दारु सोडवायची आहे

Submitted by हर्ट on 6 April, 2012 - 05:22

नमस्कार. हा विषय सुरु करताना खरे तर मला फार फार शल्य वाटत आहे पण हा कुणाच्या तरी आयुष्याचा आणि त्या व्यक्तीच्या संसाराचा प्रश्न आहे. माझा भाऊ वयाच्या ३० व्या वर्षापासून खूप खूप दारु पितो. त्याला ही सवय त्याच्या काही मित्रांनी लावली. त्यावेळी आम्ही अगदी लहान लहान होतो. त्याला टोकले तो आणखीनच पिऊन यायचा. त्याची पहिली पत्नी निवर्तली. तिच्यापासून त्याला एक मुलगी पण आहे. तिला खरे तर आम्हीच लहानाचे मोठे केले. भावाचे दुसरे लग्न करुन देणे खूप गरजेचे होते. पण मधे बहिणींचे क्रम होते. तरीही मी त्याचे दुसरे लग्न स्वतः त्याच्याकरिता मुली बघून त्याच्या वयाची ४० पुर्ण झाल्यानंतर करुन दिले. त्याचे दारुचे व्यसन इतके विकोपाला गेले को तो रोज २४ तास नशेतच वावरतो. आता नोकरी सोडली. चांगला पोलिस ईन्स्पेक्टर होता. पण नोकरी सोडली. बायको त्याच्यासोबत राहू शकली नाही. ती काही वर्षांपासून तिच्या माहेरीच असते. कारण हा तिला सारखे मारायचा, रागवायचा, उठसुट भांडणे करायचा. वहिनी अगदी सुसंस्कृत घरातली आहे. मला कायम गिल्ट येत असते की मी का भावाचे लग्न करुन दिले. चुक तर नाही ना केली? पण एक आशा होती की तो लग्नानंतर दारु सोडून देईन वा कमी तरी करेन. आता वहिनी माहेरी गेल्यानंतर फक्त आई आणि तोच घरी एकटा राहतो. तर त्याने आईलाही त्रास देणे, छळ करणे सुरु केले. दारुच्य नशेत तो अगदी अमानुष होतो. इतका की वाटत नाही हा आपला भाऊ आहे. मी आता आईला कायमस्वरुपी माझ्याकडे आणायचा निर्णय घेतला आहे. सगळे जण म्हणतात माझा भाऊ दारुच्या नशेत नसताना अत्यंत देवमाणूस असतो पण ऐरवी तो राक्षसच असतो. माझ्या भावाची मुलगी आता २२ वर्षाची होत आहे. काही वर्षांनी तिच्या लग्नाबद्दल आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आईचे म्हातारपण जवळ येत आहे. सगळे काही असून फक्त दारुपायी आमचे घर खिळखिळे होत आहे.

मला इथे काही मार्गदर्शन मिळेल का? असे विषय समाजात आपण फार उजेडात आणत नाही. कारण बदनामीची भिती असते. पण इथे मला माझे घर, माझ्या भावाचे उर्वरीत आयुष्य, पुतणीचे भविष्य ह्या सगळ्यांचा विचार करावयाचा आहे.

आपल्या महाराष्ट्रात खास करुन विदर्भात दारु मुक्ती संस्था आहेत का? मला माझ्या भावाला काही महिने तिथेच ठेवून बघायचे आहे. जर कुणाला काही संस्था माहिती असतील किंवा दारुवर उपचार करणारे दवाखाने माहिती असतील तर मला त्यांचे पत्ते द्या.

ह्या पुर्वी भावाने एकेठिकाणी उपचार करणे सुरु केले होते पण तो म्हणे की ती औषध घेतली की त्याचे पोट फार खोलवर दुखते आणि दारु प्यायली की एकदम बसते. त्याला दारु हेच आता एक औषध वाटायला लागले आहे. एकीकडे माझी कर्करोगाने ग्रस्त झालेली ताई आहे. तिचा उपचार आहे. एकीकडे भाऊ आणि त्याची दारु आहे. ह्यामधून जाताना माझे काय होत आहे हे मी लिहू शकत नाही.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तांगण फार प्रभावी आहे असे ऐकले आहे.
परिचयातली एक व्यक्ती ( वय ५०) दारुच्या व्यसनापासून पूर्णपणे मुक्त झाली आहे.

बी. माझ्यातर्फे तुला इमोशनल सपोर्ट. मी तुझी मनःस्थिती समजू शकते.
पुण्यात मुक्तांगण संस्था आहे तिथे नेता येइल. तसेच त्यांचा मेडिकल चेकप करवायल हवा. लिव्हर सिरॉसिस असू शकतो. त्यांना कोणी ही एनेबल करू नये जसे आई दारू प्यायला पैसे देत असेल तर ते बंद करायचे. असे करताना दु:ख होते पण इलाज नाही. आई व पुतणीस शक्यतो वेगळे राहता आले तर बरे. मुलगी तरूण आहे तिच्यावर परिणाम होऊ नये म्हणून. तिचे नाव रोहिणी वधुवर संस्थेत नोंदवता येइल.
माझी मैत्रिण तिथे काम करते. तू धीर सोडू नकोस.

बी इतेह चौकशी करा http://www.muktangan.org/
खूप नावाजलेले सेंटर आहे हे..साधारण ४ ते ५ मह्नियाची वेटिंग असते सतत, पण त्यांच्याशी बोलून बघा आणि case किती critical आहे ते पण सांगा

ह्याने नक्कीच तुमचा प्रश्न सुटायला मदत होईल

मामी, आई भावाशी प्रेमाने पण कडकच राहते. ती त्याला पैसे देत नाही. तो मागतही नाही. पण त्याला स्वतःची पेन्शन मिळते. ती तो देशी दारुवर उधळतो. शिवाय देशी दारु स्वस्त असते.

भावाची मुलगी आता पदवीसंपन्न होत आहे. MIT, Pune इथे मी तिला BCA ला दाखल केले होते. पुण्यात राहून तिने खूप छान प्रगती केली आहे. फ्रेन्च, जर्मन भाषा शिकली. Sun Certified Java Architecture वगैरे सारखे कोर्सेस पण पुर्ण केले. आणि बहुतेक तिला आता सिंगापुरच्या National University of Singapore मधे पदव्युत्तर करण्यासाठी प्रवेश मिळू शकेल. मी तिच्यासाठी इथे अर्ज केला आहे. आई, पुतणी आणि मी असे आम्ही तिथे मग एकत्र राहू. होप की आईला इथे लाँग टर्म विसा मिळेल. सध्या तीन महिन्यांचा विसा मिळाला आहे. पुतणीला Student Visa मिळेल. सांगायचे तात्पर्य हे की मी पुतणीला मुद्दाम घरापासून दुर ठेवले. मला तिची प्रगतीच साधायची होती. ती मला माझीच मुलगी/बहिण वाटते.

तुमची हकिकत वाचून खूप वाईट वाटले. यावर उपाय सातत्याने करावे लागतील,

त्याला आनंद नाडकर्णी किंवा अनिल अवचटांच्या संस्थेत पूर्णवेळ अ‍ॅडमिट करून तिथे ठेवावे लागेल.ही लिंक पहा http://www.muktangan.org/admission.html
Dr. Anand Nadkarni, Thane West, Thane4 avg rating5 ratings, 13 user reviewsCategory: Doctor
Phone: (022) 25433270
Address: 9th Floor, Shree Ganesh Darshan, Wing A-2, LBS Road, Naupada, Thane West, Thane- 400601, Maharashtra
त्याला लौकर व्यसनमुक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना

पुण्याला मुक्तांगण मध्ये घेउन जा. हमखास गुण येतो. डॉ. अनिल अवचट व त्यांच्या पत्नी कै. डॉ. सुनंदा अवचट ह्यांची संस्था. आता त्यांची मुलगी मुक्ता पुणतांबेकर चालवते. पु. ल. देशपांडे नी ह्याला सुरुवाती ला अर्थ सहाय्य केले होते.

http://www.muktangan.org ही वेब साइट पहा

माझा अनुभव म्हणजे माझ्या आई कडे एक कामवाली होती. तीचा नवरा प्रचंड दारु प्यायचा. तुम्ही वरचे वर्णन केले आहे ना.. तस्साच. तिने त्याला मुक्तांगण मध्ये घेवुन जाउन त्याची दारु सोडवुन आणली. माझ्या आईनेच तिला तसे सुचवले होते.

आम्हाला हे माहीती असायचे कारण म्हणजे पुर्वी आम्ही जीथे रहायचो त्याच इमारती मध्ये कै. डॉ. सुनंदा अवचटांचे माहेर होते. त्यांचा अंत कँसर ने झाला. तरीही ही संस्था अजुनही जोरात सुरु आहे.

ठाण्याला डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांची आय.पी.एच. ही संस्था ही आपली मदत करु शकेल.
http://www.healthymind.org/

गीतु, हो मी याआधी अनिल अवचटांचे मुक्तांगणावरचे लेख वाचले आहेत. आम्ही मुळचे अकोल्याचे म्हणून पुण्यापर्यंत प्रयत्न करणे जमले नाही. कारण तेंव्हा भावाची नोकरी होती. त्याची बायको तेंव्हा त्याच्यासोबत होती. सगळे काही सोडून मुक्तांगण मधे त्याला ठेवणे अवघड वाटले. एकतर त्याच्याशी बोलणे.. संवाद साधणे ही फार अवघड गोष्ट आहे. त्यात त्याला फक्त उपदेश करुन मुक्तांगणमधे जा असे सांगूण काही साध्य होणार नाही. पण आता वेळच अशी आली आहे की हेही करुन बघावे लागणार आहे.

बी, धीर सोडू नकोस. या परिस्थितीला तू नक्कीच जबाबदार नाहीस.
त्या व्यक्तीची ठाम ईच्छा असे, तर व्यसनमुक्ती सहज शक्य आहे. त्यंच्या मुलीला पुढाकार
घेऊन हे करावेच लागेल. आईला तूझ्याकडे आणण्याचा विचार योग्यच आहे
अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस या संस्थेचे कार्यालय तिथे असेलच.
औषधाने पोटाला त्रास होतो हे निव्वळ नाटक आहे. वेळप्रसंगी तूम्ही अत्यंत कठोर होणे गरजेचे आहे

किती कठोर व्हायचे याचे एक उदाहरण देतो. एकदा माझ्या मित्रांनी मला पाजायचा घाट घातला.
त्यासाही माझ्याच एका जिवलग मित्राला भरीला घातले. तो एवढा प्रामाणिक कि त्यांने मला सरळ
हे सांगितले, आणि म्हणाला एक घोट तरी घे, माझ्यासाठी, माझी शपथ आहे.
त्यावेळी मला त्याच्या प्रामाणिकपणाचा आनंद पण झाला, पण त्याला मी सरळ सांगितले, या
कारणासाठी मेलास, तरी मला वाईट वाटणार नाही.. आजही तो पितोच पण मला आग्रह करायची
हिम्मत करत नाही. आम्ही आजही मित्र आहोत.

या लेखावर काही लिहावेसे वाटत आहे.

१. माझे पहिले मत असे आहे की फोरम्सवर फारशी मदत मिळणार नाही. हे नकारात्मक असले तरी माझ्यामते योग्य आहे. अशा ठिकाणी काही पत्ते, फोन नंबर्स, काही सिमिलर अनुभव, सहानुभुती व काही माहीत असलेले उपाय सांगितले जातील. परंतु निग्रह आपल्या बंधूंचा आवश्यक आहे.

२. आपण सारे कुटुंबीय आपल्या आईंना तेथे आजवर का ठेवू देत होतात याची कारणे जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी निगडीत असतील तर ठीक, अन्यथा आईंना तेथे ठेवणे माझ्यामते (थोडे स्पष्ट लिहितो, माफी असावी) अतिशय चुकीचे आहे. इन फॅक्ट मुलीलाही. आणि दुसरे लग्न करणे / करून देणेही. सॉरी.

३. आपला भाऊ दारूपुढे लढाई हारलेला आहे. मनात कितीही वाटत असले तरी त्यांना नशेची आवश्यकता भासल्यावर सुविचार त्यागावेच लागत असणार. अनेक संस्था अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी असतातच. मात्र (पुन्हा) आपल्या बंधूंची तशी तयारी हवी व निग्रह हवा.

४. मदिरापानाचा छंद जोपासण्यासाठी आवश्यक अशी आर्थिक परिस्थिती आहे की नाही याबदल आपल्या लेखात काही आढळले नाही बहुधा. त्यांना पैशांची इतरांकडून गरज भासत नाही काय?

५. दुर्दैवाने, आपल्या रक्ताच्या नात्यातील एक व्यक्ती या परिचयाच्या परिघाबाहेर प्रत्येक माणसाचा एक परिचय असतो तो म्हणजे 'एक शरीर'. आपल्या बंधूंचे शरीर पूर्णपणे मद्यावर अवलंबून आहे असे दिसत आहे. यातून सुटकेसाठी पराकोटीचा निग्रह व आधार आवश्यक असावा. निग्रह त्या व्यक्तीचा आणि आधार कुटुंबियांचा.

६. बी, सर्वात महत्वाचे. जगातील प्रत्येक माणसाला काय हव असते? मनःशांती, सुबत्ता आणि कीर्ती! आपले बंधू कीर्ती घालवून बसलेले आहेत. यावर सर्वात सुंदर उपाय म्हणजे अशा माणसाची स्तुती करणे. त्याच्यासमोर सर्वांना सांगणे, 'बघा, आज सकाळपासून त्याने घेतलेली नाही. त्याने ठरवले तर तो काहीही करू शकतो. कदाचित तो एखाददिवस तुम्हाला फक्त रात्रीचीच घेऊनही नीट वागून दाखवेल. अहो शेवटी तो एक पोलिस अधिकारी आहे. त्याच्यासारखा ठाम माणूस कोण असणार दुसरा? केवळ एक छंद म्हणून तो घेतो इतकेच. त्याला कधीही दारू सोडता येईल हे आम्हाला माहीत आहे आणि तुम्हालाही ! नाही का?' स्तुतीइतका दुसर्‍या कशाचाही परिणाम होत नाही , एक्सेप्ट वैद्यकीय उपायांची गरज असलेला प्रश्न असला तर.

धन्यवाद व स्पष्ट मते मांडल्याबद्दल पुन्हा क्षमस्व!

-'बेफिकीर'!

बी, एकटे पालक आधार गट तर्फे मी तुझ्या भावाच्या मुलीची मावशी/ मामी बनून तिला भावनिक सपोर्ट देण्यास कधीही तयार आहे.

अल्कोहोलस अ‍ॅनानिमस किंवा मुक्तांगण या संस्थेत या समस्येविषयी मार्गदर्शन केले जाते. 'अल्कोहोलस अ‍ॅनानिमस' ही संस्था बहुतेक सर्व मोठ्या शहरात आहे.

बी, सर्वात आधी प्रॉब्लेम समजून घेतलास त्याबद्दल शाबासकी. तुझी सध्याची अवस्था मी समजू शकते. धीर सोडू नकोस. सर्व ठिक होइल.

दारूड्या माणसाला कायम बदनामीच्या नजरेनेच पाहिले जाते. समाज हे लक्षात घेत नाही, की "दारू" हा देखील एक आजारच असू शकतो. या आजारावरती उपचार करण्याचे सोडून लोक भलतेच उपचार करत बसलेले असतात आणि त्यामुळे कित्येकदा उशीर होतो. तुझ्या भावाला जेव्हा दारू पिण्याची अति सवय लागली होती तेव्हाच तू जर एखाद्या उत्तम व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेला असतास तर बरे झाले असते. अजूनही अर्थात वेळ गेलेली नाही. त्याला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा. व्यसनाधीन माणसाला आपण करतो आहेत ते चूक करतो आहेत हे माहित असतं, त्याचे मन अपराधीपणाने त्याना खात असतेच आणि या अपराधीपणातून बाहेर पडण्यासाठी परत व्यसनाचाच आधार घेतला जातो. असे हे दुष्टचक्र असते.

सर्वात आधी भावाला एखद्या फिजीशीअनला/न्युरोलॉजिस्टला दाखव, सर्व टेस्ट्स करवून घे. त्यानंतर औषधोपचार चालू कर मात्र कुठल्याही "अमुक दिवसात दारू सोडवा" टाईप जाहिरातींच्या बहकाव्यात तर अजिबात येऊ नकोस.

मुक्तांगण ही उत्तम व्यसनमुक्ती संस्था आहे. मला काही जवळच्या लोकांमुळे या संस्थेचा अनुभव आहे. शक्य झालंतर त्याला पुण्याला घेऊन जा. ते अगदीच शक्य नसेल तर पुण्यातल्या संस्थेशी संबंध साधून विदर्भामधे त्यांचे कुणी कार्यकर्ते आहेत का ते बघ. नक्की असावेत कारण दापोलीसारख्या छोट्या शहरामधून देखील आहेत.

मुक्तांगणचा एक महिनाभर कोर्स असतो आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे असते ते म्हणजे फॉलो अप. महिन्या दोन महिन्यानी पुण्यात जाऊन अथवा अल्कोहोलिक अ‍ॅनोनिमसच्या मीटिंगना जाऊन येणे खूप गरजेचे.

आईला तू तुझ्याकडे आणत आहेस ही चांगली गोष्ट. पुतणीसाठी आधी तिचे शिक्षण पूर्ण होऊ दे, ती तिच्या पायावर उभी राहू दे आणि मग तिच्या लग्नासाठी प्रयत्न चालू करा. सद्य परिस्थितीमधे त्या लेकराला सर्वात जास्त गरज भावनिक आधाराची आणि मानसिक खंबीरतेची आहे.

येस्स मीरा, मुक्तान्गण हा उपाय आहे.
बी, मुक्तान्गण वाल्याना सगळी कल्पना दे, त्यान्च्या सल्ल्याने व त्यान्नी तयारी दाखवली की, सरळ त्याला उचल अन त्यान्च्याकडे आणून सोड, मग दीड महिन्याने घेऊन जा परत. व्यसनाचा एकन्दर दीर्घ कालावधी बघता सुरवातीला दर महिन्याला नेऊन आणणे, दरवर्षी अ‍ॅडमिट करणे असे गरजेनुसार करता येईल. Happy

खुप वाईट वाटले सारे वाचुन....आपण कोणत्या दिव्यातुन जात आहत त्याची पण कल्पना आली..
पण नक्कि काय सुचवावे हे न कळल्याने गप्प बसणे ईष्ट.
आपली हि समस्या लवकरात लवकर दुर व्हावी व जिवनात आंनंद यावा हिच त्या दया घनाच्या चरणी प्रार्थाना

बेफिकिर, धन्यवाद. काही उत्तरे....मी इथे केवळ ह्याचसाठी लिहित आहे जेणेकरुन दारुमुक्ती संस्थांची मला माहिती मिळेल. मला स्वतःला सहाणूभुती वगैरे ह्याची चिड आहे. कारण त्यानी समोरची व्यक्ती आणखी दुबळी होऊ शकते. भावाची आर्थिक स्थिती चांगली आहे. माझी आई आमचे घर सोडून कुठेच जायला तयार नसते. म्हणजे एक दोन दिवस कुणाकडे इतपत ठिक आहे पण आपले घर सोडून इतर ठिकाणी राहणे तिला पसंत पडत नाही. आणि कुणकडे कायमस्वरुपी कुठे ठेवणार हाही प्रश्न आहेच. ताईंकडे आई जातच असते पण जावयांकडे सासू किती दिवस राहणार ना. इतके दिवस आईला मी परदेशात आणले नाही. आता मात्र मी निग्रह करुन आईचा पासपोर्ट बनवून तिचा विसा काढून झाला आहे. तिला इथेच आणायचे आहे. भावाचा पुनर्विवाह हा विचारविनिमय करुनच मी केला. माझ्या वहिनींचाही पुनर्विवाहच आहे. दोन समदु:खी व्यक्तीना मी एकत्रित आणले.

मनोनिग्रह वगैरे सर्व आपल्यासारख्या धडधाकट माणसाला ठिक आहेत. पण पूर्णपणे दारूच्या कचाट्यात गेलेल्या माणसाला ते शक्य होत नाही. कारण त्या वेळेला शरीर पूर्णपणे दारूवर अवलंबून असते. दारू न मिळाल्यास withdrawl symptoms सुरू होतात. यामधे संपूर्ण शरीर कापणे, हॅल्युसिनेशन्स, अतिशय हिंसक होणे वगैरे प्रकार असतात. इथे सर्व मनोनिग्रह बाजूला पडतात कारण "शरीर" मनावर सत्ता गाजवत असते. शरीरातील प्रत्येक पेशी त्या क्षणी दारूची मागणी करू लागते. त्या व्यक्तीला त्या क्षणी दारू न मिळाल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. ही लक्षणे आढळून येऊ नयेत म्हणून काही खास औषधे असतात ज्यामुळे शारिरीक दृष्ट्या दारूच्या या क्रेव्हिंगवरती कंट्रोल मिळवता येतो.

एकदा का शरीराला दारू नकोशी झाली की प्रश्न उरतो तो मनाच्या निग्रहाचा. त्यासाठी मात्र जबरदस्त कौटुंबिक साथ, योग्य दिशा दाखवणारे मित्रमंडळ आणि चोवीस तास धाक ठेवणारी व्यक्ती असणे फार गरजेचे असते. कारण व्यसनाधीन व्यक्ती कधीही स्लिप होऊ शकते.

व्यसनाधीन माणसाचे व्यसन एका दिवसात सोडवू शकत नाही. ही टप्प्याटप्प्याने गाठायची प्रक्रिया असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य आहार आणि योग्य मानसिक साथ आवश्यक असते.

खर तर दारु सोडणे हे दारू पिणार्‍याच्याच इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. दुसरा कोणी त्याला चार चांगल्याच्या गोष्टी सांगण्याव्यतिरीक्त काहीही करु शकत नाही. "दहा दिवसात पिणार्‍याला न सांगता दारू सोडवा" अशा जाहीराती वर्तमानपत्रात अनेक वेळा दिसतात, पण त्याने काही फरक पडत असेल असे वाटत नाही. किव्हा दारु सोडविण्यासाठी दुसरे काहीतरी ठोस कारण असले पाहीजे.
आमच्या महाडमध्ये असाच एक आमच्या शेजारी रहाणारा व्यक्ती आहे. जो दोन मुलींचा बाप पण आहे. त्याला दारूचे इतके जबर व्यसन होते की सकाळी झोपून उठल्यावर दात घासायला पण दारु लागायची! इतका अट्टल दारुड्या. पण दारु पिऊन एकाच्या लग्नात केलेल्या तमाशानंतर त्याच्याच मुलीनी लग्नमंडपात जो काही त्याला झाडला, आणि ते मुलींचे बोल त्याला जे काही लागले, त्यानंतर पुढच्या तीन महीन्यातच त्याने संपूर्ण दारु सोडली. आजही आमच्या बरोबर कधी मधी बसल्यावर शेगदाण्याव्यतिरीक्त दुसर्‍या कशालाही तो हात लावत नाही.

आपल्या आई त्यांना सोडून जायला तयार नसण्यामागे 'संकटात असलेल्या मुलाची अधिक काळजी' हेच तत्व बहुधा असावे.

मात्र (पुन्हा माफ करावेत) आपल्या बंधूंनी जर त्यांच्यावर हात उगारला तर काय? (मी हे असे काही विचारले व तेही जाहीर, याबद्दल माफी मागतो व असे संवाद करायचे असतील तर यापुढे विपूत करतो).

सहानुभुती आपल्याला नको असणार हे तर नक्कीच. तसेच, केवळ पत्तेच म्हणाल तर मी हेही सांगू शकतो की आत्तापर्यंत आपल्या बंधूंना आणि मातु:श्रींना मुक्तांगण अनेकांनी सुचवलेले असेलही.

(ते दोघे पुण्यात आहेत काय? तसे असल्यास उद्या, परवा मी भेटून मुक्तांगण येथील माहिती देणे किंवा घेऊन जाणे असे काही केले तर चालेल काय?)

धन्यवाद

बेफींशी सहमत. व्यसन सोडताना व्यसनाधीन व्यक्तीचा निग्रह व इच्छा महत्वाची आहे.

बी, तुम्ही प्रयत्न करा. देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो. आई व भाचीची काळजी घ्या.

<<मनोनिग्रह वगैरे सर्व आपल्यासारख्या धडधाकट माणसाला ठिक आहेत. पण पूर्णपणे दारूच्या कचाट्यात गेलेल्या माणसाला ते शक्य होत नाही. कारण त्या वेळेला शरीर पूर्णपणे दारूवर अवलंबून असते. दारू न मिळाल्यास withdrawl symptoms सुरू होतात. यामधे संपूर्ण शरीर कापणे, हॅल्युसिनेशन्स, अतिशय हिंसक होणे वगैरे प्रकार असतात. या व्यक्तीला त्या क्षणी दारू न मिळाल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. ही लक्षणे आढळून येऊ नयेत म्हणून काही खास औषधे असतात ज्यामुळे शारिरीक दृष्ट्या दारूवरती कंट्रोल मिळवता येतो. एकदा का शरीराला दारू नकोशी झाली की प्रश्न उरतो तो मनाच्या निग्रहाचा. त्यासाठी मात्र जबरदस्त कौटुंबिक साथ, योग्य दिशा दाखवणारे मित्रमंडळ आणि चोवीस तास धाक ठेवणारी व्यक्ती असणे फार गरजेचे असते.
>>

अगदी सहमत, मात्र हे बी यांना माहीत असेलच असे म्हणायचे आहे.

मला वाटते काय होवुन गेले आहे आणि त्यात कोणाचा दोष ह्याचा काथ्या कुट करण्या पेक्षा त्या माणसाची प्रक्रुती आणि कुटुंबाची परीस्थीती जास्त महत्वाची आहे.

त्यांना मदतीची गरज आहे. ते स्वतः मदत किंवा रीहॅब ची माहीती विचारत आहेत.

जे होवुन गेले आहे ते काही बदलणार नाही. जे होणार आहे ते तर आपल्या हातात आहे. मग प्रयत्न करायला काय हर्कत आहे ?

पण बी.. हे मोठ जीकरीच काम आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना तापदायक ठरु शकत. खुप चीकाटी हवी. आर्थात तुम्हाला काळजी आहे म्हंटल्यावर तुम्ही ते नीट नीभावुन न्यालच.

माझ्या कडुन ऑल द बेस्ट !!!!!!!!!

निग्रह आणणे,त्या ऑब्सेशन पासून दूर नेणे इ. गोष्टी त्या ट्रीटमेंटचा भाग आहेत व म्हणूनच ती तिथेच देता येते.सामान्य माणनांत अथवा नातेवाईकांत या स्किल नसतात .त्याला अनुभवसिध्द तज्ञांचा सल्ला व ट्रीटमे.ण्टचा फायदा होईल निश्चित. आता तरी ,या स्थितीत निग्रह वगैरे पुढच्या गोष्टी आहेत.

आत्ताच मी मुक्तागंण मधे फोन लावला. २३ मे ला बुधवारी दु. १२ वाजता भावाला घेऊन या असे त्यांनी सांगितले. ३० मे पर्यंत सगळ्या तारखा बुक्ड आहेत. प्रवेश मिळणार नाही असे म्हणालेत. मी त्यांना विचारले की खरचं ह्यातून तो बाहेर पडेल का? तर म्हणाले हे सर्व शेवटी त्या व्यक्तीवर अवंलबून आहे आम्ही फक्त त्यांना एक मानसिक बळ देण्याचा प्रयत्न करतो. ५ आठवडे इतका अल्प काळ असतो त्यांच्याकडे. म्हंटले बर.. तर मुक्तांगणमधे २३ मे ला भावाला मी घेऊन जाईन.

अजून काही मार्गदर्शन करता आले तर उत्तम.

नक्की जा. ते लोक फार प्रामाणिक आहेत व पेशंट ला फार मदत करतात.
तुम्हाला त्यांची काही पुस्तके पाठ्वू का?
ऑल द बेस्ट

बी, चिंता करू नकोस.

मुक्तांगणमधे सर्व सोयी अतिशय उत्तम आहेत. तज्ञ डॉक्टर आहेत. शिवाय त्यांचा स्टाफदेखील प्रशिक्षित आहे. अ‍ॅडमिट केल्यावर तिथे दर आठवड्याला कुटुंबीयासाठी एक सेशन ठेवलेले असते. ज्यामधे व्यसनी माणसाशी कसे वागावे, त्याच्याकडून तीच चूक परत होऊ नये यासाठी काय करावे आणि झालीच तर आपण कसे रीएक्ट् व्हावे याची माहिती दिली जाते. या सेशनसाठी शक्य झाले तर तुझ्या पुतणीला तसेच वहिनीना अवश्य जाऊ देत. कित्येकदा आपल्या प्रतिक्रियामुळेदेखील व्यसनी माणूस परत व्यसनाकडे ढकलला जातो आणि ते आपल्या लक्षात देखील येत नाही. म्हणून ही सेशन्स फारच परिणामकारक ठरतात.

पाच आठवडे हा कालावधी कमी असला तरी त्यातून मिळणारे परिणाम उत्तम असतात. नंतर रोजच्या आयुष्यामधे ते परिणाम टिकवून ठेवणे हे खरे कौशल्याचे काम. खरी लढाई तिथून पुढे चालू होते. मुक्तांगण ही पहिली पायरी झाली.

अजून काही माहिती हवी असेल तर अवश्य विचार.

बी, मी आत्ता त्यांच्याशी बोललो.

सोमवार, गुरुवार व शनिवार सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा ओपीडी मध्ये अशा पेशंट्सना आधी भेटून ट्रीटमेन्ट ठरवली जाते. उद्या शनिवार आहे.

(मला वेळ आहे, किंवा आपल्याला योग्य वाटेल त्या माबोकरास सांगावेत)

धन्यवाद

बी,

अनिल अवचट असे सांगतात की आम्ही प्रयत्न १०० टक्के करू, पण १०० टक्के यशाची खात्री देऊ शकणार नाही. तुम्ही मुक्तांगण मध्ये जरूर जा. नक्की फायदा होईल.

रेव्यु, नंदीनी - धन्यवाद.

पुस्तके नकोत कारण सुनंदा अवचट आणि अनिल अवचट ह्यांच्याविषयी मी खूप काही वाचले आहे. माहिती म्हणून आहे आता स्वानुभवातून जाऊन बघेन.

मी भावाला तिथे दाखल करेन. त्याला तिथे भेटायला घरुन कुणी जाणार नाही कारण कुणीच रिकाम नाही. तो स्वत: येवढ नक्की करेन असं मला वाटतं. प्रश्न फक्त तेथून परत आल्यानंतर तो कितपत सुधारेण ह्याचा आहे. पण आशा आहे की काहीतरी फरक पडेन.

Pages