चिकन न्योकी सूप

Submitted by maitreyee on 6 March, 2012 - 07:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन ब्रेस्ट - सुमारे अर्धा पाउंड - थोडे कमी जास्त चालते
न्योकी- १ बोल - हे एक प्रकारचे डंपलिंग असतात. सुपर मार्केट मधे फ्रोझन किंवा कुक्ड पास्ता सेक्शन मधे मिळतात.लहान आकाराचे बघून घेणे, साधारण सांडग्याच्या आकाराचे
लाजोने इथे रेसिपी दिल्याप्रमाणे न्योकी घरीही करता येतात.
न्योकी असे दिसतात
gnocci.jpg

हाफ न हाफ मिल्क किंवा साधे दूध + क्रीम - २ कप
चिकन ब्रॉथ - २ कप
कांदा बारीक चिरून - पाउण वाटी
लसूण बारीक केलेला - १-२ लहान पाकळ्या
सेलरी बारीक तुकडे करून - अर्धी ते पाउण वाटी
गाजर बारीक पातळ चकत्या किंवा जूलियन कट करून - १ वाटी
पालक - मूठभर पाने
फ्लेवर साठी- पार्स्ली किंवा इटालियन हर्ब मिक्स किंवा इटालियन सीझनिंग , मिठ, मिरी पावडर , जायफळ पावडर,
२ चमचे कॉर्न फ्लावर किंवा साधी कणिक
बटर २ चमचे, ऑलिव ऑइल २ चमचे

क्रमवार पाककृती: 

ऑलिव्ह गार्डन (अमेरिकेतले एक चेन रेस्टॉ.))मधे हे सूप अगळ्यात आधी चाखून पाहिलं आणि आवडलं होतं.
मग नेट वर शोधा शोध करून एक दोन रेसिप्या ट्राय केल्या. ही रेसिपी सगळ्यात त्या चवीच्या जवळ जाणारी वाटली. यात माझे श्रेय खरे तर फार काही नाही. करून पाहणे इतकेच!
पूर्वतयारी-
चिकन उकडून घेणे- त्याचे उकळलेले पाणीच ब्रॉथ ऐवजी वापरू शकता
न्योकी थोडे मीठ घातलेया पाण्यत उकळून मऊ होईपर्यन्त शिजवून बाजूला ठेवा. फार वेळ उकळायची गरज नाही.

जाड बुडाच्या भांड्यात बटर + ऑलिव ऑइल मध्यम आचेवर गरम करा. त्यात चिरलेला कांदा, लसूण पारदर्शक होइपर्यन्त परता. त्यात गाजराचे आणि सेलरीचे तुकडे घालून अजून थोडे परता. आता गॅस ची आच मंद करा. थोडे कॉर्न फ्लावर किंवा साधी कणिक २-३ चमचे घालून नीट हलवून घ्या. मग चिकन ब्रॉथ,उकडून लहान तुकडे केलेले चिकन आणि हाफ अ‍ॅन्ड हाफ दूध घालून उकळी येइपर्यन्त हलवत रहा. दूध आणि ब्रॉथ चे प्रमाण थोडे कमी जास्त करून कन्सिस्टन्सी हवी तशी ठेवा. हे सूप तसे घट्ट असते, साधारण पिठल्याइतके किंवा किंचित पातळ. पण करून झाल्यावर थोड्या वेळाने अजून घट्ट होते त्यामुळे आत्ता थोडे अजून पातळ ठेवले तरी चालेल. उकळी आल्यावर न्योकी घाला. आता पार्स्ली, ( फ्रेश नसेल तर ड्राय इटालियन सिझनिंग मिळते ते वापरू शकता) मीठ- मिरी पावडर, चिमूट भर जायफळ पावडर (हे मला इन्टरेस्टिन्ग वाटले होते, पण त्याचा फ्लेवर फार मस्त येतो सूप ला. जायफ्ळ नव्हते म्हणून मी एकदा चक्क वेलदोडा पावडरही वापरली होती , वर्क्ड वेल! )घाला, वरून जरासा ओबड धोबड तुकडे केलेला पालक घाला, अन थोडा वेळ अजून उकळू द्या. दोन तीन मिनिटांनी बंद करून झाकण ठेवा अन थोडे मुरु द्या.
आता बेस्ट पार्ट Happy सूप नीट हलवून बोल मधे ओतून वरून हवे तर थोडे पार्मेजान चीज घालून आवडीच्या डीनर रोल/ पाव बरोबर गरमागरम एन्जॉय करा !!
soup.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण ३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

* एक टिप - माकाचु मोमेन्ट अ‍ॅक्चुअली - मला - सहसा बहुतेक देशी लोकांना कांदा लसूण सढळ हाताने वापरायची सवय असते. इथे तसे अज्जिबात करू नये! स्वानुभव! कांदा - लसूण जास्त पडले तर यात मुळीच चांगले लागत नाही! Happy

माहितीचा स्रोत: 
इन्टरनेट वर सर्च - अन त्यावर माझे प्रयोग
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, पाहिले का करून . हो मश्रूम पण छान लागत असेल यात! अन कणकेचा ब्रेड कसा केला रेसिपी लिही ना Happy
डिजे, ते सूप तसं पोटभरीचं होतं त्यामुळे सॅलड, सूप, पाव एवढेच जेवण होतं Happy

हे सूप करायला आज मुहूर्त लागला. 'अनावर क्वांटिटीत झालंय, खपणार कसं' या विचारात असता ५ मुलांनी सगळं संपवलं. रू (roux) जास्त झाल्यामुळे की काय पण आधी सूप सुरीने कापलं तर वड्या पडतील इतकं घट्टं झालं. दूध आणि चिकनस्टॉक घालून नीट करता आलं. फक्त इटालियन सीझनिंग, मीठ, मिरी पावडर वाढवावं लागलं. (न्योकी बाहेरून आणलेली वापरली.)

मै, खूप धन्यवाद!

मै/वै
छान रेसिपी. न्योकी सुप म्हणल्यावर एका ईटालीयन मैत्रीणीला मी दुधीची मुटकुळी व्हाईट सॉस मधे करुन चारली होती. Happy

Pages