दारु सोडवायची आहे

Submitted by हर्ट on 6 April, 2012 - 05:22

नमस्कार. हा विषय सुरु करताना खरे तर मला फार फार शल्य वाटत आहे पण हा कुणाच्या तरी आयुष्याचा आणि त्या व्यक्तीच्या संसाराचा प्रश्न आहे. माझा भाऊ वयाच्या ३० व्या वर्षापासून खूप खूप दारु पितो. त्याला ही सवय त्याच्या काही मित्रांनी लावली. त्यावेळी आम्ही अगदी लहान लहान होतो. त्याला टोकले तो आणखीनच पिऊन यायचा. त्याची पहिली पत्नी निवर्तली. तिच्यापासून त्याला एक मुलगी पण आहे. तिला खरे तर आम्हीच लहानाचे मोठे केले. भावाचे दुसरे लग्न करुन देणे खूप गरजेचे होते. पण मधे बहिणींचे क्रम होते. तरीही मी त्याचे दुसरे लग्न स्वतः त्याच्याकरिता मुली बघून त्याच्या वयाची ४० पुर्ण झाल्यानंतर करुन दिले. त्याचे दारुचे व्यसन इतके विकोपाला गेले को तो रोज २४ तास नशेतच वावरतो. आता नोकरी सोडली. चांगला पोलिस ईन्स्पेक्टर होता. पण नोकरी सोडली. बायको त्याच्यासोबत राहू शकली नाही. ती काही वर्षांपासून तिच्या माहेरीच असते. कारण हा तिला सारखे मारायचा, रागवायचा, उठसुट भांडणे करायचा. वहिनी अगदी सुसंस्कृत घरातली आहे. मला कायम गिल्ट येत असते की मी का भावाचे लग्न करुन दिले. चुक तर नाही ना केली? पण एक आशा होती की तो लग्नानंतर दारु सोडून देईन वा कमी तरी करेन. आता वहिनी माहेरी गेल्यानंतर फक्त आई आणि तोच घरी एकटा राहतो. तर त्याने आईलाही त्रास देणे, छळ करणे सुरु केले. दारुच्य नशेत तो अगदी अमानुष होतो. इतका की वाटत नाही हा आपला भाऊ आहे. मी आता आईला कायमस्वरुपी माझ्याकडे आणायचा निर्णय घेतला आहे. सगळे जण म्हणतात माझा भाऊ दारुच्या नशेत नसताना अत्यंत देवमाणूस असतो पण ऐरवी तो राक्षसच असतो. माझ्या भावाची मुलगी आता २२ वर्षाची होत आहे. काही वर्षांनी तिच्या लग्नाबद्दल आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आईचे म्हातारपण जवळ येत आहे. सगळे काही असून फक्त दारुपायी आमचे घर खिळखिळे होत आहे.

मला इथे काही मार्गदर्शन मिळेल का? असे विषय समाजात आपण फार उजेडात आणत नाही. कारण बदनामीची भिती असते. पण इथे मला माझे घर, माझ्या भावाचे उर्वरीत आयुष्य, पुतणीचे भविष्य ह्या सगळ्यांचा विचार करावयाचा आहे.

आपल्या महाराष्ट्रात खास करुन विदर्भात दारु मुक्ती संस्था आहेत का? मला माझ्या भावाला काही महिने तिथेच ठेवून बघायचे आहे. जर कुणाला काही संस्था माहिती असतील किंवा दारुवर उपचार करणारे दवाखाने माहिती असतील तर मला त्यांचे पत्ते द्या.

ह्या पुर्वी भावाने एकेठिकाणी उपचार करणे सुरु केले होते पण तो म्हणे की ती औषध घेतली की त्याचे पोट फार खोलवर दुखते आणि दारु प्यायली की एकदम बसते. त्याला दारु हेच आता एक औषध वाटायला लागले आहे. एकीकडे माझी कर्करोगाने ग्रस्त झालेली ताई आहे. तिचा उपचार आहे. एकीकडे भाऊ आणि त्याची दारु आहे. ह्यामधून जाताना माझे काय होत आहे हे मी लिहू शकत नाही.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तान्गण मधे आजच्या घडीला माझा रक्ताचा नातेवाईक आहे. खूप क्रॉनिक केस आहे. पण प्रयत्नपूर्वक त्याची दारू सुटली आहे. मधे गतवर्षी रिलॅप्स झाल होते, आता गेल्या ८ म. पासून ठीक आहे. त्याची पत्नी तिथेच घर घेऊन राहू लागली. तो अजूनही दिवसभर मु. मधे असतो. रात्री घरी येतो.. ठीक चाललय अजून्तरी.. Happy
तुम चा भाऊ पण निश्चीत बरा होईल. पण जितके दुखणे जुने तितका वेळ लागेल तेव्हा चिकाटी सोडू नका..
तुम्हाला शुभेच्छा.. Happy

बी, ही महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती केंद्रांची यादी : http://deaddictioncentres.in/state/maharashtra/

ही नागपुरातील : http://deaddictioncentres.in/?city=nagpur&state=maharashtra

तुला शुभेच्छा!!!

नंदिनी, पोस्ट्स आवडल्या.
बी, इथे सगळ्यांनी खूप छान सल्ले दिलेत. तेव्हा नविन लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही. तुला आणि तुझ्या कुटुंबियांना शुभेच्छा!

सर्वांनी जे सांगितलंय त्यापेक्षा वेगळे काही सांगण्यासारखे नाही माझ्याकडे. पण कधीही मदत लागली तर बिनदिक्कत सांग. विशेषतः तुझ्या पुतणीच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन आणि त्यासंदर्भात मदत करायला मी कधीही तयार आहे. जरूर कळव.

Sad सर्वांनी उपयुक्त माहिती दिलेली आहेच. तुमच्या भावाला यातुन बाहेर पडण्यासाठी माझ्या मनापासुन शुभेच्छा.... मी परिस्थिती पुर्ण समजतो. एका प्रमाणानंतर या प्रकाराकडे एक आजार म्हणुन पहावा असे मला वाटते. तसेच घरांत असणार्‍या लहानग्यांवर या प्रकाराचे दुरगामी मानसिक परिणाम होतात त्यांना वेगळ्या मॅचुरिटीने हाताळावे लागेल. पुनश्च शुभेच्छा.

बेफिकीर यांच्या सर्व पोस्टांशी सहमत.

बेफिकीर यांच्याशी सहमत

बी तुम्ही मदत मागताय आणि मी अस काही लिहीणं चुकीचं असेल पण मला वाटतं मी इतक्यात तुमच्या बहिणीसंबंधीची पण एक पोस्ट वाचली होती..जर तुम्ही दोघं एकच व्यक्ति असाल (म्हणजे ही माझी शंका नाहीये पण मला इथे आय डी कशाप्रकारे चालतात यात जास्त काही माहिती नाहीये म्हणून हे लिहिते आहे) तर मला असं वाटतं की तुम्ही या दोघांसाठी जे करताय ते योग्य असणार आणि तुम्ही ते कराल पण एक आण़़खी गोष्ट लक्षात घ्या की या सर्व गोष्टी करताना तुम्हाला स्वत:चं मानसिक स्वास्थ्यही जपायला हवंय्...तुमच्या आजुबाजुला तुमची स्वतःची सपोर्ट सिस्टीम असेल पण एक वाचक म्हणून इतकं सांगावंसं वाटतंय्...बाकी खूप जणांनी मदतीच हात दिला आहे आणि मला ते सगळं करणं कदाचित जमणारही नाही कारण तुमचे प्रश्न ज्या व्यक्तींशी संबंधीत आहेत त्या मायदेशात आहेत्..पण तुम्ही तुमचीही काळजी घ्या.....
शुभेच्छा....

बी वाचून सुन्न झाले. पण याही परिस्थितीतला तुझा पॉझिटिव द्रुष्टिकोन बघून बरं वाटलं. मनापासून प्रयत्न कर , नक्कीच काहीतरी चांगलं होईल. तुला वर सगळ्यानी बरेच चांगले सल्ले दिले आहेत. वेगळं काय लिहू. पण मुक्तांगण मधून बाहेर आल्यावर तुझ्या भावाला खूप मोठी सपोर्ट सिस्टिम लागेल. तू आई ला तुझ्याकडे नेणार म्हणतोस मग त्याच्याकडे बघायला कोण असेल तिथे नंतर? कारण इतकं जुनं व्यसन म्हटल्यावर तो तिथे एकटाच असला तर रिलॅप्स व्हायचा चान्स जास्त.

बी.......तू कुठल्या मन:स्थिती आहेस ह्याचा फक्त विचारच करु शकतेय आणि त्या विचारानेसुद्धा अस्वस्थ झालेय. तू इतक्या संयतपणे हे सगळं सांभाळतो आहेस.......तुझं कौतुक वाटतं. इतक्या लहान वयात सगळ्या जबाबदार्‍या किती समर्थपणे सांभाळतो आहेस तू.... !! हॅट्स ऑफ !!

वर वेकांनी म्हटल्याप्रमाणे तू तुझी स्वतःचीही काळजी घे रे...... !!

कुवेतमधे रहात असल्यामुळे भारतातल्या संस्थांबद्दल अजिबातच माहिती नाहीये. पण ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकते.

खर तर दारु सोडणे हे दारू पिणार्‍याच्याच इच्छाशक्तीवर अवलंबून आहे.
----- पिणारा हा मानसिक रितीने कमजोर आहे.... त्याची इच्छाशक्ती कशी वाढवता येईल, वाढवण्यासाठी काय करायला हवे ?

कुठल्याही अट्टल दारुबाज व्यक्तीला तो जे काही करत आहे ते चुक आहे हे समजत असते, पण त्या दृष्टचक्रातुन बाहेर कसे पडावे हे कळत नाही, तेथे तो कमजोर पडतो. दारु पिल्यावर केलेल्या राक्षसी कृत्याची त्याला जाण होते आणि म्हणुन शुद्धीवर आल्यावर तो मुलांशी, आसपासच्या लोकांशी जास्तच प्रेमाने (देवमाणुस) वागतो.... येथे देवमाणुस होणे, असणे हा उद्देश नसतो तर काल आपण चुकीचे वागलो अशी अपराधी पणाची भावना असते. मनावर नियंत्रण ठेवण्यात कमी पडतात आणि पुन्हा काही तासानंतर त्यांची ओठ दारुसाठी ताहानले होतात. हे चक्र आहे. बहुतेक वेळी त्यांना या मधुन बाहेर पडायचे असतेच... पण मानसिक बळ कमी पडते.

प्रत्येक मनुष्याची केस वेग्-वेगळी असू शकते... Each case is unique. कुणाला कुठे आणि कोणत्या स्वरुपांत ते मानसिक बळ (प्रेरणा) मिळेल हे सांगता येत नाही... प्रयत्न करत रहायचे. शुभेच्छा.

बी, आणखी एक. तुमच्या भावाला जे पेन्शन दर महिन्याला मिळते ते त्याला डायरेक्ट न मिळता बँकेत तुमच्या आणि त्याच्या जॉईंट खात्यावर जमा होत राहिल असं काही करता येईल. त्याकरता पोलिस खात्यातल्या अधिकार्‍यांना भेटून, त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन हे करता येऊ शकेल. सहज पैशाचा मार्ग खुंटेल.

सरकारी पेन्शनचे खाते जॉईंट करता येते? माझ्या मते असे करता येत नसावे, (कुणी गैरफायदा घ्यायला नको म्हणुन) कायदे किचकट आहेत. वैद्यकीय कारणाने जर खातेदार व्यक्ती असमर्थ असेल तर व्यावहाराचे सर्व हक्क (Authority Letter) कुणा तिसर्‍या व्यक्तीला (येथे भावाला) देता येत असावे... पण यासाठी खातेदाराची पुर्ण संमती असावी लागते.

स्पष्ट मत :
बी तुम्ही कितीही प्रयत्न करुन भावाची दारु सोडवु शकत नाही ...त्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील . ( आमच्या एका मित्राने त्याच्या भावाची दारु सोडवायचा प्रचंड प्रयत्न केला पण ते जमले नाही कारण भावाची ती इच्छाच नव्हती ...शेवटी वेगळा संसार थाटला अन ह्याला वार्‍यावर ( की दारुवर) सोडुन दिले )

आता ज्याला स्वतःला दारु चे व्यसन सोडायचे आहे त्याला ३ उपाय ( अनुभवाचे बोल )

१) दारुचे व्यसन लागुच न देणे
२) "दारु हे व्यसन आहे" हे विसरुन जाणे
३)स्वतःचा एक क्लास ठरवुन घेणे उदा. "ग्रीनलेबल्च्या खाली पिणार नाही " वगैरे .

( स्वानुभव : तीसरा उपाय हमखास काम करतो )

ग्रीनलेबल्च्या खाली पिणार नाही >>> राणाजी म्हणजे नक्की काय?

सर्वांचे खूप खूप आभार. आता आम्ही मुक्तांगणात भावाला दाखल करत आहोत. हा निर्णय तरी नक्की घेतला आहे.

ग्रीन लेबलच्या किंमतीमुळे त्यांना असे म्हणायचे आहे की एका विशिष्ट किंमतीखालची व्हिस्की वा इतर दारू मी घेणार नाही. (हेही होण्याच त्या व्यक्तीचाच निग्रह लागतो) . असे झाल्यास माणूस आपोआप कमी घेऊ लागतो (असे त्यांना म्हणायचे आहे).

बी, इथले प्रतिसाद वाचून तूला नक्कीच बळ मिळाले असेल. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा
तुझ्या आणि तूझ्या भावाच्या पाठिशी आहेत.

मुक्तांगण हि एंक अत्यंत नावाजलेली संस्था आहे, उत्तम काम करतेय पण केवळ तिथे ठेवलं म्हणजे तुमचा भाऊ सुधारेल अशा भ्रमात राहू नका.
आमचा एंक अत्यंत चांगला मित्र दारूमुळे दोन लहान मुल आणि बायको मागे ठेवून १ वर्षापूर्वी वयाच्या ३५शित गेला. त्याला मुक्तांगण मध्ये ठेवले होते. घराची गडगंज श्रीमंती आहे. घरच्यांना वाटायचे मुक्तांगणात तो व्यसनापासून दूर आहे, परंतु तिथेही त्याला पैशाच्या जोरावर दारू मिळत होती, तिथून आल्यावर तर विचारायलाच नको. तेव्हा तुमच्या भावाला पैसे मिळणार नाहीत याची काळजी घ्या.

दारू घरादाराची वाट कशी लावते ते लहानपणापासून बघतेय. माझे सक्खे काका मित्रांमुळे दारू प्यायला लागले आणि घरच्यानी आयुष्यभर भोगले. अनेक उपाय केले पण कशाचाही उपयोग झाला नाही. मध्यानातरी काकूला एका डॉक नि एंक पावडर दिली. ती चहातून द्यायची. ती खाल्ली कि दारू प्यायल्यावर उलट्या होतात, माल्मालायला लागते आणि आपोआप दारू कमी होते आणि सुटते. काकांची दारू पूर्णपणे सुटली इतकी कि विश्वाशी बसणार नाही हा माणूस पूर्वी दारू पिऊन रस्त्यवर पडायचा. ( डॉक चा नाव पत्ता मिळाला तर नक्की सांगेन )

तुम्हाला नाउमेद करायचा माझा हेतू नाही, केवळ तुम्हो योग्य ती काळजी घ्यावी म्हणून सांगते आहे. शुभेच्छा...!

मी जरा प्रांजळपणे बोलतोय. तारतम्य -म्हणजे कुठे काय बोलायचे याला कॉमन सेन्स म्हणतात. जर मी कँसर हॉस्पिटल्मध्ये गेलो तर तिथल्या रुग्णास वा त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही म्हणाल काहो- काही उपयोग नाही-इथे कालच माझे एक मित्र गेले- -----. मग ज्या केसेस कडे पाहून इलाज चालू असतात्,दुर्दम्य आशवादावर प्रयत्न चालू असतात व अनेक वेळा यश मिळाले ही असते- त्याचे काय- --- काही ही उपयोग नाही ,असे म्हणून काय कमावतो आपण?- याला स्पष्ट्वक्ते पणा म्हणणारे म्हणोत बापडे -पण मग सकारत्मकतेचे काहीच स्थान नाही का??
--बी -नक्की उपयोग होणार - इफ यु थिंक यु कॅन्-यु कॅन -अन इतिहास याला साक्षी आहे!!!!

रेव्यु, अनुमोदन. वरच्या पोस्टस वाचताना तेच वाटलं अगदी. परिस्थितीत फरक पडेल नाही तर नाही पडेल पण आशावादाने आजचा दिवस तर चांगला जाईल आणि प्रयत्नांनाही बळ येईल.

बी, मदत कशी आणि कोणत्या प्रकारे करु शकते ते कळत नाहीए, पण देवाजवळ प्रार्थना नक्की करेन.

बी शुभेच्छा.. योग्य निर्णय. मीमराठी त्या डॉ. चा नावपत्ता नक्की इथे लिहा. हा बीबी वाचुन बर्‍याच जणांना भविष्यात (अशी वेळ येऊ नये पण दुर्दैवाने आलीच तर) उपयोग होईल.

बी,
फारच दिव्य रे...
तुझ्या भावाच्या व्यसनमुक्ती साठी शुभेच्छा व तुझ्यासकट सर्व कुटूंबीयांच्या मानसिक स्वास्थ्य यासाठी आमच्या प्रार्थना आहेतच. तरिही तुझी ही कौटूंबीक अडचण कमी करण्यात कुठल्याही प्रकारची मदत माझ्याकडून होवू शकत असेल तर बिनदिक्कत कळव. देशात नसलो तरी जमेल ती मदत करायचा प्रयत्न करेन.

बाकी यातील थेट अनुभव असलेली मंडळी तुला निश्चीत योग्य मार्ग दाखवतीलच.

रच्याकने: तुझ्या पुतणीचे महान कौतूक वाटले रे.. अशाही परिस्थितीत तीने शिक्षणात मिळवलेले प्राविण्य हे तीच्या हुशारी बरोबरच खंबीर व कणखर व्यक्तीमत्वाची साक्ष देणारेच आहे. तेव्हा तिचा भविष्यकाल निश्चीतच उज्वल आहे याची खात्री आहे.

Pages