दुपारी दीड-दोनची वेळ, प्रचंड, रखरखीत उन्हाळा आहे; सगळं काही एकदम स्तब्ध. रविंद्रनाथ म्हणतात तशी, 'दिवसाच्या पोटात असलेल्या रात्रीसारखी' दुपार! काहिली इतकी भयंकर आहे की कसलीही सहज कृती, साधा विचारही शक्य नाही, एक प्रकारची ग्लानी आली आहे.
आणि तेवढ्यात कानावर सूर येतात......
'फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, हमसे इक और मुलाकात का वादा कर लो'. मोजकीच वाद्ये, सुंदर चाल आणि 'वादा' शब्दावर गंमत करणारा महंमद रफी नावाचा कोणी. सगळा त्रास, शीण, थकवा संपतो, मन जणू सर्व शारिर संवेदनांच्या पलिकडे जाते, वाळवंटातील ओअॅसिस अजून दुसरे काय असते?
गाणं संपतं आणि घोषणा होते, 'ये रात फिर न आएगी इस फिल्म का ये गाना सुनना चाहा था हमारे इन श्रोताओंने, पटना बिहारसे राजकुमारी और गुंजन चावला, पुरीसे बिट्टू, चिंटू और उनके मम्मी पापा, बिकानेर राजस्थानसे राजेश उपाध्याय और उनके बहोत सारे साथी.'
माझी भयाण दुपार शांतवून टाकणारे हे सगळे खरचं माझे साथी वाटू लागतात आणि आम्हा सर्वांना एकत्र आमचा आणणारा सर्वात मोठा साथी- विविधभारती!
मुळात मला रेडिओची आवड लागली तीच विविधभारती ऐकल्याने. अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देत श्रोत्यांना बांधून ठेवायची किमया त्यात आहे. सकाळी प्रसारित होणारा संगीत सरिता हाच कार्यक्रम घ्या. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत यातले दिग्गज या कार्यक्रमाच्या ५-७ मिनीटात काय अपूर्व ज्ञान देतात! या कार्यक्रमाची वेळ वाढवा ही सूचना देखील 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' ठरलेली! नंतर येणारा 'चित्रलोक' म्हणजे टिपीकल ऑडीओ ट्रेलरची धमाल- 'मनोरंजन का लावा फूटेगा, सारा भारत डोलेगा' इ.इ.इ. मग दुपारच्या वेळेत येणारे फ़र्माईशी गाण्यांचे कार्यक्रम, चहाच्या बरोबर असणारा ’पिटारा’, संध्याकाळी ’फ़ौजी भाईयों के लिए-जयमाला’ आणि त्यातही कलाकारांनी सादर केलेला ’विशेष जयमाला’ असेल तर अजूनच मजा. त्यानंतर फ़क्त गजलांचा कार्यक्रम कहकशां आणि शेवटी ’बेला के फ़ूल’! पुन्हा यात ’आज के फ़नकार’’एक ही फ़िल्म से’ इत्यादी ’नेहमीचे यशस्वी’ कार्यक्रम तर आहेतच.
हिंदी सिनेसंगीताच्या अक्षय्य खजिन्याची चावी म्हणजे विविधभारती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी तर गाण्याबद्दल दिली जाणारी माहिती लिहीण्यासाठी एक वही तयारच ठेवली होती आणि त्यात सिनेमाचे नाव, संगीतकार असल्या गोष्टी तत्परतेने उतरवत असे (ते कागद माझ्याकडे अजून आहेत आंणि त्यातल्या लिस्टप्रमाणे सी.डी बनवण्याचा न जमलेला बेतही!).
शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल; सारेच वैशिष्ठ्यपूर्ण आणि उत्तम. आजच्या एफएमवर वात झाल्याप्रमाणे बडबडणार्यांशी त्यांची तुलनादेखील नको. काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे. बिनाका गीतमालाच्या रुपाने सिलोन रेडीओवरील कारकिर्दिने अ़क्षरश: स्टार बनलेल्या अमिन सायानींनी देखील विविधभारतीवर मोठे योगदान दिले आहे.
या मंडळींनी घेतलेल्या आणि अनेक भागात प्रसारित करण्यात आलेल्या एकसोएक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती हा एक वेगळाच खजिना आहे. मला अनेकदा वाटतं की या मुलाखतींच्या सीडीज जर प्रकाशित झाल्या तर त्या हातोहात खपतील. वर्तमानपत्रे-मासिके यात ज्या गोष्टी कधी छापल्या गेल्या नाहीत त्यातल्या अनेक भन्नाट कथा या मुलाखतीत दडल्या आहेत. एसडीच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल बांध फ़ुटल्यासारखा बोलणारा किशोरकुमार, मला शास्त्रिय संगीतातले काहीही कळत नाही असे ठणकावून सांगणारा ओ.पी.नय्य्रर आणि आम्ही फ़िल्मफ़ेअर पुरस्कार लबाड्या करुन मिळवला हे कबूल करणारा लक्ष्मी-प्यारेमधला प्यारेलाल शर्मा मला याच मुलाखतीत भेटला.
एका कार्यक्रमाचा मात्र मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे दुपारी ४च्या 'पिटारा'त लागणारा 'बाईस्कोप की बातें'. दर आठवड्यात कोणत्यातरी एका सिनेमाच्या निर्मीतीची रंजक कथा सांगणारा हा कार्यक्रम. सिनेमाच्या गाण्याबरोबर त्याचा पूर्ण ओरिजिनल साउंडट्रॅकच विविधभारतीकडे असल्याने महत्वाच्या संवादासकट ही सिनेमाची गोष्ट ऐकवली जाते. सिनेमाशी संबंधीत अनेक मजेदार कहाण्याही यातच कळल्या. ’हरियाली और रास्ता’चे नाव वितरकांना ’वरियाली और नाश्ता’ असे कळल्याने उडालेला गहजब, ’मुडमुड के ना देख’ गाण्यामागची खरी गोष्ट असल्या चटपटीत दंतकथाबरोबरच ’मुघल-ए-आज़म’, ’शोले’ अशा अफ़ाट प्रयत्नांमागची कथाही इथेच कळली. या कार्यक्रमाने मला सिनेमाकडे जास्त गंभीरपणे पहायला शिकवले, मला 'मूव्हीबफ' बनवले.
या सगळ्यांच्या पलिकडे जाउन विविधभारतीने मला असे अनेक 'आहा!' क्षण दिले की काय सांगू!
’रास्ते में रुक के दम लूं ये मेरी आदत नही, लौट के वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं, और कोई हमनवा मिल जाए ये किस्मत नहीं’ अशी अफ़ाट ओळ लिहून जाणारा मजाज आणि ती तितक्याच ताकदीने पेश करणार्या तलत मेहमूदशी इथेच गाठ पडली.
'अपनी तनहाई का औरों पे न शिकवा करना, तुम अकेले ही नही हो सभी अकेले हैं', हे पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा अंगावर आलेला काटा आणि शब्दांच्या कल्पक वापराला दाद द्यावी की विचारांच्या खोलीला असा प्रश्न इथेच पडला.
आरडी-गुलजार-आशा त्रिकूटाने सादर केलेला 'मेरी संगीत यात्रा' नामक अफलातून कार्यक्रम; ज्याने मी पूर्ण पंचमभक्त झालो.
आणि सर्वात महत्वाचा, 'महंमद रफीचा आवाज' नामक मित्र भेटला तो विविधभारतीमुळेच.
विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.
आणि माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील.
मला तर रेडिओची इतर चॅनल्स
मला तर रेडिओची इतर चॅनल्स माहीती पण नाहियेत. ९१.१ हे फक्त माहित आहे. रविवारी दुपारी १२ला अमिन सयानींचाच एक कार्यक्रम लागतो. फार सुरेख असतो तो. जरूर ऐका.
क्या बात..... आणि "बेला के
क्या बात.....
आणि "बेला के फूल" विसरून कसे चालेल? एरवी किशोरदांच्या गाण्याची पारायणे सुरू असताना बेला के फूल मधून हमखास ईतर महान कलाकारांची गाणी ऐकायला मिळायची आणि तिही अगदी जुनी..
"मधुमालती" पण असाच एक दुसरा कार्यक्रम होता (बहुतेक तेच नाव होते).. निव्वळ गोड गाणी.
बाकी आजची गाणी विविध भारतीवर वाजवायची तर निव्वळ गोंगाट ऐकू येईल. आजच्या गाण्यांच्या ध्वनीलहरींची आपल्याच कानांना अॅलर्जी आहे तिथे विविध भारतीची काय कथा..?
याला म्हणतात सर्वार्थाने
याला म्हणतात सर्वार्थाने "डाऊन मेमरी लेन" अस्सल लिखाण. विशेष म्हणजे हा हवाहवासा वाटणारा लेख वाचताना विविध भारतीवर या वेळी 'सदाबहार नग्मे' कार्यक्रमात चालू आहे लताचे सदाबहार 'अजीब दास्तां है ये !".
अगदी प्राथमिक शाळेपासूनचे वय ते आजपर्यंतचा माझा प्रवास विविध भारती आणि रेडिओ सिलोनच्या साथीने झाला आणि सिलोन बंद झाल्यावर आता फक्त साथ आहे ती विविध भारतीची. श्री.आगाऊ यानी ज्या विविध आणि सुरेल कार्यक्रमांची उल्लेख लेखात केला आहे त्याची द्विरुक्ती टाळून या निमित्ताने त्यांच्याशिवाय मला नेहमी भावत असलेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करतो. यात सर्वप्रथम आवडीचा म्हणजे "छायागीत". रात्री १० वाजता लागणार्या या कार्यक्रमाची लज्जत त्या रात्रीच्या संगतीने खुलत जाते. तीच गोष्ट "हवामहल" ची. छोट्या नाटुकल्या म्हटल्या जाणार्या या कार्यक्रमातील पात्रांचे हिंदी ऐकताना गालावर मोरपीस फिरविल्याचा भास व्हायचा.
"बाईस्कोप की बाते" या कार्यक्रमाची कल्पना ज्या डायरेक्टरला सुचले त्याला मुंबईतील केन्द्रात कधीतरी जाऊन आनंदाने भेटावे असे वाटते. तिच गोष्ट "सखी सहेली" ची. यामध्ये भाग घेणार्या निम्मी मिश्रा आणि शहनाझ या दोघी स्त्री श्रोत्यांसमवेत इतक्या आपुलकीच्या भावनेने संवाद साधत असतात की वाटते या दोघीमुळेच देशातील कित्येक महिला श्रोतावर्ग 'सखी सहेली' कडे मोठ्या संख्येने खेचला गेला आहे.
वर 'हरियाली और रास्ता" चा उल्लेख आला आहेच. याच चित्रपटाच्या संदर्भात कमल शर्मानी आठवण सांगितली होती की, यातील एक गाणे "इब्दायी इश्क मे हम सारी रात जागे, अल्ला जाने क्या होगा आगे, वो मौला जाने क्या होगा आगे...." खूपच लोकप्रिय झाले [आजही आहेच]. पण गंमत म्हणजे निर्माते विजय भट्ट यानी या गाण्याला विरोध केला होता, कारण त्यात आलेले 'अल्ला जाने, मौला जाने' शब्द. ते शंकर-जयकिशनना म्हणाले, "अरे बाबानो, आमची चित्रपट संस्था भरत मिलाप, रामराज्य, बैजू बावरा...अशी पौराणिक आणि भक्तीपट काढणारी. सर्व शेअर होल्डर्स प्रामुख्याने हिंदु आणि तुम्ही हे अल्ला मौला गाण्यात आणता, ते मला पसंद नाही." पण त्या काळातील संगीत दिग्दर्शक इतके प्रतिभावान आणि अभिमानी की त्या जोडीने भट्ट यांचा तो विचार मान्य केला नाही आणि त्या दोन शब्दांसहच गाणे रेकॉर्ड होईल आणि चित्रपटातील ते सर्वाधिक लोकप्रिय गाणे ठरेल असे ठामपणे सांगितले... आणि नेमके तसेच झाले. असा मनोरंजनात्मक इतिहास समजतो तो 'विविध भारती' मुळेच.
एका चांगल्या लेखाच्या वाचनाचा आनंद दिल्याबद्दल श्री.आगाऊ यांचे विशेष आभार.
अशोक पाटील
{ता.क. : "मजाज" च्या उल्लेखाबद्द्ल तुम्हाला प्रत्यक्ष भेटीच्यावेळी स्पेशल चहा देणार आहे.}
आगावा अरे आमची पिढी पोसलीये
आगावा
अरे आमची पिढी पोसलीये या विविध भारतीवर! जीवनाचा एक अविभाज्य घटक होता तो!
मस्त लिहिलंस! कुठे तरीच नेऊन सोडलंस!
भारतीय सिनेमातील संगिताच्या
भारतीय सिनेमातील संगिताच्या सुवर्णकाळाची ओळख विविधभारतीनेच करून दिली. प्रत्येक गाण्याबरोबर त्या गाण्याचा चित्रपट, गायक/गायिका, संगितकार, गीतकार एवढी सगळी माहिती सतत पुरवून प्रत्येक कलाकाराचे वैशिष्ट्य मनात उतरत गेले. किशोरकुमारचा खुला आवाज, रफीसाहेबांचा तयार आवाज, मन्ना डेचे क्लासिकल, ओ पी चा टांगा ठेका आणि त्याच्या गाण्याला न्यास देऊ शकणारा आशाचा आवाज (आणि वाईस वर्सा), अण्णा चितळकरांच्या मधात भिजवलेल्या चाली आणि त्या गाण्याकरता असलेली लताची अपरिहार्यता, 'गीत लिखा है राजा मेहंदी अली खान साबने' असे म्हटल्यावर त्यापुढे 'उसे संगित से सजाया है मदन मोहन ने' असे असतेच हे सगळे विविधभारतीनेच शिकवले.
हे सगळे ऐकणे चालायचे ते आपली इतर कामे करत करतच त्यामुळे कामांचा बोजा पण वाटायचा नाही आणि इतके 'ज्ञान' पण कानावर पडत असायचे. मग त्यातले काही थेंब आत झिरपायचे. अनेक अनोळखी पण नितांत सुंदर गाण्याची ओळख भुले-बिसरे गीत ने करून दिली. कधी कधी 'आह हे गाणे ऐकायला मिळू दे' अशी सकाळपासून खूप इच्छा असायची मग तेच गाणे बेला के फूल मध्ये लागले की दिवस सार्थकी लागल्याचा आनंद व्हायचा.
हॉस्टेलला असताना तर रात्री ११:३० ची 'शांतता' झाल्याशिवाय झोपणे म्हणजे पाप समजले जायचे. सारखी सारखी ऐकून गाणी सहज पाठ होऊन जायची. मग कोणी हौशी किशोरकुमार गाताना शब्द चुकला की दुसर्या क्षणी 'अबे ऐसा नही ऐसा है वो' अशी दुरुस्ती व्हायचीच.
आताही त्या टिव्हीच्या निरस मार्यापेक्षा रेडिओ ऐकावा असे बर्याचदा वाटते पण मग लक्षात येते घरात AM Tuner नाहीये मग आपोआप तो विचार गळून पडतो.
आगाऊ खूप नॉस्टेल्जीक केलेस रे भाऊ.
आगावा, नविन लेखनात शीर्षक
आगावा, नविन लेखनात शीर्षक वाचले आणि तू लिहिलेल्या पहिल्या परिच्छेदातली दुपार आधीच माझ्यासमोर आली. परिच्छेद वाचल्यावर पुन्हा भेटली. 'और उनके बहुत से साथी' .... अगदी अगदी योग्य शीर्षक.
मस्त आठवणी जागवल्यास.
अगदी अगदी! दुसरे काहिच बोलू
अगदी अगदी!
दुसरे काहिच बोलू शकत नाहि
मस्त रे आगावा! >> रास्ते में
मस्त रे आगावा!
>> रास्ते में रुक के दम लूं ये मेरी आदत नही, लौट के वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं, और कोई हमनवा मिल जाए ये किस्मत नहीं’ >> आयलाऽ !!!
खरंच.. सध्याचे वायझेड एफेम लोक जे काही बोलतात त्यावर काहीच उपाय नाही. गाण्याच्या क्रमाबद्दलही तेच. जुन्या प्रोग्रॅम्समधे खरंच किती माहिती असायची. आणि सावकाश.. समजेल असं बोलत. आता म्हणजे स्टाईल नुसती कण्टेण्ट काहीच नाही. आणि सारखं हॉट. नाहीतर कोल्ड. आपलं... कूल... जावद्या....
आमच्या घरी अगदी झोपेपर्यंत आई रेडिओ ऐकते. मग कधीतरी परत जाग आली की बंद होतो रेडियो...
आवडलं..
आवडलं..
मस्त लेख! आवडला. विविध
मस्त लेख! आवडला. विविध भारती अतिशय आवडायचं ऐकायला. `पिटारा' वर लड्डूलाल मीणा म्हणून पण एक असायचे ना ?
बिनाका / सिबाका गीतमाला
बिनाका / सिबाका गीतमाला सारखेच आणखी काही प्रायोजित कार्यक्रम असायचे.
त्यापैकी एक होता, कोहिनूर गीत गुंजार, (कोहीनूर मिल्स) या कार्यक्रमाला हिंदी गाण्यांचे बंधन नव्हते, त्यामूळे विषयाला अनुसरून कधी कधी इतर भाषेतील गाणी पण ऐकवली जात. संत मीराबाईंच्या रचनांवर जो कार्यक्रम झाला होता त्यात लता आणि गीता दत्त बरोबर, जुत्थिका रॉय ची पण गाणी ऐकवली होती.
तसाच इन्स्पेक्टर ईगल (ईगल फ्लास्क कंपनीचा ) कार्यक्रम पण चांगला असायचा.
त्या काळात तो बराच लोकप्रिय होता. पुढे याच नावाचा संजीव कुमार आणि कुमकुम
चा चित्रपट आला होता. त्याला मदनमोहनचे संगीत होते पण तो त्याच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता.
नव्या हिंदी चित्रपटांचे पण प्रायोजित कार्यक्रम असायचे. धर्मेंद्र रेखा च्या किंमत, अशा
एका चित्रपटाचा कार्यक्रम आठवतोय. पण हे नंतर बंद झाले.
सारस्वत बँकेचा एक मराठी प्रायोजित कार्यक्रम असायचा. मर्म बंधातली ठेव, असे नाव होते. त्यात एकदा प्रभाकर कारेकर आणि ज्योत्स्ना मोहिले यांच्या नाट्यगीतांच्या
भेंड्यांचा कार्यक्रम ऐकल्याचे आठवतेय.
मस्त!
मस्त!
आगावा, लेख चांगला आहे.
आगावा, लेख चांगला आहे. विविधभारतीचे काही कार्यक्रम चांगले असायचे!
पण तू तसा नव्या जमान्यातला आहेस हे दिसतंच आहे लेखावरून. माझा जमाना जास्त रेडिओ सिलोन वाला! त्यांच्याकडे जे कलेक्शन होतं त्याला तोड नव्हती आणि त्यांनी त्या रेकॉर्ड्स चांगल्या जपलेल्या पण होत्या. त्यांचा 'अनोखे बोल' नामक एक कार्यक्रम व्हायचा त्यातली कित्येक गाणी मला कधीही विविधभारती वर ऐकायला मिळाली नाहीत. विविधभारतीच्या बर्याचशा रेकॉर्ड्स खराब झालेल्या होत्या आणि त्या मधेच अडकायच्या. मग अधिकृत माफी मागितली जायची!
विविधभारती वरचा हवामहल नामक महाभयंकर कार्यक्रम कुणी ऐकला आहे का कधी?
>> शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत
मला हे फारसं मान्य नाही! त्यांचे आवाज ऐकून मला एखाद्या शोकसभेला आलोय की काय असं वाटायचं! किशोरच्या धमाल गाण्यांच्या वेळेला पण त्यांचे आवाज मयतीला गेल्यासारखे वाटायचे! खरा उद्घोषक अमीन सायानी, तो मुळीच वात आल्यासारखं बडबडायचा नाही आणि त्याचं बोलणं ऐकत रहावसं वाटायचं!
आगाऊ, माझ्या मनातला लेख चोरून
आगाऊ, माझ्या मनातला लेख चोरून लिहिलाय तुम्ही!
आजकालचे हॅलो फर्माइश आणि हॅलो सहेली ऐकलं नाहीत का? निम्मी मिश्रा फोनकर्त्याच्या नाव ऐकताच काही महिने आधी त्याच्याबरोबर झालेल्या संभाषणाचे संदर्भ देऊ शकतात. हे सगळे उद्घोषक श्रोत्यांशी इतक्या आपुलकीने बोलतात, आपल्या कुटुंबापासून दूर पोटापाण्यासाठी एकटेच उत्तरप्रदेश/बिहारातले आपले गाव सोडून मुंबै, गुजराथ किंवा अगदी दक्षिण भारतात रहाणार्या त्या जिवांना विविधभारती एक कुटुंबच असते.
विविधभारतीचा स्टुडियो आता बोरिवलीतच आहे आणि या सगळ्यांना भेटायला जायची माझी कधीची इच्छा आहे.
इथे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळेल.
खूप छान लेख. मी पण कितीतरी
खूप छान लेख. मी पण कितीतरी रात्री विविध भारती ऐकत घालविल्या आहेत. दुपारचे मनोरंजन, व रात्री लागणारे रेडिओप्रोग्राम्स, हवा महलची ट्यून आठवते का?
बेला के फूल संपले की मी बीबीसी हिंदी सर्विस व मग कुठेतरी लागणारे अरेबिक संगीत ऐकत असे.
हवा महलची ट्यून आठवते
हवा महलची ट्यून आठवते का?
येस्स्स्स्स!!!
आकाशवाणीचे प्रोग्रॅम्स त्यांच्या वैशिष्टपूर्ण ट्युन्समुळे कायमचे लक्षात राहिले आहेत...
हवामहल, पिटारा, जयमाला, बाइस्कोपकी बाते, सरगम के सितारे, 'हॅलो फर्माईश', त्रिवेणी, वगैरे वगैरे...
आगावा, नॉस्तॅल्जिया.........
आगावा, नॉस्तॅल्जिया.........
विविधभारतीतील रात्रीचे छायागीत, आप की फर्माईश व बेला के फूल हे कार्यक्रम मी खूप खूप ऐकले. आणि हवा महल सुद्धा! फर्माईश कार्यक्रमात कोणकोणत्या चिटकुर्याशा गावातून बबलू, पिंकी, बंतो, राजू वगैरे मंडळी किती उत्साहाने गाण्यांच्या फर्माईशी करायची हे ऐकून मजा वाटायची. त्या गावांची नावेही मी प्रथमच ऐकत असेन!
रात्री उशीरा एकट्यानेच अगदी हळू आवाजात विविध भारतीतील गाणी लावून खिडकीतून येणारे गार वारे, चांदणे अनुभवत अलगद झोपी जाणे हा तर खरोखरी सुंदर अनुभव असायचा. दुपारी कधी (चुकून) वि. भा. लावलीच तर त्या गाण्यांच्या साथीत अभ्यासही चालायचा. किंवा एकीकडे गप्पा / पत्ते/ कॅरमचा अड्डा व दुसरीकडे विविध भारतीतील गाणी... त्यांवर सर्वांच्या टिप्पण्या.... हास्य-विनोद.... कहाँ गये वो दिन?
तसे तर विभासं (विविध भारती
तसे तर विभासं (विविध भारती संबंधीत) जे मला वाटते ते वर बरेच जणांनी लिहिले आहेच.

पण अद्याप उल्लेख न झालेला एक कार्यक्रम जो मला आजही ऐकायला आवडतो त्याबद्दल.
फौजी भाईयों की पसंदीदा गीतों का कार्यक्रम ... जयमाला !
आठवड्यातुन एकदा विशेष जयमाला (कोणीतरी चित्रपट माध्यमातली व्यक्ती येऊन स्वतःबद्दल माहिती सांगत आवडीची गाणी वाजवितात.) वाह !
संध्याकाळी ७ वाजले की आधी हिंदी मे समाचार आणि मग पुढची ४० मिनिटे जयमाला !
नंतर रात्री ९ ते ११ पर्यंत गाने सुहाने, आज के फनकार, छायागीत (हे तर कानात प्राण आणून ऐकण्यासारखे आहे अजुनही), आपकी फर्माईश आणि पुण्यात असलो तर ११ वाजता बेला के फूल.
सगळाच लेख 'अगदी अगदी'!
सगळाच लेख 'अगदी अगदी'!
नॉस्तॅल्जिक केलंत.
>> शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक
अगदी!
(झूमरीतलैयाचं नाव कुठेच आलं नाही अजून की मी वाचलं नाही?)
सुरेख लिहीलं आहेस. आवडलं .
सुरेख लिहीलं आहेस. आवडलं :).
मस्त लेख आगाऊ! रेडियो फक्त
मस्त लेख आगाऊ!
रेडियो फक्त आजोळी जायचो तेव्हाच ऐकायला मिळायचा पण काही स्निपेट्स आठवतात ह्यातली. रफीच्या गाणी तेव्हा पासून डोक्यात बसली आहेत. बसली म्हणजे अशी की त्यात शियर नॉस्टॅलजिया होता, रेडियो वर किंवा वडिलांच्या कॅसेट कलेकशन मध्ये लागलेला. जरा गाण्यांचे अर्थ समजायला लागल्यावर अचानक नवीन गाणी ते जुनी गाणी असं ट्रान्जिशन झालं तेव्हा परत डोक्यात बसलेली ही गाणी नवे रुप घेऊन बाहेर आली.
वर "फिर मिलोगे कभी इस बात का वादा.." ची आठवण करुन देऊन You have made my day ते वेगळं!
थोडं अवांतर, रागा डॉट कॉम वर बिनाका गीतमाला चे अख्खे एपिसोड आहेत, ते ऐकायला ही मजा येते. वर उल्लेख केलेल्या स दे गेल्यानंतरच्या किशोरच्या उस्फूर्त भाषणाची लिंक माबो वरच सापडेल.
"नुसता स दे" ह्या चिमण ह्यांच्या लेखात. मी अधून मधून परत परत ऐकत असतो.
http://www.maayboli.com/node/12357 (नुसता स दे)
जाता जाता परत एकदा, सुंदर लेख!
मस्त!
मस्त!
@ स्वाती ~ "झुमरीतलैय्या"
@ स्वाती ~
"झुमरीतलैय्या" "राजनंदगाव" ही दोन गावे त्यावेळेच्या संगीत दिग्दर्शकांनी रेडिओ 'सिलोन' साठी राखीव केली होती. विभाने असा कधी प्रकार केला नव्हता.
['अभिमान' चित्रपटात संगीत दिग्दर्शक 'अमीतजीचे हे गाणे सुपरहिट होणार' असे असराणीला रेकॉर्डिंगच्या वेळी सांगतो, त्यावेळी असराणी कावेबाज हसून त्याला म्हणतो, 'म्हणजे खर्या अर्थाने हिट झाले पाहिजे, उगाच झुमरीतलैय्या स्टाईलमधून नको.']
अशोक, हो का? मग माझा गोंधळ
अशोक, हो का? मग माझा गोंधळ झाला असावा. धन्यवाद.
आवडलं. आमच्याकडेही रेडिओ सतत
आवडलं. आमच्याकडेही रेडिओ सतत चालू असायचा. अगदी रात्री बेला के फूल झाल्यावरच बंद व्हायचा.
राहत फतेह अली खानचं ' कैसा ये इश्क है' मला विविध भारतीच्या काळातच घेऊन जातं.
<<विविधभारतीने माझ्या
<<विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.>> काय बोललात! खरंच! संपूर्ण लेख आणि कितीतरी प्रतिक्रियांना... 'अगदी अगदी'
विविधभारतीकडून खरोखर आयुष्यभराचं देणं लाभलं आहे.
उद्घोषकांबद्दल लिहीलंय त्यालाही दुजोरा. विशेषकरून हिंदी उद्घोषकांची मृदु, आर्जवी, उर्दूमिश्रीत पेशकश ऐकत रहावी अशी असे.
विविधभारतीवर नंतर नंतर चालू झालेला प्रकार म्हणजे कार्यक्रमांच्या नावांना प्रायोजकांची नावं जोडणं. विनोदी वाटायचं पण तेही लक्षात रहायचं... 'जितेंद्र घोडके सराफ हॅलो मधुमालती' किंवा 'स्वामिनी बेला के फूल' (स्वामिनी - साड्यांची महाराणी :p ) वगैरे...
मेरे बहुत सारे साथीयो , हा
मेरे बहुत सारे साथीयो , हा लेख अन सगळे प्रतिसाद जणू काही मीच लिहिलेत की काय अस वाटतय मला.
आपण सगळे समानशील आहोत ही काय मस्त गोष्ट आहे!!
जुन्या आठवणींना उजाळा
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
अनेक गावांची नावे आणि माणसांची नावेही विविधभारतीमुळे समजली.
लेखन आवडले.
तसेच अशोक कुमार आणि
तसेच अशोक कुमार आणि हेमामालिनी चव्हाण हे दोघे नेहमी मराठी आपली आवड ला गाणी सांगायचे.
दुपारी मन चाहे गीत व मनोरंजन च्या मधे उगीचच एक गैर फिल्मी गीतांचा कार्यक्रम असे. व त्यात फार पीळ गाणी लागत. लिखे जो खत तुम्हे हे गाणे फार वेळा दुपारी मन चाहे गीत ला लागायचे. त्या हिंदी गीतांच्या अर्थाचे हावभाव करत नाचणे इत्यादी आमचे टीपी होते तेव्हा. किंवा ठेका धरून आरश्याच्या तुकड्याने कवडसे पाड्णे हे ही. जालरहित बालपण हे.
वा! मस्तच लिहिलंय रात्री
वा! मस्तच लिहिलंय
रात्री निजानीज झाली, तरी कानाशी अगदी हळू आवाजात रेडियो लावून मी बेला के फूल ऐकूनच झोपायचे.
कॉलेजला असताना, एकदा मला आठवतंय, सलग २ दिवस बेला के फूलमधे त्याच क्रमानं, सेम तीच गाणी लावली गेली होती. बहुदा त्यादिवशी काहीतरी ह्यूमन एरर झाली असावी. दुसर्या दिवशी तो कार्यक्रम ऐकताना जेव्हा ते माझ्या लक्षात आलं, तेव्हा फार वाईट वाटलं होतं, की आजची गाणी हुकली आपली
आजकाल एफ.एम. रेडियो ऐकण्याचा मी अनेकदा निकराने प्रयत्न करते, पण १५-२० मिनिटांत माझं डोकंच गरगरायला लागतं.
पण उद्घोषकांच्या बाबतीत चिमणला जरासं अनुमोदन. (आगावा, मी तुझ्या आधीची, पण चिमणच्या नंतरची आहे ना, त्यामुळे 'जरासं'च बरं का...
)
Pages