.....और उनके बहुत सारे साथी!

Submitted by लसावि on 4 April, 2012 - 02:49

दुपारी दीड-दोनची वेळ, प्रचंड, रखरखीत उन्हाळा आहे; सगळं काही एकदम स्तब्ध. रविंद्रनाथ म्हणतात तशी, 'दिवसाच्या पोटात असलेल्या रात्रीसारखी' दुपार! काहिली इतकी भयंकर आहे की कसलीही सहज कृती, साधा विचारही शक्य नाही, एक प्रकारची ग्लानी आली आहे.
आणि तेवढ्यात कानावर सूर येतात......
'फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, हमसे इक और मुलाकात का वादा कर लो'. मोजकीच वाद्ये, सुंदर चाल आणि 'वादा' शब्दावर गंमत करणारा महंमद रफी नावाचा कोणी. सगळा त्रास, शीण, थकवा संपतो, मन जणू सर्व शारिर संवेदनांच्या पलिकडे जाते, वाळवंटातील ओअ‍ॅसिस अजून दुसरे काय असते?
गाणं संपतं आणि घोषणा होते, 'ये रात फिर न आएगी इस फिल्म का ये गाना सुनना चाहा था हमारे इन श्रोताओंने, पटना बिहारसे राजकुमारी और गुंजन चावला, पुरीसे बिट्टू, चिंटू और उनके मम्मी पापा, बिकानेर राजस्थानसे राजेश उपाध्याय और उनके बहोत सारे साथी.'
माझी भयाण दुपार शांतवून टाकणारे हे सगळे खरचं माझे साथी वाटू लागतात आणि आम्हा सर्वांना एकत्र आमचा आणणारा सर्वात मोठा साथी- विविधभारती!

मुळात मला रेडिओची आवड लागली तीच विविधभारती ऐकल्याने. अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देत श्रोत्यांना बांधून ठेवायची किमया त्यात आहे. सकाळी प्रसारित होणारा संगीत सरिता हाच कार्यक्रम घ्या. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत यातले दिग्गज या कार्यक्रमाच्या ५-७ मिनीटात काय अपूर्व ज्ञान देतात! या कार्यक्रमाची वेळ वाढवा ही सूचना देखील 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' ठरलेली! नंतर येणारा 'चित्रलोक' म्हणजे टिपीकल ऑडीओ ट्रेलरची धमाल- 'मनोरंजन का लावा फूटेगा, सारा भारत डोलेगा' इ.इ.इ. मग दुपारच्या वेळेत येणारे फ़र्माईशी गाण्यांचे कार्यक्रम, चहाच्या बरोबर असणारा ’पिटारा’, संध्याकाळी ’फ़ौजी भाईयों के लिए-जयमाला’ आणि त्यातही कलाकारांनी सादर केलेला ’विशेष जयमाला’ असेल तर अजूनच मजा. त्यानंतर फ़क्त गजलांचा कार्यक्रम कहकशां आणि शेवटी ’बेला के फ़ूल’! पुन्हा यात ’आज के फ़नकार’’एक ही फ़िल्म से’ इत्यादी ’नेहमीचे यशस्वी’ कार्यक्रम तर आहेतच.
हिंदी सिनेसंगीताच्या अक्षय्य खजिन्याची चावी म्हणजे विविधभारती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी तर गाण्याबद्दल दिली जाणारी माहिती लिहीण्यासाठी एक वही तयारच ठेवली होती आणि त्यात सिनेमाचे नाव, संगीतकार असल्या गोष्टी तत्परतेने उतरवत असे (ते कागद माझ्याकडे अजून आहेत आंणि त्यातल्या लिस्टप्रमाणे सी.डी बनवण्याचा न जमलेला बेतही!).

शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल; सारेच वैशिष्ठ्यपूर्ण आणि उत्तम. आजच्या एफएमवर वात झाल्याप्रमाणे बडबडणार्‍यांशी त्यांची तुलनादेखील नको. काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे. बिनाका गीतमालाच्या रुपाने सिलोन रेडीओवरील कारकिर्दिने अ़क्षरश: स्टार बनलेल्या अमिन सायानींनी देखील विविधभारतीवर मोठे योगदान दिले आहे.
या मंडळींनी घेतलेल्या आणि अनेक भागात प्रसारित करण्यात आलेल्या एकसोएक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती हा एक वेगळाच खजिना आहे. मला अनेकदा वाटतं की या मुलाखतींच्या सीडीज जर प्रकाशित झाल्या तर त्या हातोहात खपतील. वर्तमानपत्रे-मासिके यात ज्या गोष्टी कधी छापल्या गेल्या नाहीत त्यातल्या अनेक भन्नाट कथा या मुलाखतीत दडल्या आहेत. एसडीच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल बांध फ़ुटल्यासारखा बोलणारा किशोरकुमार, मला शास्त्रिय संगीतातले काहीही कळत नाही असे ठणकावून सांगणारा ओ.पी.नय्य्रर आणि आम्ही फ़िल्मफ़ेअर पुरस्कार लबाड्या करुन मिळवला हे कबूल करणारा लक्ष्मी-प्यारेमधला प्यारेलाल शर्मा मला याच मुलाखतीत भेटला.

एका कार्यक्रमाचा मात्र मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे दुपारी ४च्या 'पिटारा'त लागणारा 'बाईस्कोप की बातें'. दर आठवड्यात कोणत्यातरी एका सिनेमाच्या निर्मीतीची रंजक कथा सांगणारा हा कार्यक्रम. सिनेमाच्या गाण्याबरोबर त्याचा पूर्ण ओरिजिनल साउंडट्रॅकच विविधभारतीकडे असल्याने महत्वाच्या संवादासकट ही सिनेमाची गोष्ट ऐकवली जाते. सिनेमाशी संबंधीत अनेक मजेदार कहाण्याही यातच कळल्या. ’हरियाली और रास्ता’चे नाव वितरकांना ’वरियाली और नाश्ता’ असे कळल्याने उडालेला गहजब, ’मुडमुड के ना देख’ गाण्यामागची खरी गोष्ट असल्या चटपटीत दंतकथाबरोबरच ’मुघल-ए-आज़म’, ’शोले’ अशा अफ़ाट प्रयत्नांमागची कथाही इथेच कळली. या कार्यक्रमाने मला सिनेमाकडे जास्त गंभीरपणे पहायला शिकवले, मला 'मूव्हीबफ' बनवले.

या सगळ्यांच्या पलिकडे जाउन विविधभारतीने मला असे अनेक 'आहा!' क्षण दिले की काय सांगू!
’रास्ते में रुक के दम लूं ये मेरी आदत नही, लौट के वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं, और कोई हमनवा मिल जाए ये किस्मत नहीं’ अशी अफ़ाट ओळ लिहून जाणारा मजाज आणि ती तितक्याच ताकदीने पेश करणार्‍या तलत मेहमूदशी इथेच गाठ पडली.
'अपनी तनहाई का औरों पे न शिकवा करना, तुम अकेले ही नही हो सभी अकेले हैं', हे पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा अंगावर आलेला काटा आणि शब्दांच्या कल्पक वापराला दाद द्यावी की विचारांच्या खोलीला असा प्रश्न इथेच पडला.
आरडी-गुलजार-आशा त्रिकूटाने सादर केलेला 'मेरी संगीत यात्रा' नामक अफलातून कार्यक्रम; ज्याने मी पूर्ण पंचमभक्त झालो.
आणि सर्वात महत्वाचा, 'महंमद रफीचा आवाज' नामक मित्र भेटला तो विविधभारतीमुळेच.

विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.
आणि माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील.

गुलमोहर: 

आवडत्या १०त.. Happy
जवळजवळ सगळ्या आवडणार्‍या कार्यक्रमांचा उल्लेख झालाच आहे..मला अजुन एक आवडणारी गोष्ट म्हणजे , सकाळच्या छायागीत मध्ये आवर्जुन जुन्या कलाकारांच्या जयंती वा पुण्यतिथीला त्यांची गाणी लावतात, त्यांच्याबद्दल अशी माहीती सांगतात, जी बाकी कुठेही ऐकायला मिळत नाही.

अमीर सयानी हल्ली रेड एफेम वर रविवारी दुपारी येतात ना..भारी वाटतं त्यांचा आवाज ऐकुन.

आगावा... क्या बात है. मस्तं जमलाय लेख. एकदम जुन्या आठवणींनी कातर करणारा... इथे नाही ना, हिन्दी रेडियो... Sad

खुप छान लेख. ऑल इंडिया रेडीओ टाइप केले तरी पहील्या लिंक वर जाऊँन ऑनलाइन रेडीओ ऐकता येईल (fm rainbow, fm gold पण)
हेलो चाॅईस आणि हेलो फ़रमाईश पण आठवतात.

Pages