नॉनस्टिकची काळी बाजू

Submitted by वेका on 22 March, 2012 - 18:04

काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..

त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..

हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अ‍ॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आहे लेख. माझ्या डॉ. बहिणीने सांगितल्यापासुन मी नॉन्-स्टिक कोटींग जरासेदेखील निघायला लागले की ते पॉट्स लगेच टाकुन देते. ते फारच नुकसानकारक असते म्हणे. बाकी मी नॉनस्टिक भांडी (व्यवस्थित conditionमधली) वापरतेच.

करेक्ट राधिका..ते कोटिंग निघण्याबद्दलचं मी विसरलेच होते...ही भांडी वापरातानाचे चमचे वेगळे असतात पण तरी कधी न कधी ते कोटिंग निघतचं त्यावेळी तर ती फ़ेकुनच द्यावी...आणि ज्यांच्याकडे कामवाल्या बाया ही भांडी घासतात त्यांना ती न देता स्वतः घासलेली बरी असं एक मैत्रीण म्हणते....

थोडंसं कोटिंग निघालं तरी आपण बरेच जण तसंच सर्रास वापरतो. दोसे करताना गरमही किती होतं पॅन. जर नॉनस्टीक नाही तर दोश्यासाठी पर्याय काय. माझ्याकडे फुच्युराचा तवा आहे, त्यावर नाही होत दोसे.

निंबुडा, खालील लिंकवर पाहिलंत तर हे सर्व विस्तृतपणे माहित होईल...इथे तरी फ़ारच त्रोटक लिहिलंय...

http://www.naturalnews.com/029676_PFOA_non-stick_cookware.html

मनिमाऊ, थोडंसं कोटिंग निघालं तरी ते फ़ेकुनच द्यावं कारण ते तसंच वापरणं सगळ्यात जास्त हानिकारक ठरेल...दोश्यासाठी बीडाचा तवा ज्याला परदेशात हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड पॅन्स म्हणतात ते वापरून पाहिलंत का? तसंही माझे डोसे अम्मळ जाडच होतात म्हणून मी दोन्ही बाजुला ते भाजते...कदाचीत अगदी पातळ एकाच बाजुला भाजले जातात ते डोसे बीडवर कसे होतात माहीत नाही...

हा विषय खूप घरांमध्ये दुलर्क्षिला जातो आणि बाकी ठिकाणी प्रचंड पैसा खर्च करणारे लोकं पोपडे निघालेली नॉन स्टिक भांडी/तवे तसेच वापरतात म्हणून टाकलाय...ही भांडी आता खूप गांभीर्याने घ्यायला हवीत..नाहीतर आणखी वीस वर्षांनी कुणी संशोधनकर्ता त्यांच्या तोट्यांची स्टॅटेस्टिकल आकडेवारी देईल आणि आपण आधीच बळी पडलेले असू म्हणून निदान खबरदारी घ्यायला हवी...

बर्‍याचदा माहितच नसतं.. मला तरी आधी इतकं नीट माहित नव्हतं.. काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्सिडेंटली वाचली.

मी वाचलेल्या काही सूचना:
१. भांडी साफ करायला खरखरीत्/स्टीलची जाळी वापरु नका
२. ही भांडी खूप तापवू नका. (मी हे सर्सास करत आली आहे :() - तापवल्यास त्यातून केमिकल्स निघतात
३.ह्या भांड्यासोबत स्टीलचे चमचे वगैरे वापरु नका.
४. थोडं जरी खराब झालं तरी फेकून द्या.

मी ईकोसोल्युशन का कुठल्यातरी कंपनीची pfoa नसलेली नॉनस्टिक भांडी बघितली आणि ती आणायच्या विचारात आहे...

बीडाचा तवा म्हणजे कास्ट आयर्न ना? हार्ड अनोडाईज्ड वेगळं आहे ना? हा लेख वाचून मी ही नॉनस्टिक काढायच्या बेतावर आहे. फ्युचुराचा हार्ड अनोडाईज्ड तवा आणि एक कढई घेऊन आले आहे. हळूहळू बाकी भांडीही रिप्लेस करेन.

फ्युचुराचा हार्ड अनोडाईज्ड तवा आणि एक कढई घेऊन आले आहे. >> माझ्याकडे पण कुकर, छोटी आणि मोठी आणि एक अगदी पिल्लु कढई, फोडणीचं भांडं आहे. एक झाकणवालं क्युटसं भांडं आहे. सगळा सेट फ्युचुराचाच आहे. भरपुर पैसे घालवले आहेत. हा धागा चालु झाल्यापासुन प्रार्थना करते आहे कि त्याबद्दल काही वाईट ( म्हणजे ते अपायकारक असते वगैरे) वाचायला मिळु नये. एवढं सगळं टाकुन देणं जीवावरच येइल. पण त॑री काही असेल तर सांगा. मी इतक्या मोठ्या प्रमाणात ते वापरते आहे तर माहित असलेलं चांगलं.

बाय द वे, या तव्यावर दोसे/थालीपीठ होत नाहीत. त्यासाठी नॉनस्टीक तवा ठेवावाच लागला आहे.

सायो हो बीड म्हणजे कास्ट आर्यन...गल्ती से मिक्ष्टेक...:)
आता मला हार्ड अ‍ॅनोडाइज्ड भांडी पण पाहायला हवीत फ़क्त काहीवेळा हार्ड अ‍ॅनोडाइज्डबद्दल एकच काळजी म्हणजे काहीवेळा त्या भांड्यांवर आणखी एकदा नॉन स्टिकचं कोटिंग (का???) करतात त्यामुळे नीट वाचून घ्यायला हवीत.....

ती लिंक पाहातेय....इतक्या डिटेल्डमध्ये या दोन्हींबद्दल कधी वाचलं नव्हतं...आभार..

फ़्युचुराबद्दल मला काहीच माहिती नाही पण आईने मला चपात्यांसाठी आणखी एक तवा आणला त्याच्या मागे हिंडाल्को का असं काहीतरी लिहिलंय...हे नॉनस्टिक नाही असं ती तरी म्हणायलीय...कोणाला काही कल्पना??

स्टील, कास्ट आयर्न, हार्ड अनॉडाईज्ड आणि सिरॅमिक असे चार पर्याय नॉनस्टीक ला..

मी स्टीलकडे वळलेय, पण चिकटणे, स्वच्छ करायला त्रास वगैरे त्रास होईल असं वाटतय एकंदर

अनेक प्रकारची माहिती वाचून सगळ्यात कास्ट आयर्नचा ऑप्शन बरा वाटतोय एकंदरीत. (पुन्हा एकदा आजी जे वापरायची तेच वापरायचं :))

प्लॅस्टिक सोडून काच/चिनीमाती आणि नॉनस्टिक सोडून बीड

नानबा, स्टीलला चिकटण्यासाठी म्हणजे न चिकटण्यासाठी मी आच नेहमी मध्यम ठेवते...आणि थोडं पदार्थ होईस्तो जवळ राहते...माझी आई म्हणते एकदा फ़ोडणी झाली की आच मध्यम आणि लहान याच्या मध्ये ठेवली आणि झाकणावर पाणी ठेवलं की आतला पदार्थ जळत नाही..भेंडी सोडून इतर गोष्टीला ही युक्ती कामी येते...भेंडी जाम हलवत राहावी लागते.....किंवा तेल अम्मळ जास्त घालावं लागतं..मला वाटतं नॉन स्टीकला तेल कमी लागतं म्हणून ते लोकांना आवडतं..पण त्याचे इतर तोटे जास्त आहेत...
चला पुन्हा आपल्या आज्या, मावशा, आया जे काही वापरायचं त्यांच्याकडून शिकुया....
on a side note, तरीही एक तह झाल्यामुळे अंड्यासाठी नॉन स्टीकने एंट्री मारली आहे....:( पण जरा जरी खराब वाटलं तर लगेच फ़ेकुन द्यायचं या बोलीवर ठेवलाय त्याला...आणि फ़कस्त अंडं...तसं काही लोकं दोश्यासाठी ठेऊ शकतात एक पण वापरण चांगली असेपर्यंतच...मला बीडाचे दोसे आवडतात.....

मी सध्या wolfgang puck चा स्टील सेट घेतला आहे नॉनस्टिक नको म्हणून्..आणि वेळकाढूने म्ह्टलं आहे तसं मध्यम आच ठेवून केले की चिकटत नाही काही..आता सवय होते आहे हळूह्ळू Happy

माझ्याकडे फोडणीपात्रापासून सगळं हार्ड आनोडाईज्ड आहे. फक्त एक नॉनस्टिक तवा आहे. तो बंद करीन वापरायचा आता. पण सुस्थितीत आहे आणि फक्त पोळीसाठी वापरतेय. हार्ड आनोडाईज्ड पण आहे तवा... आता तोच काढेन.

मी वापरतो नॉन स्टीक, पण ती नेहमीच मंद आचेवरच ठेवतो. (माझे बहुतेक पदार्थ
असेच केलेले असतात.)
चपातीसाठी नॉन स्टीक वापरु नये कारण तशी गरजच नसते. चपाती तव्याला
चिकटण्याचा प्रश्नच नसतो आणि चपातीला दमदार आच लागते ती लोखंडी तव्यावरच मिळते.
डोसा तव्याला न चिकटण्यासाठी काही युक्त्या म्हणजे,
१) त्यात अंडे घालणे
२) तव्यावर मिठाचे पाणी शिंपडून तो साफ करुन मग तापवणे
३) त्यात थोडा रवा मिसळणे.
खुपदा पहिला डोसा तुटतो पण नंतरचे चांगले होतात.

दोसा करण्यापेक्षा त्याच घटकाच्या इडल्या केल्या तर चांगले.
कॉपर बॉटम स्टीलचा तसा फायदा नाही कारण तांब्याचे कोटींग अगदीच पातळ असते. जेवण शिजवण्यासाठी मातीची भांडी सगळ्यात उत्तम आणि तेला तूपाचा
कमीत कमी वापर करणे, कधीही योग्य.
रच्याकने, आमच्या ऑफिसमधे फुलके करण्यासाठी मातीचे खापर वापरतात.
त्या खापराला, झार्‍याला असतात त्याप्रमाणे छिद्र आहेत. त्यामूळे फुलका परत
गॅसवर भाजावा लागत नाही.
असे खापर मी भारतात बघितले नाही. कुंभाराला सांगितले तर देईल करुन तो.

आमच्या ऑफिसमधे फुलके करण्यासाठी मातीचे खापर वापरतात. >>> याचा फोटो असेल तर टाकाल का प्लिझ्झ

हो, माझ्याकडे माझा तवाही साधाच आहे पण तो जास्त तापला की पोळ्या चिकट्तातच. काल पहिल्यांदाच डोश्याचा नॉनस्टीक वापरला आणि पोळ्या पहिल्यांदाच झक्कास झाल्या.

बीड : नोनस्टिक असत ना

पूर्वी आमच्याकडचे बिडाचे भिडे सठीसमाशीच वापरले जायचे तेव्हा प्रत्येकवेळी याला पीठ चिकटून बसणार असे टेन्शन असायचे. पण जसा त्याचा नियमित वापर (महिना/१५ दिवसांतून एकदा) केला तसे त्याला पीठ अजिबात चिकटत नाही. अर्थात तेल वापरायला लागते. अगदी थोडे तेल(काही थेंब) टाकून कालथा/ कांदा/ नारळाची कीस यांनी पसरून घ्यायचे.
कदाचित प्रत्येक दोश्याला तेल टाकायची गरजही नसेल.

फोटो, आज उद्या टाकतो.
मातीचा तवा तापायला २ मिनिटेच लागतात. सवय व्हायला २/३ दिवस.
कोकणात म्हणजे रायगड ते गोवा, अनेक भागात मातीचे तवे वापरात असतात.
रायगड भागात, भोकर आणि कोंडा वापरुन त्यात केक सारखा एक प्रकार करतात.
गोव्यात मासे तळण्यासाठी, कालवण करण्यासाठी, भात पेज शिजवण्यासाठी हि
भांडी बघितली आहेत मी.
दक्षिणा, पीठ जास्त सैल / ओलसर भिजवतेस का ? आपल्या आया तर तव्यावरच करायच्या ना ? कोल्हापूरला चपातीसाठी (थोडा पातळ पण खोलगट), पुरणपोळ्यांसाठी (जाड व सपाट ), भाकरीसाठी (जाड व खोलगट) , आंबोळ्यांसाठी (जाड पण काठ असलेला) असे लोखंडी तवे मिळतात. तुळशी बागेतही मिळत असतील.

बरे झाले मी नॉन्स्टीक वापरतच नाही. अशीह्च माहीती काही वर्षापुर्वी वाचली व फेकून दिली.

काही लोकं इतकी कंजूषी करतात का माहीत नसते म्हणून पण कोटींग निघाले तरी वापरत असतात. Sad

दिनेशदा तुम्ही वर्णन केलेले सगळे तवे आमच्याकडे आहेत आणि मुंबईतच घेतलेले आहेत.
मातीची भांडी गॅसवर वापरता येतात का? आधी कळलं असतं तर! आताच आमच्याकडे खादी फेस्ट झाला त्यात मातीची वेगवेगळ्या प्रकारची भांडी दिसली (ग्रामोद्योग).

भरत मातीची भांडि सिझन करुन घ्यावी लागतात. (मूळात ती पक्की भाजलेली असावी
लागतात.)
नवीन भांडे आणले कि त्यात पाणी भरुन ते २४ तास ठेवायचे मग ओतून टाकायचे.
मग त्यात परत पाणी भरुन ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवायचे. पाण्याला उकळी
येऊ द्यायची. (भांड्यात जर दोष असेल तर यावेळी गळते वा त्याला तडा जातो.)
पाण्याला उकळी आली कि गॅस बंद करायचा आणि ते पाणी ओतून भांडे उपडे
घालून सुकवायचे. मग नेहमीच्या पदार्थाना वापरता येते. अगदी फोडणीही करता येते.
फक्त धूताना शक्यतो साबण न वापरता (राख वापरायची !!) नारळाच्या शेंडीने
घासायचे. या भांड्याना थोडाफार मसाल्याचा वास लागतोच. त्यामूळे भाजी / भाताची
भांडी वेगवेगळी ठेवायची.
या भांड्यात केलेले जेवण चवदार तर लागतेच पण ते जास्त वेळ गरमही राहते.
(गोव्याला, फोंड्याजवळच्या स्पाईस गार्डनमधे या भांड्यात शिजवलेले जेवण चाखता
येत असे.)

दक्षिणा, हार्ड अनोडाइज्ड फ़ोडणीची पळी कुठे मिळते??

दिनेशदा मातीचा तवा.....____/\____
तुमच्या पोतडीत अजून काय काय आहे??फ़ोटो पाहायला नक्की आवडेल....

Pages