संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - ९

Submitted by एम.कर्णिक on 22 February, 2012 - 12:38

रसिक वाचक,
या नवव्या भागापर्यंत, सुरुवातीलाच मनात योजल्याप्रमाणे, पन्नास सुभाषितांचे भाषांतर करून या उपक्रमासाठी जिने उद्युक्त केले आणि हाताशी धरून हे कार्य करून घेतले त्या देवी सरस्वतीस वंदन करून याची सांगता करायची असा विचार होता. त्याप्रमाणे आज मी आपला निरोप घेत आहे. यानंतर हे कार्य आणखी पुढे चालवावे अशी प्रेरणा आणि तसे करण्यासाठी अनुमती, बुद्धी, क्षमता तिने दिली तर आनंदाने पुन्हा आपल्या भेटीस येईन. आजवर आपण दिलेल्या प्रेमामुळे मी ऋणी आहे. परमेश्वर आपणा सर्वाना सुखी ठेवो ! शुभम् भवतु |

४६.
नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम् |
व्यवसायाद्वितीयानां नात्यपारो महोदधि: ||

मेरु ना अति उंच तसे ते पाताळहि अतिखोल नसे |
कर्मकुशल जो त्याच्यासाठी सागर लंघन सहज असे ||

४७.
यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन: स पण्डित: स श्रुतवान् गुणज्ञा: |
स एव वक्ता स च दर्शनीय, सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते ||

ज्यापाशी धन तोचि कुलीन पंडित, तो ज्ञानि, तो नेमके मर्म वाचे |
तो सुज्ञ वक्ता नि तो देखणाही, गुण सर्व हे बांधिल त्या धनाचे ||

४८.
को न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरित: |
मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम् ||

कोण आहे जगी ऐसा वश ना हो लाच घेउनी |
मृदंगाला कणिक लिंपा, अन ऐका मधुर ध्वनी ||

४९.
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित: |
अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशो हि दु:सह: ||

सर्व गमवायचे तेव्हा अर्धे सोडति सुज्ञ जे |
तृप्त अर्ध्यामधे उरल्या, सर्वनाश न साहवे ||

५०.
अर्थ: भवन्ति गच्छन्ति लभ्यते च पुन: पुन: |
पुन: कदापि नायाति गतं तु नवयौवनम् ||

संपदा एकदा गेली तरी येते पुन:पुन्हा |
नवयौवन ओसरता परतुनि कधिही न येतसे ||

५१.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता |
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता |
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा: ||

कांती शशि, हिम, कुंद यासम जिचि अन शुभ्र वस्त्रात जी |
वीणा दंड करी धरूनि बसली जी पांढर्‍या पंकजी ||
ब्रम्हा विष्णु महेश अन इतरही देवांस हो पूज्य ती |
पावो मजसि सरस्वती, शिथिलता जी घालवी बुद्धिची ||

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633

गुलमोहर: 

कर्णिक सर
आपण घेतलेल्या या मेहनतीमुळे माझ्यासारख्यांना ही संस्कृत सुभाषितं माहीत तरी होतील. शिकण्यासारखं बरंच आहे.

अ‍ॅडमिनना विनंती : संस्कृत सुभाषितं , अनुवाद किंवा तत्सम ग्रुप बनवून तिथे ही सुभाषितमाला हलवता आई तर हवी तेव्हां वाचता येईल. धन्यवाद

- किरण

अत्यंत सुंदर उपक्रम संपतो आहे याचं वाईट वाटते आहे पण इतक्या सुंदर भाषेशी तुटलेला संपर्क आपण जोडून दिलात, याबद्द्ल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. Happy