सुपरवूमन सिंड्रोम

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 April, 2012 - 02:15

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.

बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?
अन्न रांधणे, बालसंगोपन, घराची व घरातल्या व्यक्तींची देखभाल ही परंपरेने स्त्रीला चिकटलेली कामे नव्या युगातही तशीच चालू राहिली. आणि त्यात आता घराबाहेर पडणार्‍या स्त्रीला घरातील + बाहेरील जबाबदार्‍या पार पाडण्याची धडपड करावी लागणे हे सर्वसामान्य चित्र झाले. संपूर्ण दिवस ऑफिस/ कारखाना/व्यवसायाच्या ठिकाणी काम केल्यावर स्त्रिया घरी आल्यावर देखील काम करतात. अगदी पाश्चात्य जगातील अर्थार्जन करणार्‍या स्त्रियाही एका अमेरिकन सर्वेक्षणानुसार आठवड्यात ३३ तास घरकामाला देतात तर पुरुष सर्वसाधारणपणे आठवड्यातून १६ तास घरकाम करतात. आणि या सर्वातूनच साकार होत गेली ''सुपरवूमन''.

''सुपरवूमन'' मानसिकतेच्या जवळपास जाणारी एक मजेदार गोष्ट सहज आठवली. एका घरात दोन पाली असतात. थंडीचे दिवस संपल्यावर एक पाल दुसरीला म्हणते, ''चल ना, बाहेर किती मस्त कोवळं ऊन पडलंय... जरा बाहेर जाऊन ऊन खाऊ.'' त्यावर दुसरी पाल म्हणते, ''छे गं बाई! मी बाहेर आले तर ही भिंत, हे छत कोण बरे तोलून धरेल? मी आहे म्हणून तर हे छत तोललं जातंय!!'' सुपरवूमनलाही असेच काहीसे वाटत असते.

समाजशास्त्रज्ञांच्या मते एकाच वेळी अनेक भूमिका निभावणारी स्त्री (जसे नोकरदार/व्यावसायिक, माता, पत्नी, मुलगी, सून, गृहिणी, स्वयंसेविका, कार्यकर्ती, विद्यार्थिनी इ. इ.) ही सुपरवूमन या वर्गवारीत येऊ शकते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ती या मानसिकतेत प्रवेश करू शकते. अगदी १३ वर्षाच्या मुलीपासून ते ७३ वर्षांच्या आजींपर्यंत कोणीही!! तसेच तिची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती कोणतीही असू शकते. ती एकाच वेळी सर्व आघाड्यांवर आपली समर्थता, गुणवत्ता दाखवण्याची तीव्र आस धरते व त्यानुसार धडपड करत राहते. ती एक उत्कृष्ट सुगरण असते किंवा बनू इच्छिते, त्याचबरोबर ती उत्कृष्ट गृह व्यवस्थापक असते, ती उत्कृष्ट माता सिद्ध होऊ बघते, आपल्या जोडीदारासाठी ती उत्कृष्ट सहचारिणी होऊ पाहते, ती आपल्या ऑफिसात उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी धडपडते, तिथेही ती ''उत्तम'' कर्मचारी म्हणून गणली जाण्याची इच्छा धरते. त्याच प्रमाणे ती वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेते - आवडीपोटी असेल / नसेल, पण प्रशंसेसाठी नक्कीच! आणि तिथेही आपण उत्कृष्ट सिद्ध व्हावे याकडे तिची ओढ असते.

रोज ठराविक वेळेत ऑफिस गाठायचे म्हणून भल्या पहाटे उठून जीवाचा आटापिटा करत घरचे-दारचे-मुलांचे आवरून धापा टाकत प्रवास करणार्‍या, मस्टरवर सही करून सलग आठ-दहा तास कामाला जुंपून घेणार्‍या स्त्रिया, घरी जाताना पुढच्या दिवसाची-सणवाराची- आजारी नातलगांची-मुलाबाळांची-आणखी कशाची तजवीज करता यावी म्हणून धडपडणार्‍या स्त्रिया, घरी पोचल्यावरही मरगळलेल्या शरीरात उत्साह आणून कंबर कसून पुन्हा एकदा स्वतःला घरात जुंपून घेणार्‍या स्त्रिया या खरेतर शहरांमध्ये, सर्व स्तरांमध्ये दिसतात. कधी नाईलाज म्हणून तर कधी आवड म्हणून या सर्व भूमिका निभावणार्‍या.

जरा या भूमिकांच्या खेळातील हलकी बाजू पाहिली तर काही स्त्रियांनी त्याबद्दल अतिशय मार्मिक, खुसखुशीत टिप्पण्या केल्या आहेत!!

A man's got to do what a man's got to do. A woman must do what he can't. - Rhonda Hansome.

Whatever women must do they must do twice as well as men to be thought half as good. Luckily, this is not difficult. - Charlotte Whitton.

I have yet to hear a man ask for advice on how to combine marriage and a career. - Gloria Steinem.

My second favorite household chore is ironing. My first being, hitting my head on the top bunk bed until I faint. - Erma Bombeck.

मजेची बात सोडली तर पाश्चात्यच काय, तर पौर्वात्य देशांमध्येही वेगळी स्थिती नाही! ''नील्सन सर्वे रिपोर्ट'' नामक शहरी स्त्रियांच्या वस्तू खरेदी विषयक अभ्यास अहवालात विकसनशील व अविकसित देशांमधील स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या व त्यानुसार त्यांच्या निदर्शनास आलेले तपशील हे दर्शवितात की सध्याच्या घडीला भारत, मेक्सिको व नायजेरियातील स्त्रिया सर्वाधिक संख्येत तणावाखाली वावरतात. भारतातील ८७% स्त्रियांनी सांगितले की बहुतांशी वेळ त्यांना तणाव, दडपणाचा सामना करावा लागतो. ८२ % भारतीय स्त्रियांनी सांगितले की त्यांच्यापाशी उसंत घ्यायला मोकळा वेळ नाही. भारतात स्त्रियांना ''इतरांची काळजी घेणार्‍या'', ''इतरांची देखभाल करणार्‍या'' म्हणून वाढविले जाण्याचा तर हा परिणाम नसेल? एका संशोधनानुसार भारतातील ७० ते ७२ % मध्यमवर्गीय / उच्च-मध्यम वर्गीय स्त्रिया कोणत्या न कोणत्या टप्प्याला नैराश्यभावनेच्या बळी असतात/ ठरतात असा निष्कर्ष काढला गेला आहे.

स्त्री जोवर कुटुंबासाठी व मुलांसाठी त्याग करते आहे तोवरच घराबाहेर त्या स्त्रीला मिळणार्‍या यशाची किंमत केली जाते हेच आजच्या सामाजिक मानसिकतेचे दारुण वास्तव आहे. बाईकडे घरातील व कामावरील प्रश्न सोडविण्याचे कौशल्य असले पाहिजे, तिला किरकोळ दुरुस्त्या करता आल्या पाहिजेत, तिच्यात वात्सल्य - स्वयंशिस्त - मातृत्व ठासून भरलेले पाहिजे (जणू काही जन्मतःच ते तिच्यात आलेले असते!), स्वयंपाकघरात तिने उत्तमोत्तम पदार्थ बनविले पाहिजेत, सासूचा मूड सांभाळला पाहिजे, दह्याचे विरजण लावता आले पाहिजे, दिसायला ती 'अप-टू-डेट' पाहिजे, ती गृहकृत्यदक्ष हवी, तिला माणसांची आवड हवी, तिच्यात आधुनिकता व पारंपारिकतेचा योग्य मेळ हवा..... अशी एक लांबलचक जंत्रीवजा अपेक्षांची यादी सध्याच्या स्त्रीसमोर असते. आणि त्यातील बर्‍याचशा अपेक्षांना ती स्त्री बघता-बघता स्वतःच्याच अपेक्षा समजू लागते!! तिचा सुपरवुमनगिरीकडे प्रवास सुरू होतो....

खरे तर कौतुक कोणाला आवडत नाही? प्रशंसेचे दोन शब्द ऐकल्यावर व्यक्तीला जरा जास्त बळ येते. पण सर्व विषयांमध्ये, सर्व आघाड्यांवर आपण ''चांगले'' किंवा ''उत्तम'' ठरावे, आपली इतरांनी स्तुती करावी अशी अपेक्षा या सुपरवूमनला सततच्या ताणाखाली किंवा दडपणाखाली ठेवते. सुपरवूमन ''स्वतःसाठी'' वेळ काढू शकत नाही किंवा त्याचे तिला महत्त्व वाटत नाही. स्वतःला अग्रक्रम देणे तिच्या गावी नसते. ती दुय्यमता स्वीकारते व कित्येकदा ही दुय्यमता तिच्या व इतरांच्या इतकी अंगवळणी पडते की दुय्यम अस्तित्वाचाही एक ''संस्कार'' बनतो. सुपरवूमन आपण घरी व बाहेर, दोन्ही आघाड्यांवर ''उत्कृष्ट'' ठरावे या अपेक्षेने काम करत असते. जे काम ती इतरांबरोबर विभागणी करून वाटून घेऊ शकते ते सगळीकडे धावून धावून स्वतः करणे हेही त्यातच येते. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, त्यांनी आपले कौतुक करावे, आपण त्यांना (कायमच) सुख द्यावे, कोणाला तक्रारीला कुरकुरीला स्कोप देऊ नये या अपेक्षांचा कधीतरी कडेलोट होतो.

मग त्यातून कधी नैराश्य येते, कधी मनाशी कुढणे सुरू होते. इतरांपायी आपला बळी दिला जातोय किंवा आपल्यालाच त्याग करावा लागतोय असे वाटू लागते. इतरांना आपली किंमत नाही ही भावना प्रकर्षाने जाणवू लागते. त्यांच्या प्रशंसेविना, पोचपावतीविना सारे केलेले काम व्यर्थ / कमी महत्त्वाचे वाटू लागते. किंवा 'मी एवढी खपते पण कुणाला माझी किंमत नाही' यासारखे विचार मनात डोकावू लागतात. कधी मनात कडवटपणा येतो. तर कधी वैताग, निराशा, हताशपणा, कमकुवत झालेला आत्मविश्वास भेडसावत राहतो. याचा परिणाम मुख्यत्वे स्त्रीच्या मनःस्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य, नातेसंबंध व एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर होत असतो. पर्यायाने त्या कुटुंबाच्या स्वास्थ्यावरही या सर्वाचा परिणाम होतो. अशा घरातील मुलांची वाढ निकोप तरी कशी होणार? त्यांना कामाच्या विभाजनाचे महत्त्व, स्वयंशिस्तीचे महत्त्व, स्वावलंबनाचे महत्त्व तरी कसे कळणार?

सुपरवूमनची ही काही लक्षणे सांगितली आहेत :

१. कामांची विभागणी न करता 'मैं सबकुछ कर सकती हूँ |' असा अट्टहास व भूमिका.
२. इतर स्त्रियांशी व स्वतःशीच प्रत्येक कामाच्या बाबतीत स्पर्धा
३. कोणाला ''नकार'' देणे कठिण वाटणे किंवा क्वचितच नकार देणे.
४. अंगावर जास्तीच्या जबाबदार्‍या ओढवून घेणे.
५. आपण केलेल्या कामाविषयी क्वचितच समाधान वाटणे.
६. सतत कामाच्या दडपणाखाली वावरणे.
७. आपण पर्फेक्ट माता/पत्नी/मुलगी असावे, आपण पर्फेक्ट एम्प्लॉयी असावे याची प्रबळ इच्छा.
८. सर्वांच्या सर्व मागण्यांना आपण पुरे पडण्याची तीव्र इच्छा.
९. खूप सार्‍या गोष्टी एकाच वेळी करत असल्याने सततची धावाधाव. मनात त्या आव्हानांना कमी पडण्याची, हरण्याविषयीची धाकधूक - भीती.

ह्या प्रश्नांची उत्तरे जर काही अंशी किंवा पूर्णतः होकारार्थी आली तरी ती 'सुपरवूमन सिंड्रोम' ची लक्षणे मानायला हरकत नाही :

१. तुम्हाला बरेचदा दडपण, दबावाखाली वावरल्यासारखे, कामाच्या ओझ्याने गुदमरल्यासारखे, तणावग्रस्त, इतरांपेक्षा मागे पडल्यासारखे, घायकुतीला आल्यासारखे वाटते का?

२. दिवसभरात तुमची कामे संपतच नाहीत व ''टू डू'' मधील कामांची यादी वाढतच जाते का?

३. तुमची दमणूक, थकलेले असणे, कंटाळलेले असणे हे अगदी सर्वसामान्य चित्र आहे का?

४. दिवसभराच्या रूटीनमध्ये जेवढ्या गोष्टी कोंबता येतील तेवढ्या कोंबणे व करणे याकडे तुमचा कल आहे का?

५. लहानसहान गोष्टींवरून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणे, चिडणे, ज्या गोष्टी व्हायला विलंब लागत आहे त्यांवरून चिडणे हे तुमच्यासाठी कॉमन आहे का?

६. इतर लोक काय करतात त्यावरून तुम्ही स्वतःला दडपण आणता का? त्यांची बरोबरी करता यावी याकडे तुमचे लक्ष असते का?

७. तुम्हाला आयुष्यात आनंद वाटत नाही का?

८. वारंवार स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्याची तुम्हाला गरज भासते का? उदा : तुमची आई, सासरचे नातेवाईक, सहकारी, बॉस, मित्रमैत्रिणी, नवरा किंवा तुम्ही स्वतः

९. तुमचे दिवसभराचे वेळापत्रक इतके व्यस्त आहे का, की त्यात व्यत्यय, आकस्मिक परिस्थिती, इमर्जन्सी किंवा एखाद्या मोठ्या संधीला सुद्धा वाव नाही?

वास्तविक पाहता, निम्न दर्जाचे किंवा सर्वसाधारण दर्जाचे काम करणे, सर्वसाधारण दर्जाचे आयुष्य जगणे ही कोणाचीच ''महत्त्वाकांक्षा'' किंवा ''स्वप्न'' नसते. परंतु सतत स्वतःला उत्कृष्ट बनवण्यासाठी ढकलत राहणे, जे जे प्रावीण्य मिळवू त्यात समाधानी नसणे, स्वतःला कमी महत्त्व देणे या सर्व गोष्टींचा सुपरवूमनच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वास्थ्यावर, मानसिकतेवर व नातेसंबंधांवर हळूहळू परिणाम होत जातो असे निरीक्षण आढळून येते. कधी कधी सुपरवूमन सिंड्रोम मानसिकतेची स्त्री तिच्या वाट्याला जर साचेबद्ध, ठराविक भूमिका असेल तर ती भूमिका आपण जास्तीत जास्त उत्कृष्टपणे कशी करू शकतो ह्याबद्दल ग्रस्त झालेली असते. (उदा : जर ती स्त्री गृहिणी असेल तर आपण उत्कृष्ट माता, उत्कृष्ट व्यवस्थापक, सुगरण इ. असावे यासाठीचा अट्टहास)

जिथे ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी करत जाण्यापासून बहुतांशी स्त्रियांची या दिशेने सुरुवात होते. पण त्या आपल्या या प्रवासात कधी ''सुपरवूमन''चा वेष परिधान करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. बहुतेक सर्व स्त्रिया आपली नोकरी, घर, नातेसंबंध यांत खूप वेळ व शक्ती पणास लावत असतात. त्याचे कारण आहे की या सर्व गोष्टींबद्दल त्यांना वाटणारी प्रचंड आत्मीयता. परंतु ह्या प्रवासात आपल्या शक्ती, क्षमतेपलीकडील गोष्टी करायला जाणे किंवा वास्तवाला न धरून स्वतःला जास्त रेटत राहणे हे कधी सुरू होते ते त्या व्यक्तीलाही उमगत नाही.

बरं, आणि ह्या सर्वातून काही काळ स्वतःची मानसिक सुटका करून घेण्याचा स्त्रीचा मार्गही आभासी जगाचाच असतो कित्येकदा! कधी मग तिला टीव्ही सीरियल्समधील स्त्री-भूमिकांच्यात स्वतःची प्रतिमा दिसते तर कधी सीरियल्समधून दिसणार्‍या, तिच्यापेक्षाही वाईट स्थितीत असणार्‍या कितीतरी स्त्रिया या देशात आहेत यावर तिला समाधान मानावे लागते. रिअ‍ॅलिटी शोजमधून इतर लोक किती सहनशील असतात याचे पुरावे तिला मिळतात तर काही मालिकांमधील दु:ख-शोक-परंपरांच्या जाळ्यात वेढलेली स्त्री पाहून आपण तिच्यापेक्षा खूप चांगले आयुष्य जगतो अशी ती स्वतःची समजूत घालते. स्वतःच्या आरोग्य, सौंदर्य, प्रतिमा वर्धनासाठी वेगवेगळी प्रसाधने, उत्पादने विकत घेणे व वापरणे यांत ती स्वतःला दिलासा देऊ पाहते.

फार कठोर वाटतंय का हे निरीक्षण? तर ही मानसिकता तुम्हाला आज जगात अनेक ठिकाणी दिसेल. मुळात सुशिक्षित, बुद्धिवान, चांगले कमावणार्‍या स्त्रियांना जगात, कुटुंबात, समाजात जास्त टीकेला तोंड द्यावे लागते हे उघड वास्तव आहे. आणि मग त्याला बळी पडून स्वतःला पेलणार नाहीत इतकी अवास्तव उद्दिष्टे समोर ठेवून काम करणार्‍या स्त्रिया जगात कमी नाहीत. त्यातून त्यांचीच हानी होत आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

कुठे आहे स्वतःसाठी वेळ? स्वतःच्या तब्येतीची हेळसांड, दुर्लक्ष हेही त्याचे आणखी काही परिणाम. मग भुकेवर परिणाम होतो, एनर्जी कमी पडते, अतीव दमणूक जाणवते, त्यासाठी वेगळी ताकदीची औषधे, शरीराचे स्वास्थ्य बिघडते त्यासाठी औषधे, रात्री नीट झोप येत नाही म्हणून झोप येण्यासाठी औषधे, नैराश्य येते म्हणून अँटिडिप्रेसंट्स असे दुष्टचक्र सुरू होते. डॉक्टरने लिहून दिलेली औषधे मग स्वतःच्या मनाने घेण्यास सुरुवात होते. त्यांवरचे अवलंबित्व वाढते. भावनिक ताण सहन होत नाहीत. सतत मुलांची काळजी, नोकरी-व्यवसायाची काळजी, घराची काळजी, डेडलाईन्स, कामांचे ओझे, कुटुंबाच्या मागण्या आणि कामात साथ न देणारे - सहकार्य न करणारे गृहसदस्य / जोडीदार यांमुळे हे प्रश्न कैकपटींनी वाढत जातात.

आणखी एक दिसणारा परिणाम म्हणजे स्वतःच्या पर्फेक्शन बरोबरच इतरांकडूनही तेवढ्याच पर्फेक्शनची अपेक्षा करणे व त्याबद्दल अतिशय आग्रही, ठाम असणे. जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर त्याचा पिच्छा पुरविणे. त्यातून आपले नातेसंबंध, सहकारी दुखावले जाण्याची पर्वा नसणे. निर्णयशक्तीवर होणारा परिणाम, अनिश्चितता, कामावरून सारखे लक्ष विचलित होणे, मन एकाग्र होण्यास अडचण अशा इतर गोष्टीही काही केसेसमध्ये दिसून येतात.

मुळात सुपरवूमन हेच एक आभासी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांच्या अपेक्षा पुर्‍या करणारी, सर्व भूमिका उत्कृष्टपणे करणारी, सर्व कामांत तरबेज अशी व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही. सर्वांना आपला वेळ, श्रम, अग्रक्रम देणारी स्त्री मनातून उपाशीच राहते - कारण ती स्वत:लाच वेळ देत नाही. पर्यवसान मनात जाणवणारे असमाधान, पोकळी, नैराश्य यांत होते.

काय उपाय?

  • सर्वप्रथम मनातल्या मनात का होईना, स्वतःला हा प्रॉब्लेम आहे याची कबुली देणे ही या मानसिकतेतून बाहेर येण्याची पहिली पायरी आहे.
  • सगळ्या गोष्टी 'मॅनेज' केल्याच पाहिजेत, त्या उत्कृष्टच असल्या पाहिजेत हा अट्टहास थांबवावा.
  • तुम्ही एखाद्या गोष्टीत वाकबगार नाही म्हणून लाज, शरम, नैराश्य, भीती, कमीपणा वाटायची गरज नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वात इतर कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवावे.
  • मल्टि-टास्किंग कमी करावे. आयुष्यातील, दिनक्रमातील गुंतागुंत वाढवण्यापेक्षा ती कमी कशी करता येईल यावर लक्ष द्यावे.
  • आपल्या गृहसदस्यांची, सहकार्‍यांची या कामी जरूर मदत घ्यावी. त्यांनाही सामील करून घ्यावे. विश्वासू व्यक्तींजवळ मन हलके करावे.
  • आलेल्या दिवसाचे स्वागत स्वतःबरोबर थोडा गुणात्मक वेळ घालवून करावे. घड्याळावरून सततची नजर हटवावी. आपल्या 'टू डू' लिस्टमधील कामांच्या संख्येवर मर्यादा आणावी. मोकळा श्वास घ्यावा. इतरांची आपल्या कामांमध्ये मदत घ्यावी.
  • आज मी चिडचिड न करता, न घाबरता, नैराश्य टाळून आनंदाने माझी कामे करणार आहे हे मनाशी ठरवावे.
  • शरीराला व मनाला दिवसातून काही काळ तरी विश्रांती देण्याची सवय लावून घ्यावी. रात्रीची झोप किमान ६ ते ७ तासांची व निर्वेध हवी. रूटीन नॉर्मल हवे. (झोपायच्या व उठायच्या वेळा). सुरुवातीला हे थोडे कठीण वाटेल, पण सवयीने साध्य होईल. तणावमुक्तीसाठी योग्य उपाय करावेत. उदा : मेडिटेशन, योगा इ. तसेच स्पा, मसाज, सहल यांसारखे उपाय करावेत.
  • जिथे जिथे तुम्हाला कामाचे दडपण, तणाव जाणवेल तिथे सहकारी, विश्वासू व्यक्तींची त्या कामी मदत अवश्य घ्यावी. किंवा त्यांच्यापाशी मन मोकळे करावे.
  • आपल्या कामांचा आवाका ठरवून घ्यावा व त्याखेरीजच्या कामांना स्पष्टपणे किंवा सौम्यपणे पण ठाम ''नकार'' द्यायची कला आत्मसात करावी. किंवा सरळ सरळ ''नाही'' म्हणून सांगावे.
  • आयुष्यातील आपले अग्रक्रम ठरवावेत व त्यांनुसार काय महत्त्वाचे आहे ते ठरवावे. त्यात आपल्या साथीदाराचाही पुरेपूर सहयोग घ्यावा.
  • तुम्ही एखादे काम करू शकत नसल्यास स्वतःला मनात अपराधी वाटणे, इतरांना त्याबद्दल सॉरी म्हणत राहणे थांबवावे. होईल सवय!
  • आपल्या सहचराशी / जोडीदाराशी, गृहसदस्यांशी, मित्र-मैत्रिणी / नातेवाईक यांच्याशी तुमच्या या प्रॉब्लेमबद्दल बोला. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. तुमच्यावर किती ताण येत आहे याची त्यांना कल्पना द्या. एकटीनेच सर्व तोलले पाहिजे असा कोणताही नियम नाही. त्यांची मदत घ्या. कामाचे वाटप करा. आवश्यक तिथे मोलाने / बाहेरून काम करून घ्या. फायदा होईल.

आयुष्यात महत्त्व कशाला आहे?

१. 'आपल्या आयुष्यात महत्त्वाचे काय आहे?' या प्रश्नावर तुम्ही स्वतः स्वतःशी, व तुम्ही व तुमचा जोडीदार मिळून एकमेकांशी बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच तुम्हाला तुमचे अग्रक्रम उलगडतील. मुलं मोठी झाल्यावर ती जेव्हा समाजात स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरतील तेव्हा त्यांनी कसे असावे असे तुम्हाला वाटते? त्या दृष्टीशी तुम्ही आताच्या घडीला मुलांना ज्या ज्या क्लासेस, अ‍ॅक्टिव्हिटीज इ. मध्ये गुंतवत आहात ते कितपत महत्त्वाचे आहे हे ताडून बघाल का? तुमच्या वैवाहिक नात्यात तुम्हाला काय हवे आहे? काय अपेक्षित आहे? कशाला महत्त्व आहे? हेही अवश्य पहा.

२. एक स्वाध्याय म्हणून तुमच्या सर्व कमिटमेंट्सची व नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीजची एक यादी करा. तुमच्या दैनिक, साप्ताहिक, मासिक कमिटमेंट्स, जबाबदार्‍या कोणकोणत्या आहेत? ही यादी डोळ्यांखालून घातलीत की तुम्हालाही कळेल की तुम्ही किती किती ठिकाणी स्वतःला बांधून घेतले आहे!

तुमचे कदाचित ''पर्फेक्ट'' आयुष्य नसेलही! त्यात अनेक गोंधळ, विलंब, व्यत्यय असतील.... पण मिनिटा-मिनिटाचा हिशेब मांडणारे, आकस्मिक परिस्थितीत कोलमडून पडणारे आयुष्यही कोणाला हवे असते? मुलांच्या बरोबर, जोडीदाराबरोबर मनमोकळे क्षण घालविणे, स्वतःबरोबर निवांत क्षण व्यतीत करणे यासारखे दुसरे सुख नाही! सुपरवूमनच्या वेषातून बाहेर येऊन पुन्हा असे निवांत, दिलासा देणारे क्षण अनुभवण्यासाठी एवढे कारण माझ्या मते पुरेसे आहे.

-- अरुंधती कुलकर्णी

-------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ : आंतरजालावरील अनेक संकेतस्थळे व त्या शिवाय,

The Superwoman’s Struggle, Shefalee Vasudev, Jul 24 2011, THE INDIAN EXPRESS.

End the Superwoman Syndrome, MIKELANN VALTERRA, March 19, 2010.

Overcoming the Superwoman Syndrome, Dr. Madeline Ann Lewis.

Working Outline – Fear, Worry and Anxiety, TRYING TO DO IT ALL, Connie Larso.

Superwoman syndrome credited to popping prescription pills, Feb 26, 2010, http://www.dnaindia.com/health/report_superwoman-syndrome-credited-to-po...

Beware of Superwoman Syndrome, Work-life Satisfaction Boosts Productivity for Women Scientists, http://www.elsevierfoundation.org/new-scholars/stories/video-superwoman.asp

(* सार्वजनिक धागा)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दमलो....... (नुसते वाचून... ) Happy

नेहेमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण. फक्त मला वाटते एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे का?
"विभक्त कुटूंब पध्दती": पुर्वी एकत्रीत कुटूंब असताना घरातच बर्‍याच प्रमाणात सपोर्ट सिस्टीम ऊपलब्ध होती. आता मात्र दोघेही बहुतांशी संपूर्णवेळ नोकरी/व्यवसाय यात जुंपलेले असल्याने अनेक दैनंदीन आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करतानाही दमछाक होते (हे पुरूष, स्त्री दोघांनाही लागू आहे. पण पारंपारीक अर्थाने स्त्री च्या क्रयशक्ती वर याचा अधिक परिणाम होतो कारण तीच्या जबाबदार्‍या अधिक असतात). अशा वेळी घराबाहेर (जिथे रहातो तिथे, कामाच्या ठिकाणी, वगैरे) जर सपोर्ट सिस्टीम बनवता आली तर मला वाटते प्रत्येक वेळी "सुपरह्युमन" व्हावे लागणार नाही.

"आमच्या वेळी घरातील पाच तोंडांचे जेवण खावण, शिवाय नोकरी ई सर्व आम्ही संभाळतच होतो" हा युक्तीवाद आपण बरेच वेळा आपल्याच आई-वडीलांकडून ऐकत असतो. त्यांच्या वेळेची स्पर्धा, प्रश्ण, असुरक्षितता, ई. सर्व गोष्टि आजच्या तुलनेने कमी वाटत असल्या तरी मला वाटते प्रत्त्येक गोष्टीला वेळ, काळ याचा संदर्भ असतो आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर मग मात्र घर, नोकरी, संसार, जबाबदार्‍या या गुंत्याचे व्यवस्थापन करणे अशक्यप्राय होवून बसते.

"घरातील स्त्री जर ऊभी असेल तर घर ऊभे असते, ती बसली की घर बसते" ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली म्हण अगदी खरी आहे. आजच्या युगातही याचा अनुभव आपण घेत असतोच. त्या अर्थाने स्त्री पूर्वीपासूनच "सुपरवूमन" आहे असे म्हणावे लागेल. मात्र आजच्या युगात आता तीला सर्वच बाबतीत यशस्वी व्हायला "सुपरमॅन" च्या साथिची गरज आहे हेही खरे! Happy

अशा वेळी घराबाहेर (जिथे रहातो तिथे, कामाच्या ठिकाणी, वगैरे) जर सपोर्ट सिस्टीम बनवता आली तर मला वाटते प्रत्येक वेळी "सुपरह्युमन" व्हावे लागणार नाही. <<<
+१००

सभ्य प्रतिसाद - अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन व धन्यवाद

किंचित विस्तृत प्रतिसाद - लेखातील मुद्दे किंचित जनरलाईझ्ड वाटले. मात्र आज स्त्रियांची असलेली परिस्थिती अत्यंत उत्कृष्ट शैलीत निवेदन करून त्यावर सहज जमतील असे उपायही सुचवलेले आहेत. याचा खचितच उपयोग होऊन एकंदरीत स्त्रीमनावर असलेला जबाबदार्‍यांचा व तथाकथित कर्तव्यांचा बोजा काहीसा कमी व्हावा. आज कामानिमित्त बाहेर राहून पुन्हा घरच्या जबाबदार्‍या उचलणारी स्त्री खरे तर कुटुंबातील सर्वात महत्वाचा व निर्णयक्षम घटक ठरायला हवा, मात्र पारंपारीक अपेक्षांच्या दगडाखाली सापडलेले मन तिथेच ठेवत दगड पेलत बिचारी आयुष्य कंठत आहे. उत्तम निरिक्षणे, सुयोग्य संदर्भ व ठाम मते.

मनात आलेली पहिली नैसर्गीक प्रतिक्रिया- तुफान विनोदी नाटुकली

-'बेफिकीर'!

म्रुदुला +१

अकु खुप सुंदर आहे लेख. आणि विचार करायला लावणारा. अगदी अगदी असं होत वाचताना:)

बाकी चर्चा आता निवांत वाचेन.

सर्व प्रतिसाद दात्यांचे धन्यवाद! Happy

वरदा, प्रचंड अनुमोदन.

दिनेशदा, अचूक निरीक्षण! लढाईसारख्या घटनांमध्ये पुरुषांची स्थानिक संख्या रोडावणे - स्त्रियांनी व्यवस्था सांभाळणे सारख्या घटना भारतात मुघल काळातही घडल्या की! मात्र त्या लढाया अंतर्गत होत्या. तसेच तेव्हा औद्योगिक क्रांतीचे वारे भारताला शिवले नव्हते. नायजेरियातील स्त्रियांची स्थिती वाचून काय प्रतिक्रिया द्यावी हे मात्र अद्याप उमगले नाहीये. थोडक्यात मुलाचा जन्म, पालन-पोषण इ. बाबतीत स्त्रीच सर्वेसर्वा असते. ती स्वतःचे व मुलांचे सर्व काही बघते आणि फक्त शरीरसंबंधापुरता तेथील पुरुषांचा त्यात सहभाग असतो असेच की!

मी_मयुरी.... अशाच काही केसेस मीही पाहिल्या आहेत.

नताशा.... वेल सेड!

आगाऊ << कुटूंबाच्या बाबतीत स्त्री-पुरुष या दोघानींही ' It is not always required to give the best of the world, but you can definitely try to give the best of you' एवढे लक्षात ठेवले पाहिजे. >> अनुमोदन!

गा. पै. असहमत.... शिवाय कोणी कोणते काम करावे / करू नये हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, नाही का? हां, त्यासोबत इतर कोणत्या जबाबदार्‍या कशा घ्याव्यात / घेऊ नयेत ह्याबद्दल प्रत्येकाची मते भिन्न असणार! मात्र कोणतेच काम आपल्या व्यक्तिगत जीवनाची, तब्येतीची अथवा मनस्वास्थ्याची वाट लावण्याइतपत महत्त्वाचे नाही - नसावे.... भले ते काम घरातील असो किंवा घराबाहेरील!

मृदुलाच्या मुद्द्यांशी सहमत आहे.

योग, तो कुटुंब पद्धतीचा मुद्दा लक्षात आला होता, फक्त लेखावरील चर्चेला नेहमीची वळणे नकोत म्हणून तीव्र मोह होऊनही तो टाळला! Happy सपोर्ट सिस्टिमच्या मुद्द्याला हजारो अनुमोदक.

अशा वेळी घराबाहेर (जिथे रहातो तिथे, कामाच्या ठिकाणी, वगैरे) जर सपोर्ट सिस्टीम बनवता आली तर मला वाटते प्रत्येक वेळी "सुपरह्युमन" व्हावे लागणार नाही. <<< प्रचंड अनुमोदन.
जिथे जिथे बायका काम करतात तिथेच जर त्यांच्या मुलांसाठी पाळणाघरं उभारली तर बायकांचे बरेच टेंशन कमी होईल. विषेशतः पोलिस ठाणे,रुग्णालये जिथे स्त्रीयांना वेळेचे बंधन नसते अश्या ठिकाणी पाळणाघरे फार उपयोगी ठरतील Happy

गापै,
एकाच्या पगारात भागत नाही म्हणून बाईला घराबाहेर काढायचं.>>> यात स्त्रीला किंवा पुरूषांना काहीतरी अपमानास्पद गोष्ट आहे असा टोन आहे. तो का ते कळाले नाही. गरज, आवड किंवा एखाद्या क्षेत्रात काहीतरी कर्तृत्व करून दाखवणे यापैकी कोणत्याही कारणाने स्त्री घराबाहेर पडली तर चुकीचे काय त्यात? आणि आतातर नवीनही काय?

कौटुंबिक जबाबदार्‍यांमुले तिची सम्यक क्षमता (fair deal capacity) पुरुषाच्या निम्मी किंवा कमी धरायला हवी. >> हे दुसर्‍या अर्थाने बर्‍याच देशात असावे, पण फक्त थोडा काळः गरोदर असताना व मूल अगदी लहान असताना "reasonable accommodation" केले जाते, म्हणजे एरव्हीपेक्षा कमी स्ट्रेस असलेले किंवा कमी वेळाचे काम, मधे थोडा वेळ फीडिंग साठी जाता येणे वगैरे. ते योग्यच आहे. एरव्ही काही फरक नाही.

लेखन आवडले, पटले. सुदैवाने मी या विचारसरणीतून लवकर बाहेर पडले पण एकेकाळी जीव जाईस्तोवर आटापिटा करायचे. आता नाही.

अरुंधती ,खूप अभ्यासपूर्ण लेख आहे .
सपोर्ट सिस्टीम बनवता आली तर मला वाटते प्रत्येक वेळी "सुपरह्युमन" व्हावे लागणार नाही. <<< +१
सुरुवात घरातून सुरू झाली पाहिजे.वरदा म्हणते तसे मुलांना समानतेची शिकवण दिली पाहिजे.
<<आपल्याकडे आणखी एक विचित्र परंपरा घडत गेली. ती म्हणजे स्त्रीने सर्वांच्या नंतर अन्नग्रहण करायचे.>> आम्ही सुट्टीत आजोळी जायचो तव्हा ह्या प्रकारची खूप चीड यायची.तेव्हाच ठरवले होते हे बदलले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला हवा .
जितक्या लवकर या अभासातून बाहेर येवू तितके समाधान आणि शांती मिळेल हेच खरे !

गापै
बाईला अर्थार्जनासाठी घराबाहेर काढलं ते तथाकथित आधुनिक काळाने.>>>>>> माझ्या आजीची आजी भलतीच आधुनिक की! त्या काळात ती शेतीत काम करत होती आज्याच्या खांद्याला खांदा लावून Happy

एकदा गावाला जावुनच या. नांगर धरणारी बाई सहज सापडेल.

>> त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?
हे मी माझ्या लहानपणी अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या स्त्रियांना पाहिलं तेव्हा मला वाटलं त्यांनी यांत फ़रक पडावा म्हणून काही केले का? माझ्या घरच्या जवळून पाहिलेल्या लोकांमध्ये सगळ्या घरांमधल्या बाबा लोकांना मदत करायला आवडे पण पुष्कळवेळा त्या त्या घरच्या आया "तुम्ही जाऊद्या हो...हे तुम्हाला जमत नाही" किंवा "मला सांगायला आवडत नाही" म्हणून टाळलेलंही पाहिलं आहे..त्यावरून माझा मी धडा घेतला की सर्व स्वतःलाच जमत म्हणून तोरा करण्यात काहीच अर्थ नाही..जे त्याला चांगलं जमतं ते त्याला करू द्यावं...मुलांना आंघोळी घालायचं काम जर तो आनंदाने करतोय तर करू दे....साग्रसंगीत नसेल पण जे त्याला करायला आवडतं ते त्याला करायचा एखादा दिवस द्यावा आणि इतर दिवशीही त्याला जरी कळत नसेल तरी तू हे कर असं हक्काने सांगुन आपल्याला मदत हवी आहे तर ती मागणे हे काम मी करते..
यात खंड कधी पडतो?? दुर्दैवाने जेव्हा काही इतर स्त्रियांनाच ते टोचतं तेव्हा...म्हणजे अजुनही "हे बघ हिचा नवरा भांडी घासतो" किंवा "काय केलंय बघ नवर्‍याचं" अशा प्रकारच्या कमेंट्स समाजात कुठे न कुठे ऐकायला मिळतात तेव्हा जास्त वाईट वाटतं......आणि माझं ऑब्जरवेशन हे कमेंट्स खुपदा सासु, नणंदा या अशा किंवा काही वेळा चक्क आपल्याच मावशाही थोडक्यात जास्त करून इतर स्त्रियाच ते तसं करतात त्यामुळे मग ही सुपरवुमन जन्माला आली असावी..या कमेंट्सकडे काणाडोळा करणे हे आपल्या हातात आहे..किंवा वैताग आला तर यातील एखादीला खमकावुन सांगणे....आणि दुसरं म्हणजे आता आम्ही जेव्हा सासू किंवा आई होऊ तेव्हा आपल्याला मुलगा असो वा मुलगी घरातल्या बेसिक गोष्टी त्या/तिला शिकवणे आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या पार्टनर्सना मदत केल्यास त्याचा बाऊ न करणे..
मला वाटतं आमच्या पुढच्या पिढीचे संसार जर त्यांच्यावर हे कामाचे योग्य संस्कार केले तर सुपर वुमन आणि सुपर मॅन यापैकी कुणाची गरज न पडता खर्र्‍या अर्थाने दोघांचा संसार असं व्हायला हरकत नाही..निदान तसे प्रयत्न आम्ही करू शकतो..
कुठेतरी वाचलं होतं (कदाचित माबोवरच) की स्त्री-पुरुष समानता म्हणजे दोघांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं..

अरुंधती खूप छान पोस्ट...आणि खूप गरजेच्या विषयावरची....कुठेतरी आपणही असे या शर्यतीत धावत असू हे जाणीव करुन देणारी ...त्यासाठी आपले आभार...

उत्तम लेख.
<<मुळात स्त्री ही च अभ्यासपुर्ण आहे.सहनशक्ती कांकणभर जास्त आहे.टाईम मॅनेजमेंट मग ते नवर्‍याच्या/मुलांच्या/आप्तांच्या बाबतीत/घर-नोकरी-व्यवसाय-संगोपन कोणतेही क्षेत्र असु दे .>>>
हेहेहे Biggrin
हे असले सगळे गुण का सारखे जबरदस्ती बायकांच्या माथी मारतात कळत नाही. माझ्यात असा एकही गुण नाही. अनेक बायका माहितीत आहेत ज्यांच्यात असे गुण नाहीत. खरेतर माझ्यामते हे सगळे गुण हे खरे गुण नसून इतर पर्यायच उपल्ब्ध नसल्याने बायकांच्या माथी मारले गेले आहेत. कोणाला हौस असणारे जन्मभर ओझ्याच्या गाढवाप्रमाणे राबण्याची , पण,बहुतेक बायकांना पर्याय नाही ,हेच खरे.

सहनशक्ती == दुसरा पर्यायच नसल्याने सहन शक्ती आहे असे दाखविणे
टाईम मॅनेज्मेंट =यालाही पर्याय नाही
बालसंगोपन - पर्याय नाही
लहान्पणापासून अगदी जुन्या पीढीतल्या ( आज्जी ई) सुद्धा गृहीणींकडून कानावर पडलेली हे सुवचने बघा
- यांना इकडची काडी तिकडे करायला नको, फुकटात मिळालीये ना मोलकरीण घ्या राबवून
- त्यांच्या घरचे जेवण चांगले असते का, बरे जा मग त्यांच्याकडेच जावून जेवा बघा मिळतेय का
- बरे वाटत नसले तरी झोपुन कसे चालेल , एक दिवस जेवायला उशीर झाला तर मलाच खायला येतील ना

हे आणि असे अजुनही भारी संवाद सर्वांच्या कानावर पडलेच असणार कधी ना कधी. त्यातुन बायकांच्या इतर कोणत्याही गुणापेक्षा मलातरी त्यांची अगतिकताच दिसून येते.

छान मांडलेय.

सुट्टीच्या दिवशी रोजच्या रोज तीच कामं करण्यापेक्षा कधीतरी सरळ झोपून जाणं वा बाहेर जावून बिन उद्देशाच फिरणं हेच उत्तम वाटते मला. हा माझा ताण कमी करायच उपाय.
व्यवस्थापन वाचले परवा आणि वाटलेले , लोकं किचनात किती विचारपुर्वक कामं करतात. एक मिनिटे तुलना केली पण मग सोडून दिली तुलना. अपनेको जैसा जमताइच वैसे करनेका. इथे कोणाला उत्तर द्यायचेय.
आई/मावश्या वगैरे ह्या सुपरवुमेन सिंड्रोम मध्ये बहुधा अडकलेल्या होत्या/आहेत अजुन वाटते.:)

डेलिया, मला वाटते पर्याय नाही म्हणूनच माथी मारलेले असते दुसर्‍या वर्गाने.
एकाला पर्याय नाही(तो नसतो सुद्धा बर्‍याच वेळा) असेच समजून स्वीकारावे लागते, दुसरा तिलाच जमते म्हणून समज करून खुष रहातो व पुढे जातो.

उत्तम लेख...खुप खुप विचार करायला लावणारा..आपणही कुठेतरी ह्या सींड्रमचे बळी आहोत ह्याची जाणीव करुन देणारा.
दिनेशदा,वरदा,नताशा,मृदुल्,आगावाच्या मुद्द्यांशीही सहमत. छान पोस्ट्स!
गा पै ची पोस्ट वाचुन हसावं की रडावं तेच कळलं नाही. म्हणुन बेटर ऑपशन Proud
आम्ही जेव्हा सासू किंवा आई होऊ तेव्हा आपल्याला मुलगा असो वा मुलगी घरातल्या बेसिक गोष्टी त्या/तिला शिकवणे आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या पार्टनर्सना मदत केल्यास त्याचा बाऊ न करणे..>>> +१००००००

सुरेख लेख. मी पण एके काळी ह्याची शीकार होते. अगदी थोडा काळ. माझ्या आईने मला बाहेर काढले. मी माझ्या पुरते शोधलेले उपाय

१. घरात माझे सासरे आणि नवरा प्रचंड कामे करतात. अगदी भांडी घासण्या पासुन ते कपडे वाळत घालणे वगैरे
२. आम्ही त्यांना कधीच आडवत नाही. रोज संध्याकाळचा चहा सासरे करतात.
३. मला स्वयंपाक करण्याची सक्ती नाही. एखाद्या वेळेस सासरे पोळ्या करतात ( रेटी मेकरवर त्यांना ते तंत्र जमलं आहे)

४. नवरा घरात खुप कामे करतो.

मी बाई आहे म्हणुन कधीच मला निर्णय स्वतंत्र्य नाही वगैरे प्रकार आमच्या कडे होत नाहीत. मी ईतर बायकांनी केलेल्या पदार्थांचे मनापासुन कौतुक करते. माझ्या सासु बाई कधी कधी अजुनही ह्या सुपर वुमन प्रकाराच्या बळी अजुनही होतात. मुख्य करुन त्यांच्या बहीणीला भेटुन आल्या की. पण आम्ही त्यांचे विमान जमीनीवर आणतो.

आपल्याला सगळं आलच पाहिजे हा अट्टाहास कशाला? घ्या की जरा सपोर्ट सीस्टीम ची मदत. ठेवा पोळी वाली. काम वाली. सासु बाई एखादी गोष्ट करते म्हणतात तर करु दे त्यांना. मीच केलेल सगळ चांगलं हे पालुपद कशाला?

मला वाटतं हे सुपर वुमन प्रकाराचे स्तोम माजले कारण म्हणजे प्रचंड असुरक्षितता. मी अशी वागले आता इतर लोक काय म्हणतिल? मला च हे करयला पाहिजे नाहीतर कोण करणार?

कशाला ... बाईग तु नसलीस तरी जग चालु रहाणार आहे. मुलांच्या पुढ्यात पाणी, कालवलेला भात, तुकडे केलेली पोळी, असं सगळं साग्रसंगीत वाढुन ठेवणार्‍या आया पाहिल्या की मला आश्चर्य वाटतं. येवढे त्यांना आपल्यावर अवलंबुन कशाला ठेवायचे. माझी एक मैत्रिण तिच्या १२ वीतल्या मुलाला रोज भरवायची. आणि त्याच कौतुक सांगायची. १२ वीत त्याला चांगले मार्क मिळाले नाहीत. तो तर नीराश झालाच, पण हीनेही अगदी आपलीच चुक झाली असे समजुन खुपच मनाला लावले होते. मी एक चांगली आई होवु शकले नाही हे तिच्या बोलण्यात नेहेमी यायचे.

हाच मुलगा नंतर बाहेर शिकायला गेला. आता तिच्या दर आठवड्याला त्या शहरात फेर्‍या असतात.

आपणच आपल्या मुलांना पंगु करतो. आभ्यास करताना त्यांच्या बाजुला बसतो. करा की जरा एकट्याने अभ्यास करायची सवय. नाही आलं तर आहात च तुम्ही मदत करायला.

'मला सगळं येतं" हा अट्टाहास कशाला.

दिनेशदा...

नायजेरीयन स्त्री बद्दल मागे ही शोभा बोंद्रेंच्या ' लागोस चे दिवस" मध्ये वाचले होते. खरच त्यांची तारेवरची कसरत आहे. त्यातही ते " एकपिको" प्रकरण वाचुन अजुनच शहारा आला. म्हणजे त्यांना सगळ्या वागणुकीतच न्हवे तर आधी मुले जन्माला घालुन आपली "ती" क्षमता ही सिध्ध करावी लागते.

मला वाटतं त्यांच्या ह्या परीस्थीतिला त्यांचा धर्म पण कारणी भुत आहे.

मोकीमी अगदी माझ्या सारखेच आहे की तुझे सासर Happy माझा नवरा तर किचन अगदी लख्ख ठवतो. पण तो माझ्या माहेरी गेल्यावर त्याने काही काम केले की आधी माझी आई अस्वस्थ व्हायची पण आता तिलाही बरे वाटते ते पाहून शेवटी बाई असो की पुरुष मेंटॅलिटी कशी आहे त्यावर अवलंबून आहे सगळ्ं

Pages