'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' - श्री. सुमेध वडावाला (रिसबूड)

Submitted by चिनूक्स on 19 March, 2012 - 00:13

खरा भारत हा खेड्यांमध्ये वसला आहे, असं आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. मात्र या खर्‍या भारताकडे अजून सरकारचंच पुरेसं लक्ष गेलेलं नाही, तर बड्या कंपन्यांना तरी हा भारत कसा माहीत असणार? भारतातल्या शहरांबाहेर राहणार्‍या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत पोहोचायचं कसं, हा प्रश्न त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कायमच भेडसावत आलेला आहे. कारण या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी सखोल माहिती हवी, तीच मुळात उपलब्ध नाही. ही माहिती मिळवणं हे भारतासारख्या खंडप्राय देशात महाकठीण. ही समस्या ओळखली पुण्याच्या प्रदीप लोखंडे यांनी आणि मोठ्या कष्टपूर्वक जमवलेल्या ग्रामीण भारताच्या डेटाबेसचा वापर करून प्रचंड मोठा व्यवसाय तर उभारलाच, पण या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी सतत दुर्लक्षित राहिलेल्या हजारो ग्रामीण तरुणांना रोजगारही मिळवून दिला.

रूरल मार्केटिंगचे बादशाह असलेल्या श्री. प्रदीप लोखंडे यांच्या कामाची माहिती देणारा लेख 'अनुभव' मासिकात प्रसिद्ध झाला होता. या दुव्यावर तो वाचता येईल.

श्री. प्रदीप लोखंडे यांचा संपूर्ण जीवनप्रवास श्री. सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकातील ही काही पानं...

Cover.jpg

‘‘प्रदीप, आता तुमची परीक्षा जवळ आलीय. ती झाल्यानंतरची सुटी, इथपासून पुढे उनाडक्यांसाठी वापरायची नाही. साईटवर मी बोलून ठेवलं आहे. तू तिथे ‘डेली वेजीस’वर जायचंस. तुझं काम तिथल्या गॅरेजमध्ये असेल.’’

परीक्षेच्या दुसर्‍याच दिवसापासून मी कामावर जाऊ लागलो. ते मला काही वेगळं वा कमीपणाचं वाटलं नाही. गॅरेजच्या त्या वर्कशॉपमध्ये मेकॅनिकच्या हाताखालचा हरकाम्या म्हणून मी काम करू लागलो. डम्पर, टिपर, पोकलॅन्ड, ट्रक, रोलर, लॉरी अशी कित्येक वाहनं धोम मुक्कामात मी बाह्यरूपानं पाहत होतो. आता त्यांचं अंतर्रूप मला दिसू लागलं. खोललेल्या वाहनाच्या पोटाखाली गेलेला मेकॅनिक बाजूच्या टूलबॉक्समधून साधनं द्यायला मला सांगायचा. त्यातल्या ‘पाना’, ‘स्क्रू चावी’सारख्या नाजूक हत्यारांपासून जॅकसारख्या बलदंड साधनापर्यंत सर्व चिजा माझ्या ओळखीच्या झाल्या. ‘कॉटनवेस्ट’ नामक गुंत्याचं बेस्ट मोल माझ्या अनुभवाचं झालं. रॉकेल लावून, त्यानं हातांवरची काळी तेलकट मळी पुसून काढण्यात मी सराईत झालो. शिफ्ट ड्युटीतली मजा माझ्या सरावाची झाली. कामाचा दिवस संपण्यातली मजा मला मोहक वाटू लागली. आपल्या हररोजच्या सहीचं मोल चार रुपये बत्तीस पैसे आहे, हे मला कळून आलं. ती भावना मला सुखाची वाटत असली, अर्थार्जनातली गोडी मला कळू लागली असली, तरी या कामात माझा जीव रमला नाही; पण अर्थार्जनाची इच्छा प्रबळ होत राहिली आणि एक कल्पना मला सुचली. तोवर मी नाटक कधीच पाहिलं नव्हतं, पण पूजेबिजेनिमित्त कॉलनीत रस्त्यावर दाखवल्या गेलेल्या, फुकट पाहिलेल्या तिन्ही सिनेम्यांत निळू फूल्यांनी काम केलं होतं, ते मला खूपच आवडू लागलं होतं. सावंत साहेबांकडे येणार्‍या पेपरांत ‘राजकारण गेलं चुलीत’ या नाटकाची जाहिरात असायची, तिच्यातही या निळू फूल्यांचा, लबाड डोळ्यांचा फोटो छापलेला असायचा. मी ते बघितलं आणि मला खूपच आवडलं. हे नाटक ‘कम्युनिटी हॉल’मध्ये आणून दाखवलं, तर आपल्याला पैसे मिळतील, असं स्वप्न नववीतल्या माझ्या मनाला पडलं. मी ते मिलिंद देशपांडेला बोलून दाखवलं. त्यालाही कल्पना आवडली; पण अण्णांना अंधारात ठेवून काही करणं अशक्यच होतं.

त्यांना सांगितल्यावर त्यांनी फार उत्साह दाखवला नाही, पण पुरतं धुडकावूनही लावलं नाही. फोनसाठी मी पैसे मागितले, ते कुरकुरत दिले. जाहिरातीत दिलेल्या पुण्याच्या ‘संपर्क फोन नंबर’वर मी ट्रंक कॉल लावला. पलीकडे नाटक कंपनीचे व्यवस्थापक होते. त्यांनी माझं नाव आणि काम विचारलं, मला भेटायला बोलावलं. ‘रविवारी’ही कार्यालय उघडं असल्याचं आवर्जून सांगितलं. मी उत्साहात घरी परतलो. रविवारी अण्णांकडे तिकिटासाठी पैसे मागितले. पुन्हा कुरकुरतच दिले त्यांनी ते. एस्टीनं मी पुण्याला आलो. पुणं मला नवं नव्हतं. लक्ष्मी रोडवरच्या नाटक कंपनीच्या कार्यालयात मी गेलो, तेव्हा किरकोळ वाटणारा एकटा माणूस नुसता बसलेला होता. छोट्याशा ऑफिसात दोन टेबलं, काही खुर्च्या, नटेश्वराची मूर्ती अन् एकटा तो! आता त्याच्याबरोबर मी. गेल्यागेल्या मी माझं नाव सांगितलं. व्यवस्थापकच असावेत ते, त्यांच्या मुळीच काही लक्षात आलं नाही. म्हणून मी म्हणालो,
"तुम्हीच होतात ना तीन दिवसांपूर्वी मी फोन केला होता तेव्हा? मला ‘राजकारण गेलं चुलीत’ हे नाटक धोमला न्यायचंय म्हणून तुम्हीच भेटायला बोलावलं होतंत ना?"
माझ्याकडे अपार अविश्वासानं पाहत, व्यवस्थापकच होते ते, ते म्हणाले,
"तू?... तू नाटक नेणार?"
मी होकार दिला. अविश्वासाच्या नजरेला उपरोधिक शब्दांची धार देत ते म्हणाले,
"नाटकं करू लागण्याही पूर्वीच्या वयात नाटक नेणार? व्वा छान! निळूभाऊंचा बंदा रुपया नेणार? न्या! दीड हज्जार मोजा. न्या! त्या दीड हजारांखेरीज नटमंडळी, बॅकस्टेजवाले नि इतर कुणी मिळून वीस माणसं होतात; त्यांच्या प्रयोगानंतरच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल. चारशे रुपये अ‍ॅडव्हान्स द्यावा लागेल. उरलेले अकराशे नाटकापूर्वी द्यावे लागतील. नाहीतर पहिली घंटाही देणार नाही. कळल्या आमच्या अटी?"
"कळल्या. पण नाटक कधी आणाल धोमला?"
"अटी पूर्ण केल्यात तर आजही!... निघायचं का?"
अपमान कळत असूनही, नीटपणे निरोप घेऊन मी निघालो. धोमला आलो. सर्वांत आधी मिलिंदला भेटलो. सगळं सांगितलं. तो म्हणाला,
"चारशे रुपये आमचे बाबा सहज देतील."
"खरंच? उरलेले पैसे आपण तिकीटविक्रीतून देऊ शकतो, पण तू तुझ्या बाबांना विचारून घे", मी म्हणालो. वडलांतर्फे मिलिंदनं मला पुन्हा पुन्हा हमी दिली... आज त्या घटितांचं आश्चर्य वाटतं अतोनात; पण तेव्हा खूप भारावून गेलो होतो मी. घरी गेलो. दुसर्‍या दिवशी सार्‍या गोष्टी सावंतसाहेबांना सांगितल्या. त्यांनी खूप कौतुक केलं माझं; पण हे प्रकरण मी अण्णांना सांगितलं, तेव्हा विस्फारल्या डोळ्यांनी ते म्हणाले,
"लोखंड्यांच्या घरातून कुणी कधी धंदा केला नाही. देडग्यांच्या घरातूनही कधी कुणी केला नाही. तुझ्या उभ्या खानदानात धंद्याचं रक्त नाही. खूप शिकावं, नोकरीत वाढावं. याउप्पर तुझी मर्जी. निस्तरावं लागेल ते तुलाच!"

‘मेरी मर्जी’ला आता जणू आव्हानच दिलं गेलं होतं. दुसर्‍या दिवशी मिलिंदनं माझ्या हाती चारशे रुपये दिले. मी ते अण्णांकडे ठेवायला दिले. व्यवस्था करायला वेळ हवा म्हणून, कॅलेंडर पाहून पुढच्या महिन्यातला शेवटचा रविवार ठरवला. एकोणतीस नोव्हेंबर! नंतर आलेल्या रविवारी अण्णांकडून भाड्यासाठी पैसे आणि ते चारशे रुपये घेऊन मी पुण्याला आलो. कार्यालयात ते बसलेलेच होते. मी त्यांना पैसे देऊ लागलो, तर ते जुन्याच अविश्वासानं कित्येक क्षण माझ्याकडे पाहत राहिले. मग पैसे घेऊन, मोजून, ड्रॉवरमध्ये टाकून त्यांनी पोचपावती बनवून दिली. म्हणाले,
"पण तुला हे सारं जमणार आहे ना? मोठी माणसं नाहीत का कुणी?"
"नाहीत. आणि गरजही नाही. पुढच्या महिन्यात एकोणतीस तारखेला आम्हांला नाटक हवं. धोमच्या ‘धरण वसाहती’चा कम्युनिटी हॉल!"
तारखांसाठी डायरी पाहत, मान डोलावून त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर पानावर माझं नाव आणि पत्ता लिहिला. पोचपावती घेऊन तिच्यावरही ते तपशील लिहिले. रात्री नऊ वाजताची वेळ लिहिली. पावती पुन्हा माझ्याकडे देत म्हणाले,
"तुला पुन्हा कशाला खेप पाडायची? आत्ताच मी नाटकाची तिकिटंही देतो. दिवस पक्का आहे ना? आणि सहा रुपयांची तिकिटं खपतील ना तुमच्या गावात?"
त्याचं उत्तर मला माहीत नव्हतं, तरीही मी होकार दिला. टेबलाच्या ड्रॉवरमधून मॅनेजरनं गुलाबी तिकिटांचे गठ्ठे काढले. स्टँप्स आणि पॅड काढलं. शिक्के जुळवले. प्रत्येक तिकिटाच्या तळात ते ते शिक्के मारू लागले. ‘२९ नोव्हेंबर १९७३. वेळ रात्रौ नऊ वाजता...’ शिक्के मारण्यात बराच वेळ गेला. मग ते चारही गठ्ठे माझ्याकडे देत म्हणाले,
"चारशे तिकिटं आहेत; पण हॉल मोठा आहे ना? नाहीतर माणसं तुझ्या नावानं खडे फोडतील. नाटक खूप चालणारं आहे. त्याचा तू पोरखेळ होऊ देऊ नकोस."

होकार देऊन मी त्यांचा निरोप घेतला. धोमला आलो. त्या क्षणापासून मी नाटकमय होऊन गेलो. मिलिंदला आणि सावंतसाहेबांना सारा वृत्तांत सांगितला. त्या दोघांनाही माझ्या उत्साहाची तीव्र लागण झाली. ‘मी तुझ्या मदतीला येणारच’, असं मिलिंद आपणहून म्हणाला, तर सावंतसाहेब मला घेऊन आधी कम्युनिटी हॉलला आले. एकोणतीस तारखेचं बुकिंग केलं. ‘भाडं नंतर देऊ’, असं त्यांनी सांगितलं म्हणून व्यवस्थापकानं ते मानलं. मग मला घेऊन ते कॉलनी कॅन्टीनला आले. दिवस सांगून, मेन्यू ठरवून वीस माणसांच्या जेवणाची ऑर्डर दिली. दुसर्‍या दिवसापासून मी आणि मिलिंदनं घरोघरी जाऊन नाटकाचा प्रचार केला. प्रत्येक घरी आमच्याकडे अविश्वासानं पाहिलं जायचं, पण तारखेपूर्वी दहा दिवस, मिलिंदच्या हस्ताक्षरात चौकाचौकांतल्या फळ्यांवर आम्ही नाटकाची घोषणा केली आणि लोकांना विश्वास ठेवावा लागला.

‘घरातलं, ऑफिसातलं राजकारण बाजूला ठेवावं. चुलीत गेलेलं राजकारण पाहायला सर्वांनी यावं’, अशा शीर्षकासह लिहिलेलं नाटकाचं नाव, अभिनेत्यांची नावं, स्थळ, वेळ असे तपशील देणारे ते बोर्ड धोमच्या कुतूहलाचे झाले. मग नाटकाचा दिवस आला. ‘आपल्या घरातल्यांना नाटक फुकट दाखवायचं हं!... आणि सावंतसाहेब तर आपलेच आहेत’ असं एकमेकांशी ठरवत, नाटकगाडीची प्रतीक्षा करण्यातला थरार मी आणि मिलिंद अनुभवत राहिलो. प्रत्यक्ष संध्याकाळी आम्ही काऊन्टर उघडला. नाटकाची तिकिटं घ्यायला माणसांनी झुंबड केली. नाटककंपनीची गाडी आली तेव्हाही आम्ही तिकिटं विकत होतो, हे पाहून कलावंतांचं स्वागत करायला सावंतसाहेब सरसावले. तिकिटं संपली तेव्हा आमच्या हाती नगद चोवीसशे रुपये जमले होते. आधी मिलिंदला चारशे रुपये देऊन व्यवस्थापकांचे अकराशे रुपये मी वेगळे काढले. कम्युनिटी हॉलचं भाडं आणि कॅन्टीनवाल्याचे पैसे वेगळे काढले. नोटांना खिशात जपत मी आणि मिलिंद कम्युनिटी हॉलच्या मागच्या खोलीत आलो, तेव्हा हॉलच्या रंगमंचावर ‘सेट’ उभारण्याची ठाकठोक चाललेली होती. खोलीत जाऊन व्यवस्थापकांना अकराशे रुपये दिले. त्यांनीं पावती दिली. मी म्हणालो,
"नाटक एकदम वेळेवर सुरू करा हं!"
व्यवस्थापकांनी कुणा माणसाला खूण केली. तो स्टेजकडे गेला. पहिली घंटा घणघणली. काही वेळानं दुसरी घंटा घणघणली.
"साहेब, आता मंचावर निघायचंय. चला!" असं म्हणून व्यवस्थापक निळूभाऊंपाशी आले.
त्या स्टेजवरच्या माणसानं निळूभाऊंना पाहिलं आणि तो तिसरी घंटा घणघणवीत स्टेजवर फिरू लागला. मग काही घोषणा झाल्या. पडदा उघडला गेला. क्षणभरानंतर व्यवस्थापकानं विंगेतून निळूभाऊंना पुढे सोडलं. धीमी मात्र ठाम पावलं टाकत निळूभाऊ रंगमंचावर गेले. संवादफेकीपूर्वी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. मग कुणाकुणाच्या एन्ट्री नि एक्झिट होत नाटक पुढे पुढे खेळलं जात राहिलं. मध्यांतरांत चहापाणी झालं. नवे अंक रंगले. पडदा पडला. निळूभाऊ मागच्या खोलीत आले. त्यांना भेटायला माणसांनी गर्दी केली; पण मला भेटायलाही माणसांनी गर्दी केली. व्यवस्थापकांनी मला कौतुकानं पुढे ओढलं. मला निळूभाऊंपुढे करत म्हणाले,
"साहेब, तुमचं नाटक इथे आणलं - लावलं ते या मुलानं!"
"काय सांगताय? ये... ये माझ्याजवळ!" कौतुकानं माझ्या पाठीवर थाप देत ते म्हणाले,
"नाटकात बालकलाकार असतात हे माहीत होतं. बालकंत्राटदारही असतो नाटकाचा, हे आज कळलं. भविष्यात कधी काहीही लागलं, तर माझ्याकडे यायचं."
मग कॅन्टीनवाला आला. जेवण वाढलं जाऊ लागलं.
माणसं जेवली. आमचा निरोप घेऊन मध्यरात्रीनंतर गाडी पुण्याकडे गेली. नाटकाला आलेले आई-अण्णा, भाऊ केव्हाच गेले होते. मिलिंद आणि सावंतसाहेब होतेच होते. हॉलचं भाडं, कॅन्टीनवाल्याचे पैसे देऊन आम्ही घरी परतलो. आधी सावंतसाहेबांच्या क्वॉर्टर्स होत्या. ते गेले. मग मिलिंदचा बंगला आला. तो गेला. मग आमचं घर आलं. पोचलो तेव्हा घरात लाईट होता.
"पोरग्याचे सुटीतल्या कामाचे पैसे वेगळ्या खात्यावर ठेवले होते. या नाटकात तोटा खाल्ला असता, तर त्या पैशांत लागेल तेवढी भर घालून पैसे फेडायचं ठरवलं होतं, पण ती वेळ बहुधा येणार नाही."
अण्णांचे शब्द माझ्या कानावर पडलेले नाहीत, असं दाखवण्यासाठी काही वेळ घराबाहेर काढून मी आत गेलो. गेलो तेव्हा अण्णा जणू नेहमीचे झाले. कडक शब्दांत आणि धंदाविरोधी भूमिकेतून म्हणाले,
"जेवा नि झोपा. नाटक डोक्यातून काढून टाकून झोपा."

नंतर पाच-सहा दिवस गेले. कॉलनीतले लोक माझं आपसांत कौतुक करायचे. सावंतसाहेबांनी त्याच्यावर कळस चढवला. ते मुद्दाम आमच्याकडे आले. आधी मला आणि नंतर अण्णांना म्हणाले, "अरे प्रदीप, मलाही एक माहीत नव्हतं. ऑफिसात कुणी म्हणालं तेव्हा कळलं, नाटक करायचं असेल तर म्हणे पोलिसांची परवानगी लागते. पुढल्या वेळी लक्षात ठेव... आणि लोखंडे, तुमचा मुलगा हिरा आहे. मोठेपणी खूप चमकेल पाहा."
"पाहायचं तेव्हा पाहू. आत्ताचं आत्ता. तुम्ही म्हणताय तशी पोलिस परवानगीची गरज काही पडणार नाही. ‘पुढची वेळ’च येणार नाही", अण्णा म्हणाले. वास्तवात घडलं ते भलतंच. नाटकाच्या अनुभवावर मी सिनेमा आणायचं ठरवलं. ठरवलं तेव्हा अण्णांनी फारसा विरोध केला नाही. एकूण सर्वांची देणी देऊन, अण्णांना एस. टी. भाड्याचे, फोनचे पैसेही परत करून सहाशे रुपये फायदा झाला होता. ते पैसे अण्णांकडे देतानाच, ‘मला लागतील तेव्हा द्यायचे हं हे पैसे’, असं बजावलं होतं. सावंतसाहेबांकडे जाऊन पेपरातल्या नाना जाहिराती वाचायचं मला व्यसन लागलं होतं. ‘सोळा एम. एम. सिनेमा कोणत्याही गावी आणून दाखवू’ अशी जाहिरात मी वाचली. घरी सांगून पुण्याच्या संबंधित माणसाला मी फोन केला. त्याची वेळ ठरवून पुण्याला गेलो. प्रथम भेटीत त्यालाही माझ्या कुमारवयाचं अप्रूप वाटलं. अविश्वासही वाटला; पण मी त्याला ‘राजकारण गेलं चुलीत’चा अनुभव सांगितला, तेव्हा त्यानं भाड्याच्या सिनेमाखेळाच्या अटी सांगितल्या. मी त्या मान्य केल्या. घरी आलो. अण्णांकडून पैसे घेऊन, सिनेमाचा दिवस ठरवून पुण्याला आलो. अ‍ॅडव्हान्स दिला. माणसानं मला पावती, तिकिटं दिली. ती धोममध्ये आगाऊ विकून मी सिनेमाचा पहिला खेळ त्या कम्युनिटी हॉलमध्ये लावला. प्रोजेक्टर, पडदा, रिळांच्या पेट्या असं मोजकं सामान टेम्पोतून घेऊन दोन माणसं आली. चहाच्या कपावर सिनेमा दाखवून गेली. स्टेजवरचा ‘सेट’ नको आणि जेवणसुद्धा नको. ‘चित्रपटाचं चित्र’, ‘नाटकाच्या नाटकांपेक्षा’ मला खूप सोयीचं वाटलं. त्यानंतर मी असे चार सिनेमे आणले. अंतिमात, दीड हजार रुपये फायदा झाला. ते पैसे अण्णांकडे देताच ते म्हणाले,
"आता पुढल्या वर्षी हे धंदे बंद! पुढलं वर्ष मॅट्रिकचं आहे. खूप शिकायचंय आपल्याला."

ते काही मला जमण्यातलं नव्हतं. मॅट्रिकच्या वर्षी मी ते ‘धंदे’ केले नाहीत, पण अभ्यासही केला नाही. वर्षाच्या अखेरीला अटळपणे येणार्‍या परीक्षा नामक संकटाला सामोरा गेलो. भाग्य खूपच अनुकूल होतं. छत्तीस टक्के मार्क मिळवून उद्धरलो गेलो. अण्णा रागावले; पण आता तो तिरंगी चाबूक माझ्या आयुष्यातून आणि अण्णांच्या हातातून वजा झाला होता. चिडलेल्या अण्णांनी नि:शब्द राहून संताप व्यक्त केला. वाईच्या महाविद्यालयात मला प्रवेश घ्यायला लावला. कॉमर्सचं पहिलं वर्ष मी कसंबसं पास केलं; पण अभ्यासात माझं मन रमलं नाही आणि त्या महाविद्यालयात त्याहूनही रमलं नाही. पुण्याला जाण्याचा मी निर्णय घेतला. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची माझी सवय, आजवरच्या अनुभवांनी दृढ केली होती. पुण्याला आजोळी मोठा बारदाना होता. आजीला एकूण अकरा मुलं होती. मोठ्या चार मुली, पाच मुलगे; मुलगी, मुलगा अशा क्रमातल्या बहुतेक मुलांची लग्नं झालेली होती. माझा सर्वांत धाकटा मामा माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा - बरोबरीचा होता. काही मामांचीही लग्नं होऊन संसार फळते झाले होते. एकूण पाव शतक माणसं त्या पाव डझन खोल्यांत दाटीनं राहायची. तिन्ही खोल्या टीचभर लांबीरुंदीच्या होत्या. त्या आजीच्या संसारासाठी भाड्यानं मिळाल्या होत्या हेच आश्चर्य! जगन्नाथ गिरमे हे मोठे जमीनदार आणि माजी आमदार होते. त्यांच्या प्रशस्त, सुंदर बंगल्यालगत द्राक्षांची मोठी बाग होती आणि पलीकडे प्रत्येकी तीन खोल्यांच्या घरांची चाळ त्यांनी बांधली होती. त्यांच्या संस्थानातल्या गडीनोकरांना क्वॉर्टर्स म्हणून बांधली होती. आमच्या आजोळचं त्यांच्याकडे कुणी नोकरीला नसूनही, गिरम्यांनी या देडगे कुटुंबाला ते घर भाड्यानं दिलं होतं. तीन खोल्या, पंचवीस माणसं! मी धोम सोडलं, पुण्याला येऊन धडकलो आणि सर्वांत मोठे असणारे नानामामा नि आजी यांना राहण्याबद्दल विचारलं. ‘सार्‍या आप्तांना एकत्र गुंफून ठेवणारा स्नेहल रहिवास म्हणजे एकत्र कुटुंब’ असा सात्त्विक अर्थ जपणार्‍या त्या घरानं माझं स्वागत केलं. ‘मी माझी सोय पाहीनच लवकर!’ असं मी, माझ्या समाधानासाठी, राहण्यापूर्वी नानामामांना म्हटलं असलं, तरी खूप महिने त्या तीन खोल्यांत राहून घरावरचा भार वाढवलाच मी!

मग महाविद्यालयीन प्रवेशासाठी माझी धडपड सुरू झाली. खूप उशीर झाला होता, वर्ग सुरू झाले होते, तरी मी वाडिया कॉलेजला धाव घेतली. प्रवेशाचे फॉर्म मिळण्याचे दिवस केव्हाच संपले होते. प्राचार्यांना भेटलो. प्राचार्य व. कृ. नूलकर सर आस्थेनं बोलले; पण मला मॅट्रिकला आणि पी.डी.लाही खूप कमी मार्क्स असल्यामुळे प्रवेश द्यायला त्यांनी असमर्थता दाखवली. मी म्हणालो, "सर, टेबलटेनिस, बॅडमिंटन नि क्रिकेट या तिन्ही खेळांत मी पुढे आहे. स्पोर्टस् कोट्यातून मला प्रवेश द्या ना!’’
बेल वाजवून शिपायाला बोलावून त्यांनी एका मुलाला बोलवायला सांगितलं. तो आला, तेव्हा सर म्हणाले,
"याच्याबरोबर तू टेबलटेनिस खेळ. मग मला येऊन भेट. विचार करू."
तो मुलगा मला घेऊन टेबलटेनिस हॉलला आला. लॉकर उघडून त्यानं बॅटी, बॉल काढला. मला बॅट दिली. आम्ही खेळू लागलो. टॉस जिंकून मी सर्व्हिस घेतली. पहिल्या क्षणापासून त्याची मला जाणवलेली चमक क्षणोक्षणी वाढत गेली. साताठ मिनिटं पुरली त्याचं अतुलनीय वर्चस्व सिद्ध व्हायला. लव्ह फाइव्ह, टेन लव्ह, लव्ह फिफ्टीन, ट्वेन्टी लव्ह अशी अभेद्य आघाडी घेत विनिंग पॉइंट सहजच खिशात घालून त्यानं मला पुरतं नामोहरम केलं. विजयाची खात्री मनात बाळगणार्‍या कुस्तीगिराची पाठ, प्रतिस्पर्ध्यानं केवळ पहिल्या पेचातच जमिनीला कायमची जखडून टाकावी तशा नामुष्कीचा प्रसंग हा! पण माझा प्रतिस्पर्धी खेळानं आणि मनानंही उमदा होता. शब्दानं वा नजरेनंही त्यानं मला खिजवलं नाही. माझ्या खांद्यावर आपुलकीचा हात टाकून त्यानं मला प्राचार्यांकडे आणलं; पण ती आपुलकी प्रवेशासाठी शिफारस करायला असमर्थ होती. तेथे गेल्यावर सर म्हणाले,
"काय झालं? कसा खेळला नवा खेळाडू?"
विजयी असूनही, पराभूत असल्याप्रमाणे तो नि:शब्द राहिला.
"सलग एकवीस गुण घेऊन हरवलं मला यानं! टेबलटेनिस मला कितीसं खेळता येतंय हे समजलं मला", मी म्हणालो. माझ्या खेळातला दुबळेपणा मला बोचत राहिला हे खरं! पण आयुष्यातल्या प्रत्येक प्रांतातला दुबळेपणा खुंटून टाकण्यासाठी मला उद्युक्त करायला - कार्यरत करायला तो समर्थ ठरला. इथे प्रवेश मिळणं अशक्य होतं, पण सर म्हणाले, "पालकांच्या छत्रछायेखालून न येता तू एकटा आलास, थेट मला भेटलास या हिमतीचं मला कौतुक वाटलं. प्रवेश देऊ शकत नाही मी. पण तू ती हिंमत आणि शिक्षण सोडू नकोस. एक्स्टर्नली बी. कॉम. कर. बेस्ट लक!"
त्यांना धन्यवाद देऊन आणि प्रतिस्पर्धी मुलाचाही निरोप घेऊन मी केबिनबाहेर आलो. कुणाशी विचारविनिमय करावा अशी पद्धत आणि परिस्थिती नव्हती.

नानामामा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सामान्य नोकरीत होते. सर्वांची शिक्षणं सामान्य, बेताचीच होती; पण या आजोळ मुक्कामात, घरमालकांच्या मुलग्याशी माझी दोस्ती जमली होती. जयप्रकाश गिरमे त्याचं नाव! तो वाडियात आणि माझ्याच यत्तेत शिकत होता. एक्स्टर्नल अ‍ॅडमिशनच घ्यायचीय तर ती तरी मी ‘वाडिया’मध्येच घ्यावी, असा त्यानं आग्रह केला. त्याचं मानलं. खरं म्हणजे परीक्षा देण्यापुरताच माझी ‘वाडिया’शी संबंध येणार होता, पण जयप्रकाशबरोबर मी तिथे अधूनमधून जात राहिलो. होस्टेलला राहणार्‍या रणजित शिंदेशी माझी मैत्री झाली. महाविद्यालयच काय, वसतिगृहही माझ्या छान ओळखीचं झालं. जयप्रकाशमुळे ओळखीच्या झालेल्या सतीश मगरशीही माझी दोस्ती झाली, वाढली. ही ओळख महाविद्यालयाबाहेरची. ‘मगरपट्टा’ प्रकल्पाचा आज प्रमुख असणारा सतीश गर्भश्रीमंतच! पण जयप्रकाशप्रमाणंच त्यालाही श्रीमंतीचा मुळीच गर्व नव्हता. तेव्हा नव्हता. आजही नाही... कारणाकारणानं वाढत जाणार्‍या मैत्रीत आणि खेळाहुंदडण्यात मी इतका रमून गेलो होतो, की ‘बहिःशाल विद्यार्थी’ हाही विद्यार्थी असतो, याचा मला त्या काळात जणू विसर पडला होता आणि वह्यापुस्तकं घरात ठेवून मी अभ्यासाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. रवींद्र कुंकलोळनं त्याला सिनेमाचं कारण पुरवलं. हा माझ्या धाकट्या मामाचा मित्र. आमची आजी त्याला स्वत:चा सातवा मुलगा मानायची एवढं घरात जाणंयेणं. त्याला त्याच्या नि देडग्यांच्या घरातले सगळे ‘बैजू’ म्हणायचे ते त्याच्या सिनेमावेडाशी सुसंगत ठरावं. त्यानं मलाही सिनेमाचा पार ‘बावरा’ करून सोडलं. मुळात मी खूप उशिरा उठायचो. आन्हिकं आवरून, जेवून, वाटलं तर पुन्हा झोपायचो. मग क्रिकेट ठरलेलं आणि रात्री बैजूबरोबरचा सिनेमाही ठरलेला. बैजू नोकरी करत होता म्हणून पैशांचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता तो माझ्या बेफिकीर वर्तनाचा. कित्येक महिने मी ‘जिवाचं पुणं’ करून घेतलं. ‘तुझं कसं होणार? अंगात सुस्ती नि मस्ती वाढीला लागली’, असं आजी उठताबसता म्हणायची, तरी ते माझ्या जाणिवेपर्यंत पोचायचं नाही; पण वास्तवाचं ऊर्फ ‘भवितव्या’चं भान मला बापूमामांमुळे आलं. त्यांच्या कॅन्टीनमुळे आलं. पुण्याच्या कॅम्प भागात महसूल खात्याच्या विभागीय आयुक्तांचं कार्यालय आहे. म्हणजे प्रसिद्ध ‘कौन्सिल हॉल’. इथलं कॅन्टीन त्यांनी उमेदीनं नि अपेक्षेनं चालवायला घेतलं होतं. टिकलं साताठ महिन्यांपुरतं; पण तेवढ्या काळात, भवितव्य घडवण्याच्या माझ्या जबाबदारीचं भान त्या कॅन्टीननं मला आणून दिलं. मी रिकामाच होतो, म्हणून माझी नेमणूक त्या कॅन्टीनमध्ये केली गेली. दिवसभर तिथे काम करायचं नि रात्री मुक्कामही तिथेच करायचा, असा माझा दिनक्रम झाला. पडेल ते काम करायचं, असा माझा शिरस्ता झाला. महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांच्या महसुलाच्या नाड्याच जणू या कार्यालयाच्या हाती होत्या. कार्यालयीन वेळेत इथलं कॅन्टीन चालवायला लागायचं. संध्याकाळी सहानंतर ते बंद व्हायचं. दुसर्‍या दिवशी पहाटेपासून पदार्थ बनवायची गडबड सुरू व्हायची. सकाळपासून खूप वर्दळ व्हायची. कॅन्टीनला गिर्‍हाईक प्रचंड असायचं. चहा, कॉफी, वडे, भजी, पोहे, शिरा, सॅम्पलपाव, मिसळपाव एवढेच लिमिटेड पदार्थ ठेवणार्‍या त्या कॅन्टीननं मला अनुभव मात्र अनलिमिटेड दिले. टेबलं साफ करणं, गिर्हाइकाची ऑर्डर घेणं, त्यानुसार भटारखान्यातून ते पदार्थ आणून गिर्‍हाइकाला देणं, कौन्सिल हॉलमध्ये जाऊन पदार्थ, चहा, पाणी देणं, मामाच्या अनुपस्थितीत गल्ल्यावर बसणं आणि धुतलेल्या-स्वच्छ कपबशांचा स्टॉक संपलाय हे लक्षात आल्यावर कपबशा खळाखळा धुऊ लागणं असे सर्वव्यापी अनुभव या कॅन्टीननं मला दिले. श्रमप्रतिष्ठा हा शब्द माझ्या माहितीकोशात नव्हता, तरीही तो माझ्या जगण्याचा भाग बनून गेला. आजवर मी सिनेमे, नाटकं लावली होती. अथवा त्यापूर्वी, रोजंदारीवर मेकॅनिकच्या हाताखाली काम केलं होतं, पण त्या प्रकारची कामं करणं आणि दिवसाचे सारे तास वेगवेगळ्या गिर्‍हाइकांचे हुकूम झेलत, त्यांच्या दृष्टीनं हलक्या प्रतीचं असण्याचं काम करत राहणं; थोडक्यात, इतरांकडून आपला आत्मसन्मान जपला जाण्याची हमी नसणारं काम करणं यात कोणता भावनिक फरक आहे, याचा अनुभव घेत मी काम करत राहिलो. मात्र, त्या फरकाची जाणीव जपण्याइतकी काही माणसं संवेदनशील असतात, याचाही मला अनुभव आला. लाल आणि पिवळ्या दिव्यांच्या गाड्या तिथे सतत यायच्या. कुणीकुणी कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी या प्रत्येकाला मामा माझ्याबद्दल कौतुकानं सांगायचे. ‘माझा भाचा हा! इथे मला मदत करत असला तरी बी. कॉम. करतोय’, असं निष्कारण सांगायचे... बड्या साहेबांच्या केबिन्सखेरीज, तिथल्या ‘कमिशनर्स क्लब’मध्ये मला रोज संध्याकाळी चहा द्यायला जावं लागायचं. बडे अधिकारी तिथे जमून एकत्र चहा घ्यायचे. चहा-कॉफीच्या किटल्या, कपबशांचे डझन, ट्रे असा थाटमाट घेऊन मी तिथे जायचो, तर तिथले ठरावीक तीन अधिकारी मला न विसरता नि मनापासून हररोज सांगायचे, "आम्हांला चहा द्यायला तू यायचं नाहीस कधीच! पोर्‍यालाच पाठवायचंस."

मला ते मनापासून आवडायचं. आपल्याला शिकायचं आहे, शिकायला हवंच, या जबाबदारीचं भान हर दिवसागणिक जागं व्हायचं. मन तर आणखी पुढे जायचं. ज्या आयुक्तांना आपण आज चहा देतो आहोत, त्याच साहेबांपुढे बसून चहा पिण्याची पात्रता आपण सिद्ध करायची, असं स्वप्न ते पाहू लागायचं. त्यामुळेच मी पुस्तकांशी किमान स्नेह जोडू लागलो. त्याला जणू बळ मिळण्यासाठीच मामांनी कॅन्टीन सोडायचा निर्णय घेतला. कष्टाच्या मानानं फारसं फायदा न होणारं हे प्रकरण उद्या तोट्यात जाण्यापेक्षा सोडून द्यावं, असं त्यांना वाटलं. मी पुन्हा बेरोजगार झालो. यापुढे मला अधिक कष्ट आणि अधिक अभ्यास करायचा होता. आजोळी जाऊन पुन्हा सुस्त, ऐदी व्हायची इच्छा नव्हती. मी जयप्रकाशला साकडं घातलं.

आम्ही राहायचो भैरोबा नाल्यापाशी. तिथून नऊ किलोमीटरवर असणार्‍या डेक्कन जिमखान्यावर गिरम्यांचं ‘क्रिएटिव्ह पेपर्स’ नावाचं दुकान होतं, जिथे मी कित्येकदा गेलो होतो. हॅन्डमेड पेपर विकले जाणारं, पहिल्या मजल्यावर असणारं हे दुकान विशेषसं चालायचं नाही. त्या इमारतीचे मूळ मालक तळमजल्यावर राहायचे. ‘क्रिएटिव्ह’ची जागा त्यांनी गिरम्यांना विकलेली होती, तरी त्यांचा वाकुडपणा होताच; पण त्यांच्याशी मला देणंघेणं नव्हतं. मला ‘क्रिएटिव्ह’मध्ये काम हवं होतं आणि तिथेच राहायची सोय केली जायला हवी होती. तसं मी जयप्रकाशला बोललो. त्यानं घरी विचारलं. घरच्यांनी उदार अंत:करणानं होकार दिला. दीडशे रुपये महिना पगार ठरला; पण मित्र म्हणून जयप्रकाश काळजीनं म्हणाला, "पण राहणार कसा तू तिथे? हॅन्डमेड पेपरांना इतर कागदांपेक्षा जास्त ऊब असते. दार लावून झोपलास तर कूकरमध्ये शिजून निघशील तू. पंखा गरम हवा फिरवत राहील. दुकानात मोरी नाहीये आणि मालक म्हणजे पुण्याच्या अर्कांचे अर्क आहेत. अडीनडीलासुद्धा तिथला कॉमन संडास ते तुला वापरू देणार नाहीत".
"तू फिकीर करू नकोस. माझी रस्त्यावर राहायचीही तयारी आहे", मी म्हणालो. मात्र, दुकानात राहणं हे रस्त्यावरच्या वस्तीपेक्षाही कठीण आहे, हे माझ्या प्रत्यक्ष मुक्कामात लक्षात येत गेलं. रस्त्यावरच राहायचं, तर चॉइसला मोठा वाव राहतो. सुलभ वा सार्वजनिक शौचालय, स्नानगृह यांच्या आसपासची रस्त्यावरची जागा शोधून, पैसे मोजून शौचालयाचा लाभ घेता येतो. माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवार्‍याच्याही आधी ‘शौचालया’चा नंबर लावायला हवा, असं माझं त्या वस्तीत मत झालं. ‘क्रिएटिव्ह पेपर्स’ची इमारतही मालकाप्रमाणे जगाशी फटकून वागणारी होती. तिच्या आसपास कुठेही सार्वजनिक शौचालयच नव्हतं, तर स्नानगृहाचा प्रश्न सहजच बाद होणारा होता, तरीही तिथे राहून, सोयी साधत ‘भुकेला कोंडा, निजेला धोंडा’ ही म्हण मी विपरीत अर्थानं खोटी ठरवत राहिलो. मला पगार मिळत होता आणि चव आवडली नाही, तर सहजच बदलता येतील इतक्या विपुल खानावळी परिसरात उपलब्ध होत्या. ही स्थिती ‘भुकेला कोंडा’ खोटं ठरवणारी होती. फाटके, खराब झालेले पेपर टाकून न देता पोटमाळ्यावर एकत्र ठेवलेले होते. त्यांची नीट जुळणी करून, चिकटवून घेऊन, काही दिवसांतच मी ‘हॅन्डमेड गादी आणि उशी’ बनवून घेतली. अर्थात, जयप्रकाशचा ‘शिजून निघण्या’चा इशारा थंडीतही खरा ठरू लागल्यावर दुकानाबाहेर व्हरांड्यात मी ‘गादी’ पसरू लागलो. महत्त्वाचा प्रश्न होता तो ‘मूल-मूलभूत गरजे’चा! संयमाची कसोटी लागायचीही; पण आजोळी नऊ किलोमीटर जाण्यापेक्षा दोन किलोमीटरवरच्या सदाशिव पेठेत जाणं सोयीचं होतं. तिथे माझी शकूमावशी राहायची. एकाच खोलीतला संसार तिचा, नि वाड्यातल्या आठ-दहा बिर्‍हाडांना मिळूच एकच संडास होता. सकाळचा संडास आणि अंघोळ यांसाठी मावशीचं इवलंसं घर माझं आश्रयस्थान झालं. पिण्याच्या पाण्याचाही, ‘क्रिएटिव्ह’मध्ये नळ नसल्यानं प्रश्न होता. मालक ‘कापल्या करंगळीवर’ पाणी सोडायला तयार होणारा नव्हता, तो काय प्यायला पाणी देणार? पण त्या इमारतीसमोरच असणारा सुरेश कलमाडींचा पेट्रोलपंप दयाळू होता. पिण्याचं पिंपभर पाणी हररोज देण्याचं सौजन्य त्या पंपानं मला दाखवलं. पाण्याचं ‘जीवन’ हे नाव किती सार्थ आहे हे पटत, ‘क्रिएटिव्ह’मध्ये मी दोन वर्षं काढली. आता माझं ‘वाडिया’त जाणं केव्हाच कमी झालेलं असलं तरी रणजित शिंदे, बैजू, सतीश मगर असे कैक मित्र इथे नियमितपणे येऊ लागले. अड्डा बसू लागला. अर्थात, ‘बिझनेस फर्स्ट’ हा माझा इथे राहण्याचा मूळधर्म होता, परंतु इथे गिर्‍हाईक मुळात बेतानंच यायचं. कलावंत आणि ‘अभिनव आर्ट स्कूल’चे नि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थीच काय येतील ते! कधी एखादा चोखंदळ लग्नपत्रिकावाला यायचा. मात्र या दशेला ‘क्रिएटिव्ह’शी संबंधित कारणं होती. इंद्रधनुष्याच्या सार्‍या रंगछटांचे हॅन्डमेड पेपर इथे मिळत असले, तरी वेगवेगळ्या गुणवत्तेच्या, जाडीच्या निवडीला विशेष वाव नव्हता. निरनिराळ्या उत्पादकांचे कागद इथे ठेवले जात नव्हते. बॉंडपेपर, कार्डशीट आणि लेटरपॅड पेपर हे तिन्ही प्रकार इथे मिळत असले, तरी त्यांच्या विविध जाडींचे प्रकार उपलब्ध नव्हते. या गोष्टी बदलण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. येणार्‍या कलाकारांना विचारून विचारूनच हे पेपर पुण्यात कुठून येतात, कुठे बनतात, याची मी माहिती मिळवली. व्यवसायाची गरज म्हणून काही ठिकाणांच्या भेटी आखून मी नि जयप्रकाश दोन जागी जाऊन आलो.

आधी पॉंडिचेरीला गेलो. ऑरोबिंदो आश्रमात सर्वोत्तम प्रतीचे हॅन्डमेड पेपर बनत होते. अ‍ॅडव्हान्स देऊन पेपरखरेदीची ऑर्डर निश्चित केली. नंतर राजस्थानला गेलो. संगानेर गावात हॅन्डमेडपेपर बनवणं हे कित्येक कुटुंबांच्या उपजीविकेचं साधन होतं. जयपूरजवळच्या या गावात घरोघरी कागदांचं प्रेसवर्क चाललेलं दिसलं, पण गिर्‍हाईक म्हणून आम्हांला कुणीच सहकार्य देऊ केलं नाही. एजन्टची अपरिहार्यता समजली. इथे सारे व्यवहार एजन्टमार्फत होत असल्यानं त्यांना गाठून व्यवहार ठरवले. इथे बनणारे कागद पॉंडिचेरीच्या कागदाइतके अव्वल प्रतीचे नव्हते, पण गरजवंतांसाठी किमतीचा समतोल साधत पुष्कळ जाडींचं वैविध्य पुरवणारे होते. तिथेही अ‍ॅडव्हान्स देऊन, एजन्टमार्फत आम्ही ऑर्डर नोंदवली. यथावकाश दोन्ही ठिकाणांहून पुण्याला कागद आल्यावर, त्वरेनं पैसे पाठवून आम्ही ‘खरेदी’ची शिस्त लावून घेतली. ‘क्रिएटिव्ह’ कागदांचा साठा आणि वैविध्यसमृद्धी झाल्यावर लगोलग गिर्‍हाईक वाढलं, असं झालं नाही. त्यासाठीही मी विशेष प्रयत्न केले. रजनीश आश्रमातून एक माणूस अधूनमधून खरेदीसाठी यायचा. त्याच्या ओळखीनं मी आश्रमात गेलो. पेपरांच्या कित्येक नमुन्यांसह गेलो. त्यांच्या खरेदी खात्याच्या अधिकार्‍यांना ‘आश्रम डिलिव्हरी’चं आश्वासन दिलं. दरवेळी ती मलाच करावी लागणार असली तरी दिलं! निसर्गप्रेमी रजनीश आश्रमाला हा अकृत्रिम कागद मोठ्या प्रमाणावर लागायचा. आम्हांला घाऊक ग्राहक मिळाला. ‘क्रिएटिव्ह पेपर्स’च्या कागदांनी मला रोजीरोटी, आसरा, बिछाना दिला. दोन वर्षं दिला, पण नंतर गिरमे कुटुंबानं ते दुकान विकायचं ठरवलं. माझी रोजीरोटी रद्दबातल होऊ लागली, पण तोपर्यंत मी बी. कॉम. झालो होतो. चाळीस टक्क्यांनी का होईना, गंगेत घोडं न्हालं होतं. घराण्यातला पहिला पदवीधर म्हणून मामांनी अनावर कौतुक केलं. त्या काळात, बदली होऊन अण्णा आणि तिघं भाऊ, आई सातार्‍याला गेले होते. भावांची जबाबदारीही आपल्याला घ्यायची आहे, असा ‘ज्येष्ठभाव’ मनाशी जुळवून, निकाल सांगायला मी सातार्‍याला गेलो. सांगितल्यावर अण्णा सुखावले, पण शब्दांतून आनंद, कौतुक उधळणं हे त्यांच्या पितृधर्माला शोभणारं नव्हतं, तरी डोळ्यांतून, चेहर्‍यांवरून ते ओसंडू लागलाच म्हणाले, "स्वत:च्या पायावर उभं राहून केलंस खरं सगळं! पुढे काय करणारेस?"

त्या क्षणापर्यंत तसा विचार मी केला नव्हता. पण... नाटक असो, सिनेमा असो, मामांचं कॅन्टीन असो वा ‘क्रिएटिव्ह पेपर्स’ असो, आपल्याला ‘विक्री’ जमू शकते, ‘विक्री’साठी अनुकूल पार्श्वभूमी तयार करणं जमू शकतं, असा विचार तत्क्षणी माझ्या मनात आला. ‘वाडिया’चा हुकलेला प्रवेश असो, राहण्याच्या सोयीसाठी गिरम्यांकडे केलेली विचारणा असो, आपल्याला उद्दिष्टपूर्तीसाठी ‘संवाद’ साधता येऊ शकतो, असा विचार तत्क्षणी माझ्या मनात आला. म्हणालो, "पुढचं काही ठरवलं नाहीये, पण ‘मार्केटिंग’चं काही शिक्षण घ्यावं, असं वाटतंय मला!"

***

प्रदीप लोखंडे, पुणे - १३
रूरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची!

सुमेध वडावाला (रिसबूड)
मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या - २३१
किंमत - रुपये २२०

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरवार्ता आहे म्हणजे निवांतपणे वाचायला ठेऊया असे म्हणत होतो पण सुमेध वडावाला हे नाव वाचल्यावर धीर नाही धरवला. त्यांचे अशा प्रकारचे लेखन वाचायची ही माझी पहिलीच वेळ पण त्यांच्या विज्ञानकथांचा मी पंखा होतो. त्यांच्या लौकिकाला साजेसेच लिखाण आहे हे पण - पहिल्या शब्दापासून पकड घेणारे.

चिनूक्स, अक्षरवार्ताच्या ह्या भागाकरता तुला खूप खूप धन्यवाद.

माधवने म्हटलेले खरे आहे - पहिल्या शब्दापासून पकड घेणारे लिखाण.
खूप सुंदर परिचय करुन दिलाय - धन्स चिनूक्स.

काय मस्त वल्ली आहेत! आता मिळवून वाचले पाहिजे हे पुस्तक .
चिनूक्स, सातत्याने वेगवेगळ्या विषयातल्या निवडक पुस्तकांची ओळख होत असते या उपक्रमाद्वारे त्याबद्दल धन्यवाद !

हे दुपारी वाचलं होतं

परिचय थोडा लांबला

पण उपक्रमाला हॅट्स ऑफ

Happy

==========================

चिनूक्स,

अशांना दीर्घ परिचय खुशामतही वाटत असेल

-'बेफिकीर'!

मस्तच. एका दमात वाचून काढलं. Happy अनुभव मासिकातला लेखही आधी वाचला होता.

व्यक्तीपरिचय ही रिसबूडांची खासियत आहे. (उदा : मनश्री, हेडहंटर)

मेधा +१
एकदम वल्ली आहेत! असं काही वाचलं की मग वाटायला लागतं की आपल्याकडे बरच काही आहे आणि त्याचं बरच काही करता येइल. Happy