“अर्निका, यावर्षी नाचात मानाची जागा तुझी.” ग्रीक नाचाच्या रंगीत तालमीत आमचा रिंगमास्टर पानोस म्हणाला. “मंचावर तू मधोमध असणार आहेस. स्तो केंद्रो!” मी स्तब्ध होऊन बघत राहिले. पानोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तू मधोमध असावंस.”
चावीचं खेळणं चालावं तशी चालत चालत मी मधोमध उभी राहिले.
एकदा नाच झाल्यावर पानोसला विचारलं, “तू मधोमध ला काय ग्रीक शब्द वापरलास?”
“केंद्रो. नवीन आहे नाही का हा शब्द तुला?”
“नवीन कसला? आमचाच घेतलात!” मी हसत म्हणाले. गेला तासभर पानोसला जे जमलं नव्हतं ते मी दोन सेकंदात करून दाखवलं होतं. खोलीतली सव्वीस टाळकी माझ्या चार शब्दांनी एकदम शांत झाली, माझ्या अवतीभोवती गोळा झाली. मी खऱ्या अर्थाने ‘केंद्रो’मधे अडकले.
“काहीही काय? केंद्रो सरळ सरळ ग्रीक शब्द आहे. त्यावरूनच सेंटर शब्द आलाय.” स्ताव्ह्रोस म्हणाला.
“आई शप्पथ! तरीच सेंटर लिहिताना tre ने शेवट होतो. पण संस्कृतमधेही केंद्रच म्हणतात.” मी आश्चर्याने म्हणाले.
“वादविवाद स्पर्धा तालमीनंतर घेऊया का? अजून ४ नाच राहिलेत. घेतला असेल एखादा शब्द संस्कृतने ग्रीककडून! पण म्हणून अर्निकाला कशाला छळायचं ना?” पानोस मुद्दाम डोळे मिचकावत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी या चर्चेत इतर देश सामिल झाले. कोणी हरायचा किंवा जिंकायचा प्रश्नच नव्हता. पाच मिनिटांच्या लटक्या ‘तू तू मैं मैं’ नंतर ती लढाई न रहाता देवाणघेवाण व्हायला लागली. कारण भारतीय, ग्रीक, इराणी आणि इजिप्शियन या प्राचीन वसाहतींच्या डोलाऱ्यावर उभ्या असलेल्या चारही देशांचा अबाधित विश्वास आहे, की संस्कृती आणि भाषा आपणच सबंध जगाला भेट दिल्या आहेत. आपापले डबे उघडत आमची चविष्ट संभाषणं रंगात आली होती. आदल्या दिवशी मी घरून आणलेल्या साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारत सगळे म्हणाले, “आहा! काय आहे हा प्रकार? काल सण होता?”
“नाही. सण असा नाही. संकष्टी चतुर्थी म्हणून असते.”
“चतुर्थी! हाहाहा... काय शब्द असतात तुमचे! म्हणजे काय? आमच्या ‘तेतार्ती’ सारखा वाटतो ना शब्द... ‘चौथा दिवस’ वगैरे नाही ना अर्थ त्याचा?”
खिचडी विसरून मी तोनियाकडे बघत राहिले! आई शप्पथ! हाच तर अर्थ होता चतुर्थीचा. मग मला एका मागोमाग एक शब्द आठवायला लागले. ग्रीक `प्रोती’ आणि आपली `प्रथमा’, ग्रीक `त्रीती’ आणि आपली `तृतिया’. त्रिया, त्रि... आणि अचानक काहीतरी चमकलं!
“कातेरीना, तुम्ही त्रिकोनाला काय म्हणता?” आतल्या आत माझी उत्सुकता दुथडी भरून वाहात होती.
“त्रीग़ोनो. त्री, म्हणजे तीन आणि ग़ोनीया म्हणजे कोन. त्रीग़ोनो, त्रिकोन!” कातेरीना एकेक शब्द समजावत म्हणाली पण मी संपूर्ण ऐकण्याआधीच ओरडायला लागले, “आम्ही पण!! असंच काहीसं, आम्ही पण!!’
तेव्हापासून तो एक खेळच झाला. कधी कोणाच्या वाक्यावरून भाषांची नाती सापडतील, किंवा कधी मला अचानक ती शोधावीशी वाटतील याचा नेम नसतो. महत्वाचं बोलायचं असेल तर हल्ली निकोलास आधीच नम्र सूचना करतो, “अर्निका, कुठला शब्द कुठून आला ते शोधू नकोस, मला फार महत्वाचं बोलायचं आहे. ते सत्र आपण नंतर ठेवू आणि तेव्हा ‘मुख़्तारिस’ तू हो!” (मुख़्तारिसला आम्ही मुखत्यार म्हणतो ही तळटीप मी मनात लिहून ठेवते).
हे शब्द शिकताना जितकी मजा वाटते तितकी चिडचिडही होते! ग्रीक शुद्धलेखनाचं तंत्र आधी माहित असतं तर इंग्लिश स्पेलिंग घोकायला लागलं नसतं. Psychology आणि Pneumonia मधला P उच्चारायचा नाही ही आज्ञा काय राजेशाही फर्मानाप्रमाणे स्वीकारली होती. पण मूळ ग्रीक शब्द तर ‘प्सिख़ोलोग़ीया’ आणि ‘प्नेव्ह्मोनीया’ आहेत हे कळल्यावर इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत प्साय्कॉलॉजी म्हंटल्यामुळे गेलेल्या एका मार्काचं दुःख पुन्हा ताजं होतं!
अफ़साने आणि शिरीन मला फ़ारसी शिकवताना पुष्कळदा कचरतात. ‘अर्निकाजान, मोश्खेल आस’ (शब्द कठीण आहे) असं म्हणत त्याही इंग्लिशमधे बोलायला लागतात. ‘इंद्रधनुष्याला फ़ारसी शब्द सांगा’ असा एकदा तगादा लावल्यावर अफ़साने म्हणाली, “ठीक आहे, पण लगेच म्हणता आला नाही तर वाईट नको वाटून घेऊ, मोठ्ठा आहे शब्द.” शिरीनने मान डोलावली आणि एकेक अक्षर स्पष्ट उच्चारत ती म्हणाली, “रॅंगीन कॅमॉन.” मी शब्द जसाच्या तसा उच्चारल्याचं शिरीनला आश्चर्य आणि शब्द इतका ‘ओळखीचा’ असल्याचं मला!
फ़ारसी लिपी वाचता यायला लागल्यावर दिसेल तो शब्द वाचायचा प्रयत्न करायला लागले. त्या लिपीत अकार, एकार आणि ओ-कार न लिहिण्याची पद्धत रूढ असल्याने बरेच शब्द संदर्भाने वाचायला लागतात (थोडक्यात मूळ शब्द ‘कवळ’ आहे, ‘केवळ’ आहे, की ‘कोवळा’ हे आपण ‘समजून घ्यायचं!). एकेक अक्षर लावत मी पुस्तकातला एक शब्द वाचला. ‘नी-म-को-र’. म्हणजे गोलार्ध. आई शप्पथ!! चंद्रकोर, चत्कोर म्हणतो तसलंच आहे हे! काही न म्हणता मी जागच्या जागी उड्या मारायला लागले.
मला शांत करत शिरीनने हातातल्या शेंगदाण्यांचा पुडा समोर केला. ‘अर्निकाजान, बादाम ज़ॅमिनी?’ छे! आनंदाचे झटके थांबेचनात. शेंगदाण्याला काय छान शब्द आहे! जमिनीतले बदाम. (मग नाही म्हणवेना, मूठभर शेंगदाणे घेतलेच मी!) न सांगता अर्थ आणि व्युत्पत्ती समजल्याची मजा काही खास असते. बादाम ज़ॅमिनी वरून अंदाज बांधत मी सगळ्या दाण्यांची न् फळांची नावं विचारायला लागले. त्यावरून बादाम हेंदी (काजू), ज़ॅर्दआलू म्हणजे पिवळे प्लम (जरदाळू) असे चुलत-ओळखीचे शब्द सापडत गेले.
“हेंदी म्हणजे भारतीय. बादाम हेंदी म्हणजे भारतीय बदाम. काजू तुमच्याकडून आलेत ना, म्हणून! तसंच तुमच्याकडे एक खास आंबट वापरतात बघ. त्याला इंग्लिश शब्द माहित नाही. आम्ही ‘तॅम्र-ए-हेंदी’ म्हणतो. म्हणजे भारताचं आंबट.”
“अरे म्हणजे चिंच!” अफ़सानेकडे पहात मी म्हणाले. इंग्लिशमधला tamarind हा शब्द किती जवळचा वाटतो असं सहज डोक्यात आलं. कोषात बघितल्यावर समजलं की खरंच Tamarind हा तॅम्र-ए-हेंदीचाच रोमन अपभ्रंश आहे.
ग्रीक आणि फ़ारसीबद्दल एवढं कुतुहल का वाटावं? बऱ्याच भाषांचे असे एकमेकींच्या हातात हात असतात. पण संस्कृत ते इंग्लिश अशा भौगोलिक आणि भाषिक प्रवासातले महत्वाचे धागे दाखवणाऱ्या या दोन भाषा वाटतात. ‘माउस’ शब्द वेगळाच वाटतो पण संस्कृत ‘मूषक’, फ़ारसी ‘मूश’ आणि इंग्लिश ‘माउस’ जवळजवळ येतात. वास्तविक ‘स्टार’ चा कुठे संबंध बाकी भाषांशी? पण शब्दाच्या सुरुवातीचं जोडाक्षर म्हणता येत नसल्याने इराणी मंडळी स्टार ला इंग्लिशमधेही ‘सेटार’ म्हणतात. मग फ़ारसी ‘सेतारे’, ग्रीक ‘आस्तेरी’, आणि इंग्लिश ‘स्टार’ एकत्र आल्यासारखे वाटतात. ‘Canonical’ हा शब्द सुरुवातीला किती वेळा पाठ करायला लागतो! मग तो ग्रीकमधील ‘कानोनास’ म्हणजे नियम वरून आल्याचं कळतं. विचारांची गाडी ते दोन्ही शब्द लगेच फ़ारसीतल्या ‘क़ानून’ला जोडून टाकते.
मराठीत नव्वद आणि फ़ारसीत नॅव्हॅद, मराठीत चौदा आणि फ़ारसीत चेहारदाह...एकेका अंकाबरोबर भाषांची मुळं हलल्यासारखी वाटतात. फ़ारसीत सियाह् म्हणजे काळा आणि सियाह्-ई म्हणजे काळेपणा. ‘शाई’ हा आपण केलेला अपभ्रंश! तसंच संस्कृतात ‘अभ्र’ आणि फ़ारसीत ‘आब्र’, ‘अश्व’ ला ‘आस्ब्’ (आस्ब् वरून आस्बगानिस्तान, कदाचित त्याचेच पुढे अफ़ग़ानिस्तान), संस्कृतातील ‘गांधार’ म्हणजे अफ़ग़ान ‘कंदाहार’, आपली ‘न्याहारी’ तो त्यांचा ‘नॉहार’... कुठल्याशा विणकराने घट्ट केलेले असे अनेक उभे-आडवे धागे हाताशी येतात. आणि अर्थातच, ‘कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे’ या ओळीचा फिरून फिरून अनुभव येतो.
प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जाऊन कळलेली गंमत घरच्यांना सांगावीशी वाटते. आजीला असं काही सांगितलं की तिची एक गोष्ट ठरलेली असते.
“फार फार पूर्वी भारतात दुष्काळ पडला. लोकांनी भराभर समुद्रात होड्या टाकल्या आणि वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. कोणी युरोपात गेलं, कोणी आफ्रिकेत, कोणी अमेरिकेत...काही विचारू नकोस. मग आपल्या भारतीय भाषा बदलत गेल्या, पण मुळात त्या आपल्याचकडच्या!”
या होड्या नक्की कुठून कुठे गेल्या, कुठल्या मार्गाने गेल्या...खात्रीने कोणास ठाऊक? त्यांची लाकडं मुळात आमच्याच देशातून आली या ठाम विश्वासावर कित्येक देशांचा अभिमान कायम आहे. आम्हा मित्र-मैत्रिणींमधल्या कित्येक वादविवादांचं ते इंधन आहे, संभाषणाचं तिखट-मीठ आहे, व्युत्पत्ती समजल्यावर होणारा भोळा आनंद आहे...
म्हणूनच या गप्पां ऐकून आई म्हणते ते मनोमन पटतं,
“म्हणजे कसं आहे ना अर्निका, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...शोधणं सोपं नाही हेच खरं!”
मराठी भाषा दिवसानिमित्त लिहिलेला मालिकेचा शेवटचा भाग, 'लाभले आम्हास भाग्य' इथे वाचू शकाल-
http://arnika-saakaar.blogspot.com/2012/02/blog-post_27.html
सुरेख लेख आहे. मस्त.
सुरेख लेख आहे. मस्त.
माझा एक तरुण मित्र या विविध
माझा एक तरुण मित्र या विविध भाषांतील शब्दसाद्धर्म्याने असाच भारावून जावून गेलीं कांहीं वर्षं त्यावर खूप अभ्यास करतोय. [ तो स्वतः इंजीनीयर असून त्याचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे व तो 'शब्दसंपदा' या विषयावर कॉर्पोरेट क्षेत्रात लेक्चर्सही देतो ]. त्याच्या म्हणण्यानुसार जगातील अनेक विद्यापीठात [ त्यात पुण्याच्या संशोधन केंद्रांचाही समावेश आहेच] कित्येक दशकं यावर प्रचंड संशोधन सुरूं आहे व त्याचं पद्धतशीर ' डॉक्युमेंटेशन' सुद्धां झालं/ होत आहे. जर्मनी अर्थात यात अग्रेसर आहे. शब्दांची व्युत्पत्ति [ योगायोगाने दिसणारे शब्दांतील साद्धर्म्य नव्हे] ठरवण्याचे निकषही शास्त्रोक्तपणे नक्की करण्यात आले आहेत. त्या निकषांनुसारही अगणित लॅटीन, ग्रीक शब्दांची व्युत्पत्ति संस्कृत शब्दांतच आहे हें स्पष्ट आहे. कांहीं पाश्चिमात्य भाषातज्ञानीं तर आपलं आयुष्यच नेमक्या या अभ्यासालाच वाहिलेलं होतं/आहे.
[या विषयाचा व त्यावर होत असलेल्या संशोधनाचा प्रचंड आवाका - ज्याची मलाही कल्पना नव्हती - लक्षात यावा म्हणून या विषयात अनभिज्ञ असूनही माझी ही टिपणी ]
त्या निकषांनुसारही अगणित
त्या निकषांनुसारही अगणित लॅटीन, ग्रीक शब्दांची व्युत्पत्ति संस्कृत शब्दांतच आहे हें स्पष्ट आहे.>> नाही. संस्कृत इतर भाषांची जननी आहे असा निष्कर्ष कधीच निघालेला नाही.
या सर्व भाषासाम्यांचा अभ्यास करताना भाषाशास्त्रज्ञ आता असं मानतात की या एकाच 'इंडो-युरोपीअन' नामक कुळातल्या भाषा आहेत. या सर्वांची कुठेतरी एक 'प्रोटो-इंडो-युरोपीअन' नामक भाषा ही जननी असावी. आणि म्हणून यात इतकं साम्य आहे.
आपण आज ज्याला संस्कृत म्हणतो ते वेदोत्तरकालीन, बहुतांशी पौराणिक संस्कृत आहे. वेदकालीन संस्कृत (ज्याला आर्ष म्हणतात) ते थोडं वेगळं असतं. जशी ज्ञानेश्वरीची भाषा, लीळाचरित्राची भाषा आणि आज आपण लिहितो-वाचतो-बोलतो ती भाषा तीन्हींना मराठीच म्हणतात पण त्यामधे काही शतकांच्या अंतराने भरपूर फरक पडला आहे, तसंच काहीसं... त्यामुळे एरवीचं संस्कृत येणार्या व्यक्तीलाही वेदांची भाषा आवर्जून वेगळी शिकावी लागते.
वेदांची संस्कृत ही प्राचीन इराणी ग्रंथ अवेस्ताच्या भाषेशी खूप मिळतीजुळती आहे, पण समान नाहीये. त्या भाषेतील वर्ण-व्याकरणांचे नियम वेगळे आहेत. (कारण त्या इंडो-युरोपीअन भाषाभगिनी आहेत)
<< संस्कृत इतर भाषांची जननी
<< संस्कृत इतर भाषांची जननी आहे असा निष्कर्ष कधीच निघालेला नाही.>>व << एक 'प्रोटो-इंडो-युरोपीअन' नामक भाषा ही जननी असावी >> वरदा, अगदीं बरोबर.
[माझं <<....लॅटीन, ग्रीक शब्दांची व्युत्पत्ति संस्कृत शब्दांतच आहे हें स्पष्ट आहे.>> हें विधान अनवधानाने लिहीलं गेलं होतं. क्षमस्व.]
भाऊ नमसकर, >> या सर्वांची
भाऊ नमसकर,
>> या सर्वांची कुठेतरी एक 'प्रोटो-इंडो-युरोपीअन' नामक भाषा ही जननी असावी. आणि म्हणून यात इतकं
>> साम्य आहे.
पण या प्रोटो-इंडो-युरोपीय भाषेचा कुठलाही पुरावा अस्तित्वात नाही. एकही चिटोरा वा शिलालेख वा ताम्रपट मिळालेला नाही. ही भाषा कोण बोलत होतं तेही माहीत नाही. त्यापेक्षा सरळ संस्कृतला जननी म्हणायचं होतं की! काय बिघडलं असतं! तशीही संस्कृत पूर्णपणे सुरचित (well constructed) आहे. तर तिच्यापासून उत्पन्न झालेल्या प्राकृत भाषा थोड्या ढिसाळ (कमी अचूक) आहेत.
आ.न.,
-गा.पै.
<< त्यापेक्षा सरळ संस्कृतला
<< त्यापेक्षा सरळ संस्कृतला जननी म्हणायचं होतं की! काय बिघडलं असतं!>> गा.पै.जी, मीं स्वतः याचा अभ्यासक नाही पण वर उल्लेखिलेल्या माझ्या मित्राबरोबरच्या चर्चेतून मला जाणवतं तें असं- जें संस्कृत या सर्वाचं उगमस्थान असावं असं आपल्याला वाटतं तें वेद व उपनिषदांतलं संस्कृत आहे व तें नि:संशय << सुरचित (well constructed) >> आहे. पण म्हणूनच तें संस्कृत त्या भाषेची सुरवात नसून त्या भाषेच्या प्रगल्भतेचा एक खूप पुढचा टप्पा आहे, हेंही जाणवतं. जोपर्यंत संकृतची या प्रगल्भतेपर्यंतची वाटचाल अदृश्य आहे, तोपर्यंत तरी संस्कृतचे त्याआधीचे टप्पे ज्या ज्या भाषेत अगणित समानार्थी शब्द दिसतात त्या सर्व भाषांचा उगम ज्या मूळ भाषेतून झाला त्यांतच असावेत, हें तर्कशुद्ध वाटतं.
वरदा यांचा याबाबतींत अभ्यास असावा असं वाटतं. त्यांचं मत अधिक ग्राह्य समजतां येईल.
आहा! मस्त आहे हा लेख! मी पण
आहा! मस्त आहे हा लेख! मी पण माझ्या श्रीलंकन मित्र-मैत्रिणींसोबत 'तुझे शब्द - माझे शब्द' खेळ खेळत असतो. दहा = दहाय, संत्र = नारंग असे बरेच ओळखीचे शब्द सापडले. कालच कलन नावाच्या (त्यातल्या 'न' चा पूर्ण उच्चार करायचा) मित्राशी राजकीय गप्पा मारत होतो. मी त्याला विचारलं की सध्या तिथे तमिळ आणि सिंहली लोकांमध्ये कितपत सख्य/दुरावा आहे? त्याने एकंदरीत भौगोलिक-दृष्ट्या आता कशी विभागणी झाली आहे, राजकीय लोक विविध प्रकारचे अनुनय/विरोध इत्यादी वापरून कशी आपलीच पोळी भाजून घेतात, लोकांची माथी कशी भडकवली जातात इथपासून सध्या लोकांची काय काय मत-मतांतरे आहेत हे सांगितलं. बोलता बोलता म्हणाला की "आय डोण्ट नो हाउ टु से इट इन इंग्लिश, बट आय अॅम अ ....." , तो शब्दांची जुळवा-जुळव करायला लागला. "लिबरल?" - मी. "नो नो.. नॉट एक्झॅक्टली, आय अॅम अ ... मध्यस्त!"
'मध्यस्त' - वा! या संस्कृत मुळामुळे (म्हणजे ती भाषा मूळ असल्यामुळे) आम्ही क्षणभर सायबाच्या भाषेशी सख्य विसरून 'आपल्यातला' कुणीतरी भेटल्यागत बोलू लागतो. एकंदरीत सिंहली भाषा तमिळ पेक्षा संस्कृतशी जास्त जवळ आहे असं वाटलं. त्याचं मूळ त्या शेकडो वर्षापूर्वी कलिंगावरून तिथे गेलेल्या लोकांमध्ये असावं. असंच भाषिक सख्य इंडोनेशिया, मलेशिया वगैरे मधल्या लोकांशी जुळवायला मजा येते. सगळे अनुभव लिहित बसलो तर प्रतिसाद फारच मोठा होईल.
लेख भन्नाट!
आहा! मस्त आहे हा लेख >>> +११
आहा! मस्त आहे हा लेख >>> +११ इतके दिवसात कसा वाचला नाही कुणास ठाऊक.
Pages