नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...

Submitted by Arnika on 28 February, 2012 - 12:13

“अर्निका, यावर्षी नाचात मानाची जागा तुझी.” ग्रीक नाचाच्या रंगीत तालमीत आमचा रिंगमास्टर पानोस म्हणाला. “मंचावर तू मधोमध असणार आहेस. स्तो केंद्रो!” मी स्तब्ध होऊन बघत राहिले. पानोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तू मधोमध असावंस.”
चावीचं खेळणं चालावं तशी चालत चालत मी मधोमध उभी राहिले.

एकदा नाच झाल्यावर पानोसला विचारलं, “तू मधोमध ला काय ग्रीक शब्द वापरलास?”
“केंद्रो. नवीन आहे नाही का हा शब्द तुला?”
“नवीन कसला? आमचाच घेतलात!” मी हसत म्हणाले. गेला तासभर पानोसला जे जमलं नव्हतं ते मी दोन सेकंदात करून दाखवलं होतं. खोलीतली सव्वीस टाळकी माझ्या चार शब्दांनी एकदम शांत झाली, माझ्या अवतीभोवती गोळा झाली. मी खऱ्या अर्थाने ‘केंद्रो’मधे अडकले.
“काहीही काय? केंद्रो सरळ सरळ ग्रीक शब्द आहे. त्यावरूनच सेंटर शब्द आलाय.” स्ताव्ह्रोस म्हणाला.
“आई शप्पथ! तरीच सेंटर लिहिताना tre ने शेवट होतो. पण संस्कृतमधेही केंद्रच म्हणतात.” मी आश्चर्याने म्हणाले.
“वादविवाद स्पर्धा तालमीनंतर घेऊया का? अजून ४ नाच राहिलेत. घेतला असेल एखादा शब्द संस्कृतने ग्रीककडून! पण म्हणून अर्निकाला कशाला छळायचं ना?” पानोस मुद्दाम डोळे मिचकावत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी या चर्चेत इतर देश सामिल झाले. कोणी हरायचा किंवा जिंकायचा प्रश्नच नव्हता. पाच मिनिटांच्या लटक्या ‘तू तू मैं मैं’ नंतर ती लढाई न रहाता देवाणघेवाण व्हायला लागली. कारण भारतीय, ग्रीक, इराणी आणि इजिप्शियन या प्राचीन वसाहतींच्या डोलाऱ्यावर उभ्या असलेल्या चारही देशांचा अबाधित विश्वास आहे, की संस्कृती आणि भाषा आपणच सबंध जगाला भेट दिल्या आहेत. आपापले डबे उघडत आमची चविष्ट संभाषणं रंगात आली होती. आदल्या दिवशी मी घरून आणलेल्या साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारत सगळे म्हणाले, “आहा! काय आहे हा प्रकार? काल सण होता?”
“नाही. सण असा नाही. संकष्टी चतुर्थी म्हणून असते.”
“चतुर्थी! हाहाहा... काय शब्द असतात तुमचे! म्हणजे काय? आमच्या ‘तेतार्ती’ सारखा वाटतो ना शब्द... ‘चौथा दिवस’ वगैरे नाही ना अर्थ त्याचा?”
खिचडी विसरून मी तोनियाकडे बघत राहिले! आई शप्पथ! हाच तर अर्थ होता चतुर्थीचा. मग मला एका मागोमाग एक शब्द आठवायला लागले. ग्रीक `प्रोती’ आणि आपली `प्रथमा’, ग्रीक `त्रीती’ आणि आपली `तृतिया’. त्रिया, त्रि... आणि अचानक काहीतरी चमकलं!
“कातेरीना, तुम्ही त्रिकोनाला काय म्हणता?” आतल्या आत माझी उत्सुकता दुथडी भरून वाहात होती.
“त्रीग़ोनो. त्री, म्हणजे तीन आणि ग़ोनीया म्हणजे कोन. त्रीग़ोनो, त्रिकोन!” कातेरीना एकेक शब्द समजावत म्हणाली पण मी संपूर्ण ऐकण्याआधीच ओरडायला लागले, “आम्ही पण!! असंच काहीसं, आम्ही पण!!’

तेव्हापासून तो एक खेळच झाला. कधी कोणाच्या वाक्यावरून भाषांची नाती सापडतील, किंवा कधी मला अचानक ती शोधावीशी वाटतील याचा नेम नसतो. महत्वाचं बोलायचं असेल तर हल्ली निकोलास आधीच नम्र सूचना करतो, “अर्निका, कुठला शब्द कुठून आला ते शोधू नकोस, मला फार महत्वाचं बोलायचं आहे. ते सत्र आपण नंतर ठेवू आणि तेव्हा ‘मुख़्तारिस’ तू हो!” (मुख़्तारिसला आम्ही मुखत्यार म्हणतो ही तळटीप मी मनात लिहून ठेवते).

हे शब्द शिकताना जितकी मजा वाटते तितकी चिडचिडही होते! ग्रीक शुद्धलेखनाचं तंत्र आधी माहित असतं तर इंग्लिश स्पेलिंग घोकायला लागलं नसतं. Psychology आणि Pneumonia मधला P उच्चारायचा नाही ही आज्ञा काय राजेशाही फर्मानाप्रमाणे स्वीकारली होती. पण मूळ ग्रीक शब्द तर ‘प्सिख़ोलोग़ीया’ आणि ‘प्नेव्ह्मोनीया’ आहेत हे कळल्यावर इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत प्साय्कॉलॉजी म्हंटल्यामुळे गेलेल्या एका मार्काचं दुःख पुन्हा ताजं होतं!

अफ़साने आणि शिरीन मला फ़ारसी शिकवताना पुष्कळदा कचरतात. ‘अर्निकाजान, मोश्खेल आस’ (शब्द कठीण आहे) असं म्हणत त्याही इंग्लिशमधे बोलायला लागतात. ‘इंद्रधनुष्याला फ़ारसी शब्द सांगा’ असा एकदा तगादा लावल्यावर अफ़साने म्हणाली, “ठीक आहे, पण लगेच म्हणता आला नाही तर वाईट नको वाटून घेऊ, मोठ्ठा आहे शब्द.” शिरीनने मान डोलावली आणि एकेक अक्षर स्पष्ट उच्चारत ती म्हणाली, “रॅंगीन कॅमॉन.” मी शब्द जसाच्या तसा उच्चारल्याचं शिरीनला आश्चर्य आणि शब्द इतका ‘ओळखीचा’ असल्याचं मला!

फ़ारसी लिपी वाचता यायला लागल्यावर दिसेल तो शब्द वाचायचा प्रयत्न करायला लागले. त्या लिपीत अकार, एकार आणि ओ-कार न लिहिण्याची पद्धत रूढ असल्याने बरेच शब्द संदर्भाने वाचायला लागतात (थोडक्यात मूळ शब्द ‘कवळ’ आहे, ‘केवळ’ आहे, की ‘कोवळा’ हे आपण ‘समजून घ्यायचं!). एकेक अक्षर लावत मी पुस्तकातला एक शब्द वाचला. ‘नी-म-को-र’. म्हणजे गोलार्ध. आई शप्पथ!! चंद्रकोर, चत्‍कोर म्हणतो तसलंच आहे हे! काही न म्हणता मी जागच्या जागी उड्या मारायला लागले.

मला शांत करत शिरीनने हातातल्या शेंगदाण्यांचा पुडा समोर केला. ‘अर्निकाजान, बादाम ज़ॅमिनी?’ छे! आनंदाचे झटके थांबेचनात. शेंगदाण्याला काय छान शब्द आहे! जमिनीतले बदाम. (मग नाही म्हणवेना, मूठभर शेंगदाणे घेतलेच मी!) न सांगता अर्थ आणि व्युत्पत्ती समजल्याची मजा काही खास असते. बादाम ज़ॅमिनी वरून अंदाज बांधत मी सगळ्या दाण्यांची न् फळांची नावं विचारायला लागले. त्यावरून बादाम हेंदी (काजू), ज़ॅर्दआलू म्हणजे पिवळे प्लम (जरदाळू) असे चुलत-ओळखीचे शब्द सापडत गेले.

“हेंदी म्हणजे भारतीय. बादाम हेंदी म्हणजे भारतीय बदाम. काजू तुमच्याकडून आलेत ना, म्हणून! तसंच तुमच्याकडे एक खास आंबट वापरतात बघ. त्याला इंग्लिश शब्द माहित नाही. आम्ही ‘तॅम्र-ए-हेंदी’ म्हणतो. म्हणजे भारताचं आंबट.”
“अरे म्हणजे चिंच!” अफ़सानेकडे पहात मी म्हणाले. इंग्लिशमधला tamarind हा शब्द किती जवळचा वाटतो असं सहज डोक्यात आलं. कोषात बघितल्यावर समजलं की खरंच Tamarind हा तॅम्र-ए-हेंदीचाच रोमन अपभ्रंश आहे.

ग्रीक आणि फ़ारसीबद्दल एवढं कुतुहल का वाटावं? बऱ्याच भाषांचे असे एकमेकींच्या हातात हात असतात. पण संस्कृत ते इंग्लिश अशा भौगोलिक आणि भाषिक प्रवासातले महत्वाचे धागे दाखवणाऱ्या या दोन भाषा वाटतात. ‘माउस’ शब्द वेगळाच वाटतो पण संस्कृत ‘मूषक’, फ़ारसी ‘मूश’ आणि इंग्लिश ‘माउस’ जवळजवळ येतात. वास्तविक ‘स्टार’ चा कुठे संबंध बाकी भाषांशी? पण शब्दाच्या सुरुवातीचं जोडाक्षर म्हणता येत नसल्याने इराणी मंडळी स्टार ला इंग्लिशमधेही ‘सेटार’ म्हणतात. मग फ़ारसी ‘सेतारे’, ग्रीक ‘आस्तेरी’, आणि इंग्लिश ‘स्टार’ एकत्र आल्यासारखे वाटतात. ‘Canonical’ हा शब्द सुरुवातीला किती वेळा पाठ करायला लागतो! मग तो ग्रीकमधील ‘कानोनास’ म्हणजे नियम वरून आल्याचं कळतं. विचारांची गाडी ते दोन्ही शब्द लगेच फ़ारसीतल्या ‘क़ानून’ला जोडून टाकते.

मराठीत नव्वद आणि फ़ारसीत नॅव्हॅद, मराठीत चौदा आणि फ़ारसीत चेहारदाह...एकेका अंकाबरोबर भाषांची मुळं हलल्यासारखी वाटतात. फ़ारसीत सियाह्‍ म्हणजे काळा आणि सियाह्‍-ई म्हणजे काळेपणा. ‘शाई’ हा आपण केलेला अपभ्रंश! तसंच संस्कृतात ‘अभ्र’ आणि फ़ारसीत ‘आब्र’, ‘अश्व’ ला ‘आस्ब्’ (आस्ब् वरून आस्बगानिस्तान, कदाचित त्याचेच पुढे अफ़ग़ानिस्तान), संस्कृतातील ‘गांधार’ म्हणजे अफ़ग़ान ‘कंदाहार’, आपली ‘न्याहारी’ तो त्यांचा ‘नॉहार’... कुठल्याशा विणकराने घट्ट केलेले असे अनेक उभे-आडवे धागे हाताशी येतात. आणि अर्थातच, ‘कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे’ या ओळीचा फिरून फिरून अनुभव येतो.

प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जाऊन कळलेली गंमत घरच्यांना सांगावीशी वाटते. आजीला असं काही सांगितलं की तिची एक गोष्ट ठरलेली असते.
“फार फार पूर्वी भारतात दुष्काळ पडला. लोकांनी भराभर समुद्रात होड्या टाकल्या आणि वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. कोणी युरोपात गेलं, कोणी आफ्रिकेत, कोणी अमेरिकेत...काही विचारू नकोस. मग आपल्या भारतीय भाषा बदलत गेल्या, पण मुळात त्या आपल्याचकडच्या!”

या होड्या नक्की कुठून कुठे गेल्या, कुठल्या मार्गाने गेल्या...खात्रीने कोणास ठाऊक? त्यांची लाकडं मुळात आमच्याच देशातून आली या ठाम विश्वासावर कित्येक देशांचा अभिमान कायम आहे. आम्हा मित्र-मैत्रिणींमधल्या कित्येक वादविवादांचं ते इंधन आहे, संभाषणाचं तिखट-मीठ आहे, व्युत्पत्ती समजल्यावर होणारा भोळा आनंद आहे...

म्हणूनच या गप्पां ऐकून आई म्हणते ते मनोमन पटतं,
“म्हणजे कसं आहे ना अर्निका, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...शोधणं सोपं नाही हेच खरं!”

मराठी भाषा दिवसानिमित्त लिहिलेला मालिकेचा शेवटचा भाग, 'लाभले आम्हास भाग्य' इथे वाचू शकाल-
http://arnika-saakaar.blogspot.com/2012/02/blog-post_27.html

गुलमोहर: 

आर्निका,
जर्मन, ग्रीक, फारसी इतकेच काय पण रशियन भाषेतही काही समान शब्द आढळतील, कारण प्राचीन काळी काहितरी दुवे होतेच. पण पश्चिम आफ्रिकन भाषांचे
स्त्रोत अगदी वेगळे असावेत. शब्दातच नव्हे तर उच्चारात, वाक्यरचनेत मूलभूत
फरक आहेत.
उदा. मोंबोला चा अर्थ मी उद्या येणार नाही असा आहे तर बोलेवू चा अर्थ, कुठे आहेस तू !!

त्यामानाने, पूर्व आफ्रिकेचा भारताशी (व्हाया मस्कत) संबंध आल्याने, इथल्या स्वाहिली
भाषेवर हिंदी, अरेबिक, गुजराथी, पंजाबी.. या भांषांचा प्रभाव आहे. अनेक वस्तू ज्या
भारतीयांनी इथे आणल्या असाव्यात, त्या त्याच नावाने ओळखल्या जातात. (उदा. फणस, जांभूळ !!)

अर्निका, सुंदर झालीये ही संपूर्ण मालिका. शेवटचा भाग म्हणजे कळस आहे (तो मायबोलीवर पण नक्की टाक). 'मराठीत काय आहे ग्रेट' याचे उत्तर देताना मनात थोडा गोंधळ उडत होता. आता तो भाग वाचून नाही उडणार Happy

मस्तच लिहिलायस लेख
म्हणजे संस्कृतभाषेला सर्व भाषांची जननी म्हणतात ते अगदी पटत ह्या वरुन Happy

मस्त लिहिलंयस गं अर्निका. Happy
मुळात हे भाषासाधर्म्य लक्षात आल्यानेच भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास पाश्चात्य विद्वानांनी सुरू केला. (विल्यम जोन्स - बेंगॉल एशियाटिक सोसायटीची स्थापना १७८४). ज्याला इंडो-युरोपीअन म्हणतात अशा या सगळ्या आशिया आणि युरोप खंडात पसरलेल्या भाषा आहेत. याचं मूळ एक कुणीतरी प्रोटो-इंडो-युरोपीअन भाषा असावी असा सिद्धांत आहे.
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4f/IndoEuropeanTree.svg या दुव्यावर टिचकी मारून जर पाहिलं तर ढोबळमानाने या इंडो-युरोपीअन भाषाकुलाचा विस्तार लक्षात येईल. Happy

श्रीलंकेत 'दहा' या शब्दासाठी 'दहाय' ऐकलं होतं. ते आठवलं.
मलेशियात स्त्रियांच्या सार्वजनिक प्रसाधनगृहावर 'वनिता' लिहिलेलं होतं, आणि ते ही VANITA असं. (हे म्हणजे आपल्या देशात STREE / PURUSH लिहिण्यासारखं झालं. Lol )

हो, शिवाय, श्रीलंका, आग्नेय आशिया, इराण वगैरे प्रांतांशी आपला गेले हजार-दोन हजार वर्षं तरी थेट संपर्क आहे. त्यामुळे सांस्कृतिक आणि भाषिक देवाणघेवाण अगदीच अपरिहार्य आहे. Happy

एकदम मस्त, मजा आली!
असेच आश्चर्यचकित करणारे साधर्म्य ग्रीकांच्या 'अँब्रोशिआ' आपल्या 'अमृत' मधे आहे, त्या कल्पनेत आणि शब्दातही.
बायॉलॉजी शिकवताना त्यातले शब्द सोपे वाटावेत म्हणून मी बर्‍याचवेळा अशा वर्ड रुट्सचा वापर करतो.

लेख मस्त आहे. आवडला. भाषासाधर्म्य असणारच कारण ट्रेड रूट हाच होता. त्यामुळे भाषा, खाद्यपदार्थ इ चें साम्य अनुभवायला मजेशीर वाटत असणार.
जर्मन "एरियन" आपल्याकडे आर्य होते. भाषेवरून काहींनी आर्यन इन्वेजनही ही थेअरी मांडली आहे.

Happy

माझ्या माहितीप्रमाणे इंडोयुरोपीयन भाषेतला एकही शिलालेख, धातुपट, कागद सापडले नाहीये. सरळ संस्कृतला हिंदयुरोपीय भाषांची जननी म्हणायला काय अडचण आहे?

-आ.न.,
-गा.पै.

छान लेख अर्निका! वास्तुकलेचा इतिहास असा एक विषय होता मला अभ्यासक्रमात , तेव्हा असेच संस्क्रुती, भाषा, खाद्यपदार्थ ,वास्तुकलेचे तानेबाने याचा अभ्यास केला होता. एकेक धागा पकडुन माग काढायला मजा येते नै? Happy

वा अर्निका, आश्चर्य वाटल इतके भाषासाधर्म्य शब्द बघुन. मस्त झालय लेख, मज्जा आली वाचुन. हे असे अनुभव तु आमच्या सोबत शेअर करतेस त्या बद्दल धन्स Happy

Pages