नाते समुद्राशी- भाग १.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

काठावरचा समुद्र वेगळा आणि समुद्रामधला समुद्र वेगळा. समुद्राचा आणि माझा संबंध फार जुना. त्यातही ज्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून आहे अशा कुटुंबातली मी. माझे वडील जहाजबांधणी क्षेत्रामधले. त्यामुळे समुद्राचे विविध रंगरूप आणि नखरे बघायला-अनुभवायला मिळालेले. पप्पाकडचे काही किस्से तर अक्षरश: अफलतून आहेत. अशाच काही माझ्या आणि पप्पांच्या अनुभवाबद्दल हे माझे लेख.

मी दुसरीत असताना पप्पानी भारती शिपयार्डमधे नोकरी धरली. त्याआधी ते बर्‍याच कंपन्यामधे फिरून आले होते. त्यामुळे आमची वरात बंगळूर, कोचिन, विशाखापट्टणम, कोल्हापूर अशा अनेक गावामधून फिरली होती. आमची म्हणजे मी आणि मम्मी. कोल्हापूरला असताना योगेश झाला. तेव्हा मी पाचसहा वर्षाची होते. आणि तेव्हा थोडं थोडं मराठी शिकत होते. अन्यथा माझी मातृभाषा कानडी. आता मात्र मी कानडी आहे हे सांगावं लागतं इतकं माझं मराठी चांगलं आहे. मम्मीला कोल्हापूर हे गाव फार आवडलं आणि तिने आता इथेच सेटल होऊया, अशी तयारी केली होती.

कसंच काय नी कसचं काय. काही कामासाठी पप्पा इथे रत्नागिरीला आले होते, भारतीच्या त्यावेळच्या हेड शिपयार्डला पप्पांचं काम आवडलं म्हणून त्यानी सरळ ऑफर लेटरच देऊन पाठवलं. आणि आम्ही एका ट्रकमधे सामान घालून रत्नागिरीमधे आलो. आणि आता कायमचेच इथले होऊन बसलो.

पण सुरूवातीला मम्मीला हे गाव बिल्कुल आवडलं नाही, एकतर इथले धूळभरले रस्ते, शिवाय सर्व काही लांबलांब. साधी भाजी घ्यायची म्हणजे खाली बाजारात जायचं. तेव्हा मारूती मंदिरला रात्री सातनंतर चिटपाखरूसुद्धा नसायचं. मला मात्र हे गाव खूप आवडलं. आजूबाजूला माझ्याच वयाची मुलंमुली होती शिवाय आम्ही जिथे राहत होतो तिथे हिंदू कॉलनीमधे भरपूर हुंदडायला जागा होती. तेव्हा शाळेच्या अ‍ॅडमिशनसाठी आताच्यासारखी मारामारी नसल्याने मम्मीने मला जवळच्याच एका शाळेत नेऊन बसवलं आणि आमचे दिनक्रम चालू झाले. इथे आल्यावर माझं मराठी बर्‍यापैकी सुधारलं. शाळा ही माझी अत्यंत आवडीची बाब (तेव्हा) असल्याने मला इथे रूळायला जास्त त्रास झाला नाही.

भारती तेव्हा फार छोटी कंपनी होती. सोळा की अठरा ऑफिसर्स होते. पण तेव्हाचे हेड शिपयार्ड श्री. बामणे म्हणून होते. हे बामणे अंकल स्वभावाने खूप मिश्किल आणि गमतीदार होते. कंपनी रत्नागिरीपासून जवळ जवळ अठरा किलोमीटर लांब होती. त्यामुळे सर्व ऑफिसरना न्यायला-सोडायला कंपनीची गाडी यायची. तेव्हा रत्नागिरीमधे गाड्याच कमी असल्याने आम्हाला या कंपनीच्या गाड्या (जिप्सी, जीप आणि एक मिनिव्हॅन) कुठेही ओळखू यायच्या. आणि ते ड्रायव्हर अंकलपण कंपनीचे काम बाजूला ठेवून आम्हाला घरी किंवा जिथे कुठे जात असू तिथे सोडायचे. स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षेला तर दिवसभर एक गाडी आमच्या दिमतीला असायची.

बाकीचे सर्व ऑफिसर्सदेखील खूप चांगले होते. रत्नागिरीत गेल्यागेल्या सर्व बायाबायाचं एकमेकांच्या घरी येणंजाणं चालू झालं. नशिबाने तीनचार कुटुंबं कानडी होती, मम्मीला तेवढंच समाधान. त्यामधे एक एस एस पाटिल नावाचे अंकल होते. (मला आणि इतर सर्वच मुलामुलीना कंपनीतल्या प्रत्येक माणसाला अंकल म्हणूनच हाक मारायची सवय याच काळात पडली, तेव्हा काही विशेष वाटले नाही पण पुढे कित्येक वर्षानी, नवर्‍याच्या बॉसला मी संजूअंकल म्हणून हाक मारते तेव्हा नवर्‍याला ते मजेदार वाटतं. मला किंवा त्याच्या बॉसला काहीच वाटत नाही. सवय.... दुसरं काय!!) तर हे पाटिल अंकल आता रीटायर्ड झाले, पण आजदेखील मला "तुझं नाव कानडीमधून सांग" असं विचारून विचारून पिडतात. लहान असताना मी त्याना काय काय मजेदार उत्तरं द्यायचे. पण नाही. त्यांचं आपलं मला भेटलं की कानडीमधून नाव सांग याचं पालुपद चालूच. त्याना दोनही मुलगेच होते. आणि दोन्ही मुलांची नावं काय छान आहेत. सागर्-सम्राट!!

असंच एकदा कधीतरी शाळेला सुट्टी असताना पप्पाबरोबर कंपनीमधे फिरायला गेले होते. दिवस नक्की कुठला आठवत नाही, पण मी मम्मीने नविनच शिवलेला निळा फ्रॉक घातला होता हे पक्कं आठवतय. लोखंडाच्या त्या जंजाळामधे फिरताना कशालातरी अडकून फ्रॉक फाटला होता. मग आईने धपके घातले ते आठवणारच ना?

पण यापुढे ठेच लागून शहाणपणा आला. कंपनीमधे जाताना पप्पा बॉयलर्सूट घालायचेच, पण मीपण शर्ट-पँट- बूट-कॅप अशी सज्ज वेषातच जायचे. मला फ्रॉक-पंजाबी ड्रेस वगैरेचा कंटाळा तेव्हाच यायला लागला बहुतेक. आतासारखे कंपनीमधे तेव्हा सीक्युरीटीचे एवढे प्रस्थ नव्हते. आम्ही शनिवारी रविवारी खेळायला म्हणूनदेखील कंपनीमधे जायचो. तेव्हा भारतीच्या प्रत्येक जहाजाच्या लाँचिंगचा कार्यक्रम व्हायचा.

लाँचिंग म्हणजे जमिनीवर बांधलेले जहाज पहिल्यान्दाच पाण्यात ढकलणे. हे ढकलणे शब्दश: खरे असते. समुद्रामधे उभा असलेला टग (टग्या नव्हे,) मोठ्यामोठ्या दोरखंडाने जमिनिवरच्या जहाजाला समुद्रात ओढतो. ते क्षण दोन क्षण अंगावर अक्षरश: काटा येतो. एवढे प्रचंड जहाजाचे धूड धम्माम्म करत पाण्याचे कारंजेच्याकारंजे उडवत समुद्रामधे जातं आणि तितक्याच क्षणामधे लीलया तरंगायला लागतं. थोड्याच दिवसामधे पप्पा लाँचिन्ग एक्स्पर्ट झाले पण ते समोरच्या ओढणार्‍या जहाजाचे प्रमुख असायचे. कारण, ओढण्याचं मुख्य काम त्या जहाजाचं. पाण्यात पडलं की पोहता येतं, हे जहाजाच्या बाबतीत खरं आहेच. पण त्यासाठी पाण्यात पाडणं ही स्टेप फारच महत्त्वाची असते.

अर्थात एवढं सर्व समजायचं आमचं वय नव्हतं. आम्ही पोरं मिळून तेव्हा जमिनीवर उभं राहून एकदातरी त्या धम्माम करत जाणार्‍या जहाजामधे आपण बसायला हवं असं म्हणत असू. देवाने एकदा तरी ती इच्छा पूर्ण करावी, अशी अजूनदेखील इच्छा आहे. मात्र त्या समोरच्या ओढणार्‍या टगामधे बसायची इच्छा मात्र मी मनसोक्तरीत्या पूर्ण करून घेतली.

एकदा असंच आम्ही लाँचिंगच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हाची घटना. मी सातवीत होते, आणि शाळा बुडवून या प्रोग्रामला गेले होते. दुपारच्या भरतीला लाँचिंग करायचे होते. एक वेळ लग्नाचा मुहूर्त चुकला तरी चालेल. पण लाँचिंगचामुहूर्त चुकवून चालत नाही. हे जहाज भारतीची (बहुतेक) पहिली फारिनची ऑर्डर होती आणि त्यामुळेच फार दणक्यात कार्यक्रम होता. कामगार संघटनेच्या बायकानी या कार्यक्रमाच्या संपूर्ण सांस्कृतिक संयोजनाची जबाबदारी उचलली होती. ऑफिसरच्या बायका फक्त देखरेखीचे काम करत होत्या. तर या कार्यक्रमाम्धे आधी थोडी भाषणे ओळख वगैरे झाली. नंतर बायकानी माईक ताब्यात घेऊन काही गाणी म्हटली. आम्हा मुलामुलीचा एक डान्स पण होता. सर्वात शेवटी जहाजाच्या पाठवणीचे गाणे (अर्थात स्वरचित) म्हणायला सुरूवात झाली. आलेल्या पाहुण्यापैकी आणि समोरच्या प्रेक्षकापैकी ज्याना मराठी येत नव्हते त्या सर्वाचे ग्रह या दिवशी फारच उच्चकोटीतले होते.

आमच्यासारख्याची अवस्था फारच बिकट झाली.
त्यात हे गाणे "चालली सायप्रसला लेक ही भारतीची" असे अत्यंत करूणरसपूर्ण असल्याने काही बायानी हुंदके द्यायला सुरूवात केली. आपण मराठीमधे सर्रास "ते" जहाज म्हणत असलो तरी कवयित्रीने "ती" नौका असे समजून ही कविता रचली होती. आणि हे आम्हाला सुरूवातीलाच सांगितले होते. नाहीतर कोण कुठली लेक असा प्रश्न लोकाना नक्कीच पडला असता.

आपल्या लेकीप्रमाणे तिची जपणूक करणार्‍या सर्व्च लोकाविषयी या कवितेमधे उल्लेख केलेले होते.

"श्री बामणेचे डीझाईन अतीव सुंदर
ल्यायली ही आकाशी अन लाल रंग"

हे ऐकून बामणे आंटी जे काही फिसकाटल्या, सांगायची सोय नाही. त्यात त्यांच्या नवर्‍याचा आणि डीझाईन डीपार्टमेंटचा काहीच संबंध नव्हता. ते हेड शिपयार्ड होते. पण गाण्यामधे त्याना या नौकेचे पिता केलेले होते. तो रोल गाणे संपेपर्यंत निभवायचा होता.

आणि अर्थात गाणे अजून संपलेले नव्हते.
"श्री पाटिल कुशल वीजवाले
जहाज कसे प्रकाशात न्हायले" -- इथे नौकेचे जहाज झालेले कसे काय चालते असा एक प्रश्न अमर(हल डीपार्टमेंटच्या पाटलांचा मुलगा)ला पडला होता. पण त्याला उत्तर देण्याआधीच पुढचे हास्यकल्लोळ चालू झाले होते.

एस एस पाटिल अंकल हे ईलेक्ट्रिकल डीपार्टमेंटचे हेड होते. हे असलं काही ऐकून त्याना भंजाळायलाच आणि आपण एक ईलेक्ट्रिशेयन आहोत असं वाटलं असावं. तरी मला पूर्ण गाणे आठवत नाहीये. मात्र सर्वात शेवटचे कडवे अक्षरश: कहर होते.

"भिऊ नकोस गं बाई, जाशील जरी तू दूरदेशी,
आहेत आरेम देसाई, करतील तुझी डीलीव्हरी"

अर्थात पप्पा जहाजासोबत सायप्रसला जाणार होते, मात्र जहाजाची पाठवणी आणि डीलीव्हरी हे ऐकल्यावर सर्वात जास्त हास्यकल्लोळ माजला होता. गाणी म्हणणार्‍या ज्या बायकाचे नवरे पप्पांच्या आजूबाजूला होते त्यांच्यापैकी एकाने "साह्येब, घरी जाऊन चामडी लोळवतो" अशी भाषा चालू केली. पप्पा म्हणे, "कशाला? इतकं कॉमेडी लिहायला तुला जमणार तरी आहे का?"

अर्थात नंतर बामणे अंकल रीटायर्ड झाल्यावर असले कार्यक्रम परत कधी झालेतच नाहीत. पण तरीदेखील हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या आठवणीत या एका कवितेमुळे लक्षात राहिला आहे.
================================================

क्रमश:

प्रकार: 

बापरे तो व्हिडियो कसला डेंजर वाटतोय. ते धूड असं धपकन पाण्यात पडलेलं बघणं म्हणजे तुमची पर्वणीच असेल ना? मस्त.

कृपया हे घरी ट्राय करू नका >>>> Rofl

भीषण पाठवणी! Lol लिही गं अजून.
व्हिडीओ सही आहे. पाण्यातले जहाज किती वेळा पाहिले आहे पण ते पहिल्यांदा पाण्यात कसे जात असेल हा विचारही आला नव्हता डोक्यात. मजा आली. Happy

<< भाऊ, उगाच संधी चुकवलीत >> तुमच्या व्हिडीयो क्लिप बघून तर तीव्रतेने जाणवलं हें ! 'साईड लाँचिंग' प्रथमच पाहिलं . लाँचिंगच्या आधींच्या रात्री त्या बोटीचं काम केलेला कुणीही झोपूं शकतो का हो ?
पूर्वी लाँचिंगसाठी रत्नागिरीतल्या बर्‍याच प्रतिष्ठीताना 'भारति'कडून खास निमंत्रण असायचं असं आठवतं. आतां तो सोहळा बंद झाला का ?
[ आपल्याकडे नारळ फोडतात तसं पाश्चिमात्य देशात कुणीतरी 'व्हीआयपी ' खास उभारलेल्या मचाणावर उभा राहून बोटीच्या नाळेवर शँपेनची बाटली फोडून लाँचिंग सुरूं करतो. यावर एक छान व्हिडीयो क्लीप [अ‍ॅनिमेशन व्यंगचित्र ] पाहिलं होतं; आपटलेली शँपेनची बाटली तशीच रहाते व सबंध बोट मात्र खळकन तुटून खाली कोसळते !] Wink

समयोचित स्वरचित काव्य. त्या निमित्ताने स्थानिक कवींना एक संधी .:)
नाहीतर गांधी जयंतीला आमच्या शाळेत दर वेळी " उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया " हेच गाण आम्ही म्हणत असू Proud
नेहमीप्रमाणेच छान.

मस्तच गं नंदिनी...........पुढच्या भागाची वाट पाहते.

मस्तच गं नंदिनी...........पुढच्या भागाची वाट पाहते.

ती कविता भारीच आहे. असल्या आणि इथल्या कविता वाचुन जो प्रश्न पडतो (हे सुचतं तरी कसं?) त्याचं उत्तर कधी सापडेल असं वाटत नाही Proud
मस्त लिखाण...पुढच्या भागांची उत्सुकता आहेच Happy

आज (खरेतर उशिरानेच) सर्व भाग वाचायला घेतले आहेत.. Happy

एक वेळ लग्नाचा मुहूर्त चुकला तरी चालेल. पण लाँचिंगचामुहूर्त चुकवून चालत नाही.
>> वेल सेड... खूपच महत्वाचे.. Happy

काव्य जबरी.. Happy
आमच्याकडे देखील प्रत्येक व्हेसलचा नामकारण विधी होतच असतो.. Happy

सेनापती. तुम्ही मर्चंट नेव्हीमधे का? नामकरण विधीबद्दल सविस्तर लिहा. काही जहाजाची नावे फार सुंदर असतात.

बान्धताना व्हेसल्सना आकडे असतात. पपा ४८० वर, भाऊ ३८२वर आणि सतिश ३८६ वर काम करत आहेत. Proud

स्वीट टॉकर यांच्या धाग्यावरच्या रिक्षेतून इकडे आलो.
काव्य भारी आहे.. "स्वागत करुया सकल जनांचे" आठवलं Biggrin
आता पुढचे भाग वाचतो.

स्वीट टॉकर यांच्या धाग्यावरच्या रिक्षेतून इकडे आलो.>>>मी पण त्याच रिक्षातून. आवडला लेख. बाकीचे वाचते आता

ऐ ..मैने मिस किया था ये धमाल.... थांकु स्वीटॉ.
काव्य भयानक्के Rofl Biggrin
नंदिनी, मस्तं लिवलंयस..

भारी काव्य! आमच्या मुख्याध्यापकांचे नाव 'अमृत' होते. पण तेव्हा ते माहित नव्हतं. स्नेहसंमेलनाच्या स्वागतगीतात हमखास शेवटची ओळ ' सांगे अमृत वंदुनी लोकां..', किंवा अशीच काहीतरी ! हे 'अमृत' कुठून आलं याचा पत्ता बर्याच वर्षांनी लागला होता!

पुन्हा वाचला. हहपुवा.

चिं वि जोशींच्या गोष्टीतलं स्वागतगीत आठवलं. त्या स्वातंत्र्यपूर्व काळात एका शाळेत शाळा निरीक्षक म्हणून हैबतखान पठाण नावाचे ग्रुहस्थ येतात. गायनाच्या बाईंंनी समयोचित स्वरचित स्वागतगीत विद्यार्थ्यांना शिकवले असते ते मुलं म्हणायला सुरुवात करतात.

पठाण हैबतखान पाजी
अहो कितीतरी पाजी
बहुतचि पाजी इ.इ.

या ओळी ऐकून ंनिरीक्षक भयंकर खवळतात. आपल्याला सार्वजनिकरीत्या पाजी म्हणतायत हे कसं खपेल कोणाला! पण नंतरची ओळ ऐकल्यावर शांत होतात कारण ती ओळ असते

विद्याम्रुत सकलांना जी

हे ऐकून बामणे आंटी जे काही फिसकाटल्या, सांगायची सोय नाही. त्यात त्यांच्या नवर्‍याचा आणि डीझाईन डीपार्टमेंटचा काहीच संबंध नव्हता. ते हेड शिपयार्ड होते. पण गाण्यामधे त्याना या नौकेचे पिता केलेले होते. तो रोल गाणे संपेपर्यंत निभवायचा होता.

>> Lol

Pages