“अर्निका, यावर्षी नाचात मानाची जागा तुझी.” ग्रीक नाचाच्या रंगीत तालमीत आमचा रिंगमास्टर पानोस म्हणाला. “मंचावर तू मधोमध असणार आहेस. स्तो केंद्रो!” मी स्तब्ध होऊन बघत राहिले. पानोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तू मधोमध असावंस.”
चावीचं खेळणं चालावं तशी चालत चालत मी मधोमध उभी राहिले.
एकदा नाच झाल्यावर पानोसला विचारलं, “तू मधोमध ला काय ग्रीक शब्द वापरलास?”
“केंद्रो. नवीन आहे नाही का हा शब्द तुला?”
“नवीन कसला? आमचाच घेतलात!” मी हसत म्हणाले. गेला तासभर पानोसला जे जमलं नव्हतं ते मी दोन सेकंदात करून दाखवलं होतं. खोलीतली सव्वीस टाळकी माझ्या चार शब्दांनी एकदम शांत झाली, माझ्या अवतीभोवती गोळा झाली. मी खऱ्या अर्थाने ‘केंद्रो’मधे अडकले.
“काहीही काय? केंद्रो सरळ सरळ ग्रीक शब्द आहे. त्यावरूनच सेंटर शब्द आलाय.” स्ताव्ह्रोस म्हणाला.
“आई शप्पथ! तरीच सेंटर लिहिताना tre ने शेवट होतो. पण संस्कृतमधेही केंद्रच म्हणतात.” मी आश्चर्याने म्हणाले.
“वादविवाद स्पर्धा तालमीनंतर घेऊया का? अजून ४ नाच राहिलेत. घेतला असेल एखादा शब्द संस्कृतने ग्रीककडून! पण म्हणून अर्निकाला कशाला छळायचं ना?” पानोस मुद्दाम डोळे मिचकावत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी या चर्चेत इतर देश सामिल झाले. कोणी हरायचा किंवा जिंकायचा प्रश्नच नव्हता. पाच मिनिटांच्या लटक्या ‘तू तू मैं मैं’ नंतर ती लढाई न रहाता देवाणघेवाण व्हायला लागली. कारण भारतीय, ग्रीक, इराणी आणि इजिप्शियन या प्राचीन वसाहतींच्या डोलाऱ्यावर उभ्या असलेल्या चारही देशांचा अबाधित विश्वास आहे, की संस्कृती आणि भाषा आपणच सबंध जगाला भेट दिल्या आहेत. आपापले डबे उघडत आमची चविष्ट संभाषणं रंगात आली होती. आदल्या दिवशी मी घरून आणलेल्या साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारत सगळे म्हणाले, “आहा! काय आहे हा प्रकार? काल सण होता?”
“नाही. सण असा नाही. संकष्टी चतुर्थी म्हणून असते.”
“चतुर्थी! हाहाहा... काय शब्द असतात तुमचे! म्हणजे काय? आमच्या ‘तेतार्ती’ सारखा वाटतो ना शब्द... ‘चौथा दिवस’ वगैरे नाही ना अर्थ त्याचा?”
खिचडी विसरून मी तोनियाकडे बघत राहिले! आई शप्पथ! हाच तर अर्थ होता चतुर्थीचा. मग मला एका मागोमाग एक शब्द आठवायला लागले. ग्रीक `प्रोती’ आणि आपली `प्रथमा’, ग्रीक `त्रीती’ आणि आपली `तृतिया’. त्रिया, त्रि... आणि अचानक काहीतरी चमकलं!
“कातेरीना, तुम्ही त्रिकोनाला काय म्हणता?” आतल्या आत माझी उत्सुकता दुथडी भरून वाहात होती.
“त्रीग़ोनो. त्री, म्हणजे तीन आणि ग़ोनीया म्हणजे कोन. त्रीग़ोनो, त्रिकोन!” कातेरीना एकेक शब्द समजावत म्हणाली पण मी संपूर्ण ऐकण्याआधीच ओरडायला लागले, “आम्ही पण!! असंच काहीसं, आम्ही पण!!’
तेव्हापासून तो एक खेळच झाला. कधी कोणाच्या वाक्यावरून भाषांची नाती सापडतील, किंवा कधी मला अचानक ती शोधावीशी वाटतील याचा नेम नसतो. महत्वाचं बोलायचं असेल तर हल्ली निकोलास आधीच नम्र सूचना करतो, “अर्निका, कुठला शब्द कुठून आला ते शोधू नकोस, मला फार महत्वाचं बोलायचं आहे. ते सत्र आपण नंतर ठेवू आणि तेव्हा ‘मुख़्तारिस’ तू हो!” (मुख़्तारिसला आम्ही मुखत्यार म्हणतो ही तळटीप मी मनात लिहून ठेवते).
हे शब्द शिकताना जितकी मजा वाटते तितकी चिडचिडही होते! ग्रीक शुद्धलेखनाचं तंत्र आधी माहित असतं तर इंग्लिश स्पेलिंग घोकायला लागलं नसतं. Psychology आणि Pneumonia मधला P उच्चारायचा नाही ही आज्ञा काय राजेशाही फर्मानाप्रमाणे स्वीकारली होती. पण मूळ ग्रीक शब्द तर ‘प्सिख़ोलोग़ीया’ आणि ‘प्नेव्ह्मोनीया’ आहेत हे कळल्यावर इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत प्साय्कॉलॉजी म्हंटल्यामुळे गेलेल्या एका मार्काचं दुःख पुन्हा ताजं होतं!
अफ़साने आणि शिरीन मला फ़ारसी शिकवताना पुष्कळदा कचरतात. ‘अर्निकाजान, मोश्खेल आस’ (शब्द कठीण आहे) असं म्हणत त्याही इंग्लिशमधे बोलायला लागतात. ‘इंद्रधनुष्याला फ़ारसी शब्द सांगा’ असा एकदा तगादा लावल्यावर अफ़साने म्हणाली, “ठीक आहे, पण लगेच म्हणता आला नाही तर वाईट नको वाटून घेऊ, मोठ्ठा आहे शब्द.” शिरीनने मान डोलावली आणि एकेक अक्षर स्पष्ट उच्चारत ती म्हणाली, “रॅंगीन कॅमॉन.” मी शब्द जसाच्या तसा उच्चारल्याचं शिरीनला आश्चर्य आणि शब्द इतका ‘ओळखीचा’ असल्याचं मला!
फ़ारसी लिपी वाचता यायला लागल्यावर दिसेल तो शब्द वाचायचा प्रयत्न करायला लागले. त्या लिपीत अकार, एकार आणि ओ-कार न लिहिण्याची पद्धत रूढ असल्याने बरेच शब्द संदर्भाने वाचायला लागतात (थोडक्यात मूळ शब्द ‘कवळ’ आहे, ‘केवळ’ आहे, की ‘कोवळा’ हे आपण ‘समजून घ्यायचं!). एकेक अक्षर लावत मी पुस्तकातला एक शब्द वाचला. ‘नी-म-को-र’. म्हणजे गोलार्ध. आई शप्पथ!! चंद्रकोर, चत्कोर म्हणतो तसलंच आहे हे! काही न म्हणता मी जागच्या जागी उड्या मारायला लागले.
मला शांत करत शिरीनने हातातल्या शेंगदाण्यांचा पुडा समोर केला. ‘अर्निकाजान, बादाम ज़ॅमिनी?’ छे! आनंदाचे झटके थांबेचनात. शेंगदाण्याला काय छान शब्द आहे! जमिनीतले बदाम. (मग नाही म्हणवेना, मूठभर शेंगदाणे घेतलेच मी!) न सांगता अर्थ आणि व्युत्पत्ती समजल्याची मजा काही खास असते. बादाम ज़ॅमिनी वरून अंदाज बांधत मी सगळ्या दाण्यांची न् फळांची नावं विचारायला लागले. त्यावरून बादाम हेंदी (काजू), ज़ॅर्दआलू म्हणजे पिवळे प्लम (जरदाळू) असे चुलत-ओळखीचे शब्द सापडत गेले.
“हेंदी म्हणजे भारतीय. बादाम हेंदी म्हणजे भारतीय बदाम. काजू तुमच्याकडून आलेत ना, म्हणून! तसंच तुमच्याकडे एक खास आंबट वापरतात बघ. त्याला इंग्लिश शब्द माहित नाही. आम्ही ‘तॅम्र-ए-हेंदी’ म्हणतो. म्हणजे भारताचं आंबट.”
“अरे म्हणजे चिंच!” अफ़सानेकडे पहात मी म्हणाले. इंग्लिशमधला tamarind हा शब्द किती जवळचा वाटतो असं सहज डोक्यात आलं. कोषात बघितल्यावर समजलं की खरंच Tamarind हा तॅम्र-ए-हेंदीचाच रोमन अपभ्रंश आहे.
ग्रीक आणि फ़ारसीबद्दल एवढं कुतुहल का वाटावं? बऱ्याच भाषांचे असे एकमेकींच्या हातात हात असतात. पण संस्कृत ते इंग्लिश अशा भौगोलिक आणि भाषिक प्रवासातले महत्वाचे धागे दाखवणाऱ्या या दोन भाषा वाटतात. ‘माउस’ शब्द वेगळाच वाटतो पण संस्कृत ‘मूषक’, फ़ारसी ‘मूश’ आणि इंग्लिश ‘माउस’ जवळजवळ येतात. वास्तविक ‘स्टार’ चा कुठे संबंध बाकी भाषांशी? पण शब्दाच्या सुरुवातीचं जोडाक्षर म्हणता येत नसल्याने इराणी मंडळी स्टार ला इंग्लिशमधेही ‘सेटार’ म्हणतात. मग फ़ारसी ‘सेतारे’, ग्रीक ‘आस्तेरी’, आणि इंग्लिश ‘स्टार’ एकत्र आल्यासारखे वाटतात. ‘Canonical’ हा शब्द सुरुवातीला किती वेळा पाठ करायला लागतो! मग तो ग्रीकमधील ‘कानोनास’ म्हणजे नियम वरून आल्याचं कळतं. विचारांची गाडी ते दोन्ही शब्द लगेच फ़ारसीतल्या ‘क़ानून’ला जोडून टाकते.
मराठीत नव्वद आणि फ़ारसीत नॅव्हॅद, मराठीत चौदा आणि फ़ारसीत चेहारदाह...एकेका अंकाबरोबर भाषांची मुळं हलल्यासारखी वाटतात. फ़ारसीत सियाह् म्हणजे काळा आणि सियाह्-ई म्हणजे काळेपणा. ‘शाई’ हा आपण केलेला अपभ्रंश! तसंच संस्कृतात ‘अभ्र’ आणि फ़ारसीत ‘आब्र’, ‘अश्व’ ला ‘आस्ब्’ (आस्ब् वरून आस्बगानिस्तान, कदाचित त्याचेच पुढे अफ़ग़ानिस्तान), संस्कृतातील ‘गांधार’ म्हणजे अफ़ग़ान ‘कंदाहार’, आपली ‘न्याहारी’ तो त्यांचा ‘नॉहार’... कुठल्याशा विणकराने घट्ट केलेले असे अनेक उभे-आडवे धागे हाताशी येतात. आणि अर्थातच, ‘कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे’ या ओळीचा फिरून फिरून अनुभव येतो.
प्रत्येक शब्दाच्या मुळाशी जाऊन कळलेली गंमत घरच्यांना सांगावीशी वाटते. आजीला असं काही सांगितलं की तिची एक गोष्ट ठरलेली असते.
“फार फार पूर्वी भारतात दुष्काळ पडला. लोकांनी भराभर समुद्रात होड्या टाकल्या आणि वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. कोणी युरोपात गेलं, कोणी आफ्रिकेत, कोणी अमेरिकेत...काही विचारू नकोस. मग आपल्या भारतीय भाषा बदलत गेल्या, पण मुळात त्या आपल्याचकडच्या!”
या होड्या नक्की कुठून कुठे गेल्या, कुठल्या मार्गाने गेल्या...खात्रीने कोणास ठाऊक? त्यांची लाकडं मुळात आमच्याच देशातून आली या ठाम विश्वासावर कित्येक देशांचा अभिमान कायम आहे. आम्हा मित्र-मैत्रिणींमधल्या कित्येक वादविवादांचं ते इंधन आहे, संभाषणाचं तिखट-मीठ आहे, व्युत्पत्ती समजल्यावर होणारा भोळा आनंद आहे...
म्हणूनच या गप्पां ऐकून आई म्हणते ते मनोमन पटतं,
“म्हणजे कसं आहे ना अर्निका, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...शोधणं सोपं नाही हेच खरं!”
मराठी भाषा दिवसानिमित्त लिहिलेला मालिकेचा शेवटचा भाग, 'लाभले आम्हास भाग्य' इथे वाचू शकाल-
http://arnika-saakaar.blogspot.com/2012/02/blog-post_27.html
छान लेख. मलाही अरेबिक,
छान लेख. मलाही अरेबिक, स्वाहिली मधे बरेच आपले शब्द सापडले. पण नायजेरियन भाषा म्हणजे,बाप रे बाप .
अर्निका, मस्त मजेदार लेख.
अर्निका, मस्त मजेदार लेख. वाचून आश्चर्य वाट्ले. धन्यवाद.
वाह छान, मजा वाटली वाचून.
वाह छान, मजा वाटली वाचून. पुर्वी आपल्या भारतीय भाषांवर अरबी आणि फारसीचा मोठा प्रभाव होताच.
जपानी भाषेत पण काही शब्द असे आहेत. उदा. सेवा हा शब्द जसाच्या तसा त्याच अर्थाने आहे. आनादोरू नावाचा शब्द अनादर करणे या अर्थाने आहे, इ.
अर्निका लेख आवडला. फारसी आणि
अर्निका लेख आवडला.
फारसी आणि ग्रीक शिकावेसे वाटू लागले आहे.
नेहेमीप्रमाणे छान लेख.
नेहेमीप्रमाणे छान लेख.
रॅंगीन कॅमॉन.” >> रंगीत कमान
रॅंगीन कॅमॉन.” >> रंगीत कमान ???
मस्त लेख! आवडला.
मस्त लेख! आवडला.
होय अनिलभाई, रंगीन कमानच! मी
होय अनिलभाई, रंगीन कमानच! मी तोंडात बोटं घातली अक्षरशः
खूप खूप!
आभारी आहे मंडळी
मृदुला, दोन्ही भाषा वेड्याच आहेत त्या. शिकायला लागल्यावर काय वाचू आणि काय नको असं होतं...
दिनेशदा, नायजिरियन मधे फार आपल्यासारखे शब्द आहेत होय? की एकूणच विचित्र या अर्थी म्हणताय तुम्ही?
व्वा. मजा वाटली वाचून.
व्वा. मजा वाटली वाचून. Tamar-ind ही फोड लक्षात आलीच नव्हती.
>>‘कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे’ या ओळीचा फिरून फिरून अनुभव येतो.
अगदी अगदी !
मस्त लिहिले आहेस! तु लॅटीनचा
मस्त लिहिले आहेस!
तु लॅटीनचा पण अभ्यास केला आहेस का? संस्कृतोत्भव आणि लॅटीनोत्भव शब्द त्यांच्या मुळांसकट जुळवून पाहतांना मजा येते.
मस्त!
मस्त!
सही!! खूप आवडला लेख...
सही!! खूप आवडला लेख...
अर्निका, सगळे लेख आवडले या
अर्निका, सगळे लेख आवडले या मालिकेतले. लिहित्या रहा.
('आर्निका'चा अर्थ काय?)
अर्निका शेवटचा भागही सुंदर
अर्निका शेवटचा भागही सुंदर !
अतिशय हृद्य !
अर्निका...एक नम्बर .....मस्तच
अर्निका...एक नम्बर .....मस्तच आहे हा लेख.
अर्निका, सगळे लेख आवडले या
अर्निका, सगळे लेख आवडले या मालिकेतले. लिहित्या रहा >> +१
वा! अगदी इंटरेस्टींग ..
वा! अगदी इंटरेस्टींग ..
मस्तच! एका मेक्सिकन रेस्टॉरंट
मस्तच!
गरम म्हणजे गरमच!
एका मेक्सिकन रेस्टॉरंट मधे, कुठल्यातरी भांड्याकडे हात गेल्यावर तिथला लॅटिनो पटकन 'गरम' असं म्हणालेला
मस्तच्....मजा आली वाचताना...
मस्तच्....मजा आली वाचताना...
वा मस्त आहे लेख .. मजा आली.
वा मस्त आहे लेख .. मजा आली.
वा!!! मस्त, अर्निका. रशियन
वा!!! मस्त, अर्निका.
रशियन भाषेतही संस्कृतच्या अशा अनेक खुणा सापडत जातात. आर्यांचं आगमन तिथून खाली भारतात झालं ना .......
वदा = उदक = पाणी , द्वीएर = द्वार = दार, साखर = साखर इ.
अंक तर बर्याचशा भाषांतले एकसारखे वाटतात.
शेंगदाण्यांना जमिनीतले बदाम म्हणतात ते ऐकून मजा वाटली. आपणही त्यांना भुईमुग (जमिनीतले मुग) म्हणतो तसं. खरंच गंमत.
अर्निका, मस्त लेख आहे. मला
अर्निका,
मस्त लेख आहे.
मला साम्य जाणवलेले काही शब्द :
hydro आर्द्र
cerebrum शिरब्रह्म
cerebellum शिरबलं
sister स्वसृ
daughter दुहितृ
meter मात्रा
moon मन (चंद्रमा मनसो जात:)
automatic आत्ममतिक
arithmatic अर्थमतिक
mathematics मंथमतिक
trigonometry त्रिकोणमात्रा
mortal मर्त्य
candle कंदील (प्रकाशदाती वस्तू)
sit सीद
settle सीदतल
adamant आढ्यमंत
up उपरि
apperture अपरि चर (छिद्र = पलीकडील बाजूस जाण्यचा मार्ग)
suicide स्वच्छेद
genocide गणच्छेद
regicide राजच्छेद
homicide समच्छेद (स्वत:सारख्यांना ठार मारणे)
play प्लव
गुग्गुळाचार्यांना योग्य ते क्ॡप्शब्द विचारले तर आजून रंजक माहिती मिळेलसे वाटते!
आ.न.,
-गा.पै.
छान लेख. मजा आली वाचायला.
छान लेख. मजा आली वाचायला. आणखिन वाचायला आवडेल.
मस्त लेख. ईंडोनेशीयन
मस्त लेख. ईंडोनेशीयन भाषेमध्ये देखिल बरेच संस्कृत शब्द आहेत. माझ्या कलीग बरोबर असेच वाद रंगायचे.
असे शब्द ऐकले की जाणवतं की आपण सगळे किती कनेक्टेड आहोत.
मस्त. आश्चर्य वाटते इतक्या
मस्त. आश्चर्य वाटते इतक्या भाषांमधले साम्य पाहून.
ते चिंचेला अरेबिक मधे 'भारतीय खजूर' या अर्थाने 'तमार ए हिन्द' म्हणतात असे ऐकले/ वाचले होते
हा भाग पण आवडला! लिहीत रहा!
हा भाग पण आवडला! लिहीत रहा!
अर्निका, अतिशय सुंदर लेख...
अर्निका, अतिशय सुंदर लेख... अतिशयच.
अनेक भाषांवर प्रभुत्वं असणार तुमचं... लिहीत्या रहा, खरच.
(अर्निका ह्या शब्दाचा अर्थं काय?)
अतिशय सुंदर लेख...
अतिशय सुंदर लेख...
मस्त! लेख खुप आवडला शब्दातील
मस्त! लेख खुप आवडला
शब्दातील साधर्म्य चकित करणारे आहे 
अर्निका नावाचे एक झाड/फुल असते ना?
अवांतर....होमिओपथी मधे अर्निका ला खुप महत्व आहे. अनेक रोगांवर खात्रीशीर इलाज म्हणून अर्निका वापरतात.
एक अर्निका प्लस नावाचं तेल
एक अर्निका प्लस नावाचं तेल आहे. म्हणजे लाजो म्हणते तसं अर्निका ही एक औषधी वनस्पती असणार.
Pages