रेडीओ

Submitted by नितीनचंद्र on 2 February, 2012 - 22:28

मार्कोनी की आणखी कोणी रेडिओ प्रथमत बनवला यावर कदाचित मतभेद असतील पण गेले शंबर वर्षे सुरवातीला श्रीमंतीच प्रतिक असलेला रेडिओ पुढे सर्वसामान्यांच्या सामन्य करमणुकीच साधन बनला. तर कित्येकांच्या उपजिविकेचे साधन बनला. रेडीओ कलाकार, टेक्निशियन्स, रेडिओ उत्पादन करणार्‍या कंपन्या, विक्री आणि सेवा देणारे व्यवसाईक या सार्‍यांना व्यापुन उरलेला असा हा रेडिओ.

माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहायचो. माझी बहीण माझ्या पेक्षा मोठी. माझ्या जन्माच्या नंतर कौतुकाने घरात प्रवेश करणार कोणी असेल तर तो मर्फी बनावटीचा रेडीओ.

वजनदार लाकडी बॉक्स त्याच्या वरच्या भागातल्या सोनेरी जाळीच्या कपड्यातुन उठुन दिसणारा अंडाकृती स्पिकर. खालच्या बाजुला एक रेडीओ चालु बंद करण्याचे बटन. त्याच्या शेजारी आवाजाचे बटण आणि अगदी उजव्या बाजुला स्टेशन ट्युनिंगचे बटण. त्याच्यच वरती हिरव्या रंगाचा मॅजिक आय नावाचा दिवा जो ट्युनिंग योग्य झाले आहे याचा निदर्शक होता. रेडिओच हे रुपच देखण आणि मिहिनी घालणार होत.

सकाळी पाच साडेपाचला आई वडील उठायचे. चहा बनवुन झाल्यानंतर सकाळी सहा वाजताच्या दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपीत होणार्‍या व पुणे केंद्राहुन सहक्षेपीत होणार्‍या हिंदि बातम्या. मग प्रभात वंदन. भक्तीगिते, आजच्या कार्येक्रमाची रुपरेषा. शेती विषयक सल्ला ज्यात आडसाली उसाची लागवड आणि मावा, तुडतुडे इ किटकांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी दिला जाणारा सल्ला आज ३५ - ४० वर्षांनी तसाच्या तसा आठवतो.

साधारण सकाळी नऊ वाजता बंद झालेला रेडिओ पुढे ११ वाजता कामगार सभेच्या वेळेला चालु व्हायचा. तत्कालिन मराठी सिनेमातली गाणी आणि साधारण १९७२ साली लोकप्रिय झालेल "मळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी " हे गाण किमान आठवड्यातुन एकदा वाजल्याच स्प्ष्ट आठवतय.

दुपारी आपल माझघर, सरु बाईंचा सल्ला या सारखी लोकप्रिय सदरे असायची. यावेळेपर्यंत आईच जेवण उरकुन झाक पाक होऊन आईची वामकृक्षीची वेळ व्हायची. यानंतर मात्र रेडीओ जो बंद व्हायचा तो संध्याकाळी भावगीतांच्या कार्येक्रमाच्या वेळेपर्यंत.

भावगीत झाली की संध्याकाळी ७ वाजता पुणे केंद्रावरुन बातम्या लागायच्या. ज्या वेळेला चाळीत फक्त आमच्याकडे रेडिओ होता तेव्हा शेजारचे अप्पा बातम्या ऐकायला आमच्याकडे येत. ७.१५ ला बातम्या संपल्या की जेवणाची तयारी आणि जेवण झाल की रात्री ९ वाजता श्रुतीका चा वार असला म्हणजे गाद्या बिद्या घालुन लोळत श्रुतीका ऐकणे असा कार्येक्रम असे.

श्रुतीका सहसा कथेच्या स्वरुपात असत. एकाच भागात संपणारी ती एक छोटीशी कथा व रेडीओवरुन त्याचे नभोनाट्य रुपांतर सादर होत असे. आज जश्या मालिकांवर चर्चा होतात तश्या त्या काळी या श्रुतीकांवर चर्चा होत.

वाटसरु ही फार वाटमारीवर गाजलेली श्रुतीका अजुनही स्मरणात आहे.

याच्या मधे बुधवारी बिनाका गीत माला आणि अमिन सयानीचे निवेदन, श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे सादर होणार कार्येक्रम. टेकाडे भाउजी असलेले एक सदर. इ अनेक लक्षात रहातील असे कार्येक्रम होते.

रविवारी सकाळी बालोद्यान नावाचा कार्येक्रम होता ज्यात लहान मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असे. आणिबाणीच्या काळात या कार्येक्रमाच्या निमित्ताने कुणी शिवाजीनगरच्या दुरदर्शन केंद्रात घुसला व प्रत्यक्ष प्रसारित होणार्‍या कार्येक्रमात आणिबाणी विरुध्द घोषणा देता झाला आणि पुढे हा कार्येक्रम बंद पडला.

आपली आवड हा रात्री ९ वाजता प्रसारीत होणारा आणखी एक लोकप्रिय कार्येक्रम होता ज्यात पत्राने लोक गाणी कळवायचे आणि ती गाणी वाजवली जायची. एक मुस्लीम कुटुंबाच नाव बिनवायरलेस दौंड या गावाहुन आपली आवड वारंवार कळवायचे. या शेख नवरा बायकोची नाव कित्येक वर्ष स्मरणात राहिली होती.

साधरण १९८० च्या सुमारास पुण्याला दुरदर्शन संचांची धडाक्याने विक्री सुरु झाली आणि मग मात्र रेडिओची जागा दुरदर्शनने घेतली.

आमचा मर्फी रेडिओ संच ही बिघडला. व्हॉल्वचा रेडिओ दुरुस्त करणारे तंत्रज्ञ कमी झाले आणि त्याचे सुटे भाग मिळणे ही दुरापास्त झाले.

साधरण १९८४ साली दुरदर्शन आणि त्याच्या डोक्यावर रेडिओ असे माझ्या घरात जागा अडवुन बसले होते. याच दरम्यान क्रिकेटची मॅच दुरदर्शन संचावर पहाणे पण त्याच वेली दुरदर्शनचा आवाज न ऐकता रेडिओची कॉमेट्री ऐकणे असा अभिनव उपक्रम मी १९८० ते १९८४ सालात जेव्हा जेव्हा क्रिकेटची मॅच होती तेव्हा तेव्हा केला.

बाळ ज पंडीत यांची शुध्द मराठी समालोचन ऐकणे एक आनंदाची बाब असायची. चेंडु नुसताच तटवला ( प्लेड केला ), झेल घेतला ( कॅच घेतला ), धावबाद ( रनाऑउट ), यष्टीरक्षक ( विकेटकिपर ), गोलंदाज/ गोलंदाजी ( बोलर/ बोलींग ) हे शब्द तर ऐकणे आता ऐतीहासीक झाले आहे.

१९८४ साली जेव्हा आम्ही सदनिकेत रहायला गेलो तेव्हा रेडिओची जागा बदलली. दुरदर्शनने दिवाणखान्यातली मानाची जागा पटवली आणि रेडीओ मात्र पुर्वीच्या पोरांच्या लेंढारात जस शेंडेफळ आईला बिलगुन स्वयंपाकघरात असायच तस ट्रान्झीस्टरच्या स्वरुपात आईला बिलगला.

लग्न झाल्यावर मग मात्र एका ट्रान्झीस्टरचे दोन झाले. एक बायकोकडे जो तिच्या आईचा वारसा म्हणुन आला आणि आईचा आईकडे राहिला.

हे दोन्ही रेडिओ रोज सकाळी एक स्वयंपाकघरात आणि एक आईच्या शयनगृहात चालु असतात. घरात एकाच वेळी दोन रेडीओ चालु असणे घरात शांतता रहाण्याच्या दृष्टिने खुपच फायद्याचे असते.

परवाच बायकोचा ट्रॅन्झीस्टर बिघडला आणि तो रिपेअर होईल का याच्या शोधात आम्ही एका फिलिप्सच्या डिलरकडे गेलो होतो. त्याने एका कागदावर सर्व्हीस डिलरचा पत्ता लिहिन दिला. या पत्यावर काही तो माणुस भेटला नाही करण आजकाल रेडिओ मोबाईलबरोबर मिळतो त्यामुळे स्वतंत्र रेडिओ खरेदी करणार्‍यांची फार्शी संख्या नसावी त्यामुळे रेडिओ रिपेअर्स हा एक जाता जाता जमलाच तर करण्याचा व्यवसाय झाला असावा.

लगे रहो मुन्ना भाई किंवा ऑस्ट्रेलियाच्या पार्श्वभुमीवरचा सलाम नमस्ते या सिनेमात रेडीओ जॉकी या व्यवसायाचा उल्लेख झाला. आकाशवाणीने नवनवीन कार्येक्रमांची काही काळ सुरवात ही केली. त्याही आधी रेडीओ मिर्चीच्या खो खो पाटीलने धुमाकुळ घातला पण रेडिओने दिवाणखान्यातली जागा गमावली ती गमावली.

आज रेडिओ चालतो तो टॅक्सी मध्ये किंवा जिथे दुरदर्शन चालवता येत नाही अश्या ठिकाणी. ज्या काळी वर्षाला पाच रुपये भरुन लायसन्स पुनरुज्जीवन करावे लागायचे व महिन्याचा पगार साधारण १५० ते २०० रुपये असायचा तेव्हा ४०० रुपये किमतीचा रेडीओ हप्त्या हप्त्याने घ्यावा लागायचा. लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अश्या ठिकाणी त्याचे स्थान असायचे. रोडिओने हे स्थान गमावले आहे पण मनात मात्र त्याचे स्थान अबाधित आहे.

गुलमोहर: 

.

अगदी थोडक्यात आटपलंत? दुपारचे मराठीतले कार्यक्रम संपले की आमचा मोर्चा विविधभारतीकडे वळायचा.
पुणे केंद्राचे गृहिणी मुंबई केंद्रही सहक्षेपित करायचे.

फोन इन कार्यक्रमांमुळे रेडियोची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली आहे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवर २-३ वर्षांपूर्वी सकाळी ११ ते १२ आठवणीतली गाणी हा फोन इन कार्यक्रम होता. त्यात महाराष्ट्रभरचे श्रोते फोन करायचे. गावांतले काही श्रोते मोबाइलचा सिग्नल मिळण्यासाठी झाडावर चढून फोन करायचे!

विविधभारतीचे फोन इन तसेच अन्य फर्माइशी कार्यक्रम अजूनही लोकप्रिय आहेत.

छान आठवणी नितीनचंद्र Happy

आमच्या कडेही मर्फीचा व्हॉल्वचा रेडिओ होता कधीकाळी त्याची आठवण झाली. तो बिघडल्यावर त्याचा वस्तु ठेवायचे कपाट म्हणून उपयोग होत होता कितीतरी वर्षे. Proud

रेडिओवरील सर्व कार्यक्रमांचा आढावा मस्तच अगदी - मीही अनुभवलाय हा काळ, त्यामुळे नॉस्टॅलजिक झालो.

हे दोन्ही रेडिओ रोज सकाळी एक स्वयंपाकघरात आणि एक आईच्या शयनगृहात चालु असतात. घरात एकाच वेळी दोन रेडीओ चालु असणे घरात शांतता रहाण्याच्या दृष्टिने खुपच फायद्याचे असते.>>>>>>> असले पंचेस जबरदस्तच......

सुंदर लेख, मनापासून धन्यवाद.

P L ki V P kale yanchya radiowarachya lekhachi athavan jhali. Apaki farmahish madhe mhane jhumaritallaiyawarun roj ektari call asayachach. Chhan lekh

छान आहे लेख्........लहान होते तेव्हा आई रोज १२:३० ला स्वयंपाक करता करता विविधभारती की काय ऐकायची.....आणि चित्रलोक एवढेच आठवते मला......... Happy

छान लेख आणि आठवणी.

रेडियो वर मी आवर्जुन ऐकलेले कार्यक्रम :-

सिबाका गीतमाला (पुर्वी बिनाका गीतमाला) - अमिन सयानी
संध्याकाळाई फौजी भाईच्या गाण्यांची फर्माईश ऐकवली जात.
डायमंड कॉमिक्स आणि बॉर्नविटा क्विझ काँटेस्ट हे मी न विसरता ऐकत होतो.

लहान मुलांसाठी एक 'गंमत जंमत' नावाचा कार्यक्रम असायचा. तो आम्ही कधीच चुकवत नसू.
त्याचं टायटल साँग पण मस्त होतं - "या या या ढिंग चाक ढिंग .. ढिंग चाक् ढिंग चाक् ढिंग ..." असं काहीसं.

फौजी भाईच्या गाण्यांची फर्माईश - जयमाला असे कार्यक्रमाचे नाव आहे.

नितिन,

भूतकाळात नेलेत.

आकाशवाणी सांगली(त्यावेळी कोल्हापूर आकाशवाणीचा जन्म झालेला नव्हता) चा 'आपली आवड' हा एक मराठी गाण्यांचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आठवतो.

आज फार सुरेख मुलाखत ऐकली पुणे केंद्रावर. (जुन्या संग्रहातून पुनर्प्रसारित केलेली). मालती बेडेकर यांची शांता शेळके यांनी घेतलेली. दोघींचे आवाजही इतके कर्णमधुर ! मालती बेडेकर अगदी स्वच्छ आणि ठाम विचारांच्या. आणि शांताबाई म्हणजे मुलाखत कशी घ्यावी याचा आदर्श नमुना.

अरे आपली ललिता-प्रीति देखिल रेडिओवर झळकणार आहे. २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने अस्मिता वाहिनीवर दुपारी १२.०५ ला तिने रत्नाकर मतकरींची घेतलेली मुलाखत प्रसारीत होणार आहे.

लगे रहो लले!

.