.....और उनके बहुत सारे साथी!

Submitted by लसावि on 4 April, 2012 - 02:49

दुपारी दीड-दोनची वेळ, प्रचंड, रखरखीत उन्हाळा आहे; सगळं काही एकदम स्तब्ध. रविंद्रनाथ म्हणतात तशी, 'दिवसाच्या पोटात असलेल्या रात्रीसारखी' दुपार! काहिली इतकी भयंकर आहे की कसलीही सहज कृती, साधा विचारही शक्य नाही, एक प्रकारची ग्लानी आली आहे.
आणि तेवढ्यात कानावर सूर येतात......
'फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, हमसे इक और मुलाकात का वादा कर लो'. मोजकीच वाद्ये, सुंदर चाल आणि 'वादा' शब्दावर गंमत करणारा महंमद रफी नावाचा कोणी. सगळा त्रास, शीण, थकवा संपतो, मन जणू सर्व शारिर संवेदनांच्या पलिकडे जाते, वाळवंटातील ओअ‍ॅसिस अजून दुसरे काय असते?
गाणं संपतं आणि घोषणा होते, 'ये रात फिर न आएगी इस फिल्म का ये गाना सुनना चाहा था हमारे इन श्रोताओंने, पटना बिहारसे राजकुमारी और गुंजन चावला, पुरीसे बिट्टू, चिंटू और उनके मम्मी पापा, बिकानेर राजस्थानसे राजेश उपाध्याय और उनके बहोत सारे साथी.'
माझी भयाण दुपार शांतवून टाकणारे हे सगळे खरचं माझे साथी वाटू लागतात आणि आम्हा सर्वांना एकत्र आमचा आणणारा सर्वात मोठा साथी- विविधभारती!

मुळात मला रेडिओची आवड लागली तीच विविधभारती ऐकल्याने. अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देत श्रोत्यांना बांधून ठेवायची किमया त्यात आहे. सकाळी प्रसारित होणारा संगीत सरिता हाच कार्यक्रम घ्या. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत यातले दिग्गज या कार्यक्रमाच्या ५-७ मिनीटात काय अपूर्व ज्ञान देतात! या कार्यक्रमाची वेळ वाढवा ही सूचना देखील 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' ठरलेली! नंतर येणारा 'चित्रलोक' म्हणजे टिपीकल ऑडीओ ट्रेलरची धमाल- 'मनोरंजन का लावा फूटेगा, सारा भारत डोलेगा' इ.इ.इ. मग दुपारच्या वेळेत येणारे फ़र्माईशी गाण्यांचे कार्यक्रम, चहाच्या बरोबर असणारा ’पिटारा’, संध्याकाळी ’फ़ौजी भाईयों के लिए-जयमाला’ आणि त्यातही कलाकारांनी सादर केलेला ’विशेष जयमाला’ असेल तर अजूनच मजा. त्यानंतर फ़क्त गजलांचा कार्यक्रम कहकशां आणि शेवटी ’बेला के फ़ूल’! पुन्हा यात ’आज के फ़नकार’’एक ही फ़िल्म से’ इत्यादी ’नेहमीचे यशस्वी’ कार्यक्रम तर आहेतच.
हिंदी सिनेसंगीताच्या अक्षय्य खजिन्याची चावी म्हणजे विविधभारती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी तर गाण्याबद्दल दिली जाणारी माहिती लिहीण्यासाठी एक वही तयारच ठेवली होती आणि त्यात सिनेमाचे नाव, संगीतकार असल्या गोष्टी तत्परतेने उतरवत असे (ते कागद माझ्याकडे अजून आहेत आंणि त्यातल्या लिस्टप्रमाणे सी.डी बनवण्याचा न जमलेला बेतही!).

शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल; सारेच वैशिष्ठ्यपूर्ण आणि उत्तम. आजच्या एफएमवर वात झाल्याप्रमाणे बडबडणार्‍यांशी त्यांची तुलनादेखील नको. काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे. बिनाका गीतमालाच्या रुपाने सिलोन रेडीओवरील कारकिर्दिने अ़क्षरश: स्टार बनलेल्या अमिन सायानींनी देखील विविधभारतीवर मोठे योगदान दिले आहे.
या मंडळींनी घेतलेल्या आणि अनेक भागात प्रसारित करण्यात आलेल्या एकसोएक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती हा एक वेगळाच खजिना आहे. मला अनेकदा वाटतं की या मुलाखतींच्या सीडीज जर प्रकाशित झाल्या तर त्या हातोहात खपतील. वर्तमानपत्रे-मासिके यात ज्या गोष्टी कधी छापल्या गेल्या नाहीत त्यातल्या अनेक भन्नाट कथा या मुलाखतीत दडल्या आहेत. एसडीच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल बांध फ़ुटल्यासारखा बोलणारा किशोरकुमार, मला शास्त्रिय संगीतातले काहीही कळत नाही असे ठणकावून सांगणारा ओ.पी.नय्य्रर आणि आम्ही फ़िल्मफ़ेअर पुरस्कार लबाड्या करुन मिळवला हे कबूल करणारा लक्ष्मी-प्यारेमधला प्यारेलाल शर्मा मला याच मुलाखतीत भेटला.

एका कार्यक्रमाचा मात्र मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे दुपारी ४च्या 'पिटारा'त लागणारा 'बाईस्कोप की बातें'. दर आठवड्यात कोणत्यातरी एका सिनेमाच्या निर्मीतीची रंजक कथा सांगणारा हा कार्यक्रम. सिनेमाच्या गाण्याबरोबर त्याचा पूर्ण ओरिजिनल साउंडट्रॅकच विविधभारतीकडे असल्याने महत्वाच्या संवादासकट ही सिनेमाची गोष्ट ऐकवली जाते. सिनेमाशी संबंधीत अनेक मजेदार कहाण्याही यातच कळल्या. ’हरियाली और रास्ता’चे नाव वितरकांना ’वरियाली और नाश्ता’ असे कळल्याने उडालेला गहजब, ’मुडमुड के ना देख’ गाण्यामागची खरी गोष्ट असल्या चटपटीत दंतकथाबरोबरच ’मुघल-ए-आज़म’, ’शोले’ अशा अफ़ाट प्रयत्नांमागची कथाही इथेच कळली. या कार्यक्रमाने मला सिनेमाकडे जास्त गंभीरपणे पहायला शिकवले, मला 'मूव्हीबफ' बनवले.

या सगळ्यांच्या पलिकडे जाउन विविधभारतीने मला असे अनेक 'आहा!' क्षण दिले की काय सांगू!
’रास्ते में रुक के दम लूं ये मेरी आदत नही, लौट के वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं, और कोई हमनवा मिल जाए ये किस्मत नहीं’ अशी अफ़ाट ओळ लिहून जाणारा मजाज आणि ती तितक्याच ताकदीने पेश करणार्‍या तलत मेहमूदशी इथेच गाठ पडली.
'अपनी तनहाई का औरों पे न शिकवा करना, तुम अकेले ही नही हो सभी अकेले हैं', हे पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा अंगावर आलेला काटा आणि शब्दांच्या कल्पक वापराला दाद द्यावी की विचारांच्या खोलीला असा प्रश्न इथेच पडला.
आरडी-गुलजार-आशा त्रिकूटाने सादर केलेला 'मेरी संगीत यात्रा' नामक अफलातून कार्यक्रम; ज्याने मी पूर्ण पंचमभक्त झालो.
आणि सर्वात महत्वाचा, 'महंमद रफीचा आवाज' नामक मित्र भेटला तो विविधभारतीमुळेच.

विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.
आणि माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील.

गुलमोहर: 

ओह येस येस येस!!!
शीर्षक वाचूनच नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.. Happy

जवळ जवळ प्रत्येकच शब्दाला अनुमोदन!!

आमच्याकडे अनेक वर्षे टीव्ही नव्हता तेव्हा विविधभारती हेच जिव्हाळ्याचं विश्व होतं.. Happy

आजच्या एफएमवर वात झाल्याप्रमाणे बडबडणार्‍यांशी त्यांची तुलनादेखील नको. काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे>>

सहमत

विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.
आणि माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील.>>

सहमत व मस्त लिहिलंय

===================

'वादा' या शब्दातील गंमत काय ते सांगावेत, लक्षात आले नाही

==================

सुंदर ललित

धन्यवाद

वाह!!! क्या बात है.. आगावा.. सुंदर लेख..कितीतरी आठवणीना उजाळा मिळाला..
झुमरी तलैय्या चे साथीपण आठवले Happy
माझ्या आवडत्या दहात!!!

आगावा, माझा सगळा अभ्यास विविधभारतीच्या सहाय्याने झाला.
अविस्मरणीय क्षण अनेक. अनिल बिस्वासच्या आठवणी त्यांच्या पत्नीने सांगितल्या
तो (त्यात रितु आये रितु जाये.. हे गाणे पुर्ण वाजवले होते.)
लताने जयमालात पहिल्यांदा, मदनमोहनचे माई री ऐकवले तो,
आशा खाडीलकर यांनी नाट्यगीतांसह, वीणा सहस्त्रबुद्धे यांनी तराण्यांसह आणि
गोव्याच्या एक गायिका अर्चना यांनी मदनमोहनच्या गाण्यांसह सादर केलेले
विशेष संगीत सरीता.

रात्रीच्या छायागीत मधे तर साहित्यातील नायिका यांच्या गीतांवर अनोखा कार्यक्रम
झाला होता (त्यात चित्रलेखा, आम्रपाली, देवदास, परीणीता, शकुंतला यातली
गाणी ऐकवली होती. ओ निर्दयी प्रितम ची ओळख त्यात झाली.)

मग एकदा प्रख्यात वादकांनी साथ दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम झाला होता.
अली अकबर खान (सूनो छोटिसी गुडीया की) बिस्मिल्ला खान (दिलका खिलौना
हाये टुट गया ) झरीन दारूवाला (तेरे नैना तलाश करे जिसे) पन्नालाल घोष (मै पिया तेरी ) अशी अनेक गाणी नव्याने कळली.

सध्या त्याच दर्ज्याचे निवेदन, ईप्रसारण वर ऐकायला मिळते (आम्हाला विविधभारती
अप्राप्य आहे ना सध्या.)

अगदी अगदी, मस्तच लिहिलयस रे.
कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल; सारेच वैशिष्ठ्यपूर्ण आणि उत्तम.>> अगदी, त्याची सर मिरची वगरे वर्च्या आर्जेंना नाही

आगाऊ छान घेतलाय आढावा अन त्या कार्यक्रमांनुसार जपलेले क्षण. अमिन सयानींचा तो आवाज न त्यांची पेशकश मस्तच. छान झालाय लेख.

सत्या (इथे तुला आगाऊ म्हणून संबोधणं रास्त वाटत नाहिये.:))
उत्तम निरिक्षण. तुला भावलेली, आवडलेली आणि तुझ्या आत मुरलेली विविधभारती या लेखातून दिसतेय.

खरंच कोणत्याही (इतर रेडिओ चॅनल्सच्या)स्पर्धेत न उतरता आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात विविधभारती यशस्वी ठरली आहे. वर्षानुवर्ष तेच कार्यक्रम असले तरिही नविन भासतात.

माझ्या दिवसाची सुरूवात ही विविधभारतीनेच होते. विशेष म्हणजे माझी कामं ही कार्यक्रमाच्या वेळेनुसार ठरलेली आहेत. उदा. सकाळी भुले बिसरे गीत सुरू झालं की पोळ्या करायला घ्या. दिवसाची रूपरेषा सुरू झाली (६.५०) ला की स्वयंपाक घर आवरायला घ्या.. संगित सरिताच्या आत अंघोळ झालीच पाहिजे. त्रिवेणी संपली घर सोडायचं ऑफिसला जायला.. संध्याकाळी मात्रं निवांत घरची कामं करत ऐकते. एक कलाकार... वगैरे.

विविधभारतीतली एक भावलेली गोष्ट म्हणजे जेव्हा फोन-इन कार्यक्रम असतो तेव्हा त्या कार्यक्रमाला सुद्धा मराठी कार्यक्रमांसारखे छोटे मोठे व्यवसाय करणारे (फार सोशल स्किल्स डेव्हलप न झालेले) लोक फोन करतात. पण रेणू बन्सल, ममता, युनूस खान यासारखे लोक त्यांचं फॅसिलिटेशन जबरदस्त करतात. कधीही कार्यक्रम बोअर होत नाही. किंवा फोन करणारा आणि फोन घेऊन फर्माईश ऐकवणारा असे दोघंही सेम लाईन वर असतात. वर उल्लेख केलेल्या लोकांमध्ये अजून एक कला आहे ती म्हणजे समोरच्याला बोलतं करणं. Happy

पुर्वी मी आणि माझी मैत्रिण दोघीच रहायचो तेव्हा आमच्याकडे टिव्ही नव्हता पण रेडिओ होता. रविवारी दुपारी जेवलो की घराचे सर्व पडदे लावून आम्ही दोघी हळू आवाजात रेडिओ लावून 'उजाले उनकी यादों के' ऐकायचो आणि ऐकता ऐकता झोपून जायचो. रविवारचा तो खास आवडता कार्यक्रम असायचा, आणि रेणू बन्सल चा आवाज तेव्हा अंगाई पेक्षा कमी वाटला नाही कधी.

विविधभारतीशी जुळलेल्या तारा (माझ्यातरी) अजून तितक्याच घट्ट आहेत.

आगावा,
खूप मनापासून लिहिलं आहेस. Happy
विविध भारतीशी माझा काहीच परिचय नाही तरिही तुझ्या अनुभवांच्या चष्म्यातून एक नजर टाकायला मिळाल्यासारखं वाटलं, Happy

आगावा,
हया लेखाचे शिर्षक बघुनच तो पहिल्या दहात टाकला आहे!
आता वाचते. अतिशय जिव्हाळ्याचा विषय!

मी तर गाण्याबद्दल दिली जाणारी माहिती लिहीण्यासाठी एक वही तयारच ठेवली होती आणि त्यात सिनेमाचे नाव, संगीतकार असल्या गोष्टी तत्परतेने उतरवत असे (ते कागद माझ्याकडे अजून आहेत आंणि त्यातल्या लिस्टप्रमाणे सी.डी बनवण्याचा न जमलेला बेतही!).>>>>> +१००००

अनेक वाक्यांना अगदी अगदी!

लेख खुप आवडला!

रच्याकने, रेडिओवरील जुन्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग कुठे उपलब्ध असेल का?

खुप छान लिहिलं आहेस आगावा!
विविधभारतीची गाणी या उद्घोषकांच्या हळुवार आवाजामुळे नॉस्टॅल्जिक करतात. पण तीच गाणी आजकालच्या या एफएमवर लागली तर आरजेंच्या निरर्थक बडबडीमुळे टेप पळवल्यासारखी वाटतात.

मी अजूनही रोज नियमित विविधभारती ऐकतो. एफएम चॅनेलवरचे निवेदक हिंदी, इंग्लिश व मराठी अशा धेडगुजरी भाषेत नळ गळल्यासारखे अखंड बडबडत असतात. ते अजिबात ऐकवत नाही. पण विविध भारतीवरील निवेदक म्हणजे मूर्तिमंत खानदानी व भारदस्त निवेदन, भाषा आणि शब्द!

विविधभारतीच्या फक्त २ गोष्टी आवडत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी ८:१५ ते ९:१५ व संध्याकाळी ८:१५ ते ९:०० ला लागणारी नवीन चित्रपटातील गाणी, आणि दुसरी म्हणजे, दोन गाण्यांच्या मध्ये लागणार्‍या अत्यंत संतापजनक आवाजात असलेल्या नसबंदी, साक्षरता प्रसार, घरोघरी संडास इ. विषयांवरील सरकारी जाहिराती.

पण विविधभारतीला पर्याय नाही!

फारच मस्त लेख...

सकाळी रेडिओ सध्या कमी ऐकला जातो.. पण गाडी चालवताना दुसरे कुठलेच स्टेशन लावत नाही...

विविधभारतीच्या फक्त २ गोष्टी आवडत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी ८:१५ ते ९:१५ व संध्याकाळी ८:१५ ते ९:०० ला लागणारी नवीन चित्रपटातील गाणी, आणि दुसरी म्हणजे, दोन गाण्यांच्या मध्ये लागणार्‍या अत्यंत संतापजनक आवाजात असलेल्या नसबंदी, साक्षरता प्रसार, घरोघरी संडास इ. विषयांवरील सरकारी जाहिराती>>>.

मास्तुरे ह्याला पर्याय नाहीये.. सरकारी असल्यामुळे ह्या जाहिराती येणारच.. आणि आज सुद्धा विविधभारती जिथपर्यंत पोहोचते तिथे बाकीच्या बर्‍याच गोष्टी पोहचत नाहीत.. त्यामुळे पिक्चर वाल्यांसाठी त्याची उपयुक्तता प्रचंड आहे.. आणि संध्याकाळी ८:१५ ते ८:४०च नवीन गाणी असतात.. त्यानंतर प्रत्येक केंद्राचा प्रादेशिक कार्यक्रम असतो ९ पर्यंत..

म स्त लेख..:) मी सुध्दा अजूनही वि.भा.लाच चिकटून आहे. सकाळी ६ ला बटन दाबते ते त्रिवेणी सम्पल की बन्द करायच. Happy कामे सुध्दा त्यावर बेतलेली.

मस्त.

आमच्या घरी सकाळी उठल्या उठल्या रेडीओ लावलाच पाहिजे असा मातोश्रीचा नेम आहे. Happy

कित्येक जुन्या गाण्याची ओळख विविधभारतीनेच करून दिली. आकाशवाणी, रत्नागिरीमधे काम करताना तिथले गाण्यांचे कलेक्शन पाहून अगदीच वेडी झाले होते. जुन्या काळच्या रेकॉर्ड्सचे आता सीडीमधे रूपांतर केलेले आहे. आवडीची गाणी काढून ती कार्यक्रमामधे वाजवणे यातले थ्रिल वेगळेच. Happy

ज्यांना 24*7 विविध भारती online ऐकायचे असेल त्यांच्यासाठी –

www.voicevibes.net

Dear listeners, I am happy with the kind of response that you have given to the idea of streaming radio online. Thank you all for your love and support. The primary theme behind this idea is [ Feel Home ]. Hope you are feeling it.
For a better listening experience use Firefox or Chrome browser.

Vividh Bharati - देश की सुरीली धड़कन - Live

गेल्या काही वर्षांपासून सर्व भारतभर एकच विविधभारती ऐकवतात. पुर्वी प्रत्येक केंद्राची
वेगवेगळी असे. त्यावेळी छायागीत सादर करणारा कलाकार कुठ्ल्या केंद्राचा आहे ते
पण सांगितले जात असे.

मस्तच लेख... थोड्या आधीच्या (आता ३० च्या आतबाहेर असणार्‍या)पिढीतील सर्वांच्याच काही गोड मखमली आठवणी असणार विविधभारती च्या...एकदम कॉलेजच्या काळात नेउन ठेवलेत..

आमच्या घरी सकाळी उठल्या उठल्या रेडीओ लावलाच पाहिजे असा मातोश्रीचा नेम आहे.
+१

थोडंसं स्थानिक रेडीओ चॅनल्स बद्दल (उदा मुंबई केंद्र आणि पुणे केंद्र इत्यादी)
१९९६, १९९९, २००३ चे वर्ल्डकप आणि २००७ पर्यंतच्या क्रिकेटमॅचेसच्या कोमेंटरी मी रेडिओवरच ऐकल्या.

कुलविंदरसिंग कंक, प्रकाश (आडनाव आठवत नाही), आशुतोष बॅनर्जी (हे नंतर समालोचक झाले, आधी बातम्या द्यायचे) यांच्या शैली अजून कानात आहेत..

२००३ मध्ये अमीन सायानीचाचांची मुलाखत घेतल्यानंतर तेव्हा माहित असलेली विविधभारती अजूनच आवडायला लागली होती.
Happy
विविधभारतीवर भरपूरच गप्पा मारल्या होत्या त्यांनी...

Pages