नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...

Submitted by Arnika on 28 February, 2012 - 12:13

“अर्निका, यावर्षी नाचात मानाची जागा तुझी.” ग्रीक नाचाच्या रंगीत तालमीत आमचा रिंगमास्टर पानोस म्हणाला. “मंचावर तू मधोमध असणार आहेस. स्तो केंद्रो!” मी स्तब्ध होऊन बघत राहिले. पानोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तू मधोमध असावंस.”
चावीचं खेळणं चालावं तशी चालत चालत मी मधोमध उभी राहिले.

एकदा नाच झाल्यावर पानोसला विचारलं, “तू मधोमध ला काय ग्रीक शब्द वापरलास?”
“केंद्रो. नवीन आहे नाही का हा शब्द तुला?”
“नवीन कसला? आमचाच घेतलात!” मी हसत म्हणाले. गेला तासभर पानोसला जे जमलं नव्हतं ते मी दोन सेकंदात करून दाखवलं होतं. खोलीतली सव्वीस टाळकी माझ्या चार शब्दांनी एकदम शांत झाली, माझ्या अवतीभोवती गोळा झाली. मी खऱ्या अर्थाने ‘केंद्रो’मधे अडकले.
“काहीही काय? केंद्रो सरळ सरळ ग्रीक शब्द आहे. त्यावरूनच सेंटर शब्द आलाय.” स्ताव्ह्रोस म्हणाला.
“आई शप्पथ! तरीच सेंटर लिहिताना tre ने शेवट होतो. पण संस्कृतमधेही केंद्रच म्हणतात.” मी आश्चर्याने म्हणाले.
“वादविवाद स्पर्धा तालमीनंतर घेऊया का? अजून ४ नाच राहिलेत. घेतला असेल एखादा शब्द संस्कृतने ग्रीककडून! पण म्हणून अर्निकाला कशाला छळायचं ना?” पानोस मुद्दाम डोळे मिचकावत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी या चर्चेत इतर देश सामिल झाले. कोणी हरायचा किंवा जिंकायचा प्रश्नच नव्हता. पाच मिनिटांच्या लटक्या ‘तू तू मैं मैं’ नंतर ती लढाई न रहाता देवाणघेवाण व्हायला लागली. कारण भारतीय, ग्रीक, इराणी आणि इजिप्शियन या प्राचीन वसाहतींच्या डोलाऱ्यावर उभ्या असलेल्या चारही देशांचा अबाधित विश्वास आहे, की संस्कृती आणि भाषा आपणच सबंध जगाला भेट दिल्या आहेत. आपापले डबे उघडत आमची चविष्ट संभाषणं रंगात आली होती. आदल्या दिवशी मी घरून आणलेल्या साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारत सगळे म्हणाले, “आहा! काय आहे हा प्रकार? काल सण होता?”
“नाही. सण असा नाही. संकष्टी चतुर्थी म्हणून असते.”
“चतुर्थी! हाहाहा... काय शब्द असतात तुमचे! म्हणजे काय? आमच्या ‘तेतार्ती’ सारखा वाटतो ना शब्द... ‘चौथा दिवस’ वगैरे नाही ना अर्थ त्याचा?”
खिचडी विसरून मी तोनियाकडे बघत राहिले! आई शप्पथ! हाच तर अर्थ होता चतुर्थीचा. मग मला एका मागोमाग एक शब्द आठवायला लागले. ग्रीक `प्रोती’ आणि आपली `प्रथमा’, ग्रीक `त्रीती’ आणि आपली `तृतिया’. त्रिया, त्रि... आणि अचानक काहीतरी चमकलं!
“कातेरीना, तुम्ही त्रिकोनाला काय म्हणता?” आतल्या आत माझी उत्सुकता दुथडी भरून वाहात होती.
“त्रीग़ोनो. त्री, म्हणजे तीन आणि ग़ोनीया म्हणजे कोन. त्रीग़ोनो, त्रिकोन!” कातेरीना एकेक शब्द समजावत म्हणाली पण मी संपूर्ण ऐकण्याआधीच ओरडायला लागले, “आम्ही पण!! असंच काहीसं, आम्ही पण!!’

तेव्हापासून तो एक खेळच झाला. कधी कोणाच्या वाक्यावरून भाषांची नाती सापडतील, किंवा कधी मला अचानक ती शोधावीशी वाटतील याचा नेम नसतो. महत्वाचं बोलायचं असेल तर हल्ली निकोलास आधीच नम्र सूचना करतो, “अर्निका, कुठला शब्द कुठून आला ते शोधू नकोस, मला फार महत्वाचं बोलायचं आहे. ते सत्र आपण नंतर ठेवू आणि तेव्हा ‘मुख़्तारिस’ तू हो!” (मुख़्तारिसला आम्ही मुखत्यार म्हणतो ही तळटीप मी मनात लिहून ठेवते).

हे शब्द शिकताना जितकी मजा वाटते तितकी चिडचिडही होते! ग्रीक शुद्धलेखनाचं तंत्र आधी माहित असतं तर इंग्लिश स्पेलिंग घोकायला लागलं नसतं. Psychology आणि Pneumonia मधला P उच्चारायचा नाही ही आज्ञा काय राजेशाही फर्मानाप्रमाणे स्वीकारली होती. पण मूळ ग्रीक शब्द तर ‘प्सिख़ोलोग़ीया’ आणि ‘प्नेव्ह्मोनीया’ आहेत हे कळल्यावर इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत प्साय्कॉलॉजी म्हंटल्यामुळे गेलेल्या एका मार्काचं दुःख पुन्हा ताजं होतं!

अफ़साने आणि शिरीन मला फ़ारसी शिकवताना पुष्कळदा कचरतात. ‘अर्निकाजान, मोश्खेल आस’ (शब्द कठीण आहे) असं म्हणत त्याही इंग्लिशमधे बोलायला लागतात. ‘इंद्रधनुष्याला फ़ारसी शब्द सांगा’ असा एकदा तगादा लावल्यावर अफ़साने म्हणाली, “ठीक आहे, पण लगेच म्हणता आला नाही तर वाईट नको वाटून घेऊ, मोठ्ठा आहे शब्द.” शिरीनने मान डोलावली आणि एकेक अक्षर स्पष्ट उच्चारत ती म्हणाली, “रॅंगीन कॅमॉन.” मी शब्द जसाच्या तसा उच्चारल्याचं शिरीनला आश्चर्य आणि शब्द इतका ‘ओळखीचा’ असल्याचं मला!

फ़ारसी लिपी वाचता यायला लागल्यावर दिसेल तो शब्द वाचायचा प्रयत्न करायला लागले. त्या लिपीत अकार, एकार आणि ओ-कार न लिहिण्याची पद्धत रूढ असल्याने बरेच शब्द संदर्भाने वाचायला लागतात (थोडक्यात मूळ शब्द ‘कवळ’ आहे, ‘केवळ’ आहे, की ‘कोवळा’ हे आपण ‘समजून घ्यायचं!). एकेक अक्षर लावत मी पुस्तकातला एक शब्द वाचला. ‘नी-म-को-र’. म्हणजे गोलार्ध. आई शप्पथ!! चंद्रकोर, चत्‍कोर म्हणतो तसलंच आहे हे! काही न म्हणता मी जागच्या जागी उड्या मारायला लागले.

मला शांत करत शिरीनने हातातल्या शेंगदाण्यांचा पुडा समोर केला. ‘अर्निकाजान, बादाम ज़ॅमिनी?’ छे! आनंदाचे झटके थांबेचनात. शेंगदाण्याला काय छान शब्द आहे! जमिनीतले बदाम. (मग नाही म्हणवेना, मूठभर शेंगदाणे घेतलेच मी!) न सांगता अर्थ आणि व्युत्पत्ती समजल्याची मजा काही खास असते. बादाम ज़ॅमिनी वरून अंदाज बांधत मी सगळ्या दाण्यांची न् फळांची नावं विचारायला लागले. त्यावरून बादाम हेंदी (काजू), ज़ॅर्दआलू म्हणजे पिवळे प्लम (जरदाळू) असे चुलत-ओळखीचे शब्द सापडत गेले.

“हेंदी म्हणजे भारतीय. बादाम हेंदी म्हणजे भारतीय बदाम. काजू तुमच्याकडून आलेत ना, म्हणून! तसंच तुमच्याकडे एक खास आंबट वापरतात बघ. त्याला इंग्लिश शब्द माहित नाही. आम्ही ‘तॅम्र-ए-हेंदी’ म्हणतो. म्हणजे भारताचं आंबट.”
“अरे म्हणजे चिंच!” अफ़सानेकडे पहात मी म्हणाले. इंग्लिशमधला tamarind हा शब्द किती जवळचा वाटतो असं सहज डोक्यात आलं. कोषात बघितल्यावर समजलं की खरंच Tamarind हा तॅम्र-ए-हेंदीचाच रोमन अपभ्रंश आहे.

ग्रीक आणि फ़ारसीबद्दल एवढं कुतुहल का वाटावं? बऱ्याच भाषांचे असे एकमेकींच्या हातात हात असतात. पण संस्कृत ते इंग्लिश अशा भौगोलिक आणि भाषिक प्रवासातले महत्वाचे धागे दाखवणाऱ्या या दोन भाषा वाटतात. ‘माउस’ शब्द वेगळाच वाटतो पण संस्कृत ‘मूषक’, फ़ारसी ‘मूश’ आणि इंग्लिश ‘माउस’ जवळजवळ येतात. वास्तविक ‘स्टार’ चा कुठे संबंध बाकी भाषांशी? पण शब्दाच्या सुरुवातीचं जोडाक्षर म्हणता येत नसल्याने इराणी मंडळी स्टार ला इंग्लिशमधेही ‘सेटार’ म्हणतात. मग फ़ारसी ‘सेतारे’, ग्रीक ‘आस्तेरी’, आणि इंग्लिश ‘स्टार’ एकत्र आल्यासारखे वाटतात. ‘Canonical’ हा शब्द सुरुवातीला किती वेळा पाठ करायला लागतो! मग तो ग्रीकमधील ‘कानोनास’ म्हणजे नियम वरून आल्याचं कळतं. विचारांची गाडी ते दोन्ही शब्द लगेच फ़ारसीतल्या ‘क़ानून’ला जोडून टाकते.

मराठीत नव्वद आणि फ़ारसीत नॅव्हॅद, मराठीत चौदा आणि फ़ारसीत चेहारदाह...एकेका अंकाबरोबर भाषांची मुळं हलल्यासारखी वाटतात. फ़ारसीत सियाह्‍ म्हणजे काळा आणि सियाह्‍-ई म्हणजे काळेपणा. ‘शाई’ हा आपण केलेला अपभ्रंश! तसंच संस्कृतात ‘अभ्र’ आणि फ़ारसीत ‘आब्र’, ‘अश्व’ ला ‘आस्ब्’ (आस्ब् वरून आस्बगानिस्तान, कदाचित त्याचेच पुढे अफ़ग़ानिस्तान), संस्कृतातील ‘गांधार’ म्हणजे अफ़ग़ान ‘कंदाहार’, आपली ‘न्याहारी’ तो त्यांचा ‘नॉहार’... कुठल्याशा विणकराने घट्ट केलेले असे अनेक उभे-आडवे धागे हाताशी येतात. आणि अर्थातच, ‘कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे’ या ओळीचा फिरून फिरून अनुभव येतो.

प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जाऊन कळलेली गंमत घरच्यांना सांगावीशी वाटते. आजीला असं काही सांगितलं की तिची एक गोष्ट ठरलेली असते.
“फार फार पूर्वी भारतात दुष्काळ पडला. लोकांनी भराभर समुद्रात होड्या टाकल्या आणि वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. कोणी युरोपात गेलं, कोणी आफ्रिकेत, कोणी अमेरिकेत...काही विचारू नकोस. मग आपल्या भारतीय भाषा बदलत गेल्या, पण मुळात त्या आपल्याचकडच्या!”

या होड्या नक्की कुठून कुठे गेल्या, कुठल्या मार्गाने गेल्या...खात्रीने कोणास ठाऊक? त्यांची लाकडं मुळात आमच्याच देशातून आली या ठाम विश्वासावर कित्येक देशांचा अभिमान कायम आहे. आम्हा मित्र-मैत्रिणींमधल्या कित्येक वादविवादांचं ते इंधन आहे, संभाषणाचं तिखट-मीठ आहे, व्युत्पत्ती समजल्यावर होणारा भोळा आनंद आहे...

म्हणूनच या गप्पां ऐकून आई म्हणते ते मनोमन पटतं,
“म्हणजे कसं आहे ना अर्निका, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...शोधणं सोपं नाही हेच खरं!”

मराठी भाषा दिवसानिमित्त लिहिलेला मालिकेचा शेवटचा भाग, 'लाभले आम्हास भाग्य' इथे वाचू शकाल-
http://arnika-saakaar.blogspot.com/2012/02/blog-post_27.html

गुलमोहर: 

भरभरून आभार!! Happy
खूप जणांनी 'अर्निका'चा अर्थ विचारला आहे. ते एक डोंगराळ फूल आहे...एका औषधी वनस्पतीला येणारं. या शब्दाची व्युत्पत्तीही मजेशीर आहे... आपला विषयही तोच म्हणून सांगते-

त्या फुलाच्या पाकळीवर मऊ मऊ केस असतात, कोकराच्या अंगावर असतात तसे. कोकराला ग्रीक मधे 'अर्नाकी' म्हणतात, त्यामुळे फुलाचं नाव अर्निका Happy

चौथा लेखही मायबोलीवर लावते लवकरच...
पुन्हा एकदा धन्यवाद!

मस्त लेख.
मृदुला ने लिहील्याप्रमाणे, लेख वाचून ग्रीक आणि फारसी शिकावेसे वाटू लागले आहे.

वरदा, तु दिलेली लिंक छान आहे.

अर्निका....

सु_रे_ख..... कित्ती मज्जा आली वाचताना!!! माझ्या आवडीचा विषय. मला खुप आवडत भाषांमधली साम्य स्थळे शोधायला.

जर्मन भाषेतही अनेक शब्द आपल्या सारखे उच्चारतात.
अननस = अननस
दु = तु = यु (इंग्रजी)
फ्राऊ = सौ

आपणही अनेक फारसी-अरबी शब्द जसे च्या तसे त्याच अर्थाने वापरतो
पगार, खानसामा, चपला, दुकान, मकान, तारीख, दु:ख, दवा, दाम, पोषाख,
अत्ता येवढेच आठवले.

अर्निका,

लेख आवडला, हेच खरे तर सांगायचे आहे.

मात्र, तुमच्या इतर संस्कृतींशी समरस होण्याच्या अपार सामर्थ्याने या लेखाला सोनेरी झळाळी लाभली आहे.
मराठी माणसे तैलबुद्धी असतात हे खरेच. पण तुमच्या गुणग्राहकतेने आणि रसिकतेने लेख खूपच आस्वाद्य झालेला आहे.

आपण मायबोलीत बोलतो ती भाग्याची गोष्ट आहे, तशीच इतर लोक त्यांच्या मायबोलीत बोलतांना त्यांना ती भाग्याची गोष्ट वाटत असणार, ही समजूत घडवणारी आपली भाषा त्यामुळेच आणखीही प्रगल्भ व सरस भासू लागते.

तुम्ही लिहीत राहा, आम्ही वाचत राहू. अभिव्यक्ती-अनुभूतीचे हे सत्र सदा बहरत राहो.

जर्मन व्याकरणही बरेचसे मराठी व्याकरणासारखेच चालते. तिथेही क्रियापद बर्‍याचदा वाक्याच्या शेवटी येते; इंग्रजीमध्ये ते दुसर्‍या किंवा तिसर्‍या स्थानावर असते. जर्मनीमध्ये असताना सुरुवातीला माझा जाम गोंधळ व्हायचा; कारण मी इंग्रजी वाक्य बनवून त्याचं जर्मन मध्ये भाषांतर करायचो. मग हा द्राविडी प्राणायाम सोडून सरळ मराठीतून भाषांतर करणे सोपे व्हायला लागले.

रच्याक, जर्मन भाषेत वीसपासून पुढचे आकडेही मराठीसारखेच मोजतात - म्हणजे Ein und Zwanzig [एक-वीस], Zwei und Zwanzig [बा-वीस] असे. Happy

मी इतके दिवस का नव्हतं वाचलं हे.
इन्डो-युरोपियन स्टडीज.. माझा आवडता विषय Happy

मी क्लोदिंग हिस्टरी च्या कोर्सला पेपर लिहिला होता प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीकोरोमन वेशभूषेतली साम्यस्थळे असा. Happy

अजून एक गंमत
प्राचीन रोमन वस्त्रप्रावरणांच्या अभ्यासात ही गंमत दिसली. स्त्रियांचे डोक्यावरून ओढणीसारखे घ्यायचे एक वस्त्र आहे ज्याला 'पल्ला' असे म्हणतात. पहिल्यांदा समोर आला शब्द तेव्हा मी स्पॅनिश प्रमाणे डबल एल म्हणून य हा उच्चार केला. तेव्हा प्रॉफ ने सांगितले तो उच्चार ल्ल असाच आहे. आणि मी हसूच लागले. Happy

सगळ्या प्रतिक्रिया वाचून त्यात नमूद केलेली प्रत्येक भाषा शिकावीशी वाटते आहे आता!!
कौतुकाच्या पावतीबद्दल भरपूर आभार आणि Happy

नीधप, काय सांगतेस? माझाही अति आवडता विषय... भेटलंच पाहिजे गं आता Wink

कसली सही आहे तुझी लेखनशैली........ मजा येतेय गं....... !!
इतके दिवस ही सिरिज माझी वाचायची राहूनच गेली होती.

इथे अरबी ऐकतांना पण बरेचदा हा अनुभव येतो. अरबीमधले पण बरेच शब्द आपल्या मराठी सारखे आहेत.

टमाटा = तमाता
मैदान = मैदान
माफी = माफ करा..... माफी अरबी........ म्हणजे मला अरबी येत नाही Wink
खल्लास = संपलं....... हे बरेचदा....... भाव करताना वापरतात Wink
बटाटा = बताता
मुश्किल = माफी मुश्किल = नो प्रॉब्लेम Happy

मस्त लिहिलय. मजा आली वाचताना.
मागे ऑस्ट्रियामधे अननसाला अननस हाच शब्द बघुन खूप मजा वाटलेली. Happy

महेश, साखर या शब्दाचा सांगाडा कित्येक भाषांमधे तोच आहे.

शर्करा, साखर, शकर, झाखारी, सुख्र वगैरे वगैरे... (संस्कृत, मराठी, फारसी, ग्रीक, फ्रेंच या क्रमाने) आणि हो रशियनमधेही साखरच! saccharide म्हणतो ना आपण इंग्लिशमधे, तो साखरेच्या latin शब्दावरून आलाय.

अननस तसा अजून एक शब्द. फ्रेंच आणि ग्रीक मधे अनाना म्हणतात. मूळ शब्द पोर्तुगीज आहे.

अर्निका.. खूप्पच सुंदर लिहितेस.. तुझी लेखनशैलीचं इतकं कौतुक वाटतं ना..
ही मालिकापण मस्त इंटरेस्टिंग आहे.. Happy

भेटलंच पाहिजे गं आता <<<
अगदीच फक्त माझा तुझ्याइतका अभ्यास नाही गं Happy
आता तुझी बाकीची मालिका वाचून काढते

शर्करा, साखर, शकर, झाखारी, सुख्र वगैरे वगैरे... (संस्कृत, मराठी, फारसी, ग्रीक, फ्रेंच या क्रमाने) आणि हो रशियनमधेही साखरच! saccharide म्हणतो ना आपण इंग्लिशमधे, तो साखरेच्या latin शब्दावरून आलाय

कारण उसापासुन बनवलेली साखर भारतातच फार पुर्वीपासुन तयार व्हायची. (चिनुक्सचे अन्नः वै प्राणः वाचा)

आता बर्याच शब्दाचा विरुद्धार्थी करताना आपण पुढे अ लावतो
निती x अनिती
न्याय अन्याय
ग्रीक पण तसेच करतात

मागे मी काही असे शब्द मागे दिलेले
(स्त्र हा मुळ स्त्रोत असलेले शब्द)
तारा - स्टार
झोरोस्टर - झरतार -झरतृष्ट

(क्स -क्श - क्साय (क्रिलिक) साधर्म्य)
(भारतात होता) क्षत्रियानाम क्षत्रियः - शताहिना शताय: -शहा इन शाह - शहेनशाह (भारतात आला)
पहेलवान पारसीत पण आहे

(ह चा स आणि स चा ह)
हप्नस - स्वप्नः
हप्त - सप्त
हरपटन - सरपटणे - सरपन्ट (इन्ग्लिश)
हर्मन (मेसेन्जर ऑफ गॉड) = सर्मन (इन्ग्लिश) = शर्मन (शर्मा ) संस्क्रुत (कधी कधी वर्मन पण)
विष्णुशर्मा = मेसेन्जर ऑफ विष्णु
हत्र = हेट्रो (इन्ग्लिश) वेगळे, आपले नाही = सत्र (आठवा ग्रीक सत्रपी राज्ये ) = शत्रु

मॅन - मानव
त्वम = दाउ
युयम = यु
वयम = वुइ
जुन्या संस्क्रुत अयम -- अहम
अयम -- आय

मस्त! लेख फार आवडला. नवीन भाषा शिकतेवेळी एखादा परिचित शब्द किंवा त्याचं थोडं बदललेलं रूप सापडलं की होणारा आनंद एखादा जुना मित्र फार दिवसांनी, अपरिचित जागी भेटावा; त्याच जातकुळीतला.

खूप मजेदार लेख!..
परवा एक इराणी शॉर्ट फिल्म पहात होतो त्यात एक मुलगी वडिलांना किती वाजता परत येणार हे सांगताना म्हणते: ' बाबा, नौ बाज....' ... ह्यातले 'नौ' आणि 'बाबा' हे दोन्ही शब्द आपल्या ओळखीचे !
नात्यांबद्दल बर्‍यापैकी सगळ्या शब्दांची मूळं एकच आहेत असं वाटतं...जसं - भ्रातृ ----भ्राता --- ब्राऊ ---ब्रदर , मातॄ --माता ---मदर , पिता -- पितॄ --- अरेबिकः- फित्र ( इद-उल-फित्र मधला) --- फादर.....

मी असंही ऐकलं आहे की मराठी मधल्या 'आई' शब्दाचं मूळ वेगळं आहे! ते बाकी 'मातॄ' शी संबंधित नाही....जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. समजून घ्यायला मजा येईल !

अजून अवांतर वाचन करत असताना समजलं की 'अमीर खान' मधला 'खान' शब्द खरंतर चिनी लोकांकडून मंगोल- बल्गर ( बल्गेरियन) - स्लाव - किरगिझ-- उझबेक -- तुर्की -- इराणी आणि मग मुस्लीम असा प्रवास करत आला आहे! अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चंगिझ खानाच्या वेळेपासून आला आहे. त्याही आधी म्हणे तो 'ख-गन' म्हणजे ज्याची 'खानत' आहे असा ह्या समासावरून आला आहे.....खानत म्हणजे 'अमीराची -अमिरात' किंवा 'सुलतानाची - सल्तनत' टाईप शब्द आहे...त्याहीपेक्षा इंटरेस्टींग म्हणजे काही जुन्या कागदपत्रांमध्ये 'खान' ला 'खान्त' किंवा 'का-न्त' पण म्हटलं आहे! हा संस्कृतातल्या 'कान्त'/'कांत' शी संबंधित तर नाही? जसे- 'लक्ष्मीकांत' वगैरे...? खान ह्या पदवीचा टोळीच्या मुख्यापासून सम्राटापर्यंत सगळ्या मोठ्या पदांसाठी उपयोग केला गेला आहे. जाणकारांनी ईथेही प्लीज प्रकाश टाकावा!

Pages