बाबागनोश आणि हम्मस (फोटोसहीत)

Submitted by मामी on 24 February, 2012 - 10:43

हा एक मेडिटरेनियन प्रकार आहे. भारी सोपा आणि चविष्ट. घरच्या लोकांकरता मुख्य जेवण म्हणून चालू शकेलच. पण न्याहरीला, हाय टी आयटेम, स्टार्टर, डिप किंवा साईड-डिश म्हणूनही हा बाबा नक्कीच उपयोगी पडेल. हे एका प्रकारचे भरीतच.

वेष बावळा परी अंतरी नाना कळा असं आहे बाबाचं. रूप काही देखणं नाही. ओटा पुसायचं फडकं साधारण महिन्याभरानं जसं दिसतं तसा मळखाऊ रंग. त्यामुळे पाहुण्यांना सर्व करताना दिलो जानसे नटवायला लागेल. पण पिटा ब्रेड, लवाश, क्रुटॉन्स, ब्रेडस्टिक्स बरोबर एकदम झक्कास जोडी जमते आणि खाणारे बाबागनोश मध्ये विरघळून जातात.

बहिणीच्या कृपेनं हा प्रकार मी पहिल्यांदा एका ग्रीक डेलीत खाल्ला आणि तेव्हापासून या बाबाच्या नादी लागलेय.

साहित्य :

भरताची मोठी काळी वांगी (२)
ताहिनी * (एक किंवा दोन चमचे. जास्त घातली तर जास्त क्रीमी लागतं.)
लसूण - ४-५ पाकळ्या
लाल तिखट, मीठ, ऑलिव्ह ऑईल

कृती :

वांगी भरता करता भाजून घेतो तशी मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यावीत. सालं काढून टाकून वांगी मिक्सरमध्ये घालावीत. त्यातच वरील सर्व साहित्य घालून बारीक करावे. बोलमध्ये काढून सर्व्ह करावे. बरोबर भाजलेला पिटा ब्रेड द्यावा.

बाबागनोशचा जुळा भाऊ म्हणजे हम्मस. बाकी सर्व कृती तीच. फक्त वांग्याच्या ऐवजी, रात्रभर भिजवलेले आणि मग थोडे पाणी घालून उकडलेले, काबुली चणे घ्यावेत.

* ताहिनी म्हणजे तीळाची पेस्ट. ही बाजारात तयार मिळते अथवा घरी करता येते. सोप्पी आहे. बिनपॉलिशचे तीळ आणून, निवडून, पाचेक मिनिटे कढईत मध्यम आचेवर परतायचे. रंग बदलता कामा नये. मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक होऊन तेल सुटेपर्यंत वाटावी. काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी. बाहेरही चालेल. पाण्याचा संपर्क अजिबात नको.

टिपा :
१. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट भुरभुरवून टाका.
२. मध्ये थोडा खळगा करून ऑलिव्ह ऑईल घाला.
३. डिप म्हणून वापरताना प्लेटमध्ये मधोमध बोलमध्ये ठेऊन बाजूने पिटा ब्रेडचे तुकडे, ब्रेडस्टिक्स, लवाश इ. रचावे.
४. साध्या ब्रेड बरोबर अथवा चपात्यांबरोबरही मस्त लागतं.

****************************************************

भाजलेली वांगी, लसूण आणि बोलमध्ये आहे ती घरी केलेली ताहिनी

baba1.jpg

लाल तिखट आणि ऑलिव्ह ऑईल घालून सजवलेला बाबागनोश. हे खास दिनेशदांकरता. Happy

baba2.jpg

हा ओरीजिनल रंग

baba3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूला बाबागनोश खायला घालणे हा त्या गटगचा हायलाईट ठरेल. << Lol

२ कसे? मामीकडच्या गटगला मी आहेच कायमस्वरूपी.
तेव्हा मामी +३ असे धरणे Happy

नी, तुझा मुद्दा एकदम बराबर छे. Happy

वर्षुताई, ताहिनी बनवणे काय कठीण काम नाहीये गं. (म्हणून तर बनवली!) Proud
प्रोफेशनल दिसते कारण ती दुसरी काही दिसूच शकणार नाही म्हणून. तीळ दळून बारीक केल्यावर आणखीन काय वेगळे दिसणार गं? Happy

मंजूला बाबागनोश खायला घालणे हा त्या गटगचा हायलाईट ठरेल. >>> माझ्याविरुद्ध काय कट चाललाय आँ?

प्रोफेशनल दिसते कारण ती दुसरी काही दिसूच शकणार नाही म्हणून.>>> Lol

Pages