नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे निरा.
गेल्या मे महिन्यात आम्ही मुरुडला हवापालट करण्यासाठी गेलो होतो. मुरुडच्या समुद्रकिनार्यावर गाडीतून उतरलो. मुरुडच्या किनार्यावर असणार्या सगळ्याच हॉटेल्स्/वस्तीगृहांभोवती अगदी उंच उ ऐटदार नारळाची झाडे तोर्यात मिरवत आहेत. माझी नजर नेहमीच अशा झाडापानांकडे असल्याने मान उंचावल्या उंचावल्या मला नारळाच्या झाडावर बुजगावण्याप्रमाणे मडकी लटकलेली दिसली आणि प्रचंड गंमत वाटली.
निरा/माडी काढतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा कधी योग आला नव्हता. माझ्या कॅमेर्याने मला लगेच हिंट दिली आणि आता ह्याची प्रक्रिया जाणूनच घ्यायची हे मनाशी ठरविले. पतीराजांना मनीची इच्छा प्रकट केली कारण त्यांची मदत लागणारच होती. आम्हाला जे हॉटेल मिळाले त्या मालकाला निरा बद्दल विचारले. त्याच्याकडून आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे सकाळी ७ ला निरा काढायला माणूस येतो तेंव्हा तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळेल. माझा आनंद द्विगूणीत झाला आणि झोपतानाही मला समुद्र किनारी जाण्यापेक्षा निरा उतरवताना पहायला जायच आहे हा विचार मनात रेंगाळत होता.
सकाळी लवकरच उठून ६.३० वाजताच मिस्टर व माझी श्रावणी मिळून आम्ही बाहेर पडलो. रस्त्यावरचा मस्त गरम चहा आणि बिस्कीट असा किनार्यावर बसुन नाश्ता करत निरा उतरवणार्या माणसाची वाट पाहत बसलो. काही वेळातच हातात कोयता, कमरेला प्लॅस्टीकची कळशी बांधलेला माणूस त्या हॉटेलच्या आवारात आला आणि कुठेही न पाहता झप झप सरळ नारळाच्या झाडावर चढू लागला. माझी कॅमेरा काढण्याची घाई उडाली. कॅमेरा ऑन करे पर्यंत तो झाडाच्या शेंड्यावर चढला.
झाडावर लावलेल मडक काढल, त्यात साठलेल द्रव त्याने कळशीत काढल.
परत ते मडक दुसर्या ठिकाणी काहीतरी कापून वगैरे लावल आणि झपाझप परत खाली आला. मग माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितले की आम्हाला ह्या निरा/माडीची माहीती हवी आहे कशी काढतात ती. मी झपाझप दिसतील ते फोटो काढतच होते. तो खुष झाला. असे पर्यटक कदाचीत त्याला क्वचीतच भेटत असतील. त्याने आमच्यासाठी त्याच्या मोलमजुरीच्या वेळेतला थोडा वेळ दिला आणि निरा/माडी तयार करण्याची पुर्ण प्रक्रिया सांगितली.
निरा तयार करण्यासाठी लागणारे काही साहित्य :
कोयता -चांगला धारदार असतो.
मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते.
सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते.
काटेसावरीचा कोंब - काटेसावरीच्या झाडाचा कोवळया फांदीचा सोललेला कोंब. हा खाताही येतो. त्याने मला त्यातील थोडा तुकडा खायलाही दिला. तशी काही विशेष चव नसते. पण ह्याला चिकटपणा असतो.
दोरी - पोय गुंडाळण्यासाठी
कळशी - निरा उतरवण्यासाठी
माड बाजला म्हणजे त्याच्या फुलांचा कोंब यायला लागला की निरा काढायची सुरुवात करता येते. निरासाठी मडके शक्यतो संध्याकाळी लावतात. फुलोर्याचा जो कोंब असतो त्याला पोय म्हणतात.
ती पोय तयार झाली की पोय उघडू नये म्हणजे फुलू नये म्हणून तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. त्याच्या टोकाला कोयत्याने आडवी चिर देऊन टोकाकडचा भाग खालच्या दिशेने निमुळत्या आकारात कापला जातो जेणेकरून द्रव खालच्या बाजूला पाझरेल.
असे कापल्यावर त्या पोयवर सांबर शिंगने ठोकले जाते. त्यानंतर सावरीचा चिकट बोंड कापलेल्या भागावर फिरवतात. त्यामुळे पोयीतून द्रवाचा फवारा न उडता खालच्या दिशेने गळून मडक्यात पडते.
मग मडक्याचे तोंड पोयच्या टोकाला लाऊन मडके पोयला टांगले जाते. त्यामुळे रात्रभर माडाच्या पोयीतून निरेचा होणारा स्त्राव मडक्यात जमा होत असतो.
सकाळी सुर्योदय झाल्यावर निरा काढणारा व्यक्ती आपल्या कमरेला एक कळशी बांधतो. नारळावर चढून म़डक्यात जमलेली निरा आपल्या कळशीत ओततो. मडके बाजूला कुठेतरी अडकवून पुन्हा त्याच पोयला थोडी टोकाला चिर देतो, सांबर शिंगने ठोकतो, सावरीचे बोंड घासतो व मडके पुन्हा लावून ठेवतो. फक्त पुन्हा बांधण्याची गरज नसते. ही प्रक्रिया पोयीतून निरेचा स्त्राव होईपर्यंत म्हणजे जवळ जवळ एक महीना एका पोगीमार्फत चालू राहते.
ही पोगी संपत आली आहे तरी अजुन प्रक्रिया चालू आहे.
निरा काढणारा लगेच झपाझप नारळाच्या झाडावरून खाली येतो. जवळ जवळ अर्धी कळशी भरलेली निर्[आ बाटल्यांमध्ये किंवा दुसर्या भांड्यामध्ये टाकुन पुन्हा सरसर दुसर्या माडावर तिच प्रक्रिया करण्यासाठी चढतो. ही प्रक्रिया दिवसातून तिन वेळाही करता येते असे म्हणतात.
ही निरा नंतर कोणाची पर्सनल ऑर्डर असेल तर त्यांना दिली जाते नाहीतर माडी विक्री केंद्रावर नेली जाते.
निरा म्हणजेच त्वरीत काढलेल्या माडाच्या द्रवाने कधीच नशा चढत नाही उलट ती शित गुणाची असल्याने आरोग्यदायी असते. मात्र ५-६ तासांनी निरेला मादकपणा येतो व ती माडी विक्री केंद्रावर नेऊन त्यात काही धंदेवाईक माडीवाले त्यात त्यात चुना तसेच इतर नशेचे पदार्थ टाकून माडीला अजून मादक बनवतात. ताजी निरा मात्र गोड, साधारण ताडगोळ्याच्या पाण्यासारखी व आंबूस लागते.
माडाप्रमाणेच ताडाची ताडी, शिंदीची निरा काढली जाते. काही ठिकाणी माडाच्या झाडापासून काढलेल्या निरेला माडीच म्हणतात तर काही ठिकाणी निरा म्हणतात. निरा/माडीमुळे कोकण किनारपट्टीच्या रहिवाश्यांना उद्योगाचे साधन मिळाले आहे. मुरुडला जागोजागी परवान्याची माडी विक्री केंद्रे आहेत. माडी काढणारा प्रत्येक माडाचे साधारण २५ रुपये घेतो अथवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने अथवा भाडेतत्वावर माडीची झाडे घेतो. त्यालाही उपजीवीकेचे साधन मिळते. शिवाय माडाच्या मालकाला निरा/माडी विकून उत्पन्न मिळते. पण निरा/माडी काढल्यामुळे नारळाला नारळ मात्र लागत नाहीत. नारळाच्या उत्पादनासाठी वेगळी नारळाची झाडे शिल्लक ठेवावी लागतात.
एकंदर देवाची करणी आणि नारळात पाणी त्याही आधी देवाची करणी आणि पोय मध्ये पाणी म्हणायला हरकत नाही.









अशी माडी काढल्याने नारळाच्या
अशी माडी काढल्याने नारळाच्या उत्पन्नावर काही परिणाम होतो का?
जागू... मस्त... आपण तर एकदम
जागू... मस्त... आपण तर एकदम चाहते आहे ताडी-माडीचे. कसे वाटते वाचायला ...
(ताडी-माडी विक्री केंद्र... ;))
आमच्या गावाला... म्हणजे वसई ते बोर्डी ह्या भागात सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने भरपूर वेळा भरपूर प्यालो आहे..अर्थात ताजी.

खजुराच्या झाडाची सुद्धा 'ताडी' काढतात. त्याला काय म्हणतात मला ठावूक नाही म्हणून ताडी असेच लिहिले आहे. चवीला गोडं असते..
अनेक लोक नाव ऐकूनच नाके मुरडतात. कारण त्यांना तो दारू सदृश्य प्रकार वाटत असतो. कधीतरी चव घेऊन पहाच.
सेना... जरा "ताडी-माडी मधली
सेना... जरा "ताडी-माडी मधली टायपो सुधार .... भलतेच झालय ते....
जागू मस्त माहिती आणि लेख!
जागू मस्त माहिती आणि लेख!
धन्यवाद बरीचशी नवीन माहिती
धन्यवाद बरीचशी नवीन माहिती मिळाली,
मी सुद्धा कोकणात गुहाघरला ताडी पिण्याचा प्रयत्न केला होता तीची चव खराब होती
ताडी सुर्योदया पूर्वीच काढतात असे समजले कारण सुर्योदया नंतर तिची चव बदलते,
मस्तच माहिती दिलीस जागू. नीरा
मस्तच माहिती दिलीस जागू. नीरा विक्री केंद्रं बर्याच ठिकाणी दिसतात. त्यात मिळणारी नीरा कितपत ऑथेंटिक असते ते मात्र माहित नाही कारण कधीकधी साखर घातलीये की काय असं वाटावं इतकी गोड असते. ताडी-माडी मात्र काहीश्या बदनामच आहेत.
>>>>> मग काय, आज 'माडावर गाय' ? "; म्हणीचा अर्थ असा कीं - माडी काढायला माडावर चढलेला माणूस खुषीत येऊन वरतीच गायला लागला तर ओळखावं कीं रात्रीं माडीसाठी लावलेलं मडकं चांगलंच भरलं आहे ! म्हणून, माडावर गाय !!!! >>>> छान माहिती, भाऊ.
छान माहिती जागू.
छान माहिती जागू.
मी पण ताडी-माडी अनेक वेळा
मी पण ताडी-माडी अनेक वेळा पिलेली आहे. आमच्या इकडे दापोलीला तर अनेक ठीकाणी मिळते, तीही तीन प्रकारात गोडी, आंबट, आणि प्युअर. जेवणाच्या एकाद तास आधी प्यावी मस्त भुख लागते. पण नशा तशीकाहीच होत नाही.
पण मागे एकदा डोंबिवलीला आलेलो तेंव्हां तिथे ताडी प्यालो होतो. दिड-एक बाटलीतच विमान हवेत गेले होते.:फिदी:
जागू, छान माहिती ! <<<सेना...
जागू, छान माहिती !
<<<सेना... जरा "ताडी-माडी मधली टायपो सुधार .... भलतेच झालय ते....>>>>> १००% अनुमोदन! मी पण हेच सुचवणार होते.
अशी माडी काढल्याने नारळाच्या
अशी माडी काढल्याने नारळाच्या उत्पन्नावर काही परिणाम होतो का?<< अर्थातच.. कोणत्याही झाडाची सगळी फुलं काढून टाकल्यास फळं येण्याची शक्यता नसतेच... तुम्ही प्रकाशचित्रं बघितली की लक्षात येईलच...
टायपो सुधारला आहे.... क्षमस्व
टायपो सुधारला आहे.... क्षमस्व आणि धन्यवाद..
छान माहिती जागू
छान माहिती जागू
जागू , खुप मस्त माहिती
जागू , खुप मस्त माहिती दिलीस. तुझे खुप कौतुक वाट्ते........एखादी गोष्ट ही अशी का याचे कुतुहल सर्वाना वाट्ते. पण त्याच्या मुळाशी जाउन त्याचे कारण शोधुन काढण्याचे काम तुझ्यासारखे फार कमी लोक करतात, आणि ती माहिति फोटोसकट आमच्यासारख्या लोका पर्यत पोह्चवण्याचे अजुन कमी लोक करतात, त्याच्यात तुझा नंबर लागतो. तू दिलेली माहिति छान असते... मग ती फुलापानाची असो वा खाण्याची असो, Thanks!
माहिती गोळा करण्यासाठी
माहिती गोळा करण्यासाठी धन्यवाद. पण माझ्या माहितीप्रमाणे ही ताजी असते ती नीरा. ती माद्क नसते, उलट नारळाच्या पाण्यासारखे औषधी गुण तिच्यात असतात. आंबल्यानंतरच तिला माडी म्हणतात. अशीच काजूच्या बोंडांची काजूनीराही पाचक असते. ती आंबल्यानंतर तिची फेणी करता येते.
ज्योती, निरा ही शिंदीच्या
ज्योती, निरा ही शिंदीच्या फळांपासून बनवली जाते. खजूरासारखीच शींदीची फळे असतात. ताडी ही ताडापासून बनवतात आणि माडी माडापासून म्हणजेच नारळापासून.
वत्सला, शांकली, सावली, मृनिष, सेनापती, भुंगा, फुलपाखरू, मानुषी, केदार, मामी, प्रज्ञा, परदेसाई, विजय स्वाती, विद्यक धन्यवाद.
जागुताई, माडाची, किंवा काजूची
जागुताई, माडाची, किंवा काजूची असो, ताज्या रसाला रत्नागिरी आणि गोव्यात नीराच म्हणतात. आणि ती आंबल्यानंतर त्यात अल्कोहोल तयार होतं तेव्हाच त्याला माडी आणि फेणी म्हणतात.
मस्त माहिती आणि मस्त फोटो
मस्त माहिती आणि मस्त फोटो

धन्स जागू
छान माहिती..... चौलला
छान माहिती.....
चौलला मावशीच्या घरी नारळ सुपारीच्या बागा लहानपणापासून पहात आलेयं पण हा प्रकार कधीच माहित नव्हता.......
तसेच हे ताडी-माडी-नीरा वगैरे प्रकार एकदा तरि चाखून पहावे असं नेहेमी वाटायचं.... पण नशा येते वगैरे सांगितले गेल्याने कधी हिम्मत झाली नाही..... :).... आता हरकत नाही चाखायला......
माडीच्या आधी नीरा मिळते
माडीच्या आधी नीरा मिळते प्यायला.
ज्योती कामत +१
>>>या रसाचा गूळ का करत नाहीत
>>>या रसाचा गूळ का करत नाहीत कोकणात? सौदागर शिणेमासारखं<<<<
करतात ना कोकणात देखील.
जागु..मस्त माहिती
जागु..मस्त माहिती नेहमीपर्माणे.. फोटो पण सुर्रेख..
अच्छा..तर ही माडी क्वाय...!!!!
ताडीमाडी चे दुकान अशी पाटी वाचल्यावर मला नेहमी वाटायचं कि ताडी प्यायल्यावर लोकांना माडीवर चढल्यासारखे वाटते म्हणून असं नाव असतं दुकानाचं.. !!!
वर्षू नील.. ताडी प्यायल्यावर
वर्षू नील..

ताडी प्यायल्यावर लोकांना माडीवर चढल्यासारखे वाटते म्हणून असं नाव असतं दुकानाचं..
>>>>>
ताडी प्यायल्यावर लोकांना
ताडी प्यायल्यावर लोकांना माडीवर चढल्यासारखे वाटते म्हणून असं नाव असतं दुकानाचं..
>>> वर्षुताई ......
छान माहिती, जागू. अगदी ताजी
छान माहिती, जागू. अगदी ताजी माडी आणि निरा दोन्ही लहानपणी पिऊन बघितली आहे. चव जवळ जवळ सारखीच असते नै?
मस्तं चित्रंही.
रोहन ,मामी, आत्ता जागुमुळे
रोहन ,मामी, आत्ता जागुमुळे माझा गैरसमज दूर झाला नं...
मस्त माहिती जागु , मला पण
मस्त माहिती जागु , मला पण पहिल्यांदाच समजलं माडी नारळापासुन मिळते आणि मादक नसते. ( मला नशीली म्हणायचं आहे
)
उत्तम माहिती, सुरेख फोटो.
उत्तम माहिती, सुरेख फोटो.
मस्त माहिती जागू.
मस्त माहिती जागू.
<< ( मला नशीली म्हणायचं आहे
<< ( मला नशीली म्हणायचं आहे ) >> सकाळी काढलेली माडी दुपारनंतर "शिळी" व 'नशीली "ही होते, असं जाणकार म्हणतात !!!
हो भाऊ आंबल्यावर ती माडी
हो भाऊ आंबल्यावर ती माडी नशीली होते. आणि अजुन नशा आणण्यासाठी त्यात काही मादक पदार्थ माडी विक्रिवाले टाकतात. म्हणून झाडावरून काढल्या काढल्या प्या सगळ्यांनी.
ज्योती हा प्रत्येक एरीयाच्या बोली भाषेचा फरक असेल. आमच्याकडे शिंदीच्या पेयाला निरा म्हणतात तर तुमच्याकडे ताज्या रसाला निरा म्हणतात. चालायचच.
निरा विक्री केंद्रावर मिळणारी निरा धंदेवाईक पावडर पासुन बनवतात असेही ऐकीवात आहे.
जिप्सि, काया, वर्षू :हाहा:, झंपी, दाद, श्री, पुरंदरे, माधव धन्यवाद.
Pages