महिला दिन २०१२ निमित्त गरजू संस्थेला मदत उपक्रम/आवाहन

Submitted by सुनिधी on 6 March, 2012 - 10:40

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने मायबोली-संयुक्ता-सुपंथ परिवारातर्फे गरजू संस्थांसाठी मदत गोळा केली जाते. मायबोलीकरांच्या समृद्ध सामाजिक जाणिवांचे व जबाबदारीच्या भावनेचे या उपक्रमातून उत्कृष्ट दर्शन होत असते.

सामाजिक उपक्रमांत कोणकोणत्या संस्था मदतीसाठी निवडाव्यात ह्याबद्दल नेहमीच पेच असतो. ज्या संस्थेत आपण गोळा केलेली मदत वस्तूरूपात देणगी म्हणून देता येईल अशा संस्था शोधणे, त्यांची काय गरज आहे याचा आढावा घेणे, त्यानुसार आपण करावयाच्या मदतीचे स्वरूप ठरविणे इत्यादी काम संयुक्ताच्या सदस्या दर वर्षी आवडीने व उत्साहाने करतात.

गेल्या २ वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण पुण्यातील कोथरुडच्या अंधशाळेतील मुलींसाठी मदत जमा करायचे ठरविले आहे.

भारतात सध्याच्या घडीला जगातील एकूण अंधांपैकी एक चतुर्थांश अंध व्यक्ती आहेत. १५ दशलक्ष भारतीय अंधत्वाचा सामना करत आहेत. त्यातील ९०% लोकांचे वय ४५ च्या आत असून ६०% अंधांचे वय १२ च्या खाली आहे. भारतात सध्या २ लाख ६०,००० अंध मुले आहेत.

पुण्याच्या कोथरुड येथील अंधशाळेत येणार्‍या मुलींविषयी : यातील खूप मुली ग्रामीण भागातून किंवा उपनगरांतून येतात. जात, धर्म, पंथाची येथे आडकाठी नाही. निम्न आर्थिक स्तरांतून येणार्‍या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुपोषणामुळे व वेळीच योग्य उपचार न झाल्यामुळे अनेकींना अंधत्व आलेले असते. मुळात निम्न आर्थिक स्तरात व ग्रामीण भागात शरीरात व्यंग असलेल्या मुलाची अवस्था बिकट असते. कुटुंबियांपाशी अशा मुलावर - त्याच्या उपचारांवर अनेकदा वेळ, पैसा, शक्ती घालवण्याची इच्छा किंवा परिस्थिती नसते. त्यातून ती जर मुलगी असेल तर तिची परिस्थिती आणखी वाईट असते. अशा मुलींना अंधशाळेत आणून सोडल्यावर कित्येक पालक त्यांच्याबद्दल विसरूनही जातात. शालेय सुट्ट्यांमध्ये या मुलींनी घरी जाण्याचे सक्तीचे केल्यामुळेच केवळ कित्येक पालक त्यांना तेवढ्यापुरते घरी नेतात.

अंधशाळेच्या माध्यमातून मुलींना पोषक आहार, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत व व्यक्तिमत्त्व विकास - स्वावलंबनास आवश्यक शिक्षण दिले जाते. मोफत राहायची व खायची सोयही होते. व्यावसायिक शिक्षण देतात. मुलींना संगीत, कला, खेळ यांच्याविषयी मार्गदर्शन केले जाते. पुस्तके, ऑडियो टेप्स च्या माध्यमातून मुलींच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यास मदत केली जाते.

अंध किंवा दृष्टीहीन मुलींना त्या वयात आल्यावर सर्वाधिक गरज असते ती योग्य पोषक आहाराची व वैयक्तिक स्वच्छता - निगा यांविषयी मार्गदर्शन व मदतीची. आपल्या छोट्या छोट्या गरजांसाठी त्यांना इतर कोणावर तरी विसंबायला लागते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेली २ वर्षे संयुक्ता सुपंथ मायबोलीतर्फे या मुलींना मासिकधर्मासाठी हायजिन प्रॉडक्ट्स (सॅनिटरी पॅड्स) पुरविली जातात. ह्या बद्दल संस्थेच्या मुख्याध्यापिका आवर्जून सांगतात की, 'मुलींच्या वैयक्तिक आरोग्यासाठी व आत्मविश्वासपूर्ण वावरासाठी ही मदत फार मोलाची आहे. अनेक लोक अन्न, पैसे, वस्तू देणगीस्वरूपात देतात. परंतु अशी मदत करणारे लोक विरळ आहेत'.
त्यामुळे या वर्षीही मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवाराने अंधशाळेच्या मुलींना हायजिन प्रॉडक्ट्सची मदत करण्यासाठी निधी उभा करायचे ठरविले आहे.

१ वर्षाच्या हायजिन प्रॉडक्ट्ससाठी अंदाजे येणारा खर्च : ३५,००० रुपये.

तसेच या मुलींच्या शैक्षणिक साहाय्यासाठी त्यांना टॉकिंग कॅल्क्युलेटर्सची गरज भासते. अशा १२ कॅल्क्युलेटर्सची सध्या संस्थेला गरज आहे. त्यासाठीही निधी उभा करून अंधशाळेला ही मदत मिळवून देण्याचा संयुक्ता सुपंथ परिवाराचा मानस आहे.

टॉकिंग कॅल्क्युलेटर्स : अंदाजे खर्च : ५००० रुपये + वाहतूक खर्च

ह्याशिवाय अंधशाळेच्या पुजारी मॅडमनी अंधुक / कमी दृष्टी असलेल्या मुलींना अभ्यासात व इतर ठिकाणी मदत करू शकतील अशी काही लो व्हिजन साठीची उत्पादने सुचवली आहेत ज्याबद्दल अजुन माहिती घेणे चालु आहे. योग्य ती माहिती मिळताच ती साधने, त्यांचे उपयोग व ती विकत घेण्यास लागणारी किंमत ही सर्व माहिती येथेच लिहिली जाईल.

* वस्तूस्वरूपात देणगी असल्यामुळे अंधशाळेकडून त्या वस्तूची देणगी मिळाली अशी पावती मिळेल.
जर तुम्ही विशिष्ट वस्तू स्पॉन्सर केलीत तर त्या वस्तूच्या पावतीची डिजिटल इमेज / स्कॅन इमेज देणगीदात्यांना पाठवू शकतो.

* उर्वरित वस्तूरूप देणग्यांच्या पावत्या मायबोली संयुक्ता सुपंथ परिवाराच्या नावे मिळू शकतील. त्या पावत्या, पत्र इत्यादी ह्याच धाग्यावर प्रकाशित केले जाईल.

देणगीची रक्कम कोठे जमा करायची?
रुपयांत रक्कम कृपया सुपंथ च्या बँक खात्याला पाठवा. त्यावर मेमो मधे 'महिला दिन-स्वतःचे नाव' असे लिहावे.

जर आपणास निनावी मदत करायची नसल्यास मेमोमधे स्वतःचे नाव लिहिणे फार गरजेचे आहे कारण त्यामुळे देणगीदाराचे नाव सहज कळण्यास फार मदत होते.

खाते क्रमांक वगैरे बद्दलची माहिती खाली आहे.
Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

अमेरिकावासीयांना जर डॉलर्स मधे रक्कम पाठवायची असेल तर कृपया चेक मला (सुनिधी) पाठवा.

आपल्यातले अनेकजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विधायक, समाजोपयोगी कार्याला मदत करत असतातच! या कार्यातही आपण आपले योगदान द्यावे, फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात मदतकार्यात हातभार लावावा यासाठी आपणांस विनम्र आवाहन!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता +१.
गाजावाजा न करता आपण गेले दोन वर्ष हा निधी गोळा करत आहोत. यंदा हे तिसरे वर्ष.
सातत्याबाबत कौतुक करावे तितके थोडे आहे.

सुनिधी,
धागा सार्वजनिक कर ना.

सुनिधी, तुला चेकच पाठवावा लागेल का? तुझे बँक ऑफ अमेरिका किंवा इतर कुठल्या बँकेत अकाऊंट आहे का जिथे सरळ पैसे ट्रांस्फर करता येतील?

धन्यवाद सुनिधी हा धागा सुरु केल्याबद्दल!! Happy काही मायबोलीकरणींनी अगोदरच विचारणा करून ठेवली होती या उपक्रमाबद्दल. त्यांना आता हा धागा सुरु झाल्याचे व उपक्रमाचे कळविते. थँक्स. Happy

ह्या उपक्रमात सामील झालेल्या सर्वांचे खूप आभार.

एकूण देणगीची रक्कम ५०,५१५.२६ एवढी जमली. त्यापैकी ३५००० रुपये कोथरुड येथील अंधशाळेला वस्तूरुपाने मदत देण्याकरता बाजूला काढून ठेवले गेले. १ वर्ष पुरतील एवढ्या हायजिन प्रॉडक्ट्सची ऑर्डर देण्यात आली आहे आणि ती मिळताच अंधशाळेला देणगीस्वरुपात देण्यात येईल.

वाहतूकखर्च वजा करता, साधारण १५,००० रुपये उरतात, त्या इतर गरजू संस्थांना देण्यात येतील. त्याकरता संस्थांची चौकशी सुरु आहे. आपल्याला अश्या काही संस्था माहिती असल्यास आपणही माहिती कळवू शकता.

पुन्हा एकदा, ह्या उपक्रमात सामील झालेल्या सर्व देणगीदारांचे आणि संयुक्तांचे आभार.

सर्व दात्यांचे मनापासुन आभार.
अंधशाळेचे काम मार्गे लागलेले आहे. हायजिन प्रॉडक्ट्स अंधशाळेला पोचले आहेत. ह्या आठवड्यात बाकी काम पुर्ण होईल.

मो ने लिहिल्याप्रमाणे अजुन साधारण पंधरा हजार रुपये निधी उरला आहे तो साजिरा ह्यांनी माहिती लिहिलेल्या
निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा ह्या संस्थेला देण्याचे ठरले आहे. ह्या देणगीबाबत पुढील चर्चा व माहिती साजिरा ह्यांच्याच धाग्यावर करत आहोत. कृपया तिथे अवश्य भेट देणे.
http://www.maayboli.com/node/34526

-धन्यवाद.

अंधशाळेला वस्तूरुपात देणगी देऊन एकूण उरलेला निधी आहे १५५१५ रुपये.
अंधशाळेकडून वस्तू मिळाल्याची पावती मिळाली की ह्या बाफ वर पोस्ट केले जाईल.

दोन दिवसांपूर्वी अंधशाळेत देणगी वस्तू पोचल्या. काल अंधशाळेत देणगीदाखल पोचलेल्या हायजिन प्रॉडक्ट्सची पार्सल्स मी व मायबोलीकरीण अवल यांच्या उपस्थितीत खोलून सर्व शहानिशा, मोजदाद वगैरे सोपस्कार अंधशाळेचा कर्मचारी वर्ग आणि काही विद्यार्थिनींच्या मदतीने पार पडले. प्राचार्या श्रीमती पुजारी यांनी मायबोलीकरांचे व संयुक्ता सुपंथ परिवाराचे खूप खूप आभार मानले आहेत. त्यांनी लगेच वस्तू देणगीची पावती व आभारपत्रही दिले.

वस्तू देणगीची पावती

क्र. १ :

क्र. २

आभारपत्र १ :

आभारपत्र २ :

अंधशाळेत जाणवले ते म्हणजे स्वच्छ, प्रसन्न वातावरण व मुलींचा मनमोकळा वावर. त्यांची तिथे व्यवस्थित काळजी घेतली जात आहे, त्यांना तिथे एक स्वतंत्र व स्वावलंबी नागरिक बनविण्यासाठी शक्य त्या सर्व तर्‍हेचे उपाय, शिक्षण दिले जात आहे हे पाहून खरेच छान वाटले.

धन्यवाद बागुलबुवा! Happy

एका माबोकरीण संयुक्ता सदस्येने अंधशाळेतील मुलींसाठी शैक्षणिक वस्तू ( १२ नग टॉकिंग कॅल्क्युलेटर्स, २ नग टॉकिंग थर्मोमीटर्स व ३ नग टॉकिंग क्लॉक्स) घेण्यासाठी अंधशाळेला नुकतीच देणगी दिली आहे. अंधशाळेने त्या वस्तू ऑर्डर केल्या असून त्या लवकरच शाळेकडे पोचतील.
त्या संयुक्ता सदस्येचे खास खास आभार! (तिने नाव न सांगायची अट घातली आहे.) Happy

संयुक्ता सुपंथ महिलादिन २०१२ गरजू संस्थेला मदत उपक्रमात जमा झालेल्या निधीतून १४,००० रुपयांच्या सोलापूर येथून खरेदी केलेल्या १०० सिंगल कॉटन प्रिंटेड बेडशीट्सची मदत सटाणा, जि. नाशिक येथील निवासी अपंग कल्याण केंद्राच्या वसतिगृहातील मुलांना करण्यात येत आहे. त्यानुसार चादरी संस्थेत पोहोचविण्यासाठी साजिरा यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. जुलै महिना अखेरपर्यंत त्या सटाण्याच्या संस्थेत पोहोचतील. सुनिधी, साजिरा व बाकीच्या सर्व मदतकर्त्यांना हार्दिक धन्यवाद! Happy

मोहन की मीरा.... हो नक्कीच! थोडा निधी अद्याप उरला आहे त्यातून सटाण्याच्या संस्थेतील मुलांसाठी वाचनासाठी पुस्तके घेऊन देणार आहोत. निधीत भर पडली तर अधिक पुस्तके घेऊन देता येतील. Happy

ठरविल्याप्रमाणे सटाण्याच्या अपंग कल्याण संस्थेला १०० बेडशीट्स पोहोचली आहेत. धन्यवाद साजिरा व सुनिधी! Happy लवकरच संस्थेचे वस्तू मिळाल्याबद्दलचे पत्र मिळेल. ते येथे पोस्ट करूच! Happy

ह्या अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन.
एकच विनंती की खाते क्रमांकासोबत IFSC कोडही द्यावा.

हा उपक्रम जवळजवळ संपुर्ण पार पडलाय. अजुन जो निधी आहे त्याचा विनियोग करण्यावर काम चालु आहे.

हा उपक्रम पार पडण्यासाठी इथे जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मायबोली व मायबोली प्रशासक ह्यांचे खुप आभार.
सर्व देणगीदारांचे व स्वयंसेवकांचे मनापासुन आभार.
हा लेख अरुंधतीने लिहुन दिला होता व साजिरानी सटाणा संस्थेवर लेख लिहिला होता ह्यामुळे दोन्ही संस्थांची माहिती तपशीलवार माहिती सर्वांपर्यंत पोचवली गेली त्याबद्दल दोघांचे मनापासुन आभार.

अशीच मदत मायबोलीकरांकडुन ह्यापुढेही मिळत राहील अशी प्रार्थना. अजुनही देणगीदार मदत पाठवत आहेत.

काहीजण संस्थांची नावेदेखील सुचवत आहेत त्यांनी नम्र विनंती की त्यांनी अशा संस्थेवर तपशीलात लेख लिहु शकले, फोटो देऊ शकले तर खुप उपयोगी पडेल, सर्वांपर्यंत संस्थेची माहिती जाईल.

१. साजिरा यांनी अपंग कल्याण संस्थेला (सटाणा) महिला दिन उपक्रमांतर्गत देणगीदाखल दिलेली पुस्तके पोचल्याचे कळवले आहे. त्यांच्याकडून पत्र मिळाले की त्या बाफावर व इथे ते पोस्ट करूच!

२. एका संयुक्तेने निनावी राहण्याची विनंती करून पुण्यातील मुलींच्या अंधशाळेला गरज असलेल्या लो-व्हिजन एड्स ची अतिशय महत्त्वाची मदत अमेरिकेतून देणगीदाखल देऊ केली आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारची भिंगे, द्रव पदार्थाची पातळी सूचित करणारे यंत्र असे आहे. तेथील प्राचार्या व स्टाफने या मदतीबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली. जर कोणाला अशी मदत पुढे करायची असेल तर आता त्या बद्दलची सर्व प्रोसिजर, कस्टम्स नियम इत्यादीबद्दल माहिती आपल्याजवळ त्या निमित्ताने जमा झाली आहे. अगदी ६ -८ $ पासून २०० - ३०० $ पर्यंत किंमतीची अनेक उपकरणे लो-व्हिजन एड्स मध्ये येतात.

या निनावी राहू इच्छिणार्‍या संयुक्तेचे खूप खूप आभार! Happy

शनिवारी ही मदत अंधशाळेत पोचती केल्यावर त्या भिंगांचा काढलेला हा फोटो.

Picture 005.jpg

या अगोदर सटाणा संस्थेला भेटीदाखल दिलेली पुस्तके :

letter 1.jpg

साजिरा यांचे व उपक्रमास हातभार लावलेल्या अनेकांचे धन्यवाद! Happy

[ही यादी व पत्र पुढे पुस्तके भेट देण्याचे ठरल्यास संदर्भासाठी देत आहे ]

दिवाळीत सटाणा संस्थेला संयुक्ता सुपंथ मायबोली परिवारातर्फे भेटीदाखल दिलेल्या पुस्तकांची यादी व आभारपत्र :

letter 2.jpg