संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - १

Submitted by एम.कर्णिक on 19 January, 2012 - 14:35

संस्कृत भाषा सुभाषित मौक्तिकानी समृद्ध आहे. त्यातील काही मौक्तिके मराठीत आणून तुमच्यासाठी क्रमश: प्रस्तुत करायचा मानस आहे. अर्थात तुम्हाला कंटाळा आला तर लगेच थांबवेन. शक्यतो मूळ सुभाषिताचेच वृत्त मराठीतही ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.

१.
रे रे चातक, सावधान मनसा, मित्र क्षणम् श्रूयताम्
अंबोदा: बहवो वसन्ति गगने, सर्वेपि नैतदृशा:
केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीम् गर्जन्ति केचिद् वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनम् वच:

मेघांनी भरले आभाळ तरिही सारेच ना वर्षती
थोडे वर्षुनिया धरा भिजविती थोडे फुका गर्जती
मित्रा, सावध हो असेच कथि मी, रे चातका खगवरा
ज्या ज्या पाहसि त्या नको विनवु तू देण्यास जलस्रग्धरा

२.
केयूरा: न विभूषयन्ति पुरुषम् हारा: न चन्द्रोज्वला:
न स्नानम् न विलेपनम् न कुसुमम् नालंकृता मूर्धजा
वाण्येकम् समलंकरोति पुरुषम् या संस्कृताधार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततम् वाग्भूषणम् भूषणम्

नाही कंकण, चंद्रहार अथवा कंठा गळ्याभोवती
अत्तरस्नान न गंध, नाहि गजरा, कचभारही ना कधी
हे वादातित - फक्त वाणि करते पुरुषा अलंकारित
सारी आभूषणे विनाशि असता वाग्भूषणचि शाश्वत

३.
तैलात् रक्षेत् जलात् रक्षेत् रक्षेत् शिथिल बंधनात्
मूर्खहस्ते न दातव्य एवं वदति पुस्तकम्

तेल नि पाणी, शिथिल बांधणी यांपासुन मजला तारा
मूर्खा हाती देउ नका मज विनवी पुस्तक रसिकवरा

४.
खद्योतो द्योतते तावद् यावन्नोदयते शशी
उदितेषु सहस्रांशो क्व खद्योत: क्व चंद्रमा

काजवा चमके तोवर चंद्रमा ये न जोवरी
उदया येई जव सूर्य कुठे काजवा कुठे शशी?

५.
क्षणश: कणशश्चैव विद्याम् अर्थम् च साधयेत् |
क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम् ||

क्षणोक्षणी मिळवा विद्या, कणाकणानी संपदा
क्षण सरता कुठे विद्या, कण सरता कुठे धन?

दुवे:
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

उत्कृष्ट उपक्रम. संस्कृतमधील संपदा वाचायला व समजायलादेखील मिळणे हे दुरापास्तच. ती संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार. पहिल्या श्लोकातील काही शब्द उदाहरणार्थ वितान, जलसग्धर आदी संस्कृतइतकेच अवघड भासले. मराठीकरणाची भाषा अधिक साधी, सोपी हवी असे वाटून गेले. बाकीचे सर्व श्लोक-रुपांतर सुलभ व सुंदर.

सुसुकु आणि प्रद्युम्नसन्तु, मनःपूर्वक धन्यवाद.
वितान शब्द बदलतो आहे. स्रग्धरा म्हणजे मणि ओवायचा धागा किंवा दोरी. यमकासाठी आणि वृत्त संभाळण्यासाठी 'पावसाच्या थेंबाच्या माळेसारखी जलधारा' अशा अर्थाने तो वापरला आहे. पर्यायावर आणखी विचार करतो. अत्यंत योग्य सूचना केल्याबद्दल, प्रद्युम्न, तुमचे विशेष आभार.

नाही कंकण, चंद्रहार अथवा कंठा गळ्याभोवती
अत्तरस्नान न गंध, नाहि गजरा, कचभारही ना कधी
हे वादातित - फक्त वाणि करते पुरुषा अलंकारित
सारी आभूषणे विनाशि असता वाग्भूषणचि शाश्वत

>>

faar faar suMdar !!

वाह, अप्रतिम, सुंदर, आधीच एकतर सुभाषिते छानच आहेत, त्यातुन तुम्ही त्याचे एवढे उत्कृष्ट मराठीकरण करत आहात. दुग्धशर्करा योगच जणु.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती |
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम ||

एक वेडावाकडा प्रयत्न करून पहात आहे.

भाषांमधे असशी मुख्य मधुर नि दिव्य हे गिर्वाण भारते
काव्ये जशी मधुर तुझ्यातली, तशीच ही सुभाषिते

वा मस्तच उपक्रम Happy
पहिलंच सुभाषित माझं अत्यंत आवडीच आहे, मला ते नववी की दहावीच्या सुभाषीतमालेत होतं. मी ते माझ्या मुलीलाही शिकवलं आहे तिलाही ते खूप आवडलं.तिला अजुन हवी आहेत सुभाषित पाठांतराला पण अजुन सुभाषितं मला आठवतच नव्हती. पुस्तकांच्या दुकानातुन शोधा शोध केली पण मला हवी होती तशी (जी माझ्या ओळखीची असतील) पुस्तकं नाही सापडली.तुम्ही तर माझ्यासाठी खजीना उघडा करुन दिला आहे. खूप खूप धन्यवाद!

सुसुकु, प्रद्युम्न, बिल्वा, आदिविझ, aschig, मामी, पाषाणभेद, प्रसाद, ammi, रावी, महेश आणि विनार्च
खूप खूप धन्यवाद. वाचकाना हा उपक्रम कितपत रुचेल याबाबत बराचसा साशंक होतो. पण तुम्हा सर्वांमुळे हुरूप आला. नक्की पुढे चालू ठेवीन.

फारच सुंदर आहे. अजून येऊद्या.

मी ही एका सुभाषितावर प्रयोग करून पाहिला;

काकः काकः पिकः कृष्ण, को भेदो पिककाययो ?
वसंत समये प्राप्ते, काकः काकः पिक पिक:

काळा कावळा कोकिळही काळा, काय असे भेदभाव ?
वसंत येता, कोकिळ करी कुहु अन कावळा कावकाव

उ. म. वैद्य.

कर्णिक काका, खूप चांगला उपक्रम. ह्या सगळ्याबद्दल मनापासून धन्यवाद.

विनार्च, नंतर मेल करेन सवडीने.

मस्तच उपक्रम आहे कर्णिकजी.
अनुवाद पण छान जमलेत.
एकच विनंती : प्रत्येक सुभाषिताबरोबर त्याचं वृत्त (शक्य असल्यास लक्षणांसहित) दिल्यास फार बरं होईल.

धन्यवाद कर्णिक साहेब,
जे चांगल असत ते केव्हाही सज्जनांकडुन स्विकारल जात,दुर्जन जेव्हा ते स्विकारतात तेव्हा ते आपोआपच सज्जनतेच्या वाटेकडे चालू लागलेले असतात,आपला उपक्रम चालू ठेवा.

ओहो, बंटी-बनूच्या कवितेत ह्याविषयी वाचलं. आठवी ते दहावी संस्कृत घेतलं होतं त्यानंतर भाषेचा संबंधच तुटला. ह्यानिमित्ताने किती आठवतंय ते जोखून बघता येईल आणि नवी सुभाषितंही समजतील. मस्त उपक्रम चालू केल्याबद्दल मनापासून आभार. Happy

खरोखरच स्तुत्य उपक्रम.........

माझ्यासाठी हा धागा निवडक १० मध्ये ............ Happy