड सगळ्यात जड !!" साठी टाळ्या. वेबमास्तरांच म्हणण बरचस पटल,पण मी त्यांच्याशी थोडासा असहमतही आहे. मायबोली एक समृध्द संकेतस्थळ आहे ते अधिकाधिक समृध्द व्हाव याकरता अस खिडक्या बंद करण मला बरोबर वाटत नाही. मराठीच पारड जड करायच तर अधिकाधिक चांगल लेखन मायबोली वर आल पाहिजे. त्याकरता जगात 'जे जे उत्तम ,उदात्त , उन्नत महन्मधुर' आहे ते ते सगळ -साहित्य; कला; विज्ञान; संगीत; क्रीडा- मराठीत/मायबोलीवर आल पाहिजे,आपल्याला त्याचा परिचय झाला पाहिजे, त्या साठी मायबोलीच्या लेखकांना ते माहित व्हायला हव. त्यावर त्यांच्या मराठीत चर्चा (रसग्रहणच हव असा आग्रह नसावा ) घडाव्या. माहिती तंत्रज्ञानातली ही जी क्रांती झाली आहे होते आहे तिचा लाभ घेउन मराठी माणसाच जीवन समृध्द करणार्‍या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात मायबोली सारख्या संकेतस्थळानी महत्वाच स्थान मिळवायला हव. मला मराठी साहित्यिकांच अनुभव विश्व तोकड आहे / असत अशी केली जाणारी टीका आठवते. माटे मास्तरांनी या समस्येच उत्तर फार पूर्वीच देउन ठेवलय. विविध पेशांमधली मराठी माणस जेव्हा लिहू लागतील तेव्हा हे अनुभवविश्व आपोआप विस्तारेल अस ते म्हणायचे. हेच आता मायबोलीवर होत नाहीये का? जगातल्या उत्तम कविता उत्तम पुस्तक उत्तम संगीत याचा परिचय होउन कोणाला अनुवाद करावेसे वाटतील , कोणी प्रेरणा घेउन स्वतंत्र नवनिर्मिती करेल मायबोली वर नवनवीन उत्तमोत्तम लेखन होत राहील.म्हणून अस धागे बंद करण वगैरे नको करायला अस मला वाटत. (बंद करण्या साठी 'शिमगाधागे' येत असतातच त्यांच्याकडे लक्ष ठेवणे व ते मर्यादा ओलाडू लागताच बंद करणे हेच काम वेबमास्तरांकरता खरतर खूप आहे Happy )

ओह.. बी चा बाफ नाही पाहिला.. त्यामूळे नेमकी त्याचा "फोकस" काय होता हे माहित नाही.
(बी- तुझ्या रंगीबेरंगी वर असे ईतर भाषेतील टेक्स्ट चे लिखाण चालू शेकल असे वाटते.)
वेबमास्टर,
त्याबद्दल देखिल काही निकष आहेत का? अर्थात प्रयत्न शक्यतो मराठी लिहीण्याचाच असावा पण रंगीबेरंगीवर ईतर भाषेतील चालेल का- नियम म्हणून नाही तर अपवाद म्हणून?

बाकी वर लिहीलेले वेबमास्तरांचे एकंदरीत स्पष्टीकरण पटते आहे.

पुर्णपणे नाही पटले.
श्रीकांतजींशी सहमत !

@श्रीकांत
>मला मराठी साहित्यिकांच अनुभव विश्व तोकड आहे / असत अशी केली जाणारी टीका आठवते.
>विविध पेशांमधली मराठी माणस जेव्हा लिहू लागतील तेव्हा हे अनुभवविश्व आपोआप विस्तारेल

जेंव्हा स्थळकाळाच्या मर्यादा होत्या तेंव्हा या विधानांची गरज होती. कारण कुणीतरी ते "तिकडून" (त्या अनुभव विश्वातून) "इकडे" (मराठी माणसाच्या अनुभव विश्वात) आणणं गरजेचं होतं. सगळ्यांनाच "तिकडे" जाऊन अनुभव घेणं शक्य नव्हतं. मी "तिकडे" हा शब्द अनुभव विश्वासाठी वापरतोय. कुठले एक स्थळ्/ठिकाण/कालावधी इथे अपेक्षीत नाही.

आता जर एका टिचकी सरशी "तिकडे" जाऊन अनुभव घेणं शक्य असतानाही, सगळं तिकडचं इकडेच आणा
हे म्हणणं कितपत योग्य आहे? किंवा असं करून आपण त्या मराठी माणसाला एका अर्थाने पांगळे बनवू का? त्याचं अनुभव विश्व त्याने तिकडेच जाऊन जास्त समृद्ध होणार नाही का? याचंच एक टोकाचं रुप मायबोलीवर पुष्कळदा दिसतं. उदा. मी "क्षयज्ञ" या पानावर आहे. पण मला पाककृतींच्या पानावर जाऊन शोधायचा कंटाळा आलाय, तेंव्हा मला इथेच पटकन त्या सांगा असे प्रतिसाद मी पाहीले आहेत. तेंव्हा मायबोलीवरचं जे जे सगळं चांगलं ते सगळं या "क्षयज्ञ" या पानावर आलं पाहिजे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल का? किंवा मायबोलीवरच्या अबक ग्रूपचा मी सभासद आहे. गमभन या ग्रूपचा सभासद एका टिचकीसरशी होणे शक्य असतानाही, आणि त्या ग्रूपमधे अमुक तमुक विषय लिहणे योग्य असतानाही मी तो इथेच अबक ग्रूपमधे लिहणार असेही लिहले जाते. हे त्यासारखेच अयोग्य नाही का?

आता ज्यांना भाषेच्या अडचणीमुळे "तिकडे" जाता येत नाही त्यांच्या साठी "तिकडचं" अनुवादीत करून "इकडे" आणलं पाहिजे असं म्हटलं तर ते योग्य होईल आणि आमचाही तोच प्रयत्न आहे. पण "तिकडचं" त्याच भाषेत इकडे आणून ते होणार नाही.

>> वेबमास्टर, तुमची भूमिका स्पष्ट झाली दोन्ही पोस्टींमधून
हो.

"आवडलेल्या अमराठी कवितांवर (मराठीतून) चर्चा" अशा प्रकारचा धागा चालला असता असं दिसतंय. आणि बहुधा बीचा धागा तसाच झाला असता, नाव जरा धोरणाने ठेवायला हवं होतं.

दोन्ही बाजु पटत आहेत. एका खाजगी संकेतस्थळावर कुठल्या प्रकारचे विषय हाताळावेत हा निकष लावण्याचा अधिकार प्रशासनाकडे असावा. याउलट कुठल्याही विषयावर मायबोलीवर येऊन चर्चा कराविशी वाटणे यात मायबोलीचेही यश आहे असे मी समजतो. असे कित्येक विषय आहेत ज्यासाठी कितीतरी मोठी संकेतस्थळे/फोरम्स उपलब्ध आहेत पण इतर मायबोलीकरांबरोबर या सर्व विषयांवर चर्चा करण्याची मजा वेगळीच. काय चालेल आणी काय नाहित याचे नियमही कालानुरुप बदलत जाणारच. एके काळी खेळासाठी वेगळे बाफ काढण्यास बंदी होती आता बरेच बाफ दिसतात.

>> कुठल्याही विषयावर मायबोलीवर येऊन चर्चा कराविशी वाटणे यात मायबोलीचेही यश आहे असे मी समजतो. असे कित्येक विषय आहेत ज्यासाठी कितीतरी मोठी संकेतस्थळे/फोरम्स उपलब्ध आहेत पण इतर मायबोलीकरांबरोबर या सर्व विषयांवर चर्चा करण्याची मजा वेगळीच.

+ १०० ! Happy

नात्या +१ उत्तम पोस्ट! Happy
वेल सेड लिहीलं होतं आधी पण मग जमावानी धुवून काढलं असतं मला, म्हणून बदललं Proud

Pages