पनीर -गट्टे की सब्जी..

Submitted by सुलेखा on 1 March, 2012 - 03:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गट्ट्यासाठी----
२ वाटी बेसन.
१ वाटी पनीर .[अंदाजे २०० ग्राम पुरते]
१/४ वाटी घट्ट दही.[व १/४ वाटी ग्रेव्ही साठी. असे भाजीसाठी एकुण १/२ वाटी दही लागणार आहे]
१ चमचा आलेलसुण पेस्ट.
१/२ चमचा ओवा.
१/८ चमचा हिंगपुड.
१ चिमुट खाण्याचा सोडा.
१ चमचा तेल.
१ /२ चमचा लाल तिखट.
मीठ चवीनुसार..
ग्रेव्ही साठी--
२ कांदे.
२ टोमॅटो.
१/४ वाटी घट्ट दही.
२ हिरव्या मिरच्या,
१/२ चमचा मोहोरी व जिरे
१/२ चमचा हळद.
१/२ चमचा ति़खट.
मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी २ मोठे चमचे तेल.
१ चमचा गरम मसाला.
कोथिंबीर चिरलेली वरुन घालायला.
.

क्रमवार पाककृती: 

गट्टे करण्यासाठी च्या साहित्यातील पनीर किसुन बाजुला ठेवावे.
बाकी वस्तु एकत्र करुन त्यात लागेल तितके पाणी घालुन त्याचा गोळा बनवावा.वरुन तेलाचा हात फिरवावा.म्हणजे लाटताना पोळपाटाला चिकटणार नाही.
आता या गोळ्याची पातळ पोळी लाटुन त्यावर किसलेले पनीर पसरावे .या पोळीची घट्ट गुंडाळी वळुन घ्यावी व त्याचे अर्ध्या इंचाचे तुकडे कापावेप्रत्येक तुकड्याच्या कापलेल्या दोन्ही बा़जुंवर [सुरी-काट्यातल्या]काट्याने दाबुन घ्यावे जेणेकरुन त्यात भरलेले सारण बाहेर येणार नाही..
एका कढईत २ कप पाणी उकळावे.त्यामधे हे तुकडे ५ मिनिटे उकळावे.थोडे सारण बाहेर आले तरी हरकत नाही्ए तुकडे अलगद हाताने बाहेर काढावे.उकळलेले पाणी भाजीत रसासाठी वापरायचे आहे.
ग्रेव्ही-
कांदा-टोंमॅटो-मिरच्या एकत्र वाटुन घ्याव्या.
तेलाची फोडणी करुन त्यात जिरे-मोहोरी-हिंग ,दही घाला व ही पेस्ट तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतुन घ्यावी.
आता त्यात गट्टे उकळलेले पाणी व चवीनुसार मीठ घालावे .उकळी आली कि गरम मसाला,तिखट,चवीनुसार मीठ व गट्टे घालावे.अजुन एक उकळी येवु द्यावी.
वरुन कोथिंबीर घालावी.
या भाजी बरोबर पोळी,पराठा,भाकरी काहीही चालेल.

वाढणी/प्रमाण: 
३ जणाना पुरेशी आहे..
अधिक टिपा: 

माझ्या शेजारी जैन भाभी रहायच्या..जैन असल्याने भाज्या अमुक च चालायच्या. त्यांच्याकडे शनिवारी संध्याकाळी ही सब्जी व्हेरीएशन ने करायच्या.गट्ट्यामधे पनीर,किसलेले खोबरे-किशमीश्-काजु भरुन तर कधी जिरावण व शोप चा मसाला भरुन्.पण त्यांची भाजी कांदा ,आले,लसुण विरहीत असायची पण तिखट मात्र झणझणीत असायचे व तेलाचा तवंग ही असायचा.इतकं ति़खट खाणं शक्यच नव्हते.त्यामुळे मी या प्रकाराने करु लागले.

माहितीचा स्रोत: 
माझी शेजारीण..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गटटे पनीर भरुन केले आहेत त्यामुळे शिजल्यावर गिच्च्/घट्ट न होता मऊसर रहातात .चवीला नेहमीपेक्षा वेगळे लागतात.

गट्टे + पनीर हे राजस्थानी-पंजाबी फ्युजन म्हणावं का?
गट्टे उकळण्यापेक्षा वाफवलेले चालतील का?

<<त्यामधे हे तुकडे ५ मिनिटे उकळावे.थोडे सारण बाहेर आले तरी हरकत नाही्ए तुकडे अलगद हाताने बाहेर काढावे>> उकळत्या पाण्यात हात कशाला घालावा? Wink

भरत्,हो हे फ्युजन म्हटले तरी चालेल्.जयपुर ला खास राजस्थानी जेवण "नखराली ढाणी"/"चोख्खी ढाणी"मध्ये पारंपारिक वेषभूषा व वातावरण निर्मिती मध्ये "मान-मनुहार" करुन खिलवतात /वाढतात.त्यात दाल -बाटी ,गट्टे कि सब्जी,केर -सांगरी ची भाजी असे खास राज्.पदार्थ असतात्. त्यात बाटी व गट्ट्याचे असेच वेगवेगळे "फ्युजन"प्रकार असतात.हे सगळे पदार्थ एकाच पानात थोडे-थोडे वाढतात.त्या शिवाय बर्‍याच वाट्या ही असतात.थाळी पाहुनच मन अति-प्रसन्न होते.जमल्यास राजस्थानी ढाणी ला भेट द्या.इतर जागी या ढाणी ची प्रथा आहे.
हे गट्टे इडली पात्राला तेलाचा हात लावुन वाफवले तरी चालेल.अलगद हाताने ही "बोली-भाषा" आहे.तुकडे न मोडता पाण्यातुन बाहेर काढायचे आहेत्.पळी ने काढा ना?उकळत्या पाण्यात हात का घालावा?

सुलेखा, इंदूरला चोखी ढाणी आणि नखराली ढाणी पाहिल्यात. इंदूरकरांना कोणत्याही विशेष प्रसंगी दाल-बाटी(च) लागते(च). केर सांगरी टीव्हीवर पाहिले होते विनोद दुआच्या जायका इंडियाका मध्ये.
तसेच इंदूरात एक राजस्थानी थाली रेस्टॉरंटही होते. तिथे मोठी थोरली थाळी, त्यात लहान लहान वाट्यांची गर्दी आणि दर मिनिटांनी डोक्याशी नवीन वाढप्या असा थाट असायचा. तिथल्या जेवणाच्या आधी आणि नंतर उपास मस्ट.

उकळत्या पाण्यात हात घालण्याचा माझा जोक फसला Sad Lol

कु़णीतरी प्लीज क्रमवार फोटो टाका... मी प्रयत्न केला..पण नाही जमले.. Sad
बेसन मळताना खुपच चिटकत होते..आणि पनीर किसुन टाकल्यावर वळकटी करताना बेसन पोळी तुटुन गेली..

>>>इंदूरला चोखी ढाणी आणि नखराली ढाणी पाहिल्>>><<

हो हो बरोबर. माझी आईला विचारले तर भरभरून सांगायला लागेल.. Happy इंदोर पाहिजे ते. इंदूर नाही.

इंदोर पाहिजे ते. इंदूर नाही.>>

जसं मुंबईला हिंदीत बंबई म्हणतात तसच मराठीत इंदोरला इंदूरच म्हणतात.

सही आहे.. बघते ट्राय करुन.
पण एक डाउट आहे. ते सारण गट्यातुन बाहेर पडेल ना? काट्याने दाबुन ठेवले असले तरीही. Uhoh

मस्त आहे व्हेरीएशन..... माझ्या सासुबाई यात खूप सुगरण आणि केर सांगर्‍या म्हणजे आमच्याकडे सर्वांची आवडती भाजी...... Happy तसे गट्टे आमच्याकडे (जैन समाजात) दाळ बाटी च्या जेवणाबरोबर करतातच...... Happy

>>>इंदूरला चोखी ढाणी आणि नखराली ढाणी पाहिल्>>><<>>>>>> हे पुण्यातही आहे वाघोली जवळ गट्टे (म्हनजे गुजराती आणि राजस्थानी जेवनही) मस्त असते तिथले..... Happy

योगुली.मी खास जयपुरची "ढाणी" म्हणते आहे..तिथे बाट्या/बाफल्यांचे [मावा,सुका मेवा,पनीर्,असं खुप काही भरुन केलेल्या गोड आणि तिखट ]नवे प्रकार असतात.तिथेच भाज्या व हे गट्टे लाजवाब असतात्..इतके काही विविध पदार्थ भरलेली थाळी असते कि नुसती चव पहाता पहाताच पोट भरते.मी जैन लो़कांत राहिले त्यामुळे चालीरिती [त्यात जेवण आलेच] खुप जवळुन अनुभवल्या आहेत. मलाही केर सांगरी फार आवडते.

मी_चिऊ.
बेसन घट्टसर भिजवुन तेलावर पोळी लाटुन घ्यायची..किसलेले पनीर पसरुन गुंडाळी करायची व सुरीने तुकडे करायचे दोन्ही बाजुवर काट्याने दाब द्यायचा साधारण पाव इंच इतका .म्हणजे दोन्हीकडे काट्याची नक्षी दिसेलअसे नसे करायचे तर सुरीने कापलेल्या जागी हाताने दाबावे.म्हणजे टोके सुटणार नाहीत्.पनीरचा थर अगदी पातळ पसरावा.चवीला पनीर लागेल इतपत.